कॉकटेल लाउंज 2 : व्हाइट रशिअन (White Russian)

कॉकटेल लाउंज 1…व्हिस्की गाथा…लिक्युर गाथा…

कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे व्हाइट रशिअन

पार्श्वभूमी:

नावाने जरी रशिअन असले तरीही हे कॉकटेल रशियातुन आलेले नाहीयेय. वोड्का हा ह्या कॉकटेलचा बेस असल्यामुळॆ ‘रशिअन’ असे नाव आहे. हे कॉकटेल कॉफी लिक्युर पासुन बनवलेले असल्यामुळे ‘आफ्टर डीनर’ कॉकटेल आहे. थोडक्यात भरपेट जेवण झाल्यावर घ्यायचा हा उतारा आहे 😉

कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे.
बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे.
ह्या दोन्ही लिक्युर ‘ऑन दि रॉक्स’ सुद्धा घेउ शकता. फारच भारी चाव असते.

प्रकार: वोडका बेस्ड, क्लासिक कॉकटेल

साहित्य:
वोडका – 1 औस
कल्हुआ – 1 औस
बेलीज आयरीश क्रीम – 0.5 औस
बर्फ
क़ॉफी बीन्स – 2-3 (सजावटी करीता)
ग्लास – ओल्ड फॅशन

कृती:
ग्लासमधे ¾ भरेल असे बर्फाचे खडे घ्या. त्यावर अनुक्रमे वोडका आणि कल्हुआ ओतुन घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर करून घ्या. आता कॉकटेल स्पूनच्या एका टोकावरून बेलीज आयरीश क्रीम ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा. बेलीज आयरीश क्रीमचे ढग वोडका आणि कल्हुआ च्या मिश्रणावर जमा व्हायला हवेत. (आयरीश क्रीम कल्हुआ पेक्षा हलके असल्यामुळॆ वर तरंगते). आता कॉफी बीन्स सजावटी साठी टाका. व्हाइट रशिअन तयार 🙂

 

टीप:
ह्या कॉकटेल मधे बेलीज आयरीश क्रीम वगळले तर त्या कॉकटेलला ब्लॅक रशिअन कॉकटेल म्हणतात. तेही एक क्लासिक ह्या प्रकारात मोडणारे कॉकटेल आहे. पण मला बेलीज आयरीश क्रीम भयंकर आवडते त्यामुळे व्हाइट रशिअन माझे आवडते कॉकटेल आहे.

बहरीन – मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ

व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला.  मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप.
थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या ‘शरिया’ तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे

1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे)
2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष  एकत्र येणे निषिद्ध
3. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जाताना पुरुषाबरोबर (पती अथवा वडील) असणे बंधंकारक
4. जगातील एकमेक देश जिथे मुव्ही थिएटरवर कायद्याने बंदी
5. दारू पिणॆ / बाळगणॆ कायद्यानुसार निषिद्ध (पकडले गेल्यास शिक्षा भय़ंकर)
6. 5 वेळॆच्या नमाजच्या वेळी दुकाने / मॉल्स  कायद्यानुसार बंद
7. मुतव्वा हे धार्मिक पोलिस नमाजच्या वेळी बाहेर फिरणार्‍या कोणालाही पकडून मशिदीमधे घेउन जाउ शकतात
(माझ्या  एका मित्राला नेले होते, बिचारा सांगुन सांगुन थकला कि तो मुस्लीम नाहीयेय 😦 )

पहिल्या 4 गोष्टींवर आणि शेवट्च्या 2 गोष्टींवर मला जास्त काही  हरकत नव्हती /  नाहीयेय, पण नंबर पाच हा मुद्दा माझ्यासाठी फारच जाचक होता. कसे होणार ह्या विवंचनेत असतनाच कळले की माझा व्हिसा ज्या प्रकारचा होता त्याने मी फक्त एक महीना सौदी अरेबीया, रियाध राहु शकतो. एका महिन्यानंतर व्हिसा एक्सटेंशन साठी सौदीबाहेर जाउन येणे बंधंकारक होते.  बहरीन हा एक शेजारी देश जिथे प्रवेशतत्वावर 72 तासांचा व्हिसा मिळतो, तिथे व्हिसा एक्सटेंशन दर एका महिन्यानंतर जावे लागणार होते. मग बहरीन वर गुगलींग करणॆ आलेच. ते केल्यावर जे कळले त्याने आनंद गगनात मावेना.

बहरीन हा मुस्लीम देश असुनही पुर्ण मुक्त देश आहे. मेट्रोपोलीटन संस्कृती आपलीशी केलेला एक सुंदर देश. महत्वाचे म्हणजे सौदीतल्या पाचव्या मुद्याला फाटयावर मारणारा देश. मला तर तो मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे भासला 🙂

सौदीतील जनता बहरीनला विकांताला (Weekend) बहरीनला जीवाचे बहरीन करण्यास जाते. त्यांच्या साठीही तो देश सौदीतील जाचक नियमांमुळॆ  मृगजळच आहे.  सौदीच्या सुल्तानाने सौदी आणि बहरीन ला जोण्यासाठी समुद्रावर एक पुल बांधला आहे, जो विकांताला जास्तीत जास्त वापरला जातो 😉

सौदी ते बहरीन हा 480 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे. भर वाळवंटातुन हा प्रवास करावा लागतो. आजुबाजुला प्रेक्षणीय काहीही नसल्यामुळॆ हा प्रवास फारच रुक्ष होतो, पण बहरीन गाठायच्या कल्पनेनेच तो सुसह्य होतो.



सौदीतुन बहरीनला जाण्याचा समुद्रावरील रस्ता फारच छान आहे. सौदीमधे एकंदरीतच इंफ्रास्ट्रक्चर फार छान आणि अद्यावत आहे. सर्व रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्सचे काटेकोर पालन करणारे आहेत.

480 किमी अंतर कापल्यावर, हा सुंदर रस्ता आणि पूल पार केल्यावर दिसतो बहरीनचा स्वागत फलक. इथे ‘या आपले स्वागत आहे’ ‘बहरीन वेल कम्स यु’ असला काही प्रकार दिसला नाही. पण त्याचे काही वाटून घेतले नाही, सौदीमधुन घटकाभर सुटका करून देणार्‍या देशात स्वागत फलकापेक्षा जे हवे होते ते मिळणार होते आणि स्वागत फलकापेक्षा त्याचे महत्व कैक पटीने जास्त होते 🙂

सुंदर बहरीन शहर

बहरीनमधल्या सुंदर इमारती. अत्याधुनिक आणि अद्यावत आर्किटेक्चर वापरून बांधलेल्या इमारती मला फारच आवडल्या. ह्या बहरीनच्या राजेशाही कुटुंबाच्या कलात्मकतेची जाणीव करून देण्यार्‍या आहेत.

बहरीनचे राजे आणि राजकुमार, ह्यांच्या संमतीशिवाय इथे झाडाचे पानही हलु शकत नाही. सौदीच्या राजाशी ह्यांचा राजेशाही घरोबा आहे. बहरीन मधे जेव्हा स्वातंत्र्यासाठी जनतेचा उठाव होत होता तेव्हा सौदीने ह्या राजे आणि राजकुमारांच्या आणि बहरीनच्या संरक्षणासाठी सौदीचे लष्कर बहरीनला रवाना केले होते. (पण बहरीन एवढे मुक्त आहे की तिथल्या जनतेला अजुन काय हवे आहे ते काही मला कळले नाही, असो ते म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तसे काहीसे असावे)

आणि आता शेवटी सर्वात महत्वाचे, जे काम करण्यासाठी येवढी यातायात केली ते काम ‘मदिरापान’. मी आणि माझा कलीग संपथ मनसोक्त आणि ‘हलेडुले’ होइपर्यंत एका महिन्याचा कोटा पुर्ण करून घेण्यात दंग. पुढचा एक महिन्या ह्या ‘हाय’ वर आणि आठवणींवर काढायाचा होता 😦

असे हे मला भावलेले बहरीन, वाळवंटातले मृगजळ.

मायदेशी परत

सकाळी सात वाजता घरी, पुण्याला पोहोचलो. मस्त ताणून दिली आल्यावर आणि आत्ताच उठतो आहे. Mails, Social updates check करून परत झोपायचा प्लान आहे. खुप थकयला झाले आहे जाग्रणामुळे.

अलविदा – रियाध, सौदी

आज अडिच महिन्याच्या कालावधीनंतर परत मायदेशात जाणार आहे. इथले काम संपले (की संपवले 😉 ) आणि आता बायको-मुलांना भेटण्याचे वेध लागले आहेत.

ह्या रूक्ष देशातून परत जाताना अजिबात भरून येत नाहीयेय. उलट भलताच आनंद होत आहे.

मायदेशा मी येत आहे …………

कॉकटेल लाउंज १ : Mojito (mo-HEE-to, मोहितो)

‘कॉकटेल लाउंज’ ही माझ्या आवडीच्या कॉकटेल्सची मालिका सुरू करीत आहे. ह्यात काही खास ‘देसी धमाका’ कॉकटेल्ससुद्धा असणार आहेत.
तर ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील पहिले कॉकटेल आहे Mojito (mo-HEE-to, मोहितो).

Mojito 1

मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे 🙂
उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? ;))

साहित्य:
व्हाइट रम – 2 औस
लिंबाचे लहान तुकडे(फोडी) – 4-5
ब्राउन शुगर – एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर)
पुदीन्याची ताजी पाने – 8
लिंबाचा रस – 0.5 औस
शुगर सिरप – 0.5 औस
सोडा
बर्फ – बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस)
ग्लास – कोलीन्स असल्यात उत्तम

कृती:
ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे.
(चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते)
आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर
(ह्या, ‘ढवळा’ हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच 🙂 ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार.

मोहितो 2

गाथा लिक्युर्सची (Liqueur)

मागच्या धाग्यात (Blog Entry)  व्हिस्कीची गाथा मांडली होती, आता ह्या भागात लिक्युर्सची गाथा मांडतोय.

ज्या काळात किमयागार कुठल्याही धातुचे सोन्यात रुपांतर करणार्‍या परीसाच्या शोधात होते तेव्हा Bénédictine किंवा Monk (भिक्षु) ही मंडळी रामबाण अशी मात्रा (Potion) तयार करण्यात दंग होती. वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी, झाडपाला, मुळ्या, बीया, मसाले, फुले, फळे अश्या गोष्टींच्या मिश्रणापासून तयार होणारी ही मात्रा (Potion) हे मॉन्क्स औषधी उपचारांसाठी वापरत.

पण मणुष्यप्राणी हा जात्याच उठाठेवी करण्यात पारंगत आहे. (अगदी बाबा आदमपासून, त्याच्या ‘उठा’ठेवींमुळेच तर तुम्ही (मीही) हा धागा वाचण्यास ह्या जगात आहोत 😉 ) इटली, फ्रांस इथल्या काही चळवळ्या, उठाठेवी आणि कलाकार आत्म्यांनी लगेच ह्या मात्रेपासून मेंदुला झिंग आणणारे, मादक असे काहीतरी बनविण्याचे प्रयत्न चालू केले आणि त्यांच्या ‘प्रयत्ने वाळू रगडीता…’ ह्या चालीवर ‘प्रयत्ने मिश्रणॆ करता…’ अशा प्रयत्नांना यश येउन, मित्रांनो, लिक्युर तयार झाली. तर ‘हर्बल मेडीसीन’ ह्या वैद्यशास्त्राच्या शाखेपासून अचानकपणॆ मनुष्यप्राण्याला प्राप्त झालेला हा अदभुत चमत्कार म्हणजे ‘लिक्युर्स’ होय.

लिक्युर हा शब्द ‘Liquefacere’ ह्या लॅटीन क्रियापदापासून घेण्यात आला आहे. ‘Liquefacere’ म्हणजे To extract Aroma and Flavor (मराठीत नाही हो हे लिहीता आले 😦 ) लिक्युर तयार करण्याची पद्धत ही अशीच असल्यामुळे त्या मादक मिश्रणाला लिक्युर हे नाव सार्थ झाले.

लिक्युर ही मुख्यत्वे फळांपासून तयार होत असल्यामुळॆ ही चवीला गोड असते. त्यामुळे लिक्युर ही ‘आफ्टर डीनर’ ड्रींक म्हणून वापरात येउ लागली. क़ॉकटेल्सचे तर पानच हीच्यावाचून हलू शकत नाही.

क़ॉकटेल्स मधे वापरण्यात येणारी काही लिक्युर्स (माझ्या माहितीतील) आता बघुयात.

1. हर्ब बेस्ड लिक्युर्स

1.1 बेनेडीक्टाइन (Benedictine)


ही फ्रेंच लिक्युर 26 ते 27 प्रकरच्या औषधि वनस्पतींनपासून बनवली जाते. 40% अल्कोहोल असलेली ही लिक्युर पंधराव्या शतकात शोधली गेली. ह्या लिक्युरच्या बाटलीवर D.O.M Deo Optimo Maximo असे लिहीलेले असते, त्याचा अर्थ To God, Most Good, Most Great असा होतो. मी ही लिक्युर वापरलेली नाही, त्यामुळॆ जास्त काही माहित नाही चवीबद्दल.

1.2 चारत्रुस (Chartreuse):

ही लिक्युर फ्रेंच चारथुसिअन मॉन्क्सनी 130 वेगवेगळ्या औषधि वनस्पतींनपासून बनवली. फारच छान आणि ऎरोमॅटीक चव असते. शॉट ग्लास मधे घेउन एक एक सीप घेउन चव जीभेवर रेंगाळत ठेउन आजमावयाची चीज आहे ही लिक्युर.
मी ही लिक्युर एका दारू सेशन (4-5 पेग डाउन) नंतर घेतली होती, एक मित्र घेउन आला होता. त्यानंतर जे काही झाले ते मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये 😉 50-55% अल्कोहोल असते ह्या लिक्युर मधे. एका आठवड्यानंतर धीट होउन मग छान चवीचा आस्वाद घेतला.

2. संत्रा लिक्युर्स

2.1 ग्रॅंड मार्निअर (Grand Marnier):

मोस्ट पॉपुलर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी लिक्युर संत्र्यापासून बनवतात. कोन्यॅक ह्या ब्रॅंडीच्या आणि दर्जेदार कॅरेबिअन कडू संत्र्याचा सुकवलेल्या सालीच्या मिश्रणापासून ही लिक्युर बनवली जाते. 40% अल्कोहोल कंटेंट असते ह्या लिक्युर मधे.स्वतःची एक ओळख आहे ह्या लिक्युरची म्हणूनच ग्रेड 1 ची ऑरेंज लिक्युर म्हणून गणली जाते आनि भयानक महाग असते.

2.2 कॉइंत्रु (Cointreau):

मोस्ट पॉपुलर अशी ही लिक्युर संत्र्यापासून बनवतात. कॉइंत्रु हे नाव ही लिक्युर शोधणार्‍या आणि बनविनार्‍या कुटुंबाच्या आडनावावरून पडलेले नाव आहे. बहुतेक प्रख्यात क्लासिक कॉकटेल्समधे ही लिक्युर वापरली जाते. ही ऑन दी रॉक्स सुद्धा रात्रीच्या जेवणानंतर भारी असते.

2.3 ट्रिपल सेक (Triple Sec):

सगळ्या 40% अल्कोहोल असणार्‍या ट्रिपल डिस्टील्ड ऑरेंज लिक्युर जनरली ट्रिपल सेक म्हणून ओळखल्या जातात. ह्या गरीबांच्या कॉइंत्रु किंवा ग्रॅंड मर्निअर असतात.

2.4 ब्लु कुरासाओ (Blue Curacao):

कॅरेबिअन बेटांवर मिळणार्‍या कडू संत्र्याचा सुकवलेल्या सालीपासून ही लिक्युर बनबवली जाते. हीचा रंग निळा असतो. निळ्या रंगांची कॉकटेल्स जर दिसली किंवा प्यायलात तर खुशाल समजा कि त्यात ब्लु कुरासाओ आहे म्हणून. बोल्स हा नेदरलॅंड्चा ब्रॅन्ड फेमस आहे ब्लु कुरासाओसाठी.

3. इतर फळांच्या लिक्युर्स

3.1 ऎमरेटो (Amaretto):

ही इटालीअन लिक्युर आहे. (इटलीची ऎलर्जी असणार्‍या ‘चड्डीवाल्यांना’ कदचित ह्या लिक्युरचीसुद्धा ऎलर्जी येण्याची शक्यता आहे 😉  ह.घ्या. हे सांगणे न लगे) ही लिक्युर बदाम किंवा ऎप्रिकॉट (जर्दाळू) पासून बनवली जाते. व्हिस्की बेस्ड किंवा स्ट्रॉंग चव असणार्‍या लिकर बेस्ड कॉकटेल्स मधे गोडवा आणण्यासाठी ही लिक्युर वापरतात.

3.2 शॅम्बोर्ड (Chambord):

फ्रान्समधे बननारी ही लिक्युर रास्पबेरी फळापासून बनवितात.

3.3 ग्रेनेडाइन (Grenadine):

डाळिंबापासून बनवलेली ही लिक्युर कॉकटेल्स साठी मस्ट असलेली आणि मिक्सिंगसाठी जास्त वापरली जाणारी लिक्युर आहे. ऑरंज ज्युस वापरून ‘सनराइज’ किंवा ‘सनसेट’ असा इफेक्ट आणण्यासाठी ह्या लिक्युरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

 3.4 पॅसोआ (Passoa):

पॅशन फ्रुटपासून बनवली जाणारी ही एक फ्रेच लिक्युर आहे.
मागे गोव्यावरून पॅशन फ्रुटची Passion अशी ह्या Passoa ची भ्रष्ट नक्कल असलेली लिक्युर मी आणाली (स्वस्तात मिळाली हो) चवीला आणि इफेक्टला छान आहे, पैसा वसूल आहे.

3.5 मिदोरी (Midori):

जपानची लिक्युर कॅटेगरीला दिलेली ही देणगी आहे. मेलनपासून बनवलेली ही लिक्युर जपानच्या प्रख्यात सांतोरी डिस्टीलरी मधे बनवली जाते. जपानी भाषेत हिरव्या रंगाला मिदोरी म्हणतात. ह्या लिक्युरच्या हिरव्या रंगावरून हीला मीदोरी हे नाव देण्यात आले आहे.

3.6 सदर्न कंफर्ट (Southern Comfort):

ही अमेरीकन लिक्युर बर्बन व्हिस्की, सायट्रस आणि पीच ह्यांच्या मिश्रणाने बनवतात.

3.7 मालिबु (Malibu)

ही लिक्युर रम आणि नारळाच्या पाण्यापासून बनवली जाते. डार्क रम बेस्ड कॉकटेल्स मधे ही लिक्युर प्रामुख्याने वापरली जाते.

4. क़्रीम (Crème) लिक्युर्स:

ह्या लिक्युर्स Cream लिक्युर्स पेक्षा वेगळ्या असतात, फळांपासून बनवलेल्या. ह्यांमधे डेअरी प्रोडक्ट्स नसतात.

4.1 क्रीम दे कसाओ (Crème De Cacao)

Cocoa च्या बीयांपासून (Beans) ही लिक्युर बनवतात.

4.2 क्रीम दे कॅसिस (Crème De Cassis)

जांभळ्या रंगाच्या ब्लॅककरंट फळापासून बनवलेली ही एक फ्रेंच लिक्युर आहे.

4.3 क्रीम दे मेन्थ (Crème De Menthe)

पुदीन्या पासून बनवलेली ही एक हिरव्या रंगाची गोड लिक्युर आहे.

5. डेअरी प्रोडक्ट लिक्युर्स

ही कॅटेगरी माझी भयंकर आवडती आहे.

5.1 बेलीज आयरीश क्रीम (Bailey’s Irish Cream):

जगात सर्वात जास्त आवडली जाणारी आणि प्रख्यात अशी ही लिक्युर आयरीश व्हिस्की, चॉकलेट आणि क्रीम (आयरीश साय) ह्यांच्या मिश्रणाने बनवली जाते. 17% अल्कोहोल असलेली ही लिक्युर कॉफी बेस्ड किंवा क्रीम बेस्ड कॉकटेल्स मधे वापरली जाते. ऑन दी रॉक्स सुद्धा अतिशय चवीष्ट असते, आणि सर्रास ऑन दी रॉक्स घेतली जाते. माझी स्वतःची अत्यंत आवडती लिक्युर आहे ही.

5.2 कलुआ (Kahlua):

अरेबिका कॉफी बीन्सपासून बनवली जाणारी ही एक प्रसिद्ध आणि अतिशय चवदार अशी लिक्युर आहे. ऑन दी रॉक्स तर भारीच लागते ही लिक्युर.  आफ्टर डीनर कॉकटेल्ससाठी जास्त उअपयोग केला जातो. ( मालिकेतील पुढचे कॉकटेल ह्या लिक्युर वर आधारीत आहे.)

अश्या प्रकारे लिक्युर्सची गाथा इथेच संपवतो.

नोट:
सर्व इमेजीस आंतरजालावरून साभार.

गाथा व्हिस्कीची

एशिया मधे सर्व ड्रिंक्स मधे व्हिस्की जास्त प्रमाणात घेतली जाते. बहुतेक जणांची व्हिस्की हा आवडता मद्यप्रकार आहे. व्हिस्की बद्दल मला माहित असलेली माहिती ह्या व्हिस्की गाथेत मांडत आहे.

डिस्क्लेमर: माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी खरडत आहे, चूकभुल देणे घेणे  🙂

प्रथम सुरुवात करुया व्हिस्कीच्या स्पेलिंगने. व्हिस्कीची दोन स्पेलिंग्स आहेत, 1. Whisky and 2.Whiskey.

1. Whisky : स्कॉच, कॅनेडीअन आणि जापनीज आयरिश व्हिस्की ह्या स्पेलिंगने लिहितात.
2. Whiskey : अमेरिकन आणि आयरिश व्हिस्कीचे स्पेलिंग असे लिहीतात.

हे अमेरिकन सर्व गोष्टी जगाच्या उलट करण्यात का धन्याता मानतात कोण जाणे. बघा ना, वीजेचे स्वीच उलटे, रस्त्यावर गाड्या उलटया बाजूने, सेXX… जाउदे विषयांतर होतेय हे चाणाक्ष वाचाकांनी जाणाले असेलच 😉
आइशप्पथ, ‘चाणाक्ष वाचाकांनी’ हे असे लिहीण्याची कितीतरी वर्षांपासुनची सुप्त इच्छा आज पुर्ण करून घेतली, ह्याला म्हणतात मौके पे चौका 🙂 असो मुळ विषयाकडे वळुयात.

ढोबळ मानाने व्हिस्कीचे दोन प्रकार मोडतात 1. सिंगल मॉल्ट व्हिस्की     2. ब्लेन्डेड व्हिस्की

आता म्हणाल की ही ‘मॉल्ट’ काय भानग़ड काय आहे? पण तीच तर खरी गंमत आहे. व्हिस्कीचे मूळ ह्या मॉल्ट मधेच दडलेले आहे. पाण्यात धान्य भिजवून त्याला मोड आणायचे आणि ते भट्टीत (Kiln) भाजून सुकवयचे. ह्या प्रक्रियेनंतर त्या बिचार्‍या धान्याचे जे काही होते त्याला मॉल्ट म्हणतात. जे प्रतिथयश ब्रॅन्ड्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या भट्ट्या ही त्यांची खासिअत असते. व्हिस्कीची चव खुपशी ह्या भट्टीवर पण अवलंबून असते.

बर आता धान्य असे वाचल्यावर सर्व शाकाहारी वाचकांच्या चेहेर्‍यावर आलेली चमक मला दिसतेय. होय व्हिस्की पुर्ण शाकाहारी आहे 😛 व्हिस्की प्रामुख्याने जवस, नाचणी आणि मका ह्या धान्यांपासुन बनवतात. वापरलेल्या धान्यामुळे आणखीन पोट्प्रकार पडतात ते पुढे येतीलच.

तर सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे डिस्टील केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. सर्व काही ‘एकच’ असल्यामुळे बनवन्याची प्रक्रिया महाग होते म्हणुन सिंगल मॉल्ट व्हिस्की बरीच महाग असते (आता हे विधान व्यक्तीसापेक्ष असु शकेल, पण माझ्यासारख्याला महागच)
तरीही ग्लेन फिडिच हा माझा आवडता ब्रॅंड काट्कसर करून माझ्या मीनीबार मधे विरजमान झालेला आहे हे जाता जाता येथे नमूद करतो.
रूम टेंपरेचरची सिंगल मॉल्ट किंवा ऑन दि रॉक्स न घेणार्‍याचे ह्या भूतलावर जन्म घेणे फुकट आहे. जर त्यात थोडे ‘ड्राय व्हर्मूथ’ टाकले तर ते पिण्यात जे सुख आहे त्याची तुलना केवळ, इंद्राच्या दरबारात बसून वारूणी पिणार्‍या गंधर्वाच्या सुखाशीच होउ शकते. 🙂

ब्लेन्डेड व्हिस्की ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असते/असू शकते. तसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेलया दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही जानेमाने ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.

आता धान्यामुळे पडणारे पोटप्रकार बघुयात

स्कॉच व्हिस्की (सातू/जव): स्क़ॉट्लंड मधे तयार होणार्‍या व्हिस्कीला स्कॉच व्हिस्की म्हणतात. उच्च दर्जाची जवस आणि स्प्रिंग वॉटर हे ही व्हिस्की बनवण्यासाठी अत्यावश्यक असते. मॉल्ट तयार करताना मोड आलेले कड्धान्य भाजण्यासाठी peat ह्या प्रकारच्या कोळश्याचा धूर (स्मोक) वापरला जातो आणि तेच असते ह्या स्कॉचच्या उच्च दर्जेदार चवीच्या यशाचे गमक. स्कॉचमधे पाणि घालून पिणारे पीओत बापडे मला मात्र ऑन दि रॉक्सच आवडते.

आरयरिश व्हिस्की (मीक्स / ब्लेन्ड): आयर्लंड मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे आरयरिश व्हिस्की. आयरिश लोकांचे म्हणणॆ आहे कि स्कॉटिश लोकांनी व्हिस्की ‘प्यायला’ सुरुवात करण्याआधिपासून ते व्हिस्की ‘तयार’ करीत होते. ही व्हिस्की मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिश्रणापासून (Pure-pot still) तयार केली जाते आणि ती ट्रिपल डिस्टील्ड असते. ह्या व्हिस्कीच्या मॉल्ट प्रक्रियेमधे कोळश्याचा धूर वापरला जात नाही त्यामुळे ह्या व्हिस्कीची चव स्कॉचच्या चवी पेक्षा वेगळी असते.

कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की (मोवरी): कॅनडामधे मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की. ही व्हिस्की Rye म्हणजे नाचणी पासून बनवितात. कॉकटेल जगतात ही व्हिस्की, व्हिस्की बेस्ड कॉकटेल बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरतात. ‘क्राउन रोयाल’ हा एक कॅनडीअन व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅन्ड आहे. (प्रख्यात अश्यासाठी की तो माझ्या मीनीबार मधे दाखल आहे 😉 )

बर्बन व्हिस्की (मका): अमेरिकेत तयार होणार्‍या व्हिस्कीला बर्बन व्हिस्की असे म्हणतात. ह्या व्हिस्की तयार करण्यास 51% मका वापरतात. ही व्हिस्की प्रामुख्याने Tennessee आणि Kentucky ह्या स्टेट्स मधे बनवली जाते. मक्यामुळे ही चवीला थोडी गोड असते. जॅक डॅनीअल्स हा ह्या व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅंड आहे.

जापनीज व्हिस्की: जपान हा टॉप 5 देशांपैकी व्हिस्की उत्पादक देश बनला आहे. जपानमधी ‘Santory’ ही डिस्टीलरी व्हिस्की बनवते. जापनीज व्हिस्की ही स्कॉच व्हिस्की किंवा आयरीश व्हिस्की बनवन्याच्या पद्ध्तीने बनवली जाते.

भारतीय व्हिस्की (साखरेची मळी): भारतीय व्हिस्की प्रामुख्याने साखरेची मळी ह्यापासून बनवितात. आद्य दारू उत्पादक, लिकरकिंग, माननीय विजय माल्या ह्यांचा मॅक्डोवेल्स नं 1 हा ब्रॅंड हा तमाम भारतीयंचा आवडता ब्रॅंड समजला जातो.
माननीय कृषिमंत्री ह्यांच्या कृपेने भारत व्हिस्की उत्पादनात आघाडी मारेल अशी चिन्हे दिसत आहेत, पण हे लोकशाहीतील विरोधक म्हणजे ना, ह्यांना मेले जरा काही चांगले म्हणुन झालेले बघवतच नाही.

अश्याप्रकारे ही व्हिस्कीची गाथा इथेच संपवतो.  🙂

हानामी (花見) : साकुरा

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत – मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत. 

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

 

 

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

लाल स्वेटरमधे मी व सौ आणि माझे दोन बछडे जीवाचा साकुरा करताना 😀

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव 🙂

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. 0:)

तो आणि ती

तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर
ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर

तो ‘दील और दिमाग़ से’ आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा
ती फक्त ‘दील से’ आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी

तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा
ती नातेवाइक, मुले, समाज… काय म्हणेल ह्या विचाराने हैराण होत आयुष्य जगणारी

तो काहीसा हळवा, बराचसा माघार घेणारा पण कधी कधी आक्रमक होणारा
ती हळवेपणाचा आव आणून टोचून बोलून घायाळ करणारी

तो नाजूक आठवणींच्या वलयात गुरफटून, गालातल्या गालात हसून आनंद मिळवणारा
ती ‘कसला विचार करतोय कोण जाणॆ?’ असे म्हणून आपल्याच विश्वात आनंदणारी

तो एकांतात, नाजूक क्षणी, नाजूक क्षण वेचून आठवणींच्या कप्प्यात साठवण्याचा कसोशिने प्रयत्न करणारा
ती एकांतात, नाजूक क्षणी ‘तुझे माझ्यावर खरेच प्रेम आहे ना रे’? असे विचारून धुंदी उतरवणारी

तो अचानक उत्कटतेने तीला कवेत घेउन, चुंबनांची बरसात करून घुसमटून टाकावे असा विचार करणारा
ती ‘वेळे काळाचे भानच नाही, जनाची नाही तर मनाची तरी’ असे म्हणून रंगाचा बेरंग करणारी

तो त्याच्यातल्या उणिवा तीने भरून काढून त्याला साथ द्यावी असे वाटणारा, पण हे तीला कसे समजवून सांगावे ह्या विचारांनी घुसमटणारा
ती सगळे मलाच बघावे लागते, तो कधीतरी मला समजून घेइल, ह्या एकांगी विचारांनी घुसमटून जाणारी

तो कधी-कधी हे सगळे असह्य होउन भांड-भांड भांडणारा
ती तेवढ्याच आक्रमकतेने भांड-भांड भांडणारी

तो नंतर माघार घेउन तीला रंगात आणून खुलवणारा
ती समजूतदारपणे, खुषीने रंगात येउन खुलणारी

तो तीच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून तीच्यावर मनापासून प्रेम करणारा
ती त्याच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून त्याच्यावर तीतकेच मनापासून प्रेम करणारी