‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे पहिले मॉकटेल आहे ग्रीन डिलाइट
पार्श्वभूमी:
मला माझ्या कॉकटेल्स बरोबर माझ्या मुलांसाठी काहीतरी रंगीत मॉकटेल्स करावीच लागतात.
तर काल रविवार, मुलांसाठी एक मस्त मॉकटेल बनवले. खुप दिवसांनी बनवल्यामुळे मुले खुष तर धाग्याला विषय मिळाल्यामुळे मी खुष,
‘एक तीर मे दो शिकार’. (तसा मी फार हुषार आहे बर का, लहानपणापासुनच, दिसण्यावर जाउ नका ;))
तर हे मॉकटेल ही पुर्णपणे माझी रेसिपी आहे, नावासहीत. आता असे मॉकटेल असुन कोणी ते ट्राय केले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
साहित्य:
मिंट (पुदीना) सिरप – 1 औस (30 मिली)
लेमन आणि/किंवा आले कॉर्डिअल – 10 मिली
ताज्या मोसंबीचा रस – 10 मिली
ताज्या मोसंबीची एक चकती सजावटीसाठी
सोडा
बर्फ
ग्लास – मॉकटेल ग्लास
कृती:
शेकर मधे 3/4 बर्फ भरून घ्या. त्यात मिन्ट सिरप ओतुन घ्या. आता एकास चार ह्या प्रमाणात पाणी टाकुन घ्या. (30मिली * 4)
आता बाकीचे सर्व साहित्य शेकर मधे ओतुन घ्या. हे सर्व मिश्र ण शेकरमधे 4-5 मिनिटे मस्त शेक करुन घ्या. मॉकटेल तयार होण्याची खुण म्हणजे शेकरवर बाहेरुन जमा झालेले बाष्प. आता मॉकटेल ग्लासमधे मिश्रण गाळुन घ्या. सोडा टाकुन ग्लास टॉप अप करा. (सोडा ह्या मॉकटेलसाठी मस्ट आहे बरं का, तो वगळल्यास चव बदलु शकते मग ती माझी जबाबदारी नाही)
चला तर मग ग्रीन डिलाइट तयार आहे.
अश्या प्रकारेही सजावट करू शकता 🙂
नोट:
हे सर्व साहित्य पुण्यात हक्काने मिळण्याचे ठिकाण दोराबजी, कॅम्प. पण आता सर्वच मॉल्स्मधे सर्व सिरप अगदी आरामात मिळतात.