कॉकटेल लाउंज : क्लासिक मार्टीनी / ड्राय मार्टीनी

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “क्लासिक मार्टीनी”

पार्श्वभूमी:

घरात काम चालु असल्यामुळे बार बंद होता. आता काम झाले आणि बार चालु केला. 🙂
दिवाळीसाठी एक मस्त कडक कॉकटेल टाकावे असा विचार केला आणि समोर जीन दिसली.लगेच कॉकटेल ठरले “मार्टीनी”.

‘लेडीज ड्रिंक’ अशी हेटाळणी केली गेलेल्या ‘जीन’ पासुन बनवलेले हे कॉकटेल आहे. जीन हे लेडीज ड्रिंक असे म्हणणार्यांनी हे कॉकटेल प्यावे आणि मग जीनला लेडीज ड्रिंक असे म्हणण्याची हिंमत करून दाखवाववी. अतिशय जहाल, कडक (Potent) असे कॉकटेल आहे हे.
ऊगाच नाही 007, जेम्स बॉण्डचे आवडते ड्रिंक हे. 🙂 पण त्याचे कॉकटेल जरा वेगळे असते, जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात पुन्हा कट्टर ब्रिटीश, सामान्य माणसाप्रमाणे कसा काय वाग़णार तो 😉

प्रकार: जीन बेस्ड, क्लासिक कॉकटेल

साहित्य:

जीन – 2 औस (60 मिली)
ड्राय वर्मुथ – 15 मिली
बर्फ
3 ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी / 1 टुथपिक
बार स्पुन
Hawthorne strainer किंवा गाळणे

ग्लास: – कॉकटेल (ह्या  ग्लासला मार्टीनी ग्लास  असेही म्हणतात)

कृती:

कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.

मिक्सिंग ग्लास 3/4 बर्फाने भरून घ्या. आता त्यात जीन आणि ड्राय व्हर्मुथ ओता. बार स्पुनने व्यवस्थित स्टर करून घ्या. व्यवस्थित स्टर झाल्यावर Hawthorne strainer‌‌‌‌‌ वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
आता 3 ऑलिव्ह टुथपिकवर अडकवून कॉकटेल ग्लासमधे हळुच सोडा.

क्लासिक मार्टीनी तयार आहे:)
चियर्स!

माझा लेख – सामना दिवाळी अंक 2011

ह्या वर्षीच्या मंगलमय दिवाळीला, माझे लिखाण छापील स्वरूपात प्रकाशित होण्याचे माझे स्वप्न साकार झाले.
सामनाच्या दिवाळी अंक 2011 मधे माझा लेख प्रकाशित झाला आहे.

सामनाच्या दिवाळी अंकात ह्यावर्षी ‘भ्रष्टाचार’ ही एक मध्यवर्ती संकल्पना होती.
त्यावर एक खुसखुशीत लेख मी लिहु शकेन अशी खात्री माझे आंतर्जालावरील मित्र ‘श्रियुत श्रावण मोडक’ यांना होती.
तसे त्यांनी मला सुचवले आणि लेख लिहुन घेतला. त्यांचे आभार ह्या निमीत्तने मानतो.

लेखावर जरा ‘संपादकांची (सेंसॉरची)’ कात्री लागली आहे पण त्याने लेखाची खुमारी अजिबात गेली नाहीयेय.
कृपया लेख वाचुन आपला अभिप्राय नक्की कळवा!

तसेच माझा एक लेखक मित्र ‘प्रसाद ताम्हनकर’ ह्याचाही एक लेख ‘मराठी ब्लॉग विश्व’ ह्याच अंकात प्रकाशित झाला आहे.
विविध मराठी  ब्लॉग्सची ओळख त्याने अतिशय सुंदरतेने ह्या लेखात करुन दिली आहे. त्यात त्याने माझ्या ह्या ब्लॉगचाही उहापोह केला आहे. त्याचेही ह्या निमीत्ताने आभार मानतो.

त्या लेखाच्या काही भागाचे हे छायाचित्र:

पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली

ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच.

सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’. लगेच टोरंट वरून डाउनलोड करून घेतला आणि ताबडतोब अधाश्यासारखा बघुन टाकला.

स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स म्हणजेच मायक्रोसोफ्ट आणि अ‍ॅपल ह्यांच्या वादावरचा हा चित्रपट. रूढ अर्थाने चित्रपट म्हणता येणार नाही. थोडाफार माहितीपटाच्या धर्तीवर जातो.

स्टीव जॉब्सचा मित्र स्टीव्ह वॉझनिअ‍ॅक ह्याचे आणि बिल गेट्सचा मित्र स्टीव्ह बाल्मर ह्यांचे मधे मधे नरेशन आणि घटना मालिका असा हा चित्रपट आहे. दोघांच्याही जीवनातला संघर्ष, कॉलेज जीवनातला, स्वतःची ओळख निर्माण करण्यामागचा, बलाढ्य कंपनी चालु करण्यामागाची तळमळ, अहंकार हा चित्रपट अगदी सुंदरपणे आपल्यासमोर उलगडून दाखवतो.

चित्रपट सुरु होतो स्टीव्ह जॉब्सच्या स्टोरीने. त्याच्या आयुष्यतला अ‍ॅपल सुरु करण्यआधीचा काळ दाखवत. त्यानंतर येतो बिल गेट्सचा मायक्रोसोफ्ट सुरु करण्यआधीचा काळ. दोघांची कथानकं नरेशन आणि घटनाक्रम ह्यांच्या सहायाने अतिशय रंजकपणे दिग्दर्शक आपल्यापुढे ठेवतो. त्यानंतर ही स्वतंत्र कथानकं एका वळणावर एकत्र येतात जेव्हा स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स समोरासमोर येतात. मग त्या दोघांचे आपापली कंपनी बलाढ्य करण्यासाठीचे डाव, राजकारण आणि कूट्नीती ह्यांनी भरलेले कथानक ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’ हे चित्रपटाचे नाव सार्थ करते.

Noah Wyle ह्या नटाने उभा केलेला स्टीव्ह जॉब्स निव्वळ लाजवाब! त्याने स्टीव्हची आढ्यता, बेमुर्वतपणा, आपल्याच मस्तीत जगण्याचा कैफ अगदी ताकदीने पेललाय. अक्षरश: भुमिका जगलाय तो.
त्याचा हिप्पी अवतार सोडुन एकदम सुटाबुटात तो एका संगणक प्रदर्शनात येतो तो सीन आणि एका उमेदवाराचा अ‍ॅपल्साठी मुलाखत घेण्याच्या सीन मधे तर तो निव्वळ आहाहा….

Anthony Michael Hall ह्या नटानेही बिल गेट्सही अगदी सार्थपणे रंगवलाय. बिल गेट्सचा धुर्तपणा अतिशय मस्त रंगवला आहे बेट्याने.

‘लोकांकडे मी जाण्या ऐवजी लोकचं माझ्याकडे धावत येताहेत’ हे पहिला अ‍ॅपल संगणक सादर करणार्‍या स्टीव्हचे उद्गार अ‍ॅपलमागची स्टीवची भुमिका स्पष्ट करतात तर ‘आज लोकांना माझी गरज नाहीयेय पण मीच त्यांची गरज बनेन’ हे बिलचे उद्गार मायक्रोसॉफ्टमागची बिलाची भुमिका स्पष्ट करतात.

संगणक विश्वातील ‘दादा’ लोकांचे ऐहिहासिक पर्व उलगडणारा, आवर्जुन पहावा असा, ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’
(मला तर फारच आवडला).

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.

स्टीव जॉब्सला मानाचा मुजरा…

स्टीव्ह एक सच्चा, हाडाचा, आणि खराखुरा ‘आर्किटेक्ट’!

प्रॉडक्ट्चे, हार्ड्वेअर डिझाइन पासुन सॉफ्ट्वेअर डिझाइन ते सर्वसमावेशक युजर इंटरफेस डिझाइन ह्या सर्वांचा एकहाती विचार करण्याची पात्रता आणी व्हिजन असलेला एकमेव खरा इंजिनीअर!

स्वत:च्याच कंपनीतुन हाकलले गेल्यानंतर जिद्दीने नवीन कंपनी चालु करुन ती मुळ कंपनीला विकत घ्यायला भाग पाडणे
आणि पुन्हा एक बलाढ्य अशी कंपनी बनवणे हे सर्व करु शकणारा विसाव्या शतकातील एकमेव अवलिया!

लिसा, मॅकिंतोश, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, आयपॅड आणी अ‍ॅप स्टोअर ह्या आणि अश्या अनेक उच्च अभियांत्रिकी मुल्य
असलेली प्रॉडक्ट्स त्याने संगणक विश्वाला बहाल केली.

संगणक इतिहास, उच्च अभियांत्रिकी मुल्यांशी कधीही तडजोड न कराणार्‍या स्टीव्हच्या नावाशिवाय अपूर्ण असेल.
त्याइतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनीच लिहीले जाईल. ह्या थोर आर्किटेक्टचा व्यावसायिक आणि शोध प्रवास अनुभवायला मिळाला ह्याचा
आणि त्याच्या पिढीत जन्माला आल्याचा मला अभिमान आहे.

पुन्हा एकदा ह्या अवलियाला मानाचा मुजरा!

– (iSad) ब्रिजेश