पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली


ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच.

सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’. लगेच टोरंट वरून डाउनलोड करून घेतला आणि ताबडतोब अधाश्यासारखा बघुन टाकला.

स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स म्हणजेच मायक्रोसोफ्ट आणि अ‍ॅपल ह्यांच्या वादावरचा हा चित्रपट. रूढ अर्थाने चित्रपट म्हणता येणार नाही. थोडाफार माहितीपटाच्या धर्तीवर जातो.

स्टीव जॉब्सचा मित्र स्टीव्ह वॉझनिअ‍ॅक ह्याचे आणि बिल गेट्सचा मित्र स्टीव्ह बाल्मर ह्यांचे मधे मधे नरेशन आणि घटना मालिका असा हा चित्रपट आहे. दोघांच्याही जीवनातला संघर्ष, कॉलेज जीवनातला, स्वतःची ओळख निर्माण करण्यामागचा, बलाढ्य कंपनी चालु करण्यामागाची तळमळ, अहंकार हा चित्रपट अगदी सुंदरपणे आपल्यासमोर उलगडून दाखवतो.

चित्रपट सुरु होतो स्टीव्ह जॉब्सच्या स्टोरीने. त्याच्या आयुष्यतला अ‍ॅपल सुरु करण्यआधीचा काळ दाखवत. त्यानंतर येतो बिल गेट्सचा मायक्रोसोफ्ट सुरु करण्यआधीचा काळ. दोघांची कथानकं नरेशन आणि घटनाक्रम ह्यांच्या सहायाने अतिशय रंजकपणे दिग्दर्शक आपल्यापुढे ठेवतो. त्यानंतर ही स्वतंत्र कथानकं एका वळणावर एकत्र येतात जेव्हा स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स समोरासमोर येतात. मग त्या दोघांचे आपापली कंपनी बलाढ्य करण्यासाठीचे डाव, राजकारण आणि कूट्नीती ह्यांनी भरलेले कथानक ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’ हे चित्रपटाचे नाव सार्थ करते.

Noah Wyle ह्या नटाने उभा केलेला स्टीव्ह जॉब्स निव्वळ लाजवाब! त्याने स्टीव्हची आढ्यता, बेमुर्वतपणा, आपल्याच मस्तीत जगण्याचा कैफ अगदी ताकदीने पेललाय. अक्षरश: भुमिका जगलाय तो.
त्याचा हिप्पी अवतार सोडुन एकदम सुटाबुटात तो एका संगणक प्रदर्शनात येतो तो सीन आणि एका उमेदवाराचा अ‍ॅपल्साठी मुलाखत घेण्याच्या सीन मधे तर तो निव्वळ आहाहा….

Anthony Michael Hall ह्या नटानेही बिल गेट्सही अगदी सार्थपणे रंगवलाय. बिल गेट्सचा धुर्तपणा अतिशय मस्त रंगवला आहे बेट्याने.

‘लोकांकडे मी जाण्या ऐवजी लोकचं माझ्याकडे धावत येताहेत’ हे पहिला अ‍ॅपल संगणक सादर करणार्‍या स्टीव्हचे उद्गार अ‍ॅपलमागची स्टीवची भुमिका स्पष्ट करतात तर ‘आज लोकांना माझी गरज नाहीयेय पण मीच त्यांची गरज बनेन’ हे बिलचे उद्गार मायक्रोसॉफ्टमागची बिलाची भुमिका स्पष्ट करतात.

संगणक विश्वातील ‘दादा’ लोकांचे ऐहिहासिक पर्व उलगडणारा, आवर्जुन पहावा असा, ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’
(मला तर फारच आवडला).

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s