औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला


दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे असे मुलांना विचारले. मोठा मुलगा म्हणाला कुतुबमिनार आणि ताजमहाल बघायचाय. पण आता असे घोड्यावर बसुन रेल्वे बूकिंग शक्य नव्हते. मग सहज त्याला म्हटले तुला मिनी ताजमहाल आणी मिनी कुतुबमिनार बघायचा का? तो एकदम चकितच झाला आणी म्हणाला म्ह्णजे काय? लगेच गुगलबाबाच्या चित्र विभागाला साकडे घातले आणि त्याला बिबी का मकबराची आणि चाँद मिनारची चित्रे दाखवली. ती चित्रे बघुन तो पडलाच. असं कसं काय शक्य आहे असे विचारून त्याने भंडावून सोडले. त्याला म्हटले जायचे का बघायला तर तो म्हणाला जाउया. मग जरा सिरीयस होउन औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण अशी एक ‘हिस्टॉरिकल टूर’ प्लान केली आणि धमाल एन्जॉय केली.

सर्वप्रथम पोहोचलो देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी म्हणजे ‘देवतांचा पर्वत’. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले.

यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून 3 हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील 2 वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता.

ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने.

देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार

हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे

ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे.

आत आल्यावर दिसणारे काही बुरुज

मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत.

 

भारतमाता मंदिर
आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा 1948 साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले.
त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब

 

चाँद मिनार
भारतमाता मंदिराजवळ एक मोठा 3 मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या 3 मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो.

चिनी महल
एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे.

मेंढा तोफ
चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्‍या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला ‘तोप किला शिकन’ म्हणजे ‘किल्ला तोडणारी तोफ’ म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्‍याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे.

ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे.

खंदक
मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्‍या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते.

अंधारी/ भुलभुलय्या
हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान.
शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत.

बारादरी
सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला 12 कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले.

बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते.

अत्त्युच्च शिखर
हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो.


एवढ्या टोकावर गड चढून गेलो त्याचा हा घ्या पुरावा. 🙂

क्रमश: (पुढे-> बिबी का मकबरा)

9 thoughts on “औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (1) : देवगिरी किल्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s