कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज (‘हॅप्पी न्यु इयर’ स्पेशल)

आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार, शेवटचे कॉकटेल…म्हणजे ह्या वर्षातले, 2011 चे शेवटचे!

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज

पार्श्वभूमी:

ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे ‘पान सरप्राईज’.
31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा आणि तुमचे मत प्रतिसादातून नक्की कळवा. 🙂

प्रकार: व्होडका बेस्ड कॉकटेल, डिझर्ट, देशी धमाका

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
कंडेन्स्ड मिल्क 1 औस (30 मिली)
मघई पानं 2
एक कप बर्फ
ब्लेंडर
मोजण्याचा जिगर

ग्लास: – ओल्ड फॅशन्ड

कृती:

ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.

व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.

देशी धमाका ‘पान सरप्राईज’ तयार आहे:)

सदर कॉकटेल ‘द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल’मधून साभार

सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.

!!! सर्व वाचक मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!!
!!! Wish you and your family a happy new year !!!

पुणे वाइन फेस्टीव्हल – 2011

Pune Gourmet Club पुण्यात 2007 पासून पुणे वाइन फेस्टीव्हल आयोजीत करते. पुण्याबरोबर मुंबईला बांद्र्यालाही हा वाइन फेस्टीव्हल ते आयोजीत करतात. अस्सल वाइनप्रेमींसाठी वेगवेगळ्या वाइनरीजच्या वाइन्स चाखण्याची आणि विकत घेण्याची, एकाच ठिकाणी, एक मस्त संधी ह्या निमीत्ताने प्राप्त होते.

ह्या शनिवारी काही मित्रांसोबत पुणे वाइन फस्टीव्हल 2011 ला हजेरी लावण्याचा योग आला (सहकुटुंब). खरचं खूप धमाल आली. जवळजवळ 16 वाइनरीजचे स्टॉल्स ह्या वेळी होते. तसेच खाण्याचेही बरेच स्टॉल्स असल्यामुळे वाइन चाखण्याबरोबरच खादाडीची सोय उपलब्ध होती.

ह्या इथे स्वागतकक्षात प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून आत गेलो. खरेतर उशीरचं झाला होता पोहोचायला,चांगलेच अंधारून आले होते.

आत गेल्यावरचा नजारा असा होता.

एक फेरी मारून सर्व स्टॉल्सचा अंदाज घेतला. मग एका मित्राच्याच्या सल्ल्यानुसार ‘नाइन हिल्स’ ह्या वाइनरीच्या स्टॉलपासून वाइन ‘टेस्टींगला’ सुरुवात केली. त्याने ह्याच स्टॉलपासून का सुरवात करायला सांगीतले हे बाकीचे स्टॉल्स बघितल्यावर कळून आले. 😉

इथे मी सुरुवात केली ‘सोविन्यॉन ब्लॅं’ आणि ‘शेनिन ब्लॅँ’ ह्या व्हाइट वाइनपासून. मित्राने ह्या वाइअनरीची नविन लॉन्च केलेली वाइन ‘विऑन्यें’ ट्राय केली.

इथे मी माझ्या वाइनच्या तुटपुंज्या माहितीच्याआधारे वाइन टेस्टींगच्या ‘वाइन बघणे’, ‘वाइनचा गंध अनुभवणे’ आणि ‘वाइन चाखणे’ ह्या स्टेप्स उपस्थित मित्रांना समजावून सांगीतल्या. त्यांना त्या पटल्याने जरा आनंदही झाला.

पुढच्या वाइअनरीकडे गेलो तीथे रेड वाइनमधे शिराझ होती. माझे आणि सिराझचे जरा वाकडे असल्याने मी परत व्हाइट वाइनकडेच मोर्चा वळवला. इथे होती ‘शॅर्दोने’.

मग जरा वाइन चाखत चाखत आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात मित्रांनी बराच वेळ घालवला. इथे आमचे कुटुंब मुलांचा पोटोबा करण्याकरिता गेले असल्याने मलाही ह्या संधीचा फायदा करून घेता आला.

त्यानंतर मोर्चा वळवला ‘झंपा’ ह्या वायनरीच्या स्टॉलकडे.

इथल्या वाइन्स जरा जास्तच अॅAसीडीक होत्या कदाचित त्यांचे तापमान योग्य नसल्यामुळे असेल. इथे ‘सुला’ वाइन्स कश्या चांगल्या असतात ह्यावर आमचे एक चर्चासत्र झाले. ते नेमकी त्या स्टॉलवाल्याने ऐकले. मग सुला सध्या ‘वाइनमधे कशी गडबड करते’ ह्यावर त्याचे मौलिक विचार ऐकायला मिळाले. ते ऐकून पुढे सरकलो ‘किंगफिशर’ च्या स्टॉलकडे.

इथे ‘शॅर्दोने’ आणि ‘शिनेन ब्लॅं’ ह्या द्राक्षांचा ब्लेंड असलेली व्हाइट वाइन होती. हे कॉम्बीनेशनच इतके अपीलिंग होते की लगेच ट्राय केले. अतिशय सुंदर वाइन. वाइअनचे तापमान मस्त असल्याने अतिशय भन्नाट लागली. लागलीच ती विकत घ्यायचे ठरले आणि शेवटी निघताना विकत घेतली.

आता शोध घ्यायचा होता ‘झिनफॅन्डलचा’ कारण ती अजूनही कुठेच दिसली नव्हती. मग फिरून शोध घेतल्यावर झिनफॅन्डल मिळाली ‘यॉर्क’ नावाच्या वायनरीच्या स्टॉलवर. सगळ्यांना तिकडे मोर्चा वळवायला सांगीतला.

इथे झिनफॅन्ड्लची रोज वाइन ट्राय केली. एकदम मस्त होती. विकत घेण्याचे ठरवून शेवटी परत येताना विकत घेतली. इथे असताना वपाडावचे आगमन झाल. त्याला मर्गदर्शनाकरून यॉर्कच्या बाजूलाच ‘फोर सीजन्स’ वायनरीचा स्टॉल होता. तेथे मोर्चा वळवला.

ह्या स्टॉलवर ‘ब्लश’ ब्रॅन्ड्ची रोज वाइन टेस्ट केली. अतिशय भन्नाट वाइन होती. बाकीच्यांसाठी एक नविन बाटली फोडली जीचे तापमान एकदम परफेक्ट होते. त्यामुळे ब्लॅशचा लुत्फ मनमुराद घेता आला. ब्लश घेत असतानाच ‘वाइन स्टॉम्पिंगची’ घोषणा झाली आणि लगेच तीथे मोर्चा वळवला.

पण एकंदरीत हा असा माहोल बघता ‘स्टॉम्पिंग’ कमी आणि ‘स्टेम्पीड’ जास्त असे वाटल्याने फार वेळ न घालवता बाकीच्या वाइनरीजकडे मोर्चा वळवला.

पण काही मित्रांनी ह्या संधीचा ‘लाभ’ घेतला. त्यांच्या पदस्पर्शाने द्राक्षे पावन झाली.

त्यानंतर बर्‍याच वाइअनरीजच्या स्टॉल्सवर रेड वाईन, रोज वाइन आणि व्हाइट वाइन्स चाखल्या. काही बर्‍या होत्या तर काही ओके होत्या.

यानंतर एक कॉकटेल काउंटर दिसला जो बघितल्यावर आम्हा सर्वांनाच आनंद झाला. तिथे काही मित्रांनी रेड वाइनचे आणि मी ‘स्प्राईट्झर’ नावाचे व्हाईट वाइनचे कॉकटेल ट्राय केले. रेड वाइनचे कॉकटेल एकदम बकवास निघाले त्याचे नावही विसरलो ह्यातच सगळे आले. स्प्राईट्झर बरे होते.

रेसिपी
व्हाईट वाइन 30 मिली
स्प्राइट – ग्लास टॉप अप
ग्रॅपा (द्राक्षाचा सिरप) – 15 मिली

हजेरी लावलेले मित्रमंडळ

मधेच एका मित्राने सिगार पैदा केला कुठून तरी त्याने आणखीणच मजा आली. त्याच्या चेहेर्याावरून तो कोण ते कळेलच त्याचा चेहरा बोलतो आहेच.

रात्री साधारण दहाच्या सुमाराला परत निघालो. एकंदरीत ४-५ तास अगदी मजेत आणि हवेत तरंगत गेले. वाइन हे तर कारण होतेच पण दर्दी मित्रांची संगत चार चाँद लावून गेली.

कॉकटेल लाउंज : मार्गारीटा (फ्रोझन)

आज शुक्रवार, विकांत (Weekend) सुरु झालाय… एक कॉकटेल का हक तो बनताइच है!

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “मार्गारीटा (फ्रोझन)

पार्श्वभूमी:

ह्या कॉकटेलच्या उगमाच्या फार दंतकथा आहेत. एका कहाणीप्रमाणे एका मोठ्या समारंभात त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्याच्या मुलीच्या नावाने एक नविन ड्रिंक बनवले ते म्हणजे मार्गारीटा. तर एक कहाणी सांगते की एका बारटेंडरने ह्या ड्रिंकचा शोध लावला आणि तीचे नाव होते मार्गारीटा म्हणून ह्या कॉकटेलला मार्गारीटा हे नाव पडले.  हीच ती Margarita Sames, legendary inventor of the margarita

तर, जरी हे कॉकटेल मेक्सिकन टकीलापासून बनवले असले तरीही हे पुर्णतः अमेरिकन कॉकटेल आहे. मेक्सिकोमधे हे तितकेसे लोकप्रिय नाहीयेय.

प्रकार: टकीला बेस्ड कॉकटेल

साहित्य:

टकीला 1.5 औस (45 मिली)
कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) 1 औस (30 मिली)
मोसंबी ज्युस 0.5 औस (15 मिली)
लिंबू ज्युस 10 मिली
एक कप बर्फ
मोसंबीची साल सजावटीसाठी
ब्लेंडर
मोजण्याचा जिगर

ग्लास: – कॉकटेल किंवा मार्गारीटा

कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे पाणी आणि बर्फाचे खडे टाकून फ्रीझमधे फ्रॉस्टी करण्यासाठी साधारण तासभर ठेवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे मस्त फ्रॉस्टी करा.

आता एका प्लेट मधे मीठ पसरवून घ्या. लिंबू कापुन ते ग्लासच्या तोंडावर एकसारखे चोळून घ्या. आता ग्लासाचे तोंड त्या मीठाच्या प्लेटमधे गोल फिरवून घ्या. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या तोंडावर मीठ बसलेले असले पाहिजे.

आता मोसंबीचा आणि लिंबाचा रस काढून घ्या.

आता टकीला, कॉइंत्रु (किंवा ट्रिपल सेक), आणि मोसंबी आणि लिंबू रस ब्लेंडर मधे ओतून घ्या.

आता बर्फ ब्लेंडर मधे टाका आणि मिडीयम स्पीडवर बर्फाचा चुरा होईपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

आता ब्लेंड झालेले मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या. मोसंबीची साल सजावटीसाठी ग्लासमधे अलगद सोडा.

चुरा झालेला बर्फ म्हणजे बर्फाचा गोळा खाताना होतो तसा झालेला चुरा. पण त्यात थोडे थोडे तुकडे असलेले मला आवडतात.

मस्त चवदार फ्रोझन मार्गारीटा तयार आहे 🙂

ब्लु मार्गारीटा

वरच्या रेसिपीमधे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक ऐवजी ‘ब्लु कुरासाओ (Blue Curacao)ही लिक्युअर वापरल्यास तेवढ्याच प्रमाणात वापरल्यास ‘ब्लु मार्गारीटाहे एक व्हेरिएशन कॉकटेल तयार होते.

ब्लु कुराकाओ हे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक प्रमाणेच एक ऑरेंज लिक्युर आहे. अधिक माहितीसाठी.


(ब्लु मार्गारीटाचे वरील चित्र आंजावरून साभार)

नावात काय आहे? खूप काही…

नावात काय आहे? असे कोणीतरी म्हणून गेले आहे. बघा शेक्सपियरच येतो ना लगेच डोळ्यापुढे?
असेच आहे. जरी तो तसे म्हणून गेला असला तरीही नावात खूप काही आहे.

मी मिसळपाव.कॉम ह्या एका मराठी संस्थळावरही लेखन करतो. तिथे हा एक लेख – मुला मुलींची नावे वाचला आणि नावात खूप काही असते हे ह्या माझ्या विचाराला एकदम दुजोरा मिळाला.

एकदा माझा माझ्या मित्राबरोबर काहीतरी वैचारिक वाद झाला, कुठल्या तरी नावाच्या अर्थावरून. तो चिडून म्हणाला तुझ्या नावाचा काय अर्थ आहे? मग त्याला मी माझ्या घरातील सर्वांच्या नावाचे अर्थ आणि त्यामागची वैचारिक बैठक समजावून सांगितली.

माझे नाव ब्रिजेश. ब्रज + ईश म्हणजे गोकुळाचा देव, कृष्ण.
माझा जन्म आजोळी झाला. तिथे, आमच्या घराजवळ एक मंदिर आहे वारकरी संप्रदायाचे. त्याच्याभोवती एक बागही आहे. त्यामुळे त्या भागाला गोकूळ म्हणतात. त्यावरूनच माझे नाव ब्रिजेश ठेवले गेले माझ्या वडिलांकडून. माझ्या बायकोचे नाव श्यामला. म्हणजे श्याम (कृष्ण)च्या रंगात रंगलेली. पण हा योगायोग होता त्यामुळे लग्नानंतर नाव बदलले नाही. नावात काय आहे? ह्यावर माझा विश्वास नसल्यामुळे मुलांची नावे ठेवतानांही जरा विचार करूनच ठेवली होती.

श्री दत्तांच्या आरतीतले ‘मी-तू पणाची झाली बोळवण’ हे माझे फार आवडते चरण आहे. मी तू पणाची बोळवण झाली की अद्वैतावस्था प्राप्त होते.

त्या न्यायाने मी आणि माझी बायको असेच मी तू पणाची बोळवण होऊन अद्वैत झालो आहोत. त्याचे प्रतीक म्हणजे माझा मोठा मुलगा. म्हणून त्याचे नाव अद्वैत. त्या अद्वैतावस्थेतून एक ‘तेज’ निर्माण झाले ते तेज म्हणजे माझा धाकटा मुलगा म्हणून त्याचे नाव आदित्य.

आहे की नाही नावात खूप काही. 🙂
आता तुम्हालाही ‘नावात काय आहे’? असा प्रश्न न पडता वाटू लागेल नावात आहे खूप काही.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स.

हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले. अतिशय उत्तम कथा,वळणा वळणाची, अनेक धक्के आणि फ्लॅशबॅक असलेली. अनेक परिकथेतील पात्रे आणि कथांचे भाग एकत्र करून कथा साकारली आहे.

कथानायक पुस (Puss) हा एक साहसवीर असतो आणि एका साहस मोहीमेच्या वेळी एका शहरात येतो. त्यावेळी त्याला समजते जॅक आणि जील ह्या भावंडांकडे तो लहानापासून शोधत असलेल्या 3 जादूच्या बिया (Magic Beans) आहेत. हे जॅक आणि जील महाभयानक आणि कुप्रसिद्ध असे दुष्प्रवृत्तीचे असतात. पुस रात्री त्यांच्याघरी त्या जादूच्या बिया चोरायला जातो. पण तिथे त्याला एक मुखवटा (Mask) घातेलेली आकृती आड येते आणि तो त्या बिया चोरू शकत नाही. त्या आकृतीचा पाठलाग करत तो एका अड्ड्यावर पोहोचतो. तिथे ती आकृती त्याला द्वंद्वाचे आवाहन देते.साधेसुधे नव्हे तर “डान्स फाइट”चे, म्हणजे नाचत नाचत मारामारी. ह्या मारामारीच्या शेवटी त्याला कळते ती आकृती म्हणजे ‘किटी सोफ़्टपॉन’ नावाची एक मांजरी आहे.

तीच्या मागे-मागे जाता जाता त्याला त्याचा लहानपणीचा मित्र भेटतो. हा मित्र म्हणजे ‘ह्म्प्टी अ‍ॅलेक्झांडर डम्टी’, ह्म्प्टी डम्टी कवितेतील अंडे. तो पुसला मदतीची याचना करतो. पण पुस त्याला झिडकारून निघून जातो. मग आपल्याला कळते की किटी ही हम्प्टीची मैत्रीण आहे. ती हम्प्टीला विश्वास देते की ती पुसला परत आणू शकते.

ती पुसकडे जाते आणि त्याला त्याच्या रागाचे कारण विचारते. मग येतो एक फ्लॅशबॅक……

पुस अणि हम्प्टी ‘सॅन रिकार्डो’ नामक एका खेड्यात एका अनाथा आश्रमात एकत्र वाढलेले असतात. तिथे पुस हम्प्टीचे बाकीच्या टग्यांपासून नेहमी रक्षण करत असतो त्यामुळे त्याचा खास मित्र असतो. हम्प्टीला 3 जादूच्या बिया हव्या असतात. त्या बियांची एक राक्षसी वेल होणार असते जी आकाशाच्या पलीकडे जाऊ शकते. तिथे एक मोठा राजवाडा असतो आणि त्यात सोन्याचे अंडे देणारा हंस असतो. तो हम्प्टीला हवा असतो. तो पुसला त्याच्या ह्या मोहिमेत सामावून घेतो. मग हे दोघे मिळून जादूच्या बिया मिळवण्यासाठी लोकांच्या घरात घुसणे माफक चोर्‍याकरणे असे प्रकार करू लागतात. एकदा पुस एका म्हातारीला एका वळूपासून वाचवतो. ती म्हातारी त्या शहरातल्या एका प्रतिष्ठित आणि पोलीस पाटलाची आई असते. पुसचा जाहीर सत्कार केला जातो आणि त्याला ‘सन्मानाचे बूट’ दिले जातात. त्या दिवसापासून तो लोकांना मदत करू लागतो आणि हम्प्टीला टाळू लागतो.

एके रात्री हम्प्टी त्याला फक्त एक शेवटची मदत करायची विनंती करतो. पुस मान्य करून त्याच्याबरोबर जातो. पण हम्प्टी ‘बॅन्क ऑफ सॅन रिकार्डो’ वर दरोडा घालायला पुसला घेऊन गेलेला असतो. पुसला हे कळते तेव्हा तो खूप रागावतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. बॅन्केतला बझर चालू होऊन पोलीसपाटील पोलिसांसोबत तिथे पोहोचलेला असतो. ते पुसच दरोडा घालायला आलेला आहे असे समजतात. पुसला पळून जाण्याशिवाय गत्यंतर नसते. हम्प्टी त्याला स्वतःला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याविषयी विनवतो. हम्प्टीचे स्वप्न साकार करायला फक्त पुसच त्याला मदत करू शकतो असे विनवूनही पुस त्याच्यावर रागावून पळून जातो. पण तो कायमचा सॅन रिकार्डोचा ‘वॉन्टेड’ होऊन जातो. त्याच्या ह्या भटक्या आयुष्याला हम्प्टी जबाबदार आहे असे त्याला वाटत असते.

आता किटी आणि हम्प्टी पुसची समजूत काढण्यात यशस्वी होतात. मग ते जॅक आणि जील कडून त्या बिया चोरतात आणि त्या आकाशातल्या राजवाड्यात पोहोचतात. सोन्याचे अंडे देणारे हंसाचे पिलू आणि सोन्याची अंडी घेऊन परत पृथ्वीवर येतात. पण परत आल्यावर त्यांची गाठ पडते जॅक आणि जीलशी. इथून कथेला एक धक्कादायक वळण येते. हंसाचे पिलू जमिनीवर आणल्यामुळे अजाणतेपणी एक भयंकर धोकाही त्यांनी ओढवून घेतलेला असतो. तो धोका आणि धक्कादायक वळण काय हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायलाच हवा.

Antonio Banderas (पुस), Salma Hayek (किटी), Zach Galifianakis (हम्प्टी) ह्यांचा आवाजाने नटलेला हा सिनेमा लक्षात राहतो तो अतिशय सुंदर आणि इंटेलिजेंट 3D एफेक्ट्समुळे.
पुस किटीचा पहिल्यांदा पाठलाग करतो पाठलाग एकदम थरारक झालाय. त्यानंतर ‘डांस फाईट’ म्हणजे तर कळस आहे. सालसाच्या आणि चा..चा..च्या बीट्स वर किटीच्या अदा आणि स्टेप्स म्हणजे उफ्फ्फ…निव्वळ माइंड ब्लोईंग. 🙂
त्यानंतर जॅक आणि जीलकडून 3 बिया चोरीचा सिक्वेंस ही मस्तच. त्या बियांपासून राक्षसी वेल तयार होऊन आकाशातल्या राजाराजवाड्यात जाणे आणि परत येणे एवढे थरारक आहे की माझी दोन्ही मुले माझे हात इकडून तिकडून पकडून बसले होते. 3D एफेक्ट्स एवढे प्रभावीपणे वापरलेत की आपल्या डोळ्यासमोर सगळे घडते असे वाटते. प्रत्येक पात्राचे डिटेलिंग तुफान आहे,अगदी बारीक सारीक तपशीलही मस्तच चितारले आहेत.

काही काही डायलॉग्स मोठ्यांसाठी आहेत. म्हणजे ते फक्त मोठ्यांना कळतील असे आहेत. ते सोडले तर बच्चे कंपनीला गुंगवून ठेवण्यात हा ऍनिमेशनपट एकदम यशस्वी ठरतो. तर बच्चेकंपनीला खूश करायचे असेल तर आणि त्यांच्याबरोबर वेळ आनंदात घालवायचा असेल तर नक्की बघण्यासारखा, “पुस इन बूट्स”

पस आणि किटी सोफ़्टपॉन

ह्म्प्टी अ‍ॅलेक्झांडर डम्टी

एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?

सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा.

सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, ‘इथेच जेवायचे’ आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही. निमूटपणे बाहेर येऊन बाकीच्या सगळ्यांना आत यायला सांगितले.

सगळे येऊन स्थानापन्न होईपर्यंत मुलाचे मासे मोजून झाले होते. सगळ्या माश्यांना नावे देऊन त्यांचे बारसेपण झाले होते. ऑर्डर देऊन झाल्यावर मग जरा ऐसपैस बसून मीही मग मुलांबरोबर माशांना न्याहाळू लागलो. अचानक एका माशामध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले. मग जरा निरखून बघितल्यावर लक्षात आले की त्याला डोळेच नाहीयेत. अंध प्राणी बघायची ही पहिलीच वेळ. डोक्याला बराच ताण देऊनही अंध असा कोणता प्राणी बघितल्याचे आठवेना.

परत परत बघून खात्री करून घेतली आणि मग मॅनेजरला बोलावून त्याच्याशी बोलून खात्री पटवून घेतली. त्याने सांगितले की जेव्हा हॉटेलमध्ये त्या माशाला आणले तेव्हा तो एकदम पिल्लावस्थेत होता. तो मासा जन्मापासून अंध आहे. मग एकदम त्या माशाची कणव आली. एकतर त्या भिंतीतल्या टॅन्कमधले बंदिस्त जीवन त्यात पुन्हा सगळा अंधार. त्याचे इतर माश्यांशी काय बोलणे होत असावे ह्याचा विचार करू लागलो आणि डोळ्यापुढे संवाद आला:

अंध मासा (एका माशाला): ‘काय भावड्या कसे काय चालू आहे?, मजा आहे म्हणा तुझी. रंगीत जग बघायला मजा येत असेल नाही?’

दुसरा मासा : ‘मित्रा, तू फार नशीबवान आहेस!’

अंध मासा : ‘का चेष्टा करतो रे आंधळ्याची :(‘

दुसरा मासा : ‘चेष्टा? आपल्या भाई-बांधवांना तळलेल्या, भाजलेल्या अवस्थेत आपल्या डोळ्यासमोरच मनुष्यप्राण्याकडून खाल्ले जाताना उघड्या डोळ्यांनी बघणे, तेही एकदा दोनदा नव्हे तर आपले स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत, हे किती भयानक आणि जीवघेणे असते ह्याची तुला कल्पना नाही मित्रा. शाप आहे हा शाप.! तुला नशीबवान म्हणतोय कारण तुला डोळे न देऊन देवाने ह्या शापापासून मुक्त केले आहे.

हा संवाद डोळ्यापुढे आल्यानंतर मी खरंच ठरवू शकलो नाही की तो अंध मासा सुदैवी की दुर्दैवी 😦

हाच तो सुदैवी (की दुर्दैवी?) अंध मासा ->

ह्या फोटोत हा मासा मला खरंच एकदम केविलवाणा वाटतो, एकदम अंगावर येतो हा फोटो.

हेच ते दोघे (भावड्या आणि मित्रा), संवाद करणारे मासे.

औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की

बिबी का मकबरा

ताज महल हा एक भव्यदिव्य मकबरा एका प्रेमी नवर्‍याने (शहजहान) आपल्या बायकोवरच्या (मुमताज) प्रेमाखातर बनवला होता. त्याची प्रतिकृती असलेला आणि त्याच्या रचनेवर बेतलेला ‘बिबी का मकबरा’ मात्र एका मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.

औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने त्याची आई, रबिया दुर्राणी उर्फ दिलरस-बानू-बेगम हीच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. खरंतर आजमशहाला हे स्मारक ताज महल पेक्षाही भव्यदिव्य बनवायचे होते पण औरंगजेबाने दिलेल्या ‘बजेट’ मधे ते शक्य झाले नाही. पण ह्या कलाकृतीची नेहमी ताज महल बरोबर तुलना झाल्यामुळे आणि ताज महल इतके भव्यदिव्य नसल्यामुळे जरा दुर्लक्षीत होउन तेवढी लोकप्रियता नाही मिळाली. ह्या ‘बीबी का मकबर्‍या’ला ‘दख्खनी ताज’ असेही म्हटले जाते.

प्रवेशद्वारावर असलेला हा माहिती फलक. बरीच तांत्रिक माहिती दिली आहे त्याच्यावर.

प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावर असलेल्या काळ्या डागांवरूनच पुरातत्व विभागचे काम आणि एकंदरीत पुराणवास्तूंबद्दलची आस्था दिसत होती. त्यामुळे आत काय बघायला मिळेल ह्याची कल्पना येत होती. बीबी का मकबरा हा का दुर्लक्षीत राहिला ह्याचे कारण दिसतेच आहे. तरी बरें इथे यायच्या रस्त्याचे फोटो नाही काढले. असो.

दुरुन डोंगर साजरे ह्याची प्रचिती देणारे हे फोटोज. लांबून काढलेल्या ह्या फोटोंमधून ह्या स्मारकाचे सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.


हा फोटो मस्त आहे मला खुप आवडतो, मस्त सूर्यास्ताच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकड्रॉपवर उडणार्‍या पक्षांचा थवा मस्त मन मोहवून गेला होता.

बिबी का मकबर्याचे सध्याचे दुर्दैवाचे दशावतार

अतिशय गलथानपणे कामे चालू आहेत. सगळी रया घालवून टाकली आहे ह्या स्मारकाच्या सौंदर्याची.

मी आणि माझी बच्चे कंपनी.

तर, असा हा सो-कॉल्ड सुंदर बीबी का मकबरा बघून पुढे निघालो पाणचक्की  बघायला.

पाणचक्की:

ही पाणचक्की तंत्रज्ञानाचा एक अनोखा नमुना आहे. १० किमी अंतरावरून भूमीगत मातीच्या नळांमधून पाणी ह्या पाणचक्कीत आणून ‘सायफन‘ पद्धातीने वर चढवून या पाण्याचा एक गतिमान प्रवाह तयार केला आहे. ह्या गतिमान प्रवाहापासून उर्जा तयार करून एक भव्य लोखंडी पंखा त्या उर्जेवर फिरवला जातो. ह्या पंख्यावर एक जाते बसवले आहे हे ह्या टर्बाईन सदृश्य पंख्यामुळे फिरते. हीच ती पाणचक्की, पाण्याच्या जोरावर फिरली जाणारी चक्की. इथे एक कृत्रिम धबधबा तयार केलेलाआहे. त्या धबधब्यामुळे इथेले वातावरण एकदम थंड असते. अगदी एअरकंडीशनरच्या कूलिंग प्रमाणे थंडगार. औरंगाबादच्या गरमागरम हवामानात हा पाण्याचा नैसर्गिक थंडावा खरंच गार करतो आपल्याला.

बाबा-शाह-मुसाफिर हे एक सुफी संत ह्या पाणचक्कीवर पीठ तयार करून एक अन्नछत्र चालवत अही एक कहाणी आहे. ह्यांचा एक दर्गा ही आहे ह्या पाणचक्कीच्या परिसरात.

पाणचक्कीला पोहोचे पर्यंत खुपच काळोख झाला होता. त्यामुळे फोटो आले पण ते इथे टाकण्यासारखे नाही आलेत. 😦 पण एक व्हिडीओ घेतलाय ह्या पाणचक्कीचा.

क्रमश: (पुढे-> वेरूळ)

कोड ऑफ कंडक्ट

“ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही”? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो.
“काय झाले सक्काळी सक्काळी”, आमचे अर्धांगं.
“अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.”, मी.
“मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.”, उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले.
त्या आवाजाच्या “उंची” वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी समझोता करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले. ”अगं काही नाही गं, हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता सोशल मिडीया आणि तत्स्म संस्थाळांसाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार आहे”.
“अरे बापरे, का?”, सौ.
“अगं ते आपले उच्चविद्याविभूषित वकिल आहेत ना कपिल सिब्बल, त्यांना म्हणे राग आला. फेसबूकवर, त्यांचे ‘दैवत’, ज्याच्याशिवाय ह्यांना कोणीही हिंग लावून विचारणार नाही आणि निवडून देणार नाही असे ह्यांना वाटते, त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट होतोय आणि त्यावर फेसबूकवाले काहीही करत नाहीत? मग त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत फेसबूकच्या अधिकार्‍यांना बोलावले. त्यांच्या वकिली भाषेत समजावून सांगीतले. पण फेसबूकवाले काही बधेनात. त्यांच्या (फेसबूकवाल्यांच्या) म्हणण्यानुसार त्यांच्या पॉलिसीप्रमाणे जर मजकूर आक्षेपार्ह नसेल तर फक्त विवादास्पद आहे म्हणून ते मजकूर सेंन्सॉर करणार नाहीत.

आता आला सिब्बलांना राग. मी एक मंत्री आणि माझे ऐकत नाही? बघतोच आता. लगेच ह्यांना ‘आपल्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी’ आठवली. म्हणे आमच्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी जपण्यासाठी आम्हाला काहीतरी करणे आवश्याक आहे. अरे, आमचे स्थानिक लोक म्हणजे कोण? तर ते म्हणजे, सत्ताधारी पक्षातील सत्तधीश बरं का.

आम जनता देशात रहाते, तीही स्थानिक आहे, तीला काही सेन्सेबिलिटी असते हे ह्या सत्ताधुंदाच्या गावीही नाहीयेय. संरक्षण ह्यांच्या हिताचेच हवेय. आम जनता काय जगतेय कशीही. जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवा, जनता काटकसर करून जगते आहेच.

बॉम्बस्फोटात लोकं मरताहेत, जे बॉम्बस्फोटं करताहेत त्यांच्या धर्माचे राजकारण होऊन त्यांना पोसतो आहोतच. त्या धारातीर्थी पडलेल्यांच्या नातेवाईकांना काय सेंसिबीलीटी असते? ते आम जनता आहेत. ते थोडीच स्थानिक सत्ताधीश आहेत? ते थोडीच बाहेरून येवून स्थानिक झालेले आहेत. त्यांना भावना नसातात. असल्या तरीही त्यांनी त्या मोकळ्या करायचा नाहीत.

पण तरीही तुम्ही तुमच्या भावनांना मोकळी वाट केलीत तर हे स्थानिक सत्ताधिश ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार. ह्यांना काळजी फक्त ह्यांच्या हक्कांची, सोयीची. पण ज्या जनतेने त्यांना तीच्या सोयी पहाण्यासाठी निवडून दिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे आत्ममग्न हे. म्हणुन म्हणालो की ही लोकशाही आहे कि सरंजामशाही”. असे म्हणत बायकोकडे बचितले तर ती मुलाचा डबा भरण्यात आत्ममग्न.

म्हणजे मी हे सगळे इतका वेळ भिंतीशीच बोलत होतो?
“अगं, आपले व्यक्तिस्वातंत्र्य डबाबंद व्हायची वेळ आलीय, भाजीपोळीचा डबा काय भरते आहेस.” मी जरा चिडूनच बोललो.

“द्या मग चिरंजीवांना १०० ची नोट आजपासून रोज”, सौ.
मी लगेच तडकलो, “अरे आमच्या वेळी १० रुपयाची नोट मिळायची मारामार आणि ह्यांना नुसते खायला १०० रुपये?”

मग मुलगा म्हणाला, “पिताश्री, ते १०० रुपयांच जाउदे. आत्ता एवढे चिडून कपिलअंकलना नाही नाही ते बोलत होतात. पण एका गोष्टीकडे तुम्ही त्यांच्यासारखेच आणि तसेच सोयिस्करीत्या दुर्लक्ष करता आहात. व्यक्तिस्वातंत्र्य काय फक्त मोठ्यांनाच असते? आम्हा मुलांना नसते? तुम्ही आमच्यासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ लावायला मोकळे आणि जर हेच तुमच्या बाबतीत घडले तर लगेच गळे काढणार तुम्ही?”

आयला, मुलगा आता मोठा होउ लागलोय हे विसरलोच होतो मी.
लगेच वाफाळत्या चहाच्या वाफेमागे चेहरा लपवून; माझ्या रागाची वाफ त्या चहाच्या वाफेत मिसळवून पेपर वाचण्यात मग मीही ‘आत्ममग्न’ झालो.

‘डर्टी पिक्चर’ : उलाला…उलाला…उलाला…उलाला

बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला.

एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा ‘आंबटशौकीन’ मसाला भरपूर आहे.

एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास ‘सील्क’ ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत.

बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स.

अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे ‘विद्या बालन‘.

अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण…..

विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते ‘व्हल्गर’ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे ‘सेन्शुअल’ दिसली आहे ती.

सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल ‘साऊथ ईंडिअन’, चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा.

असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त ‘शो ऑफ’करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे ‘दर्शनिय’ आणि ‘सहनीय’ झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे.

आता काही कमकुवत बाजू:
पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो.
इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते.
इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो.

मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.