कोड ऑफ कंडक्ट


“ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही”? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो.
“काय झाले सक्काळी सक्काळी”, आमचे अर्धांगं.
“अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.”, मी.
“मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.”, उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले.
त्या आवाजाच्या “उंची” वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी समझोता करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले. ”अगं काही नाही गं, हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता सोशल मिडीया आणि तत्स्म संस्थाळांसाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार आहे”.
“अरे बापरे, का?”, सौ.
“अगं ते आपले उच्चविद्याविभूषित वकिल आहेत ना कपिल सिब्बल, त्यांना म्हणे राग आला. फेसबूकवर, त्यांचे ‘दैवत’, ज्याच्याशिवाय ह्यांना कोणीही हिंग लावून विचारणार नाही आणि निवडून देणार नाही असे ह्यांना वाटते, त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट होतोय आणि त्यावर फेसबूकवाले काहीही करत नाहीत? मग त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत फेसबूकच्या अधिकार्‍यांना बोलावले. त्यांच्या वकिली भाषेत समजावून सांगीतले. पण फेसबूकवाले काही बधेनात. त्यांच्या (फेसबूकवाल्यांच्या) म्हणण्यानुसार त्यांच्या पॉलिसीप्रमाणे जर मजकूर आक्षेपार्ह नसेल तर फक्त विवादास्पद आहे म्हणून ते मजकूर सेंन्सॉर करणार नाहीत.

आता आला सिब्बलांना राग. मी एक मंत्री आणि माझे ऐकत नाही? बघतोच आता. लगेच ह्यांना ‘आपल्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी’ आठवली. म्हणे आमच्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी जपण्यासाठी आम्हाला काहीतरी करणे आवश्याक आहे. अरे, आमचे स्थानिक लोक म्हणजे कोण? तर ते म्हणजे, सत्ताधारी पक्षातील सत्तधीश बरं का.

आम जनता देशात रहाते, तीही स्थानिक आहे, तीला काही सेन्सेबिलिटी असते हे ह्या सत्ताधुंदाच्या गावीही नाहीयेय. संरक्षण ह्यांच्या हिताचेच हवेय. आम जनता काय जगतेय कशीही. जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवा, जनता काटकसर करून जगते आहेच.

बॉम्बस्फोटात लोकं मरताहेत, जे बॉम्बस्फोटं करताहेत त्यांच्या धर्माचे राजकारण होऊन त्यांना पोसतो आहोतच. त्या धारातीर्थी पडलेल्यांच्या नातेवाईकांना काय सेंसिबीलीटी असते? ते आम जनता आहेत. ते थोडीच स्थानिक सत्ताधीश आहेत? ते थोडीच बाहेरून येवून स्थानिक झालेले आहेत. त्यांना भावना नसातात. असल्या तरीही त्यांनी त्या मोकळ्या करायचा नाहीत.

पण तरीही तुम्ही तुमच्या भावनांना मोकळी वाट केलीत तर हे स्थानिक सत्ताधिश ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार. ह्यांना काळजी फक्त ह्यांच्या हक्कांची, सोयीची. पण ज्या जनतेने त्यांना तीच्या सोयी पहाण्यासाठी निवडून दिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे आत्ममग्न हे. म्हणुन म्हणालो की ही लोकशाही आहे कि सरंजामशाही”. असे म्हणत बायकोकडे बचितले तर ती मुलाचा डबा भरण्यात आत्ममग्न.

म्हणजे मी हे सगळे इतका वेळ भिंतीशीच बोलत होतो?
“अगं, आपले व्यक्तिस्वातंत्र्य डबाबंद व्हायची वेळ आलीय, भाजीपोळीचा डबा काय भरते आहेस.” मी जरा चिडूनच बोललो.

“द्या मग चिरंजीवांना १०० ची नोट आजपासून रोज”, सौ.
मी लगेच तडकलो, “अरे आमच्या वेळी १० रुपयाची नोट मिळायची मारामार आणि ह्यांना नुसते खायला १०० रुपये?”

मग मुलगा म्हणाला, “पिताश्री, ते १०० रुपयांच जाउदे. आत्ता एवढे चिडून कपिलअंकलना नाही नाही ते बोलत होतात. पण एका गोष्टीकडे तुम्ही त्यांच्यासारखेच आणि तसेच सोयिस्करीत्या दुर्लक्ष करता आहात. व्यक्तिस्वातंत्र्य काय फक्त मोठ्यांनाच असते? आम्हा मुलांना नसते? तुम्ही आमच्यासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ लावायला मोकळे आणि जर हेच तुमच्या बाबतीत घडले तर लगेच गळे काढणार तुम्ही?”

आयला, मुलगा आता मोठा होउ लागलोय हे विसरलोच होतो मी.
लगेच वाफाळत्या चहाच्या वाफेमागे चेहरा लपवून; माझ्या रागाची वाफ त्या चहाच्या वाफेत मिसळवून पेपर वाचण्यात मग मीही ‘आत्ममग्न’ झालो.

One thought on “कोड ऑफ कंडक्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s