नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन

माझा एक ब्लॉगर मित्र प्रतिक ठाकूर ह्याने त्याचा खा-रे-खा हा ब्लॉग फक्त पाककृतींसठी वाहिला आहे. नुकतीच त्याने त्या ब्लॉगवर नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन नावाची एक पाककृती प्रकाशित केली आहे. त्यातल्या पेप्पे चिकनला फाटा देउन त्या रेसिपीला थोडा ट्वीस्ट देउन एक ‘ईंप्रोवाइज्ड’ डीश मागच्या रविवारी ट्राय केली. ती डीश एकदम हीट झाली होती म्हणून शेयर करतो आहे. ही सर्व मेहेनत माझ्या बायकोने केली आहे मी फक्त डोके लावले होते ते शेयर करतो आहे 😉

आम्ही केलेली डीश होती ‘नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अ‍ॅण्ड बेक्ड वेज’ अर्थातच ‘विथ रोज वाइन’ 🙂

सर्वात आधि फुल कोबी (Coliflower),फ्रेँच बीन्स, गाजर आणि मटार ब्लांच करून घेतली.

मग मॅश्ड पोटॅटो बनवले. हे बनवणे फार सोप्पे आहे. हा एवढा पदार्थ मी केला.
1. बटाटे उकडून घ्यायचे
2. त्यात कंन्डेंस्ड मिल्क, थोडी साखर आणि काळीमिरी पूड घालून मिक्सर मधून पेस्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे.

आता बेक्ड वेज पार्ट तयार झाला आहे

त्यानंतर नायज्जा जेलोफ राईस प्रतिकच्या ब्लॉगवर दाखविल्याप्रमणे बनवून घेतला आणि ‘नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अ‍ॅण्ड बेक्ड वेज’ तयार झाला.

आता राहिली वाइन. पुणे वाइन फेस्टिव्हलमधून यॉर्क वाइनरीची झिनफॅन्डल रोज वाइन आणली होती. ती बाटली उपयोगी आणली.

तर ही होती माझी ‘नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन’ 🙂

कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची

ब्रॅन्डीची ओळख सनातन महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आचार्य अत्र्यांनी ‘ब्रॅन्डीची बाटली’ ह्या सिनेमाची कथा लिहून करून दिली. त्यानंतर बहुजन समाजाला खोकला झाला की चमचाभर ब्रॅन्डी घ्यायची असा शोध लागला. त्यामुळे ब्रॅन्डी ही चमचाभर औषध म्हणून घेण्यापलीकडे दारू किंवा मादक द्रव्य म्हणून माझ्या खिजगिणतीतही नव्हती. त्यात देशी दारूमध्ये ब्रॅन्डी जास्त विकला जाणारा प्रकार आहे (अजून एक ब्लेंडी  नावाचा प्रकार असून तोही ब्रॅन्डीच्या नावावार खपतो असे जाणकार सूत्रांकडून कळते). आमच्या वाड्यात राहणारा एक जहाल बेवडा ही ब्रॅन्डी पिऊन आमच्या वाड्याच्या दारात नेहमी पडलेला असायचा त्यामुळे ब्रॅन्डी तशी ‘डोक्यात’ गेलेली होती.

पण एकदा माझ्या बॉसने त्याच्याकडे गेल्यावर कोन्यॅक दिली तीही एकदम साग्रसंगीत ‘स्निफर’ ग्लासमधून. काय आहे ते माहिती नव्हते पण एक घोट घेतल्यावर भन्नाट लागली आणि काय आहे ते बॉसला विचारल्यावर त्याने सांगितले ब्रॅन्डी. एकदम चकितच झालो आणि एवढ्या चांगल्या दारूला उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिल्या बद्दल स्वतःचाच राग आला. त्या गुन्ह्याचे परिमार्जन करण्यासाठी ही ब्रॅन्डी गाथा समर्पित करतो आहे.

असो, नमनाला घडाभर तेल जाळून झाले आहे, आता मूळ कथेकडे वळूया.

ब्रॅन्डी ही डच लोकांची देणगी आहे दारू विश्वाला. ब्रॅन्डीचा फॉर्म्युला काही डच व्यापाऱ्यांकडून व्यापारात केल्या गेलेल्या तडजोडींमुळे अचानकच शोधला गेला. ते म्हणतात नं ‘करायला गेलो एक…’ अगदी तसेच झाले.

सोळाव्या शतकात नेदरलँड्सला (हॉलंड) फ्रान्समधून वाइन मोठ्या प्रमाणात आयात केली जायची. पण ती आयात करताना डच व्यापाऱ्यांना बर्‍याच अडचणी येत असत. फ्रान्समधील ज्या परगण्यांतून ही आयात केली जायची तेथील नद्यांतून वाइन घेऊन जाण्यावर बरेच कर भरावे लागत असत. एवढे कर भरून झाल्यावरही समुद्री चाच्यांकडूनही लुटालूट फार मोठ्या प्रमाणावर व्ह्यायची. फ्रान्समधून नेदरलँड्सला जायला लागणार्‍या कालावधी मुळे बर्‍याचवेळा वाइन खराबही व्हायची (वाइनमधल्या पाण्यामुळे). अशा ह्या तिहेरी संकटाचा सामना करण्यासाठी काहीतरी करणे आवश्यकच होते. बनिया, अगदी आपल्या कच्छ-मारवाडातला असो किंवा युरोपातला, नुकसान कसे काय होऊ देणार?

ह्या व्यापार्‍यांनी मग ही वाइन डिस्टील करायला सुरुवात केली. म्हणजे वाइनमधला पाण्याचा अंश काढून टाकायचा. त्यामुळे

  • आकारमान कमी होऊन कर बचत
  • कमीत कमी कार्गो स्पेस मध्ये आयात करणे सुलभ,
  • चाच्यांना असल्या वाइनमध्ये काही रुची नसायची त्यामुळे त्यांच्या त्रासापासून मुक्ती
  • आणि आता वाइन ‘कॉन्संट्रेटेड’ (डिस्टील्ड) असल्यामुळे खराब व्हायचा ही धोका नाही.

अशी भन्नाट कॢप्ती त्यांनी शोधून काढली. ह्या कॢप्तीला डचांच्या स्थानिक भाषेत ‘Brandewijn’ असे म्हणतात. म्हणजे ‘Burnt Wine’. ह्या Brandewijn चाच पुढे अपभ्रंश होऊन ‘ब्रॅन्डी’ असे नामकरण झाले.

ब्रॅन्डी कशापासून बनवली आहे त्यावरून तिची तीन मूलभूत प्रकारात विभागणी होते.

1. ग्रेप ब्रॅन्डी :

ही ब्रॅन्डी नावाप्रमाणेच द्राक्षांपासून बनवतात. फर्मेंट केलेल्या द्राक्षाच्या रसाला डिस्टील्ड करून ही ब्रॅन्डी बनवली जाते. ह्या डिस्टील्ड झालेली ब्रॅन्डी रंगहीन असते. तिला ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या ड्रममध्ये मुरवत  ठेवले जाते. त्या लाकडामुळे तिला वैषिट्यपूर्ण रंग आणि गंध प्राप्त होतो. मुरवत ठेवण्याचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष एवढा असू शकतो.

2. पोमेस (Pomace) ब्रॅन्डी :

वाइनसाठी क्रश केलेल्या द्राक्षांच्या उरलेल्या चोथ्यापासून म्हणजे, रस गेलेला गर, साली, द्राक्षांचे देठ ह्यापासून पोमेस ब्रॅन्डी बनवली जाते. ही ब्रॅन्डी फार कमी काळासाठी मुरवली जाते त्यामुळे चवीला जरा रॉ (अपक्व) असते.  तसेच ही लाकडाच्या ड्रममध्ये मुरवत ठेवली जात नाही त्यामुळे मूळ द्राक्षाच्या चवीशी इमान राखून चवीला फ्रुटी असते.

3. फ्रूट ब्रॅन्डी :

द्राक्षांऐवजी वेगवेगळ्या फळांपासून ही ब्रॅन्डी बनवली जाते. सफरचंद, जरदाळू, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, प्लम ह्या फळांच्या रसाला फर्मेंट कले जाते आणि मग  डिस्टील्ड करून फ्रूट ब्रॅन्डी तयार होते.

ब्रॅन्डीची खरी ओळख ती जगाच्या कुठल्या भागात बनवली गेली आहे त्यानुसार होते. दारूचे माहेरघर असलेले फ्रान्स हे अत्युच्च दर्जाच्या ब्रॅन्डीसाठीही प्रख्यात आहे. ब्रॅन्डीचेही युरोपियन आणि उरलेले जग अशी भौगोलिक विभागणी आहे.

फ्रेंच ब्रॅन्डीज

कोन्यॅक
जगप्रसिद्ध आणि एक नंबरवर असणारी ‘कोन्यॅक’ ही फ्रेंच ब्रॅन्डी आहे. फ्रांसच्या कोन्यॅक नावाच्या परगण्यात तयार होणारी ही ‘ग्रेप ब्रॅन्डी’ आहे.बाजूच्या चित्रात निळ्या रंगाने दर्शवलेला फ्रान्समधील हा कोन्यॅक परगणा.
ही इतकी प्रसिद्ध आणि अत्युच्च दर्जाची आहे की ब्रॅन्डीसाठी व्यापक अर्थाने सामान्य नाव होऊन बसले आहे. कोन्यॅक ‘डबल डिस्टील्ड’ असते. ही इतकी सुपरफाईन असण्याचे कारण म्हणजे ज्या कास्क मध्ये ही मुरवली जाते त्याचे लाकूड ओक वृक्षांच्या कुठल्या जंगलातले वापरायचे याचे नियम ठरलेले आहेत. Limousin or Tronçais ह्या जातीच्या ओक झाडांच्या लाकडापासून तयार केलेली कास्कंच मुरवण्याकरिता वापरली जातात. त्याचे कारण म्हणजे ह्या लाकडाने व्हॅनिलाचा गंध आणि काहीशी चव ब्रॅन्डीला मिळते.
अर्मान्यॅक (Armagnac) :
फ्रान्समधल्या दक्षिणेकडील Gascony ह्या प्रांतातील अर्मान्यॅक ह्या परगण्यात तयार होणारी ही ब्रॅन्डी Armagnac म्हणून ओळखली जाते. ह्या परगण्यातल्या खालील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने अर्मान्यॅक तयार केली जाते.

  1. Bas-Armagnac
  2. Armagnac-Ténarèze
  3. Haut-Armagnac
ही कोन्यॅकशी मिळती जुळती असली तरीही बनवण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे, जमिनीचा (माती) पोत, डिस्टीलेशन प्रोसेस, चव,गंध आणि ब्रॅन्डीचा पोत असे फार फरक आहेत ह्या दोन प्रकारांत.अर्मान्यॅक कोन्यॅकप्रमाणे ‘डबल डिस्टील्ड’ नसून ‘सिंगल डिस्टील्ड’ असते.ही ब्रॅन्डी कोन्यॅकच्या आधी सुमारे 150 वर्षापासून अस्तित्वात आहे असे म्हटले जातेपण दुर्दैवाने कोन्यॅकला मिळालेली लोकप्रियता, प्रतिष्ठा काही अर्मान्यॅक नाही मिळवू शकली.अर्मान्यॅक मुरवण्यासाठी वापरले जाणारे कास्क Limousin, Alsace ह्या जातीच्या ओक वृक्षाचे लाकडापासून बनविलेले असतात. Monlezun ह्या जंगलात मिळणार्‍या काही ओक वृक्षांचे लाकूडही वापरले जाते. ह्या लाकडांमध्ये ‘टॅनीन’ जास्त प्रमाणात असते हे ब्रॅन्डीमधे मिसळले जाते आणि एक आगळा स्वाद आणि गंध अर्मान्यॅकला बहाल करते.

इतर ब्रॅन्डीज

फ्रान्स खालोखाल इटलीचा नंबर लागतो लोकप्रिय ब्रॅन्डी बनवण्यामध्ये. ‘ग्रॅपा’ ही प्रसिद्ध ब्रॅन्डी (Pomace प्रकारातली) ही इटालियन ब्रॅन्डी आहे. त्यानंतर अमेरिकन, स्पॅनिश आणि जर्मन ब्रॅन्डीज लोकप्रिय आहेत.

ब्रॅन्डीच्या ग्रेड्स

ब्रॅन्डी मुरवत ठेवलेल्या कालावधीप्रमाणे ब्रॅन्डीच्या ग्रेड्स ठरवलेल्या आहेत. ब्रॅन्डी साधारण 2 वर्षे ते 20 वर्षे मुरवत ठेवली जाते. 25 वर्षापेक्षा जास्त जुनी ब्रॅन्डी खराब आणि पिण्यासाठी अयोग्य मानली जाते.

डिस्टील्ड झालेली पण मुरवण्यासाठी कास्कमधे ठेवण्यापूर्वीची जी ब्रॅन्डीची अवस्था तारुण्यावस्था असते तिला ‘eau-de-vie‘ असे म्हटले जाते. ह्या eau-de-vie ला किती काळ मुरवेले जाते त्यावरून ब्रॅन्डीची ग्रेड ठरते.

VS
(Very Special)
कास्क मध्ये कमीत कमी 2 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
VSOP
(Very Special Old Pale)
कास्क मध्ये कमीत कमी 4 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
XO
(Extra Old)
कास्क मध्ये कमीत कमी 6 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी. भविष्यात ही सहा वर्षाची मर्यादा 10 वर्षे होणार आहे.

ह्या व्यतिरिक्त अजूनही काही मानांकने आहेत पण ती खासकरून कोन्यॅकसाठी वापरली जातात.

Napoleon VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Extra कमीत कमी 6 वर्षे मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieux VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieille Réserve Xo पेक्षा जास्त पण Hors d’age पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Hors d’âge Xo पेक्षा जास्त मुरवलेली. Hors d’age म्हणजे beyond age. उच्च दर्जाची कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

ब्रॅन्डी पिण्याचा ‘ब्रॅन्डी स्निफ्टर (Brandy Snifter)’

ब्रॅन्डी पिण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ग्लासला ब्रॅन्डी स्निफ्टर म्हणतात.
ह्यातून ब्रॅन्डी पिण्याआधी मनसोक्त हुंगायची असते.

ब्रॅन्डी पिण्याची पद्धत

हा ब्रॅन्डी स्निफ्टर ह्या चित्रात दाखल्याप्रमाणे पकडायचा असतो. असे पकडण्यामुळे ग्लासातली ब्रॅन्डी हलकीशी गरम (उबदार) होउन तिच गंध खुलतो आणि चवही खुलते.ब्रॅन्डीत किंचीत कोमट पाणी घालून प्यायल्यास तिची लज्जत काही औरच असते. थंड केलेली (बाटली फ्रीझमध्ये ठेवून, ग्लासात बर्फ घालून नव्हे) ब्रॅन्डी ‘नीट’ घेतल्यास एक आगळाच आनंद देते.

ब्रॅन्डी ही प्रामुखाने जेवणानंतर प्यायचे मद्य आहे. जेवल्यानंतर, ब्रॅन्डीसोबत जर सिगार, तोही क्युबन, असेल तर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागते की साक्षात यम जरी त्यावेळी आला तर त्याचीही, माणसाला त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर काढायची, ईच्छा होणार नाही. 🙂

अशी ही ब्रॅन्डीची गाथा सुफळ संपूर्ण करतो.

काही किस्से…

जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या ‘शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतोआहे.

माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो. तर बरेचसे ऐकीव असतात. मी आज तुम्हाला काही किस्से सांगणार आहे, दारू किस्से. सगळे मी प्रत्यक्ष अनुभवलेले तर काही मी स्वतः केलेले. पण हे सगळे किस्से घडतात अजाणतेपणी. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घेणे किती आवश्यक असते हे कळेल हे किस्से वाचून. चला तर मग बघूयात काही दारू किस्से…

एकदा मी गावी गेलो होतो. माझ्या मामाचा मित्र मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्याकडे परदेशी दारूच्या बाटल्या असतात ह्याचे त्याला खूप कौतुक होते. घरी नेऊन माझ्यासमोर एक खंबा ठेवला आणि म्हणाला “इंग्लिश आहे, मामाची काळजी करू नको. जेवायची वेळ होते आहे, ताट-पाणी घेताहेत, चल थोडीशी घेऊ”. एवढे बोलून त्याने स्टीलचे दोन ग्लास आणि दोन पाण्याचे तांबे टेबलावर ठेवले. खंबा उघडून दोन्ही स्टीलचे ग्लास अर्धे – अर्धे भरले आणि उरलेल्या जागेत पाणी टाकून ग्लास भरले. एक ग्लास माझ्या हातात देऊन म्हणाला, “चियर्स, विंजीनेरसाहेब”. आणि पुढे काही कळायच्या आत घटाघट तो ग्लास गटकावुन मोकळा झाला.  मी आपला एक एक सीप घ्यायला लागलो तर म्हणाला, “अरे उरक लवकर, हे काय मुळूमुळू पितोहेस लहान पोरांनी दुदु प्यायल्यासारखे”. काय बोलावे ह्याचा विचार करेपर्यंत त्याने त्याचा दुसरा ग्लास भरला आणि मला काही समजायच्या आत गट्ट्म करून खाली ठेवला. “काय मटणाचा मस्त वास सुटलाय रे, उरक की लवकर” असे म्हणत तिसरा ग्लास भरला आणि संपवलासुद्धा. आता त्याचे डोळे तांबारले आणि माझे मात्र पांढरे व्हायची वेळ आली होती.  असलेरोमनाळ, दांडगट किस्से गावोगावी असेच होत असतात.

खेडेगावातच असे किस्से होतात असे नाही. उच्चभ्रू आणि शहरी वातावरणातही असे किस्से होतच असतात, खास ‘सोफिस्टीकेटेड’ टच असतो त्याला. एका उच्चभ्रू, गर्भश्रीमंत महाशयांच्या ‘पेंट हाउस’ मध्ये जाण्याचा योग आला. अशीच दारूवर चर्चा सुरू झाली आणि विषय ब्रॅन्डीवर आला. त्यांच्यामते ब्रॅन्डी हा प्रकार ‘डाउन मार्केट’ असतो. ते हे सांगत असताना मागे त्यांच्या कपाटात कोन्यॅक दिसली. मी एकदम चमकून त्यांना हे काय विचारले तर त्यांनी खुशीत येऊन त्यांनी ती बाटली फ्रान्स वरून आणली असे सांगितले. मग त्यांना विचारले, “आता तर म्हणालात की  ब्रॅन्डी डाउन मार्केट आहे मग ही बाटली कशी काय?” तर त्यांनी हसत हसत उत्तर दिले “अरे ही कोग्नक  आहे, फ्रान्स एअरपोर्ट वर एका सेल्सगर्लने सजेस्ट केली. मोठी गोड होती रे मुलगी”. मी त्यावर काय बोलणार कपाळ. त्यांना कोन्यॅकचा उच्चारही धड करत येत नव्हता आणि ती एक ब्रॅन्डी आहे हेही त्यांच्या गावी नव्हते. थोडी-थोडी घेणार का असे त्यांनी विचारले. नाही म्हणण्याचे पातक तर माझ्याकडून घडणे शक्यच नाही. मी हो म्हटल्यावर त्यांनी नोकराला सांगून टेबल लावायला सांगितले. कपाटातून त्यांनी सिगारचे पाकीट काढले तेही क्युबन.ते बघून मी त्यांना माफ करून टाकले. माझा एकदम त्यांच्या विषयीचा आदर वाढला, पण क्षणभरच. लगेच ते म्हणाले  “त्या एअरपोर्टच्या छोकरीने सांगितले कोग्नक  बरोबर हा सिगार मस्त लागतो, काय गोड हसायची रे ती मुलगी”. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. टेबलवर बसलो तर ब्रॅन्डी बरोबर कोका – कोला. राग गिळून त्यांना म्हटले, “मला कोक नको मी तशीच  घेईन”. तर भूत बघितल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. त्यांनी सिगार पेटवून एक झुरका मारला आणि चक्क ‘इन-हेल’ केला (सिगारबद्दल माहिती नसणार्‍यांसाठी – सिगार ‘इन-हेल’ करत नाहीत), ते बघून मला त्यांच्या त्या पेंट हाउसवरून खाली उडी मारावीशी वाटली आणि पुढ्यातली कोग्नक  प्यायची इच्छाही मेली. ‘मोर नाचते म्हणून लांडोर नाचते’ असले हे उच्चभ्रू प्रकार बर्‍याच पेंट हाउसेस मध्ये होतच असतात.

खरे धमाल किस्से होण्याचे कुरण म्हणजे विमानप्रवासात मिळणारी दारू. एकतर विमानात दारू किती, कशी, कोणती मागावी  ह्याचा संकोच माणसाला खूप नर्व्हस करतो. त्यात सतत हसणार्‍या हवाइसुंदर्‍यांच्या त्या कृत्रिम वागण्यामुळेही माणूस जरा बावचळून जातो. त्यांच्या  मधाळ पण कृत्रिम हास्यामुळे बर्फासारखा वितळून काही बाही करून जातो आणि मागे उरतात किस्से.

एकदा मी एका प्रवासात माझे अत्यंत आवडते पेय, रेड वाइन मागवली. माझ्या शेजारच्या महाशयांनीही रेड वाइन मागवली. हवाइसुंदरीने ग्लास आणि बाटली दिल्यावर तिच्याकडे त्यांनी बर्फ मागितला आणि ग्लासभर बर्फ घेऊन त्यात बाटलीतील रेड वाइन ओतली. मी हळूच डोळ्याच्या कोपर्‍यातुन हवाइसुंदरीकडे बघितले तर ती निष्काम कर्मयोग्याप्रमाणे, ‘अजून काही सर?’ असे म्हणत चेहेर्‍यावर तेच कृत्रिम हसू घेऊन पुढे गेली. तिला ह्या असल्या प्रकारांची सवय असावी.

एकदा एका सहप्रवाशाने व्हिस्की आहे का म्हणून विचारले. आहे आणि ती पण ब्लॅक लेबल म्हटल्यावर तर गडी एकदम खूश झाला. हवाइसुंदरीने विचारले,“लार्ज ऑर स्मॉल सर”?  “एक्स्ट्रा लार्ज”, शेजारी. तिने ग्लासात बर्फ टाकून व्हिस्की ओतली आणि“एन्जॉय युवर ड्रिंक सर” म्हणून तेच कृत्रिम हास्य पसरून पुढे गेली.  आता तो ‘एक्स्ट्रा लार्ज’ असलेला ग्लास बर्फ आणि व्हिस्कीने भरून गेलेला त्यात पाणी टाकायलाही जागा नव्हती. ह्याला काय करावे ते कळेचना. ‘नीट’ घ्यायची सवय असावी लागते. तशी चव जिभेवर रुळलेली असावी लागते. एक घोट घेतला त्याने तसाच. पण त्याने त्याची झालेली पंचाईत त्याच्या चेहेऱ्यावर लगेच दिसली. तो घोट गिळावा की थुंकावा,आणि थुंकावा तर कुठे? असे भलेथोरले, ‘एक्स्ट्रा लार्ज’ प्रश्नचिह्न त्याच्या डोळ्यात उभे होते. कसाबसा त्याने तो घोट तोंड वेडेवाकडे करत गिळला आणि तो उरलेला ग्लास तसाच ठेवून दिला. त्या हवाइसुंदरीच्या नजरेला नजर द्यायची त्याला इतकी चोरी झाली की बिचारा न जेवता तसाच झोपून गेला.

आम जनता जाऊद्या हो, मागे एका मंत्री महोदयांनी असेच विमानात दारू पिऊन तमाशा केला होता. आपण ‘चौफुल्याच्या बारीत’बसलेलो नसून विमानात आहोत हेच ते बिचारे विसरून गेले होते.

कामाच्या निमित्ताने मला परदेशी दौरे करावे लागतात. माझ्यासाठी ती पर्वणीच असते. देशोदेशींची दारू चाखायची आणि घरी घेऊन (विकत हो) यायची संधी मिळते त्यावेळी. अशीच मी एकदा माझ्या मित्रांसाठी टकीला घेऊन आलो.  उत्साहाने त्यांना टकीलाची माहिती दिली. टकीला ‘नीट’ प्यायची पद्धत समजावून सांगितली (थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धतही सांगितली). त्यावर फक्त एक जण ‘नीट’ टकीला शॉट मारायला तयार झाला.  बाकीच्यांची काही छाती होईन ‘नीट’ शॉट घ्यायची.  त्यांनी चक्क सोडा, कोक मागवून ती टकीला चक्क त्यांतून प्यायली. एकच बाटली आणली म्हणून माझा आणि माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करून एक व्हिस्कीचा खंबा मागवला.  धरणीमाता दुभंगून मला त्याक्षणी पोटात घेईल तर किती बरे, असे वाटले त्यावेळी.

कॉलेज जीवनात असताना कधीतरी मित्रांबरोबर बियर प्यायला सुरुवात होते, मजे-मजेत. पण त्यावेळी पैश्याची चणचण भयंकर असते. पॉकेट्मनी संपून गेल्यावर बियर प्यायची इच्छा झाल्यावर कशी प्यायची हा मोठा यक्षप्रश्न असतो कॉलेजकुमारांपुढे. मला आणि माझा एका  मित्राला नाही पडायचा  कारण त्या मित्राचा दादा आमचा सीनियर असल्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला बियर प्यायला मिळायची.
एकदा त्या  मित्राचे नातेवाईक  मुंबई बघायला  आले होते. योगायोगाने ते त्याला भेटले. गप्पा मारून परत जाताना त्यांनी त्याला 20 रुपयांची नोट दिली. महिनाअखेरीस आख्खे 20 रुपये म्हणजे मज्जाच हो. मग आमचा दोघांचे, ते 20 रुपये बियरवर उडवायचे ठरले. तेव्हा बियर  18रुपयांना मिळायची. वाइन शॉपमधून बियर आणणे वगैरे गोष्टी  तर या आधी कधीच केल्या नव्हत्या. कसेबसे धाडस करून वाइन शॉप मधून बियर आणली. आख्खी बाटली हाताळणे आणि आता ती संपवणे असली दुहेरी जबाबदारी आम्हाला पार पाडायची होती. ह्याच्या आधी मित्राच्या दादाचे मित्र ग्लास भरून आम्हाला देत असत. आम्ही निमूटपणे तो ग्लास संपवून काहीतरी अचाट काम केले असा आव चेहर्‍यावर आणून त्यांच्यामधून निघून जायचो.
आता ते सर्व सोपस्कार आम्हालाच पार पाडायचे होते आणि तिथेच खरी गोची होती. ती बाटली उघडून  कशी आणि किती बियर ग्लासात ओतायची ह्यावर आमचे एकमत होईना. मी ह्यांआधी माझ्या  मामाला त्याच्या मित्रांबरोबर  दारू पिताना बघितले  होते. ते पाण्यातून घेताना त्यांना बघितल्यामुळे बियर मध्ये पाणी टाकून प्यावी असे माझे मत होते. तर त्याचे मत होते थम्प्स अप टाकून घेतात. मी माझी बाजू वरचढ होण्यासाठी वकिली मुद्दा मांडला, “जर  थम्प्स अप टाकले तर बियर काळी होईल, तुझ्या दादाबरोबर पिताना बियरचा रंग पिवळाच होता”. हे त्याला पटले. त्या वरचढ झाल्याच्या खुशीत मला अजून आठवले की कधी कधी मामा  पाण्याऐवजी सोड्यातूनही घ्यायचा. मग मित्राला ते सांगितल्यावर तोही आज  एक भारी अचाट काम करायच्या खुशीत ‘बियर आणि सोडा’ अशा प्लॅनला झाला. बियर तर आणली होतीच, मित्र लगेच सोडा घेऊन आला. उरलेले 2 रुपयेही सार्थकी लागले. मग आम्ही दोघांनी ती बियर सोड्यात मिक्स करून प्यायला सुरुवात केली. रंग पिवळाच होता पण चव नेहमीपेक्षा वेगळी लागत होती. अशी चव का लागते असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. एकदाची ती बाटली संपली आणि अचाट काम करून ‘सीनियर’ झाल्याचा अभिमान उराशी दाटला.
पण ते चवीचे कोडे तसेच होते. तो भुंगा काही केल्या पिच्छा सोडेना. मग एकदा परत मित्राच्या दादा बरोबर बसायची संधी मिळाली. तिथे त्याला आणि त्याच्या मित्रांना ती सर्व गोष्ट आम्ही सांगितली. ती ऐकून  सगळेजण येड्या सारखे खोखो हसत सुटले. कितीतरी वेळ ते हसतच होते अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी व्यवस्थित ‘दीक्षा’ दिली.  तेव्हा आम्हाला दोघांना कळले की आम्ही कसला किस्सा करून बसलो होतो ते.  त्यानंतर बरेच दिवस कॉलेजमध्ये आम्हाला ‘सोडामिक्स’ असे नाव पडले होते.

असे बरेच किस्से आहेत, आता एवढेच बस, बाकीचे पुन्हा कधीतरी.