काही किस्से…


जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या ‘शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतोआहे.

माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो. तर बरेचसे ऐकीव असतात. मी आज तुम्हाला काही किस्से सांगणार आहे, दारू किस्से. सगळे मी प्रत्यक्ष अनुभवलेले तर काही मी स्वतः केलेले. पण हे सगळे किस्से घडतात अजाणतेपणी. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घेणे किती आवश्यक असते हे कळेल हे किस्से वाचून. चला तर मग बघूयात काही दारू किस्से…

एकदा मी गावी गेलो होतो. माझ्या मामाचा मित्र मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्याकडे परदेशी दारूच्या बाटल्या असतात ह्याचे त्याला खूप कौतुक होते. घरी नेऊन माझ्यासमोर एक खंबा ठेवला आणि म्हणाला “इंग्लिश आहे, मामाची काळजी करू नको. जेवायची वेळ होते आहे, ताट-पाणी घेताहेत, चल थोडीशी घेऊ”. एवढे बोलून त्याने स्टीलचे दोन ग्लास आणि दोन पाण्याचे तांबे टेबलावर ठेवले. खंबा उघडून दोन्ही स्टीलचे ग्लास अर्धे – अर्धे भरले आणि उरलेल्या जागेत पाणी टाकून ग्लास भरले. एक ग्लास माझ्या हातात देऊन म्हणाला, “चियर्स, विंजीनेरसाहेब”. आणि पुढे काही कळायच्या आत घटाघट तो ग्लास गटकावुन मोकळा झाला.  मी आपला एक एक सीप घ्यायला लागलो तर म्हणाला, “अरे उरक लवकर, हे काय मुळूमुळू पितोहेस लहान पोरांनी दुदु प्यायल्यासारखे”. काय बोलावे ह्याचा विचार करेपर्यंत त्याने त्याचा दुसरा ग्लास भरला आणि मला काही समजायच्या आत गट्ट्म करून खाली ठेवला. “काय मटणाचा मस्त वास सुटलाय रे, उरक की लवकर” असे म्हणत तिसरा ग्लास भरला आणि संपवलासुद्धा. आता त्याचे डोळे तांबारले आणि माझे मात्र पांढरे व्हायची वेळ आली होती.  असलेरोमनाळ, दांडगट किस्से गावोगावी असेच होत असतात.

खेडेगावातच असे किस्से होतात असे नाही. उच्चभ्रू आणि शहरी वातावरणातही असे किस्से होतच असतात, खास ‘सोफिस्टीकेटेड’ टच असतो त्याला. एका उच्चभ्रू, गर्भश्रीमंत महाशयांच्या ‘पेंट हाउस’ मध्ये जाण्याचा योग आला. अशीच दारूवर चर्चा सुरू झाली आणि विषय ब्रॅन्डीवर आला. त्यांच्यामते ब्रॅन्डी हा प्रकार ‘डाउन मार्केट’ असतो. ते हे सांगत असताना मागे त्यांच्या कपाटात कोन्यॅक दिसली. मी एकदम चमकून त्यांना हे काय विचारले तर त्यांनी खुशीत येऊन त्यांनी ती बाटली फ्रान्स वरून आणली असे सांगितले. मग त्यांना विचारले, “आता तर म्हणालात की  ब्रॅन्डी डाउन मार्केट आहे मग ही बाटली कशी काय?” तर त्यांनी हसत हसत उत्तर दिले “अरे ही कोग्नक  आहे, फ्रान्स एअरपोर्ट वर एका सेल्सगर्लने सजेस्ट केली. मोठी गोड होती रे मुलगी”. मी त्यावर काय बोलणार कपाळ. त्यांना कोन्यॅकचा उच्चारही धड करत येत नव्हता आणि ती एक ब्रॅन्डी आहे हेही त्यांच्या गावी नव्हते. थोडी-थोडी घेणार का असे त्यांनी विचारले. नाही म्हणण्याचे पातक तर माझ्याकडून घडणे शक्यच नाही. मी हो म्हटल्यावर त्यांनी नोकराला सांगून टेबल लावायला सांगितले. कपाटातून त्यांनी सिगारचे पाकीट काढले तेही क्युबन.ते बघून मी त्यांना माफ करून टाकले. माझा एकदम त्यांच्या विषयीचा आदर वाढला, पण क्षणभरच. लगेच ते म्हणाले  “त्या एअरपोर्टच्या छोकरीने सांगितले कोग्नक  बरोबर हा सिगार मस्त लागतो, काय गोड हसायची रे ती मुलगी”. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. टेबलवर बसलो तर ब्रॅन्डी बरोबर कोका – कोला. राग गिळून त्यांना म्हटले, “मला कोक नको मी तशीच  घेईन”. तर भूत बघितल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. त्यांनी सिगार पेटवून एक झुरका मारला आणि चक्क ‘इन-हेल’ केला (सिगारबद्दल माहिती नसणार्‍यांसाठी – सिगार ‘इन-हेल’ करत नाहीत), ते बघून मला त्यांच्या त्या पेंट हाउसवरून खाली उडी मारावीशी वाटली आणि पुढ्यातली कोग्नक  प्यायची इच्छाही मेली. ‘मोर नाचते म्हणून लांडोर नाचते’ असले हे उच्चभ्रू प्रकार बर्‍याच पेंट हाउसेस मध्ये होतच असतात.

खरे धमाल किस्से होण्याचे कुरण म्हणजे विमानप्रवासात मिळणारी दारू. एकतर विमानात दारू किती, कशी, कोणती मागावी  ह्याचा संकोच माणसाला खूप नर्व्हस करतो. त्यात सतत हसणार्‍या हवाइसुंदर्‍यांच्या त्या कृत्रिम वागण्यामुळेही माणूस जरा बावचळून जातो. त्यांच्या  मधाळ पण कृत्रिम हास्यामुळे बर्फासारखा वितळून काही बाही करून जातो आणि मागे उरतात किस्से.

एकदा मी एका प्रवासात माझे अत्यंत आवडते पेय, रेड वाइन मागवली. माझ्या शेजारच्या महाशयांनीही रेड वाइन मागवली. हवाइसुंदरीने ग्लास आणि बाटली दिल्यावर तिच्याकडे त्यांनी बर्फ मागितला आणि ग्लासभर बर्फ घेऊन त्यात बाटलीतील रेड वाइन ओतली. मी हळूच डोळ्याच्या कोपर्‍यातुन हवाइसुंदरीकडे बघितले तर ती निष्काम कर्मयोग्याप्रमाणे, ‘अजून काही सर?’ असे म्हणत चेहेर्‍यावर तेच कृत्रिम हसू घेऊन पुढे गेली. तिला ह्या असल्या प्रकारांची सवय असावी.

एकदा एका सहप्रवाशाने व्हिस्की आहे का म्हणून विचारले. आहे आणि ती पण ब्लॅक लेबल म्हटल्यावर तर गडी एकदम खूश झाला. हवाइसुंदरीने विचारले,“लार्ज ऑर स्मॉल सर”?  “एक्स्ट्रा लार्ज”, शेजारी. तिने ग्लासात बर्फ टाकून व्हिस्की ओतली आणि“एन्जॉय युवर ड्रिंक सर” म्हणून तेच कृत्रिम हास्य पसरून पुढे गेली.  आता तो ‘एक्स्ट्रा लार्ज’ असलेला ग्लास बर्फ आणि व्हिस्कीने भरून गेलेला त्यात पाणी टाकायलाही जागा नव्हती. ह्याला काय करावे ते कळेचना. ‘नीट’ घ्यायची सवय असावी लागते. तशी चव जिभेवर रुळलेली असावी लागते. एक घोट घेतला त्याने तसाच. पण त्याने त्याची झालेली पंचाईत त्याच्या चेहेऱ्यावर लगेच दिसली. तो घोट गिळावा की थुंकावा,आणि थुंकावा तर कुठे? असे भलेथोरले, ‘एक्स्ट्रा लार्ज’ प्रश्नचिह्न त्याच्या डोळ्यात उभे होते. कसाबसा त्याने तो घोट तोंड वेडेवाकडे करत गिळला आणि तो उरलेला ग्लास तसाच ठेवून दिला. त्या हवाइसुंदरीच्या नजरेला नजर द्यायची त्याला इतकी चोरी झाली की बिचारा न जेवता तसाच झोपून गेला.

आम जनता जाऊद्या हो, मागे एका मंत्री महोदयांनी असेच विमानात दारू पिऊन तमाशा केला होता. आपण ‘चौफुल्याच्या बारीत’बसलेलो नसून विमानात आहोत हेच ते बिचारे विसरून गेले होते.

कामाच्या निमित्ताने मला परदेशी दौरे करावे लागतात. माझ्यासाठी ती पर्वणीच असते. देशोदेशींची दारू चाखायची आणि घरी घेऊन (विकत हो) यायची संधी मिळते त्यावेळी. अशीच मी एकदा माझ्या मित्रांसाठी टकीला घेऊन आलो.  उत्साहाने त्यांना टकीलाची माहिती दिली. टकीला ‘नीट’ प्यायची पद्धत समजावून सांगितली (थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धतही सांगितली). त्यावर फक्त एक जण ‘नीट’ टकीला शॉट मारायला तयार झाला.  बाकीच्यांची काही छाती होईन ‘नीट’ शॉट घ्यायची.  त्यांनी चक्क सोडा, कोक मागवून ती टकीला चक्क त्यांतून प्यायली. एकच बाटली आणली म्हणून माझा आणि माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करून एक व्हिस्कीचा खंबा मागवला.  धरणीमाता दुभंगून मला त्याक्षणी पोटात घेईल तर किती बरे, असे वाटले त्यावेळी.

कॉलेज जीवनात असताना कधीतरी मित्रांबरोबर बियर प्यायला सुरुवात होते, मजे-मजेत. पण त्यावेळी पैश्याची चणचण भयंकर असते. पॉकेट्मनी संपून गेल्यावर बियर प्यायची इच्छा झाल्यावर कशी प्यायची हा मोठा यक्षप्रश्न असतो कॉलेजकुमारांपुढे. मला आणि माझा एका  मित्राला नाही पडायचा  कारण त्या मित्राचा दादा आमचा सीनियर असल्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला बियर प्यायला मिळायची.
एकदा त्या  मित्राचे नातेवाईक  मुंबई बघायला  आले होते. योगायोगाने ते त्याला भेटले. गप्पा मारून परत जाताना त्यांनी त्याला 20 रुपयांची नोट दिली. महिनाअखेरीस आख्खे 20 रुपये म्हणजे मज्जाच हो. मग आमचा दोघांचे, ते 20 रुपये बियरवर उडवायचे ठरले. तेव्हा बियर  18रुपयांना मिळायची. वाइन शॉपमधून बियर आणणे वगैरे गोष्टी  तर या आधी कधीच केल्या नव्हत्या. कसेबसे धाडस करून वाइन शॉप मधून बियर आणली. आख्खी बाटली हाताळणे आणि आता ती संपवणे असली दुहेरी जबाबदारी आम्हाला पार पाडायची होती. ह्याच्या आधी मित्राच्या दादाचे मित्र ग्लास भरून आम्हाला देत असत. आम्ही निमूटपणे तो ग्लास संपवून काहीतरी अचाट काम केले असा आव चेहर्‍यावर आणून त्यांच्यामधून निघून जायचो.
आता ते सर्व सोपस्कार आम्हालाच पार पाडायचे होते आणि तिथेच खरी गोची होती. ती बाटली उघडून  कशी आणि किती बियर ग्लासात ओतायची ह्यावर आमचे एकमत होईना. मी ह्यांआधी माझ्या  मामाला त्याच्या मित्रांबरोबर  दारू पिताना बघितले  होते. ते पाण्यातून घेताना त्यांना बघितल्यामुळे बियर मध्ये पाणी टाकून प्यावी असे माझे मत होते. तर त्याचे मत होते थम्प्स अप टाकून घेतात. मी माझी बाजू वरचढ होण्यासाठी वकिली मुद्दा मांडला, “जर  थम्प्स अप टाकले तर बियर काळी होईल, तुझ्या दादाबरोबर पिताना बियरचा रंग पिवळाच होता”. हे त्याला पटले. त्या वरचढ झाल्याच्या खुशीत मला अजून आठवले की कधी कधी मामा  पाण्याऐवजी सोड्यातूनही घ्यायचा. मग मित्राला ते सांगितल्यावर तोही आज  एक भारी अचाट काम करायच्या खुशीत ‘बियर आणि सोडा’ अशा प्लॅनला झाला. बियर तर आणली होतीच, मित्र लगेच सोडा घेऊन आला. उरलेले 2 रुपयेही सार्थकी लागले. मग आम्ही दोघांनी ती बियर सोड्यात मिक्स करून प्यायला सुरुवात केली. रंग पिवळाच होता पण चव नेहमीपेक्षा वेगळी लागत होती. अशी चव का लागते असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. एकदाची ती बाटली संपली आणि अचाट काम करून ‘सीनियर’ झाल्याचा अभिमान उराशी दाटला.
पण ते चवीचे कोडे तसेच होते. तो भुंगा काही केल्या पिच्छा सोडेना. मग एकदा परत मित्राच्या दादा बरोबर बसायची संधी मिळाली. तिथे त्याला आणि त्याच्या मित्रांना ती सर्व गोष्ट आम्ही सांगितली. ती ऐकून  सगळेजण येड्या सारखे खोखो हसत सुटले. कितीतरी वेळ ते हसतच होते अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी व्यवस्थित ‘दीक्षा’ दिली.  तेव्हा आम्हाला दोघांना कळले की आम्ही कसला किस्सा करून बसलो होतो ते.  त्यानंतर बरेच दिवस कॉलेजमध्ये आम्हाला ‘सोडामिक्स’ असे नाव पडले होते.

असे बरेच किस्से आहेत, आता एवढेच बस, बाकीचे पुन्हा कधीतरी.

3 thoughts on “काही किस्से…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s