कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम)

पहिल्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास बघितला दुसर्‍या भागात (भाग २) टकीलाचे विवीध प्रकार बघितले आता ह्या अंतीम भागात टकीला तयार करण्याची चित्रमय झालक आणि टकीला प्यायची पद्धत बघूयात.

टकीला तयार करण्याची प्रक्रिया (चित्ररूपात)

अगावेचे फळ (piñas) भट्टीत भाजण्यासाठी दोन तुकड्यांमध्ये तोडले जाताना
भट्टीत भाजले जाणारे अगावेचे फळ
भाजलेले फळ श्रेडरमध्ये टाकले जाताना.
भाजलेला आणि श्रेड केलेला अगावेचा गर
भाजलेला गर भरडण्यासाठी कन्वेअर बेल्ट वरून जाताना
भाजलेला गर भरडण्याचा पारंपारिक दगड
गर भरडून होणारा रस फर्मेंटेशन टॅंक मध्ये जाताना
फर्मेंट केलेला रस डिस्टीलेशन प्रोसेसमध्ये
मॅनुअल टकीला क्वलिटी कंट्रोल प्रोसेस
डिस्टीलेशन नंतर ओक कास्कमध्ये मुरवत ठेवलेली टकीला

टकीला शॉट घ्यायची पद्धत

टकीला पिताना मीठ आणि लिंबू खुप महत्वाचे आहे. चव बहारदार होण्यासाठी.

टकीला शॉट मारण्याआधी थोडे मीठ हात उपडा करून त्यावर टाकून ते चाटून घ्यायचे. ह्या मीठामुळे जीभेवरील पॅलेट्स (मराठी शब्द ?) टकीलाच्या चवीसाठी तयार होतात. त्यानंतर टकीला शॉटसाठी 45 मिली टकीला शॉट ग्लासमध्ये घेऊन झटकन एका दमात गिळून टाकायची. शॉट गिळताना टकीला पडजिभेवर आदळू द्यायची त्याने टकीलाचा गंध (अरोमा) दरवळून, स्वाद आणखिन खुलवतो. त्यावर लिंबाची फोड घेऊन, चोखून तीचा रस जिभेवर पसरू द्यायचा.
आता जी एक मस्त ब्रम्हानंदी टाळी लागेल तीची अनुभूती घेत घेत दुसरा शॉट भरण्याच्या तयारीला लागायचे. 🙂

आता एक थोडी चावट पद्धत. 🙂

टकीला बॉडी शॉटची पद्धत

साहित्यः
टकीला : ४५ मिली
लिंबाची फोड
मीठ
आणि सर्वात महत्त्वाचे ती, प्रेयसी किंवा सखी, ह्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे.

कृती:
१. थोडे मीठ तिच्या खांद्यावर नीट काळजीपूर्वक पसरावे.
२. लिंबाची फोड तिच्या ओठात ठेवावी.
३. आता तिच्या खांद्यावरील मीठ जिभेने हळूवार चाटून घेऊन झटकन टकीला शॉट घेउन गट्टम करून टाकावा.
४. त्यानंतर तिच्या ओठात ओठ मिसळून रस येई पर्यंत ( लिंबाचा बरं का ) किस करावा.
🙂

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(समाप्त)

कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)

मागच्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास (पल्के, अगावेचे फळ, भौगोलिक स्थान वगैरे) बघितला. आता ह्या भागात बघूयात टकीलाचे वेगवेगळे प्रकार. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे टकीला ही ब्लु अगावेपासून बनवतात. ह्या ब्लु अगावेच्या वापरल्या गेलेल्या प्रमाणामुळे टकीलाचे ढोबळमानाने २ मुख्य प्रकार पडतात.

१. टकीला : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण १००% असते.

२. मिक्सटो : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण कमीत कमी ५१% इतके असते. बाकी उसाचा रस किंवा वेगळ्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज रुपातील साखर असते.

टकीला NOM

मेक्सिको सरकारने टकीलावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी टकीलाची मानके ठरवली आहेत त्यांना NOM (NORMA OFICIAL MEXICANA) असे म्हणतत. प्रत्येक बाटलीवर NOM नंबर असावा लागतो. हा नंबर मेक्सिको सरकार प्रत्येक डिस्टीलरीला देते. NOM + हा नंबर टकीलाचे ‘ओरिजिनल’त्व ठरवतो.

ह्या ओरिजिनल टकीलाचे मुरवण्याच्या कालावधीनुसार पाच वेगवेगळ्या प्रकारात बॉटलिंग केले जाते.

१. सिल्वर – प्लाटा [Blanco – White | Plata – Silver]

ह्या प्रकाराला Blanco (White) असेही म्हणतात.
डिस्टीलेशन नंतर लगेचच किंवा जास्तीत जास्त दोन महिने स्टील टॅंक मध्ये ठेवून बाटलीबंद केलेली ही टकीला सिल्व्हर किंवा व्हाईट म्हणून ओळखली जाते. म्हणजेच कास्कमध्ये न मुरवल्यामुळे हीचा रंग सोनेरी नसतो. त्यामुळे ह्या टकीलाला १००% अगावेचा गोडवा असतो. कास्कमध्ये न मुरवल्यामुळे अल्कोहोलचा हार्शनेस असतो ह्या टकीलाला. म्हणूनच ह्या प्रकारची टकीला शॉट ग्लासमधून एका झटक्यात रिचवायची असते.

२. गोल्ड – ओरो [Gold – Oro | Young – Joven]

हा प्रकार बनविण्यासाठी ब्लांकोत कॅरॅमल कलर्स, ओक लाकडाचा अर्क आणि वेगवेगळी साखरेची सिरप्स वापरून सोनेरी(ओरो) रंग आणला जातो बाटलीबंद करण्याआधी. ह्यामुळे मुरलेल्या टकीलाचा आभास निर्माण होतो. ह्या जास्त करून मिक्सटो, ५१% अगावे वापरलेल्या, टकीला असतात. अगावे व्यतिरीक्त वापरलेल्या ह्या अतिरीक्त घटकांमुळे अल्कोहोलचा हार्शनेस कमी होतो व ती थोडी स्मुथ होते. टकीलापासून बनणार्‍या कॉकटेल्ससाठी टकीलाचा हा प्रकार जास्त वापरला जातो.

३. रेस्टेड – रेपोसॅडो (Reposado)

ब्लांकोला २ महिन्यांपसून ते जास्तीत जास्त १ वर्षांपर्यंत कास्कमध्ये मुरवूत ठेवून नंतर बाटलीबंद केला जाणारा हा प्रकार सर्वात जास्त विकली जाणारी टकीला आहे. गोल्ड किंवा ओरो ह्या प्रकाराच्या उलट, कास्कच्या लाकडाचे गुणधर्म घेऊन ह्या टकीलाला रंग आणि गंध नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो. टकीला मुरवण्यासाठी वापरण्यात येणारे कास्क्स अमेरिकन किंवा फ्रेंच ओक लाकडापासून बनवलेले असतात. हे कास्क्स नविन लाकडापासून बनवलेले असतात पण काही कंपन्या बर्बन, स्कॉच आणि कोन्यॅक मुरवण्यासाठी वापरलेले जुने कास्क्स वापरतात. जुन्या कास्कमुळे त्यांच्यामध्ये असलेल्या मुळ मदिरेचा किंचीत स्वाद टकीलाला प्राप्त होतो आणि चव आणखिन मजेदार होते.

४. एज्ड(विंटेज) – अनेजो (Añejo)

१ वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत कास्क मध्ये मुरवत ठेवून त्यानंतर बाटलीबंद केलेली ही टकीला लाकडाशी जास्त काळ संपर्कात येऊन खूपच कॉम्प्लेक्स होते. ही टकीला खूपच ‘रीच’ असते चवीला. ह्या प्रकारची टकीला चवीला खुपच कोम्प्लेक्स आणि रीच असल्यामुळे शॉट ह्या पद्धतीने पिण्याऐवजी स्निफ्टर ग्लास किंवा Ouverture Tequila glass ह्यांतून मस्त एक एक सीप घेत अनुभवायची असते.

५. एक्स्ट्रा अनेजो ( Extra Añejo)

हा प्रकार २००६ पासून मान्यता प्राप्त झाला आहे. कमीत कमी ३ वर्ष मुरवत ठेवून मग ही टकीला बाटलीबंद केली जाते. ही अतिशय उच्च दर्जाची टकीला असते त्यामुळे तेवढीच महागही असते.

वर्म टकीला

टकीलाच्या बाटलीमध्ये एक अळी (Worm) असलेली टकीला अ‍सते अशी एक वंदता आहे. पण खर्‍या आणि ओरिजिनल टकीला मध्ये कधीही अळी नसते.

मेझ्कल

अळी* असणारी, अगावे (Agave Americana) पासून बनणारी मदिरा असते मेझ्कल. ही मेक्सिकोच्या टकीलाची पाच राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये बनते. हीला टकीला म्हणता येत नाही कारण ही ब्लु अगावेपासून बनत नाही. Gusano de Magueyनावाची अळी ह्या मेझ्कल मध्ये असते. ही अळी हे एक मार्केटींग गिमीक आहे. ही अळी अल्कोहल कंटेंट किती स्ट्रॉन्ग आहे दर्शवते. जर बाटलीच्या तळाशी असलेली अळी खराब झालेली नसेल तर अल्कोहोल कंटेंट खुपच ग्रेट असे दर्शवायचे असते.* बाजूच्या चित्रात बाटलीच्या तळाशी अळी आहे.

टकीला पिण्यासाठीचे वेगवेगळे ग्लासेस

टकीला शॉट ग्लास टकीला ओव्हर्चर ग्लास मार्गारीटा कॉकटेल ग्लास

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(क्रमश:)

गोष्ट एका ‘कहानी’ची…

‘कहानी’ ह्या चित्रपटबद्दल त्याचे फक्त पोस्टर सोडून काहीच वाचले नव्हते. सध्या मी ‘विद्यामय’ असल्यामुळे हा चित्रपट बघितला जाणार तर होताच 🙂 शक्यतो मी जे चित्रपट आवडीने पहायचे असतात त्यांच्याविषयी कुठेही काहिही वाचत नाही पहायच्या आधि. वाचल्यावर थोडाफार का होईना एक पूर्वग्रह होतोच. ‘दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ’ हा मंत्र मी पाळत आल्याने त्याचा फायदा हा कहानी चित्रपट बघताना झाला. त्या कहानीचीच ही गोष्ट…

चित्रपट सुरू होतो एका प्रयोगशाळेत उंदरांवर केल्या जाणार्‍या एका प्रयोगाने. एक वायू उंदरांच्या पिंजर्‍यात सोडून दिल्यावर सगळे उंदीर मरून जातात. त्यानंतर कोलकात्याची मेट्रो रेल्वे, त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची घावपळ, घाई असा सीन येतो. लगेच आता त्या वायूने एक दुर्घटना होणार हे लक्षात येते, ती तशी होते ही. संपूर्ण चित्रपटात पुढे काय होणार ह्याचा अंदाज बांधता येईल एवढी ही एकच घटना. (इथे मुद्दाम तसे करून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वादातीत).  ही आहे चित्रपटाची नांदी, ‘Prologue’. नांदीनतर मूळ कथानक…

नवरा हरवलेली ‘विद्या बागची’ नावाची एक गरोदर स्त्री (विद्या बालन) लंडनहून कोलकात्याला तिच्या नवर्‍याला,अर्णव बागचीला, शोधायला आलेली असते, विमानतळावरून डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये. रीतसर तक्रार नोंदवून झाल्यावर ती गरोदर असल्यामुळे एक सब इंस्पेक्टर (परमब्रत चॅटर्जी) तीला मदत करायला तयार होउन तिला तिचा नवरा रहात असलेल्या एका हॉटेल (?) मध्ये घेऊन जातो. आणि इथून सुरू  होतो एक गुंतागुंतीचा, धक्कादायक, किंचीत वेगवान, रहस्यमय, उत्कंठावर्धक शोधप्रवास…

नॅशनल डेटा सेंटर, कोलकाता इथे  अर्णव एका प्रकल्पावर काम करण्यासाठी लंडंनवरून आलेला असतो. तिथे विद्या त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी जाते. तिथे तिला कळते की अर्णव तिथे आलेलाच नसतो. पण तिथली HR  मॅनेजर तिला सांगते की एक ‘मिलन दामजी’ नावाचा एक कर्मचारी तिच्या नवर्‍यासारखाच दिसणारा होता. ती HR  मॅनेजर त्याची माहिती NDC च्या संगणकावर शोधायचा प्रयत्न करते पण ती फाइल तिला दिसू शकत नाही.  इथे प्रश्न निर्माण होतो की अर्णव खरंच आहे का ? अचानक अर्णव आणि मिलन दामजी असा गुंता झालेला असतो. त्यातच भर म्हणून ‘ईटेलिजंस ब्युरो’, IB,  मिलन दामजीची फाईल कोणीतरी शोधायचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या कथानकात शिरते. एक एजंट, खान (नवाजउद्दीन सिद्दीकी) कोलकात्याला दाखल होतो. तो केसचा ताबा आपल्या हातात घेतो. कथेची गुंतागुंत अजून वाढते, कोण आहे हा मिलन दामजी…

आता एका कॉन्ट्रॅक्ट किलरची एंट्री होऊन त्याला HR  मॅनेजर व इतर ज्यांनी मिलन दामजीला बघितले आहे त्यांना संपवण्याची सुपारी मिळते व तो त्यांना संपवतोही. कथेतल्या एका वळणावर खुद्द विद्याला संपवण्याची त्याला सुपारी मिळते. धक्के वाढतच जाऊन रहस्य अजूनही वाढतच जाते…

शेवटी येतो चित्रपटाचा उत्कर्षबिंदू (Climax), एक धक्का बसून रहस्याचा उलगडा होतो आणि नकळत तोंडून निघून जाते “आईशप्पथ, सही!” आता अर्णव बागची कोण, मिलन दामजी कोण, विद्याचे काय होते, रहस्य काय हे जाणून घ्यायला चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघणे जास्त सयुक्तिक आहे.

अतिशय सशक्त कथा, पटकथा! संपूर्ण चित्रपटभर खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकत आहे सुजॉय घोष ह्यांच्या कथेत. ते पटकथाकार आणि दिग्दर्शकही आहेत ह्या चित्रपटाचे. सर्व बाजू अतिशय कौशल्याने सांभाळल्या आहेत त्यांनी. रहस्यमय चित्रपटात दिग्दर्शन अतिशय महत्वाचे असते. सुजॉय ह्यांनी स्वतः कथा आणि पटकथा लिहीली असल्याने दिग्दर्शनात काय काय करायचे हे त्यांना पक्के ठाऊक होते. कमालीचे दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या घटनांचे तुकडे दाखवून त्यांची एकमेकांत सांगड घालून कथा पुढे नेण्याचे कौशल्य चित्रपटाला तांत्रिकदृष्ट्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठवते. तांत्रिकदृष्ट्या उच्च दिग्दर्शनाला मिळालेली नम्रता राव हयांच्या संकलनाची जोड ही चित्रपटची जमेची बाजू. सेतू (Cinematography) ह्यांनी दुर्गापूजेच्या तयारीत असलेला आणि दूर्गापूजेत रंगलेला कोलकाता आणि त्याची बारकाई व्यवस्थित टिपली आहे. कोलकात्याचे हे दर्शन विलोभनिय  झाले आहे.

चित्रपटात विद्या सोडली तर कोणीही तसे प्रतिथयश कलाकार नाहीत. पण जे जे आहेत त्यांनी समरसून कामं केली आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलरही त्याच्या छोट्याश्या भूमिकेत भाव  खाऊन जातो. नवीनच पोलिस झालेला, हळूवार पोलिस सब इंस्पेक्टर परमब्रत चॅटर्जीने छान रंगवला आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त विद्याचाच आहे असे म्हणता येणार नाही. पण तिने साकरलेली ‘विद्या बागची’ कुठेही ‘विद्या बालन’ होत नाही. ती शेवटपर्यंत तंतोतंत विद्या बागचीच वाटते, इतका सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय केला आहे विद्याने. गरोदर बाईचे अवघडलेपण, नवरा हरवलेल्या बाईची घालमेल अतिशय सहजपणे रंगवलीय तिने.

“हॅ, हिंदी चित्रपटांमध्ये असते काय बघायला?” असे म्हणणार्‍यांनी आवर्जून बघावा अशा ‘कहानी’ची ही गोष्ट!

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे.
मिसळपाव.कॉम
वरील लेखिका अदिती ह्यांच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते.  ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री

  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते
    (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)

तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता.

त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.

सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?

ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं.

मला हे एकदम भावले आणि पटले. तुमचे काय मत?

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

   मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व ‘सीनियर’  मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे  जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता. पण यथावकाश सर्व आळ्या, वाडे बिल्डरलॉबीने सिमेंटच्या जंगलात रूपांतरित करून टाकले. अनोळखी लोकांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे शिव्या घालत फिरणे, बोंबाबोंब करणे हे बंद होऊन होळी ही फक्त रात्री दारू चढवून आपापसात गप्पा मारणे इतपतच उरली.

एकदा डिप्लोमाला असताना माझा एक मित्र, शेखर देशमुख, थेट बदलापुराहून माझ्याकडे होळी साजरी करण्यासाठी आला होता. त्याला मी लहानपणीच्या होळीच्या खूप गप्पा हाणल्या असल्यामुळे त्यालाही जरा उत्सुकता होतीच आमच्या पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची. रात्री मग माझे आगाशीतले काही मित्र आणि शेखर असे मिळून व्हिस्कीचा खंबा घेऊन बसलो. त्यावेळी शिकाऊ उमेदवार असल्यामुळे भरपूर भ्रष्ट पद्धतीचेच पिणे होते ते. खंबा संपत आल्यावर सगळेच जण जरा मोकळे होऊन आपापला खरा रंग दाखवून पुड्या सोडू लागले. गप्पांच्या ओघात भांगेचा विषय निघाला. आमच्यापैकी कोणीच भांग घेतली नव्हती त्याआधी. शेखरला भांग ट्राय करायची इच्छा झाली. मला म्हणाला,”भोXXX, मी तुझा अतिथी आहे आणि अतिथी देवो भवं ह्या न्यायाने मला भांग हवीय, सोय कर.”  च्यायची त्याच्या, आधीच मर्कट तशात मद्य प्याले, तो एकटाच नाही हो, आम्ही सगळेच. मग रात्री त्या तसल्या अवस्थेत भांगेची व्यवस्था करायला आम्ही सगळेच ‘हलेडुले’ होऊन निघालो.

माझा एक मारवाडी मित्र होता, त्यांच्या एरियात त्याचा मामा भांगेची सोय करतो अशी ऐकीव माहिती होती. मध्य रात्री त्याला गाठले. तो त्याच्या मामाकडे घेऊन गेला आणि खरोखरचं तिथे भांग घोटण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या मारवाडी मित्राने त्याच्या मामाला मला भांग हवी असे सांगितले. त्यानेही लगेच चान्स मारून घेतला, “सरचां मुलगा ना रे तू, तू पण हेतलाच काय? जय जलाराम बाप्पा”. माझे वडील शाळेत सर होते आणि त्याने बहुदा माझ्या वडिलांच्या हातचा प्रसाद भरपूर खाल्ला असवा कारण त्या प्रसादाची परतफेड तो होळीचा प्रसाद, भांग, देऊन करीन म्हणाला. “शक्काळला येऊन घेऊन जा”, असे म्हणून त्याने आम्हाला आश्वस्त केले. मीही लगेच जरा कॉलर टाईट करून शेखरकडे बघितले (पुढे कंडिशन कशी टाईट होणार आहे ह्याची अजिबात कल्पना  त्यावेळी नव्हती). तो ‘अतिथी देव’ तृप्त चेहेर्‍याने माझ्याकडे बघत होता.

ह्या शेखरचा माझ्या घरी खूप वट होता. PLCNA हा एक विषय मला समजावून सांगण्यासाठी ह्याआधी त्याचे माझ्या घरी बर्‍याच वेळा येणे झाले होते. थेट बदलापुरावरून आपल्या मुलाला अभ्यासात मदत करायला येतो म्हणून आईला त्याचे फार कौतुक होते. पण ते कार्ट कसलं बेणं आहे ह्याची तिला तोपर्यंत कल्पना नसल्यामुळे चक्क धूळवडीला घरी मटण वगैरे आणून खास त्याच्यासाठी पेश्शल तिखट मेनू बनवला होता. त्या जेवणाच्या तयारीची सोय करून आम्ही आमच्या पहिल्यावहिल्या भांगेच्या अनुभूतीसाठी कुच केले.

मारवाडी मित्राच्या मामाकडे गेलो. तो आमची वाटच बघत होता. “ये ये साला लै टाइम लावला, मला वाटला येते का नाय”, असे म्हणत त्याने आमचे स्वागत केले. मग हिरवट मेंदी रंगाचे, ओलसर लगद्याचे 2-3 छोटे-छोटे गोळे माझ्या हातात ठेवून बोलला, “लैच कडक माल हाय, कोण कोण घेते?”. मग आमच्याकडे सगळ्यांकडे त्याने नीट बघून घेतले. “तुम्हीच घ्या, लहान पोरान्ला अजिबात द्यायचा नाय”, असे बजावून आम्हाला जायला सांगितले. ते गोळे घेऊन निघालो तेव्हा सकाळचे दहा – साडे दहा झाले होते. जेवायला साधारण अजून दोनेक तास होते. भरपूर वेळ होता.

एक चहाच्या टपरीवर जाऊन दुधाचे ग्लास मागवून ते गोळे दुधात मिक्स करून ते दूध आम्ही सर्वांनी संपवले. भांगेवर गोड खाल्ल्यावर आनंद आणखीन द्विगुणित होतो अशी ऐकीव माहिती होती. त्या माहितीचा हवाला धरून मग गोड खायचा सपाटा लावला. सर्वांत आधी अर्धा किलो जिलबी हाणली. मग कुल्फीवाल्याला पकडून 2-2 कुल्फ्या चापल्या. मग रस्त्यावर रंग उधळत फिरायला सुरुवात केली. मध्येच मिठाईच्या दुकानातून मसाला दूध,पेढे असला गोड माराही चालू होता. शेवटी एका पान टपरीवर मसालापान डब्बल गुलकंद घालून आणि ईक्लेयर चॉकलेट कातरून त्यात घालून खाल्ले. परत रंगांची उधळण करत रस्त्यावर निघालो. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा जोर जाणवू लागला होता. आता घरी जायचे मटण हाणून मस्त ताणून द्यायची असा विचार करतंच होतो….

अचानक मला सर्व आवाज एकदम हळू हळू ऐकू येऊ लागले. पायाला जरा मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. पायाला काय झाले वाटते न वाटते  तोच एकदम हलकं हलकं वाटायला लागले. “च्यायला चढली की काय रे”, असे शेखरला म्हणालो. तर तो म्हणाला “चल लवकर जाऊन अंघोळ करून जेवूयात. मी जातो, मला बदलापुराला  पोहोचायला उशीर होईल.” मग लगेच आम्ही घरी गेलो. मी अंघोळ करून कपडे बदलेपर्यंत मला सहजावस्था आली. शेखर अंघोळ करून बाहेर आला तोच लालबुंद होऊन.  त्याला बरीच चढली होती. “मित्रा, माझी लागली आहे, मला काहीच कळत नाहीयेय काय करायचे ते. काकूंना तोंड दाखवायची सोय राहिली नाही. मला खूप काहीतरी होतेय. मला डॉक्टरांकडे घेऊन चल.” हे ऐकून माझ्या एकदम कपाळातच गेल्या. हे काय त्रांगडं होऊन बसलं. मी त्याला म्हणालो, “जेवून घेऊया रे, जेवल्यावर जरा बरं वाटेल.” पण तो पार ऐकण्याच्या पलीकडे पोहोचला होता. तो पर्यंत आईला संशय आलाच काहीतरी गडबड झाल्याचा. लगेच मग भावाला सांगून शेखरला बाहेर काढले आणि सायकलवर डबल सीट घेऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आमच्याकडे बघूनच त्याला काय झाले असावे ते कळले. त्याने शेखरला टेबलवर झोपवून चेक केले आणि विचारले “काय घेतले?”
“भांग, डॉक्टर.”, मी.
“नक्की का? त्यात काय मिक्स केले होते?”, डॉक्टर.
“नाही डॉक्टर, भांगच होती”, मी.
“कुठून आणली होती”, डॉक्टरने संशयितपणे. मग मी डॉक्टर आणि वकिलापासून काहीही लपवू नये म्हणून त्या मारवाड्याचे नाव आणि त्या एरियाचे नाव सांगून मोकळा झालो.
“रात्री काय घेतले होते”, डॉक्टर.
“व्हिस्की”, मी.
“किती घेतली होती”, डॉक्टर. आता माझी फाटली, मी काहीच बोलत नाही हे पाहून त्याने काय ओळखायचे ते ओळखलं.
“भोसडीच्यांनो, झेपत नाहीतर हे असले पालथे धंदे कशाला करता रे. त्या भांगेत अफू मिक्स असणार. डी हायड्रेशन झाले आहे. लवकर घरी जाऊन भरपूर जेवा. ग्लूकोज नाहीयेय शरीरात. असच राहिले तर सलाईन चढवावे लागेल. आणि ह्याला (शेखरला) काय झाले आहे, असा का डिप्रेस झालाय हा. ह्याला आधी जेवायला घाला”, डॉक्टर. ते ऐकून मलाही अचानक भयंकर असे काहीतरी वाटू लागले,एकदम आजारी पडल्यासारखे झाले.

त्या डॉक्टरला पैसे देऊन बाहेर आलो. तर शेखर एकदम चालू झाला, “मी नालायक आहे, तुझी आई एवढी माउली, माझ्यासाठी मटणाचे जेवण बनवले आणि मी भिकारचोट काय करून बसलो. आता कसे तोंड दाखवू त्या माउलीला”. ते ‘माउली’ तो असे काही म्हणत होता की मला त्याही अवस्थेत खो खो हसायला येत होते. आता ते हसू त्या अफूमिश्रित भांगेचा परिणाम होता की काय ते त्या आळंदीच्या खरोखरीच्या माउलीलाच ठाऊक. “ए, मला घरी जेवायला यायचे नाही. मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल, सलाईन लावा मला नाहीतर मी मरीन”,शेखर. त्याचा तो अवतार बघून मी आणि माझा भाऊही घाबरलो.  शेखर तर काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हता. मग आमची वरात निघाली जवळच्या हॉस्पिटलमध्ये…

हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर धूळवड करायला निघून गेले होते. नर्स आतमध्ये जेवत होत्या. एका नर्सला बोलावून मघाच्या डॉक्टरांचा रेफरंस देऊन सांगितले की शेखरला सलाईन लावायचे आहे. ती भडकलीच, असे कोणालाही उगाच सलाईन लावत नाही असे म्हणाली. आता आली का पंचाईत. मग तिला त्या डॉक्टरांशी फोनवर बोलायला सांगितले. शेखरने “मी नालायक आहे, माउली मला माफ कर” असा लावलेला घोष पाहून तिलाही काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. तिने डॉक्टरांना फोन केला. मग आम्हाला बसायला सांगून ती  जेवायला परत गेली. इकडे शेखरचे, “मी नालायक आहे, खाशील भांग परत” हे स्वगत चालूच होते. तेवढ्यात त्याच्या कानामागून एक घामाची धार एकदम आली आणि माझे अवसानच गळाले.भयंकर घाबरलो मी. “नssssर्स”, असे खच्चून ओरडलो मी. 2-3 नर्स एकदम पळत आल्या. त्यांनी लगेच शेखरला एक बेडवर झोपवून सलाईन चालू केले. मी बाहेरच थांबलो. आता मलाही ताण असह्य झाला होता. मी कॉरिडॉरमध्ये येरझारा घालू लागलो. एक नर्स मला खेकसून म्हणाली, “बस तिकडे बाकड्यावर”. मी हो म्हणालो आणि परत येरझारा घालू लागलो. असे 2-3 वेळा झाल्यावर माझी पण शेखरच्या बाजूच्या खाटेवर रवानगी झाली आणि दंडावर सलाईन चढले. (हे सगळे मला नंतर भावाने सांगितलं, अदरवाइज माझ्या लक्षात राहण्याचे काहीच कारण नव्हते 😉 )

सलाईन संपल्यावर आम्ही दोघेही जरा ताळ्यावर आलो. “मला डायरेक्ट स्टेशनवर सोड, काकूंच्या समोर जायची माझी हिंमत नाही”, शेखर. ‘माउली’वरून पुन्हा ‘काकू’ वर आल्याने शेखरही आता बराच हुशार झाला हे माझ्या लगेच लक्षात आले (तसा हुशार आहेच मी, लहानपणापासून). पण आईची सक्त ताकित होती,”घरी येऊन जेवायचे”. मग नाईलाज असल्याने शेखरला घरी यावेच लागले. घरी पोहोचल्यावर त्याने मानही वर केली नाही. जे काही पानात वाढले ते गुपचूप खाल्ले.”आता नीट घरी जाऊ शकशील का की उद्या जातोस?”,आई. त्याच्या पोटात गोळाच आला. मान खाली तशीच ठेवून तो म्हणाला, “नाही आता बरे आहे, घरी जाईन.”
“ठीक आहे, घरी पोहोचल्यावर फोन कर.”, आई. लगेच त्याचे पाऊल घराबाहेर पडले. माझा भाऊ त्याला स्टेशनवर सोडायला गेला. मला आई आणि बाबांच्या तावडीत सोडून. ते गेल्यावर माझे काय झाले त्याच्यावर एक नवीनं लेख पुन्हा केव्हातरी 🙂

त्यानंतर पुन्हा कधी भांग खायची छाती झाली नाही. आत्ताही हे सर्व लिहिताना अंगावर काटा आला आहे.

आधी(चं) हौस त्यात पडला पाऊस…

मागे देवगिरी किल्ल्याला भेट देऊन आल्यापासून माझा धाकटा जरा इतिहासमय झाला होता. तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकणे हा त्याचा आवडता छंद बनला. यू ट्यूब वर जाऊन महाराजांचे ऍनिमेशनपट पाहणे, कलर्सवर चालू असलेली महाराजांची सीरियल (अतिशय टुकार असलेली) पाहणे ह्या गोष्टी तो अगदी मावळ्याच्या निष्ठेने करतो.

‘कायद्याचे बोला’ बघितल्यापासून माझी मोठा मुलगा मकरंद अनासपुरे, आपला मक्या हो, त्याचा प्रचंड फॅन झाला आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि गावरान भाषेचा तडका त्याला फारच आवडतो, म्हणजे मलाही बरं का. विशेषतः म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रभावी वापर तर मला भयंकर आवडतो. आता तो संवाद लेखकाच्या कौशल्याचा भाग झाला हे जरी खरे असले तरीही मक्याच्या तोंडून ऐकण्याची खुमारी काही औरच आहे. विशेष म्हणजे त्याने अजूनही भरत जाधव सारखा वात आणला नसल्यामुळे अजूनही तो सुसह्य आहे. (त्या भरतला कोणीतरी स्टेज आणि स्क्रीनमधला फरक समजावून सांगा ना ,प्लीज…)

तर ह्या दोन्ही गोष्टी आठवायचे आणि सांगायचे कारण म्हणजे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट. असंख्य वेळा पाहिलेला हा चित्रपट (सौजन्य: टोरंट डाउनलोड) परवा परत एकदा बघितला. ह्या चित्रपटात महाराज आणि मक्या असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे दोन्ही मुलांचा आवडता चित्रपट आहे हा. मला जनरली मुलांबरोबर चित्रपट बघताना त्यांना कथानक समजावून सांगणे आवडते. थोड्याफार तांत्रिक करामतीं समजावून सांगणे, पात्रांविषयी माहिती देणे, जोक्स, कोट्या समजावून सांगणे ह्यात मला रस असतो त्यामुळे बच्चेकंपनी माझ्याबरोबर चित्रपट बघायला एकदम खूश असते. त्यात मक्याचा चित्रपट बघताना मी ‘मस्ट’चं. त्याचे डायलॉग्सचे षट्कार बहुतेक माझ्या मोठ्याच्या डोक्यावरून जातात. तो  म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ समजावून घ्यायच्या खूप मागे असतो. मी त्याच्याशी बोलताना खूप वेळा त्यांचा वापर करत असतो त्यामुळे मला तशीच उत्तरं द्यायला (बहुतेक वेळा निरुत्तर करायलाच) म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करून, त्याला आवडते.

त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बघितला तेव्हा त्यांना भोसले म्हणजे कोण, गोसालिया त्याच्या का मागे लागलाय, महाराज असे काय आले, ते कुठे राहतात (धाकट्यासाठी), मक्या कोण ह्यातच सगळा वेळ गेला होता. मग दुसर्‍यांदा बघितला तो मात्र मक्याची आतषबाजी ऐकण्यासाठी, आणि भोसलेला आलेला जोर आणि त्या जोषांत त्याने मारलेले डायलॉग्स एन्जॉय करण्यासाठीचं.

त्यात मक्याचा एक डायलॉग आहे ‘आधीच हौस त्यात पडला पाऊस’. हा डायलॉग ऐकून माझी बायको माझ्याकडे बघून जोरात हसली. मोठ्या मुलाला कळेना की काय झाले. मग तो त्याचा अर्थ काय म्हणून मागे लागला. “अरे त्याचा अर्थ तुझे बाबा”, असे म्हणून बायको पुन्हा हसायला लागली. हसून झाल्यावर तिने त्याचा अर्थ अगदी साग्रसंगीत त्याला समजावून सांगितला. त्याला तो अर्थ आता व्यवस्थित कळला, बापाचे जिवंत उदाहरणच संदर्भासहित स्पष्टीकरणाला होते म्हटल्यावर कसे समजणार नाही? मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत “काय झाले?”, “तो काय बोलला?”, “आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय?” असे विचारू लागला. आता त्याला काय सांगणार कपाळ. आता आम्ही सगळे हसतो आहोत आणि आपल्याला काही समजत नाही हा अपमान सहन न होऊन त्याने भोकांड पसरले. मग त्याला काहीतरी थातूर मातूर समजावून सांगितले. त्यानेही बेट्यानं सगळं समजले असा आवा आणला आणि पिक्चर परत रिवाइंड करायला लावून तो डायलॉग आल्यावर जोरात हसला. खरंतर त्याला काहीही कळले नव्हते. त्यानंतर मी मध्येच कधीतरी त्याला “आधीच हौस त्यात पडला पाऊस” असे उगाचच म्हणायचो. एक दोनदा तो हसला पण नंतर काही तो हसायचा नाही, पण त्याचा चेहरा जरा विचारी व्हायचा. मग मीही तो डायलॉग त्याला मारणे बंद केले.

परवा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ परत झी टॉकीजला लागला होता. नेहमीप्रमाणे मी आणि माझा मोठा मुलगा डायलॉग्जवर हसत होतो. त्यात मक्याचा तो डायलॉग परत आला, ‘आधीच हौस त्यात पडला पाऊस’. तो डायलॉग आल्यावर माझा धाकटा मुलगा धावत धावत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “बाबा, मला ह्या अर्थ माहितेय”. मला  एकदम हसूच आले. मी म्हटले काय आहे सांग. त्यावर तो म्हणाला, “अहो, त्या भोसलेच आधीचं हाउस आहे ना त्यात पाऊस पडला आणि म्हणून त्याला दुसरं हाउस बांधायचंय पण तो गोसालिया त्याला बांधून देत नाहीयेय. त्याला महाराज मदत करताहेत दुसरं घर बांधायला”. आणि आता गोसालियाची कशी मज्जा होणार म्हणून हसायला लागला आणि मी मात्र त्याच्या हौस च्या हाउस ह्या इंटरप्रीटेशनने फ्लॅट झालो होतो.

“कोई शक?” हे एकढेच म्हणावेसे वाटते आता ह्या आजच्या पिढीच्या आकलन आणि विचार शक्ती पुढे.

कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १)

कीला ह्या माझ्या अत्यंत आवडत्या मद्याची आणि माझी ‘तोंड’ओळख फारच अनपेक्षितरीत्या झाली. 2000 साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो असताना जुन्या मित्रांचा न्यू जर्सी येथे गेट टुगेदरचा  बेत ठरला. त्यातल्या एका मित्राला मायक्रो-सॉफ्ट मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याबद्दल त्याने ‘रेड लॉबस्टर’ ह्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्हा सर्वांना पार्टी दिली. तिथेच मला टकीला भेटली 🙂

त्या मित्राने जेवणाच्या ऑर्डरीबरोबरच मार्गारीटा कॉकटेलही मागवले होते. त्या कॉकटेल ग्लासबरोबर एक छोटा ग्लासपण सर्व्ह केला गेला होता. (त्याला शॉट ग्लास म्हणतात हे तेव्हा माहिती नव्हते) त्यात सोनेरी रंगाचे द्रव्य होते. आमच्याबरोबर असणार्‍या कोणाच्याही मागच्या सात पिढ्यांमधील कोणीही ‘रेड लॉबस्टर’ मध्ये जाऊन काहीही ऑर्डर करण्याची सुतराम म्हणतात तसली शक्यता नसल्याने त्या छोट्याश्या ग्लासात काय आहे हे कोणालाही माहिती नव्हते आणि कळलेही नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच जण, पु.लं. आणि त्यांचे मित्र मॉन्जीनीमध्ये गेल्यावर जसे बावचळून गेले होते, डिक्टो तसेच बावचळून गेलो होतो. त्या ग्लासात काय आहे आणि त्याचे काय करायचे ह्या टेन्शनमुळे समोरचा चवदार लॉबस्टरही गोड लागेना. त्यात ऑर्डर घ्यायला आणि सर्व्ह करायला होत्या अमेरिकन ललना, त्यामुळे आम्ही सर्वच जण आणखीनंच संकोचलो होतो. पण देवदयेने समोर मादक ‘शराब’च्या जोडीने ‘शबाब’ही असताना तसेच बावचळून जाणे आणि तसेच बसून राहणे मनाला काही केल्या पटेना. मग मीच जरा धाडस करून आमच्या वेट्रेसला (आमच्या म्हणजे  आमच्या टेबलच्या)  बोलावून त्या छोट्या ग्लासात काय आहे ते विचारले.

ती एक टीन एजरच होती. एकदम फसफसणार्‍या उत्साहात तिने सांगितले ‘शुअर सर, इट्स टकीला’. ऑ, मी आणि सर? एक मित्र बोललाही ‘च्यायला तुझा बाप शाळेत सर होता ना रे, तुला का सर म्हणतेय ती?’ तोही मुंढेवाडी बुद्रुक सोडून पहिल्यांदाच गावाबाहेर आला असल्यामुळे त्याच्या त्या तिरकस बोलण्याला त्याचे अज्ञान  समजून मी तिकडे दुर्लक्ष केले. आता त्या ग्लासात टकीला आहे हे तर कळले होते पण त्या छोट्या ग्लासात ती टकीला द्यायचे प्रयोजन काही केल्या कळेना. त्यांत पुन्हा ते सर म्हटल्यामुळे आता एक प्रचंड गोची झाली होती, त्या टकीलाचे काय करायचे ते विचारायचे कसे? एका हायस्कूलच्या सरांचा मुलगा असल्याने ‘सरांना सर्व काही माहिती असते किंबहुना तसा आव आणायचा असतो’ हे मला चांगलेच माहिती होते. मी तसा आव आणायचा प्रयत्न केलाही पण एकंदरीतच आमच्या भंजाळलेल्या अवतारावरून आम्ही सर्वजण कुठल्यातरी ‘बुद्रुक’ गावावरून आलो आहोत हे तिला बहुदा कळले असावे. ‘एनी हेल्प,सर?’ असे ती विचारती झाले. मग मात्र मी सर्व लाज सोडून त्या छोट्या ग्लासात दिलेल्या टकीलाचे काय करायचे ते तिला विचारून मोकळा झालो. तिने हसून ‘शुअर सर’ म्हणून त्या छोट्या ग्लासातली टकीला मार्गारीटामध्ये टाकून ते कॉकटेल अजून स्ट्रॉन्ग करू शकतो असे सांगितले. तसे करायचे नसल्यास नुसताच शॉट घ्यायचा असे ज्ञान वाढवले. नुसताच शॉट घ्यायचा हे तोपर्यंत बियर (तीही सुरुवातीला सोडामिक्स) पिणार्‍या मला काही झेपलेच नाही. ‘नुसताच शॉट घ्यायचा म्हणजे कसे?’ हे तिला विचारले. तिच्या मधाळ हसून बोलण्यामुळे नाही म्हटले तरी आता माझीही भीड जरा चेपली होतीच. 🙂   तिने लगेच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करून टाकला आणि परत एकदा मधाळ हसत म्हणाली ‘असे!’ मग तिला थॅन्क्स म्हणाल्यावर ती निघून गेली.

ती गेल्यावर मग सर्वांनी तसा शॉट घ्यायचे ठरवले. आता तिने माझा ‘सर’ केल्यामुळे आणि माहिती मिळवायचा गडही मी ‘सर’ केल्यामुळे सर्वप्रथम मीच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करावा असा सर्वांनी कल्ला केला. मी ही मग धाडस करून तो शॉट ग्लास उचलून गट्टम केला. त्यानंतरचा अनुभव काय वर्णावा महाराजा! जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत. त्यानंतर त्या चवीमुळे आणि त्या अनुभवामुळे आणखीन 2-3 शॉट्स मागवून ते गट्टम  करण्यात आले.  प्रत्येक शॉटबरोबर ओव्हरकोट, मफलर, स्वेटर असे प्रचंड थंडीमुळे घातलेले कपड्यांचे थर काढून टाकले, सर्वांनीच. ह्या अनुभवानंतर मी तर टकीलाचा कट्टर भक्त झालो.

त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मदिरेचा महापूर असलेल्या जपानमध्ये जाण्याचा योग आला. तोक्योमध्ये रोप्पोंगी ह्या उपनगरात ‘अगावे’ नावाचा एक्सक्लूसिव्ह टकीला बार आहे. त्या बारमध्ये गेल्यावर टकीलाचे जे काही असंख्य प्रकार जगात अस्तित्वात आहेत ते सर्व एका छताखाली बघायला आणि चाखायला मिळाले. त्यावेळी चाळीस चोरांच्या गुहेत शिरल्यावर, तिथली अगणित संपत्ती बघितल्यावर अलीबाबाची जशी अवस्था झाली असेल तशीच माझी, टकीला भक्ताची, अवस्था झाली होती. 🙂

चला आता नमना नंतर मूळ गाथेकडे वळूयात.

टकीला ही मेक्सिको ह्या उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील देशाची देणगी आहे मद्यविश्वाला. टकीला, मेक्सिकोत,  ‘अगावे‘ ह्या निवडुंग (Cacti) सदृश्य, भरपूर प्रमाणात पैदास होणार्‍या, वनस्पतीच्या शर्करायुक्त फळापासून बनवली जाते. हे फळ  अननसासारखे असते त्याला स्पॅनिश भाषेत ‘piñas’ म्हणजेच अननस असे म्हणतात.(हा piñas म्हणजेच pina colada मधला  पिना)

ह्या टकीलाचा इतिहास फार रंजक आहे. फार पुर्वीपासून ह्या अगावेच्या फळाच्या (piñas) गरापासून, त्या गराला फर्मेंट करून (आंबवून)  एक मादक द्रव्य मेक्सिकोचे स्थानिक लोक बनवत असत. त्याला पल्के (Pulque) असे ते म्हणत. अगावेच्या बर्‍याच प्रजाती आहेत. त्यां विवीध प्रजातींच्या मिलाफापासून (Blend) हे पल्के बनवले  जात असे. पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केला.  स्पॅनिश लोकांना हे पल्के आवडले पण ते पडले जातीवंत युरोपियन, त्यांनी त्याला ‘युरोपियन टच’ दिला. म्हणजे त्यांनी त्या फर्मेंटेशनला जोड दिली डिस्टीलेशनाची.  स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केल्यावर  साधारण एका दशकात उत्तर अमेरिकेतले पहिले डिस्टील्ड मद्य ह्या अगावेपासून तयार झाले जे आजच्या टकीलाचे मूळ रूप, ज्याला ‘मेझ्कल (Mezcal)’ असे म्हटले जायचे, ते होय.

मेझ्कल ब्रॅन्डी -> अगावे वाइन -> मेझ्कल टकीला -> शेवटी आजची मॉडर्न टकीला असा आजच्या टकीलाचा सुधारीत आवृत्तींचा प्रवास झाला.

आता प्रश्न असा पडेल की हा सुधारीत आवृत्तींचा प्रवास का वा कसा? तर ह्याचे उत्तर दडले आहे अगावे ह्या वस्पतींच्या प्रजातींमध्ये. सुरुवातीला मूळ मेक्सिकन स्थानिक लोक बर्‍याच प्रकारच्या अगावेच्या प्रजातीपासून मेझ्कल बनवायचे. पण स्पॅनिश लोकांनी त्यावर युरोपियन मद्यसंस्कार केले 🙂  त्यांनी अगावेच्या विवीध प्रजांतींच्या वापरामधे सुसूत्रता आणली. जसे जसे ह्या प्रजातींवर संशोधन होत गेले तसे तसे आजची सुधारीत टकीला तयार होत गेली.

अगावेच्या ह्या खालील प्रमुख प्रजाती आहेत.

 Agave Tequilala : टकीलासाठी वापरली जाणारी अगावे

 ह्यातली फक्त ‘Agave Tequilala‘ ही प्रजात आजची मॉडर्न टकीला बनवण्यासाठी वापरली जाते.ह्या अगावेला ‘ब्लु अगावे (Blue Agave)’ किंवा टकीला अगावे असेही म्हणतात. ह्या प्रजातींच्या फळामध्ये शर्करा फ्रुक्टोजच्या रूपात मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे ही प्रजात टकीला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असते.बाजूच्या चित्रात दिसणारी ही ह्या वनस्पतीची ही पाने आहेत. ती वेळोवेळी कापली जातात ज्यामुळे त्याच्या फळाला जास्त एनार्जी मिळते आणि त्यातले शर्करेचे प्रमाण वाढते. ह्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे परागीकरण वटवाघूळाकडून होते.
 हाच तो piñas म्हणजे अगावेचे शर्करायुक्त फळ ज्याला ‘अगावे हार्ट’ म्हटले जाते.हे फळ साधारण ह्याच्या झाडाच्या वयाच्या साधारण बाराव्या वर्षी तयार होते. ह्या फळाची पाने काढून टाकल्यावर वजन अंदाजे 35-90 किलो पर्यंत असते. ही कापलेली पाने पुढच्या प्लांटेशनसाठी वापरली जातात.टकीला बनवण्यासाठी ह्या फळाचा गर, हे फळ भाजून काढला जातो.

भौगोलिक स्थानमहात्म्य

जसाजसा टकीलाला लोकाश्रय मिळून ती लोकप्रिय होत गेली तसा मेक्सिकोला एक उत्पनाचे साधन मिळून टकीला डिस्टलरीच्या उद्योगाने तेथे मोठे रूप धारण केले. मग ह्या टकीलाच्या स्वामित्वासाठी तिथले सरकारही जाग़ृत झाले आणि टकीलाची सरकारी मानके ठरली.मेक्सिको मधल्या जालिस्को (Jalisco) राज्यातील Los Altos (Highlands) ह्या पर्वतराशींच्या कुशीत असलेल्या ‘टकीला‘ ह्या महानगरामधे बनलेली टकीला हीच स्वतःला अस्सल मॉडर्न टकीला म्हणवून घेउ शकते.

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

(क्रमश:)