गोष्ट एका ‘कहानी’ची…


‘कहानी’ ह्या चित्रपटबद्दल त्याचे फक्त पोस्टर सोडून काहीच वाचले नव्हते. सध्या मी ‘विद्यामय’ असल्यामुळे हा चित्रपट बघितला जाणार तर होताच 🙂 शक्यतो मी जे चित्रपट आवडीने पहायचे असतात त्यांच्याविषयी कुठेही काहिही वाचत नाही पहायच्या आधि. वाचल्यावर थोडाफार का होईना एक पूर्वग्रह होतोच. ‘दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ’ हा मंत्र मी पाळत आल्याने त्याचा फायदा हा कहानी चित्रपट बघताना झाला. त्या कहानीचीच ही गोष्ट…

चित्रपट सुरू होतो एका प्रयोगशाळेत उंदरांवर केल्या जाणार्‍या एका प्रयोगाने. एक वायू उंदरांच्या पिंजर्‍यात सोडून दिल्यावर सगळे उंदीर मरून जातात. त्यानंतर कोलकात्याची मेट्रो रेल्वे, त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची घावपळ, घाई असा सीन येतो. लगेच आता त्या वायूने एक दुर्घटना होणार हे लक्षात येते, ती तशी होते ही. संपूर्ण चित्रपटात पुढे काय होणार ह्याचा अंदाज बांधता येईल एवढी ही एकच घटना. (इथे मुद्दाम तसे करून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वादातीत).  ही आहे चित्रपटाची नांदी, ‘Prologue’. नांदीनतर मूळ कथानक…

नवरा हरवलेली ‘विद्या बागची’ नावाची एक गरोदर स्त्री (विद्या बालन) लंडनहून कोलकात्याला तिच्या नवर्‍याला,अर्णव बागचीला, शोधायला आलेली असते, विमानतळावरून डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये. रीतसर तक्रार नोंदवून झाल्यावर ती गरोदर असल्यामुळे एक सब इंस्पेक्टर (परमब्रत चॅटर्जी) तीला मदत करायला तयार होउन तिला तिचा नवरा रहात असलेल्या एका हॉटेल (?) मध्ये घेऊन जातो. आणि इथून सुरू  होतो एक गुंतागुंतीचा, धक्कादायक, किंचीत वेगवान, रहस्यमय, उत्कंठावर्धक शोधप्रवास…

नॅशनल डेटा सेंटर, कोलकाता इथे  अर्णव एका प्रकल्पावर काम करण्यासाठी लंडंनवरून आलेला असतो. तिथे विद्या त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी जाते. तिथे तिला कळते की अर्णव तिथे आलेलाच नसतो. पण तिथली HR  मॅनेजर तिला सांगते की एक ‘मिलन दामजी’ नावाचा एक कर्मचारी तिच्या नवर्‍यासारखाच दिसणारा होता. ती HR  मॅनेजर त्याची माहिती NDC च्या संगणकावर शोधायचा प्रयत्न करते पण ती फाइल तिला दिसू शकत नाही.  इथे प्रश्न निर्माण होतो की अर्णव खरंच आहे का ? अचानक अर्णव आणि मिलन दामजी असा गुंता झालेला असतो. त्यातच भर म्हणून ‘ईटेलिजंस ब्युरो’, IB,  मिलन दामजीची फाईल कोणीतरी शोधायचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या कथानकात शिरते. एक एजंट, खान (नवाजउद्दीन सिद्दीकी) कोलकात्याला दाखल होतो. तो केसचा ताबा आपल्या हातात घेतो. कथेची गुंतागुंत अजून वाढते, कोण आहे हा मिलन दामजी…

आता एका कॉन्ट्रॅक्ट किलरची एंट्री होऊन त्याला HR  मॅनेजर व इतर ज्यांनी मिलन दामजीला बघितले आहे त्यांना संपवण्याची सुपारी मिळते व तो त्यांना संपवतोही. कथेतल्या एका वळणावर खुद्द विद्याला संपवण्याची त्याला सुपारी मिळते. धक्के वाढतच जाऊन रहस्य अजूनही वाढतच जाते…

शेवटी येतो चित्रपटाचा उत्कर्षबिंदू (Climax), एक धक्का बसून रहस्याचा उलगडा होतो आणि नकळत तोंडून निघून जाते “आईशप्पथ, सही!” आता अर्णव बागची कोण, मिलन दामजी कोण, विद्याचे काय होते, रहस्य काय हे जाणून घ्यायला चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघणे जास्त सयुक्तिक आहे.

अतिशय सशक्त कथा, पटकथा! संपूर्ण चित्रपटभर खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकत आहे सुजॉय घोष ह्यांच्या कथेत. ते पटकथाकार आणि दिग्दर्शकही आहेत ह्या चित्रपटाचे. सर्व बाजू अतिशय कौशल्याने सांभाळल्या आहेत त्यांनी. रहस्यमय चित्रपटात दिग्दर्शन अतिशय महत्वाचे असते. सुजॉय ह्यांनी स्वतः कथा आणि पटकथा लिहीली असल्याने दिग्दर्शनात काय काय करायचे हे त्यांना पक्के ठाऊक होते. कमालीचे दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या घटनांचे तुकडे दाखवून त्यांची एकमेकांत सांगड घालून कथा पुढे नेण्याचे कौशल्य चित्रपटाला तांत्रिकदृष्ट्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठवते. तांत्रिकदृष्ट्या उच्च दिग्दर्शनाला मिळालेली नम्रता राव हयांच्या संकलनाची जोड ही चित्रपटची जमेची बाजू. सेतू (Cinematography) ह्यांनी दुर्गापूजेच्या तयारीत असलेला आणि दूर्गापूजेत रंगलेला कोलकाता आणि त्याची बारकाई व्यवस्थित टिपली आहे. कोलकात्याचे हे दर्शन विलोभनिय  झाले आहे.

चित्रपटात विद्या सोडली तर कोणीही तसे प्रतिथयश कलाकार नाहीत. पण जे जे आहेत त्यांनी समरसून कामं केली आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलरही त्याच्या छोट्याश्या भूमिकेत भाव  खाऊन जातो. नवीनच पोलिस झालेला, हळूवार पोलिस सब इंस्पेक्टर परमब्रत चॅटर्जीने छान रंगवला आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त विद्याचाच आहे असे म्हणता येणार नाही. पण तिने साकरलेली ‘विद्या बागची’ कुठेही ‘विद्या बालन’ होत नाही. ती शेवटपर्यंत तंतोतंत विद्या बागचीच वाटते, इतका सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय केला आहे विद्याने. गरोदर बाईचे अवघडलेपण, नवरा हरवलेल्या बाईची घालमेल अतिशय सहजपणे रंगवलीय तिने.

“हॅ, हिंदी चित्रपटांमध्ये असते काय बघायला?” असे म्हणणार्‍यांनी आवर्जून बघावा अशा ‘कहानी’ची ही गोष्ट!

12 thoughts on “गोष्ट एका ‘कहानी’ची…

 1. झाऽऽऽलं!!! ‍आता तुम्ही एवढं जबरदस्त लिहिल्यानंतर तिथे ननिंच्या धाग्यावर तावातावाने बघणार नाही म्हटलं असलं तरी झकत बघावा लागणार आहे.

  काय आहे काय त्यात एवढं ही उत्सुकता लागून राहिली आहे.

  Like

 2. क्या बात है … साहेब …. एखाद्या पेज३ पत्रकाराला लाजवेल अशी जबरदस्त समीक्षा दिली आहेत. चित्रपटाच्या मूळ सस्पेन्सला हात न लावता वाचकांना चित्रपट बघायला लावण्याचे कसब आपल्या लेखात आहे. मी चित्रपटांचा विशेष भोक्ता नाही …. तरीपण कुतूहल नक्कीच चाळवले आहे.

  Like

 3. जबऱ्या… मला वाटलेलं तुम्ही या चित्रपटावर नक्की लिहिणार….

  एकदम उत्सुकता लागलीय बघायची, पण साला हापिसातून वेळ काढायला जमेना. आता जमवतो लवकरचं 🙂 🙂

  Like

 4. नक्की बघणार आहे हा सिनेमा… त्यात तु्म्ही लिहीलेले परिक्षण वाचून आणिक उत्सूकता वाटतेय !! 🙂

  जमून आलीये पोस्ट….

  Like

 5. मस्त दिसत हा सिनेमा….

  भारतात तसेही “रहस्य” हा विषय उत्तम रीत्या हाताळणारे सिनेमे क्वचितच निघतात….

  ज्वेल थीफ, खामोश आणि खोज (१९८९) हे त्यापैकीच…..

  दो गज जमीन के नीचे , बीस साल बाद , गुमनाम , काली घटा हे बरे होते….

  हा सिनेमा नक्की बघीन…..

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s