वेगळे आवाज

‘ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!’, आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला ‘हे यडं’ म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, ‘वेगळा आवाज’.

तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते. काहीतरी वेगळेपण होते त्या आवाजात. तो आवाज ऐकल्यावर काहीतरी वेगळेच फिलींग यायचे. मंजुळ आवाज ऐकल्यावर जसे ‘अंगावर मोरपीस फिरल्यासारखे’ वाटते त्याप्रमाणेच पण एकदम वेगळेच काहीतरी फिलींग असायचे ते. शब्दात वर्णन करता येणार नाही असे म्हणता येणार नाही कारण माझी एक व्याख्या होती त्या फिलींगचे वर्णन करण्यासाठी. (पण ती अशी जाहिर लिहीण्यासारखी नाहीयेय 1) तर त्या आवाजाच्या मोहात पडल्यामुळे तो आवाज कानावर पडावा म्हणून मी हं च्या मागे फिरायचो. ‘काय मंजुळ आवाज आहे नाही तिचा’, ‘किती बाई तो गोsssड आवाज’, ‘आवाजात काय मार्दव आणून बोलते ती’, ‘लताचा आवाज कसा तर कोकिळेसारखा’ अश्या प्रकारच्या विषेशणांनी सजलेल्या, पुस्तकी व्याख्यांनी केलेल्या स्त्रियांच्या आवाजाचे गुणगान ऐकून आपापली समज बनवलेल्या त्या मित्रांना त्या आवाजातली मादकता कधी कळलीच नाही.

अतिशय मंजुळ  आणि घोगरा ह्या दोन्हीच्या बरोबर मध्ये असणारी आवाजाची एक रेंज आहे जी मला खूप मादक वाटते. त्या आवाजाला एक वेगळाच खर्ज असतो, खोली असते. एक वेगळे Texture असते. तो आवाज ऐकल्यावर लगेच तो आवाज ‘वेगळा आवाज’ आहे ह्याची जाणीव होते. हे असे आवाज ऐकले की एकदम मादक पेय प्यायल्याचा फील येतो आणि जोडीला खुसखुशीत आणि खमंग चकली खाल्ल्याचा आनंद मिळतो.

त्या वेगळ्या आवाजातली मादकता म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्यासाठी काही ‘वेगळे आवाज’ बघूयात (खरंतर ऐकूयात असे म्हणायला हवे). ते आवाज आठवले की मग मला नेमके काय म्हणायचे आहे.. ह्म्म्म.. किंबहुना मला काय एवढे मादक वाटते ते कळेल 🙂

डेमी मूर
हीची आणि माझी भेट घोस्ट ह्या सिनेमात झाली. त्यावेळेच्या वयानुसार जे बघायला सगळेजण इंग्रजी सिनेमे बघत त्यासाठीच हा सिनेमा बघायला गेलो होतो. पण त्यात डेमीचा आवाज ऐकला आणि बास्स! ‘हे यडं’ ह्या माझ्या मित्रांचे माझ्यासाठीचे संबोधन सार्थ ठरले.

त्यानंतर तो सिनेमा ढीगभरवेळा बघितला पण फक्त डेमीच्या आवाजाकरिता, आवाजातला तो मादक वेगळेपणा मला प्रचंड मोहवून टाकतो, आजही. त्यात पुन्हा त्या वेगळ्या आवाजाला सौदर्याची जी जोड आहे तो बोनस 😉

लिलीट दुबे
लिलीटला मी पहिल्यांदा पाहिले किंवा ऐकले गदर सिनेमात. पण त्या सिनेमात सनी देओलचा गदारोळ, आरडाओरडा इतका होता की त्या आवाजात तिचे वेगळेपण दडपून गेले होते पण त्या वेगळेपणाची जाणिव मात्र झाली होती. त्यानंतर झुबेदा पाहिला फक्त तिच्या आवाजासाठी (त्या करिश्मासाठी कोण वेळ फुकट घालवेल).

मग कळले की ती इंग्रजी नाटकातून पण कामे करते. एका मित्राकडे तिच्या नाटकाची सिडी आहे कळल्यावर त्याला अक्षरश: पाणी लावून लावून ती CD त्याच्याकडून घेऊन बघितली. अजुनही ती बर्‍याच सिनेमांतुन तिच्या जादुई आवाजाची भुरळ घालतच आहे.

रानी मुखर्जी
रानी मुखर्जीला खास सावळ्या रुपड्याबरोबर एका खास आवाजाचेही देणं लाभले आहे.

‘राजा की आयेगी बारात’ ह्या तिच्या पहिल्या सिनेमात (हो.. हो… ह्या नावाचा एक सिनेमा आला होता तिचा) तिच्या ह्या खास आवाजाच्या प्रेमात पडलो मी. तीचे कामही खास होते त्या सिनेमात पण अमजद खानच्या मुलाने त्यात अभिनय(?) करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता जो सपशेल अयशस्वी ठरला होता आणि तो सिनेमा डब्यात गेला.

त्यामुळे पुढे गुलाम ह्या सिनेमात तिचा आवाज डब केला गेला. त्यात रानीच्या आवाजाचा चार्म नव्हता. पुढे करन जोहरलाही कुछ कुछ होता है साठी तिचा आवाज डब करण्याची अवदसा सुचली होती पण माझ्या सुदैवाने त्याने तसे केले नाही 🙂

रेखा
हीला ‘लेडी अमिताभ’ म्हटले जाते ते कशामुळेही असो, मी तिला लेडी अमिताभ मानतो ते फक्त तिच्या कमावलेल्या, खर्जातल्या आवाजामुळेच!

अनेक थोराड दक्षिणी अभिनेत्रींच्या गर्दीतली एक अशीच हिची ओळख होती सुरुवातीला. तिने करीयरला आकार येण्यासाठी विनोद मेहेराला हाताशी घरून ठेवले होते पण काही झाले नाही.
पुढे अमिताभच्या ‘परीसस्पर्शाने’ तिच्यात जो अंतर्बाह्य बदल घडून आला, त्यात तिचा आवाजही होता. खास खर्जातल्या कमावलेल्या आवाजासाठी तिने खूप मेहेनत घेतली आणि त्याचे फळ सर्वांनी ऐकलेच. आजही तिच्यासारखा दमदार आणि वेगळा आवाज असणारी तिच्या वयाची अभिनेत्री विरळाच.

तर हे आहेत मला मादक वाटणारे वेगळे आवाज! तुमचेही आवडते असे काही ‘वेगळे आवाज’ असतील तर जरुर कळवा 🙂

1: ईच्छुकांनी ई-मेल द्वारे संपर्क साधावा 😉

सर्च इंजिन – कसे चालते रे भाऊ ?

एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्‍या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला. मग त्याचे आणि माझे ‘गुगल शोध’ बद्दल झालेले बोलणे त्याने माझ्या धाकट्या मुलालाही सांगितले, प्रात्यक्षिकासहित. त्याचे त्यालाही कौतुक वाटून त्याचीही उत्सुकता चाळवली गेली.

‘बाबा, गुगलवर आपण काहीपण शोधू शकतो?’, गाल फुगवून आणि डोळे मोठ्ठे करून धाकट्याने विचारले. मी एकदम टेक सॅव्ही बाप असल्याच्या कौतुकाने त्याला म्हणालो, ‘हो काहीपण, तुला काय शोधायचे ते सांग आपण शोधूया’. एकदम निरागसतेने त्याने विचारले, ‘आई चिडल्यावर कधी-कधी तुम्ही म्हणता ना मला की नविन आई आणूयात! ही नविन आई पण आपण गुगलवर शोधू शकतो का?”. च्यायला, ही आत्ताची लहान पिढी आपलेच दात आपल्या घशात कसे घालील ह्याचा काही नेम नाही. पण वेळ बरी होती, अर्धांग स्वयंपाकघरात गुंतलेले होते. मी लगेच, ‘अरे चला तुम्हाला आइसक्रीम खायचे होते ना, जाऊया’, असे म्हणून वेळ मारून नेण्यासाठी त्यांना घेऊन बाहेर पडलो. आईसक्रीमच्या खुषीत धाकटा त्याचा प्रश्न विसरून गेला. पण मोठ्या मुलाने, गुगलकडे ही सगळी माहिती अशी असते, तो ही सगळी माहिती आपल्याला अशी काय दाखवू शकतो असे ‘समंजस’ प्रश्न विचारले. त्याला समजावून देता देता लक्षात आले की ‘एंटरप्राईज सर्च’ ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे माहिती झालेल्या ह्यातल्या तांत्रिक बाबींची माहिती साध्या आणि सोप्या भाषेत सर्वांनाच करू देता येईल. चला तर मग बघुयात हे सर्च इंजीन कसे काम करते ते…

आजच्या ऑनलाईन जगात इंटरनेट हे माहितीचे भांडार झाले आहे. सर्व लहान मोठ्या कंपन्या त्यांचे ब्रॅन्ड्स, त्यांची उत्पादने आणि सेवा ह्यांच्या माहितीसाठी आणि मार्केटींगसाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करुन त्या भांडारात भर टाकत आहेत. वेब २.० (Web 2.0) मुळे इंटरनेट वाचनीय न रहाता लेखनीयही झाले आहे. लाखो ब्लॉगर्स विवीध विषयांवर लेखन करून त्या भांडाराला दिवसेंदिवस समृद्ध करीत आहेत. ही सर्व माहिती, अफाट पसरलेल्या आणि गहन खोली असलेल्या महासागराप्रमाणे आहे. आता ह्या माहितीच्या अफाट सागरातून आपल्याला हवी असलेली नेमकी माहिती शोधायची म्हणजे अक्षरशः ‘दर्या मे खसखस’ शोधण्यासारखेच आहे. इथेच हे इंटरनेट सर्च इंजीन अल्लादिनच्या जादूच्या दिव्यातील जिनप्रमाणे आपल्या मदतीसाठी पुढे येते.

ही मदत करण्यासाठी इंटरनेट सर्च इंजीन अविरत कार्यरत असते. ह्या कामाची विभागणी खालील तीन मुलभूत प्रकारांत केलेली असते.

माग काढणे
(Web Crawling)
इंटरनेटवरील सर्व वेब पेजेसचा माग काढून, त्यांना भेट देऊन त्यावरील माहिती गोळा करणे
पृथःकरण आणि सूची करणे
(Analysis & Indexing)
गोळा केलेल्या माहितीचे पृथ:करण (Analysis) आणि सुसुत्रीकरण (Alignment) करून त्या माहितीचा जलद शोध घेण्यासाठी सूची (Index) बनवणे
शोध निकाल
(Search Result)
शोध घेणार्‍या इंटरनेट वापरकर्त्यांना (Users) सूची वापरुन योग्य तो शोध निकाल (Search Result) कमीत कमी वेळात दाखवणे

१. Web Crawling (माग काढणे)

आपल्याला हवी असलेली माहिती इंटरनेटवर नेमक्या कोणत्या पानावर आहे हे आपल्याला सांगण्याआधी ते पान इंटरनेट सर्च इंजीनला माहिती असले पाहिजे, हो ना? त्यासाठी सर्च इंजीनला अस्तित्वात असलेल्या सर्व वेब पेजेसचा मागोवा घ्यावा लागतो. रोज भर पडण्यार्‍या ह्या करोडो वेब पेजेसना भेट देऊन त्यांचा मागोवा घेणे हे काही खायचे काम नाही (ह्या खडतर कामाचा आवाका, मुलींचा मागोवा घेत फिरणार्‍यांना नक्की ध्यानात येईल 😉 ). ह्यासाठी सर्च इंजीन्स, सोफ्ट्वेअर रोबोट्स वापरतात ज्यांना ‘स्पायडर (Spider)’ म्हटले जाते. हे स्पायडर्स अक्षरशः इंटरनेटभर सरपटत जाउन ही माहिती गोळा करतात म्हणून ह्या प्रक्रियेला Web Crawling म्हणतात. ही प्रक्रिया पुनरावर्तन (Recursion) प्रक्रिया असते म्हणजे सुरुवातीच्या, पहिल्या पानावर असलेल्या सर्व लिंक्स गोळा केल्या जातात आणि मग त्या प्रत्येक लि़कला भेट देऊन पुन्हा त्या पानावरच्या सर्व लि़क गोळा करून त्या प्रत्येक लिंकला भेट देत ह्याची आवर्तने होत राहतात.

आता कळीचा मुद्दा हा आहे की ह्या प्रत्येक पानाला भेट दिल्यावर काय माहिती गोळा केली जाते? प्रामुख्याने सर्व स्पायडर्स ‘मजकूर स्वरूपातली (Text)’ माहिती गोळा करतात. प्रत्येक सर्च इंजीन्सची आपापली विशीष्ट अशी अल्गोरिदम्स असतात ही माहिती गोळा करण्यासाठी. पण प्रामुख्याने वेब पेजचे टायटल, मेटा टॅग्स, हेडर टॅग्स, चित्रांना दिलेला मजकूर (Alt tag) ह्यांत असलेल्या Text ला जास्त वेटेज दिले जाते. कारण हा मजकूर त्या वेब पेजला ‘डिफाईन’ करत असतो. त्यानंतर Body tag मधला मजकूर गोळा केला जातो.

काही वेब साइट्सना काही पेजेसचा मागोवा घेऊ द्यायचा नसतो. अशा वेळी ह्या साइट्स Robots.txt नावाची फाईल त्यांच्या साइट्वर ठेवतात. ही फाइल म्हणजे स्पायडर्स आणि वेब साइट ह्यांच्यामधला करार (Robots Exclusion Protocol) असतो. ज्या वेब पेजेसना ह्या स्पायडर्सनी भेट देऊ नये असे ठरवले असते त्या वेब पेजेसची नावे (लिंक्स) ह्या फाइलमध्ये लिहीलेली असतात. स्पायडर्स Crawling किंवा पुनरावर्तन चालू करायच्या आधि ही फाइल वाचून त्याप्रमाणे लिंक्स मागोवा घेताना गाळतात.

२. Analysis & Indexing (पृथ:करण आणी सूचीकरण)

ही सगळी ‘मजकुर (Text)’ माहिती गोळा करून सर्च इंजिन्स त्यांच्या जवळ ठेवत नाहीत. त्या माहितीचे पृथःकरण करून त्यातली शोध घेण्याच्या कामी येणारी माहितीच फक्त वापरली जाते. पण हे पृथःकरण असते तरी काय?

पृथ:करण
ह्यात प्रथम जी माहिती गोळा केली आहे ती कोणत्या भाषेतली आहे ते तपसले जाते. त्या भाषेच्या अनुषंगाने पृथ:करण कार्यवाहक (Analysers) वापरले जातात. एकदा भाषा कळली की मग त्या Text चे प्रसामान्यीकरण (Normalization) केले जाते. ह्यासाठी वापरली जाणारी प्रोसेस ‘Stemming किंवा Lemmatization’ म्हणून ओळखली जाते. ह्यात शब्दांची विवीध रूपे (धातूसाधित रूपे) त्यांच्या मूळ (धातू) प्रकारात आणली जातात. ह्म्म.. जरा बोजड झाले ना, वोक्के, उदाहरण बघू म्हणजे समजेल.

car, cars, car’s, cars’ ह्याचे मूळ रूप car हे घेतले जाते. त्यामुळे जेव्हा ‘car’ हा शब्द सर्च टर्म म्हणून वापरला जाईल तेव्हा car चे कोणतेही रुप असलेली वेब पेजेस शोधली जातील.

अजून एक उदाहरण बघुयात,
“the boy’s cars are different colors” वे वाक्य “the boy car differ color” असे Normalize केले जाईल. हे फक्त वानगीदाखल आहे. प्रत्यक्षात बरीच वेगवेगळी अल्गोरिदम्स वापरली जातात आणि ही प्रोसेस खुपच क्लिष्ट आहे.

सूचीकरण
आता ह्या नॉर्मलाईझ केलेल्या शब्दांच्या मूळ रुपांना (धातूंना) सूचीबद्ध केले जाते. ही सूची (फक्त समजण्यासाठी) पुस्तकाच्या शेवटी जी सूची (Index) असते, म्हणजे शब्दांची यादी आणि तो शब्द पुस्तकात कोण-कोणत्या पानांवर आलेला आहे ते पृष्ठ क्रमांक, साधारण तशीच, त्या प्रकारची एक सूची असते.

सर्च इंजीनच्या सूचीत नॉर्मलाईझ केलेले शब्दांचे मूळ रूप आणि ते कोण कोणत्या वेब पेजेस वर आले आहे त्यांची यादी असते. हेही फक्त वानगीदाखल आहे. हे सूचीकरण हा तर सर्च इंजीनचा आत्मा असतो आणि ते त्यांचे व्यावसायिक सिक्रेट असते. ह्या सूचीवरच सर्व डोलारा उभा असतो. ह्या सूचीला तांत्रिक भाषेत ‘Inverted index‘ म्हणतात.

ह्या सूचीत तो शब्द त्या वेब पेज वर किती वेळा आला आहे, कुठे आला आहे, कुठल्या महत्वाच्या टॅग्स मध्ये आला आहे अशी विवीध माहिती असते. ह्या सूचीची रचना, सर्च इंजीन शोध निकाल किती जलद देऊ शकत ह्यासाठी फारच महत्वाची असते.

३. Search Result (शोध निकाल)

जेव्हा शोधकर्ता काही शोधण्यासाठी इंटरनेट सर्च इंजीन वापरतो तेव्हा जे शोधायचेय त्याच्यापेक्षा भलतीच काही वेब पेजेस शोध निकालात दिसली तर शोधकर्ता पुन्हा ते सर्च इंजीन वापरणारच नाही आणि तो असंतुष्ट वापरकर्ता (unsatisfied user) म्हणून गणला जाईल आणि असे unsatisfied user असणे सर्च इंजीनला परवडणार नाही (धंदा बसेल हो दुसरे काय, छ्या! मराठी माणसाला धंदा आणि तो बसला असे काही सांगितल्याशिवाय चटकन कळतच नाही). त्यासाठी शोध निकालातली अन्वर्थकता किंवा समर्पकता (relevance) फार महत्वाची असते. सर्च इंजीन्सच्या ह्या relevance चे मूल्यमापन Precision (अचूकता) आणि Recall (?) ह्यांनी केले जाते. ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक असतात.

Precision (अचूकता): म्हणजे सर्च टर्म नुसार शोध निकालात न दाखवायची वेब पेजेस गाळण्याची (Filter) अचूकता
Recall (?): म्हणजे सर्च टर्म नुसार शोध निकालात दाखवायची वेब पेजेस निवडण्याची अचूकता

आज सर्च इंजीनचे जवळजवळ ८०-८३% मार्केट काबीज करून त्यावर मोनोपॉली असलेल्या गुगलच्या यशाचे ‘relevance’ हेच मूळ आहे. लॅरी आणि सर्जी ह्या जोडगोळीच्या ‘पेजरॅन्क (PageRank)’ अल्गोरिदम वर गुगलचा डोलारा उभा आहे. गंमत म्हणजे एकेकाळी त्यांना आणि त्यांच्या ह्याच अल्गोरिदमला कोणीही हिंग लावूनही विचारत नव्हते. शेवटी कंटाळून त्यांनी स्वतःची कंपनी चालू करायचा निर्णय घेतला. 🙂

या खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एकंदरीत सर्च इंजीन चालते, बरं का रे भाऊ!

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अ‍ॅट बीच

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्‍यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्‍याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.

मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा ‘उतारा’ म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. 🙂

प्रकार मलिबू कोकोनट रम आणि आल्मन्ड (बदाम) लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
मलिबू कोकोनट रम 1.5 औस (45 मिली)
अमारेतो लिक्युअर (Amaretto Liqueur) 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
संत्र्याचा रस
बर्फ
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.

आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, ‘सनराइज’चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.

चला तर मग, अ डे अ‍ॅट बीच तयार आहे. 🙂

आर्थिक वैर्‍याची रात्र आली आहे का ?

आजच्या अर्थ विषयक बातम्यांनुसार जागतिक चलन बाजारात रुपयाची किंमत ढासळून प्रति डॉलरला ५४-५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. १ जानेवारी २०११ रोजी प्रति डॉलर ४४.६७ वर असलेला रुपया आज डॉलरमागे ५४-५५ अशा किमतीवर घोटाळातो आहे.

आर्थिक महासत्तेची स्वप्ने बघणार्‍या जनतेला त्या स्वनात राहू देण्याचे कौशल्य असलेल्या अर्थ मंत्रालयाला आता त्यांचे खरे कौशल्य दाखवायची वेळ आली आहे. प्रत्येक अरिष्टामागे परकीय शक्तींचा हात आहे अशी ओरड करायची सत्ताधार्‍यांची सवय असतेच त्यात त्यांना आता युरोपियन युनियच्या आर्थिक मंदीचे आणि ग्रीसच्या आर्थिक बट्ट्याबोळाचे कोलित हातात मिळालेच आहे. पण आता स्वप्नातुन जागे होउन आर्थिक घडी नीट करायची वेळ आली आहे असे वाटते.

सध्या तरी प्रणब मुखर्जींनी दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे पण त्यांनीही ग्रीसचेच तुणतुणे वाजवले आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाला आता सजग होऊन भरीव काहीतरी करायची गरज निर्माण झाली आहे. रुपयाच्या ह्या घसरगुंडीमुळे होणार्‍या आयात निर्यात तुटीचा राक्षस आता आ वासून उभा राहिल. तसेच परकिय गुंतवणुकीचा ओघ कायम राखणेही जरूरीचे ठरेल. अन्यथा हगल्या पादल्याचे निमीत्त होउन गडगडणार्‍या शेयर बाजारातही उलथापालथ होऊन गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाला आता आर्थिक शिस्त पाळून पुढची पावले उचलावी लागतील.

पण मला वाटते तशी खरोखरच आर्थिक वैर्‍याची रात्र आली आहे का? तुम्हाला काय वाटते?

कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग २)

मागच्या भागात आपण कॉफीच्या फळापर्यंत येऊन थांबलो होतो. आज बघुयात ह्या फळ अवस्थेत असलेली ही कॉफी आपल्या कपापर्यंत पोहोचण्यापुर्वी कोणकोणत्या प्रक्रियेतुन जाते ते.

कॉफीसाठी कॉफीची बी महत्वाची असते, कॉफीच्या फळाचा गर हा काही कामाचा नसतो. त्याला कामापुरता मामा करून ही, ‘आतल्या गाठीची’ कॉफीची बी, त्याच्या आत सुरक्षित राहते. कॉफीचे फळ पिकल्यावर ते झाडावरून काढले जाते. हे झाडावरून काढायच्या (खुडणी) दोन पद्धती आहेत हे मागच्या भागात ओझरते आले होते. आता जरा तपशीलवार बघुयात काय आहेत ह्या पद्धती.

१. यांत्रिक खुडणी
मोठ्या मोठ्या शेतांमधून कॉफीच्या फळांना काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो. ह्या प्रकारामध्ये थेट, फळ असलेली फांदी तोडली जाते. निवडक फळांची खुडणी ह्या पद्धतीत शक्य नसते.

२. मनुष्यबळ वापरून केलेली खुडणी
ह्यामध्ये खुडणी कामगारांकडून कॉफीची फळे झाडावरून हातांनी खुडली जातात. खुडणी कामगार साधारण दर १०-१५ दिवसांनी शेतात फिरून पिकलेली निवडक कॉफीची फळे खुडून घेतात. हे काम फारच कष्टाचे असते पण अरेबिका सारख्या अत्त्युच्य दर्जाच्या कॉफीच्या फळांना खुडण्यासाठी हीच पद्धत वापरतात.

आता ही फळे खुडल्यावर, बी फळातुन काढण्यात येते. ही बी फळातुन काढण्याच्याही विशिष्ट पध्दती आहेत. कॉफीची चव आणि दर्जा हा, ह्या पद्धतींवर मोठ्या प्रमाणावर अबलंबून असतो. जर तुम्हाला एखाद्या वेळी कॉफी आवडली नसेल तर कदाचित ही पद्धत त्याला कारणीभूत असु शकेल.  चला मग बघुयात या पद्धती.

१. कोरडी पद्धत (Dry Processing)
ह्या पद्धतीत कॉफीची फळे सौर उर्जेचा वापर करून सुकवली जातात. उन्हामध्ये फळ सुकवण्याची ही पद्धत फार जुनी आहे. ह्या सौर उर्जेमुळे कॉफीच्या बी मध्ये टार्टचे (कडसरपणा) प्रमाण वाढते आणि तीच्यात येतो, एका अल्लड तरूणीचा अवखळपणा तर लग्नाच्या बायकोचा अनियमीतपणा. थोडक्यात, चव एकदम बहारदार होते. 😉
ह्या पद्घतीत फळे सर्वसकट सुकवत ठेवली जात नाहीत. खराब फळे काढून टाकून, चांगली फळे निवडून ती सुकवली जातात. ह्या साठीही मनुष्यबळ वापरले जाते.

२. ओली पद्धत (Wet Processing)
ह्या पद्धतीत फळे पाण्याच्या मोठया पात्रात टाकतात. पिकलेली टपोरी फळे जड असल्याने खाली तळाशी जाउन बसतात. अपक्व आणि खराब फळे पाण्यावर तरंगतात. तरंगणारी फळे काढुन टाकली जातात व त्यानंतर ही तळाशी बसलेली फळे वापरून त्यांचा गर मशिन वापरून काढला जातो. मशिन मधून काढल्यानंतरही हा गर पूर्णपणे जात नाही. त्यामुळे पुढे सुक्ष्मजंतू वापरून उरलेला गर आंबवला जातो. त्यानंतर जोरदार पाण्याच्या फवार्‍याने हा  उरलेला गर काढून टाकला जतो. (ह्या प्रकारात पाण्याचा अपव्य खुप होतो आणि ते वापरून उरलेले पाणी प्रदुषित असते). पुढे मग ही बी मशिनेमध्येच सुकवली जाते.

ह्या ओल्या किंवा सुक्या, कोणत्याही पद्धातीने काढलेली बी अशी असते.

त्या बी वर अजुनही सिल्वर स्किन आणि पार्चमेंट ही दोन आवरणे असतात त्यामुळे ह्या बीला अजुनही बर्‍याच प्रकियांमधून जायचे असते. मिल मध्ये त्या बीवरचे पार्चमेंट काढले जाते. त्यानंतर पॉलिशकरून सिल्वर स्किन काढली जाते. शेवटी सर्व प्रक्रियेनंतर बी ही अशी हिरवी दिसते.

पण ही प्रक्रिया केलेली हिरवी बी, कॉफी बनवण्यासाठी वापरत नाहीत. त्यासाठी त्या हिरव्या बीला भाजले जाते. ही प्रक्रिया (भाजणे, Roasting) अतिशय महत्वाची असते. ही हिरवी बी भाजली जाताना ह्या बी वरचा पाण्याचा अंश निघून जातो. बीच्या अंतर्भागात असलेला ओलावा (Moisture) हा तापमानामुळे प्रसरण पावतो आणि एक हलकासा स्फोट होऊन तो कॉफीच्या बीला तडे बहाल करतो. ह्या प्रक्रियेत बीचा रंग करडा होतो जो त्या बीमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स जळले जाऊन त्यांचे caramalization (मराठी शब्द ?) झाल्यामुळे येतो. अशी ही भाजलेली बी ब्रु करण्यासाठी तयार होते.

भाजण्याच्या वेगवेगळ्या तापमानानुसार ह्या करड्या रंगाचे वेगवेगळे पोत कॉफीच्या बीला मिळतात. फक्त पोतच नाही तर वैशिष्ट्यपूर्ण चवही 🙂

(सर्व चित्रे आंजावरून साभार)

(क्रमशः)

एक किस्सा – दगड आणि खड्डे

तसा मी ‘कॉलेज’ (रूढार्थाने) जिवनाचा फार काही उपभोग खर्‍या अर्थाने घेउ शकलो नाही, पॉलीटेक्नीक मध्ये शिकलो मी. आमची शाळा तांत्रिक शाळा असल्यामुळे, शाळेच्या अलिखित परंपरेप्रमाणे १०वी नंतर डिप्लोमाला, भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला, अ‍ॅडमिशन घेतली… घेतली म्हणजे मिळाली. हे पॉलीटेक्निक मुंबैच्या टॉप ३ पॉलीटेक्निक मध्ये मोडत असल्यामुळे व्यवस्थापन त्याच्या ‘प्रतिमे’साठी फार जागरूक होते. त्यामुळे नियम फारच कडक होते. कॅन्टीनमध्ये सिग्रेटी फुंकायला मनाई होती. तसेच नविन वर्ष चालू झाले की सगळे HOD कॅम्पसमध्ये फिरत असायचे, रॅगिंग होऊ नये म्हणून. असे बरेच काही कडक वातावरण. बाकीच्या नियमांचे मला काही देणे घेणे नव्हते फक्त ते सिग्रेटी कॅन्टीनमध्ये फुंकायला बंदी हे जरा जाचक होते. सिनेमात बघितल्याप्रमाणे कॉलेजात जाऊन काहीतरी ‘वेगळे’ असे करायचे ह्या स्वप्नाला तडा बसला.

‘गरज ही शोधाची जननी असते’ असे कायसे म्हणतात त्याप्रमाणे शोध घेतला, नव्हे घ्यावाच लागला, तेव्हा कळले की पॉलीटेक्निकच्या कूपर हॉस्पीटलच्या बाजूला एक बस स्टॉप होता. जुना असल्याने त्यावर बसेस थांबायच्या नाहीत (तसेच होते का नक्की ते आठवत नाही आता). पण हा बस स्टॉप भागुबाईच्या विद्यार्थ्यांचा सिग्रेटी फुंकायचा अड्डा होता. त्याचा शोध लागल्यावर अ‍ॅडमिशन मिळाल्यावर जितक आनंद झाला होता त्याच्या कैक पटीने जास्त आनंद झाला. तिथे बरेच मित्र भेटले नव्या ओळखी झाल्या. पण जास्त करून मी नेहमी मेकॅनिकलच्या कार्ट्यांबरोबर तिथे पडीक असायचो त्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या सोकॉल्ड स्कॉलर्ससाठी सिग्रेटी फुंकणे म्हणजे “तोबा तोबा” असे होते. मी डिजीटल इलेक्ट्रॉनिक्सला असूनही माझे मेकॅनिकलचे खुप मित्र होते त्यामुळे मी जगन्मित्र आहे असा माझा गोड समज (?) झाला होता. पण तो समज गैर-समज होता हे लवकरच माझ्या लक्षात आले. मेकॅनिकलला मुलींचा दुष्काळ असतो. त्यामुळे ते सगळे वखवखलेले आत्मे असल्याने, हरामखोरांनी, मला आमच्या वर्गातल्या मुलींचा इंट्रो करून घेण्यासाठी मित्र बनवले होते. असो, पण नंतर दारू आणि सिग्रेट्मुळे त्या मैत्रीला गहिरे रंग आले आणि त्याकडे दुर्लक्ष केले हा भाग अलहिदा. पण बरेच दिवस पोपट झाल्याची भावना मन पोखरून काढायची.

त्या ग्रुपमध्ये एक महान अवलिया कार्टे होते, समीर. कुशाग्र बुद्धीमता (इलेक्ट्रॉनिक्सला अ‍ॅडमिशन मिळत असतानाही आवडीमुळे मेकॅनिकलला गेलेला), अफाट वाचन, तरल विनोदबुद्धी, चेन स्मोकर, पिण्यातला दर्दी हे सगळे गुण एकाच ठिकाणी एकवटलेला असा हा जीव तब्बेतीनेही मजबूत होता. दिसायलाही देखणाच होता, इतका की ‘माझ्याशी मैत्री करणार का’ असे कुणालाही विचारल्यास नकार येणे शक्यच नाही. पण तो त्याबाबतीत तेवढा एकदम सज्जन होता. पण आमच्याबरोबर बस स्टॉपवर बसून मुलींची थट्टा करण्यात सामील असायचाच किंबहूना त्याच्या तरल विनोदबुद्धीने तो जे काही पंचेस मारायचा त्याने तो आमचा अघोषित नायक असायचा. तसाही तो आमचा सिनीयर होताच. आमच्यापेक्षा एका वर्षाने मोठा होता.

आमच्या थर्ड इयरला केमिकलला अ‍ॅडमिशन मिळालेल्या मुलींची संख्या खुप जास्त होती आणि त्यांच्यातही ‘सुंदर’ असणार्‍या मुलींची संख्या खुपच जास्त होती. मे़कॅनिकलच्या सर्व ‘दुष्काळग्रस्तां’च्या आनंदाला पारावार रहिला नाही. काहीतरी ऐतिहासिक कारणामुळे मेकॅनिकलची मुले आणि केमिकलच्या मुली ह्यांचे परंपरागत वैर होते. एकदम ३६ चा आकडा. त्यामुळे त्या परंपरेला जागून मे़कॅनिकलवाल्या मुलांनी त्या मुलींची सर्व बित्तंबातमी, माहिती काढायला सुरुवात केली. भागुबाईला रॅगिंग करणे / होणे शक्यच नव्हते त्यामुळे बस स्टॉपवर त्या मुली यायची वाट बघायची आणि मग काढलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर कमेंट्स करायच्या ह्यावर आम्ही रॅगिंगची, दुधाची तहान ताकावर भागवायची असा प्लान ठरला.

केमीकलला, एक आम्हाला सिनीयर असणारी (समीरच्याच बॅचची) सौदर्याची खाण, नमिता त्या वर्षीची रोज क्वीन होती. भागुबाईला शेवटच्या वर्षातले विद्यार्थी हे नविन अ‍ॅडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. (मुलांसाठी अ‍ॅक्चुली तो राजकारणाचा भाग असतो, इलेक्शनला नविन मुले आपल्या बाजूला वळवण्यासाठी). नमिताने त्या नविन अ‍ॅडमिशन झालेल्या सौदर्यवतींचा ताबा घेतला तिच्या अधिकारात आणि त्यांना सगळे कॅम्पस फिरवून दाखवयला निघाली. मार्गावर सगळीकडे हे मे़कॅनिकलचे दुष्काळग्रस्त टोळक्याने उभे होतेच. मीही मजा बघत समीरच्या ग्रुपबरोबर उभा होतो. नमिता आणि तीच्या बरोबरीच्या सौदर्यवतींचा घोळका आमच्यापुढून जाताना कोणीतरी काहीतरी कमेंट मारली. मला काहीही कळले नाही. नमिता मग समीरला उद्देशून काहीतरी खरमरीत बोलली आणि तडाक्यात तिथून त्या मुलींना टाकून निघून गेली. मला तर काय झाले कळायला मार्गच नव्हता. जरा चौकशी केल्यावर कळले की नमिताने सेकंड ईयरला समीरला प्रपोज केले होते आणि समीर नाही म्हणाला होता. तेव्हापासून समीरचा, काहीतरी खरमरीत बोलून, पाणउतारा करायची संधी नमिता सोडत नसे. समीरच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि तिच्या आर्थिक स्तरात खुपच तफावत होती आणि त्याच्या घरी ती सुखी होऊ शकली नसती. समीर ज्या पातळीवरून विचार करत होता त्या पातळीवर विचार करणे नमिताला शक्यंच नव्हते, त्यामुळे ती त्या नकाराला अपमान समजत होती. कुठेही समीरचा अपमान करायची संधी सोडत नसायची.

दुसर्‍या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर ‘हर फिक्र को धुए मे उडां’ असे करत बसलो होतो. तेवढ्यात नमिता आणि सौदर्यवतींचा घोळका नेमका तिथुन पास होत होता. भर दुपारी एवढ्या टोळक्यांच्या तावडीत सापडण्यापेक्षा परत जावे असा विचार करून त्या सर्वजणी नमिताच्या आदेशानुसार परत जायला वळल्या. तेवढ्यात ते बघून समीर चालू झाला ‘बेकरार करके हमे यु न जाईये, आपको हमारी कसम लौट आईये’. सगळी कार्टी लगेच गळे काढून नरडी घासू लागले. त्याने नमिता चवताळली आणि परत फिरली.

त्यावेळी बस स्टॉपच्या समोरच्या रस्त्याचे काम चालू होते. मोठ्या मोठ्या दगडांचा रस्त्यावर ढीग पडला होता. नमिता आमच्या समोर आल्यावर थांबली, एक खुन्नस भरी नजर समीरला देउन मुलींना म्हणाली, “हे सगळे दगड आहेत नां दगड रस्त्यावरचे, तसेच दगड भागुबाईत पण आहेत, तेही असेच रस्त्यावर पडलेले असतात. सगळ्या मोठ्या मोठ्या दगडांना फोडून फोडून बारीक केले पाहिजे.” अग्ग बाब्ब्बौ! आम्ही सगळे समीरकडे मोठ्या आशेने बघू लागलो. त्यानेही लगेच आमच्या विश्वासाला सार्थ केले…

त्याने आमच्याकडे बघून डोळा मारला आणि नमिताकडे बघून म्हणाला, “दगड लहान असोत वा मोठे , शेवटी खड्डे भरायला दगडच लागतात!”. कोणालाच सुरुवातीला काही कळले नाही. पण मग जेव्हा त्याच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात आला तेव्हा जो काही गोंगाट आम्ही सर्वांनी केला त्याला तोड नव्हती. नमिता आणि तिच्या बरोबरच्या सगळ्याजणींचे चेहरे पहाण्यासारखे झाले होते, मान खाली घालून निमुटपणे त्यांनी तिथुन काढता पाय घेतला.

🙂

सत्यमेव जयते

भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट ‘थीम्ड टॉक शो’ असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो  ‘मि. परेफेक्ट’ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे.

आजचा विषय होता “स्त्री भ्रूण हत्या”. आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.

आता बर्‍याच जणांना ‘ह्यात काय’ नविन?’ असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.

मला तरी असे वाटते आहे,  तुम्हाला काय वाटते?

कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १)

हजारों वर्षांपूर्वीची एक दुपार, इथियोपियाच्या वाळवंटी प्रदेशातील एका झुडपाळ भागात एक मेंढपाळ त्याच्या शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन गेला होता. त्या दुपारी त्याच्या असे लक्षात आले की १-२ शेळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच ‘लाडात’ येऊन उड्या मारत आहेत. त्याने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळाने त्याच्या असे लक्षात आले की आणखीन बर्‍याच शेळ्या लाडात येऊन उड्या मारू लागल्या आहेत. तो जरा चकितच झाला आणि त्या ज्या झुडुपांमध्ये चरत होत्या तिकडे गेला. त्या शेळ्या त्या झुडुपाची लाल बोरं किंवा बोरांसारखी छोटी छोटी फळे खात आहेत असे त्याला दिसले. इतके दिवस तो, ती फळे बघत होता, पण त्याने ती फळे खायचा कधी विचार केला नव्हता. त्याच्या लगेच लक्षात आले की ही फळे खाल्ल्यामुळेच बहुदा ह्या शेळ्या लाडात आल्या आहेत. त्यानेही लगेच ती फळे खाउन बघितली आणि अहो आश्चर्यम! त्यालाही एकदम उत्तेजित झाल्यासारखे वाटून ‘लाडात’ यावेसे वाटले. पण त्याचे घर दूर असल्यामुळे त्याने त्या उर्जितावस्थेत फक्त नाच करण्यावरच समाधान मानून घेतले. 😉

संध्याकाळी गावात परत गेल्यावर त्याने त्या गावातल्या मुल्लाला हा प्रकार सांगीतला. मुल्ला जरा चौकस होता; त्याने त्या फळांवर जरा संशोधन केले. शेवटी त्या फळाला उकळवून बनलेले पेय प्यायल्यावर येणार्‍या उत्तेजित अवस्थेमुळे, भल्या पहाटेच्या प्रार्थनेला नेहमी येणारी झोपेची पेंग येत नाही आणि प्रार्थना मनःपूर्वक करता येते हे त्याच्या लक्षात आले. लगेच त्याने त्या भागातल्या मौलवींना ते पेय प्यायला दिले. सर्वांनी त्याचा परिणाम बघून त्या पेयाला प्यायची मान्यता दिली, हो… हो, तुमच्या मनात आले तसेच, ‘फतवा’ काढला. 🙂

मग हळूहळू ह्या मौलवींकडून ह्या पेयाचा प्रवास सुरू झाला. ते सर्वात आधी येमेन आणि इजिप्त ह्या अरबस्तानच्या बाजूच्या देशांमध्ये थडकले. तिथे मान्यता पावल्यावर ते हळूहळू मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांमध्ये परिचीत होऊन लोकप्रिय झाले. तो पर्यंत वेगवेगळ्या देशात ह्याला वेगवेगळ्या नावानी संबोधले जायचे. अरब राष्ट्रांमध्ये, अरबीमध्ये, ह्या पेयाला काहवा, ‘बीयांची वाइन’, असे म्हटले जाउ लागले. अरब देशांतुन तुर्कस्तानात पोहोचल्यावर त्या काहवाचे काहवे नामकरण झाले. तुर्कस्तानातून ह्याचा प्रवास झाला इटलीमध्ये आणि मग इटलीतून पूर्ण युरोपभर झाला. पुढे डचांनी काहवेचे नामकरण कोफी असे (koffie) केले. त्यानंतर इंग्रजांनी त्या कोफीचे कॉफी (Coffee) असे केलेले नामकरण आजतागायत टिकून आहे. डचांनी ह्या कोफीला दक्षिण अमरिकेत नेऊन रूजवले तर ब्रिटीशांनी त्यांच्या वसाहतींमध्ये. असा हा कॉफीचा अद्भुतरम्य प्रवास इथियोपियापासून सुरू होऊन, आता माझ्या हातातल्या वाफाळत्या कॉफीच्या कपात येऊन पोहोचला आहे. 🙂

मला खरंतर कॉफीची एवढी चाहत नव्हती. कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे (इन्स्टंट, फिल्टर, लाटे, मोका, जावा, कप्युचिनो ई.) बावचळून जायला व्हायचे. त्यात स्टारबक्स किंवा सीसीडी सारख्या उच्चभ्रू ठिकाणच्या त्या कॉफीच्या किमतीमुळे म्हणा किंवा तिथे जाउन काय ऑर्डर करायचे हे न कळल्यामुळे म्हणा, कधी कॉफीच्या वाटेला गेलो नाही. पण आता चेन्नैला यायच्या आधि माझे एक मित्र, विवेक मोडक, यांच्याबरोबर एक ‘बैठक’ झाली होती. त्यांनी चेन्नैमध्ये मिळणार्‍या फिल्टर कॉफीसारखी फिल्टर कॉफी पूर्ण भारतात कुठेही मिळत नाही तेव्हा आवर्जून टेस्ट कर असे बजावले होते. नवनविन काहीतरी टेस्ट करायला आणि रसग्रंथींना वेगवेगळ्या चवींनी समृद्ध करण्यावर माझा भर असल्यामुळे इथे फिल्टर कॉफी ट्राय केली. त्यानंतर माझा एक तमिळ मित्र, आनंद वेंकटेश्वरन, ह्याने त्याच्या घरी गेल्यावर ‘इंस्टन्ट’ कॉफी पाजली. तीही फिल्टर कॉफी इतकीच चवदार होती. त्यानंतर मी कॉफीच्या प्रेमात पडलो आणि वेगवेगळ्या तमिळ हॉटेलातली कॉफी ट्राय करण्याचा छंदच जडला. इंस्टन्ट कॉफी आणि फिल्टर कॉफी मधला फरक कळण्या इतपत रसग्रंथी तयार झाल्या. पण मग चौकस बुद्धीला (?) प्रश्न पडू लागले की नेमके हे कॉफीचे प्रकार काय आहेत, काय फरक आहे त्यांच्यात? मग थोडा शोध घेणे सुरू केले…

चला तर मग, ह्या नमनानंतर बघूयात गाथा कॉफीची!

कॉफीची व्यावसायिक लागवड करण्यासाठी लागते कसदार जमीन, उबदार हवामान, भरपूर पाऊस आणि दमट व ढगाळ वातावरण. ह्या सर्व पोषक गोष्टी विषुववृत्ताच्या साधारण २०-२५ डीग्री वर-खाली उपलब्ध असतात, त्यामुळे बाजुच्या चित्रात दाखवलेल्या प्र-देशांत कॉफी तयार केली जाते.
जगात दरवर्षी साधारण ५,०००,००० टन कॉफी तयार केली जाते आणि ह्यात सिंहाचा वाटा एकट्या ब्राझीलचा असतो. त्या खालोखाल कोलंबियाचा नंबर लागतो. भारताचाही नंबर टॉप १० देशांमध्ये येतो. भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये कॉफीची लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते.

कॉफीच्या बर्‍याच प्रजाती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढतात. पण व्यावसायिकरित्या लागवड केल्या जाणार्‍या आणि प्यायल्या जाणार्‍या मुख्य प्रजाती दोनच.

१. अरेबिका (Arabica)
२. रोबस्ता (Robusta)

अरेबिका
रोबस्ता
ही कॉफी, उच्च दर्जाची कॉफी समजली जाते. कॉफीत असलेला मादक घटक ‘कॅफीन’, ह्याचे प्रमाण ह्या कॉफीत कमी असते (रोबस्ताच्या मानाने).
अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण स्व-परागीकरण (Self Pollination) प्रकाराने होते.
रोबस्ता ही प्रजात कॉफीच्या झाडावर पडणार्‍या रोगावर प्रतिकार करण्यास अरेबिकापेक्षा जास्त सक्षम असते.
अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण पर-परागीकरण (Cross Pollination) प्रकाराने होते.
बहुतेक कॅन्ड आणि इंस्टंट कॉफी बनवण्याकरिता अरेबिका आणि रोबस्ता ह्यांचा ब्लेंड वापरला जातो.

कॉफीची हिरवी फळे लाल झाल्यावर, म्हणजेच पिकल्यावर कॉफीच्या सुगीचा हंगाम सुरु होतो. ही लाल झालेली फळे यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यांकरवी झाडांवरून काढली जातात. अर्थातच माणसांकडून काढले गेलेल्या पद्धतीत अफाट श्रम लागत असल्यामुळे (त्याने कॉफीच्या फळांना कमी क्षती पोहोचते) त्या कॉफीचा भाव हा चढा असतो.

कॉफीचे पिकलेले फळ :

(सर्व चित्रे आंजावरून साभार)

(क्रमशः)