काही ‘जपानी’ अनुभव


जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.

अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य.

माझ्या पहिल्या दौर्‍यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्‍या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो… हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्‍यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव…

एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्‍या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. ‘काम चालू रस्ता बंद’ अशी पाटी न लागता ‘तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल क्षमस्व’ असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने बघायला लागला व म्हणाला, ‘अरे त्या दोन कर्मचार्‍यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?’

बर्‍याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते.

ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव…

एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्‍याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्‍यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, ‘सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?’ आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा… अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. ‘एक मिनीट’, म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्‍याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्‍यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, ‘तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते’. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये!

एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, ‘त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?’

ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला.

ह्या दुसर्‍या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. 🙂

9 thoughts on “काही ‘जपानी’ अनुभव

 1. आपले लेख वाचनिय आणि सहज-सुंदर असतात यात काहि शंका नाही..
  जपान आणि जपानी लोकांबद्दल आदर असलेल्यांपैकी मी एक. म्हणून मला माझा एक अनुभव इथे नमुद करावासा वाट्तोय…माझा छोटा तेव्हा 2 वर्षाचा होता आणि तो घरिच असायचा म्हंजे आम्ही त्याला शाळेत नव्हते घातले.. मोठा मात्र तिथल्या शाळेत जायचा..

  एका दुपारी मोठा शाळेतून यायच्या तासभर आधि मी छोट्याला घेऊन जवळच असलेल्या किराणा दुकानात जाण्यासाठी घरातून निघाले..खाली आल्यावर माझ्या छोट्याला पार्कमधेच खेळायचे होते..दुपारची
  वेळ असल्यामुळे पार्कमधे दोन जपानी छोट्या मुलीन(6-7वर्षाच्या असतील) व्यतिरिक्त कोणी नव्हते.मला
  वेळ नसल्यामुले(मोठा शाळेतून परत यायच्या आत परतायचे होते) मी त्याला पार्क मधे ठेवून दुकानात गेले पण थोड्याच वेळात पाउस पडायला लागला म्हणून मी गडबडीत दुकानातून बाहेर निघाली.

  इकडे पार्कमधे पाऊस येउ लागल्यावर त्या दोन मुली घरी न जाता, रडणार्या माझ्या छोट्याचा हात पकडून दुकानाच्या दिशेने येत असलेल्या मला दिसल्या.मला पहाताच त्याचा हात सोडून त्या झाडामागे लपून त्याला माझ्यापर्यंत पोचेपर्यंत पाहात रहिल्या..मी छोट्याला विचारल्यास त्याने फक्त झाडाकडे बोट दाखवले. मी तिकडे पाहिले तेव्हा फक्त गोड हसून त्या त्यांच्या घरी निघून गेल्या.

  खरेच,मदत करनारी जपानी मोठी माणसे तर खूप भेटली परंतु त्या छोट्या अनोळखी जपानी मुली माझ्या कायम लक्षात राहिल्या..

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s