चावडीवरच्या गप्पा


‘हा चक्क अन्याय आहे’, सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधीच हजर होते.

‘काय झाले?’, कोणीतरी विचारले.

‘अरे त्या बिचार्‍या संगमांना राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले’, नारूतात्या.
(हा नारुतात्यांच्या नातवाने आणलेले स्टीव्ह जॉबचे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच वाचल्याचा परिणाम होता.)

‘कोssण हा शिंचा संगमाsss’, घारुअण्णा अस्लखित चिपळुणी अंदाजात विचारते झाले.

‘हाच तर प्रॉब्लेम आहे, इथे उपेक्षितांवर अन्यात होत असताना, उपेक्षित कोण हेच माहिती नसणे हा बहुजनांवरचा अन्याय पुरातन आहे’, इति कट्ट्याचे बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

‘साहेबांशी घेतलास पंगा, भोग म्हणावे आता आपल्या कर्माची फळे’, शामराव बारामतीकरांनी साहेबांच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा व्यक्त केली.

‘अरे काय तुमचे साहेब, ज्याच्या मांडीला मांडी लावून नव्या पक्षाची स्थापना केली साधी त्याच्या मनातली ईच्छा समजू नये त्यांना?’ नारुतात्यांनी त्यांचा मूळ मुद्दा पुन्हा हिरिरीने मांडला.

‘महत्वाकांक्षा सर्वांनाच असते हो, पण ती साहेबांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणे म्हणजे साक्षात आत्महत्याच हो, दालमिया आठवतोय का?’, शामराव बारामतीकर.

‘अहो कोण हा संगमा, कर्तुत्व काय ह्याचे?’, घारुअण्णांचे पालुपद.

‘अहो प्रखर राष्ट्रवाद दाखवून सोनियाला विरोध करून तिला पंतप्रधान होऊ दिले नाही हे कर्तुत्व काय कमी आहे का?’, भुजबळकाका.

‘त्यात त्याचे कसले आलेय कर्तुत्व? तिचा काय जीव वर आला होता! तसेही काही न करता पैसा ओरपायला मिळणार, सत्ता तशीही ताब्यात, कशाला व्हायचे पंतप्रधान!’, घारुअण्णांचे तर्कशास्त्र.

‘झाले ह्यांचे सुरु, अहो मुद्दा काय, तुम्ही बरळताय काय? विषय आहे सगमांचा’, नारुतात्या.

‘अरे! पण त्या शिंच्याला राष्ट्रपती व्ह्यायची खाजच का म्हणतो मी?’, घारुअण्णा.

‘सोनियाच्या विरूद्ध लढायला सगळेच उतरले पण त्यांना फक्त कपडे सांभाळावे लागले. अहो साहेबांना त्यांनी पक्ष काढायला मदत केली पण मलई सगळी साहेबांनी खाल्ली.
हेच खरे दु:ख दुसरे काय! त्यात आता प्रतिभाताईंच्या जगप्रवासाच्या खर्चाचे आकडे प्रसिद्ध झाले आणि फिरले डोळे त्याचे. हाय काय आन नाय काय.

चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?’, इतकावेळ शांत बसलेले सोकाजीनाना.

‘अहो पण राष्ट्रपती होऊन परदेशी व्यक्तींना देशात कोणतेही पद भुषबता येऊ नये असा वटहुकुम जारी करायचा छुपा हेतु असेल त्यांचा’, घारु अण्णांचा स्वन्पाळु आशावाद.

‘घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही!

उगाच नाही अब्दुल कलामांनी नकार दिला पुन्हा राष्ट्रपती होण्याला, एवढा मोठा, सर्वोच्च मान कोणी असा सुखासुखी सोडेल काय?
तेव्हा ह्या फुकाच्या बातां सोडा आणि चहा ऑर्डर करा! चला!!’, इति सोकाजीनाना!

ह्याला सर्वांनी दुजोरा दिला आणि चहाची ऑर्डर दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s