चावडीवरच्या गप्पा – ‘टोल’वाटोलवी

अरे, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली.

“काय झाले?”, कोणीतरी विचारले.

“काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता.

“चला! म्हणजे भैय्यांचा मुंबैतला प्रॉब्लेम संपला म्हणायचा, सगळ्या भैय्यांना महाराष्ट्रियन बाप्तिस्मा देऊन झाला बुवा एकदाचा, हुश्श”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तर तर, महाराष्ट्रभर सगळ्या दुकानांच्या पाट्यांचे मराठीकरणही करून झाले की”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“ह्या… ह्या… असल्या खेकडी वृत्तीनेच आपण आपले नुकसान करून घेतो आहोत. अरे, टोल नाक्यांवर प्रचंड गैरव्यवहार होत असून टोल वसुलीमध्ये कोणताही पारदर्शकता नाहीयेय. इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला?”, घारूअण्णा आवेगात विचारते झाले. त्यांचे अंग आवेशाने किंचीत कंप पावत होते.

“ह्म्म्म…पारदर्शकताsss”, भुजबळकाकांचा उपरोध.

“तुम्ही नुसते उसासेच टाकत बसा. बघा बघा, त्या राजने टोलनाक्यांवर मनसेच्या सैनिकांना सलग चौदा दिवस पाहाणी करायला लावून किती वाहने येतात व टोल भरतात याची नोंद करायला लावली. त्याशिवाय शासकीय स्तरावरही माहिती गोळा करायला लावली. ह्याला म्हणतात जनतेचा कैवारी!”, घारूअण्णा त्याच आवेगात आणि आवेशात.

“सैनिकsss, कैवारीsss, ऐकतोय, ऐकतोय, चालू द्या”, भुजबळकाकाही त्याच उपरोधात.

“काय? चालू द्या काय? त्या टोलच्या बदल्यात जनतेला नेमक्या काय सुविधा मिळतात हे जोपर्यंत सरकार स्पष्ट करत नाही तसेच त्यात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत जनतेने टोल भरू नये असे आवाहन करण्यात गैर काय आहे? बोला ना बोला”, घारुअण्णा.

“इतक्या दिवसांनी बरी जाग आली”, शामराव बारामतीकर.

“अरे, जाग आली तर खरी. नाहीतर आम जनतेची लुबाडणूक चालूच आहे राजरोस, तुमच्या साहेबांची तर फूसच असणार त्याला, बसलेत दिल्लीवर आणि लक्ष राज्यावर”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“साहेबांना मध्ये घेण्याचे काम नाही, त्यांना असल्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालायला वेळ नाही”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“हो ना, त्यांचे निष्ठावंत आहेतच की ती काळजी घ्यायला, त्यांना काळजी आता फक्त नंबर दोनचे स्थान मिळवण्याची, एक नंबर काही नशिबात नाही ह्याची खात्री झालीच आहे आता”, घारुअण्णा. “आम्हाला सरकारबरोबर कुठलाही संघर्ष नको. परंतु बळजबरी झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल! असे उघड बोलायला निधडी छाती लागते. स्वार्थासाठी पाठीमागून दगाबाजी करणार्‍यांतना काय समजणार हे”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका”, शामराव बारामतीकर.

“खरंय, घारुअण्णा, मुळ विषयाला बगल देऊ नका”, सोकाजीनाना न राहवून.

“काय, काय बगल देतोय मी?”, घारुअण्णा प्रश्नार्थक चेहेरा करून.

“तुम्ही मगाशी काय म्हणालात? इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला? हाच खरा कळीचा मुद्दा आहे”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“म्हणजे, काय म्हणायचंय तुम्हाला?”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“अरे, सोपे आहे, हे सगळे बेरजेचे आणि पैशाचेच राजकारण आहे. एवढा अमाप पैसा गोळा होतो आहे टोल नाक्यावर. सेनेच्या सत्तेच्या काळातच त्याचा अंदाज सगळ्यांना आला होता. आता कदाचित ठेकेदार कंपन्यांवर कंट्रोल राहिला नसेल, टक्केवारी मिळत नसेल. ह्या एकढ्या मोठ्या टोलरूपी जमणार्‍या निधीच्या डबोल्यावर सर्वांचेच लक्ष असणारच, थोडाफार हिस्सा सर्वांनाच मिळायला नको का? पक्ष चालवायचे, सैनिक संभाळायचे, पोसायचे म्हणजे पैसा सगळ्यांनाच लागणार नाही का. थोडे दिवस थांबा! बेरजेचे राजकारण झाले, खोक्यांचा व्यवहार सेटल झाला की हाच टोल समाजसुधारणेसाठी कसा आवश्यक आहे ह्याचे धडे कृष्णकुंज मधून ऐकू येतील”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, भुजबळकाका आणि तुम्हीही बारामतीकर, तुमचे बुड कधी लाल डब्याच्या सरकारी गाडीखेरीज इतर कुठल्या गाडीला लागले आहे का? आँ? अहो ते टोल भरणारे सर्वसामान्य, आम जनता नसतात हो आपल्यासारखे. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून चहा मागवला.

पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ?

नुकताच व्यवस्थापकीय प्रशिक्षणाचा, कंपनीने आखलेला (कंपनीचे पैसे खर्च करून) ‘उद्याचे नेतृत्व (Tomorrows Leadership)’ हा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. फारच माहितीवर्धक आणि ज्ञानप्रबोधक असा अभ्यासक्रम होता. एकंदरीत कंपनीतील बर्‍याच नवीनं सहकार्‍यांची भेट होऊन त्यानिमीत्ताने नवीनं मित्र झाले आणि ‘नेटवर्किंग’ ह्या कॉर्पोरेट जगतातील एका पर्वाला सुरुवात झाली. असो मुद्दा तो नाही.

ह्या अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे एखाद्याचे ‘Organizational Behavior’ ओळखणे. त्यातून त्याचा ‘नेतृत्वगुण गुणांक’ आणि ‘नेतृत्वशैली’ पडताळणे. त्यासाठी त्या प्रशिक्षण देणार्‍या कंपनीने एक ‘डिस्क (DISC) प्रोफाइल’ नावाची एक प्रश्नमंजूषा असलेली संगणकप्रणाली तयार केली होती. त्या संगणकप्रणालीत, काम करताना, कामाच्या ठिकाणी उद्भवणार्या वेगेवेगळ्या परिस्थिती, त्यावेळी उद्भवणारे कलह व ते हाताळण्याची पद्धत, कंपनीतील सहकार्‍यांशी आणि सीनियर मॅनेजर्स बरोबर केली जाणारी आपली वागणूक अश्या बर्‍याच विषयांवर, त्या त्या परिस्थितीत तुम्ही आहात असे समजून आणि त्यावेळी कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्याची उत्तरे त्या प्रश्नमंजुषेत द्यायची होती. ही प्रश्नमंजूषा ऑब्जेक्टीव्ह प्रकाराची होती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्यासाठी प्रत्येकी फक्त एक पर्याय सिलेक्ट करायचा. हा, थांबा, तुम्हाला वाटते तेवढी ती प्रश्नमंजूषा सोपी अजिबात नव्हती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये एक अतिशय थिन लाइन होती. उत्तरे द्यायची अट एकच होती, नैसर्गिकरीत्या जसे वागाल तसाच विचार करून पर्याय निवडायचे, तार्किकदृष्ट्या समर्पक उत्तर काय असेल ते विचार करून पर्याय निवडायचा नाही. पण ते पर्याय असे खत्रुड होते की नैसर्गिक उबळ येऊनच पर्याय निवडला जायचा. खूप विचारपूर्वक ती प्रश्नमंजूषा तयार केल्याचे जाणवत होते. त्यामुळे मग जरा सीरियस होऊन उत्तरे दिली. त्यानंतर १-२ दिवसांनी त्याचा निकाल लागून प्रत्येकाचे डिस्क (DISC) प्रोफाइल कळणार होते. D – Dominance, I – Influence, S – Steadiness आणि C – Conscientiousness ह्यावर आधारित ते प्रोफाइल असणार होते.

त्या निकालाचे एक ईमेल १-२ दिवसांनी आले, पण मुख्य कामात व्यस्त असल्याने त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. प्रशिक्षणाच्या पुढच्या कार्यशाळेत गेल्यावर सर्वांची चर्चा चालू होती आपापल्या डिस्क प्रोफाइलवर. एक नवीनच झालेला बंगाली मित्र, पार्था, एकदम उत्साहात माझ्याजवळ आला आणि माझे प्रोफाइल काय आले ते विचारू लागला. माझी एकदम फाफलली कारण मी ते मेल बघितलेच नव्हते. त्याला तसे सांगितल्यावर, “अरे, मेल चेक कर ना बाबा” असे म्हणत माझ्या मागेच उभा राहिला. माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने तो माझे प्रोफाइल बघण्यासाठी का बरे उतावीळ झाला आहे ते मला कळेना. त्याला तसे विचारल्यावर एकदम जोरात म्हणाला, “अनबिलीव्हेबल! स्साला, उस प्रोफाइल मे एकदम कुंडली लिखा है यार हर एक का”. च्यायला, हे बंगाली सगळेच काळ्या जादूच्या प्रभावाखाली असतात की काय असा विचार चमकून गेला आणि त्यावर हसत हसत मी माझे प्रोफाइल उघडले आणि माझी मतीच गुंग झाली. अगदी आरशात प्रतिबिंब दाखवावे तसे त्या प्रोफाइलमध्ये माझे सर्व ‘गुण’ उधळलेले होते. माझी निर्णयक्षमता, नेतृत्वशैली, वागणूक, conflict management style, pressure handling capacity अशा अनेक पैलूंवर प्रत्येकी अर्धे पान असे विवेचन होते. अगदी कुंडलीत जसे ग्रहमान मांडलेले असते अगदी तसेच, वेगवेगळ्या आलेखांसकट, तंतोतंत खरे. मी चाटच पडलो. त्या प्रशिक्षण देणार्‍या बाबाला (हो, त्याला आता ‘बाबा’ म्हणणेच भाग होते) पकडून हे असे कसे काय होऊ शकते ते विचारले. त्याने मग वेगवेगळे १५-२० डिस्क पॅटर्न्स आहेत आणि आम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे (ठराविक निर्णयक्षमतेमुळे) आम्ही कोणत्या पॅटर्न्स मध्ये मोडतो ते ठरवले जाते असे सांगितले. हे सर्व मी अतिशय सोप्या भाषेत आता इथे सांगतोय प्रत्यक्षात त्याने खूपच क्लिष्ट आणि तांत्रिक भाषेत ते समजावून सांगितले. पण मुख्य गाभा हाच की ‘पॅटर्न्स’.

ती कार्यशाळा संपल्यावर बसने घरी येता येता ह्या पॅटर्न्स वर विचार करायला वेळ मिळाला. प्रत्येक क्षेत्रात हे पॅटर्न्स असतात. स्थापत्यशास्त्रात आर्किटेक्चरशी निगडित अनेक पॅटर्न्स आहेत त्यांच्याद्वारे मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती बांधताना त्यांची फार मदत होते. संगणक प्रणाली तयार करताना ‘पॅटर्न्स’ हा एक बझवर्ड झालेला आहे. डिझाइन पॅटर्न्स, सॉफ्टवेअर अर्किटेक्चरल पॅटर्न्स, UI पॅटर्न्स असे शेकड्याने पॅटर्न्स आहेत. तर हे पॅटर्न्स म्हणजे काय? तर आमच्या संगणक क्षेत्रात त्याला ‘In software engineering, a design pattern is a general reusable solution to a commonly occurring problem within a given context’ असे म्हटले जाते. तर विकिपीडियानुसार पॅटर्न म्हणजे, Pattern is a type of theme of recurring events or objects. The elements of a pattern repeat in a predictable manner. Patterns can be based on a template or model which generates pattern elements, especially if the elements have enough in common for the underlying pattern to be inferred, in which case the things are said to exhibit the unique pattern.

मग अचानक मनामध्ये एक विचार चमकला की जर सर्व क्षेत्रात ह्या पॅटर्न्स नुसार प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स शोधता येऊ शकतात तर आपल्या पूर्वजांनी ह्याच पॅटर्न्स च्या आधारे ज्योतिषशास्त्र विकसित केले नसेल कशावरून? म्हणजे बघा. आपली प्राचीन संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. आणि त्या काळात खगोलशास्त्रही विकसित झालेले होते. मानवाला मी कोण? आणि माझे ह्या ब्रह्मांडाशी नाते काय? हे प्रश्न पडून त्याचे उत्तरे मिळवणे त्या काळापासूनच चालू झालेले आहे. अवकाशाचे, तार्‍यांचे, ग्रहांचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेणे त्यावेळेपासूनच सुरू झाले असणार. त्या ओघातच पुढे वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थिती आणि त्याचे मानवजातींवर होणारे परिणाम यांच्याही नोंदी ठेवणे सुरू झाले असावे. आता ह्या नोंदी घेणे आणि जपून ठेवणे वर्षानुवर्षे (शेकडो) चालले असणार. त्यामुळे त्यातले पॅटर्न्स ओळखणे कठीण नाही. मग पुढे त्या पॅटर्न्स च्या नोंदी घेणे चालू होऊन त्यांतूनच पुढे ठोकताळे बांधणार्‍या होराशास्त्राचा जन्म झाला असावा. पुढे ह्या नोंदींचे प्रमाण वाढले जाऊन आणि त्यानुसार बांधण्यात आलेले होरे खरे होण्याचे प्रमाण वाढून त्यांतूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला असावा का?

त्याही पुढे, सर्व विश्वाची उत्पत्ती ही ‘बिग बॅंग’ ने झाली. त्यापासूनच हे चराचर निर्माण झाले. सर्व विश्व एका अनामिक शक्तीने एकत्र बांधलेले आहे. एक विशिष्ट परस्परसंबंध आणि एक तोल आहे ह्या सर्व ग्रह-तार्‍यांचा एकमेकांबरोबर. ते एकमेकांवर परिणाम करू शकतात. मग आपणही ह्याच ‘बिग बॅंग’ ची निर्मिती आहोत तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम होणे का शक्य नाही? किंवा जो एक ताळमेळ ह्या ग्रह-तार्‍यांचा एकमेकांशी आहे आणि त्यामुळे हा विश्वाचा डोलारा उभा आहे, आपणही का त्याचा भाग नाही? किंवा त्या ताळमेळाशी आपला का संबंध असू नये?

जर ज्योतिषशास्त्राकडे, पॅटर्न्स आणि आपणही ह्या ‘बिग बॅंग’ ची निर्मिती आणि पर्यायाने ब्रह्मांडाचा एक पूरक भाग ह्या अँगलने जर बघितले तर ज्योतिषशास्त्र फक्त एक थोतांड आहे ‘न मानण्यास’ वाव असू शकतो. मी काही ह्या विषयातला जाणकार नाही. काहीतरी विचार मनात आले, जे विस्कळीत असण्याची शक्यताच जास्त आहे. पण जाणकारांनी ह्यावर आपापली मते व्यक्त केली तर चर्चा घडून ज्ञानात भर पडावी हाच हेतू आहे ह्या लेखामागे.

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. खास करून, मिसळपाव.कॉम ह्या संस्थळावर ‘कोणाचा रे तू’ ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे ‘आरक्षण’ ह्या मुद्द्यावर येऊन थडकली. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळ्या उदाहरणांचे दाखले दिले गेले. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काही जणांनी ‘जात नाही ती जात’ असे म्हणून ह्या चर्चेची बोळवण केली तर बर्‍याच जणांनी हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या सर्व गदारोळात ह्या प्रश्नाचे मूळ न समजून घेताच सद्य परिस्थितीला समस्यांचा उहापोह जास्त होता.

अस्पृश्यता, तिच्या पर्यायाने आलेले जातिनिहाय आरक्षण आणि आजची सद्य परिस्थिती, ह्याची सुरुवात, पुण्यात, येरवडा कारागृहात, ज्या दिवशी (24 सप्टेंबर 1932) ‘पुणे करार’ ठरला आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीँनी त्यावर सह्या केल्या, त्या दिवसापासून झाली. जरी अस्पृश्यता त्याआधी हजारो वर्षाँपासून अस्तित्वात होती तरीही त्यामुळे होणारी समस्या ही पुणे करारापासूनच झाली. कारण त्या दिवसापर्यंत अस्पृश्यांचे ‘मानवीय अस्तित्व’च कोणाच्या खिजगणतीत नव्हते. तेव्हा ती एक समस्या फक्त अस्पृश्यांपुरतीच मर्यादित होती आणि त्यांना काही समस्या असू शकतात हेच कोणाच्या गावी नव्हते. अस्पृश्यांच्या नशिबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे वादळ त्यांच्या जीवनात आले आणि त्या महामानवाने त्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. ‘भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, पण आमच्या अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याचे काय?’ हा प्रश्न त्यांनी भारतीय स्पृश्य समाजाला विचारला. पण जरी ते विद्वान असले तरीही ते शेवटी अस्पृश्यच होते त्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आंदोलनाचा बडगाच उचलावा लागला. जर अस्पृश्यांना खर्‍या अर्थाने स्वतंत्र व्ह्यायचे असेल (जन्माने येणार्‍या अस्पृश्यतेच्या जोखडातून) तर त्यांना सत्तेत सहभागी व्हावेच लागेल, त्याशिवाय खर्‍या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य मिळू शकणार नाही. त्याचबरोबर अस्पृश्यांना विद्यार्जनासाठी असलेली आडकाठी दूर केली जाऊन त्यांचा विद्यार्जनाचा मार्गही खुला व्हावा जेणेकरून ते सत्तेत सहभागी होण्यास समर्थ होतील येवढीच त्यांची प्रामाणिक आणि कळकळीची मागणी होती. पण रूढ अर्थाने त्या काळी स्पृश्यांच्या राज्यात असे होणे शक्यच नव्हते, म्हणून त्यांनी अस्पृश्य अल्पसंख्याक आहेत असे म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र (विभक्त) मतदार संघाची मागणी केली.

पण त्यांची वेळ चुकली, कारण नेमका त्याचवेळी एक ‘महात्मा’ अस्पृश्यांना ‘हरिजन’ असे लेबल देऊन, त्यांचा उद्धार (?) करण्याचे आंदोलन करीत होता. आपल्या मार्गात आता एक ‘पर्याय’ निर्माण होऊन आंदोलनाचे आपले कार्य मातीमोल होऊन, त्याचे सर्व श्रेय त्या ‘पर्याया’ला मिळणार असे दिसताच त्या महात्माच्या आत दडलेला ‘बनिया राजकारणी’ जागा झाला. त्याने लगेच स्वतंत्र (विभक्त) मतदार संघाची मागणी म्हणजे ‘हिंदूंच्या अंतर्गत एकात्मकतेला’ धोका असा बागूलबुबा उभा केला. पण आंबेडकर त्याने काही बधेनात हे लक्षात येताच त्या महात्म्याने आपले, ठेवणीतले, उपोषणाचे ‘ब्रह्मास्त्र’ बाहेर काढले. हा त्याने डॉ. आंबेडकरांना दिलेला शह चेकमेट ठरला आणि त्याची परिणिती ‘पुणे करार’ अशी झाली. त्या करारानुसार मग अस्पृश्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आणि विद्यार्जनाचा मार्ग खुला होण्यासाठी काही जागा आरक्षित करण्याचे ठरले. अशा प्रकारे आरक्षणाची सुरुवात झाली. खुद्द आंबेडकरांनाही हे आरक्षण जन्म-जन्मांतराकरिता नको होते, त्यांनाही, एकदा का सत्तेत सहभागी होऊन आणि विद्या मिळवून अस्पृश्य मूळ प्रवाहात सामील (स्पृश्य) झाले की टप्प्या-टप्प्याने हे आरक्षण हटवले जाणेच अपेक्षित होते.

1947 साली ‘भारत देश’ ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला पण ‘भारतीय जनता’ पारतंत्र्यातच होती. त्यांचा नवीनं स्वामी होता सत्तेला चटावलेले राजकारणी. त्या काळी देश अनेक समस्यांनी गांजलेला होता पण सत्तालोलुप राजकारण्यांना कसलाही विधिनिषेध न बाळगता सत्ता हस्तगत करणे महत्त्वाचे वाटू लागले. त्यांतूनच मग व्होट बँकेचा शोध लागला. मग ती व्होट बँक जपण्याकरिता जातीय अस्मितेचा सहारा घेण्यात आला. त्यासाठी हे आरक्षण कळीचा मुद्दा बनले. बस्स! इथे खरी समस्या सुरू झाली. ज्याकरिता आंबेडकरांनी हा अट्टहास केला होता त्यालाच हरताळ फासला गेला आणि आरक्षण ही एक शिवी बनून, तिचा हा हा म्हणता एक अक्राळविक्राळ राक्षस तयार केला गेला, फक्त आणि फक्त राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी.

आता समस्या माहिती आहे, समस्येचे मूळही माहिती झाले आहे मग त्या समस्येचे निराकरण का होत नाहीयेय किंबहुना होऊ शकत नाहीयेय?

ह्याचे मूळ दडले आहे आपल्या भारतीयांच्या मानसिकतेत. हजारो वर्षाँची वर्णाधारित जातीय उतरंड आपल्या रक्तात भिनली आहे. त्या उतरंडीमुळे आपल्यात आलेली उच्च नीचतेची भावना निघून जाणे फार कठिण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. पण ते एका रात्रीत होणे शक्य नाही. त्यासाठी एका फार मोठ्या सामाजिक आणि मानसिक उत्क्रांतीची गरज आहे. त्याला वेळ लागेल. मी आशावादी आहे, कदाचित पुढच्या 2-3 पिढ्यांमध्ये ह्या समस्येचे निराकरण पूर्णपणे होईल असा मला विश्वास वाटतो. पशूचा माणूस व्हायला हजारोँ वर्षे लागली होती, पण इथे आपल्याला फक्त Human being वरून Being Human व्हायचे आहे त्यामुळे 2-3 पिढ्यांमध्ये ते शक्य व्हावे; आपण फक्त आपल्या मुलांना ह्या जातींच्या भिंतींपासून दूर ठेवले, त्यांना उच्च-नीच, जात-पात ह्या समजापासूनच मुक्त ठेवले की आपण आपला खारीचा वाटा उचलल्यासारखे आहे. तोच वारसा आपली मुलेही पुढे चालवतील. एवढे तर आपण खचितच करू शकतो. (चर्चा झोडण्यापेक्षा हे जास्त सोपे आहे, नाही?)

मला हा विश्वास वाटण्याचे अजून कारण म्हणजे, सध्याचे युग हे ‘ज्ञानाचे अधिष्ठान’ असलेले, तंत्रज्ञानाचे, स्पर्धात्मक युग आहे. खुल्या अर्थव्यवस्थांमुळे जागतिक सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. ‘हे विश्वची माझे घरं’ हे देखिल खरे झालेले आहे. त्यामुळे ह्यापुढे, ह्या स्पर्धात्मक युगात फक्त आणि फक्त गुणवत्तेचा कस लागणार आहे. ही गुणवत्ता नैसर्गिक देणगी असते, ती निसर्गाकडून ‘जात’ हा निकष न लागता मिळालेली असते.

माझा ह्या खुल्या अर्थव्यवस्थेवर आणि स्पर्धात्मक युगावर विश्वास आहे आणि त्यामुळेच, ह्या जातींच्या आणि पर्यायाने आरक्षणासारख्या समस्यांच्या विळख्यातून, आपण आपला खारीचा वाटा उचलला तर नक्कीच बाहेर पडू, ह्यावर माझा दृढ विश्वास आहे. माझी वाट बघायची तयारी आहे कारण माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे त्यांनी न खाता मी खाल्लेले आहेत ह्या सत्याची मला जाणीव आहे.

कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “वॉटर्मेलन मोहितो

पार्श्वभूमी:

मला मनापासून आवडणारे एक रसाळ फळ म्हणजे कलिंगड. भरपूर पाणी असलेले हे रसरशीत फळ त्याच्या लाल रंगामुळे आणी हिरव्या आवरणामुळे कापल्यावर खुपच आकर्षक दिसते. कलिंगडाचे काप, त्यातल्या बिया अलगद तोंडातल्या तोंडात वेगळ्या करून खाण्यात जी मजा आहे तेवढीच मजा कलिंगडाचा रसही पिण्यात आहे. जर हा रस मजा देऊ शकतो तर मग त्याचे कॉकटेलही बहार आणणारच असा विचार येणे सहाजिकच आहे 🙂

तर आजचे कॉकटेल आहे ‘वॉटर्मेलन मोहितो’, क्लासिक मोहितोला दिलेला कलिंगडाचा फ्लेवर.  

प्रकार व्हाइट रम आणि पुदिना बेस्ड (मोहितो)
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
मोसंबी रस किंवा लेमन स्क्वॅश १.५ औस (४५ मिली)
कलिंगडाचा रस (प्युरी) २ औस (६० मिली)
ग्रेनेडाइन १० मिली
सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर १५ मिली
पुदिना ७-८ पाने
बर्फ
मडलर
बार स्पून
ग्लास कॉलिन्स

कृती:

सर्वप्रथम कलिंगडाचे काप करून मिक्सर किंवा ब्लेंडरमधून साधारण ६० मिली होईल इतका रस काढून घ्या.  त्यानंतर कलिंगडाचे ३-४ छोटे छोटे तुकडे आणि पुदिनाची ३-४ पाने कॉलिन्स ग्लास मध्ये टाकून मडलरच्या सहाय्याने चेचून घ्या. त्याने पुदिनीच्या पानांमधले तेल (Oils) आणि कलिंगडाचा ताजा रस सुटा होऊन ते कॉकटेलला तजेलदार बनवेल.

आता ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यात रम आणि मोसंबीचा रस किंवा लेमन स्क्वॅश टाका.

कलिंगडाच्या ताज्या रसामुळे रमला एक मस्त गुलाबी छटा येईल आणि ती तशीच गट्टम करून टाकावीशी वाटेल, पण जरा कळ सोसा. सब्र का कॉकटेल बढिया होता है| 🙂  आता त्यात कलिंगडाचा रस ओतून घ्या मस्त लाल रंग येईल आता मिश्रणाला.

त्यावर आता ग्रेनेडाईन ओता. मिश्रण एकदम लालेलाल होऊन जाईल. बार स्पून वापरून मस्त ढवळून घ्या.

थोडासा सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर टाकून ग्लास टॉप अप करा. सजावटीसाठी पुदिन्याची काही पाने व कलिंगडाचा एक काप ग्लासाच्या कडेला लावा.

चला तर, लालचुटुक वॉटर्मेलन मोहितो तयार आहे 🙂

आभार प्रकटन

ह्या महिन्यात ‘मनातले जनांत, ब्रिजेश उवाच’ हा ब्लॉग सुरू करून एक वर्ष झाले. अगदी आनंददायी काळ होता हा.

या निमीत्ताने ब्लॉगवर धावत्या भेटी देणार्‍यांचे, नियमित वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे मनापासून आभार मानतो. आपण लिहीलेले कुणीतरी वाचते आहे ही भावनाच मोठी उत्साह आणि हुरुप वाढविणारी असते. तुमच्या सर्वांच्या वाचकरुपी सहभागामुळेच मनात रुंजी घालणारे काहीबाही लिहायला धजलो आणि त्यात मजा येत गेली.

माझी लिहीण्याची सुरुवात मिसळपाव.कॉम ह्या मराठी संस्थळावरून झाली. तिथे बर्‍याच सभासदांच्या उर्फ मिपाकरांच्या प्रतिसादात्मक प्रोत्साहनामुळे ब्लॉग लिहीण्याचे ठरवले. तिथल्या वाचकांचेही ह्या निमीत्ताने आभार मानतो.

Last but not the least, मिसळपाव वरील माझे मित्र श्रियुत श्रावण मोडक यांचे आभार न मानता हे आभार प्रकटन संपविणे अशक्य आहे,  अगदी ‘मुश्कील ही नही नमुमकीन भी है’  ह्या धर्तीवर.  मला ‘मदिरा/कॉकटेल’ ह्या विषयावर लिहीण्यास उद्युक्त करण्यामागे त्यांचा फार मोठा हात आहे. माझ्याकडे ह्या विषयावर लिहीण्यासारखी एक शैली आहे हे त्यांनीच मला जाणवून दिले व ती जोपासण्याचे प्रोत्साहन ते वेळोवेळी देत असतातच. तर श्रामो, मनापासून आभार!

सर्वांचे पुन्हा मनापसून आभार!