कॉकटेल लाउंज : बॉईलरमेकर (BoilerMaker)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बॉईलरमेकर (BoilerMaker)”

पार्श्वभूमी:

अगदी सुरुवातीला जेव्हा ‘फक्त चढवण्यासाठी’ पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे ‘पिण्यावर’ मर्यादा यायची (खरेतर हे ‘खिशाला न परवणारे असल्यामुळे’ असे असयला हवे 😀 ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम ‘स्वस्तात मस्त’ होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच… रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला… 😉

आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!

प्रकार बियर कॉकटेल
साहित्य
कॅनेडियन राय व्हिस्की
(पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल)
1 औस (30 मिली)
बियर 1 टिन
ग्लास बियर ग्लास आणि शॉट ग्लास

कृती:

ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या.

आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा ‘डुब्बुक’ असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य…

आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा.

चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे 🙂

मुरुड (जंजिरा) आणि पालीचा गणपती

बर्‍याच दिवसांची सुट्टी मिळवण्यात चक्क यशस्वी झालो आणि एका आठवडाभराची सुट्टी घेऊन पुण्याला आलो. चेन्नैच्या उष्णदमट हवामानाला भयंकर वैतागलो असल्यामुळे पुण्यात आल्यावर ढगाळ आणि थंड वातावरणात एकदम दिल खुष झाला. कुठेतरी जवळच्याच शांत समुद्रकिनारी मुक्कामी जाऊन आराम करायचा बेत होता, जास्त ड्राइव्ह करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या मुरुड-जंजिरा येथे जायचा प्लान बनवला.

मागे एकदा मित्रांबरोबर मुरुड-जंजिरा, व्हाया अलिबाग, केले होते. त्यावेळी अलिबागला हॉटेल पतंग मध्ये भयंकर टेस्टी मासे खाल्ले होते, खासकरून ‘तिसर्‍या मसाला’. तिथे बायको मुलांबरोबर एकदा हादडायला जायचे हे मागेच ठरवलेले होते. त्यामुळे ह्यावेळी अलिबागला जेवण करून मुरुड-जंजिर्‍याला पोहोचायचे असे ठरवून पुण्यातून सकाळी सात वाजता निघालो. खंडाळ्याला पोहोचलो तेव्हा पाऊसाची एक सर येऊन गेली होती, सगळीकडे धुके पसरून वातावरण एकदम रोमॅन्टीक झाले होते. गाडी कोपर्‍यात लावून फोटो काढायचा मोह टाळता आलाच नाही.

त्यानंतर पेणपासून पुढे रस्ता दुतर्फा हिरव्यागार गर्द, घनदाट झाडांनी सौंदर्यबद्ध केला होता.

अलिबागला वेळेवर पोहोचलो पण ह्यावेळी हॉटेल पतंगमध्ये एकदम भ्रमनिरास झाला. तिसर्‍या नव्हत्या आणि पापलेट चक्क शिळे होते. त्यामुळे तिथे काही फोटो काढले नाही. पण अलिबागवरून निघून मुरुड जंजिर्‍याच्या रस्त्याला लागल्यावर मुलाने कॅमेरा ताब्यात घेऊन त्याची फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.

दुपारी साधारण दोन अडीचच्या सुमारास मुरुडला गोल्डन स्वान बीच रिसॉर्टला पोहोचलो.

आता गेलो आणि हसूच आले. ‘गोल्डन स्वान’ हे नाव, ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ ह्या म्हणीला सार्थ करीत होते. स्वान्स ऐवजी बदके बागडत होती सगळीकडे, तीही चक्क पांढरी. 🙂

पण रिसॉर्ट एकदम झॅक आहे. स्वच्छ, सुंदर आणि आटोपशीर.

रुममध्ये जाऊन एक डुलकी काढली. उठल्यावर एकदम फ्रेश वाटत होते. मस्त पाऊस पडून वातावरण कुंद झाले होते. त्या वातावरणात आपोआपच फ्रेश व्हायला होत होते. मग मस्तपैकी एक कॉफी मारली आणि रिसॉर्टच्या, बीचला लागून असलेल्या, शॅक मध्ये जाऊन आरामात समुद्राचा वारा खात पाय लांब करून पडलो. तिथून दिसणारा नजारा एकदम मस्त होता, हा असा…

लांबवर एक दीपस्तंभ दिसत होता. त्याच्यावरचा दिवा चालू बंद, चालू बंद होत होता. तो चालू असताना फोटो टिपण्यासाठी मुलाने बर्‍याच क्लिक्स मारल्या. शेवटी तो दिवा चालू असताना तो कॅमेराबद्ध करणे त्याने जमवलेच.

त्यानंतर सूर्याचे थोडे दर्शन झाले. सूर्यास्ताची वेळही झाली होती आणि आम्ही बीचच्या सनसेट पॉइंटवरच लोळत पडलो होतो. त्यामुळे सनसेट बघायला तसेच टिपायला मिळेल अशी आशा पल्लवित झाली, पण दोनच मिनिटांत पुन्हा वातावरण ढगाळ झाले आणि सनसेट काही बघायला मिळाला नाही.

त्याआधी मुलांनी बीचवर सॅंडपेंटींगची मजा लुटली होती.

दुसर्‍यादिवशी सकाळी आंघोळी, ब्रेकफास्ट उरकून, चेकआऊट करून जंजिरा किल्ला पाहायला निघालो. मुरुडवरून जंजिर्‍यासाठी जाताना रस्त्यावरून हे गावाचे असे विलोभनिय दृश्य दिसते. ह्याच गावातून बोटीने जंजिरा किल्ल्यात जाता येते.

आम्ही साधारण बाराच्या सुमारास तिथे पोहोचलो. गावाच्या एंट्रीला 10 रुपयांची पावती फाडली. पुढे आलो तर पार्किंगसाठी एक माणूस जागा दाखवून पार्किंगसाठी मदत करू लागला. गाडीतून उतरल्यावर, प्रायव्हेट बोटी जातील किल्ल्यात लवकर जा जेटीवर, संध्याकाळी 5:30 वाजता शेवटची बोट असते वगैरे माहिती देउ लागला. मी ह्या आदरातिथ्याने भारून जायच्या आतच त्याने 20 रुपये मागितले, पार्किंगचे. गुपचुप काढून दिले आणि जेटीच्या दिशेने निघालो. थोडे पुढे आलो तर एक काका म्हणाले, “अरे, आता पुढे जाऊ नका! 12-2 नमाजसाठी बोटी बंद असतात”. मागे वळून पाहिले तर तो पार्किंगचे पैसे घेतलेला गायब झाला होता. आता काय? चला चुकून एखादी बोट निघतेय का ते बघूयात म्हणून तसेच पुढं निघालो. परत 2-3 जणांनी, “अरे, बोटी 2 वाजेपर्यंत बंद आहेत” असे ऐकवून मूर्ख बनल्याच्या जखमेवर मीठ चोळले. पुढे गेल्यावर एका ऍन्गलवरून किल्ल्याचे, जंजिर्‍याचे, दर्शन होत होते. तिथेच फोटो काढून परत फिरलो. 2 तास नुसतेच तिथे थांबणे शक्य नव्हते, पुण्याला रात्र व्हायच्या आत पोहोचायचे होते.

तिथून पुढे रोहा मार्गे पालीच्या गणपतीला, बल्लाळेश्वराला, जायला निघालो. हाच तो बल्लाळेश्वराचा डोंगर. तिथे देवळात आणि परिसरात फोटो काढायला बंदी होती. ही बंदी का असते हे कोडे काही केल्या माझ्याच्याने अजून उलगडलेले नाही.

त्याआधी, मध्ये, रोह्यात जेवायला थांबलो होतो. तिथली एकंदरीत हॉटेले बघितल्यावर कुठे जेवायचे असा यक्ष प्रश्न पडला होता. जी काही हॉटेले लोकांनी सांगीतली ती काही जेवण्यासारखी नव्हती आणि तसेही मला त्या हॉटेलांमध्ये जाऊन पंजाबी मेनू खायची अजिबात इच्छा होइनां. मग गाडी लावली एका कोपर्‍यात आणि मी जरा ST स्टॅन्डवर गेलो आणि लोकांशी गप्पा मारून जेवण्याची चौकशी करायला सुरु झालो. त्यातून कळले की त्या ST स्टॅन्डच्या वरच्या मजल्यावर एक खानावळ आहे आणि तिथे मालवणी जेवण मिळते. तसेच ते हॉटेल स्वच्छ आहे ही मोलाची माहितीही कळली. आणि खरोखरीच ते हॉटेल एकदम झक्कास होते. एकदम टेस्टी, तिखट आणि चमचमीत.

पापलेट थाळी कोळंबी थाळी व्हेज थाळी

एकंदरीत दोन दिवस, धकाधकीच्या रहाटगाडग्यापासून लांब, एकदम झक्कास गेले!

चावडीवरच्या गप्पा – असुरक्षित भारत

“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट… चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय म्हणता! बॉम्बस्फोट तर डेक्कनजवळ झाला, सदाशिवपेठेत नाही, खी खी खी”, भुजबळकाका.

“कळतात हो टोमणे कळतात, पण ही वेळ टोमणे मारायची नाहीयेय, भारत खरंच सुरक्षित राहिलेला नाहीयेय”, चिंतोपंत जरा चिडून.

“तुम्हाला काय चिंता चिंतोपंत, सगळ्या जगात तुमचा गोतावळा पसरला आहे, जा की तिकडें”, इति घारुअण्णा.

“हो ना, काय हो चिंतोपंत जाणार होतात ना, काय झाले?”, शामराव बारामतीकरांनी घारुअण्णांची री ओढली.

“ह्म्म्म, अमेरिकेत जाणार होतो थोरल्याकडे पण त्यावेळी नेमका त्या ओसामाने घोळ घातला”, चिंतोपंत.

“त्याला झाली की आता बराच काळ, आता जां!”, सानुनासिक उपरोधात घारुअण्णा.

“आताही तिकडे बोंबच आहे, गोळीबार करत फिरत आहेत तिथे माथेफिरु”, चिंतोपंत.

“मग तुमच्या धाकट्याकडे का नाही जात, तिकडे इंग्लंडात?””, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तिथेही जाणार होतो, पण तेव्हा तिकडेही बॉम्बस्फोट झाला. आता तर काय काळ्या लोकांना प्रोब्लेम आहे म्हणे तिथे, रेसिस्ट लेकाचे”, चिंतोपंत.

“बर मग मधल्याकडे जा, ऑस्ट्रेलियात”, शामराव बारामतीकर.

“अजिबात नको! तिकडे तर सरळ भोसका भोसकी चालू आहे म्हणे, त्यापेक्षा तुम्ही जपानला का नाही जात तुमच्या भावाकडे”, घारुअण्णां

“जाणार होतो, पण भाउ म्हणाला की तोच परत यायचा विचार करतोय, तिथे अणुभट्टीचा धोका अजुनही आहे म्हणे”, चिंतोपंत.

“मग त्यात काय एवढे, लेकीकडे जा ना, जावई आखातात असतात ना तुमचे”, नारुतात्या.

“नाही हो! तिथे देवाधर्माचे काही नाही करता येत, आपला धर्म कसा काय बुडवू”, चिंतोपंत.

“हां! हे मात्र खरें हों तुमचें”, घारुअण्णा हात जोडून आकाशाकडे बघत.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, शामराव बारामतीकर.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे”, सोकाजीनाना.

“मग तुमचे काय मत? काय करावे चिंतोपंतांनी?”, नारुतात्या.

“अहो त्यांचे म्हणणे नीट ऐकले का? ही असुरक्षितता सगळीकडेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि ह्या वेगवान युगात वेगवेगळ्या प्रकारची असुरक्षितता सगळ्याच देशांना भेडसावत आहे. त्यामुळे भारतच असुरक्षित आहे वगैरे म्हणून भारत सोडून जाण्यात काय अर्थ आहे? हा आपला देश आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्यच आहे. देश सोडून जाऊन काय हशील होणार आहे. आपल्या घराची आपण काळजी घेतो की नाही? की एरियात चोर्‍या होऊ लागल्या म्हणून आपण घर सोडून जातो? चिंतोपंत, ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात. ‘कसे होणार’ ह्याची चिंता सोडा, ‘काय करावे’, भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, सोकाजीनाना.

“काय पटतयं का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिष्कील हसत.

चिंतोपंतांनी मान हलवत चहाची ऑर्डर दिली.

कॉकटेल लाउंज : Almonda Amarita

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “Almonda Amarita

पार्श्वभूमी:

काल अस्मादिकांचा वाढदिवस होता, त्यानिमीत्ताने एक जबरदस्त कॉकटेल टाकायचा विचार होता पण कार्यबाहुल्यामुळे (कसले भारदस्त वाटते ना?) जमले नाही. पण शुक्रवारचा मुहुर्त साधता येतोय त्यामुळे काही हरकत नाही.

हे कॉकटेल हे माझे इंप्रोवायझेशन आहे म्हणजे पुर्णपणे माझी रेसिपी. बायकोने एकदा मुलांसाठी एक आइसक्रीम आणले होते बदामाचे. ते बघताना माझ्या डोळ्यासमोर एकदम अमारेतो, बदामापासून बनलेली लिक्युअर, आली. ती माझ्या मीनीबार मध्ये दाखल होतीच. लगेच मग काहीतरी प्रयोग करायचे ठरले. तो यशस्वी झाला तोच ह्या कॉकटेलच्या रूपात तुमच्यासमोर सादर करतो आहे. ह्या कॉकटेलला नाव देण्यासाठी बर्‍याच मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली. पण कॉकटेल्सचे फोटों बघून हे नाव सुचवले ते माझी गोव्यातली ब्लॉगर मैत्रिण ज्योती कामत हिने (ही मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाची संपादकही आहे).

प्रकार व्हाइट रम आणि अमरेतो लिक्युअर बेस्ड, लेडीज स्पेशल 
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
अमारेतो १० मिली
आल्मड क्रशड आइसक्रीम २ स्कूप
काजू (सजावटीसाठी)  
 
ग्लास वाइन ग्लास

कृती:

ह्याची कृती एकदम सोप्पी आहे. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून मस्त ब्लेंड करून घ्या. (कोण खवचटपणे म्हणतयं काजू पण का? ते सजावटीसाठी आहेत.)
खालच्या फोटोप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की व्यवस्थित ब्लेंड झाला आहे हे समजावे. 

आता हे मिश्रण वाइनग्लास मधे ओतून घ्या. ग्लासच्या कडेला काजू सजावटीसाठी लावा. हे फारच जिकरीचे आणि कष्टप्रद काम आहे.

आता त्यात स्ट्रॉ टाकून घ्या. आइसक्रीम मुळे हे कॉकटेल खुप थंड असणार आहे. त्यामुळे  स्ट्रॉने पिणे हे सोयिस्कर असते, थेट पिण्यापेक्षा.

चला तर, Almonda Amarita तयार आहे 🙂

डिस्क्लेमर: ह्या कॉकटेलसारखे कॉकटेल कोणी दुसर्‍या नावाने प्यायले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

चावडीवरच्या गप्पा – साहित्य संमेलने आणि सरकार

“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली.

“ऑ?”, नारुतात्या.

“अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता.

“अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!”, इति नारुतात्या.

“अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.

“कुठली मराठी म्हणायची ही? बहुजनांची की पुण्या-मुंबैतली?”, इती कट्ट्याचे बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आवराsss ‘काका मला वाचवा’ ह्याऐवजी ‘ह्या काकांना वाचवा’, असे म्हणायची वेळ आली आहे, अहो भुजबळकाका प्रत्येकवेळी असा उपरोध बरा नव्हें ”, घारुअण्णा वैतागून.

“तुमचे हे साहित्य संमेलन सर्वसमावेशक असते काय? बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करते काय? साहित्य हा समाजमनाचा आरसा असायला हवा, तसे ते असते काय? उगा सरकारला दोष देऊ नका”, भुजबळाकाका आवेशात.

“नाहीतर काय, म्हणे सरकारने साहित्य संमेलनाचा सगळा खर्च उचलावा, अरे सरकारला दुसरे काही काम नाही का?”, शामराव बारामतीकर, सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या साहेबांच्या पक्षाशी निष्टा राखत.

“आम्ही टॅक्स काय ह्यासाठी भरतो?”, नारुतात्या.

“नाहीतर काय?”, शामराव बारामतीकर.

“अहो ह्या सरकारने, राजकारण्यांनी सगळा टॅक्सरुपी पैसा भ्रष्टाचार करून आपल्या घशात घातलेला चालतो तुम्हाला, पण जरा काही समाजोपयोगी काम करायचे म्हटले की त्रागा सुरु”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“हे बघा उगा आरोप करू नका. सगळे राजकारणी आणि पक्ष तसे नसतात.”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“तर तर, उजेडच पाडला आहे ना तुमच्या साहेबांनी. जिथे जिथे चरायला कुरण आहे तिथे तिथे साहेब हजर! पण समाजासाठी, साहित्यासाठी काही करायचे म्हटले की लगेच जातीचे राजकारण करायला तयार, त्यासाठी आहेतच हे आपले बहुनजकैवारी, भुजबळकाका”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका, अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा कोठे गेले होते हे तुमचे समाजाभिमुख साहित्यिक? भ्रष्टाचार होतो आहे तर त्या विरोधात किती साहित्यिक आंदोलन करायला रस्त्यावर उतरले, समाजासाठी?”, भुजबळकाका.

“खरंय घारुअण्णा! साहित्यिक, साहित्य संमेलनं आणि समाज ह्यांची गल्लत करत आहात तुम्ही”, सोकाजीनाना.

“काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो हे लोकशाहीतले सरकार आहे, ते काही अकबर बादशहाचा दरबार नाही, साहित्यिक पदरी बाळगायला!”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“हे काय आता नविनच”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“ही साहित्य संमेलने कोट्यावधी मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करतात असे समजले तर त्यांचा अध्यक्ष ठरवते कोण? त्यासाठी मराठी समाज, जनता जबाबदार नको? तीन-चारशे लोकं ह्या संमेलनाचा अध्यक्ष ठरवणार. त्यातही त्यांचे रुसवे फुगवे, कंपुबाजी. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा असेल वाद तिथेही सुटलेले नाहीत. बरें, झाला अध्यक्ष आणि झाले संमेलन त्याने साध्य काय होते? ह्या साहित्यिकांना साहित्याची सेवा करताना मेवा मिळायलाच हवा, लोकशाही आहे ना शेवटी इथे. पण ह्या साहित्यिकांनी कधी वाचनालये दत्तक घेतल्याचे किंवा त्यांना अनुदान दिल्याचे, पुस्तके दिल्याचे, एकरकमी मदत केल्याचे ऐकले आहे का कोणी? उगा प्रत्येकवेळी आपला हात सरकारपुढे करून आपलीच किंमत अशी कमी करून घेण्यात काही अर्थ नाही. तशीही मराठी जिवंत रहायला ह्यांच्या संमेलनांची गरज आहे, असेही नाही. मराठी भाषेत जर मुळात दम असेल तर ती शतकानुशतके टिकून राहिलच!”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, कधी उभ्या आयुष्यात तुम्ही कोणते साहित्य वाचले आहे काय? तुमचा ‘संध्यानंद’ सोडून. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांची कशी जिरली ह्या आनंदात भुजबळकाकांनी लगेच चहा मागवला.