मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. चेन्नैच्या भयंकर उकाड्यावर हा उतारा एकदम कातिल होता.
पहिल्या दिवशी सकाळी सकाळी ‘कोकर्स वॉक’ नावाच्या साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एक रपेट मारून ‘साईटसिइंग’ला सुरुवात झाली. त्यानंतर एक जंगलातला ट्रेल होता. सुरुच्या बनातून असलेला एक मस्त ट्रेल. अचानक एका चढावर एक लहान फुलाच्या गुच्छासारखे काहीतरी दिसले म्हणून फोटो काढायला पुढे सरसावलो आणि काय आश्चर्य, ती फुले नसून रंगबिरंगी भूछत्र, कुत्र्याच्या छत्र्या किंवा जंगली अळंबी असल्याचे निदर्शनास आले. एकदम चकितच झालो ती विविध रंगातली भूछत्री बघुन. आजूबाजूला बघितल्यावर जाणवले की खूपच सुंदर, ह्यापूर्वी कधीही न बघितलेले भूछत्र्यांचे रंगबिरंगी आणि मनमोहक विश्व.
लहान मुली पावसात छत्र्या घेऊन फिरायला निघाल्या आहेत असे वाटायला लावणारी ही सुंदर आणि लालचुटुक भुछत्रे.
चॉकलेटच्या किंवा कॉफीच्या लॉलीपॉपची आठवण करून देणारी ही कॉफी कलरची सुंदर भुछत्रे.
लहानपणी गंगा नदीची जी काही चित्रमय झलक पाहिली होती त्यानुसार गंगा नदी म्हटले की तिच्या घाटावर असलेल्या पंडित लोकांच्या गोलाकार छत्र्या ह्यांचीच आठवण मला प्रथम होते. ही भुछत्री बघितल्यावर एकदम त्यांची आठवण झाली. चमक (शायनिंग) असलेली भुछत्रं पहिल्यांदाच बघितली, मी तरी.
ही भुछत्रे भरघोस फुलांचे गुच्छ असल्याची जाणिव करून देत आहेत.
चिमुकली आणि अगदी नाजूक असणारी ही भुछत्रे बघताच एकदम नाजूक चणीच्या लहान गोंडस बालिकांची आठवण होते.
एकदम एलियनांच्या UFO प्रमाणे दिसणारी ही एकदम वेगळ्याच रंगछटा असलेली भुछत्रे.
फुलांच्या गुच्छाप्रमाणेच असणारी ही भुछत्रे, पण ह्यावेळी वेगळ्या नजरेने आणि ऍंगलने बघितल्यावर कॉर्नेट ह्या म्युसिकल इंस्ट्रुमेंटला असलेल्या दट्ट्यांची आठवण होत होती.