“कळस आहे हा मूर्खपणाचा! हसावं का रडावं ह्यापुढे आता?”, नारुतात्या कपाळाला हात लावतच चावडीवर आले.
“कोणांचा आणि कसलां मूर्खपणां नारुतात्या?”, घारुअण्णा.
“अहो, ही खाप पंचायत हो! म्हणे मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करा, का? तर त्याने म्हणे बलात्काराचे वाढते प्रमाण कमी होईल, आहे की नाही मूर्खपणा”, नारुतात्या.
“ह्या शिंच्या पंचायतीला भारीच ब्वॉ पंचायती?”, घारुअण्णा.
“सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाली तर ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील असे त्यांचे म्हणणे आहे हो.”, शामराव बारामतीकर.
“आयला खरंच आचरटपणा आहे हा. लहान वयात लग्न आणि बलात्काराचा काय संबंध?” भुजबळकाका.
“नाहीतर काय! बलात्कार काय ठराविक वयात करावीशी वाटणारी गोष्ट आहे काय? काय हो चिंतोपंत”, शामराव बारामतीकर.
“अं…अं…मला काय माहिती? मला का विचारताय हो बारामतीकर?”, चिंतोपंत एकदम गांगरून.
“खॅ.. खॅ.. खॅ.. तसे नाही हो चिंतोपंत, बारामतीकरांना म्हणायचेय की बलात्कार करण्याची पशुतुल्य भावना मनात उत्पन्न होण्यास वयाची अट नसते.”, नारुतात्या
“हो तर काय, मानसिक विकृतीच आहे ती आणि ती वयातित असते.”, शामराव बारामतीकर.
“ते बरीक खरेंच हो तुमचे बारामतीकर, पण मी काय म्हणतो आपल्याकडेही पूर्वी बालविवाह होत होतेच की, त्याचे कारण हेच असावे काय हो? नाही आपली एक शंका”, घारुअण्णा.
“घारुअण्णा, तुमचं आपलं काहीतरीच असतं नेहमी. त्या बालविवाहांचा इथे काय संबंध ? ”, शामराव बारामतीकर जरासे उखडून.
“नाही? मग त्यामागे काय कारण असावे?”, घारुअण्णा.
“त्या काळीही बरेच मतप्रवाह होते म्हणतात लग्नाच्या वयावरून. तेही ह्या खाप पंचायतीला लाजवतील असे. आपले पूर्वजही काही कमी नव्हते बरं का.”, भुजबळकाका.
“सांगा तरी बघू कसें होते ते आमचे पूर्वज?”, घारुअण्णा उपरोधाने.
“आमचे? बरं! आठव्या वर्षी मुलीचा विवाह प्रशस्त होय, असे तुमच्या मनूने म्हटले आहे. रजोदर्शनापूर्वी आपल्या मुलीचे लग्न जो पिता, माता व ज्येष्ठ भ्राता करीत नाही तो नरकात जातो असेही सांगितले होते बरं का!”, भुजबळकाका.
“भुजबळकाका उगा जातीयवादात जावू नका. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी ही पित्याची होती. वंश, जात-पोटजात, गोत्र इत्यादींसंबंधीचे नियमही त्या काळी फारच कडक होते. त्यामुळे वयात आलेल्या मुलीने स्वतःच वरसंशोधन करून, ह्या नियमांचे उल्लंघन होऊन समाजाचा रोष ओढवून घेणे हे त्या काळी परवडण्यासारखे नसल्याने, मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचे लग्न उरकून टाकावे, अशी वृत्ती बळावली असावी. तसेच स्त्रीच्या चारित्र्यालाही अतिशय महत्त्व होतेच, मुलीचे कौमार्य ह्याचा तर बाऊ आजही आहे, त्यामुळे मुलीने मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रूढ झाली असावी.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“पण हे काही पटत नाही हो सोकाजीनाना, मूर्खपणाच नाही का हा?”, शामराव बारामतीकर.
“अहो बारामतीकर! तुम्ही आजच्या काळात राहून हा विचार करता आहात म्हणून ‘हा मूर्खपणा’ असे वाटते आहे तुम्हाला. टाइम्स हॅव चेंज्ड”, चिंतोपंत.
“चिंतोपंत एकदम बरोबर म्हणत आहेत.”, सोकाजीनाना.
“बरं! मी आजच्या ह्या काळात आहे मान्य, पण म्हणून मी म्हणतो ते चुकीचे असे कसे?”, शामराव बारामतीकर इरेला पेटून.
“तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे तेच तर कळतं नाहीयेय ना! खी… खी… खी…”, नारुतात्या.
“अहो नारुतात्या, माझे म्हणणे एवढेच आहे ही लग्नाचा आणि बलात्काराचा जसा संबंध नाही तसा लग्नाचा आणि वयाचाही काही संबंध नाही? शरीरसंबंधासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेला कोणीही केव्हाही लग्न करू शकतो.”, शामराव बारामतीकर.
“घ्याsss लग्न काय फक्त शरीर संबंधासाठीच करायचे असते.”, नारुतात्या.
“नारुतात्या, मनुष्यप्राणी लग्न का करतो? तो पशूंपेक्षा वेगळा आहे. त्याला सामाजिक जाण आहे. त्या जाणिवेमुळेच, पशूंप्रमाणे स्वैराचार बोकाळला तर, जोडीदारासाठी हाणामार्या होऊन मनुष्यजात नष्ट होऊ नये ह्यासाठी लग्न संस्था त्याने उभी केली असावी. त्यामुळे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे शामराव बरोबर बोलत आहेत आणि त्यांचे पटतंयही.”, सोकाजीनाना .
“पण शामराव म्हणत आहेत तसा वयाचा अगदीच संबंध नाही असे नाही. वयाला तर बरेच महत्त्व असायला हवे. पण तुमची जी चर्चा चालली होती त्या अनुषंगाने नव्हे एका वेगळ्याच अर्थाने.”, सोकाजीनाना.
“म्हणजे नेमके कसे?”, चिंतोपंत.
“म्हणजे असं बघा, आपण भारतीय जनरली लग्नाचा विचार कधी करतो? सेटल झाल्यावर. म्हणजे स्थिर नोकरी मिळाली की. आता तर काय स्वतःचे घर असल्याशिवाय लग्नाचा विचारही करता येत नाही. त्यात पुन्हा आताच्या रॅट रेसमुळे करियर घडविणे महत्त्वाचे, मग लग्न. त्या नादात तिशी कधी ओलांडते हे कळतही नाही. मग लग्न. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते. पण आपल्या तथाकथित संस्कृतीच्या पगड्यामुळे हे लग्न होईपर्यंत आपल्याला शरीर म्हणजे काय आणि त्याची मागणी काय हेच माहिती नसते. तसे काही शिकवलेलेही नसते. जोडीदाराचे शरीर आणि त्यातले बारकावे, खाचाखोचा, सौंदर्य, मादकता ह्या सर्व गोष्टींची खर्या अर्थाने ओळख होईपर्यंत आणि कळेपर्यंत तारुण्याचा भर ओसरून गेलेला असतो. पुरुषाच्या पोटावर आणि स्त्रीच्या कमरेवर चरबीचे टायर चढलेले असतात. त्यात तिशीच्या आसपास लग्न केल्यामुळे प्लॅनिंग करून मुलं होणे लांबवणे शक्य होत नाही. मग मुले झाले की मग जोडीदाराला वेळ देता येत नाही. ह्या सर्वांवर काहीबाही उपाय करत थोडे दिवस गेले की लगेच मिड लाईफ क्रायसेस डोके वर काढतो. झालं ह्या साठीच केला होता का हा अट्टहास असे म्हणायचे वेळ येते.”, सोकाजीनाना, थांबून सगळ्यांकडे बघत.
“प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेळ असते, ती त्या त्या वेळी व्ह्यायला हवी. भूपाळी रात्री झोपताना म्हटली तर चालेल का? नाही ना! लग्नाचे आणि वयाचेही तसेच आहे. मला हे असे म्हणायचे होते. काय पटतंय का? पटत असेल तर चहा मागवा.”, सोकाजीनाना.
सर्वजण सोकाजीनाना नेमके काय म्हणाले ह्याचा अर्थ लावण्यात गर्क असल्याने मग सोकाजीनानांनीच हसत हसतं चहाची ऑर्डर देऊन टाकली.