चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन


“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले आता?”, कोणीतरी.

“अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा.

“काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर.

“बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर.

“मग काय! आता भगवा आणि निळा युती आहे म्हटलें!”, घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, ही सरळ गोष्ट आहे, उगाच कीस पाडू नका! मी आधीही म्हटलेच होते मंत्रालयाला आग लागली तेव्हा की ती काही साधीसुधी आग नव्हती.”, भुजबळकाका काहीसे आक्रमक होत.

“फरक आहे ना, तुम्ही चावडीवर बरळला होतात, पण आता आमचा उद्धव तेच जाहीरपणे बोलतोय, खी खी खी”, घारुअण्णा टिपीकल चिपळुणी अंदाजात, “पण जे काही बोलतोय ते खरेंच आहे हों! हे अजित’दादा’ आता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘राजीनामा आपण फेकला, आता होऊन जाऊ द्या चौकशी’ असा आव आणत मिशीला तूप लावून फिरत आहेंत.”

“तेच तर, मंत्रालयाच्या आगीत घोटाळ्यांची कागदपत्रे जाळून राख केली, त्यामुळेच तर त्यांच्यात हे एवढे धाडस, हिंमत आलीय, त्याचा मंत्रालयातील आगीशी संबंध खचितच असणार”, भुजबळकाका.

“ते ठीकच आहे हो! पण पुढे दादा आणि ताईंना राज्य आणि केंद्र आंदण दिले आहे का? असला फालतू सवाल करण्याची काय गरज होती?”, शामराव बारामतीकर.

“तो फालतू सवाल कसा काय हों?”, घारुअण्णा.

“का हो! मग आम्हीही विचारू शकतो, मागे जेव्हा तुम्हाला सत्ता बहाल केली होती तेव्हा का मग सगळे राज्य आंदण मिळाल्यासारखे वागत होतात? झुणका भाकर केंद्रांच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या त्याचे पुढे काय झाले?”, शामराव बारामतीकर अजिबात विचलित न होता.

“अहो बारामतीकर, विषय सिंचन घोटाळ्याचा चालला आहे!”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, तुमच्या वर्मावर बोट ठेवले की कसे लागते ना लगेच तुम्हाला. तरी मी अजून बाकीच्या गोष्टी बोललोच नाहीयेय अजून.”, शामराव बारामतीकर.

“बारामतीकर हा राजीनामा त्यांनी दिलेला नाहीयेय. काकांनी त्यांना द्यायला लावलाय. त्यांना सुप्रियाताईंसाठी ‘गादी’ तयार करायची आहे ना! लोकशाही अंतर्गत असलेली घराणेशाहीच आहे ही कॉग्रेसची. खी…खी…खी….”, भुजबळकका.

“घराणेशाही ही काय फक्त काँग्रेसमध्येच आहे? काय हो घारुअण्णा बोलू का?”, शामराव बारामतीकर.

“हे बघा उगाच राळ उडवायचा प्रयत्न करू नका, तमाम शिवसैनिकांचीच ती इच्छा होती.”, चिंतोपंत.

“बरोबर आहे, फक्त तमाम शिवसैनिकांचीच होती ती इच्छा, एका सेनापतीची सोडून. पण काय हो ह्या असल्या इच्छा काय फक्त सैनिकांनाच असतात काय हो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय इच्छा नसतात काय हो?”, शामराव बारामतीकर.

“अरे तुम्ही सगळे कुठून कुठे वाहवत चालला आहात?”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“बोला, बोला सोकाजीनाना तुम्हीच सांगा आता ह्यां सगळ्यांना!”, नारुतात्या.

“उद्धवचे कार्य साध्य झाले. त्याला जे साधायचे ते त्याने मेळाव्यात जाहीर प्रकटन करून साध्य केलेच. त्याला मतदार राजाला नेमके असेच जागे करायचे होते. ते झाले!”, मंद हसत सोकाजीनाना, “अरे, हे सगळे जवळ येत चाललेल्या निवडणुकांचे पडघम आहेत. विरोधकांकिषयी रान उठवण्याची रंगीत तालीम आहे ही. मतदार राजा जागा हो!”

“अहो पण मतदार राजाने जागे होऊन करायचे काय? सगळेच साले चोर लेकाचे. मतदान करायचे तरी कोणाला. त्यातल्या त्यात कमी चोराला निवडून दिले की पाच वर्षांत तो एक मोठा दरवडेखोरच बनून जातो”, चिंतोपंत त्यांची खंत व्यक्त करत.

“त्याचे काय आहे चिंतोपंत, गंगाजल सिनेमात अजय देवगण म्हणतो, ‘समाज को सरकार और पुलीस वैसीही मिलती है जैसा समाज खुद होता है’ ते अगदी खरे आहे. तुम्ही ही जी आहे ती परिस्थिती बदलवू शकता का? आमूलाग्र बदल कोणीतरी घडवून आणण्यापेक्षा तो स्वतः घडवण्याची पात्रता किंवा धाडस आहे का तुमच्यात? नुसत्या चर्चा झोडून उसासे सोडण्यापेक्षा ह्या सिस्टिमला पर्यायी सिस्टिम शोधण्याची आणि बनविण्याची तयारी आहे का तुमची? नसेल तर मग जे आहे त्यातले चांगले ते वेचून वाईट सोडून द्यायची तयारी ठेवा आणि जर असेल तर एक आंदोलन करायची तयारी करा!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“सोडा हो ह्या बातां आणि चहा मागवा”, सोकाजीनाना.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

2 thoughts on “चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s