“काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्यावर आणत.
“हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला. सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना असेच म्हणावे लागेल.”, घारुअण्णा एकदम सुतकी चेहेर्याने.
“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीसुद्धा!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.
“चला, ह्या निमित्ताने तरी घारुअण्णा आणि बहुजनह्रदयसम्राटांचे एकमत झाले! मला वाटले आता ‘सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना’ वरून जुंपते की काय… खीs खीss खीsss”, नारुतात्या पांचट विनोद करत.
“नारुतात्या, तुम्हाला कसला पोचच नाही, कुठे काय बरळावे ह्याचा काही अंदाज?”, इति चिंतोपंत.
“असो, आम्ही गेलो होतो फिरायला पण तो दिवस हॉटेलातच बसून काढला, अंत्यदर्शनासाठी जमलेली गर्दी बघून आपली तर छातीच दडपून गेली ब्वॉ.”, घारुअण्णा एकदम भावुक होत.
“हो! २० लाख लोक जमले होते म्हणे शिवाजी पार्कात. साहेबांचा हिंदूहृदयसम्राट असण्याचा ह्याहून भरभक्कम पुरावा तो काय असेल दुसरा”, इति चिंतोपंत.
“अहो चिंतोपंत, तो २० लाख म्हणे उगाच फुगवलेला आकडा आहे. एवढी माणसे जमायला तिथे जागाच नाहीयेय म्हणे”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“बरंsssबरंsss, तुमच्या सकाळ समूहानेच लावला असेल हा असला जावईशोध, नाही का?”, घारुअण्णा रागाने.
“घारुअण्णा, तुम्हाला असे बोलवतेच हो कसे? त्या २० लाखाच्या आकड्यांवर बर्याच जणांचा आक्षेप आहे इतकेच मला म्हणायचे होते.”, इति बारामतीकर.
“अहो, आकडा कसा काय महत्त्वाचा असेल? तो अंत्यविधीसाठी आपणहून जमलेला जमाव होता, कोणाचे शक्तिप्रदर्शन नव्हते आकड्यात मोजायला.”, घारुअण्णा रागाने लाल होत.
“जाऊ द्या हो घारुअण्णा, ह्याचा इश्यू करून काही फायदा नाहीयेय. सोडून द्या, २० लाख काय किंवा २ लाख काय, संपूर्ण अंत्ययात्रा आणि अंत्यविधी शांततेत पार पडला हे महत्त्वाचे!”, इति भुजबळकाका.
“अहो, मला कुठे इश्यू करायचाय ह्याचा, ह्या सेक्युलरवाद्यांचेच हे नेहमीचे अवलक्षण असते.”, घारुअण्णा रागात घुमसत.
“तो २० लाखांचा आकडा जाऊद्या, पण बाळासाहेबांचे स्मारक तर शिवाजी पार्कात व्हायलाच हवे! त्यावरही काही सेक्युलरवाद्यांचा आक्षेप आहे, आता बोला ”, चिंतोपंत.
“भले शाबास! हिंदूंसाठी ह्या भारतात काहीही करायचे झाले तर प्रत्येक वेळी ह्यांची परवानगी मागायची, हे म्हणजे हिंदू अस्मितेवर हल्ला आहे! हे होणे नाही! हम स्मारक वहीं बनायेंगे!”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.
“अहो घारुअण्णा का उगाच ‘हिंदूंवर अन्याय’ हा प्रपोगंडा करताय, शिवाजी पार्क खेळाचे मैदान आहे. तिथे कसले स्मारक उभारताय?”, भुजबळकाका शांतपणे.
“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, ज्या शिवतीर्थावर या महानेत्यानं साडेचार दशकं अधिराज्य गाजवलं, ज्या ठिकाणी चिरनिद्रा घेतली, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे राहणे उचित आहे.”, चिंतोपंत जरा तडकून.
“मान्य, बाळासाहेब हे देशातील एक महान नेते होते त्यामुळे त्यांचं स्मारक उभारायलाच हवं. या भावनेशी मी असहमत नाही. फक्त, शिवाजी पार्क मैदानात हे स्मारक बांधणं योग्य होणार नाही.”, भुजबळकाका ठामपणे .
“बरं मग, इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक बांधण्यावर आपले काय मत आहे बहुजनह्रदयसम्राट?”, घारुअण्णा घुश्शात.
“त्यापेक्षा, कोहिनूर मिलच्या जागेवर हे स्मारक बांधले तर?”, नारुतात्या काडी सारत.
“इथे तर मराठी माणसालाच काही पडले नाहीयेय तर बाकीच्यांना दोष देऊन काय उपयोग?”, घारुअण्णा हताश होत.
“अहो डोंबलाचे मराठी माणसाचे मत! भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच!”, भुजबळकाका ठामपणे.
“अहो भुजबळकाका, मनोहरपंत जोशीसरांनीसुद्धा स्मारक शिवाजी पार्कात व्हायला हवे असेच म्हटले आहे.”, चिंतोपंत.
“नाही चिंतोपंत, त्यांना तसे बोलायला काय जातेय? तसेही जोशीसरांचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पीळ काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.
“हो, अहो आचरटपणा आहे हा सगळा. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्याची मागणी आधीच झाली आहे आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुन्हा इंदू मिलचे नाव सुचवणे हा शुद्ध आचरटपणा आहे. त्यानंतर कोहिनूर मिलच्या जागेचे नाव निघताच जोशीसर कासावीस झाले आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्काचा त्यांनी हट्ट धरला आहे. वेळ आल्यास शिवसैनिकांनी कायदा हातात घ्यावा असेही त्यांनी सुचवले आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्याने.
“सोकाजीनाना, ह्यातही राजकारण?”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.
“तर काय! हे सगळे गलिच्छ राजकारण आहे. जोशीसरांकडून ह्यावेळी तरी ही अपेक्षा नव्हती.”, सोकाजीनाना काहीसे हळवे होत.
“अहो, ‘शिवसेनाप्रमुख हे सच्चे क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे मैदानांवर खेळणारी पावले थांबवून, खेळाचा श्वास कोंडून तिथे आपले स्मारक उभारणे, हे बाळासाहेबांनाही पटले नसते’ असे मत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी व्यक्त केले आहे. स्मारक बांधण्याबद्दल काही हरकत नाही हो कोणाची. पण त्यातही राजकारण केले जावे ह्यात खुद्द बाळासाहेबांचा अवमान आहे हेही लक्षात घेत नाहीयेय कोणी.”, सोकाजीनाना शांतपणे, “शिवसेना भवन किंवा बाळासाहेबांचे घर, निवासस्थान, ह्या दोन्ही वास्तू बाळासाहेबांचे स्मारक म्हणून उचित स्थानं असू शकतात. ह्या दोन्ही जागांचे पावित्र्य आणि स्थानमाहात्म्य तेवढे थोर नक्कीच आहे. बाळासाहेबांच्या हस्तस्पर्शाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या वास्तू खरेतर त्यांची अस्तित्वात असलेली स्मारकेच आहेत. ही दोन्ही ठिकाणे शिवसैनिकांना आणि मराठी तरुणांना नेहमीच स्फूर्ती देत राहतील ह्यात कोणाला शंका असण्याचे काही कारणच नाही. त्यामुळे नवीनं जागा शोधून त्यावर स्मारक बांधण्याचे राजकारण करत बसण्यापेक्षा ते स्मारक नेमके कसे असावे त्याचे स्वरूप कसे असावे ह्याबद्दल चर्चा केली जाणे महत्त्वाचे आहे.”
“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.
सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.