यक्कु उर्फ येश्या उर्फ यशवंत कुलकर्णी…


मागच्या 4 दिवसांच्या धमाल सहलीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अगदी वांझोटा गेला. काहीतरी रितेपण मेंदू कुरतडून टाकत होते. अगदी हताश नाही पण एक भकासपण व्यापून राहिले होते सभोवताली. कधी कधी असे होते की काही गोष्टीँची संगतीच लागत नाही आणि आपण एका पोकळीत असल्यासारखे असतो, भांगेच्या नशेत असावे तसे.

माझ्या बाबतीत असे व्ह्यायला कारण होता यक्कु. यशवंत कुलकर्णी, औरंगाबादेतला एक तरुण अवलिया. काल रात्री 1 वाजता फेसबुकवर बर्‍याच दिवसांनी लॉगिन केले तोच, ‘यकु तु असा कसा काय निघून गेलास’ असल्या पोस्ट दिसल्या. च्यायला, ह्याने परत काही घोळ घातला का काय इंदोरवरून परत येउन असा विचार करेपर्यंत RIP यकु असली पोस्ट दिसली आणि हबकलोच. त्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असे हिंदोळे मन घेऊ लागले. मग मिसळपाव.कॉम वर लॉगिन केले आणि त्याच्यावर असलेली एक स्वतंत्र पोस्ट दिसली आणि मग खात्री पटली. फेसबुकबर एक मित्र ऑनलाइन होता. त्याच्याशी बोलणे झाल्यावर त्याच्या आत्महत्येची बातमी कळली. एकदम सुन्न झालो आणि त्याच तंद्रीत झोप लागली (10-11 तास ड्रायव्हिंगचा शिणवटाही त्याला कारणीभूत होता). पण सकाळी उठल्यापासून एक अनामिक पोकळी……

ह्या यकुची आणि माझी ओळख मिसळपाव.कॉम वर झाली. कशी आणि कधी नेमकी झाली तेही आता आठवत नाही. पण झालेली ओळख एकदम पक्की होती, अगदी जन्मज्न्मांतरीची असल्यासारखी. (हे असे बहुदा त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वाँच्याच बाबतीत खरे असावे). अतिशय तरल आणि भावनाप्रधान असलेला यक्कु, जे मनात असेल ते तोंडावर आणणारा. कोणाचीही कसलीही भीड न बाळगता, कसलाही मुलाहिजा न बाळगता त्याची ठाम मते व्यक्त करणारा. तो मला त्याच्या त्या स्वभावामुळेच कदाचित भावला असावा.

त्याची ओळख झाली तीच मुळी आभासी, आंतरजालावरची. त्याचे बरेचसे लिखाण न कळणारे, अतिशय उच्च किंवा सर्वसामान्य माणसांच्या आकलना पलिकडचे असावे तसेच असायचे. सुरुवातीला तो यु. जी. कृष्णमूर्तींवर विलक्षण लिहायचा. पण त्यानंतर हळूहळू त्याचे लिखाण हे एका अज्ञाताची अनामिक ओढ असलेल्या अनुभवांनी भरगच्च होऊ लागले. त्याचे लिखाण बर्‍याच वेळा अगदी भितीदायकही असायचे. भितीदायक अशासाठी की त्यात वापरलेल्या भाषेनी आणि अनुभवांनी घाबरून जायला व्हायचे. अघोरी आणि हठयोगी साधू, नाथपंथी, शाक्तपंथी, महाकाली असले काय काय तो अनुभवायचा आणि त्यावर लिहायचा. त्याला कोsssहम हा प्रशन फार लवकरच पडला असावा. आणि त्यामागे तो आयुष्यभर (?) धावत राहिला, उणीपुरी 26 वर्षे.

त्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या स्नेह्यांना आणि मित्रांना अलिकडे त्याची बरीच काळजी लागून राहिली होती. त्याचे लिखाण आणि त्याचे विचार पार विस्कळीत झाले होते. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे कानावर येत होते. तो इंदोरला नोकरीसाठी असे पर्यंत माझा त्याच्याशी संपर्क होता. मला तो बर्‍याच वेळा निरोप टाकून इंदोरला एक सर्व मित्रांचा कट्टा करू असे सुचवायचा. त्यावेळी फोनवर होणारे त्याचे बोलणे कधीही आक्षेपार्ह वाटले नाही. कदाचित अध्यात्म हा माझ्याही आवडीचा विषय असल्याने मला त्याच्या विचारांचे वावगे वाटायचे नाही. पण त्याने जो अघोरी किंवा नाथपंथीय मार्ग स्विकारला होता तो मला काही पटायचा नाही. त्याविषयावर आमचे बोलणे कधी झाले नाही. त्याला तो विषय काढून उपदेशपर बोलणे केले की आवडायचे नाही, तो ते कळण्यापलीकडे पोहोचला होता. त्यामुळे मीही कधी त्या विषयावर ताणून घरले नाही. एकदा प्रत्यक्ष भेट झाली, पुण्यात, एकदम अनपेक्षित. इंदोरवरून आला होता तो काही कामासाठी पुण्यात. त्या वेळी माझ्या दारुविषयक लिखाणावर चर्चा झाली पुढच्या भेटीत ‘बैठक’ जमवायची, तीही इंदोरला, असा प्लानही झाला. पण आता ते राहिले ते राहिलेच. अलिकडेच तो इंदोरची नोकरी सोडून औरंगाबादला परत आला होता. त्यानंतर त्याचा नविन संपर्कक्रमांक काही मला मिळाला नाही आणि त्याने दिलाही नाही. पण फेसबुकवरून संपर्क होताच पण तो अगदी किरकोळ झाला होता.

रुढ अर्थाने त्याने आत्महत्या केली, पोलिस फाइलीत ‘मानसिक स्थिती बरोबर नसल्याने आत्महत्या’ अशीच नोंद झाली असेल. पण आज दिवसभर जी पोकळी जाणवत होती ती त्याच्या आत्महत्येमुळे नव्हतीच. त्याने केलेली ही आत्महत्या असावी का? की कुठल्यातरी तंद्रीत (कदाचित भांगेच्या तारेत) उत्कट अनुभूतीसाठी त्याच्या हातून घडलेला हा प्रयोग? हे न कळल्यामुळे!

लौकिक अर्थाने त्याने केलेले हे कृत्य आत्महत्या म्हणायला अजूनही मन कचरते आहे कदाचित त्याचे विचार काही अंशी का होइना कळले असल्याने. हे खरंच, बरच स्फोटक विधान आहे, बर्‍याच कॉमन मित्रांचा ह्या विधानावर आक्षेप असेल, कदाचित माझे डोके ठिकाणावर आहे का असाही प्रश्न उभा राहिल. पण आज दिवसभर असलेल्या विमनस्क मन:स्थितीचे कारण हेच असावे बहुदा!

यक्कु! यक्कु!! काय करून गेलास रे बाबा…..

3 thoughts on “यक्कु उर्फ येश्या उर्फ यशवंत कुलकर्णी…

 1. ब्रिजेश,
  यशवंत भाषांतराचेही बरेच काम करायचा. काही काळ माझ्याशी इमेल द्वारे संपर्क होता, पण त्याने असे का करावे हा प्रश्न नक्कीच मनाला खंत लावणारा आहे . श्रदधांजली.

  Like

 2. खरं सांगायचं तर सकाळी हे पोस्ट वाचल्यावर मनापासून शिव्या घालायची इच्छा होत होती. इतके वर्ष नेट वर सोशल साईट्स वर असूनही एकही जिवलग मित्र जोडला गेला नसेल तर या सोशल साईट्स चा काय ्फायदा? मी फेसबुक बंद केलंय, आता ब्लॉग पण बंद करण्याची इच्छा होते आहे. खरंच खूप अपसेट झालोय आज मी.

  Like

 3. यक्कू मिसळपाव वरील एक सवंगडी . पैलतीरावर असल्याने म्हणा की माझ्या दुनियेत मशगुल असल्याने म्हणा सोशल मिडीयावर जिवलग असे मित्र झाले नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.
  पण त्याच्या जाण्याने मी हबकलो.
  कारण त्याचे सच्चे व्यक्तिमत्त्व

  सोकाजी राव तुम्ही आत्महत्या खेरीज जी वेगळी शक्यता मांडली. दिला मी दूरोजा
  देईन
  अश्या घटना घडल्या आहेत.
  पण आजवर कोणालाही सांगितली नाही ती गोष्ट येथे लिहावीशी वाटते.
  केट च्या चुलत भाऊ वय वर्ष १८ त्याकाळी युरोपात नव्याने आलेल्या Scientology ह्या पंथात सामील झाला ( टोम क्रुझ सुद्धा ह्या पंथात आहे )
  ह्यांची तत्वे आचरण करतांना त्याच्यावर हळूहळू परिणाम झाला, त्याला सावल्या त्याच्या मागावर आहेत असे वाटायचे.
  त्यांची मानसिक स्थिती खालावली गेली व शेवटी ताण असह्य न होऊन त्याने गळफास लावला.
  असे यक्कू च्या बाबतीत झाले असेल असे काही नाही.
  पण आता तो गेल्यावर आपल्या हाती आहे त्यांच्या आ

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s