कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)

2012 ह्या सरत्या वर्षातला शेवटचा शुक्रवार! एक कॉकटेल का हक तो बनता है।
एका जबरदस्त कॉकटेलनी ह्या वर्षाची सांगता करुयात.

तर ‘कॉकटेल लाउंज’ मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).

पार्श्वभूमी:

माइ ताइ हे नाव वाचून , “ताइ माइ अक्का विचार करा पक्का” ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय? तर असो, ह्या कॉकटेलची पार्श्वभूमी अगदी चित्तवेधक आहे.

पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत अमेरिकेत, युद्धात शस्त्रसामग्री विकून मिळालेल्या अमाप पैशामुळे, अनेक बदल, स्थित्यंतरे होत होती, सुधारणा होत होत्या. अमेरिकन्स नव्या नव्या कल्पनांच्या भरार्‍या घेऊन नवनिर्माणाचे कार्य मनापासून करीत होते. त्याच काळात अमेरिकेत ‘टिकी संस्कृती’चा (Tiki Culture) प्रभाव पडला होता. त्या प्रभावाखाली रेस्तराँ आणि बार ह्यांची रचना पॅसिफिक महासागराच्या दक्षिणेला असलेल्या पॉलिनेशिआ ह्या द्वीपसमूहांतील रेस्तराँ आणि बारच्या धर्तीवर (Polynesian-themed) केली जाऊ लागली. डॉन बीच (Donn Beach) ह्या त्या टिकी पब्ज आणि बार याचा जनक समजला जातो.


(हे छाचि विकीपिडीयावरून साभार)

पुढे व्हिक्टर ज्यूल्स (Victor Jules Bergeron) ह्या इसमाने त्याच्या ‘ट्रेडर विक्स (Trader Vic’s)’ या टोपणनावाने एक टिकी रेस्तराँ आणि बार सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे चालू केला. हाच व्हिक्टर ज्यूल्स ‘माइ ताइ’ ह्या कॉकटेलचा जनक मानला जातो. पण डॉन बीचने सुरुवातीला हे कॉकटेल हा त्याचाच शोध असल्याचा दावा केला होता. पण त्याची कॉकटेल सामग्री आणि कॉकटेलची चव बरीच वेगळी असल्याने तो दावा पुढे फोल ठरला.

पण मला अजूनही तुमच्या चेहेर्‍यावर असलेले भले थोरले प्रश्नचिन्ह दिसते आहे आणि तो प्रश्नही मला कळतो आहे की, ‘माइ ताइ’ हेच नाव का आणि कसे?

सांगतो! त्याचे काय झाले की व्हिक्टर जुल्सने त्याचा पहिला ट्रेडर विक्स हा रेस्तराँ आणि बार चालू केल्यावर एका दुपारी त्याला त्याचे काही ताहिती मित्र ताहिती आयलंडवरून (पॉलिनेशियामधील एक द्वीप) भेटायला आले होते. त्यांच्यासाठी स्पेशल ड्रिंक म्हणून त्याने, रम आणि कुरास्सो लिक्युअर वर आधारित एक शीघ्ररचित (Improvised) कॉकटेल तयार केले. ते कॉकटेल प्यायल्यावर त्याचा ताहिती मित्र एकदम खूश होऊन ताहितीमध्ये अत्यानंदाने उद्गारला “Maita’i roa ae!“. त्याचा अर्थ ‘Very good! Out of this world!‘ म्हणजेच ‘एकदम फर्मास, कल्पनेपलीकडचे!’. त्याच्या त्या उद्गारांचेच नाव ह्या कॉकटेलला मिळाले, ‘माइ ताइ’.

चला, आता बघूयात ह्या कल्पनेपलीकडच्या कॉकटेलची रेसिपी.

प्रकार रम ऍन्ड कुरास्सो लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
डार्क रम 1.5 औस (45 मिली)
व्हाइट रम 1.5 औस (45 मिली)
क्वांथ्रो (कुरासाओ लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
अमारेतो (आल्मन्ड लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
ग्रेनेडाइन 10 मिली
बर्फ
लिंबचा काप सजावटीसाठी (अननसाचा असल्यास उत्तम)
ग्लास ओल्ड फॅशन्ड ग्लास

कृती:

कॉकटेल शेकर मध्ये अर्धा शेकर भरून बर्फ भरून घ्या. वरील सर्व साहित्य कॉकटेल शेकर मध्ये ओतून घ्या.
शेकरवर बाहेरून बाष्प येईपर्यंत व्यवस्थित शेक करून घ्या.

आता ते मिश्रण ओल्ड फॅशन्ड ग्लासमध्ये ओतून घ्या. माइ ताइ परिपूर्ण करण्यासाठी ह्या मिश्रणावर डार्क रमचा एक थर असणे जरुरी आहे.
बार स्पून वापरून डार्क रमची एक धार त्या मिश्रणावर सोडून द्या.

आता ग्लासवर लिंबाचा एक काप सजावटीसाठी लावून घ्या.

चला तर, कल्पनेपलीकडचे माइ ताइ तयार आहे 🙂

तुम्हा सर्वांना नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नविन वर्षाचे स्वागत ह्या धडाकेबाज कॉकटेलच्या साथीने साजरे करा.

गोंय (गोवा) – पाटणें बीच – २

गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! …….

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर जाग आली ती रिसोर्टमधील झाडांवर गुंजारव करणार्‍या पक्षांच्या किलबिलाटाने. त्या दिवशी धाकट्याचा वाढदिवस होता. मग तो झोपलेला असतानाच त्याच्यासाठी केक आणायला मोठ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो. रिसेप्शनवर केक कुठे मिळेल त्याची चौकशी केली आणि २-३ किमीवर असलेल्या एका गावात मॉंजिनीज आहे असे कळले. आनंदाने तिकडे निघालो. त्या गावात पोहोचल्यावर त्या गावाचे नाव कळले आणि आनंद द्विगुणित झाला. त्या गावाचे नाव होते चावडी. मुलाने त्या गावाचे नाव असलेला रिक्षा स्टॅंड आणि त्याच्याजवळचा झाडाचा पार बघितला आणि तोही अनपेक्षित आनंदाने ओरडला, “बाबा तुमच्या सोकाजीनानांची चावडी! बघा सोकाजीनाना कुठे दिसताहेत का ते!!”. मीही मिशीतल्या मिशीत हसत त्याच्याकडे बघितले कारण त्याच्या त्या आनंदी उद्गारांनी मलाही खूप आनंद झाला होता.

केक घेऊन घरी आलो. मुलगा झोपलेलाच होता. बायकोने त्याच्यासाठी आणलेली गिफ्ट्स त्याच्या डोक्याशी ठेवली होती. त्याला उठवल्यावर, त्याने ती गिफ्ट्स बघितली आणि त्याच्या चेहेर्‍या वरचा त्या वेळेचा आनंद अमूल्य होता. त्याची तयारी झाल्यावर केक कापून कपडे घेऊन किनार्‍याकडे कूच केले.

बीचवरच्या शॅकची कापडी छत्री असलेल्या दोन खुर्च्या पकडून सामान ठेवले. बियरची ऑर्डर सोडली, तोपर्यंत मुलांनी कपडे काढून समुद्राच्या पाण्याकडे धूम ठोकली होती. मीही मग त्यांच्या बाललीला बघत बियरचे घोट घेत घेत, कपडे काढून समुद्राला आलिंगन द्यायला निघालो. रविवार असूनही समुद्रकिनारा बराचसा निर्मनुष्य होता. अगदी मोजकीच माणसे आजूबाजूला होती. अगदी मनसोक्त, कंटाळा येईपर्यंत समुद्राच्या लाटांबरोबर दंगामस्ती केली. मध्येच थोड्या-थोड्या वेळाने खुर्च्यांकडे जाऊन बियरचे सीप घेत उन्हात पडायचे, अंग तापले (उन्हाने) की परत थंडगार आणि निळ्याशार पाण्यात जाऊन डुंबायचे हा क्रम थकवा येईपर्यंत आणि पोटात कावळे ओरडायला लागे पर्यंत चालू होता. मुलांना तर पाण्यातून बाहेरच पडायचे नव्हते. शेवटी त्यांना भुकेची जाणीव होईपर्यंत आणि माझ्या जाणिवा बधिर होईपर्यंत बियर ढोसत, छत्रीखालच्या खुर्चीत आरामात पायावर पाय टाकून, गोव्याचा सगळा सुस्तावा अंगात भरून घेत, बायकोशी गप्पा मारत बसलो. स्वर्गीय सुख म्हणतात ना ते हेच असावे किंबहुना माझी त्या स्वर्गीय सुखाची हीच व्याख्या आहे असे म्हणा ना!

मुलांचे खेळून झाल्यावर त्या शॅकच्या बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेऊन फ्रेश होऊन जेवणाची ऑर्डर द्यायचे बघायला लागलो. त्या शॅकवर ओपन किचन होते आणि समोर मासे ठेवलेले होते. मासा सिलेक्ट करायचा, रेसिपी सांगायची की समोरचा बल्लवाचार्य ती डिश आपल्या टेबलावर हजर करणार असला मामला होता. कसला राजेशाही थाट! बल्लवाचार्याला जेवणाची ऑर्डर दिली आणि वेटरला, थांब म्हणेपर्यंत नॉन-स्टॉप बियर आणत राहायची ऑर्डर दिली (इथून पुढे, परत जाईपर्यंत, बियरची मोजदाद करायचे सोडून दिले). मस्त फिश फ्राय आणि बरेच काही पदार्थ पुढ्यात आले आणि पोटाला तड लागेपर्यंत हादडणी सुरू होती. जेवण झाल्यावर मुले वाळूत खेळायला निघून गेली. शॅकमधली सर्व माणसे जेवून निघून गेली होती; काही सूर्यस्नान करत समोरच्या वाळून पडून होती. शॅकमध्ये मी आणि माझी बायकोच उरलो होतो, अर्थात बियर होतीच साथीला. मग त्या एकांताचा फायदा उठवून (चावट! कसलेही भलते विचार मनात आणू नका) बायकोचा हात हातात घेऊन गुजगोष्टी करत बसलो. बियरने चित्तवृत्ती प्रफुल्ल आणि तरल झाल्या होत्या. बर्‍याच गोष्टी ज्या जनरली आपण बोलत नाही त्या बोलायला त्याने मजा येत होती, एकदम उन्मुक्त होऊन. हीच ती सुरुवातीला म्हटलेली गोव्याची झिंग आणि कैफ.

साधारण 3-4 वाजता रिसॉर्टवर जाऊन सामान ठेवून, थोडा आराम करून परत सूर्यास्ताच्यावेळी बीच वर गेलो. अनवाणी पायांनी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, बायकोच्या हातात हात गुंफून संपूर्ण किनार्‍याचा फेरफटका मारायला सुरुवात केली. एक दोन तास त्या फिरण्यात कसे गेले ते कळलेच नाही. मुलं समजूतदारपणे, शॅकजवळ वाळूत किल्ले आणि त्याच्या भोवताली तटबंदी करण्यात मशगुल होऊन गेली होती. मग गाडी काढली आणि पाळोळें बीच बघायला निघालो.

ह्या बीचवर बर्‍यापैकी गर्दी होती. दुकानांची गर्दीही जास्त होती. तिथल्या बाजारात फेरफटका मारला. मुलांनी काहीबाही खरेदी केली. पाळोळेंचा समुद्रकिनाराही छानच होता पण त्याला पाटणेंची सर नव्हती. कदाचित फार गर्दी असल्यामुळे असेल. अंधार दाटून यायला लागला तसा परत रिसॉर्टवर परत आलो. रात्री रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमधले कॉंटिनेंटल जेवण हादडायचे हे मुलांनी ठरवून ठेवले होते. त्यानुसार ते जेवण मी बियरच्या साथीने आणि मुलांनी व बायकोने मॉकटेल्सच्या साथीनं रिचवून एका आनंदाने आणि तृप्तीने भरलेल्या दिवसाची अखेर केली.

दुसर्‍या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत तोच कार्यक्रम रिपीट केला. त्याच कैफात आणि मस्तीत. माझा एक गोवाप्रेमी मित्र, नचिकेत गद्रेने, कोळवा बीचजवळ ‘फिशरमन्स वार्फ’ नावाचे एक भन्नाट हॉटेल आहे आणि ते ‘मस्ट गो’ आहे असे सांगितले होते. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी दुपारी थोडा आराम करून कोळवा (Colva Beach) बीचकडे प्रयाण केले. कोळवा बीचला पोहोचल्या पोहोचल्या भ्रमनिरास झाला. भयंकर गर्दी आणि अतिशय बकाल बीच. त्यात कुठल्यातरी समाजाचे लोक, कसली तरी सार्वजनिक समुद्र पूजा करण्यासाठी तिथे त्या दिवशी आले होते. त्यामुळे गर्दी आणखीनंच जास्त होती. ह्या बीचवर वॉटरस्पोर्ट्सची रेलचेल असल्याने सगळी गर्दी तिकडे एकवटली होती. माझी मुलं ती गर्दी आणि त्या बीचवरचा पसारा बघून लगेच कंटाळली आणि ‘आपल्या बीच’वर परत जाऊया असा लकडा माझ्यामागे लावला. आपला बीच? जसा काही तो बीच त्यांच्या तीर्थरूपांच्या मालकीचाच होता.

पण मीही वैतागलो होतो आणि फिशरमन्स वार्फ १७-१८ किमी लांब असल्याचे चौकशीअंती कळले होते. त्यामुळे तिथे वेळेत पोहोचण्यासाठी निघावेच लागणार होते. कोळवा बीचवर सूर्यास्त बघून, वार्का मार्गे मोबोर बीचवर असलेल्या फिशरमन्स वार्फकडे निघालो. तिथे जेवून परत पाटणेंकडे प्रयाण केले. (तिथला अनुभव(?) हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, लिहितो नंतर त्याविषयी)

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून परत चावडी गावात गेलो, खरेदीसाठी. ह्यावेळेची माझी महत्वाची खरेदी फक्त फेणीची होती. खरेदी करून, सामान आवरून परत बीचवर गेलो आणि एक शेवटची बियर समुद्राच्या साक्षीने पोटार्पण केली, पाटणेंचा समुद्रकिनारा डोळेभरून पाहून घेतला आणि भरल्या मनाने तिथून त्याचा निरोप घेतला. परतीचा प्रवास काणकोण – मडगाव – पणजी – आंबोली – गडहिंग्लज – आजरा – कोल्हापूर – पुणे असा केला, जडवलेल्या मनानेच. हा रस्ता बेळगाव – गोवा रस्त्यापेक्षा फारच चांगला होता.

पणजीतून बाहेत पडताना मन अगदी भरून आले होते. पण मागच्या ३-४ दिवसात जो आनंद गोव्याने दिला होता तो उराशी बाळगून, आता पुढच्या गोवा भेटीत अरंबोळ ह्या बीचवर सुट्टी घालवायची अशी खूणगाठ बांधून परत आलो आहे.

गोंया, हांव बेगिन परत येतलो!

गोंय (गोवा) – पाटणें बीच – १

गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!

पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स. त्यावेळी तिथूनच गोव्याचा आनंद घेणे चालू झाले होते. त्यावेळच्या भेटीत नुसते बीच बघत सुटणे झाले होते. तशीही पहिलीच ट्रीप असल्याने गोवा नेमकी काय चीज आहे ते कळायचे होते. कळंगुट, अंजुना, दोना पावला, मिरामार असे उत्तर गोव्यातले बीच एका मागोमाग एक फिरत बसलो होतो. त्यामुळे त्यावेळी गोवा बघितला पण अनुभवला नाही. त्यानंतरही बर्‍याच वेळा गोव्याला गेलो पण तेव्हाही गोवा बघितला, अनुभवला नाहीच. काही वर्षांपूर्वी काही मित्र सहकुटुंब गोव्याला गेलो होतो त्यावेळी पूर्ण वेळ कांदोळी बीचजवळ (Candolim beach) राहिलो होतो. त्यावेळी खर्‍या अर्थाने गोवा अनुभवला आणि खर्‍या अर्थाने गोवा कळला…

भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्‍या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्‍यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!

 

ह्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या पार्श्वमूमीवर, ह्या दिवाळीला गोव्याला जायचा प्लान करत होतो तेव्हा लक्षात आले की आतापर्यंत गोवा फक्त उत्तर गोवा आणि ओल्ड गोवा एवढाच बघितला होता. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातले, माझ्या आवडत्या गोंयचे, एक वेगळे रूप अनुभवायचे ठरवले. त्यानुसार मग अनवट बीचचा शोध चालू केला. अनवट अशासाठी की बीच जेवढा लोकप्रिय तेवढा गर्दीने भरलेला हे समीकरण इतक्या वेळच्या गोवा भेटीमुळे उलगडले होते. त्या शोधा-शोधी मध्ये मिळाला पाटणें बीच (Patnem beach). हा बीच इतका की दक्षिणेला आहे तिथून कारवार फक्त ३५-४० कि.मी. वर आहे. गोव्याच्या, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातील काणकोण (Canacona) नावाच्या तालुक्यातल्या प्रसिद्ध पाळोळें बीचजवळ (Palolem beach) असलेला हा पाटणें बीच एक नितांत सुंदर आणि अतिशय शांत बीच.

गूगलवर ह्या बीचचे फोटो बघितल्यावर, ट्रीपऍडवायझर.कॉम वर ह्या बीच जवळची हॉटेल्स शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बर्‍याच हॉटेल्सच्या जोडीने ह्या बीचबद्दल ही देशी – विदेशी लोकांची मते आणि अनुभव (Reviews) वाचायला मिळून ह्या बीचची केलेली निवड किती सार्थ आहे ह्याची खात्री पटली. शेवटी शोध पूर्ण झाल्यावर समुद्र किनार्‍यापासून २०० – २५० मीटर अंतरावर असणारे ‘सी व्ह्यू रिसॉर्ट’ राहण्यासाठी नक्की केले आणि बुकिंग करून टाकले.

आता जायचे कुठल्या मार्गाने हा प्रश्न आला. कारण ह्यापूर्वी गोव्याला जेव्हा जेव्हा जाणे झाले होते ते मुंबईवरून, पनवेल मार्गे कोंकणातून झाले होते. पुण्यावरून जायची ही पहिलीच वेळ. कोल्हापूर वरून बेळगाव मार्गे किंवा गडहिंग्लज – आजरा – आंबोली मार्गे असे दोन मार्ग होते. बरीच फोना-फोनी करून चौकशी केल्यावर कळले की बेळगाव गोवा मार्गावरचा रस्ता ठीक नाहीयेय. गडहिंग्लज – आजरा – आंबोली मध्ये काही काही पॅच खराब आहेत असेही कळले. बरेच कन्फ्युजन झाले की काय करायचे? नेमका निर्णय न झाल्याने किंवा करता न आल्याने शेवटी कोल्हापुराला पोहोचल्यावर बघू काय करायचे ते असे ठरवले.

शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुराला कूच केले. प्रत्येक टोल नाक्यावर राजसाहेबांची आठवण काढत, टोलच्या दिडक्या मोजत मोजत, कोल्हापुराला पोहोचलो. पोहोचे पर्यंत रात्र झाली होती आणि थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. रंकाळ्यापासून गगनबावड्याच्या दिशेनं साधारण ३-४ किमी वर असलेल्या राहुल डिलक्स नावाच्या एका हॉटेलात जाऊन गरमागरम तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पोटभर ओरपून थंडीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.

सकाळी लवकर उठून महालक्ष्मी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे असा बायकोचा फतवा निघाला. देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?” त्यावर त्याला, रांगेत उभे राहायचे नाही मागच्या बाजूने मुखदर्शन घेऊन निघायचे आणि आई देव म्हणून दर्शन घेईल, आपण देवळाची शिल्पकला आणि देवीचे शिल्प यांचे दर्शन घेऊ! असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले (आजच्या ह्या पिढीतील मुलांचे समाधान करता करता नाकी नऊ येतात हो!) आणि दर्शनाला निघालो. मुखदर्शन घेऊन झाल्यावर, आता कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला.

कोल्हापूर गोवा अंतर साधारण २४० किमी आहे असे गुंगाला मॅप दाखवत होता आणि कोल्हापूर बेळगाव हे अंतर ११० किमी. एक्सप्रेस हायवेने बेळगाव पर्यंतचे अंतर सव्वा तासात कापता येणार होते. त्यापुढे १३० साध्या रस्त्याने म्हणजे साधारण ३ तास असा हिशोब करून बेळगाव मार्गे जायचे ठरवले. पण आपण जेव्हा काही ठरवत असतो तेव्हा त्याच वेळेस नियतीही काहीतरी ठरवत असते आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते…

बेळगावाला जायचा एक्सप्रेस हायवे, चतुष्कोण योजनेतला एक हायवे, एकदम भन्नाट आहे. भन्नाट म्हणजे एकदम आऊट ऑफ द वर्ल्ड! आजूबाजूला दुतर्फा पसरलेली शेते, हिरवागार निसर्ग आणि त्यांच्या मधोमध पसरलेला भव्य एक्सप्रेस हायवे, बोले तो एकदम झक्कास! महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरलो आहोत ही जाणीव फक्त कन्नड भाषेतल्या पाट्या आणि मैलाचे दगड यांच्यावरूचच होत होती. प्लान केल्या प्रमाणे सव्वा तासाच्या आतच बेळगावाला पोहोचलो. बेळगावाला पोहोचलो आणि तिथून पुढे नियतीने काय ठरवले त्याची कल्पना यायला सुरुवात झाली. बेळगावातून गोव्याच्या राज्य महामार्गावर पोहोचे पर्यंत रस्ता एकदम गल्लीबोळातून जाणारा. ठीक आहे, हा गावातला रस्ता (पुणेरी माज हो, दुसरे काही नाही) आहे असे म्हणून मन शांत केले आणि मागच्या एका तासाचा भन्नाट ड्रायव्हिंगचा जोष कायम ठेवला. पुढे महामार्गावर लागल्यावर जे काही हाल झाले ते विचारु नका. कर्नाटक सरकाराने बहुतेक ठरवले असावे की कोणीही कन्नड माणसाने गोव्याला जायची हिंमत करू नये. अतिशय भंगार रस्ता. ठिकठिकाणी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशी अवस्था.

पण गंमत म्हणजे ‘गोवा आपले स्वागत करत आहे’ अशा आशयाची पाटी गोव्याच्या सरहद्दीवर दिसली आणि तिथून रस्ता एकदम चांगला, चकाचक, माझी गोव्यातली मैत्रीण, ज्योती कामत, म्हणते तस्सा, हेमामालिनीचे गाल. पुढे फोंड्यामार्गे काणकोणला पोहोचायचे होते. फोंड्यापासून पुढे काणकोणला कसे जायचे तो रस्ता माहिती नव्हता. फोंड्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या उशीरामुळे मोबाइलच्या बॅटरीने नेमकी तेव्हाच मान टाकली आणि गूगल मॅप्स बंद झाले. मग GPS ऐवजी आपले भारतीय ‘JVS – जनता विचारपूस सिस्टिम’ उपयोगात आणून विचारत विचारत मार्गक्रमण सुरू केले. तिथे गोंयकरांचे कोंकणी उच्चार आणि माझे स्पेलिंगप्रमाणे केलेले उच्चार यांची एक जबरदस्त जुगलबंदी होऊन कोंकणी भाषेशी आणखीनं जवळीक निर्माण झाली. एका चौकात आता पुढे कसे जायचे हा प्रश्न आ वासून उभा राहिला असता एक इंग्रजी बोलणारे किरिस्ताव काका देवासारखे धावून आले आणि त्यांच्या गाडीची पाठ धरून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथून पुढे काणकोणचा रस्ता सरळ होता. संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाटणें गावात सी व्ह्यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. चेक इन चे सोपस्कार पार पाडून त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या हॉटेलात खादाडी केली, कोल्हापुराला चापलेल्या मिसळीनंतर जेवण केलेच नव्हते.

रूममध्ये सामान ठेवून झाल्या झाल्या लगेच बीचकडे धाव घेतली. पाटणें समुद्रकिनार्‍याचे हे विलोभनीय दृश्य नजरेला पडले आणि 6-7 तासांच्या भयाण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.

चपला बूट काढून थंड होत चाललेल्या पांढर्‍या शुभ्र वाळूमध्ये अनवाणी पायाने चालण्यातला आनंद घेत, समुद्राचा खारा वारा नाकात भरून घेत, समुद्राच्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत, जवळ जवळ निर्मनुष्य असलेल्या किनार्‍यावर रपेट मारत मारत काळोख पडू दिला. मग थंड वार्‍याला कवेत घेऊन, एका शॅक समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून पोटाला एका थंडगार बियरचे अर्ध्य देऊन, “लाडक्या गोंया, मी आलो आहे! इथून पुढच्या तीन रात्री तुझ्या सोबत असणार आहे”, असे हितगुज मी गोव्याबरोबर करत अजून एका बियरचा फडशा पाडला आणि जड पोटाने रिसॉर्टवर जायला निघालो.

(क्रमशः)

सुरुवातीची काही छायाचित्रे आंतरजालाहून साभार

ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?

मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्‍याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता. एके काळी लष्कराच्या अधिकारात आणि ताब्यात असलेले हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी खुले होऊन त्याचा दैनंदिन जीवनातही वापर प्रभावीपणे सुरू झाला आहे. पण जीपीएस (GPS) म्हणजे नेमके काय? हा प्रश्न पडणे गैरलागू नाही; कारण प्रश्न पडले तरच उत्तरे मिळतात.

तर चला, जीपीएस (GPS) म्हणजे काय ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूयात…

ह्या जीपीएस (GPS) ची मुहूर्तमेढ रशियाने स्पुटनिक हा मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडल्यापासून रोवली गेली. स्पुटनिकमुळे अवकाशाचा अभ्यास, वातावरणाचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा अभ्यास असे अनेक उपयोग त्यावेळी होणार होते. पण अमेरिकेत त्याने गदारोळ उडाला आणि त्यातून पुढे अवकाश युगाच्या स्पर्धेची सुरुवात झाली. अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धामुळे ह्या अवकाशात सोडलेल्या उपग्रहांना एक वेगळेच परिमाण त्यावेळी मिळाले आणि त्यांचा उपयोग लष्करी हेरगिरी करण्याची सुपीक कल्पना अमेरिकन लष्कर अधिकार्‍यांच्या डोक्यात आली. कदाचित रशियाने सोडलेला उपग्रह त्याचसाठी असावा अशी अमेरिकेला भिती वाटत असावी. त्या अनुषंगाने संशोधन झाल्यावर ‘सॅटेलाईट नॅव्हिगेशन’ ह्या तंत्रज्ञानाचा उगम झाला. पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत उपग्रह सोडून, त्यांनी प्रक्षेपित केलेले संदेश ग्रहण करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक स्थान (geo-spatial) ठरविण्यासाठी, शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले ते प्रामुख्याने अमेरिकन लष्करी उपयोगाकरिता. हेच सॅटेलाईट नॅव्हिगेशन ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता जर अखंड पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक क्षेत्राकरिता वापरले गेले तर त्याचे “Global Navigation Satellite System (GNSS)” नामकरण होते. हेच तंत्रज्ञान जीपीएस (GPS) चा पाया आहे.

भूमितीमधील ‘Trilateration’ ह्या संकल्पनेचा प्रत्यक्षात, व्यावहारिक उपयोग (Practical Application) जीपीएस (GPS) मध्ये केला जातो. ह्या भूमितीय संकल्पनेनुसार एखाद्या बिंदूचे स्थान निश्चित करताना त्या बिंदूजवळ असणार्‍या आणखी कमीत कमी तीन बिंदूच्या भोवती वर्तुळ काढून, त्या बिंदूंमध्ये असणारे सापेक्ष अंतर लक्षात घेऊन स्थान निश्चिती करता येते. ह्यालाच Trilateration किंवा त्रिबिंदूभेद (श्रेयअव्हेर: राजेश घासकडवी) असे म्हणतात.

आता हे सर्व वाचल्यावर, काही ओ की ठो न कळल्याने, ‘ओ मेरी प्यारी बिंदू, बिंदू रे बिंदू… मेरी नैया पार लगादे’ हे गाणे म्हणावेसे वाटायला लागले ना. माझेही तसेच झाले होते. ठीक आहे, जरा उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे आपली नैया पार होईल.

समजा तुम्ही एके ठिकाणी उभे आहात आणि तुम्हाला अजिबात कळत नाहीयेय की तुम्ही कुठे आहात. त्यामुळे तुम्ही कोणाला तरी विचारता की बाबा रे हे ठिकाण कोणते. तो म्हणतो की हे ठिकाण मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे. आता आली का पंचाईत, बाजूच्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे हे ठिकाण त्या वर्तुळाच्या परिघावर नेमके कुठे आणि कोणते ते कसे कळणार?

मग तुम्ही दुसर्‍या कोणाला तरी विचारता. तो म्हणतो हे ठिकाण नाशिकपासून 210 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे. त्यानुसार 210 किमी त्रिज्या असलेलं अजून एक वर्तुळ काढूयात. आता जरा जीवात जीव येतोय, बाजूच्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे आता हे ठिकाण ह्या दोन वर्तुळांच्या एकमेकांना छेद देणार्‍या दोन बिंदूंपैकी एक आहे हे कळले.

त्या नंतर तुम्ही तिसर्‍या माणसाला विचारता. तो म्हणतो हे ठिकाण सातार्‍या पासून 105 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे.

त्यानुसार 105 कि.मी. त्रिज्या असलेलं अजुन एक वर्तुळ काढूयात. बस्स, आता ह्या बाजूच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे तिन्ही वर्तुळे छेद जाणारा बिंदू म्हणजे आपल्याला हवे असलेले ठिकाण म्हणजे, पुणे आहे हे निश्चित करता येते. (तसेही त्या माणसांनी दिलेल्या तिरकस उत्तरांवरून चाणाक्ष वाचकांनी हे ठिकाण आधीच ओळखले असणार म्हणा! ) तर हे तीन बिंदू आणि त्यांच्या भोवती काढलेली वर्तुळे हे सर्व भूमितीमधील ‘Trilateration’ संकल्पना.

वर दर्शविलेली ही वर्तुळे सॅटेलाइट्स च्या साहाय्याने अशी खालच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे कॅलक्युलेट केली जातात. हे द्विमीतीय असले तरी प्रत्यक्षात ते कॅल्क्युलेशन त्रिमितीय असते. रिसीव्हर प्रथम एका सॅटेलाईटकडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 150 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 150 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. त्यानंतर तो दुसर्‍या सॅटेलाईट कडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 210 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 210 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. त्यानंतर तिसर्‍या सॅटेलाईट कडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 105 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 105 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. आता ह्या तिन्ही वर्तुळे जिथे एकत्र छेद देतील तिथले अक्षांश आणि रेखांश घेऊन त्याने स्थान निश्चिती केली जाते.

याच संकल्पनेचा उपयोग करुन जीपीएस (GPS) रिसीव्हर आपल्याला मदत करतो. त्यासाठी त्याला दोन गोष्टी माहिती असाव्या लागतात.

1. संदेश प्रक्षेपित करणार्‍या सॅटेलाईटचे अवकाशातील स्थान
2. त्याचे स्वतःचे, संदेश प्रक्षेपित करणार्‍या सॅटेलाईट पर्यंतचे अंतर

आता “याहूSSSS” हे गाणे म्हणावेसे वाटायला लागले ना? थांबा जरा. हे सगळे समजायला सोपे झाले किंवा करून घेतले. पण प्रत्यक्षात ते एवढे सोपे नसते. सॅटेलाईटपासून स्वतःचे अंतर मोजायला रिसीव्हरला प्रत्येक सॅटेलाईटची भ्रमणकक्षा माहिती असावी लागते. त्यांचे भ्रमण कॅलेंडर त्याला स्टोअर करून ठेवायला लागते. सूर्य आणि चंद्र यांच्या आकर्षणामुळे सॅटेलाईटच्या भ्रमणकक्षेत किंचित बदल होऊ शकतो. त्या किंचित बदलामुळे स्थान निश्चिती मध्ये चूक होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून सॅटेलाईटकडून मिळालेल्या संदेशांमधून त्या बदलाची माहिती डीकोड करून त्यानुसार अंतर कॅलक्युलेट केले जाते. त्याशिवाय वेळ ही एक किचकट भानगडही असते. प्रत्येक सॅटेलाईटची वेळ इतर सॅटेलाईट्स बरोबर सिंक्रोनाइज्ड असते, त्यासाठी त्या सर्व सॅटेलाईट्स मध्ये ‘ऍटॉमिक क्लॉक’ वापरलेले असते. पण ते क्लॉक रिसीव्हर मध्ये ठेवणे परवडणारे नसते. पण जर रिसीव्हर सॅटेलाईट्सच्या वेळेबरोबर सिंक्रोनाइज्ड नसेल तर अचूक स्थान निश्चिती करता येणार नाही. त्यासाठी रिसीव्हरमध्ये ‘क्वार्ट्झ क्लॉक’ वापरले जाते. ते प्रत्येक ‘क्लॉक टीक’ बरोबर त्याची वेळ रिसेट करते आणि सॅटेलाईटकडून मिळालेल्या संदेशांमधून मिळालेल्या ‘टाइम वॅल्यु’ वरून रिसीव्हर योग्य वेळ ठरवतो.

हे सगळे अविरत चालू असावे लागते. त्यासाठी बरीच आकडेमोड ह्या रिसीव्हरला करावी लागते. बरेच CPU सायकल्स त्यासाठी खर्च होतात. त्यामुळे मोबाइल मधल्या GPS रिसीव्हरमध्ये AGPS म्हणजे Assisted GPS वापरले जाते. मोबाइलमधल्या मर्यादित मेमरी, बॅटरी आणि गणनशक्तीमुळे ही सगळी आकडेमोड सर्व्हरवर केली जाऊन योग्य ते अक्षांश आणि रेखांश मोबाइलमधल्या रिसीव्हरला परत पाठवले जातात. त्यांचा वापर करून मोबाइलमधले मॅप्स ऍप मॅपवर आपली लोकेशन दाखवते.

आजच्या घडीला ह्या Global Navigation Satellite System आणि Trilateration यांच्या साहाय्याने दोनच यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत.
1. अकेरिकेची GPS यंत्रणा आणि 2. रशियाची GLONASS यंत्रणा

अमेरिकेची GPS यंत्रणा

अमेरिका ह्या यंत्रणेसाठी 24 सॅटेलाईट्स वापरते. कुठल्याही एका वेळी त्यातले तीन सॅटेलाईट्स पृथ्वीच्या कुठल्याही भागावर असतील अशी त्यांची भ्रमणकक्षा ठरवलेली केलेली असते. ही यंत्रणा सुरुवातीला फक्त लष्करासाठीच वापरली जायची, प्रामुख्याने हेरगिरीसाठी. पण तिचा काही भाग सरकारने सार्वजनिक उपयोगासाठी खुला केल्यापासून दैनंदिन जीवनात त्याचा किफायतशीर उपयोग सुरू झाला.

रशियाची GLONASS (Gobalnaya Navigatsionnaya Sputnikovaya Sistema) यंत्रणा

ह्यासाठी रशियानेही 24 सॅटेलाईट्स असलेलीच यंत्रणा उभी केली आहे, अमेरिकेच्या GPS ला उत्तर म्हणून. मध्यंतरी सोव्हियत रशियाच्या पडझडीनंतर ह्या यंत्रणेचे काम ठप्प झाले होते. पण पुतिन यांनी त्यावर लक्ष केंद्रित करून आणि रग्गड पैसा ह्या प्रकल्पाला पुरवून 2011 मध्ये सर्व 24 सॅटेलाईट्स कार्यान्वयित होतील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे 2011 पासून बर्‍याच मोबाइल बनविणार्‍या कंपन्यांनी GPS बरोबर GLONASS सिग्नल्स रिसीव्हींगची क्षमता असलेले रिसीव्हर्स मोबाइलमध्ये अंतर्भूत करायला सुरुवात केली आहे. सॅमसंग नोट, सॅमसंग गॅलॅक्सी 3 आणि आयफोन 5 ह्या फोन मध्ये ही सुविधा पुरवलेली आहे.

युरोपियन युनियनची Galileo यंत्रणा

अमेरिका आणि रशिया यांचे त्यांच्या सार्वजनिक असलेल्या यंत्रणांवर पूर्णं नियंत्रण असल्याने युद्धकाळात किंवा आणीबाणीच्या काळात ते त्यांची सेवा बंद करू शकतात. आणि लष्करी वापरासाठी जबर किंमत मोजूनही युद्धकाळात किंवा आणीबाणीच्या काळात त्यांच्या त्या यंत्रणांवर अवलंबून राहणे ही एक मोठी जोखीम आहे हे युरोप युनियनने ओळखले आणि त्यामुळे त्या यंत्रणांपासून स्वतंत्र अशी ही गॅलिलिओ यंत्रणा उभारण्याचा निर्णय 2003 मध्ये घेतला. 2006 मध्ये चीनही ह्या प्रकल्पात सहभागी झाला. पण बर्‍याच वेळा, वाढत जाणार्‍या खर्चामुळे त्या खर्चाचा भार युनियनमधल्या देशांनी कसा उचलायचा यावरून बरेच गोंधळ झाला आणि अजूनही आहे. एकूण 30 सॅटेलाईट्स असलेली ही यंत्रणा 2019 मध्ये पूर्णपणे कार्यान्वयित होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ह्या यंत्रणेची चार सॅटेलाईट्स त्यांच्या भ्रमणकक्षेत सोडली गेली आहेत.

चीनची कंपास (बैदू 2) यंत्रणा

युरोपियन युनियनच्या कटकटींना वैतागून चीनने त्यांच्या बैदू 1 ह्या स्थानिक यंत्रणेत सुधारणा करून स्वतंत्र ग्लोबल यंत्रणा उभारायचा निर्णय घेतला आणि कंपास हा प्रकल्प हाती घेतला. 35 सॅटेलाईट्सचा वापर ह्या यंत्रणेत केला जाणार आहे. त्यापैकी 10 सॅटेलाईट्सचा लॉंच करून झालेली आहेत. ह्यावरून चीनचा ह्यातला झपाटा दिसून येतो. 2020 पर्यंत सर्व सॅटेलाईट्सचा लॉंच करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची चीनची योजना आहे.

भारताची Indian Regional Navigational Satellite System (IRNSS) यंत्रणा

अभिमानाची बाब अशी की ह्या सर्व दिग्गज देशांच्या पंक्तीत भारत ही असणार आहे. सात सॅटेलाईट्स असलेली ही यंत्रणा फक्त भारत आणि भारतीय उपखंडावर लक्ष केंद्रित करणार आहे. इस्रो च्या पुढाकाराने आकारास येणार्‍या ह्या सरकारी यंत्रणेचा वापर नागरी आणि लष्करी ह्या दोन्ही कामांकरिता केला जाणार आहे. 2014 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वयित करण्याची इस्रोची योजना आहे. ह्या यंत्रणेद्वारे खालील चित्रात दाखविलेला भूभाग सॅटेलाईट्सच्या निरीक्षणाखाली असणार आहे.

आता ग्लोबल पोजिशनिंग म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

चावडीवरच्या गप्पा – बळीराजा आणि रामगिरी

chawadee

चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत.

“आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण्णा नाराजीने.

“अहो घारुअण्णा, पण त्यांनी तसे का केले हे तर समजून घ्यायचा प्रयत्न करा ना!”, बारामतीकर जरा सावध होत.

घारुअण्णा“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.

“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.

“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“का ब्वॉ?”, नारुतात्या.

“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.

भुजबळकाका“आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात व्यवस्थित आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी ह्यांना वेळ द्यावा एवढेच त्यांचे म्हणणे होते.”, भुजबळकाका.

“बरंsss मग पोलिसांशी बाचाबाची करण्याचे काय कारण मग?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, अहो मुख्यमंत्र्यांना म्हणे वेळच नव्हता!”, इति बारामतीकर.

“कुठल्या ‘आदर्श’ कामात गुंतले होते म्हणे आपले माननीय मुख्यमंत्री?”, नारुतात्या.

“पुढे कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे कुठले पितळ आता उघडे करायचे याची चर्चा करत असतील पक्षश्रेष्ठींबरोबर अजून काय!”, बारामतीकर नाराजीने.

“छॅsss ह्या आपल्या बारामतीकरांची दौड आपली इथपर्यंतच…”, घारुअण्णा उपरोधाने.

बारामतीकर
“घारुअण्णा शेतीच्या प्रश्नातले तुम्हाला काय कळते हो?”, बारामतीकर घाव सहन न होऊन.

“व्वा रे व्वा! कोंकणात वाडीत नारळी आणि पोफळीची झाडें आहेंत म्हटले आमची. झालंच तर चार फणस आहेंत.”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

नारुतात्या“अहो घारुअण्णा, त्याला झाडी म्हणतात शेती नव्हे! खी…खी..खी… ”, नारुतात्या पाचकळपणा करत.

“नारुतात्या अहो कसला बाष्कळपणा चालवलाय तुम्ही हा, आहो विषय काय तुमचे चाललेय काय?”, चिंतोपंत जरा तडकून.

“नाहीतर काय, अहो शेतकर्‍यांनी न्याय मार्गाने आपले म्हणणे आणि मागण्या मांडायचा प्रयत्न केला होता.”, भुजबळकाका शांतपणे.

“काय मागण्या होत्या त्यांच्या एवढ्या?”, चिंतोपंत.

“केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान्य उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध रास्त मागण्या होत्या शेतकर्‍यांच्या.”, बारामतीकर.

“त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ न दिल्यामुळे त्यांनी चिडून त्यांच्या निवासस्थानावर कूच करायचे ठरवले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी त्या बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली.”, भुजबळकाका.

“पण पोलिसांनी परिस्थिती धीराने हाताळल्यामुळे लाठीचार्ज टळला आणि भलतेच काही झाले नाही.”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“चला म्हणजे कोणीतरी शहाणपणा दाखवला म्हणायचा!”, नारुतात्या.

“अहो सोकाजीनाना ऐकताय ना, शेतकरी आणि पोलिसांची धक्काबुक्की झालीयेय”, चिंतोपंत.

“हो, ऐकले सगळे! कृषिप्रधान असलेल्या भारत देशात, त्या कृषिप्रधानतेचा पाया असलेल्या बळीराजावर ही वेळ यावी याचेच वैषम्य वाटते आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“हे बरीक खरें हों!”, घारुअण्णा.

सोकाजीनाना“अहो, ज्या जनतेचे नेतृत्व करत आहेत त्या जनतेला देण्यासाठी, जनतेचा सेवक असलेले, मुख्यमंत्री यांना वेळ नसावा, ह्या सारखे दुर्दैव दुसरे कोणते असावे? अडत्यांच्या जाळ्यात अडकलेल्या, अठरा ते वीस-वीस तास लोड शेडिंगच्या तडाख्यात अडकलेल्या, कितीही उत्पादन घेतले तरीही कर्जाच्या विळख्यातच अडकून पिचत असलेल्या आणि ह्या सर्वामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍याने जायचे कोणाकडे? त्याच्या मुख्यमंत्र्याकडेच ना? पण त्यांना त्यासाठीही वेळ असू नये? एकीकडे अतिप्रचंड फायद्यासाठी बिल्डरांच्या गळ्यात गळे घालून लागवडीखालची प्रचंड जमीन लाटायची, त्यासाठी बिल्डरधार्जिणे नियम बनवायचे, ह्यासाठी वेळच वेळच असणार्‍यांना, उरलेल्या जमीनत सचोटीने लागवड करून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या अन्नधान्याची सोय लावणार्‍यासाठी मात्र वेळ नसावा ह्याची खरंच शरम वाटायला हवी.”, सोकाजीनाना गंभीर चेहेर्‍याने.

“असो, झाली घटना काही चांगली झाली नाही! तरीही शेवटी त्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर 30 मिनिटे का होईना पण चर्चेसाठी दिली, जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून, हेही नसे थोडके! जाऊद्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

सुगंधी दिवाळी – गाथा परफ्यूमची

(मिसळपाव दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)

चित्र: आंतरजालाहून साभार

माझ्या लहानपणी मला दिवाळीला, फटाक्यांच्या आकर्षणाबरोबर अत्तराची बाटली हे एक फार मोठे आकर्षण होते. दरवर्षी दिवाळीला वडील एक अत्तराची बाटली आणायचे, बाटली काय म्हणतोय, कुपीच असायची ती एक लहानशी. अभ्यंगस्नान केल्यावर थोडे अत्तर कपड्यावर चोपडून मिळायचे. नंतर त्याच अत्तराचा फाया कानात घालायला मिळायचा. मग नुसता घमघमाट व्ह्यायचा आणि एकदम राजेशाही वाटायचे. त्या काळातला तो चंगळवादच होता. त्यानंतर पुन्हा वर्षभर काही अत्तर स्वतःच्या अंगावर मिरवायला मिळायचे नाही. हा, पण कधीतरी आईबरोबर हळदी कुंकवाला गेले की तळहाताच्या उलट्या बाजूला थोडेसे अत्तर चोपडले जायचे पण त्यात दिवाळीच्या अत्तराची मजा नसायची. कधीतरी गावातल्या अतिश्रीमंतांच्या लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही थोडीफार सुगंधी झुळूक द्यायचा. ह्यापलीकडे कधी अत्तराचा संबंध लहानपणी आला नव्हता.

मोठे झाल्यावर, कॉलेजात जायला लागल्यावर, कॉलेजातल्या श्रीमंत मित्रांकडून डिओ आणि परफ्यूम हे अत्तराचे श्रीमंत अवतार आहेत कळले. ते काही वापरायची ऐपत नव्हती. ते तसले काही घेऊयात का? असे आमच्या पूज्य वडिलांना नुसते म्हटले जरी असते तर दरवर्षी दिवाळीला मिळणारा हक्काचा अत्तराचा फायाही मिळायचा बंद झाला असता. त्यामुळे कॉलेजात असताना डिओ आणि परफ्यूम हे ऐकण्यापलीकडे काही मजल गेली नाही.

चित्र: आंतरजालाहून साभार

पुढे नोकरी लागल्या एक चार्ली नावाची एक सेंटची बाटली घेतली होती. त्या विषयातले ज्ञानही तेव्हा एवढे अगाध होते की डिओ म्हणजे काय, परफ्यूम, सेंट म्हणजे काय ह्यातली काहीही अक्कल नव्हती. काहीतरी छान वास येतो येवढीच काय ती अक्कल. एकदा ऑफिसमधल्या एका मित्राच्या घरी, अंधेरीला, आम्ही काही मित्र पार्टीसाठी मुक्कामी राहिलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या घरूनच ऑफिसला जाणार होतो. सकाळी अंघोळ झाल्यावर त्याच्या ड्रेसिंग टेबलावरच्या कपाटात बघितले तर बर्‍याच रंगेबीरंगी बाटल्या दिसल्या. त्यात एक डिओ असे लिहिलेली बाटली होती. मनात म्हटले “च्यायला चला, मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन” आणि फवारले त्यातले द्रव्य शर्टावर सगळीकडे. तसे करताना त्या मित्राने पाहिले आणि दात काढत म्हणाला,“साल्या, घाटीच आहेस. अरे, डिओ आहे तो परफ्यूम नाही.” मीही दात काढले आणि बळंच हॅ. हॅ.. हॅ… केले. पण तो घाव जिव्हारी लागला होता. मित्राने माप काढले म्हणून नव्हे तर, साला, जे कळत नाही ते करायची हौस दांडगी, ह्या स्वतःच्या वृत्तीमुळे. पण काळाच्या ओघात पुढे ती घटना विसरूनही गेलो.

मुंबईतल्या एका कंपनीत काम करीत असताना एकदा, पहिल्यांदा अमेरिकेत कामानिमित्त जायचा योग आला. तेव्हा त्या कंपनीत आम्हाला एका आठवड्याचे ट्रेनिंग दिले होते अमेरिकेत कसे वागायचे, एक कंसल्टंट म्हणून, ह्याबद्दल. तिथल्या रीतीभाती, खाण्यापिण्यातले आणि दैनंदिन जीवनातले शिष्टाचार ह्यावर सगळा भर होता. त्यावेळी कळले की अमेरिकेत, तिथल्या लोकांची भारतीयांबद्दलची एक तक्रार म्हणजे, ‘इंडियन पीपल स्मेल’. त्यामुळे आम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी जो ‘किट अलावंस’ (प्रवास तयारी भत्ता) दिला होता त्यात कोणती वेगवेगळी डिओ आणि परफ्यूम्स घ्यावी याची यादी दिलेली होती. त्यावेळी मात्र भत्ता कंपनीने दिलेला असल्याने महागडी डिओ आणि परफ्यूम्स घ्यायची इच्छा पूर्ण झाली, इथेही मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन हा मंत्र होताच साथीला. पण अमेरिकेत गेल्यावर ते तसे ट्रेनिंग का दिले गेले होते त्याची परिणती आली.

दुसर्‍यांदा अमेरिकेत गेलो ते एका नवीन कंपनीतून. तोपर्यंत बॉडी शॉपिंगचा धंदा पार फोफावला होता. त्यामुळे पहिल्या कंपनीसारखे काही एटिकेट्स ट्रेनिंग वैगरे देण्याच्या फंदात ही नवीन कंपनी पडत नव्हती. (पण माझा खरा रस होता प्रवास तयारी भत्त्यात, मात्र तो काही ह्यावेळी नव्हता) ह्यावेळी माझ्याबरोबर २-३ दक्षिण भारतीय होते, ज्यांचे आयुष्य ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ह्या उक्तीवर उभे होते. त्यांचा आणि डिओ, परफ्यूम्स वगैरेंचा दूरान्वयेही काही संबंध नव्हता. अमेरिकेत गेल्यावर तिथल्या त्या क्लायंटच्या ऑफिसमधल्या मुली कायम काहीही काम (ऑफिसचेच, बरं का) असले की फक्त माझ्याकडेच यायच्या. नाही हो, मी काही मदनाचा पुतळा वैगरे नाहीयेय, त्यामुळे माझा कसलाही गैरसमज झाला नव्हता. पण त्या दक्षिण भारतीय मित्रांना फार जळजळ व्ह्यायची. मग त्यांना ‘इंडियन पीपल स्मेल’चा फंडा समजावून सांगितला तेव्हा कुठे त्यांच्या जिवात जीव आला. त्यानंतर मग त्यांनीही कुठल्यातरी स्वस्तातल्या ब्रॅन्डचे डिओ घेतलेच एकदाचे पण तरीही त्या ऑफिसमधल्या मुली काही माझ्याकडे यायच्या थांबल्या नाहीत. ‘एकदा कानफाट्या नाव पडले की पडले’ही म्हण इंग्रजीत कशी समजावून सांगायची हे काही केल्या मला जमले नाही; म्हणून मग मीही त्या दाक्षिणात्यांना काही समजावून द्यायच्या भानगडीत पडलो नाही. नाही तरी मलाही आतून खूप खूप बरे वाटायचे हो, त्या मुली माझ्याकडे यायच्या तेव्हा, खोटं कशाला बोला.

चला आता ह्या नांदीनंतर आपल्या परफ्यूमच्या गाथेकडे वळूयात.

परफ्यूमचा इतिहास
प्राचीन काळी, त्यावेळच्या पूजाअर्चनेच्यावेळी, काही खास वनस्पती किंवा काही खास झाडांच्या खोडाच्या साली जाळून सुवासिक धूर केला जायचा. रोमन संस्कृतीत (ख्रिस्तपूर्व) पॅगन लोकं देवाची पूजाअर्चना करताना हा सुवासिक धूर वापरीत. त्यांच्या मते देवाकडे जाण्याचा मार्ग ह्या ‘धूरा पासून’ सुरू होतो. लॅटिन भाषेत ‘per fumum’ म्हणजे ‘धूरा पासून’ किंवा इंग्रजीत ‘from smoke’. त्याचेच पुढे काळाच्या ओघातले आधुनिक रूप म्हणजे ह्या सुगंधाला आजचे पडलेले नाव, परफ्यूम. त्यामुळे आजच्या काळात वापरला जाणारा ‘परफ्यूम’ हा शब्द आलेला आहे, लॅटिन भाषेतून, ‘धूरा पासून’.

चित्र: आंतरजालाहून साभार

परफ्यूमच्या सुवासिक इतिहासात डोकावले असता, परफ्यूमचा वापर हा इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीपासून असल्याचे ह्या विषयातील संशोधक आणि जाणकारांचे मत आहे. ह्या ऐतिहासिक खोलात जर जायचा प्रयत्न केला तर तो इतिहास आपल्याला पार इजिप्त पर्यंत घेऊन जातो. मध्यपूर्वेत इजिप्तजवळ उत्खननात इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीच्या काही कबरींचा शोध लागला आणि त्या कबरींमध्ये काही कुप्या मिळाल्या. त्या कुप्या ह्या सुगंधी द्रव्यांच्या असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून इजिप्तमध्ये त्या काळाच्या संस्कृतीत सुगंधी द्रव्यांचा फार वापर केला जात होता ह्याचा शोध लागला. पण त्या कबरींमध्ये ह्या कुपी काय करीत होत्या? तर त्या रहस्याची पुराणवस्तुशास्त्रज्ञांनी केलेली उकल अशी की मृतात्म्याचा स्वर्गात जातानाचा प्रवास हा सुवासिक असावा अशी त्या काळी धारणा होती. आहे की नाही हा परफ्यूमच्या इतिहास त्याच्या नावाप्रमाणेच एकदम आल्हाददायक.

परफ्यूम कसे तयार होते?

चित्र: आंतरजालाहून साभार

परफ्यूम कसे बनवतात हे कळले आणि मी आनंदाने बेहोषच झालो. कारण ते बनविण्याची पद्धत ही माझ्या अतिशय आवडीची आहे, अगदी ‘गाळीव’. परफ्यूम तयार करण्याच्या पद्धतीत डिस्टिलेशन (Distillation) ही प्रक्रिया वापरली जाते. जेव्हा ही डिस्टिलेशन पद्धत वापरली जाते हे कळले तेव्हाच ह्या परफ्यूमची गाथा लिहायची हे मनाशी नक्की केले. परफ्यूम तयार करण्यातली पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणे. परफ्यूम बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती (Herbs) आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव (उदा. कस्तुरी मृग) हा गोळा करून त्याचा साठा केला जातो. हा कच्चा माल मिळवला की मग त्यांपासून सुवास वेगळा करणे ही महत्वाची पायरी असते. हा सुवास वेगळा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या प्रकारानुसार ह्यातली एक पद्धत सुवास वेगळा करण्यासाठी वापरली जाते.

उर्ध्वपातनाने अर्क काढणे (डिस्टिलेशन): ह्यात कच्चा माल एका भट्टीत (Still) मध्ये टाकून त्याला उकळवले जाते, हे उकळवण्यासाठी गरम वाफही वापरली जाते. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे (तेल) बाष्प तयार होते. हे बाष्प मग एका नळीवाटे जाऊ देऊन त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रव पदार्थात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल (Concentrated Oil)

द्रावकात विरघळविणे: पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठ्या फिरत्या भांड्यात कच्चा माल टाकून तो घुसळवला जातो आणि तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळतो आणि एक मेणचट पदार्थ मागे उरतो. त्याला मग इथिल अल्कोहोलमध्ये मिसळवले जाते. मग त्या मिश्रणाला गरम केले जाते. त्या उष्णतेने त्यातले अल्कोहोल उडून जाते आणि मग मागे उरते सुगंधी तेल (Concentrated Oil).

दाब देणे: ह्या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढले जाते.

आता इथून पुढे, शास्त्र आणि कला यांचा खरी जुगलबंदी चालू होते. ही वेगवेगळी सुगंधी तेलं ठराविक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, त्यांचा मिलाफ (Blend) केला जातो. हा मिलाफ करणारा किमयागारच (रासायनिक) असावा लागतो. फारच नैपुण्याचे काम असते हे. म्हणून हा मिलाफ करण्याच्या ह्या शास्त्राला, कलेचीही जोड असावी लागते असे म्हटले जाते. आता ह्यात कसली कला आलेय? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. सांगतो! आपण जे फिनिश्ड गुड म्हणजे तयार माल असलेले परफ्यूम वापरतो त्याचे, 3 थर असतात. त्या प्रत्येक थराला नोट (Note) असे म्हणतात.

टॉप नोट: परफ्यूम फवारल्या फवारल्या जो गंध दरवळतो तो टॉप नोट असतो.
सेंट्रल किंवा हार्ट नोट: परफ्यूम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो तो हार्ट नोट असतो.
बेस नोट: परफ्यूम फवारल्यानंतर कित्येक तास दरवळणारा जो गंध असतो तो बेस नोट असतो.

मग आता सांगा, हे सगळे त्या ब्लेंड केलेल्या परफ्यूम जमवून आणायचे म्हणजे कलाकारीच आहे की नाही?

त्यानंतरची पायरी म्हणजे मुरवणे (Aging). ह्या ब्लेन्ड करून मुरवलेल्या सुगंधी तेलांना मग मुरवले जाते. त्याचा कालावधी काही महिने ते काही वर्षे इतका असू शकतो. ह्या ब्लेन्ड केलेल्या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिक्स केले जाऊन त्याची घनता कमी केली जाते. ह्या अल्कोहोल मिश्रीत परफ्यूममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात.

परफ्यूमचा प्रकार सुगंधी तेलाचे प्रमाण टिकण्याचा कालावधी
Perfume ५ ते ३० % ६ ते ७ तास
Eau de Perfume or EDP ८ ते १५ % ५ ते ७ तास
Eau de Toilette or EDT ४ ते ८ % ४ ते ६ तास
Eau de Cologne ३ ते ५ % २ ते ३ तास

परफ्यूमच्या सुगंधाचे प्रकार कोणते?

ह्या परफ्यूमचे सध्याच्या आधुनिक काळात वर्गीकरण साधारण पाच ढोबळ प्रकारात केले जाते.

फ्लोरल नोट्स: गुलाब, जाई, चमेली, कार्नेशन इत्यादी विविध फुलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
ओरिएंटल नोट्स: प्राण्यांच्या सुवासिक अवयवांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांना फळांच्या आणि फुलांच्या सुगंधी तेलांबरोबर ब्लेंड करून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
वुड नोट्स: चंदन, देवनार यांसारख्या झाडांच्या खोडापासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
फ्रेश नोट्स: सायट्रस (लिंबू, संत्री, मोसंबी) चवीच्या फळं आणि फुले यांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
Fougère नोट्स: फ्रेंच भाषेत Fern (नेचे सदृश वनस्पती) ला Fougère म्हणतात. ह्या नेचे सदृश वनस्पतींपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.

हे ढोबळ आणि मूलभूत वर्गीकरण झाले, ह्यांच्या उपप्रकारांत असंख्य प्रकारचे फ्लेवर्स असलेली परफ्यूम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचे प्रकार दर्शवण्यासाठी खालील फ्रेग्नन्स चक्र वापरले जाते.

फ्रेग्नन्स चक्राचे चित्र विकीपीडियावरून साभार

परफ्यूम आणि डिओडरंट मध्ये फरक काय?
डिओडरंट्सचा (Deodorant) वापर घर्मस्त्राव (Perspiration) रोखण्यासाठी केला जातो. घामामध्ये असलेल्या जिवाणूंमुळे घामाला एक दुर्गंध येत असतो. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दुर्गंधापासून मुक्ती मिळवून देण्याचे कार्य हे डिओडरंट्स करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर हे डिओडरंट्स फवारायचे असतात. बरेच डिओडरंट्स हे सुगंधरहित सुद्धा असतात. त्यांचे काम एकच घर्मस्त्राव रोखणे.
परफ्यूम्समध्ये घर्मस्त्राव रोखण्याचे काही असले काही गुणधर्म नसतात. त्यात फक्त सुगंधच (Fragrance) असतो. त्याचे कार्य फक्त आणि फक्त एकच, सुगंध देऊन शरीराला सुवास देणे.

परफ्यूम कसे वापराल?
परफ्यूम फवारल्यावर त्यातले सुगंधी कण हळूहळू उडून जातात. ते उडून जाताना त्यांच्या नोट्स प्रमाणे गंध दरवळत राहतो. जास्त काळ ह्या परफ्यूमचा गंध दरवळत ठेवायचा असेल तर ते परफ्यूम कसे वापरायचा ह्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. सर्वात आधी तुमच्या आवडीचा परफ्यूम निवडून घ्या. बरेच परफ्यूम्स वापरल्यानंतर तुम्हाला नेमका शोभणारा (सूट होणारा) परफ्यूम ठरवता येईल. आता परफ्यूम निवडून झाला असेल तर मग तो लावण्यापूर्वी छानपैकी अंघोळ करून घ्या. तुमच्या परफ्यूमच्या सुगंधाच्या जवळ जाणारा सुगंध असलेल्या साबणाने अंघोळ केल्यास उत्तम. उदाहरणार्थ जर तुम्हाला फ्रेश नोट्सचे परफ्यूम्स आवडत असतील तर सिंथॉल लाईम वापरल्यास त्याच्या शरीरावर रेंगाळणार्‍या गंधाबरोबर त्याची जोडी त्या परफ्यूमबरोबर जमून जाईल अगदी.

आता हा परफ्यूम चोपडण्याच्या काही विशेष जागा आहेत तेथे तो लावल्यास त्याचा परिणाम फार काळ टिकून राहतो. आपल्या शरीरावर जिथे नाडीचे ठोके पडतात त्या जागा हा परफ्यूम फवारण्यास अती उत्तम म्हणजे हाताचे मनगट, हाताच्या कोपराची आतली बाजू, छाती (स्त्रियांसाठी ही जागा अतिशय उत्तम! ह्यात कसलीही अश्लीलता नाहीयेय. कसलेही भलते विचार मनात आणू नका). शिवाय मान आणि कानाच्या पाळीच्या मागची बाजू ह्या जागा तर खास महत्त्वाच्या. का ते विचारा? जेव्हा जोडीदाराला आपण कवेत घेतो तेव्हा नाकाच्या सर्वात जवळ असणारे शरीराचे भाग हेच असतात. त्यामुळे तिथून येणार्‍या सुगंधाने जोडीदाराला कवेत घेण्याच्या उन्मादाला आणखीनंच बहर येतो. साधारण जिथे जिथे हे परफ्यूम फवारले आहे ती जागा अंगावरच्या कपड्यांनी झाकली जाईल अशी काळजी घेतल्यास त्या परफ्यूमचा परिणाम जास्त काळ राहू शकतो. परफ्यूममधले उडून जाणारे सुगंधी कण कपड्यामुळे हवेत विरून जायला वेळ लागतो आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो.

चला तर मग, ह्या वर्षीची दीपावली तुमच्यासाठी अतिशय सुगंधी आणि सुवासिक अशी असो, ही शुभेच्छा व्यक्त करत ही परफ्यूमची गाथा इथे सुफळ संपूर्ण करतो.

गजरा – एक प्रवास

(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)

लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर ‘गजरा’ नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे. पण प्रत्यक्ष बघितल्यावर बहुतकरून तो पांढर्‍या रंगाचा असतो हे बघून थोडा हिरमोडच झाला होता.

त्यानंतर गजर्‍याशी तसा काही प्रत्यक्ष संबंध कधी आलाच नाही. पण पुढे मिलिंद बोकिलांच्या शाळा ह्या कादंबरीचा नायक, मुकुंद जोशी, ह्याच्या वयाचे झाल्यावर, मुकुंदाप्रमाणेच, त्या पौगंडावस्थेतील वयात मित्रांबरोबर आपापली शिरोडकर शोधताना ह्या गजर्‍याशी अप्रत्यक्ष संबंध आला. त्या वयात वाचायला मिळू शकणार्यार आणि त्या वयात झेपू शकणाऱ्या कादंबर्‍यांमधून (आमच्या गावातील सार्वजनिक वाचनालयातील लायब्ररीयन, आचार्यकाकू, यांचा बारीक डोळा असायचा आम्ही कुठली पुस्तके वाचतो ह्यावर. एकदा काकोडकर चोरून वाचताना त्यांनी मला पकडले आणि अशी काही हजामत सर्वांदेखत केली की तोंड दाखवायला जागा नव्हती उरली काही दिवस. तेवढे कमी नव्हते म्हणून की काय कोण जाणे, वडिलांनाही “मुलगा मोठा झाला बरं का!” असं सांगितलं, त्यामुळे घरी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लाय तो अजूनही लक्षात आहे) नायिकांची जी काही शृंगारिक वर्णने वाचली होती त्यात नेहमी मोहक हालचाल करणारे घाटदार नितंब, त्यावर घोळणारा लांबसडक केसांचा, एका वेणीचा शेपटा आणि त्यावर माळलेला गजरा हा हटकून असायचाच. त्यामुळे त्या मोहमयी दिवसांमध्ये मग नेहमी एक वेणी आणि त्यावर गजरा माळणारी आपली शिरोडकर शोधताना खूप मजा यायची. एक वेणी आणि गजरा हे सौंदर्याचे परिमाण ठरून गेले होते. पण त्या पौगंडावस्थेतील वयाच्या नशिबात शिरोडकर काही विधात्याने लिहून ठेवलेली नव्हती, त्यामुळे गजर्‍याचा आणि माझा संबंध काही पुढे सरकला नाही.

कॉलेजात गेल्यावर, नुकतीच फुटलेली मिसरूड साफ करून जरा आधुनिक विचारांचे आणि प्रगल्भ झालो असे वाटू लागल्याने गजरा घालणे म्हणजे अगदीच डाऊनमार्केट, ‘काकूबाई’छाप मुली गजरा घालतात असा समज मनात घट्ट रुतून बसला होता. त्यामुळे गजर्‍यापासून अजूनही दुरावला गेलो. पण आता कॉलेजातल्या लायब्ररीमध्ये आचार्यकाकू लायब्ररीयन नव्हत्या त्यामुळे तिथल्या लायब्ररीत आणि आता शाळकरी नसल्याने आचार्यकाकूंचा तेवढा वचकही राहिला नसल्याने, गावातल्या लायब्ररीत, काकोडकरांच्या जरा ‘वरच्या’ लेव्हलची पुस्तके वाचायला मिळू लागली. त्यावेळी अचानक गजर्‍याचा अजून एक महत्त्वाचा पैलू पुढे आला. ह्यावेळी तो स्त्रीचे नितंब आणि त्यावरची वेणी ह्यावर विराजमान न होता चक्क पुरुषाच्या मनगटावर लगडलेला होता. माडी चढण्यासाठी तोंड रंगवणार्‍या तांबूल सेवनाबरोबरच ह्या श्वेतवर्णी गजर्‍याचे असणे, हे किती अनिवार्य आहे ह्याची जाण आली. पण पुढे त्या भलत्याच आळीचा रस्ता सभ्य माणसे धरत नाहीत असे कळले. समाजामध्ये अभिमानाने म्हणजे ताठ मानेने जगण्याकरता आणि मिरवण्याकरता स्वतःला सभ्य म्हणवून घेणे किंवा तसे चित्र निर्माण करणे ही फारच अत्यावश्यक बाब आहे हे सत्यही तितक्याच प्रकर्षाने कळले असल्याने त्या भलत्याच आळीचा रस्ता पकडणेही कधी जमले नाही. हाय रे कर्मा, त्या तसल्या प्रकारेही माझा गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध येणे घडले नाही.

शाळेतही शिरोडकर काही भेटली नाही आणि कॉलेजातही. त्यासाठी नशिबाची साथ फार जोराची असावी लागते असे म्हणतात. पण मला खरं विचाराल तर नशीब वगैरे काही नसते, त्यासाठी एक धमक अंगात असावी लागते. तसली धमक काही माझ्या अंगात नव्हती. त्यामुळे मग नशीब वगैरे असले काहीबाही कारण शोधावे लागते, आपली दुर्बलता झाकण्यासाठी, दुसरे काही नाही. त्यामुळे मग लग्न करतेवेळी, मुलगी बघून, सर्वांच्या संमतीने यथासांग ‘अरेंज्ड मॅरेज’ अशा प्रकाराने झाले. लग्नानंतर माझ्या काही खास आणि हौशी मित्रांनी मधुचंद्रासाठी माझी बेडरूम सजवण्याचे काम अतिशय प्रेमाने अंगावर घेऊन ते तडीला नेले. संपूर्ण खोली रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजवली होती. बेडवरही फुले पसरून ठेवली होती. बेडच्या बाजूच्या टेबलावर गजरे ठेवलेले होते. ते गजरे बघताक्षणीच गजर्‍याबद्दलच्या आतापर्यंतच्या सर्व आठवणी जाग्या होऊन शेवटी गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध आला बुवा एकदाचा ह्या जाणीवेने एकदम सुखावून गेलो. मधुचंद्राची रात्र, जिवाभावाच्या मित्रांनी प्रेमाने सजवलेली बेडरूम, गजरे आणि सोबत सुंदर अशी नवी नवरी, अहाहा, स्वर्ग असाच असावा कदाचित असा विचार मनात आला. आनंदाने आणि काहीश्या धडधडत्या छातीने बेडवर पडलो आणि गजरा हातात घेऊन तो तिच्या केसात माळण्यापूर्वी तिला माझी गजरा कहाणी सांगत होतो. बेडवर पडल्यानंतर साधारण ३-४ मिनिटाने एक विचित्र जाणीव होऊन सर्व अंगाला खाज येऊ लागली, काही कळेचना असे काय होतेय ते. मग उठून बघितल्यावर कळले की एक गडबड झाली होती. बेडरूमची खिडकी उघडी राहिली होती. मित्र रूम सजविण्याच्या नादात खिडकी बंद करायला विसरले होते. त्या खिडकीतून त्या फुलांच्या वासाने बरीच वेगवेगळ्या प्रकारची बारीक, नजरेला सहज न दिसणारी, चिलटं त्या बेडवर पसरलेल्या फुलांवर आणि बेडवरच्या फुलांच्या माळांवर येऊन बसली होती. मग ती सर्व बेडवरची फुले आणि बेडला लावलेल्या सर्व फुलांच्या माळा काढल्या आणि बेडवरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवून बेडरूमच्या कोपर्‍यात ती बेडशीट टाकून दिली. त्या सर्व प्रकारानंतर त्या गजऱ्यांचाही धसका घेऊन ते गजरेही मग त्याच बेडशीटवर टाकून दिले. ऐन मधुचंद्राच्या उन्मादक रात्रीही गजर्‍याचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध येता येता राहिला. त्यानंतर काही परत माझा आणि गजर्‍याचा संबंध आला नाही.

आता अलीकडेच कामानिमित्त म्हणजे नवीन नोकरीकरता चेन्नैत मद्रासी अण्णा होऊन राहावे लागतेय. आमच्या कंपनीची दोन ऑफिसेस चेन्नै शहराच्या उत्तर – दक्षिण टोकाला आहेत. एक थेट शहराच्या मध्यवर्ती भागात, हेड ऑफिस आणि दुसरे तिथून १५-२० किमी अंतरावर शहराच्या बाहेर दुसर्‍या टोकाला. मला ह्या दोन्ही ऑफिसेसमध्ये ये-जा करावी लागते. चेन्नैत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदी छान आहे. शहराचे सर्व भाग बस मार्गाने व्यवस्थित जोडलेले आहेत. त्या बस सेवाही मस्त आहेत. सुपर डिलक्स, डिलक्स आणि आम बस असे तीन प्रकारच्या बसेस शहरात धावतात. आम बस ही व्हाईट बस असते म्हणजे पांढर्‍या रंगाची पाटी असलेली असते आणि ती सर्व स्थानकांवर थांबते आणि हिचे तिकीट भाडे अतिशय कमी म्हणजे स्वस्त असते. ह्या प्रकाराव्यतिरिक्त ए.सी. बसेसही असतात. चेन्नैतल्या भयंकर उकाड्यात ह्या ए.सी. बसेस म्हणजे अगदी स्वर्ग असतात. माझ्या ऑफिसच्या मार्गांवर ह्या ए.सी. बसेस धावत असल्याने मी नेहमी ह्याच बसने प्रवास करतो. सर्व प्रकारच्या बसमध्ये त्यांच्या भाड्याप्रमाणे गर्दी आणि प्रवास करणारी जनता असते.

हो हो कळतंय, अचानक मी एकदम असल्या रूक्ष विषयात कसा काय घुसलो असे वाटायला लागले ना तुम्हाला? नाही हो! विषयांतर नाही करत आहे. कळेलच तुम्हाला, ट्रस्ट मी.

तर एकदा सिंगापुरावरून काही सीनियर मंडळी भारतात एका मीटिंगकरिता आली होती. मला त्या मीटिंगला हजर राहायचे होते. त्यासाठी मी बस स्टॉपवर उभा होतो बसची वाट बघत. त्या दिवशी नेमका काही तरी घोटाळा झाला होता. ए.सी. बस काही केल्या वेळेत येत नव्हत्या. मीटिंगला वेळेवर पोहोचणे गरजेचे होते. पहिल्यांदाच वरिष्ठांची ओळख वाढवायची संधी प्राप्त झाली होती. त्यामुळे जास्त वाट बघत वेळ घालविणे परवडणार नाही, काय करावे, टॅक्सीने जावे का असा विचार करत होतो. तेवढ्यात 29C ही एक व्हाईट बस स्टॉपवर आली. रिकामी होती म्हणजे बसायला जागा नव्हती पण उभे राहायला व्यवस्थित जागा होती. लगेचच चढलो बस मध्ये….

पुढच्याच स्टॉपवर बस मध्ये हीsss गर्दी झाली. पहिल्यांदाच व्हाईट बसमध्ये चढलो होतो. त्यामुळे ती बस सर्व स्टॉपवर थांबत थांबत ही गर्दी अशी वाढतच जाणार हे काही लक्षात आले नाही आणि पुढे सरकत सरकत (की ढकलला जात जात?) बसच्या मधल्या भागात आलो. आता बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती तरीही बस स्टॉपवर थांबत होती आणि लोकं बसमध्ये शिरतच होती. माझी अवस्था काही विचारू नका. मुंबैच्या लोकलमध्ये जशी अवस्था होते नेमकी तशीच अवस्था बसमध्ये झाली होती माझी. उभं राहायला देखील धड जागा नव्हती. जर लिओ टॉलस्टॉयने ह्या बसने प्रवास केला असता तर त्याने त्याची ‘माणसाला किती जागा लागते’ ही कथा लिहिली नसती असाही एक विचार त्यावेळी मनात येऊन गेला. आजूबाजूला ‘एक्स डिओडरंट’ची किंबहुना कुठल्याच डिओडरंटची जाहिरात नेमकी कशाची असते हे अजूनही न कळलेले समग्र चेन्नैकर दर स्टॉपगणिक माझ्या जीवाची घालमेल वाढवीत होते. घामाच्या त्या आंबट वासाने जीव गुदमरून जात होता. त्यातच एक काका उतरायचे म्हणून सीटवरून उठले आणि नेमके माझ्या पुढेच, नाकासमोरच, वरच्या दांड्याला हात पकडून उभे राहिले आणि मला ब्रह्मांड आठवले. नाकातले केस पार जळून गेले, जगण्याची आसक्तीच नाहीशी झाली. किती दिवस आंघोळ केली नव्हती काय माहिती. उलटीची एक प्रबळ इच्छा उचंबळून यायला लागली. अहो, हसताय काय? हसताय तुम्ही, जीव जायची पाळी आली होती माझी. पण लगेच स्टॉप आला आणि ते काका उतरून गेले, बरेच लोक त्या स्टॉपवर उतरून गेले पण तेवढेच पुन्हा चढले.

आता बसमध्ये उभं राहून ह्या घामाच्या आंबट वासात प्रवास करणे शक्य नाही, पुढच्या स्टॉपवर उतरून टॅक्सीने जाऊयात असा विचार करत होतो तोच एक चमत्कार झाला. एक धुंद सुवास नाकात शिरला. इतका वेळ डोळे उघडायची हिंमत नसल्याने डोळे बंद करूनच उभा होतो. भास झाला असेल असा विचार करून तसाच उभा राहिलो. पण परत तोच मंद आणि धुंद सुवास नाकात शिरला. डोळे उघडून समोर बघतो तोच एक मद्रदेशी भगिनी, केसांची एक वेणी असलेली आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा माळलेली, पाठमोरी उभी होती. गजराही चक्क भरघोस होता. त्यांतून येणारा तो सुगंध मला ह्या जगात पुन्हा परत आणत होता. त्याक्षणी मला माझा गजरा अप्रत्यक्षरित्या का होईना पण एकदाचा भेटला होता. माझा स्टॉप यायला अवकाश होता. ती मद्रदेशी भगिनी माझा स्टॉप येईपर्यंत उतरून न जाता तशीच माझ्यापुढे उभी राहो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करत होतो. त्यानेही ती ऐकली आणि देव आहे ह्याचीही जाणीव करून दिली. त्या मोगर्‍याच्या दरवळणार्‍या मंद आणि धुंद सुगंधापुढे जगातली सर्व परफ्यूम्स (अगदी मेड इन फ्रांस), कोलोन्स, डिओ वगैरे अगदी तुच्छ वाटते होती. त्या नैसर्गिक सुगंधामुळे सगळे मानवनिर्मित कृत्रिम सुगंध खुजे वाटावेत इतका तो मोगर्‍याचा सुवास ताजातवाना होता आणि माझी जगण्याची आसक्ती पुन्हा मार्गावर आणत होता.

आतापर्यंतचा माझा गजरा प्रवास आणि शोध असा अचानक पूर्ण होईल अशी स्वप्नातदेखील कधी कल्पना केली नव्हती. पण ‘देर आये दुरूस्त आये’ असे काहीसे म्हणतात त्याप्रमाणेच झाले खरे. तर आता ह्या दिवाळीला दर दिवशी एक असे वेगवेगळे गजरे बायकोसाठी आणून तिला ते माळायला लावून त्या नैसर्गिक सुगंधात दिवाळी साजरी करायची अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधली आहे.

चावडीवरील गप्पा – सचित्र झलक

नमस्कार मंडळी! चावडीवरच्या गप्पांची मैफल आवडते ना? चावडीवरील सर्व वल्ली आहेतच एकदम नग, एकापेक्षा एक. आजपर्यंत त्यांच्या गप्पा जशा तुम्ही ऐकल्यात तशा त्या, माझी मिसळपाव.कॉम वरील मैत्रिण पूजा पवार हिनेही ऐकल्या आणि ती सोकाजीनानांची फॅन झाली. त्यांच्या चहाची चाहत तिला एकदम भावली. तिने मिसळपाव च्या दिवाळी अंकात ह्या सर्व मंडळींची एक फर्मास चर्चा ‘हौन जाउ दे’ असा आदेश दिला. (हो, ती आदेशच देते!) त्याला मिसळपाव वरील अजुन एक कलाकार मित्र, अभिजीत देशपांडे ह्याने दुजोरा देत ही फर्मास चर्चा सचित्र करुयात असा प्रस्ताव मांडला आणि ह्या वल्लींना दृश्य रुप द्यायचा विडा उचलला.

त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडीवरील सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार आणि अभिजित देशपांडे या दोघांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा
हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका
हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर
हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची ‘साहेबांच्या’ प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर ‘साहेबांचे’ बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा ‘टग्या’दादांवर अतिशय राग आहे, त्या ‘टग्या’दादांमुळे  ‘साहेबांची’ प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या
हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी ‘बेंबट्या’ होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत
हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोकाजीनाना
तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी
अस्मादिक
सर्वात शेवटी अस्मादिक 🙂