गोंय (गोवा) – पाटणें बीच – १


गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!

पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स. त्यावेळी तिथूनच गोव्याचा आनंद घेणे चालू झाले होते. त्यावेळच्या भेटीत नुसते बीच बघत सुटणे झाले होते. तशीही पहिलीच ट्रीप असल्याने गोवा नेमकी काय चीज आहे ते कळायचे होते. कळंगुट, अंजुना, दोना पावला, मिरामार असे उत्तर गोव्यातले बीच एका मागोमाग एक फिरत बसलो होतो. त्यामुळे त्यावेळी गोवा बघितला पण अनुभवला नाही. त्यानंतरही बर्‍याच वेळा गोव्याला गेलो पण तेव्हाही गोवा बघितला, अनुभवला नाहीच. काही वर्षांपूर्वी काही मित्र सहकुटुंब गोव्याला गेलो होतो त्यावेळी पूर्ण वेळ कांदोळी बीचजवळ (Candolim beach) राहिलो होतो. त्यावेळी खर्‍या अर्थाने गोवा अनुभवला आणि खर्‍या अर्थाने गोवा कळला…

भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्‍या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्‍यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!

 

ह्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या पार्श्वमूमीवर, ह्या दिवाळीला गोव्याला जायचा प्लान करत होतो तेव्हा लक्षात आले की आतापर्यंत गोवा फक्त उत्तर गोवा आणि ओल्ड गोवा एवढाच बघितला होता. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातले, माझ्या आवडत्या गोंयचे, एक वेगळे रूप अनुभवायचे ठरवले. त्यानुसार मग अनवट बीचचा शोध चालू केला. अनवट अशासाठी की बीच जेवढा लोकप्रिय तेवढा गर्दीने भरलेला हे समीकरण इतक्या वेळच्या गोवा भेटीमुळे उलगडले होते. त्या शोधा-शोधी मध्ये मिळाला पाटणें बीच (Patnem beach). हा बीच इतका की दक्षिणेला आहे तिथून कारवार फक्त ३५-४० कि.मी. वर आहे. गोव्याच्या, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातील काणकोण (Canacona) नावाच्या तालुक्यातल्या प्रसिद्ध पाळोळें बीचजवळ (Palolem beach) असलेला हा पाटणें बीच एक नितांत सुंदर आणि अतिशय शांत बीच.

गूगलवर ह्या बीचचे फोटो बघितल्यावर, ट्रीपऍडवायझर.कॉम वर ह्या बीच जवळची हॉटेल्स शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बर्‍याच हॉटेल्सच्या जोडीने ह्या बीचबद्दल ही देशी – विदेशी लोकांची मते आणि अनुभव (Reviews) वाचायला मिळून ह्या बीचची केलेली निवड किती सार्थ आहे ह्याची खात्री पटली. शेवटी शोध पूर्ण झाल्यावर समुद्र किनार्‍यापासून २०० – २५० मीटर अंतरावर असणारे ‘सी व्ह्यू रिसॉर्ट’ राहण्यासाठी नक्की केले आणि बुकिंग करून टाकले.

आता जायचे कुठल्या मार्गाने हा प्रश्न आला. कारण ह्यापूर्वी गोव्याला जेव्हा जेव्हा जाणे झाले होते ते मुंबईवरून, पनवेल मार्गे कोंकणातून झाले होते. पुण्यावरून जायची ही पहिलीच वेळ. कोल्हापूर वरून बेळगाव मार्गे किंवा गडहिंग्लज – आजरा – आंबोली मार्गे असे दोन मार्ग होते. बरीच फोना-फोनी करून चौकशी केल्यावर कळले की बेळगाव गोवा मार्गावरचा रस्ता ठीक नाहीयेय. गडहिंग्लज – आजरा – आंबोली मध्ये काही काही पॅच खराब आहेत असेही कळले. बरेच कन्फ्युजन झाले की काय करायचे? नेमका निर्णय न झाल्याने किंवा करता न आल्याने शेवटी कोल्हापुराला पोहोचल्यावर बघू काय करायचे ते असे ठरवले.

शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुराला कूच केले. प्रत्येक टोल नाक्यावर राजसाहेबांची आठवण काढत, टोलच्या दिडक्या मोजत मोजत, कोल्हापुराला पोहोचलो. पोहोचे पर्यंत रात्र झाली होती आणि थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. रंकाळ्यापासून गगनबावड्याच्या दिशेनं साधारण ३-४ किमी वर असलेल्या राहुल डिलक्स नावाच्या एका हॉटेलात जाऊन गरमागरम तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पोटभर ओरपून थंडीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.

सकाळी लवकर उठून महालक्ष्मी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे असा बायकोचा फतवा निघाला. देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?” त्यावर त्याला, रांगेत उभे राहायचे नाही मागच्या बाजूने मुखदर्शन घेऊन निघायचे आणि आई देव म्हणून दर्शन घेईल, आपण देवळाची शिल्पकला आणि देवीचे शिल्प यांचे दर्शन घेऊ! असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले (आजच्या ह्या पिढीतील मुलांचे समाधान करता करता नाकी नऊ येतात हो!) आणि दर्शनाला निघालो. मुखदर्शन घेऊन झाल्यावर, आता कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला.

कोल्हापूर गोवा अंतर साधारण २४० किमी आहे असे गुंगाला मॅप दाखवत होता आणि कोल्हापूर बेळगाव हे अंतर ११० किमी. एक्सप्रेस हायवेने बेळगाव पर्यंतचे अंतर सव्वा तासात कापता येणार होते. त्यापुढे १३० साध्या रस्त्याने म्हणजे साधारण ३ तास असा हिशोब करून बेळगाव मार्गे जायचे ठरवले. पण आपण जेव्हा काही ठरवत असतो तेव्हा त्याच वेळेस नियतीही काहीतरी ठरवत असते आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते…

बेळगावाला जायचा एक्सप्रेस हायवे, चतुष्कोण योजनेतला एक हायवे, एकदम भन्नाट आहे. भन्नाट म्हणजे एकदम आऊट ऑफ द वर्ल्ड! आजूबाजूला दुतर्फा पसरलेली शेते, हिरवागार निसर्ग आणि त्यांच्या मधोमध पसरलेला भव्य एक्सप्रेस हायवे, बोले तो एकदम झक्कास! महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरलो आहोत ही जाणीव फक्त कन्नड भाषेतल्या पाट्या आणि मैलाचे दगड यांच्यावरूचच होत होती. प्लान केल्या प्रमाणे सव्वा तासाच्या आतच बेळगावाला पोहोचलो. बेळगावाला पोहोचलो आणि तिथून पुढे नियतीने काय ठरवले त्याची कल्पना यायला सुरुवात झाली. बेळगावातून गोव्याच्या राज्य महामार्गावर पोहोचे पर्यंत रस्ता एकदम गल्लीबोळातून जाणारा. ठीक आहे, हा गावातला रस्ता (पुणेरी माज हो, दुसरे काही नाही) आहे असे म्हणून मन शांत केले आणि मागच्या एका तासाचा भन्नाट ड्रायव्हिंगचा जोष कायम ठेवला. पुढे महामार्गावर लागल्यावर जे काही हाल झाले ते विचारु नका. कर्नाटक सरकाराने बहुतेक ठरवले असावे की कोणीही कन्नड माणसाने गोव्याला जायची हिंमत करू नये. अतिशय भंगार रस्ता. ठिकठिकाणी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशी अवस्था.

पण गंमत म्हणजे ‘गोवा आपले स्वागत करत आहे’ अशा आशयाची पाटी गोव्याच्या सरहद्दीवर दिसली आणि तिथून रस्ता एकदम चांगला, चकाचक, माझी गोव्यातली मैत्रीण, ज्योती कामत, म्हणते तस्सा, हेमामालिनीचे गाल. पुढे फोंड्यामार्गे काणकोणला पोहोचायचे होते. फोंड्यापासून पुढे काणकोणला कसे जायचे तो रस्ता माहिती नव्हता. फोंड्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या उशीरामुळे मोबाइलच्या बॅटरीने नेमकी तेव्हाच मान टाकली आणि गूगल मॅप्स बंद झाले. मग GPS ऐवजी आपले भारतीय ‘JVS – जनता विचारपूस सिस्टिम’ उपयोगात आणून विचारत विचारत मार्गक्रमण सुरू केले. तिथे गोंयकरांचे कोंकणी उच्चार आणि माझे स्पेलिंगप्रमाणे केलेले उच्चार यांची एक जबरदस्त जुगलबंदी होऊन कोंकणी भाषेशी आणखीनं जवळीक निर्माण झाली. एका चौकात आता पुढे कसे जायचे हा प्रश्न आ वासून उभा राहिला असता एक इंग्रजी बोलणारे किरिस्ताव काका देवासारखे धावून आले आणि त्यांच्या गाडीची पाठ धरून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथून पुढे काणकोणचा रस्ता सरळ होता. संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाटणें गावात सी व्ह्यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. चेक इन चे सोपस्कार पार पाडून त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या हॉटेलात खादाडी केली, कोल्हापुराला चापलेल्या मिसळीनंतर जेवण केलेच नव्हते.

रूममध्ये सामान ठेवून झाल्या झाल्या लगेच बीचकडे धाव घेतली. पाटणें समुद्रकिनार्‍याचे हे विलोभनीय दृश्य नजरेला पडले आणि 6-7 तासांच्या भयाण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.

चपला बूट काढून थंड होत चाललेल्या पांढर्‍या शुभ्र वाळूमध्ये अनवाणी पायाने चालण्यातला आनंद घेत, समुद्राचा खारा वारा नाकात भरून घेत, समुद्राच्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत, जवळ जवळ निर्मनुष्य असलेल्या किनार्‍यावर रपेट मारत मारत काळोख पडू दिला. मग थंड वार्‍याला कवेत घेऊन, एका शॅक समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून पोटाला एका थंडगार बियरचे अर्ध्य देऊन, “लाडक्या गोंया, मी आलो आहे! इथून पुढच्या तीन रात्री तुझ्या सोबत असणार आहे”, असे हितगुज मी गोव्याबरोबर करत अजून एका बियरचा फडशा पाडला आणि जड पोटाने रिसॉर्टवर जायला निघालो.

(क्रमशः)

सुरुवातीची काही छायाचित्रे आंतरजालाहून साभार

4 thoughts on “गोंय (गोवा) – पाटणें बीच – १

Leave a reply to आल्हाद alias Alhad उत्तर रद्द करा.