3D प्रिंटींग – म्हणजे काय रे भाऊ?

मागे एकदा एका मेल मधून 3D प्रिंटींगच्या व्हिडियोची एक मेल आली होती. ती बघितल्यावर काहीतरी गीमीक असावे म्हणून तिकडे लक्ष दिले नव्हते. पण परवा ही बातमी वाचली आणि हबकलोच. त्यावेळी तो व्हिडियो बघून त्या 3D प्रिंटींगला सीरियसली न घेतल्याबद्दल मन खाऊ लागले आणि 3D प्रिंटींगबद्दल ज्ञान वाढविण्यासाठी त्याची माहिती घेणे चालू केले. चला तर बघूयात काय आहे हे 3D प्रिंटींग…

3D प्रिंटींग असे वाचून, प्रिंटींग म्हणजे काहीतरी कागदावर छापणे असे असल्याने, ते 3D कसे काय असू शकेल? असा प्रश्न पडून थोडी दिशाभूल होते, माझीही झाली होती पण ह्या 3D प्रिंटींगचा थेट प्रिंटींगशी काही संबंध नाही. डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनियरिंग ड्रॉइंग यांच्या युतीतून तयार होणार्‍या ‘डिजीटल मॉडेलिंग’ ह्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्या आधाराने वापरण्यायोग्य वस्तू तयार करणे म्हणजे 3D प्रिंटींग.

चित्र: आंतरजालाहून साभार

इंजिनियरिंग बॅकग्राऊंड असलेल्यांना हे डिजीटल मॉडेलिंग लगेच कळेल. पण ज्यांना इंजिनियरिंगचा बॅकग्राऊंड नाहीयेय त्यांच्यासाठी एकदम डिजीटल मॉडेलिंग कडे वळण्याआधी जरा आपण मूलभूत संकल्पना समजावून घेऊयात. इंजिनियरिंग ड्रॉइंग किंवा मशीन ड्रॉइंग ह्या विषयात ‘आयसोमेट्रीक ड्रॉइंग’ हा एक प्रकार असतो, ह्यात मशीनचे वेगवेगळे भाग बनविण्यासाठी त्यांची मॉडेल्स कशी उभी करायची हा महत्त्वाचा भाग असतो. मशीनचा एखादा भाग त्रिमितीय अवस्थेत कसा दिसेल ते काढण्याची पद्धत ह्या प्रकारात समजावलेली असते. बाजूच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे इंजिनियर तो मशीनचा भाग, वरून बघितल्यावर कसा दिसेल (Top View), डाव्या व उजव्या बाजूने कसा दिसेल (Side View) आणि समोरून कसा दिसेल (Front View) हे ठरवून त्याची ड्रॉइंग्स बनवतो मग आयसोमेट्रीक ड्रॉइंग ह्या पद्धतीने त्याचे त्रिमितीय स्वरूप कसे असेल त्याचे त्रिमितीय ड्रॉइंग तयार केले जाते. ह्या त्रिमितीय मॉडेलला मध्येच कापले तर ते कसे दिसेल ह्याच्या ड्रॉइंगला ‘सेक्शनल व्ह्यू’ म्हणतात, बाजूच्या चित्रात तिरक्या रेषांनी दाखविलेला भाग का सेक्शनल व्ह्यू आहे.

हे सर्व ड्रॉइंगचे काम संगणक युगाच्या आधि मेकॅनिकल ड्राफ्ट्स्मन कागदावर हाताने करायचे, टी स्क्वेअर वापरून. पण संगणक युगाच्या झपाट्यात CAD (Computer Aided Design) सोफ़्टवेयर वापरून हे डिझाइनचे काम केले जाते. हे CAD वापरून केलेली ड्रॉइंग्स मग CAM (Computer Aided Manufacturing) ह्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी मशीन्स वापरून ते मशीनचे भाग बनवले जातात. त्यामुळे CAD आणि CAM ह्या तंत्रज्ञानाने बनविलेल्या वस्तू बनविण्यात फारच अचूकता साधता येते. तर, ह्याच CAD आणि CAM चा वापर करून डिझाइन्स किंवा मॉडेल्स बनविणे म्हणजे ‘डिजीटल मॉडेलिंग’.

च्यायला प्रिंटींग.प्रिंटींग.. म्हणत हा, किचकट अभियांत्रिकी मध्ये का बुवा घुसला असे वाटायला लागून बोअर झाले ना? थांबा किचकट भाग संपला, आता जरा कमी किचकट असलेली माहिती अजूनही सोपी करून सांगतो. (असे म्हणायला काय जाते? 😉 )

तर आता मूळ 3D प्रिंटींग कडे परत वळूयात. पण त्यासाठी परत आपल्याला पारंपरिक मॅन्युफॅक्चरिंगची पद्धत बघावी लागेल. ह्या पद्धतीला Subtractive Process (स्तर-अवर्धीतकरण) म्हणतात. आता हे समजावून सांगण्यासाठी चित्राची गरज अनिवार्य आहे. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ह्या पद्धतीत मूळ मटेरियलचा नको असलेला भाग काढून आपल्याला हवी असलेली वस्तू बनविली जाते. अगदी आपल्या बारा बलुतेदारांपासून ते आधुनिक यांत्रिक पद्धतीने वस्तू ह्या Subtractive Process ने बनविल्या जातात.

चित्र: आंतरजालाहून साभार

बरं मग? त्याचा इथे काय संबंध? सांगतो सांगतो… तुम्हाला प्रश्न फारच पडतात ब्वॉ. तर हे 3D प्रिंटींगने बनणार्‍या वस्तू ह्या पारंपरिक Subtractive Process चा वापर करून बनत नाहीत. त्यासाठी नेमकी उलटी पद्धत वापरली जाते ती म्हणजे Additive Process (स्तर-वर्धीतकरण). बाजूच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे टॉवर ऑफ हनोई चा हा पॅगोडा, वेगवगळे लाकडी आकाराचे थर एकावर एक रचून बनला आहे. तो ज्या पद्धतीने बनला आहे ती पद्धत म्हणजेच Additive Process.

चित्र: आंतरजालाहून साभार

बाजूच्या आकृतीत एका 3D प्रिंटरचे काप्लनिक मॉडेल आहे. ह्या प्रिंटरला एक लेजर गन असते जी ही Additive Process वापरून, वस्तू, थरावर थर चढवून तयार करते. वेगवेगळी ड्रॉइंग्स आधि CAD आणि CAM च्या साहाय्याने बनवली जातात व ती 3D प्रिंटरला पुरवली जातात. मग 3D प्रिंटर त्या ड्रॉइंग्सच्या आधारे लहानात लहान थर बनवतो आणि ते एकमेकांवर रचनात्मक चढवत वस्तू बनली जाते. ह्या कामी वर सांगितलेली ‘सेक्शनल व्ह्यू’ची ड्रॉइंग्स, थर चढवताना अचूकता आणण्याची महत्त्वाची कामगिरी बजावतात. सूक्ष्मातले सूक्ष्म बारकावे ह्या ‘सेक्शनल व्ह्यू’ची ड्रॉइंग्स मधून 3D प्रिंटरला मिळतात आणि तो त्या प्रमाणे वस्तू बनवतो.

मघापासून 3D प्रिंटरचे वस्तू बनवतो… वस्तू बनवतो… असे मी सांगतो आहे, पण ती वस्तू बनते कशाने? प्रिंटर जरी असला तरीही कागदावर प्रिंटींग ह्या 3D प्रिंटींगमध्ये नसते असेही मी म्हणालो, मग ही वस्तू नेमकी बनते कशी? तर त्यासाठी पावडर स्वरूपातला कच्चा माल असतो. (खूश होऊ नका गालाला लावायची पावडर नाहीयेय ही). वेगवेगळ्या पॉलिमर्स किंवा पॉलीस्टायरीनच्या पावडर असतात ह्या. ज्या फोटो पॉलिमर प्रकारात मोडतात. म्हणजे प्रकाशाच्या साहाय्याने त्यांच्या भौतिक गुणधर्मात बदल होतात. 3D प्रिंटरमधली लेजर गन जेव्हा ह्या फोटो पॉलिमर वर लेजर बीम सोडते तेव्हा पावडर स्थितीतून त्याचे रूपांतर घनस्थितीत होते आणि वस्तू तयार होते.

हा व्हिडिओ बघितल्यावर हे 3D प्रिंटींग म्हणजे काय त्याची कल्पना येईल.

सर्व तांत्रिक क्लिष्टता आणि परिभाषा यांच्या तपशिलात जायचे टाळून 3D प्रिंटींग म्हणजे काय तेच फक्त समजवण्याचा उद्देश होता त्यामुळे बरेच तांत्रिक तपशील लेखात वगळले आहेत.

तर आता 3D प्रिंटींग म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

क्यू. आर. कोड – म्हणजे काय रे भाऊ ?

मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि “बघू…”, असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अ‍ॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा ‘वेब – चेक इन’ केलेला बोर्डिंग पास दिसू लागला. ते बघून त्याचे डोळे आणि तोंडाचा ‘आ’ एवढा मोठा झाला की त्याला बसलेला आश्चर्याचा धक्का स्पष्ट दिसत होता. पुन्हा एकदा मुलाला, त्याचा बाप ‘टेकसॅव्ही’ असल्याची, प्रचिती देता आल्यामुळे जरा बरे वाटून कॉलर टाइट झाली. मग त्याला त्या क्यू.आर. कोडची माहिती देणे भाग होते. चला तर मग! बघूयात ही क्यू.आर. कोड काय भानगड आहे ते…

क्यू.आर. हा ‘क्विक रिस्पॉन्स’ ह्या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. जो कोड क्विक रिस्पॉन्स देतो तो क्यू.आर. कोड. पण क्विक रीस्पॉन्स कशासाठी? कोणाला? कसला? हे प्रश्न पडले ना! बरोबर आहे, ते कळण्यासाठी थोडे भूतकाळात जाणे आवश्यक आहे. अमेरिकेत जेव्हा विसाव्या शतकाच्या मध्यात, फूड चेन्स आणि रिटेल ह्या क्षेत्रात, जेव्हा ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ह्या डोमेनने व्यवस्थित बस्तान बसवलेले नव्हते तेव्हा, वस्तूंचे वर्गीकृत केलेली माहिती आणि तिचे नोंदणीकरण ह्यासाठी आधुनिक अशा तंत्रज्ञानाची निकड भासू लागली. त्यानुसार ‘युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (UPC)’ ह्या एका सांकेतिक नोंदणीकरणाचा शोध लागला. पण आता पुढे ते नोंदणीकरण यांत्रिक पद्धतीने पटकन, वेगाने वाचता येईल ह्या दृष्टीने संशोधन होण्याची गरज निर्माण झाली.

चित्र: विकीपीडियावरून साभार

त्यासाठी अमेरिकेतील वेगवेळगळ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संशोधन करू लागले. त्यात एक होता, नॉर्मन वुडलॅंड, Drexel Institute of Technology मधला विद्यार्थी. त्याने अल्ट्राव्हायोलेट शाई वापरून एक पद्धत विकसित केली पण ती भयंकर महाग होती आणि व्यापारी दृष्टिकोनातून फायदेशीर नव्हती. पुढे विद्यापीठातून घरी आल्यावरही त्याच्या डोक्यात तोच किडा वळवळत होता आणि त्याने त्याचे प्रयोग चालूच ठेवले होते. एके दिवशी, समुद्रकिनारी बसला असताना, वाळूत बोटाने रेघोट्या ओढताना अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्याला एकदम मोर्स कोड आठवला.

त्याने त्या वाळूत मोर्स कोडाचे डॅश आणि डॉट्स उभे खाली खेचले तर हवी असलेली सांकेतिक भाषा तयार होऊ शकते असे त्याच्या लक्षात आले. आणि तिथेच बार कोडाचा शोध लागला. (मला नक्की खात्री आहे तो त्यावेळी समुद्रकिनारी, थंडगार बियर रिचवत असणार आणि त्या बियरच्या अंमलाखाली त्याचा हात त्या मोर्स कोडच्या डॅश आणि डॉट्सवरून खाली घसरला असणार. उगा कोण कशाला समुद्रकिनारी जाऊन वाळूत नुसतेच डॅश आणि डॉट्स काढून त्यांना लांबवत बसेल.)

चित्र: आंतरजालाहून साभार

ह्या बारकोडमध्ये अक्षर आणि आकड्यांसाठी ठराविक जाडीची एक लांब दांडी ठरलेली असते. त्या दांड्यांची जाडी आणि त्यांच्यामधले अंतर ह्यावरून त्यातल्या माहितीचे आकलन केले जाते. त्यासाठी ऑप्टिकल रीडर म्हणजेच बार कोड रीडरचा वापर केला जाऊ लागला. आज आपण सगळ्याच सुपरमार्ट मध्ये ह्या बार कोडाचा सुळसुळाट बघतो आहोत.

तर, ह्या बारकोडमध्ये लपलेली सांकेतिक माहिती ही एकमितीय असते, म्हणजे डावीकडून उजवीकडे अशी, आपण ज्या पद्धतीने वाचन करतो, त्याच प्रमाणे साठवलेली असते. पुढे बारकोडची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर त्याचा जसजसा वापर वाढू लागला तसतसा त्या बारकोड मधून मांडता येऊ शकणारी माहिती मर्यादित असल्याची जाणीव होऊ लागली.  उजवीकडून डावीकडे असे एकमितीय बार कोडचे बार असल्याने माहिती जेवढी अधिक तेवढी ह्या बार कोडची लांबी बाढू लागली. त्यामुळे बार कोडच्या वापरावर मर्यादा येऊ लागल्या आणि अधिक माहिती कोड मध्ये कमीत कमी जागेत बसवण्याची निकड भासू लागली, खास करून ऑटोमोबाइल क्षेत्रात ह्या बारकोडचा वापर वाढला तसा. गरज ही शोधाची जननी असतेच. त्यात जपान्यांच्या गरजेची भूक दुसर्‍या महायुद्धानंतर प्रचंड वखवखलेली होती. औद्यिगिक झपाटा, कामाचे यांत्रिकीकरण, ऑटोमेशन आणि त्या जोडीला उत्पादित वस्तूंचा दर्जा याने जपान झपाटून गेला होता.

चित्र: माझ्या ब्लॉगचा क्यू आर कोड

त्या गरजेनुसार, जपानमध्ये टोयोटा कंपनीच्या देंसो ह्या एका उपकंपनीमध्ये अधिक माहिती कमी जागेत सांकेतिक करण्याच्या संशोधनात क्यू.आर. कोडाचा शोध 1994 मध्ये लागला. 1D, एकमितीय असलेल्या बारकोडच्या पुढे जाऊन ‘मॅट्रिक्स बारकोड’ म्हणजेच 2D, द्विमितीय, असलेला हा बारकोड म्हणजेच क्यू.आर. कोड.
फक्त डावीकडून उजवीकडे एवढीच माहिती आत्तापर्यंत सांकेतिक करण्याची असलेली क्षमता, आता त्या डाव्या आणि उजव्या यांच्या जोडीला वर आणि खाली अशी वाढवून द्विमितीय करून टाकतो. ह्याचा काय फायदा? तर फायदा असा की आता जास्त माहिती कमी जागेत सांकेतिक करता येते. फक्त आकडे जर असतील तर 7089 आकडे ह्या आणि फक्त अक्षरे असतील 4,296 एवढी अक्षरे ह्या क्यू.आर. कोडमध्ये साठवता येतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे आकडे आणि A–Z (upper-case only), space, $, %, *, +, -, ., /, : ही अक्षरे वापरून क्यू.आर. कोड मध्ये माहितीचे सांकेतीकरण केले जाते.

मोठ्या प्रमाणात वस्तू साठवून ठेवताना त्यांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या ह्या क्यू.आर.कोडाची उपयुक्तता त्यापलीकडे पोहोचली ती सोशल नेटवर्किंगचा मार्केटिंग साठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यावर. त्याचप्रमाणे स्मार्ट फोन्स आणि 3G इंटरनेटचा त्या स्मार्ट फोन्स वर केला जाणारा वापर हा ह्या क्यू.आर.कोडच्या लोकप्रियतेसाठी आणि प्रसारासाठी मोठ्याप्रमावर कारणीभूत ठरला. एखादी इव्हेंट एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून आखली की त्याचे आमंत्रण देण्यासाठी ह्या थोडेसे हटके डिझाइन असलेल्या क्यू.आर.कोडाचा वापर करून वेब साईटची लिंक देणे हे ‘इन थिंग’ झाले आहे. सध्या वर्तमानपत्रातूनही ह्या क्यू.आर. कोडाचा सुळसुळाट झाला आहे जाहिरातींमध्ये, वाचकाला डायरेक्ट वेब साईटवर नेण्यासाठी.

सरकारी दरबारी सुद्धा ह्या क्यू.आर.कोडाचा दबदबा आहे बरं का. आपल्या भारत सरकारच्या ‘आधार कार्ड’ ह्या योजने अंतर्गत देण्यात येणार्‍या कार्डावरही, सर्व माहिती ह्या क्यू.आर.कोडामध्ये साठवून, तो, त्या कार्डावर प्रिंट केलेला असतो. जपानच्या पासपोर्ट स्टॅपिंगच्या वेळीही पासपोर्टवरच्या वर्क परमिटवर हा क्यू.आर.कोड होता. (त्यावेळी त्याबद्दल काहीही माहिती नसल्याने, असेल जपान्यांचा काहीतरी तांत्रिक तर्कटपणा म्हणून तिकडे दुर्लक्ष केले होते.)

त्याचबरोबर स्मार्टफोन्स मध्ये कॉन्टॅक्ट्सची देवाण घेवाण करण्यासाठीही ह्या क्यू.आर.कोडचा वापर आता प्रभावीपणे केला जाऊ लागला आहे.

QR Droid

पण बारकोडपेक्षा ह्याच्या लोकप्रियतेचे कारण काय, कमी जागेत जास्त माहिती सांकेतिक करता येणे ह्या पलीकडे?

1. बारकोड साठी महागडा ऑप्टिकल रीडर लागतो जो ह्या क्यू.आर.कोड साठी लागत नाही. स्मार्ट मोबाइलमध्ये असणारा साधा कॅमेरा हा रीडर म्हणून वापरला जातो. कॅमेर्‍याने घेतलेल्या फोटोला वाचून त्या क्यू.आर.कोडामध्ये सांकेतिक केलेली माहिती वाचली जाते.
2. स्मार्ट फोनच्या सगळ्याच, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर, जसे की अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस, विंडोज, वेगवेगळी उदंड अ‍ॅप्स आहेत क्यू.आर.कोड रीडर म्हणून (चकटफू). माझे स्वतःचे आवडते अ‍ॅप म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईडचे क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid).
3. सर्वसामान्य माणूसही ही अ‍ॅप वापरून स्वत:चा क्यू.आर.कोड अगदी काही सेकंदात बनवू शकतो.

चित्र: आंतरजालाहून साभार

ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या क्यू.आर. कोडची मांडणी असते. आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याचा फॉरमॅट आणि वाचण्याची दिशा ठरवली जाते, कॅमेर्‍याने घेतलेला फोटो डीकोड करताना.

व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3,व्हर्जन 4, व्हर्जन 10 आणि व्हर्जन 40 अशी वेगवेगळी वर्जन्स आहेत ह्या कोडाची. माहिती सांकेतिक करण्याची पद्धत आणि पर्यायाने ह्या कोडच्या डिझाइनचा पॅटर्न ह्या व्हर्जन प्रमाणे बदलतो.

तर आता क्यू.आर.कोड म्हणजे काय, ते कळले का रे भाऊ?

ब्लॉग माझा 2012 : चलचित्रफीत

एबीपी माझा ह्या TV वाहीनीद्वारे नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. अशोक पानवलकर, संपादक – महाराष्ट्र टाइम्स, दीपक पवार, संचालक – मराठी अभ्यास केंद्र, इरावती कर्णिक, लेखिका व नाटककार हे ह्या स्पर्धेचे परिक्षक होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. जवळपास 160 ब्लॉगर्सनी त्यांचे ब्लॉग्स स्पर्धेसाठी पाठविले होते.

या स्पर्धेत माझ्या ह्या ब्लॉगला पुरस्कार मिळाला आहे. तुम्हा सर्व वाचकांमुळेच हे शक्य झाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाची ही चलचित्रफीत:

ब्लॉग माझा ह्या स्पर्धेचा कौतुक सोहळा

ब्लॉग माझा 2012 ह्या स्पर्धेचा कौतुक सोहळा उद्द्या, रविवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३०वा. एबीपी माझा ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

30 मिनीटांच्या ह्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग 27 जानेवारीला झाले होते. दिपक पवार ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सर्व विजेत्यांचे त्यांच्या ब्लॉगबद्दलचे व्यक्त केलेले मनोगत ह्या कार्यक्रमातून दाखविले जाणार आहे.

मला स्वत:ला हा कार्यक्रम दूरदर्शनवर बघता येणार नाहीयेय (चेन्नैत असल्याने). याच दिवशी abpmajha.in या वेबसाईटवर हा एपिसोड अपलोडही केला जाईल.

कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे ब्लु गोवन हेवन

पार्श्वभूमी:

काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी 2 औस (60 मिली)
ब्लु कुरास्सो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
बर्फ
मीठ (ग्लासच्या रिमवर लावण्यासाठी)
ग्लास कॉकटेल ग्लास

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे 🙂

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी