“शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर.
१९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही. त्यात पहिल्या आठवड्यात ज्याच्या बाजूला बसलो होतो तो समदु:खी असावा ह्या अपेक्षेने त्याला विचारले, “तुला कळते का रे?” तर तो एकदम फुशारकीने म्हणाला, “हं, त्यात काय? कळते आहे सगळे.” त्याच्याशी पुढे बोलणे झाल्यावर कळले की त्याची ‘मेरिट’ ३ मार्कांनी हुकली होती. च्यायला, माझी तर बोलतीच बंद झाली. मग, मराठी माध्यमातून शिकलो असल्याने आणि त्या वातावरणात बिचकून जायला होत असल्याने, समदु:खी मित्रांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यात पहिला मित्र भेटला धनुराम. वेव्हलेंग्थ जुळली. त्याची तोपर्यंत बर्याच जणांशी मैत्री झालेली होती.
भौतिकशास्त्राला एक प्रोफेसर नायर होते शिकवायला. मिलिटरी रिटायर्ड माणूस, सणसणीत आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा. प्रयोगशाळेत कसलेतरी संशोधन करत असलेला उपद्व्यापी माणूस. पहिल्या महिन्यातच माझी जर्नल तपासताना त्यांनी माझी भर प्रयोगशाळेत सर्वांसमोर लाज काढली, कारण काय? तर मी Specimen ह्याचे स्पेलिंग मी Speciman असे केले होते. मला त्यावेळी मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. सर्व इंग्लिश मिडीयमकर ‘कुठून येतात कोण जाणे’ असल्या नजरेनी बघत होते माझ्याकडे त्यावेळी, त्यामुळे भयंकर अपमानित व्ह्यायला झाले होते.
रिसेसमध्ये, कॅन्टिनमध्ये, धनुरामबरोबर बसून जवळजवळ रडतच बोलत बसलो होतो. तोच खांद्यावर हात आणि कानावर, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” हे शब्द एकाचवेळी पडले. कोण बाबा हे म्हणून मागे बघितले तर एक काळा सावळा, शिडशिडीत, किंचित कुरळे असलेल्या, बारीक कापलेल्या केसांचा तेल लावून चपटा भांग पाडलेला, मिसरूड फुटलेला, दाढीची लव तुरळक वाढलेला, चेहेर्यावर तारुण्यसुलभ तारुण्यपीटिका, उंचीने माझ्यापेक्षा एखादं इंच कमी असलेला मुलगा, स्वच्छ आणि निखळ हसत माझ्याकडे बघत होता. त्यावेळी हसताना त्याचे चमकणारे शुभ्र दात आजही मला लख्ख आठवतात. “राजेश, राजेश सातमकर”, असे म्हणत त्याने मला ‘शेक-हॅन्ड’ केला. त्या हाताच्या उबदार आणि घट्ट पकडीबरोबरच मैत्रीचे नातेही त्या पकडीसारखेच घट्ट होणार ह्याची खात्री त्याच्या निर्मळ आणि निखळ हास्याने त्यावेळी झाली.
तोही माझ्यासारखाच इंग्रजीला काहीसा वैतागला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही इंग्रजीला वैतागून जायचो, कोणी नवीन प्रोफेसर किंवा मॅडम येऊन इंग्रजी झाडून गेल्या आणि काही कळले नाही की कॅन्टिनमध्ये चहा पीत पीत राजेश त्याचे नेहमीचे पेटंटेड वाक्य ऐकवायचा, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” पण तो माझ्याइतका वैतागलेला नसायचा. त्याचे कारण मी त्याला एकदा न राहवून विचारले तेव्हा कळले की त्याची थोरली बहीण कुठल्याश्या नामांकित कॉलेजात शिकणारी आणि स्कॉलर होती. ती त्याचा अभ्यास घ्यायची. “च्यायला, नशीबवान आहेस रे तू”, असे मी त्याला म्हणायचो तेव्हा तो मुग्ध हसायचा.
त्यानंतर आमचे मैत्रीचे बंध जुळत गेले आणि राजेश सातमकर कळत गेला. पहिल्या आठवड्यात माझा बाजूला बसलेला सो कॉल्ड ‘स्कॉलर’ ज्याची मेरिट ३ मार्कांनी हुकली होती तो आणि राजेश गिरगावातल्या एकाच शाळेतले विद्यार्थी आणि वर्गबंधू आहेत हे समजल्यावर मी चाटच पडलो. कारण तो स्कॉलर राजेशशी जास्त बोलायचा नाही आणि मैत्रीचा ओलावा तर कधीच जाणवायचा नाही. मला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे. पण पुढे कळले की राजेशचे वडील त्यांच्या शाळेत शिपाई होते. राजेश त्यांच्या शाळेतला एक स्कॉलर होता. त्याचे जरा जास्त कौतुक व्हायचे शाळेत कारण कठिण परिस्थितीत राहूनही त्याची शैक्षणिक प्रगती देदीप्यमान होती आणि ते कौतुक त्या स्कॉलरला आवडायचे नाही.
हुषार असलेला राजेश स्वभावाने अगदी सरळ आणि सज्जन कॅटेगरीतला होता, नाकासमोर चालणारा. त्याच्या तोंडून कधीही अपशब्द यायचे नाहीत. खूप चिडला, हे ही क्वचितच व्हायचे, की मात्र “नालायक” एकढाच एक जहाल शब्द त्याच्या तोंडून पडायचा पण लगेच त्याच्या निखळ हास्याने त्या शब्दाची जहालता शीतल होऊन जायची. माझ्या तोंडाचे तर तेव्हा गटारच असायचे. भकारात्मक शब्दांनीच वाक्यं सुरू व्हायची आणि संपायचीही. त्यावेळी तो मला उपदेश न करता नुसते डोळे मोठे करून निषेध नोंदवायचा. त्याच्याबरोबर मी ‘इक्विलिब्रियम’वर एक फिजिक्सचा प्रोजेक्ट केला होता. त्यात एक बाहुली असते जिला असेही वाकवले आणि पाडले तरीही ती पुन्हा मूळ स्थितीत येते असा तो प्रोजेक्ट होता. चेष्टेने मी त्या बाहुलीला ‘जड बुडाची’ म्हणायचो. त्यावेळी मात्र माझ्या त्या शब्दावर तो मनमुराद हसला होता, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत.
त्या नंतर मला आमच्या पॉलीटेक्निकच्या शेजारी असलेल्या मिठीबाई कॉलेजचा शोध लागला. त्या कॉलेजात बर्याच बॉलीवूडच्या नट्या शिकून गेल्या आहेत ही बातमी कळल्यावर लेक्चर बंक करून दुपारी मिठीबाई कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये सौंदर्यस्थळे न्याहळीत बसणे आणि घरी जाताना भागुबाईवरून अंधेरी स्टेशनला न जाता मिठीबाई कॉलेजवरून चालत चालत विले पार्ले स्टेशनला जाणे हा भागुबाईमधील जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन बसला होता. मी लेक्चर बंक करून मिठीबाईला जातो ह्याचा त्याला विलक्षण अचंबा वाटायचा. त्याचा निषेध तो, “अरे, तू एका शिक्षकाचा मुलगा आहेस ना, तुला हे शोभत नाही” असे बोलून व्यक्त करायचा. मला त्यावेळी खरंतर त्याचा खूप राग यायचा पण त्याच्या हसण्याने तो मावळूनही जायचा. मिठीबाई कॉलेजवरून स्टेशनला जाताना हा पठठ्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं जायचा. मग मी त्याला खूप पिळायचो. “अरे, भोxxx, ही हिरवळ बघ ना बाजूची. सौंदर्याचा नजरेने तरी आनंद घे” असे म्हणायचो. खूप वैतागलो की मग मी माझा एक ठेवणीतला डायलॉग त्याच्यावर फेकायचो, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा? म्हणून म्हणतो, बघ जरा आजूबाजूला फुललेले हे ताटवे!” त्यावर तो फक्त मंद हसायचा आणि त्याचा हुकुमाचा एक्का बाहेर काढायचा, “हे तुझे थोर आणि साहित्यिक विचार जर तुझ्या वडिलांनी ऐकले तर त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार कधी केला आहेस का?” आता ह्यावर काय बोलणार? “मर भोxxx”, असे बोलून मी त्याला टपल्या मारायचो.
पहिल्या सेमिस्टरला सगळे जण चक्क पास झालो. त्यामुळे त्याच्या “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” ह्या पालुपदाची धार कमी झाली असली तरी सज्जनपणाच्या आचरणाची धार अणुकूचीदार होत होती. त्याचे मिठीबाई कॉलेजवरून जातानाचे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत जाणे अजूनही कायम होते. फक्त एक फरक पडला होता. तो बर्याच वेळा गैरहजर असायचा दुसर्या सेमिस्टर मध्ये, आजारी असायचा. त्यामुळे आणि दुसर्या सेमिस्टरला जरा मॅच्युरिटीही आल्यामुळे माझे मित्रांचे विश्वही जरा बदलले होते. कूपर हॉस्पिटलाकडच्या बाजूच्या एका टग्या मुलांचा अड्डा असलेल्या बस स्टॉपचा शोध लागला होता. तिथे वावर वाढला असल्याने राजेशचे गैरहजर असणे तसे जाणवायचे नाही. तसेही तो मला नेहमी मी त्या बस स्टॉपवर जाऊ नये म्हणून वेळोवेळी झापायचाही. पण मैत्रीचे वीण तशीच घट्ट होती.
दुसर्या सेमिस्टरच्या शेवटी किंवा तिसर्या सेमिस्टरच्या सुरुवातीला तो खूप दिवस आलाच नाही. चक्क चाचणी परीक्षेलाही आला नाही. हे मात्र अचंबित करणारे वर्तन होते. मग त्याच्या वर्गमित्र, सो कॉल्ड स्कॉलर, याला आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करून यायला सांगितले. आम्ही त्याची केलेली मनधरणी त्याने तशीही धुडकावून लावली होती कारण तो अंधेरीला राहायला आला होता. पण कोणत्यातरी प्रोफेसरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन यायला सांगितल्यामुळे त्याला जावे लागले. एका वीकएंडला तो गिरगावात जाऊन आला. सोमवारी आल्यावर,“राजेश खपला” असे तो आम्हाला म्हणाला. दोन मिनिटे मला तो नेमके काय म्हणतोय ते कळलेच नाही. मग नंतर कळले की राजेश सातमकर ह्या जगात नव्हता. माझी तर हे ऐकून दातखीळच बसली. सर्व जाणिवा एकदम बधीर होऊन सुन्न व्हायला झाले. त्याचा हसरा चेहेरा नजरेसमोर फेर धरून नाचू लागला आणि त्याला मजे मजेत म्हटलेले, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा?” हे राहून राहून आठवायला लागले.
राजेशला बोन कॅन्सर होता. एखाद्या साध्या सरळ माणसाबरोबर नियती कसा खेळ खेळेल हे सांगणे कठीण असते. मात्र राजेशशी नियतीने खेळलेला हा खेळ मनाला चटका लावून गेला. त्याला एकदा, “काय रे, काय आजारी असतोस सारखा? कुठल्या डॉक्टरला दाखवलेस?” असे विचारले असताना त्याने टाटा हॉस्पिटलाचा केलेला उल्लेख आठवून त्याची लिंक त्यावेळी लागली. अतिशय जवळचा बनलेल्या आणि कायम हसत राहणार्या राजेशचे असे अचानक सोडून जाणे मनाला चटका लावून गेले होते. काही कारणामुळे त्याच्या घरी कधी जाता आले नाही. 1-2 मित्र त्याच्या घरी त्याच्या तेराव्याला जाऊन आले. मला का कोण जाणे, जायची प्रचंड इच्छा असूनही जावेसे वाटले नाही आणि गेलोही नाही. त्या गोष्टीची बोच अजूनही मनात कायम आहे.
आजही जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या की ती राजेश सातमकर आवर्जून आठवतो आणि मनात एक आवाज उमटतो, “राजेश, गेलास भोxxx, पण एकदा जरा मिठीबाईच्या रस्त्यावरून अलीकडून चालला असतास तर ‘समजा उद्या जर गचकलास’ ह्या माझ्या वाक्याची बोच मला आयुष्यभर बाळगावी लागली नसती”.