‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मॅन्गो मार्गारीटा
पार्श्वभूमी:
माझा एक मित्र, नचिकेत गद्रे, याने एकदा गोव्याला फिशरमन व्हार्फ मध्ये मॅन्गो मार्गारीटा ट्राय केली होती. त्याने तसे सांगितल्यापासून ते कॉकटेल एकदम मनात भरले होते. आमरस हा माझा जीव की प्राण! माझ्यासाठी, खाण्यात आमरसाचे जे स्थान तेच दारुमध्ये टकीलाचे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा संगम असलेले कॉकटेल तितकेच कातिल असणार ह्याची खात्री होती.
ह्या मंगळवारी लग्नाचा वाढदिवस होता, तो आणि ग्रीष्म लाउंजोत्सव यांचे औचित्य साधून त्या मॅन्गो मार्गारीटाचा बार उडवायचे ठरवले. सगळे साहित्य घरात होतेच. त्यामुळे खरंच मॅन्गो मार्गारीटाचा बार ‘उडाला’!
साहित्य:
टकीला | १ औस (३० मिली) |
क्वाँत्रो (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) | १ औस (३० मिली) |
अर्ध्या आंब्याचा गर | |
अर्ध्या मोसंबीचा रस | |
बर्फ | |
आंब्याची चकती सजावटीसाठी | |
ग्लास | कॉकटेल ग्लास किंवा मार्गारीटा ग्लास |
कृती:
ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य घालून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये अर्धा ब्लेंडर भरेल एवढा बर्फ भरून घ्या.
सर्व मिश्रण एकजीव होइपर्यंत मध्यम गतीने ब्लेंड करा.
आता ते मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या आणि आंब्याची चकती ग्लासच्या रीमला खोचून घ्या.
झक्कास आणि बहारदार मॅन्गो मार्गारीटा तयार आहे 🙂