शालेय जीवनात वडिलांच्या एका स्नेह्याच्या मुलामुळे टेनिस खेळ कळायला लागला पण बघायची काही गोडी लागली नव्हती तेव्हा. जॉन मेकॅन्रो, बोरीस बेकर, स्टेफी ग्राफ, मार्टिना नव्रातोलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, अराँता साँचेझ व्हिकारियो ही नावे तेव्हा अगदी एलियन लोकांची असावीत असेच वाटायचे. नव्रातोलोव्हा हे तर मला, ‘नवरा तिला हवा’ असेच वाटायचे. पण पुढे कळले की तिला नवरा नको असून ‘नवरी‘ हवी आहे 🙂 एकदा हिंदी बातम्या ऐकताना एका फ्रेंच ओपनची फायनल, कोणीतरी एक खेळाडू आणि अराँता साँचेझ व्हिकारियो ह्यांच्यात होणार अशी बातमी अर्धवट अशी ऐकली “….अराँता साँचेझ व्हिकारियो के दरमियां।“ त्यावेळी तसल्या नावांची कानाला सवय नसल्याने “…अराँता साँचेझ भिकारियो के दरमियां।“ अशी ऐकली आणि बावचळून गेलेलो ते अजूनही लख्ख आठवते आहे आणि त्याचवेळी परदेशातही भिकारी आहेत असे वाटून सुखावलोही होतो.
असो, तर त्यावेळी खेळाचा दर्जा वैगरे भानगडीत न पडता खेळातली गंमत जास्त अनुभवण्याच्या दृष्टीने मी मॅचेस बघत असे. एका मित्राचे वडील जॉन मेकॅन्रोचे प्रचंड फॅन होते. ते खेळातली गंमत, थरार, सर्व आणि वॉली, बेसलाइन विनर असले तपशील समजावून सांगायचे. त्यामुळे खेळ बघायला मजा यायची. तोपर्यंत जास्त करून पुरुष एकेरीच्याच मेचेस बघायचो. पुढे जरा आणखी ‘मोठे’ झाल्यावर महिला एकेरीच्या सामन्यांतले ‘बारकावे’ कळल्याने त्या मॅचेस बघायची सवय लागली. पण त्यात फार गोडी लागावी अशी परिस्थिती नव्हती. स्टेफी ग्राफचा त्या खेळातला दबदबा आणि तिचे कौशल्य वादातीत असले ती मला आवडायची नाही. त्याचे कारण वेगळे होते. वडिलांच्या ज्या स्नेह्याच्या मुलामुळे टेनिस खेळ बघायला लागलो त्याची बहीण, कल्पानाताई हिचे आणि माझे अजिबात जमायचे नाही. त्यामुळे तिला जे जे आवडायचे ते सर्व माझे नावडते झाले होते आणि स्टेफी तिची आवडती होती. त्यामुळे मला मनातून स्टेफीचा गेम आवडत असूनही तिचा फॅन होता आले नाही. ति विरोद्ध मोनिका सेलेस अशी एक मॅच मोनिका हरल्यावर मी ढसाढसा रडलो होतो, कारण ‘कल्पानाताईची आवडती स्टेफी’ ती मॅच जिंकली म्हणून!

तर ते असो, पुढे माझ्या टेनिस जीवनात एक वादळ आले ज्याने टेनिस ह्या खेळाची सर्व परिणामे माझ्यापुरती बदलून गेली. आयुष्य ढवळून निघाले. पौगंडावस्थेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली. त्या तारुण्यसुलभ वयात तारुण्याची सर्व आव्हाने पेलायची ताकद मनात रुजून, जगण्याचा एक नवीनं हुरूप आला. टेनिस खेळाविषयी अतिशय आत्मियता निर्माण होऊन हा खेळ शोधल्याबद्दल गोर्या साहेबाविषयी अभिमान दाटून आला. अर्जेंटिना ह्या देशाविषयी एकदम अभिमान दाटून येऊन त्या देशाविषयी एक प्रेम मनात उत्पन्न झाले. अचानकच त्यादेशाविषायीची माहिती काढणे चालू केले. वडिल भूगोल शिकवायचे त्यांना “आपण अर्जेंटिना ह्या देशावर एक प्रोजेक्ट करुयात का?”, असे विचारुन झीटही आणली. हे सर्व होण्याचे एकमेवा कारण होते ते वादळ! ते वादळ होते अर्जेंटिनाची ‘गॅब्रिएला सॅबातिनी’.

‘ती पाहताच बाला कलेजा खलास झाला’ असे काय म्हणतात ना, नेमके तसेच झाले तिला पहिल्यांदा बघितल्यावर. ते वयाच असे होते ज्यावेळी आपल्या विषमलिंगी जोडीदाराबद्दलच्या कल्पना आणि फॅन्टसीच हळूहळू डेव्हलप होत असतात. एक अमूर्त असे चित्र आपल्या मनात तयार होत असते. सुंदरता, देखणेपणा, आकर्षकता, ब्यूटिफुल आणि हॅन्डसम ह्यात असलेली एक थिन लाइन ह्या गोष्टी आपल्या मनाच्या खोल गाभ्यात डिफाइन होत असतात. त्यामुळेच त्या वयात टेनिस खेळाडूच्या रूपाने भेटलेली (टीव्हीवर हो!) गॅब्रिएला आयुष्यात वादळ उठवून गेली होती.

तिच्या केसांची हटके स्टाइल, लांब तरतरीत नाक, चेहेर्याहची पंचकोनी ठेवण, खेळताना डोक्याला लावलेला पांढरा बंडाना, पांढरा मिनी स्कर्ट आणि पुष्ट व कमनीय अशी अॅथलीट देहयष्टी. हे सर्व पाहून त्या वयात वेडावून न जाणे हे जरा कठीणच होते. अक्षरशः मिळतील त्या वर्तमानपत्रांतले तिचे सर्व फोटो जमवून ठेवायचा ध्यासच लागला होता तेव्हा. त्या वेळेच्या कृष्ण-धवल वर्तमानपत्रांमधल्या तिच्या त्या कृष्ण-धवल फोटोंमध्येही ती त्यावेळी लाजवाबच दिसायची, अगदी काळजाला घरे पडतील इतकी. त्या काळी इंटरनेट सुविधा नसल्याने तिचे त्या खेळाच्या पोषाखा व्यतिरीक्त फोटो बघायला मिळायचे नाहीत. कधीतरी वाचनालयात स्पोर्टस्टार सदृश मासिकांमध्ये रंगीत फोटो बघायला मिळायचा. मग गुपचूप तो फोटो फाडून घेऊन वाचनालयातून पसार व्हायचे धंदेही त्या काळी केलेत. गॅब्रिएलासाठी हे त्या काळी माझ्यासाठी क्षम्य गुन्हे होते. नशिबाने कधी पकडलो गेलो नाही म्हणून नाहीतर अफाट मार खावा लागला असता ही गोष्ट वेगळी, पण तरीही त्यावेळी मार खाताना तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊन तो मारही सुसह्य झाला असता असा सार्थ विश्वास आजही आहे.
तिचा खेळ एवढा काही उच्च नव्हता आणि तिने विशेष असे काही सामनेही जिंकले नाहीत. पण त्याची फिकीर मला नाही कारण तिने माझ्या हृदयातले ‘ग्रॅन्ड स्लॅम’ पहिल्या दृष्टीतच जिंकले होते, 6-लव, 6-लव असे!
|
![]() |
![]() |
![]() |