थॅन्क्यू गूगल फॉर द डूडल…

आज अस्मादिकांचा वाढदिवस. चेन्नैहून पुण्याला, सुट्टी घेऊन, वाढदिवस कुटुंबासमावेत साजरा करण्याचा प्लान केला होता. चेन्नैहून पुण्याचे विमान भल्या पहाटेचे असल्याने विमानतळावर येण्यासाठी बुक केलेली टॅक्सी त्याहुनही भल्या पहाटे येणार असल्याने झोपेशी गट्टी फू करणे भाग होते. कारण एकदा मी झोपलो की भल्या पहाटे उठणे हे अशक्य काम असते. तर रात्री उशीर पर्यंत बायकोशी चॅट करून, तिच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन, फेसबुकावर मित्रांचे शुभेच्छा संदेश वाचून त्यांना कमेंट्स देईपर्यंत टॅक्सी यायची वेळ झाली. प्रवासात फ्रेश रहावे म्हणून वाढदिवसाच्या मुहुर्तावर भल्या पहाटे चक्क आंघोळ केली. ( हे वर्ष बहुदा धुतल्या तांदळासारखे स्वच्छ जाणार असे वाटते आहे) 🙂

विमानतळावर पोहोचून चेक-इनचे सोपस्कार पार पाडून लाउंज मध्ये आलो. विमानच्या उड्डाणवेळेला भरपूर अवकाश होता म्हणून नेहमीच्या सवयीप्रमाणे लॅपटॉप चालू करून एखादा सिनेमा पहावा असा विचार करून व्हीएलसी प्लेयर चालू करून एक सिनेमा (प्रेस्टीज, सिनेमाचे नाव) चालू केला; तर व्हीएलसी प्लेयर ने फॉन्ट लायब्ररी रीलोड करतो आहे असला काहीतरी मेसेज दिला. त्याला वेळ लागणार होता. आजकालच्या फास्टफूड जमान्यात असे वाट बघणे काही जमत नाही. लगेच टाटा फोटॉन ऑन करून नेटला कनेक्ट झालो. (हे असे नेटला कनेक्ट होताना मला नेहमी मी मॅट्रीक्स सिनेमातला निओ आहे आणि मी डोक्यात प्लग घालून मॅट्रीक्स मध्ये शिरतो आहे असा फील येतो) कनेक्ट झाल्या झाल्या गूगल क्रोम चालू केले. होम पेज अर्थातच गूगल.कॉमच आहे. ते लोड झाले आणि ‘गूगल Doodle’ हे चक्क वाढदिवसाच्या केकचे होते. च्यामारी, माझ्या प्रगटदिनी आणि कोणत्या महान आत्म्याने जन्म घेतला आहे ह्याचे कुतुहल वाटून त्या गूगल Doodle वर माउस कर्सर फिरवला आणि काय चमत्कार सांगावा महाराजा चक्क माझेच नाव!

सकाळी सकाळी इतके छान वाटले म्हणून सांगू की बास. एकदम आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एखाद्या मित्राने आठवणीने शुभेच्छा द्याव्यात असे वाटले.

आता बर्‍याच जणांना हा गूगलचा व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला वाटेल, वैयक्तिक माहिती साठावून त्यातुन माझ्या व्यक्तिगत आयुष्यात केलेला चोँबडेपणा वाटेल किंवा अजून काही. असे वाटणारे माझ्या ओळखीतले, खास मित्र आहेत आणि त्यांच्याशी ह्या विषयावर बरेच वैचारिक वादही झालेत. पण ज्याला जे वाटायचे आहे ते वाटो बापडे! मला जो काही सकाळी…सॉरी…सॉरी भल्या पहाटे गूगलने जो आनंद मिळवून दिला त्याची तोड फक्त रात्री 12 वाजता बायकोने शुभेच्छा दिल्यावर झालेल्या आनंदाशीच होऊ शकेल कदाचित.

तर गूगल, ह्या पर्सनलाईज्ड डूडल बद्दल मनापासून धन्यावाद बरं का!