आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली. आणि म्हणूनच कदाचित वाचनातला हुरूप टिकून राहिला आणि एकंदर मराठी साहित्य वाचायची सवय आणि गोडी लागली. एकदम सुरुवातीला बाबा कदमांच्या एका दोन कादंबर्या वाचल्या होत्या, त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सुशिंची सालम ही कादंबरी वाचली आणि झपाटल्यासारखा सुशिंच्यासर्व कादंबर्या वाचनालयात जाऊन वाचायचा सपाटा लावला. त्यावेळी बहुतकरून फिरोझ इराणी आणि दारा बुलंद हे माझे आवडते हीरो बनले होते. मग एकदा अचानक कल्पांत ही कादंबरी हाती लागली आणि सुशिंचा एका आगळाच पैलू मला गवसला. सुशिंचा परम भक्त असल्याचा अभिमान तेव्हा गगनात मावत नव्हता. पुढे लवकरच कॉलेजला जायला लागलो आणि नेमकी ‘दुनियादारी’ ही कादंबरी हाती लागली. बस्स! कॉलेजजीवन अगदी झपाटून गेले होते तेव्हा.
पण आता नुकतीच ही कादंबरी आता पुन्हा एकदा वाचली (नाही, चित्रपट येणार म्हणून नाही, त्याच्या आधीच). पण ह्यावेळी ती एवढी भिडली नाही जितकी कॉलेजात असताना भिडली होती. ह्यावेळी वाचताना एम. के. श्रोत्री आणि श्रेयस यांचे नाते, सुशिंनी, कादंबरीत बरेच पोकळ दाखवले आहे असे वाटून गेले. प्रत्यक्षात एम. के. श्रोत्री आयुष्याबद्दलचे जे काही तत्त्वज्ञान कादंबरीत सांगतो ते जास्त गहन असे सुशिंनी मांडायचा प्रयत्न केला होता पण श्रेयस तळवळकराशी डायरेक्ट नाते संबंध जुळवून कादंबरीचा केलेला शेवट ह्यावेळी मला काही भावला नव्हता.
आता हा सिनेमा जेव्हा आला त्यावेळी कथानक बदलले आहे असा गदारोळ झाला होता. पात्रांची नावेदेखील बदलली आहेत असेही कळले होते. पण चित्रपट स्वतः बघितल्याशिवाय त्यावर काहीबाही वाचून मत बनविणे हे मला आवडत नाही. त्यामुळे चित्रपट बरा असो की वाईट सुशिंसाठी हा चित्रपट बघायचाच असे ठरविले होते. चेन्नैत असल्याने काही हा चित्रपट बघायला जमत नव्हते. आज पुण्यात आल्या-आल्या चित्रपट पाहून घेतला. चित्रपटगृह दुपारी बाराच्या शोलाही भरलेले होते. हे पाहून खूपच बरे वाटले आणि ही गर्दी तरुणाईची होती. त्यातल्या बहुसंख्यांना सुशि कोण हेही माहितीही नसावे.
असो, मला हा सिनेमा अतिशय आवडला. सर्वात जास्त काय आवडले असेल तर पटकथेत केलेला बदल. ह्या बदलामुळे एम. के. श्रोत्रींच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे असे मला व्यक्तिशः वाटते. कादंबरीत एम. के. श्रोत्री एक शोकांतिक शेवट असलेले पात्र आहे, दुनियादारीची साक्ष देण्यासाठी उभारलेले पात्र. पण कादंबरीत एम. के. श्रोत्रींचा शेवट आणि त्याची श्रेयसशीघातलेली सांगड तितकीची पटत नाही. पण चित्रपटातल्या पटकथेत एम. के. श्रोत्रीच्या मृत्यूने श्रेयसमध्ये झालेला बदल आणि चित्रपटाच्या पटकथेतील शेवट हा अतिशय सयुक्तिक आणि वास्तविक वाटतो.
मला चित्रपट बघताना कथेत केलेले बदल कुठेही खटकले नाहीत. मुळात सिनेमा बघायला जाताना एक स्वतंत्र कलाकृती बघायला जायचे ह्या हिशोबानेच गेले होतो. त्यामुळे कुठेही तुलना केली नाही. सुशिंच्या दुनियादारी ह्या कादंबरीवर बेतलेली एक स्वतंत्र कथा/पटकथा आणि त्यावर बेतलेला एक स्वतंत्र चित्रपट असे बघितल्यास हा सिनेमा मस्तच झाला आहे. हा सिनेमा हाऊसफुल चालून 30-40 कोटींचा गल्लाही ह्या सिनेमाने जमवला आहे.
पात्रे आणि त्यांची वेषभूषा सत्तरीच्या दशकातली दाखवली आहे, पण कादंबरी त्या काळातली असल्याने तसे करणे गरजेचे आहे असे वाटत नाही. कारण कथेतला बदल हा, ही पूर्ण कथा फ्लॅश-बॅकच्या अंगाने पुढे आणतो त्यामुळे त्या वेषभूषा पटत जातात. अंकुशाचा दिग्या उर्फ डी.एस.पी. अतिशय समर्पक. तो दिग्या वाटतो, निदान मलातरी वाटला. अश्क्या, उम्या इत्यादी पात्रेही मस्तच. शिरीनसाठी सध्याच्या जमान्यात सई ताम्हनकर शिवाय दुसरी कोणी पर्याय असेल असे वाटत नाही असे वाटावे इतकी सई शिरीन म्हणून शोभते. (पण अभिनयाची वानवा असल्याने मूळ कथेतील पात्राची परिपक्वता दाखविण्यास तीच्या मर्यादा आड येतात). मिनू अतिशय समर्पक, मूळ कथेतील मिनू अस्तित्वात आलीय की काय असे वाटावे इतकी उर्मिला कानिटकर मिनू म्हणून शोभली आहे.
श्रेयस आणि साईनाथ ही पात्रे मात्र जबरी हुकली किंवा फसली आहेत. स्वप्नील जोश्याला त्याच्या त्या सुजलेल्या स्वरूपात श्रेयस म्हणून पचविणे खरंच खूप जड जाते. चेहेर्यावरच्या थोराडपणामुळे श्रेयसचा हळुवारपण आणि निरागसता त्याला अजिबात प्रतिबिंबित करता आलेला नाहीयेय. जितेंद्र जोशी फक्त सुरुवातीच्या, एंट्रीच्या सीनमध्ये तेवढा सुसह्य होतो बाकी चित्रपटभर त्याने ओव्हर अॅशक्टींगचा कहर केला आहे. एम. के. श्रोत्री म्हणून संदीप कुलकर्णीला काही करायला चित्रपटात वावच नाहीयेय. 2-3 सीन्समध्येच एम. के. श्रोत्रीचे दर्शन होते. पण संदीप कुलकर्णी ऐवजी मोहन जोशींना एम. के. श्रोत्री म्हणून बघायला कदाचित आवडले असते.
तर एकंदरीत ‘सुशि-भक्तांनी’ गदारोळ उडवलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट मला आवडला आणि कथेतील बदलही सार्थ वाटला, त्यामुळे एम. के. श्रोत्री ह्या पात्राला न्याय मिळाला असे मला वाटते.
सप्रेम नमस्कार……… मनातल जनातं,ब्रिजेश उवाच हे सदर वाचताना मला अतिशय आनंद झाला आहे.इकडचे तिकडचे,मनातले,समिशा/परिषण सिनेमा/चित्रपट,कादंबरी अशा विविधागी विषयावर केलेल लेखन मन आनंदित,उल्हासित,प्रोत्साहित करतं,मनाचा ठाव घेत,काळीजमाया करतं तुमच्या या महान उपक्रमास सुभेच्छा….! कवी-दादासो बनकर मो.07875481561 email-dbankar7707@rediffmail.com http://www.kavi dadaso bankar.com
LikeLike
धन्यवाद दादासो!
LikeLike
दुनियादारीच्या निमित्ताने सहमत-असहमतचे खेळ कायम वालु राहणार. कुणाला काय आवडेल, कुणाला काय…. ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. माझ्याबद्दल म्हणशील तर मला चित्रपटातला तो प्रसंग (एमके च्या मृत्युचा) फ़ारसा इफ़ेक्टीव्ह वाटला नाही. मुळात एमके चे पात्रच चित्रपटात नीट उभे राहत नाही. दोन प्रसंगात श्रेयसला भेटलेला एमके , त्याच्यात इतका मोठा बदल घडवून आणेल हे तितकेसे पटत नाही.
मी जेव्हा हा चित्रपट पाहीला तेव्हा कादंबरीशी अजिबात तुलना करायची नाही हे ठरवूनच गेलो होतो. आणि त्यात यशस्वीही झालो. कदाचीत त्यामुळेच एक स्वतंत्र कथानक म्हणून पाहतानासुद्धा चित्रपट ठसला नाही, कारण एकही पात्र व्यवस्थीत जमुन आलेले नाही, डिस्क्राईब झालेले नाही. अनेक ठिगळे जोडलेली वाकळ पांघरल्यासारखी भावना झाली काहिशी 🙂
संगीत आणि गाणी सोडले तर चित्रपटात काहीही आवडले नाही. पात्ररचनेबद्दल तर बोलायलाच नको.
LikeLike
>> दुनियादारीच्या निमित्ताने सहमत-असहमतचे खेळ कायम वालु राहणार. कुणाला काय आवडेल, कुणाला काय
अगदी मनापासून सहमती!
LikeLike
मी अद्याप सुशिंची दुनियादारी कांदबरी वाचलेली नाही. पण दुनियादारी चित्रपट रोज जवळपास पीसीवर बघतोय. जितेंद्र जोशीला कुठेच खराखुरा व्हिलन उभा करता आलेला नाही. आणि या चित्रपटातील काही डबल मिनिंग संवादांची अजिबात गरज नव्हती असं मला वाटतं. दोन ठिकाणी सई ने अगदी नॅच्युरल आवाज काढला आहे. जेव्हा ती श्रेयसच्या नाकात रक्त बघते तेंव्हा कधी पासुन होतंय हे याठीकाणी आणि अगदी शेवटी तो तिला म्हणतो विचार माझी शेवटची इच्छा काय आहे ते ती म्हणते तुझी शेवटची इच्छा काय हे. देवा तुझ्या हे गाणे लइ भारी.
LikeLike