विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास ‘अर्धा रिकामा’ असा दिसू शकतो किंवा ‘अर्धा भरलेला’ दिसू शकतो.

सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only. WEB 2.0 च्या तांत्रिक क्रांतीतून निव्वळ वाचनाचा आनंद न घेता आता इंटरनेटवर लिहिताही येऊ लागले. ‘ब्लॉग’ नावाचे माध्यम तमाम लिखाळ लोकांना उपलब्ध झाले आणि इंटरनेटवर माहितीचा पूर येऊ लागला. त्यात ‘Wikipedia’ आणि ‘Google Search’ ह्या सर्वात मोठ्या अलीबाबाच्या गुहा ठरल्या. ‘अनंत हस्ते इंटरनेट देता, किती घेशील दोन कराने’ अशी अवस्था झाली. अनेक विचारवंत आणि हौशी लेखक ‘Wikipedia’ आणि ‘Google’ च्या मदतीने माहितीचे संकलन करून लिखाण करू लागले. बर्‍याच जणांनी त्यात कौशल्य मिळवून यश प्राप्त केले. बऱ्याच जणांची पुस्तकेही प्रकाशित झाली. खास करून मराठी भाषेतल्या मराठी संस्थळांवर चांगले लेखन मराठी भाषेत उपलब्ध होऊ लागले. इंटरनेट ह्या माध्यमातही ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण एक माशी शिंकली. ह्या यशस्वी झालेल्यांना ‘विकीपंडीत’ किंवा ‘गुगलपंडीत’ असे हिणवले जाऊ लागले. माहिती आणि त्यावर आधारित ज्ञान हे त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावे? ह्या प्रश्नाचे उत्तर न देताच हिणकस शेऱ्यांनी त्या लेखनकर्त्यांची खिल्ली उडवली जाण्यात धन्यता मानली जाऊ लागले. ‘सोशल नेटवर्किंग’ ह्या इंटरनेटच्या दुसऱ्या अपत्याच्या माध्यमातून आपले कंपू तयार करून त्या लेखनकर्त्यांविषयी चकाट्या पिटल्या जाऊ लागल्या. आजतागायत हे प्रकार चालले आहे. पण ‘माहिती आणि त्यावर आधारित मांडल्या गेलेल्या ज्ञानाचा दर्जा हा त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावा?’ ह्या प्रश्नावर ह्या खिल्ली उडवणाऱ्यांनी कधीही विचार केला नाही.

ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka). अमेरिकेतील मेरीलॅंड राज्यातील क्राउन्सविले येथील एका शाळेत शिकणारा 15 वर्षाचा शाळकरी मुलगा. ह्याने 15 व्या वर्षीच संशोधन करून स्वादुपिंड (pancreatic), अंडकोष (ovarian) आणि फुफ्फुस (lung) यांच्या कॅन्सरची शरीराला लागण झाली आहे का ह्याचे निदान करणाऱ्या तपासणीची एक कमी खर्चिक पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीत डिपस्टीक पद्धतीचा एक ‘सेंसर पेपर’ (लिटमस पेपर सारखा) त्याने शोधला आहे. हा पेपर कॅन्सरचा प्रादुर्भाव दर्शविणारी, रक्तात किंवा लघवीत असणारी प्रथिने शोधतो आणि अगदी लवकरच्या स्टेजवर कॅन्सरचे निदान होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka)

शाळेत असल्यापासूनच विज्ञानात रस असलेला हा धडपड्या जॅक नववीत असताना त्याचा एक अतिशय जवळचा नातेवाईक स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान लवकर न झाल्यामुळे दगावला आणि जॅकचे आयुष्य त्याने बदलून गेले. त्याने ह्यावर ‘निदान तपासणी’ शोधायचा मनाशी निर्धार केला. शाळेत जीवशात्रात त्याला ‘प्रतिजैवके’ आणि ‘कार्बन नॅनोट्यूब्जचा तपासणीच्या पद्धतींमध्ये वापर’ ह्या विषयांची तोंडओळख झाली होती. त्यांचा वापर करून स्वस्तातली निदान पद्धती शोधता येऊ शकेल असे त्याला तेव्हा वाटले. शाळेतल्या लायब्ररीत जाऊन त्याने पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. पण शाळेतल्या लायब्ररीतल्या पुस्तकांच्याही पुढची माहिती आणि ज्ञान त्याला त्यासाठी हवे होते.

ते त्याने कसे मिळवले? त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याने “a teenager’s two best friends: Google and Wikipedia” यांचा वापर करून त्याला हवी असलेली माहिती मिळवली. त्याच्या आधारे त्याचा ‘संशोधन प्रकल्प’ सुरू करून तो Intel International Science and Engineering Fair मध्ये सादर केला आणि त्याबद्दल पारितोषिक मिळवले. त्यानंतर केंब्रिज ऑक्सफर्ड हार्वर्ड ह्या सारखी विद्यापीठे त्याला अॅडमिशन द्यायला पायघड्या घालून तयार आहेत.

आतापर्यंत करोडो डॉलर्स, अत्याधुनिक लॅब्ज मध्ये संशोधनासाठी खर्च करून जे जमले नव्हते ते ह्या लहानग्या जॅकने एका छोट्या आणि साध्या प्रयोगशाळेत साध्य करून दाखवले. त्यासाठी त्याने ‘विकिपीडिया’ आणि ‘गूगल’ ह्यांचा सढळ हाताने उपयोग केला आणि त्याच्या मुलाखतींमध्ये तसे सांगायलाही तो विसरत नाही.

तर, ‘विकीपंडीत’ किंवा ‘गुगलपंडीत’ अशी हेटाळणी करणाऱ्यांनी आता ह्यातून बोध घ्यावा आणि माहिती ही माहिती असते आणि योग्य प्रकारे वापरल्यास त्यातून मानवजातीवर उपकारच होतात हे समजून घ्यावे.

चावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’

chawadee
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.

“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.

“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.

“कसली दुरुस्ती? काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.

“जे काम बाळासाहेबांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी केलं, झालं!”, इति भुजबळकाका.

“अच्छा म्हणजे सरांविषयी बोलता आहात तर आपण”, चिंतोपंत चर्चेत येत.

“हो! ‘मनोहर जोशी परत जा’, ‘मनोहर जोशी चले जाव’, शिवसैनिकांच्या अशा घोषणांमुळे सरांना व्यासपीठच नव्हे तर मेळावा सोडून जावे लागले.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो, हे तर धक्कादायक आहे!”, आता शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना! हे जरा अतीच झाले आणि काय हो बहुजनहृदयसम्राट ह्यात तुम्हाला का एवढा आनंद झाला आहे?”, चिंतोपंत जराशा त्राग्याने.

“आनंद नाही झालाय पण जे काही झाले ते खूप उशीरा झाले असे म्हणायचे आहे. अहो, खाजवून खरूज काढायचे आणि ते चिघळले की बोंबा मारायच्या असे झाले हे सरांचे चिंतोपंत”, भुजबळकाका.

“म्हणजे काय? कसली खरूज?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, दादरला एका नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी दिली काडी लावून. ‘शिवसेनेचे नेतृत्व आता बाळासाहेबांसारखे आक्रमक राहिले नाही’ ‘असे स्फोटक विधान केले. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही वर त्यांनी व्यक्त केली. आहे की नाही मज्जा!”, भुजबळकाका उपहासाने.

“बाळासाहेबांच्या स्मारकाचा खांदा करून, त्यावर बंदूक ठेवून त्यांनी उद्धवावर गोळ्या डागण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अंगाशी आला.” इति बारामतीकर.

“अगदी बरोबर बोललात बारामतीकर! अहो सरांचा हा बामणी कावा आजचा नाहीयेय. अगदी शिवसेनेत बाळासाहेबांच्या जवळ पोहोचल्या पासूनचा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“ओ बहुजनसम्राट असलात म्हणून उगाच काहीही बरळू नका! कसला बामणी कावा? वाट्टेल ते बोलाल काय?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत, इतिहास गवाह है! बहुजन समाजात, तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम ज्या छगनरावांनी केले त्यांच्यावरच शिवसेना सोडण्याची वेळ यावी यामागे कोणाचा आणि कोणता कावा होता हे सर्वांना माहिती आहेच.”, इति भुजबळकाका.

“बरं! ज्या शिवसेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळे त्यांचे स्वतःचे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले त्यांच्याच स्मारकावरून राजकारण करावे ही मात्र हद्द झाली.”, बारामतीकर तावातावाने.

“ ‘बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही, म्हणून त्यांचे स्मारक होण्यास विलंब होत आहे. त्यांची भाषा वापरली असती तर आतापर्यंत त्यांचे स्मारक उभे राहिले असते आणि आता स्मारकासाठी आंदोलन उभे राहिले तर त्यासाठी उभा राहणारा पहिला सैनिक मी असेन’, असली काहीतरी कावेबाज स्टेटमेंट पत्रकारांना देण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही”,भुजबळकाका

“अहो खरंआहे , एवढा जर पुळका होता स्मारकाचा तर द्यायचा एक कोपरा कोहिनूर मिलचा स्मारकासाठी पण नाही.”, इति बारामतीकर.

“अहो, मुळात स्मारक स्मारक हवेच कशाला! त्याने काय असे भले होणार आहे?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“अहो, इथे स्मारक हवेय कोणाला, त्याच्या आडून राजकारण करायला मिळते ना!”, बारामतीकर.

“अहो शिवसेनेत आल्यापासून फक्त राजकारणच आणि तेही घाणेरडे राजकारण करणारे सर काय म्हणताहेत बघा ‘राजकारण आणि धोरणीपण एकत्र असतात. बाळासाहेब २0 टक्के राजकारणी आणि ८0 टक्के समाजकारणी होते. त्यांनी राजकारणाला नाही तर समाजकारणाला महत्त्व दिले. बाळासाहेब निवडणुका जिंकणारे राजकारणी नव्हते, म्हणूनच ते आदर्श राजकारणी होते.’, आहे की नाही मज्जा आणि चिंतोपंत, तुमच्यासाठी ‘बामणी’ हा शब्द वगळतो, पण ह्यात तुम्हाला कावा दिसत नाही?”, भुजबळकाका हसत.

“अहो, साहेबांच्या जवळ असल्याने ह्यांनी स्वतःच्या फायद्याचे राजकारण करून, स्वतःचे भले करून घेतले खरे पण त्याचबरोबर शिवसेनेचे भले करण्याऐवजी नुकसानच केले त्यांनी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदी बसवले त्याचीही चाड ठेवली नाही.”, बारामतीकर.

“चालायचेच, तुमच्या साहेबांच्याच जास्त जवळ आहेत म्हणे ते बाळासाहेबांपेक्षा, वाण आणि गुण लागायचाच मग!”, नारुतात्या गालातल्या गालात हसत.

“नारुतात्या, उगाच आमच्या साहेबांना मध्ये आणायचे काम नाही!”, बारामतीकर जरा चिडून.

“का हो का? शिवसेना आणि बाळासाहेब ह्या चर्चेत पवारसाहेबांचा विषय येणे अपरिहार्यच आहे हो!”, नारुतात्या गालातल्या गालातले हसणे चालू ठेवत.

“नारुतात्या, पोरकटपणा करून उगाच विषयांतर करू नका!”, भुजबळकाका वैतागत.

“अहो, बहुजनहृदयसम्राट, नारुतात्यांच्या बोलण्यात तथ्य आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“ऑ?”, घारुअण्णा एकदम चमकून.

“अहो, दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी दादरला नवरात्र मंडळात केलेला मेलोड्रामा ह्यात एक छुपे कनेक्शन नक्कीच आहे.”, सोकाजीनाना मिश्किल हसणे कायम ठेवत.

“सोकाजीनाना, स्पष्ट बोला ब्वॉ! ह्या खोपडीत काही शिरले नाही.”, नारुतात्या हार मानत.

“सोपे आहे हो सगळे. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही. थोडा हे थोडे की जरुरत है असेच त्यांचे अजूनही चालले आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा लोभ आणि ती धोक्यात येताना दिसणारी उमेदवारीच ह्या सगळ्या मर्कटलीला करण्यास त्यांना भाग पाडत आहे.”, सोकाजीनाना

“अहो पण सोकाजीनाना, त्याने उद्धवावर तोफा डागून काय होणार आहे?”,चिंतोपंत प्रश्नांकित चेहेर्‍याने.

“अहो तीच तर सरांची खासियत आहे! आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्‍या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात ‘कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही’ असा शालजोडीतलापण दिला!”

“थोडक्यात काय, सुंभ जळला तरीही पीळ जात नाही अशी, ‘राजकारणी आणि कावेबाज’ मनोहरपंत सरांची, आजची अवस्था आहे! काय पटते आहे का? चला, चहा मागवा!”, मंद हसतसोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.