>> तर तेही असो, जलसा बीच रिसॉर्टला पोहोचल्यावर असा नजारा होता.
रिसॉर्टला पोहोचल्यावर त्यांच्या रिसेप्शन मॅनेजरने सर्व चेक इन फॉर्मॅलिटी पूर्ण करून झाल्यावर एक आनंदाची बातमी दिली. प्रत्येक आठवड्यात एकदा हॉटेल मॅनेजमेंट कॉकटेल पार्टी आयोजित करते आणि त्या आठवड्यातली ती कॉकटेल पार्टी आम्ही पोहोचलो त्या दिवशी होती. हे ऐकताच उत्साहित होऊन रूम मध्ये सामान ठेवून आणि फ्रेश होऊन रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीच कडे धाव घेतली. बीचवर धमाल करून रात्रीची कॉकटेल पार्टी अटेंड करून दुसर्या दिवशीच्या ‘उत्तर मॉरिशस’च्या सहलीच्या विचारांमध्ये निद्रादेवीच्या अधीन झालो.
दुसर्या दिवशी टूर गाइड केविन वेळेवर बसजवळ सर्वांची वाट पाहत उभा होता. सर्वजण आल्यावर त्याने त्या दिवशी काय काय करणार आहोत त्याची रूपरेषा सांगितली आणि आम्ही सहलीसाठी प्रयाण केले. सर्वात आधी तो आम्हाला एका लोकल मार्केट मध्ये लोकल शॉपिंगसाठी घेऊन गेला. ज्या दुकानात घेऊन गेला त्या दुकानात त्याचे कमिशन ठरले असावे असे त्या दुकानातील किमती पाहून वाटून गेले. कोणालाही शॉपिंगमध्ये रस नसल्याने अर्ध्या तासात तिकडून निघून पोस्ट लाफायेत शहर सोडून पोर्ट लुईस ह्या मॉरिशसच्या राजधानीकडे आम्ही कूच केले. जाताना मॉरिशसच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येत होता. मॉरिशसच्या पूर्व पश्चिम भूभागाला विभागणारी मस्त पर्वत-शिखरांची आणि डोंगरांची रांग, सह्याद्रीची आणि पर्यायाने पुण्यानजीकच्या डोंगर रांगांची आठवण करून देत होती.
मॉरिशस हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला भूभाग असल्याने तिथली जमीन शेतीसाठी अतिशय सुपीक आहे त्यामुळे तो देश शेतीप्रधान आहे. मॉरिशसमधले मुख्य उत्पादन ऊस. जिकडे बघावे तिथे फक्त उसाची शेती दिसते. जिथे नजर जाईल तिथे आणि जिथे मोकळी शेती उपयोग्य जागा असेल तिथे उसाची लागवड केलेली दिसत होती. ह्या उसाच्या लागवडी मुळे साखर उत्पादन हा मॉरिशसमधला मुख्य औद्योगिक धंदा. साखरेच्या निर्यातीवर ह्या देशाची मदार आहे. सर्व उसाचे गाळप हे साखर कारखान्यांमध्ये करायचे हा सरकारी नियम आहे. इतक्या मोठ्या ऊस उत्पादक देशात उसाच्या रसाची गुर्हाळे सगळीकडे असतील असे वाटणे साहजिकच आहे पण तसे नाहीयेय. फक्त काही ठिकाणीच उसाचा रस उपलब्ध आहे कारण सर्व उसाचे गाळप साखर उत्पादनासाठी करण्यावर सरकारी नजर आणि निर्बंध आहेत. पण त्यामुळे सुबत्ता इतकी की शेतकरी शेतात टोयोटा, ऑडी असल्या गाड्या घेऊन जातात. जागोजागी शेतांमध्ये असल्या गाड्या पार्क केलेल्या दिसतात. 🙂
मॉरिशसमधली छोट्या-छोट्या गावांमधली घरे छान टुमदार आहेत. तिथली 60% लोकसंख्या हिंदू असल्याने प्रत्येक घरात देऊळ दिसले आणि इतरत्रही भरपूर देवळे दिसली.
हा सर्व नजारा बघता बघता आम्ही पोर्ट लुईसला कसे पोहोचलो ते कळलेच नाही. फक्त पोर्ट लुईसमध्ये बहुमजली इमारती आहेत. बाकी पूर्ण मॉरिशसमध्ये एकमजली किंवा दोनमजली घरे दिसली. पोर्ट लुईस हे समुद्रकिनार्याहवर वसलेले एक आटोपशीर आणि छोटे शहर आहे. सर्व महत्त्वाच्या सरकारी दफ़्तरांची कार्यालये ह्या शहरात आहेत.
‘उत्तर मॉरिशस’च्या सहलीतला ‘Fort Adelaide’ (किल्ले अॅडलेड) हा पहिला ‘प्रेक्षणीय’ आणि ऐतिहासिक थांबा. समुद्रसपाटीपासून साधारण अडीचशे फूट उंचावर, एका टेकडीवर ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या किल्ल्यावरून एका बाजूला निळाशार समुद्र व गजबजलेले बंदर आणि एका बाजूला सुंदर पोर्ट लुईस शहर असा मस्त देखावा, उंचावर असल्यामुळे, बघता येतो. चौथा विल्यम याच्या देखरेखीखाली बांधलेल्या ह्या किल्ल्याला राणी Adelaide हिचे नाव दिलेले असले तरीही स्थानिक लोक ह्याला ‘ला सिटाडेल (La Citadelle)’ ह्या नावानेच संबोधतात. किनार्यावर गस्त आणि शहरावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला स्थानिक प्रशासनाने अगदी मस्त मेंटेन केलेला आहे. किल्ल्यातल्या बराकींना छान भेटवस्तूच्या दुकानात रूपांतरित करून तिजोरीत भर पडेल हे ही बघितलेले आहे हे पाहून त्यांचे कौतुक वाटले आणि आपल्या प्रशासनाचा कपाळकरंटेपणा जाणवला.
किल्ल्यावरून डोळे भरून नजारा बघून झाल्यावर पुढच्या प्रेक्षणीय स्थळाकडे कूच केले. ते प्रेक्षणीय स्थळ होते ‘Le Caudan Waterfront’. एका नैसर्गिक भूशिराभोवती भराव टाकून तयार केलेला सुंदर कमर्शिअल कॉम्प्लेक्स. Le Caudan ह्या भूशिरावर पूर्वी वेधशाळा होत्या. त्या पडल्यावर त्या जागेचा उपयोग एक भले मोठे पर्यटन स्थळ बनविण्यासाठी केला गेला. छोटे मोठे शॉपिंग मॉल्स, अनेक रेस्तराँ, एक फाईव्ह स्टार हॉटेल, म्युझियम, अनेक आर्ट गॅलरीज आणि मल्टिप्लेक्स अशा अनेक मनोरंजक गोष्टींनी सजलेल्या ह्या Le Caudan Waterfront वर वेळ अगदी मजेत गेला.
पुढचे प्रेक्षणीय स्थळ आपल्या सर्वांच्या, म्हणजे बॉलीवूडचे चित्रपट ज्यांचा प्राणवायू आहे त्या सर्वांच्या, परिचयाचे आहे. टूर गाईड केविनने ही ह्या स्थळाबद्दल उत्सुकता ताणून ठेवली होती. काही माहिती देतच नव्हता. तुम्ही तिथे गेल्यावर उड्या मारू लागाल असे म्हणत होता. त्या प्रेक्षणीय स्थळाचे नावही ‘Marie Reine de la Paix Church’ असे लांबलचक आणि भयानक होते की तिथे पोहोचेपर्यंत काही कळत नव्हते आणि उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती. तिथे पोहोचलो आणि साक्षात्कार झाला की च्यायला हे ठिकाण तर आपल्या परिचयाचे आहे. ‘मुझसे शादी करोगी’ मध्ये सलमान खान जेव्हा प्रियंका चोप्राला पैशाची निनावी केलेली मदत मीच केली असे सांगण्यासाठी जातो ते ठिकाण किंवा ‘नो एंट्री’ मधल्या क्लायमॅक्सच्या फालतू सीनआधी, जिथे सलमान खान सर्व खरे खरे सांगतो तेच हे ठिकाण. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग इथे होते म्हणून हे स्थळ प्रेक्षणीय स्थळ बनले आहे हे ऐकल्यावर हसू आले आणि अंमळ मजाही वाटली. कारण इथे दिसणारे पर्यटक झाडून सगळे भारतीयच होते. पण आता आलो आहोतच तर फोटो काढून घेऊयात म्हणून फोटो काढून घेतले.
त्यानंतर शेवटचे ठिकाण होते अजून एक शॉपिंग मॉल. आमच्या पुण्यात गल्लोगल्ली अवाढव्य शॉपिंग मॉल झाले आहेत. अशा पुण्यात राहणार्या पुणेकराला कसली आलीय तिकडच्या त्या मॉलची मात्तबरी? हं, अगदीच ओके मॉल होता पुण्याच्या अॅमेनोरा शॉपिंग मॉलपुढे. पण त्या मॉलच्या बाजूला एक आकर्षक नाव असलेली इमारत होती.
तिथे गेलो तर ते एक रेस्तराँ असल्याचे कळले आणि हिरमोड झाला. इथे थोडी पोटपूजा करून घेतली. ‘Roti chaud’ नावाचा लोकल खाद्यपदार्थ. आपली चपाती त्यात मिरचीचा ठेचा बेस, त्यावर दोन भाज्यांच्या थर, लोणचे आणि टोमॅटो सॉसचा (केचप नव्हे) थर बनवून मेक्सिकन तॉर्तिलाप्रमाणे केलेला रोल होता. एकदम टेस्टी होता आणि किफायतशीर ही 🙂
साधारण पाच – सव्वा पाच ला रिसॉर्टवर परत आलो. कपडे चेंज करून लगेच स्विमिंग पुलाकडे पळालो. सिमींगपूलमध्ये मॉरिशसच्या लोकल फिनिक्स बियरचा फडशा पाडत अंधार पडेपर्यंत डुंबत राहिलो (अर्थात, बायको बरोबर होतीच 😉 ).
(क्रमशः)