मॉरिशस सफरनामा (1)


डिप्लोमाला असताना, त्यावेळची ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर, आमच्या विरारचा छोकरा गोविंदा, ‘टारझन’ फेम किमी काटकर, अभिनयसम्राट अमिताभ बच्चन आणि दस्तूरखुद्द रजनीकांत असा सगळा मसाला ठासून भरलेला हिट चित्रपट, हम, त्यावेळी कैक वेळा पाहिला होता. खास आकर्षण अर्थात ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर. त्यात एक गाणे आहे ‘सनम मेरे सनम…कसम तेरी कसम’ . त्यावेळी, ते गाणे बघताना शिल्पा शिरोडकरच्या तोडीस तोड आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे निळेशार समुद्र आणि सफेद रेतीचे किनारे असलेला सुंदर मॉरिशस. हम सिनेमाने ह्या सुंदर मॉरिशसची पहिली भेट तारुण्य सुलभ वयात घालून दिली. त्यावेळीच ह्या देशात जायचे हे मनाशी ठरवले होते फक्त तो योग कधी येणार ते गुलदस्त्यात होते.

मॉरिशस (Ile Maurice)

ह्या वर्षी तो योग जुळवून आणायचा प्लान केला. दिवाळीच्या सुट्टीत सुंदर मॉरिशसला जायची ऑनलाईन तयारी सुरू केली. माझ्या प्लानप्रमाणे फक्त मी आणि बायको असाच दौरा करायचा होता. सर्वात मोठी अडचण, मुलांना घरी ठेवून जाण्यासाठी बायकोला तयार करणे, ही होती. एक दीड महिना प्रयत्न करून पाहिला काही वाटाघाटींना यश आले नाही. मग मी डायरेक्ट बुकिंग करून टाकले आणि त्याची कॉपी बायकोच्या मेलवर फॉरवर्ड केली. त्यातला नॉन रिफंडेबल अमाउंटचा आकडा बघितला की बायकोचा होकार येणार असे गृहीत धरले होते. खरेतर जुगारच होता तो. आता त्याचे काय दान पडते ते पाहायचे होते.

मेल वाचल्यावर बायकोचा फोन आला, “मी आधीच सांगितले होते जमणार नाही! आता ते पैसे कसे परत घ्यायचे ते बघ!” मी, “आता ते पैसे परत मिळणार नाहीत. त्यांच्या ‘Terms and Conditions’ ना हो म्हणून पैसे भरले आहेत.” समोरून एकदम शांतता. चला, एकंदरीत टाकलेला डाव यशस्वी होणार ह्याची लक्षणे दिसू लागली. “बुडू देत पैसे!”, बायको. आता आली का पंचाईत. मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला. होकार मिळाल्यावर लगेच खरीखुरी उरलेली रक्कम भरून टाकली. (बायकोला फॉरवर्ड केलेले मेल मी एडीट केलेले होते 🙂 आता काय भिती, मेलेले  कोंबडे आगीला भीत नाही!)

भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी भल्या पहाटेचे विमान होते पण ते मुंबईतून. त्यामुळे पुण्यातून रात्रीच निघावे लागणार होते. के. के. ट्रॅव्हल्सच्या वेबसाइटवरून एअरपोर्ट ड्रॉप साठी गाडी बुक केली. के. के. ट्रॅव्हल्सची सर्विस एकदम चोख. ड्रायव्हर सांगितलेल्या वेळेवर हजर, युनिफॉर्ममध्ये. कुठे कुठे पिक अप आहेत, किती वाजता आहेत आणि फायनली एअरपोर्टवर गाडी किती वाजता पोहोचेल हे सांगून त्याने कूच केले. मी ही मग डोळे मिटून निद्रादेवीची आराधना करू लागलो. अहो आश्चर्यम! डायरेक्ट एअरपोर्टवरच जाग आली, ड्रायव्हर निष्णात होता याची ती पावती होती. पण ह्या निष्णात ड्रायव्हरमुळे आम्ही वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचलो होतो. चेक इन काउंटर अजून उघडला नव्हता. पण त्या काउंटर समोर भला मोठा क्यू मात्र होता.

भल्या पहाटे, वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचूनही ‘आलिया भोगासी’ असलेल्या क्यू मध्ये निमूटपणे जाऊन उभा राहिलो. रांगेत बहुतेक सर्व गुज्जुभाइ अने गुज्जुबेन. मला गुजराथी कळत असल्याने एकदम करमणुकीचा कार्यक्रमच चालू झाला माझ्यासाठी. त्यामुळे चेक इन काउंटर कधी उघडला हेच कळले नाही. काउंटर वरच्या बाबाने बोर्डिंग पास हातात ठेवले ते 7C आणि 7E. त्याला म्हटले अरे घोळ झालाय तिकिटे बाजूची नाहीयेत. मला वाटले की 3 X 5 X 3 अशा सीट्स असतील त्यामुळे 7C आणि 7E बाजूच्या सीट नाहीयेत. पण तो बुकिंग क्लार्क म्हणाला की सीट्स 2 X 5 X 2 अशी आहेत. विमानात गेल्यावर 7ड वाल्याला रीक्वेस्ट करून सीट अ‍ॅडजस्ट करून घ्या. मी जरा हुज्जत घालायचा प्रयत्न केला पण तो, “Sir, Flight is overbooked and this is what the BEST I can do!” असे म्हणाल्यावर मी गुपचूप ते बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक साठी निघालो.

सिक्युरिटी चेक आणि त्यानंतर ड्यूटी फ्री शॉपमधली विंडो शॉपिंग यात बराच वेळ गेला आणि बोर्डिंगची अनाउंसमेंट झाली. 7ड वर कोण भेटणार ह्या चिंतेत आमच्या सीट्स कडे जाऊन स्थानापन्न झालो. 7ड वर एक चायनीज काका होते. त्यांना रीतसर ‘नी हांव’ केले आणि सीट अ‍ॅडजस्ट करून घ्यायची रीक्वेस्ट केली. ते तयार झाले. मग त्यांना ‘शें शें’ असे म्हणून आभार प्रगट केल्यावर त्यांचा पीतवर्णी चेहरा ‘झिरोच्या’ बल्बप्रमाणे प्रकाशमान झाला. मग त्यांना मी शांघाय मध्ये काही दिवस राहिलो होते ते सांगितल्यावर ते खूश झाले. त्यांची गाडी अपेक्षित गप्पांच्या रुळावर जाणार असे वाटत होते तोच एक गुज्जुभाई आणि गुज्जुबेन, एकदम गुज्जु स्टाइलमध्ये ओरडू लागले, ”सीट खाली करो! ये हमारा सीट है ‘7C, 7D और 7E’. तुम ऐसा देखे बिना दुसरे के सीट पे कैसे बैठ सकता है?”

त्यांचा आवेश आणि तोरा इतका लाउड होता की मला त्याही परिस्थितीत हसू येत होते. (कारण बहुतेक डबल बुक झालेल्या सीटवर मी प्रथम बसलो होतो आणि मला कोणीही उठवू शकणार नव्हते) त्या बेननी लगेच आवाज करून सगळे विमान कर्मचारी गोळा केले. मी माझे तिकिट त्यातील एका कर्मचार्‍याच्या ताब्यात दिले. 5-7 मिनिटांनी एक एअर होस्टेस आली आणि चायनीज काकांना दुसर्‍या सीटवर जाण्यास सांगू लागली. ते काका मला ‘बिजनेस क्लास’ मध्ये अपग्रेड करा म्हणून भांडू लागले. त्यावर एक कॅप्टन आला आणि चायनीज काकांना बाजूला घेऊन गेला. ह्या सगळ्या गोंधळात मला आणी बायकोला एकत्र बसता येते की नाही ह्या काळजीने मला घाम फुटत होता. तोच ती एअर होस्टेस एकदम मधाळ हसत माझ्याकडे आली आणि म्हणाली, “सर, वी आर अपग्रेडींग यू टू बिजनेस क्लास, प्लीज फ़ॉलो मी!” बायको काही बोलायच्या आत लगेच तिच्या हाताला धरून उठवले वरचे आणि सामान न घेताच बिजनेस क्लासच्या दिशेनं पळालो. न जाणो यांचा परत मूड चेंज व्हायचा आणि म्हणायचे, “इट वॉज अ मिस्टेक सर, प्लीज गो टू रो नंबर 37!” पण नाही, बिजनेस क्लास मध्येच सीट्स मिळाल्या. सावकाश सामान पण आले. चायनीज काकांना पण बिजनेस क्लास मध्येच सीट मिळाली.

मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती…

(क्रमशः)

3 thoughts on “मॉरिशस सफरनामा (1)

  1. पिंगबॅक मॉरिशस सफरनामा (२) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाच

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s