
“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.
“कोणाबद्दल बोलताय घारुअण्णा, आज कोणाची कंबख्ती?” नारुतात्या चिवड्याचे ताट ओढत आणि चेहऱ्यावर हसू आणत.
“तुमच्या त्या ‘राउल’ ऊर्फ पप्पूबद्दल बोलतोय मी, का उगाच वेड पांघरताय ह्या दिवाळीच्या मंगलमय सकाळी?” घारुअण्णा चकली ताटात टाकत, भयंकर उद्विग्न होत.
“घारुअण्णा, त्यात त्याचे कसले आलेय कर्तृत्व? ते कर्तृत्व राजीवचे! खी खी खी…”, नारुतात्या चिवड्याचा बकाणा भरत आणि पांचट विनोद करत.
“नारुतात्या, कसले शिंचे पुचाट विनोद करतांय सकाळी सकाळी? मी सीरियसली बोलतोय!” घारुअण्णा करारी चेहरा करून.
“अहो घारुअण्णा! नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?” बारामतीकर.
“बारामतीकर, ह्याची लायकी काय हो? आपल्या ह्या ‘आर्य सनातनी आसेतुहिमाचल भारतवर्षा’चे नेतृत्व करण्यासाठी आणि करोडो जनतेची धुरा वाहण्यासाठी आयात केलेले शिलेदार, सेनापती का लागावेत तुम्हाला?”, घारुअण्णा कसल्याश्या आवेशात.
“ह्म्म्म… तुम्हालाsss”, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.
“नाहीतर काय? आमचे मोदी बघा, असे ह्या अस्सल हिंदुस्तानच्या मातीतून तळपत पुढे आलेले अस्सल स्वदेशी आणि करारी नेतृत्व!”, चिंतोपंत घारुअण्णांच्या खांद्याला खांदा देत.
“घारुअण्णा, तुमची देशाबद्दलची व्याख्या अतिशय जातीयवादी आणि जनमानसाचे ध्रुवीकरण करणारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा तुकडा मोडत.
“वाटलेच मला, अजून कसे ह्यांनी ह्यांचे सेक्युलर तोंड उघडले नाहीं ते!” घारुअण्णा तिरीमिरीत.
“अहो बहुजनहृदयसम्राट, देशाची व्याख्या राहू द्या तात्पुरती बाजूला. पण मला सांगा, ह्या काँग्रेसकडे, नेहरू घराण्याच्या ह्या लाडावलेल्या नातवाशिवाय दुसरे कोणते कणखर नेतृत्व नाही?” चिंतोपंत.
“नाहीतर काय, शिंचा युवराज म्हणे!” घारुअण्णा रागाने धुसफुसत.
“काय हो, काय प्रॉब्लेम काय तुमचा? उमदे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व आहे की राहुल!” इति बारामतीकर.
“हो, आणि नेमके तेच कारण सांगत संघश्रेष्ठींनी अडवाणींच्या गुडघ्याचे बाशिंग काढून घेतले ना?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा दुसरा तुकडा मोडत.
“अहो, देशात अतिरेकी कारवाया होत असताना हे तुमचे सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व परदेशात काय गुण उधळत होते, ते माहीत आहे आम्हाला!” घारुअण्णा रागाने चकलीचा चुरा करत.
“अहो, त्याने CII Industrial Meet मध्ये तोडलेले अकलेचे तारे आम्ही ऐकले आणि पाहिलेसुद्धा. काय म्हणे भारत मधमाशीचे पोळे आहे, भारतीय ट्रेन्समध्ये लोक नाही तर आयडियाज प्रवास करतात. पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणे आउटडेटेड सिलॅबस शिकवला जातो. नॉन्सेन्स!” चिंतोपंत करंजी मोडत.
“अहो चिंतोपंत, फक्त पायलट ट्रेनिंग नव्हे, पूर्ण शिक्षणपद्धतीचा बोर्या वाजलाय म्हणे. हा सुकळीचा म्हणे अमेरिकेत आणि केंब्रिजमध्ये शिकून सुशिक्षित झालाय! अरे, शिरा पडो तुझ्या तोंडात, शिंच्या, आमच्या भारतीय शिक्षण परंपरेला नावे ठेवतोय काय रे नापास गाडग्या!” घारुअण्णा रागाने अजून एका चकलीचा चुरा करत.
“अहो घारुअण्णा, कुठे भरकटत चालला आहात. मुद्द्याला धरून राहा. जनमताचे ध्रुवीकरण करणार्या जातीयवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या नेतृत्वापेक्षा हे सर्वसमावेशक सेक्युलर नेतृत्वच भारताचे भले करेल!” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडूचा घास घेत.
“बहुजनसम्राट, शब्द मागे घ्या! फॅसिस्ट काय, जातीयवादी काय? काहीही बोलाल काय? अहो, गुजराथचा झालेला कायापालट बघितला आहात काय? मोदी फॅसिस्ट आणि जातीयवादी असते तर गुजराथच्या जनतेने त्यांना निवडून दिले असते काय? गुजराथच्या जनतेचा सार्थ विश्वास आहे मोदींच्या कणखर नेतृत्वावर. गुजरातच्या विकासाचे व्यवस्थित पॅकेजिंग आणि मार्केटिंग करून गुंतवणुकीचा ओघ त्यांनी गुजराथेत वळवला आहे. आता हाच ‘गुजराथ पॅटर्न’ भारतभर राबविण्याची गरज आहे. विकास आराखड्याची गरज आहे आज भारताला. पण त्यासाठी सार्थ पुरोगामी वैचारिक बैठक असलेल्या नेतृत्वाची आज निकड आहे आणि नरेंद्र मोदी हाच सार्थ पर्याय आहे आणि ती काळाची गरजही आहे!” चिंतोपंत ठामपणे रव्याचा लाडू तोडत.
“अहो, गुजराथबाहेर ह्या मोदींना कोणी ओळखते का? राहुलचा दिल्लीपासून पार केरळपर्यंत जनमानसावर पगडा आहे. अखंड भारत त्याला आज ओळखतो आणि त्याला पंतप्रधानाच्या रूपात पाहतो आहे. तुमच्या भाजपात तरी एकवाक्यता आहे का? तिथेही तंगडीखेच चालू आहेच. नुसता विकास आराखडा नको आहे, तो सर्वसमावेशक हवा आणि तळागाळातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हवा.” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडू संपवत.
“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.
“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.
“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.
“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.
“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.
“अहो, हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा पोकळ बुडबुडा ह्या दोन्ही पक्षाच्या थिंक टॅन्कने, मीडियाला हाताशी धरून, हवा देऊन फुगवला आहे. अहो, गाजराची पुंगी आहे ही दोन्ही पक्षांसाठी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, काय? त्यात तुमच्यासारखे अनुयायी आहेतच त्या बुडबुड्याला अजून हवा द्यायला. निवडणुकीआधी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत, असे पक्षावर कोणतेही बंधन नसते. ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते. अहो, निवडणुकीत जिंकेल जो जिंकायचाय तो. तुम्ही का आपापसात लढताय फुकाचे? तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा – कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. काय, पटतंय का?” सोकाजीनाना मंद हसत.
“चला, आज चहा नको. दिवाळीच्या मुहूर्तावर बायकोने बासुंदी करून दिली आहे सर्वांसाठी, ती घ्या आणि तोंड गोड करा!” सोकाजीनाना मिश्किलीने.
सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या बासुंदीच्या वाट्या भरू लागले.