डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले. लगेच ‘डायलमुंबई.कॉम’ हे डोमेन नेम सागर मेलवंकी ह्या मित्राच्या साथीने रजिस्टर केले. तुम्ही सोशल नेटवर्क हा सिनेमा पाहिला असेल तर त्यात जसे झुकरबर्ग आणि त्याचा मित्र फेसबुक स्थापन करतात अगदी सेम तसेच आम्ही डायलमुंबई.कॉम हे व्हेंचर चालू केले, मी CTO आणि तो CFO आणि COO.
त्यासाठी मग तांत्रिक संशोधन सुरू झाले. प्रोटो-टायपिंग सुरू झाले. सागर व्हेंचर कॅपिटलिस्ट शोधायच्या मोहिमेवर निघाला. पण पुढे ट्रायच्या (Telecom Regulatory Authority of India) आणि लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही असे कळले! हाय रे कर्मा, सगळे ओंफस झाले आणि जग आणखी एका वुड-बी झुकरबर्गसारख्या ‘यंग आंत्रेप्रेनॉर’ला मुकले. आमची ‘डायलमुंबई.कॉम’ कंपनी पुढे कोणीतरी कोट्यावधी रुपयांना विकत घेईल अशी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे मारणार्या आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
पण त्यावेळी केलेल्या तांत्रिक संशोधनामुळे VoIP ह्या तंत्रज्ञानाची ओळख झाली होती. परवा मुलाने, “बाबा, VoIP फोन म्हणजे काय?” हा प्रश्न विचारला आणि ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणांच्या जखमेवरची खपली निघाली आणि त्यातून भळभळणार्या दुःखाच्या भरात त्याला ते समजावून सांगितले. तर चला बघूया हे VoIP म्हणजे काय ते…
VoIP म्हणजे Voice over Internet Protocol.
Internet Protocol म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी थोडे मागे जाऊयात. दोन संगणक एकमेकांना जोडून त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ‘सॉकेट’चा शोध लावला गेला. दोन्ही संगणकांवर एक एक सॉकेट ओपन करून त्या संगणकांना जोडणार्या केबलमधून माहिती पाठवणे शक्य झाले. पण ही माहिती कशी पाठवतात? तर ती पाठवण्यासाठी एक ‘प्रोटोकॉल’ पाळावा लागतो. तो प्रोटोकॉल म्हणजे नेमके काय? एकदम मजेशीर असते. समजा दोन ओळखीची माणसे भेटली आहेत.
माणूस एक: “नमस्कार!”
माणूस दोन: “नमस्कार!”
माणूस एक: “कसे काय ठीक?”
माणूस दोन: “ठीक, बाकी काय विशेष?”
हे संभाषण हा माणसांमधला शिष्टसंमत प्रोटोकॉल आहे. तसेच दोन संगणक माहिती पाठविताना प्रोटोकॉल पाळतात.
संगणक एक: “पिंग”
संगणक दोन: “पॉंग”
संगणक एक: “माहिती पाठवतो आहे पाठवू का?”
संगणक दोन: “ओके, पाठव”
संगणक एक: “तयार”
संगणक दोन: “ओके”
संगणक एक: “माहिती पाठवली”
संगणक दोन: “मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “नाही, चेकसम एरर, परत पाठव”
संगणक एक: “ओके, पाठवली”
संगणक दोन: “ओके, मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “हो!”
असा हा संवाद दोन संगणकांमध्ये सॉकेटमार्फत, ते सॉकेट जोडलेले असेपर्यंत निरंतर चालू असतो. त्या प्रोटोकॉलला ‘TCP’ – Transmission Control Protocol असे म्हणतात. ह्यामध्ये माहिती छोट्या छोट्या ‘डेटा पॅकेट्स’ मध्ये रूपांतरित करून तुकड्या तुकड्याने एका संगणकाकडून दुसर्या संगणकाकडे पाठवली जाते. पण संगणक इंटरनेटला कुठूनही जोडलेला असू शकतो म्हणजे जगाच्या पाठीवर कुठूनही. मग जगाच्या एका कोपर्यात असलेल्या संगणकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी योग्य तो संगणक कसा शोधायचा ह्याचा प्रोटोकॉल म्हणजे Internet Protocol. वेगवेगळ्या इंटरनेट राउटर्स मधून योग्य तो IP Address असलेला संगणक शोधून डेटा पॅकेट्स त्याच्या पर्यंत पोहोचवण्याची तजवीज हा Internet Protocol करतो. अशा प्रकारे दोन संगणक TCP/IP ह्या Protocol मार्फत एकमेकांची संवाद साधत माहितीची देवाण-घेवाण करतात.
पण ह्या TCP मध्ये डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले आहे की नाही ह्याचा पडताळा घेतला जातो आणि जर डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले नसेल तर ते पुन्हा पाठवले जाते. जर आवाजाची डेटा पॅकेट्स पडताळली गेली तर बोलणे ‘रियल-टाइम’ राहणार नाही आणि सलग ऐकता येणार नाही. त्यामुळे हा TCP प्रोटोकॉल न वापरता ह्याच्या पेक्षा एक सोप्पा आणि लाइटवेट User Datagram Protocol वापरला जातो. हा लाइटवेट अशासाठी की ह्यात ‘error checking and correction’ होत नाही. त्यामुळे VoIP वरून केलेले संभाषण सलग ऐकता येते, पण कधी कधी नेटवर्क कंजेशन असेल तर तुटक ऐकू येते.
पारंपरिक टेलीफोन सर्विस, ‘सर्किट स्विचिंग’ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असते. जेव्हा एखादा फोन केला जातो तेव्हा टेलेफोन ऑफिस मधून त्या दोन फोन्समध्ये कनेक्शन जोडून दिले जाते. हे जोडलेले कनेक्शन म्हणजे ‘सर्किट’. जो पर्यंत कॉल चालू असतो तोपर्यंत हे सर्किट जोडलेले असते. कॉल संपला की हे सर्किट ब्रेक होते. ह्या यंत्रणेला Public Switched Telephone Network (PSTN) म्हणतात. ह्या पद्धतीत सर्किट मधून वाहणारा डेटा हा ‘अॅनॅलॉग’ असतो. अॅनॅलॉग म्हणजे (ह्या लेखाच्या संदर्भात) सतत वाहणारा इलेक्ट्रिक प्रवाह. फोनमधल्या स्पीकरमध्ये बोलल्यावर कंपने तयार होतात, ती कंपने, जी इलेक्ट्रिक प्रवाहच्या माध्यमातून Public Switched Telephone Network ह्या सर्किटमधून पाठवली जातात, अॅनॅलॉग असतात.
बेसिक डेटा Internet Protocol च्या साहाय्याने कसा प्रवास करतो हे कळले. Public Switched Telephone Network मधून अॅनॅलॉग डेटा कसा पाठवला जातो हेही कळले. ह्या दोन्ही प्रकारांचा संगम म्हणजे Voice over Internet Protocol. आवाज (संभाषण), इंटरनेटच्या माध्यमातून प्रवाहित करणारे तंत्रज्ञान म्हणजे VoIP.
पण जर इंटरनेटच्या माध्यम वापरायचे असेल तर डेटा डिजीटल फॉर्म मध्ये पाहिजे, अॅनॅलॉग असून चालणार नाही. त्यासाठी अॅनॅलॉग डेटा ‘कोडेक (CODEC)’ वापरून डिजीटाइझ्ड केला जातो. हा डिजीटाइझ्ड केलेला आवाज ‘पॅकेट स्विचिंग’ च्या साहाय्याने Internet Protocol वापरून दुसर्या पार्टीपर्यंत पोहोचवला जातो. ही दुसरी पार्टी असू शकते.
-
1. टेलिफोन
2. संगणक
3. VoIP फोन


VoIP साठी इंटरनेट हे माध्यम असल्यामुळे आणि डिजीटल डेटा संकीर्ण (Compress) करून पाठवता येतो. डेटा संकीर्ण असल्याने त्याच बॅन्डविड्थ मध्ये बर्याच कनेक्शनसाठी डेटा संक्रमित केला जाऊ शकतो. हा VoIP चा मुख्य फायदा. PSTN सर्किट मध्ये हे शक्य नसते.
VoIP तीन प्रकाराने वापरता येतो
1. Analog Telephone Adaptor (ATA): ह्यामध्ये टेलिफोन इंस्ट्रुमेंट आणि कनेक्शन पोर्ट ह्याच्यांमध्ये Analog Telephone Adaptor बसवला जातो जो अॅनॅलॉग डिजीटल कंव्हर्जन करतो. (हे भारतात शक्य नाही)
2. IP Phone: हा फोन दिसतो एकदम नॉर्मल फोन सारखा पण नॉर्मल फोनसारखे RJ-45 कनेक्शन न वापरता RJ-45 इथरनेट कनेक्शन वापरतो. त्यासाठी ह्या फोनला लागते LAN नेटवर्क किंवा WiFi नेटवर्क
3. संगणक ते संगणक: ह्यामध्ये संगणकामध्ये एक सॉफ्टवेयर स्थापित (Install) केले जाते. हे सॉफ़्टवेयर ATA आणि ‘कोडेक (CODEC)’ चे काम करून संगणकाला उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा वापर करते. स्काइप, वायबर, मॅजिकजॅक अशी अनेक सॉफ्टवेयर्स उपलब्ध आहेत जी वापरून VoIP ची कमाल अनुभवू शकतो.
पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. PSTN टेलिफोन सर्विसमध्ये फोनला विद्युतपुरवठा PSTN एक्सेंजकडून होतो, म्हणजे तुमच्या घरचा विद्युतपुरवठा बंद असला तरीही फोन चालू असतो. हे काही कळीचे मुद्दे सध्या VoIPच्या वापरावर मर्यादा आणतात.
थोड्याच काळात ह्यावर उपाय शोधले जाऊन ते तंत्रज्ञान क्रांती घडवून पारंपरिक PSTN टेलिफोन सर्विस मोडीत काढण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही VoIP वापरून संभाषण करत असाल आणि ते ठीक होत नसेल तर तंत्रज्ञानाला नावे ठेवण्याआधी त्यामागची यातायात समजून घ्या आणि मगच नावे ठेवा.
तर आता VoIP म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?