चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

chawadee

आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.

“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.

“बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.

“अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“बारामातीकर, कुठे आहे तुमचा जाणता राजा ह्या दुष्काळात? आहे का काही त्या माजी कृषीमंत्र्याला शेतकऱ्याचे?”, इति चिंतोपंत.

“अमेय खोपकर ह्या बॉलीवूड सेनेच्या अध्यक्षाने मनसे तर्फे बॉलीवूडला आवाहन केले आहे शेतकर्यांना सढळ हाताने मदत करायला, चांगला काम आहे!”, इति घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, हे असे आवाहन की आव्हान? ”, बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका हसत.

“हो ना, कसलं आवाहन न आव्हान, धमकीच म्हणा ना सरळ.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, अहो जमीन कसून अन्नधान्य पिकवणाऱ्याची काळजी करायला नको का?”, घारुअण्णा तिरमिरीत.

“काळजी तर करावीच ना, पण अशी दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवून?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, जागृती होतेय हे काही कमी आहे का? पावसाने कंबरडे मोडले आहे.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, तथाकथित बहुजन नेत्यांकडून काही सुरुवात झाली नाही म्हणून विरोध दुसरं काय?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! स्वतः: काय केलेय मदत करण्यासाठी? दुसऱ्यांना वेठीस का म्हणून?”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, हा कळवळा कृष्णकुंजातील गारेगार एसीमध्ये बसूनच आलाय ना? की विदर्भात किंवा मराठवाड्यात बसून आलाय?”, बारामतीकर शांतपणे.

“टोल आंदोलनात मिळालेलं काही द्यायचे की आधी स्वतः:, मग आवाहनं करायची दुसऱ्यांना!”, इति भुजबळकाका.

“ओह्हो! घारुअण्णा, आत्ता माझ्या लक्षात आलं कोण आयजी आणि कोण बायजी ते.”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जर मदत करतात तर बॉलीवूड कलाकार का करू शकत नाही असा सवाल विचारणारे हे टिकोजीराव कोण?”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“नाशिकच्या ‘नवणिर्माणा’तूनही काही ‘भले’ झालेच असेल की ते वापरायचे दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी”, बारामतीकर आवेशात.

“अहो पण हे शिंचे कलाकार कमावतात की खोऱ्याने मग सामाजिक बांधिलकी वैग्रे काही आहे की नाही?”, घारुअण्णा तणतणत.

“ते त्यांचं त्यांना ठरवू द्याना, त्यांची सामाजिक बांधिलकी ठरविणारे तुम्ही कोण? ”, भुजबळकाका हसत.

“अहो पण आपला नाना आणि मकरंद करताहेत ना? त्यांचे बघून तरी काही लाज बाळगायची…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. मराठी माणसाने मराठी माणसासाठी काही केले की लगेच बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकारांचा पोटशूळ कसा उठतो बघा! ”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“अहो राजने काहीतरी करून पक्षाची मोट बांधली आहे, पदं आणि पदाधिकारी उभे केले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही कामं नकोत का?”, सोकाजीनाना मंद हसत

“आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे मनसे पहिल्यांदा करते आहे का? शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा म्हणजे नेमके काय करा, ती मदत जर बॉलीवूडचे कलाकार करणार असतील तर त्यात मनसेचा काय रोल, ह्या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. ब्लु प्रिण्ट मध्येही हेच केले होते. आता, नाना आणि मकरंद मैदानात उतरून काही करताहेत हे दिसल्यावर अचानक एक विषय मिळाला प्रकाशात यायला. शेतकऱ्यांना पैसे वाटून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? त्यांच्या समस्या काय आहेत आत्महत्या करण्यामागच्या त्याचा अभ्यास करून, मुळाशी जाऊन, निराकरणासाठी काही ठोस कार्यक्रम राबवायला हवा ना! तसे करण्याची सोडा, नुसते विचार करण्याची तरी कुवत आहे का? नुसते सढळ हाताने मदत करा असे आवाहन कम गर्भित धमकी देऊन समस्या नाहीशी होते का? नाही! त्याने फक्त ‘उपद्रवमूल्य’ लोकांच्या मनात ठसवता येते आणि हेतू तोच आहे. ‘आम्ही आहोत अजून, आम्हाला विसरू नका एवढ्यात‘, हाच संदेश लोकांच्या मनातफ़ ठसवायचा आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

“आणि आपण बसतो आपापली अस्मितांची गळवं कुरवाळत, तथाकथित नेत्यांनाही तेच हवे असते. सोडा तो अकलेचा दुष्काळ आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना घारूअण्णांच्या खांद्यावर हात टाकत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.