भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे ‘पिंगा’ हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित ‘मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक’ यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.
ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल ‘बाजीराव-मस्तानी’ पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले? तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.
पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा ‘पुरोगामी’ होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.
कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.
बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती ‘तवायफ‘ की पत्नी ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला ‘गाणी बजावणी‘ करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.
ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर ‘तवायफ‘ ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे! ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.
सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.
भव्य-दिव्य न् महागडे सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.
राहता राहिले ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची ‘तडफदार आणि धडाकेबाज’ भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.
बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!