शाळेच्या एका ग्रुपवर बर्याच टूम निघत असतात. एके दिवशी प्रशांत गोरे ह्या मित्राने एक फोटो शेअर करून टूम काढली की फोटोवरून काहीतरी हटके लिहा. त्याच्या कोकणातल्या आजोळच्या घराचा फोटो होता तो. कस काय कोण जाणे पण ते घर बघितल्यावर एकदम नारायण धारप आणि त्यांच्या रहस्यकथा आठवल्या. आणि, लक्षात आल की ह्या प्रकाराच काही लिहीले नाहीयेय. प्रयत्न करून बघितला, तो असा…

सूर्य कासराभर वर येऊन सगळा आसमंत लख्ख करून गेला. जांभ्याच्या चिरांच्या भक्कमपणावर ठाकलेल्या त्या घराचा परिसर उजळून गेला होता आणि प्रसन्न वातावरणाचा आभास निर्माण झाला होता. घराभोवतालच्या हिरवाईची आभा सकाळच्या उत्साही वातावरणाला द्विगुणीत करत होती.
रात्रीच्या अभद्र वातावरणाचा मागमूस कणभरही उरला नव्हता. रात्रीच्या काळोखात, आता प्रसन्न भासणारी, गडद हिरवाई ह्याच वातावरणाला गूढतेचं वलय देऊन भयंकर कोलाहल सामावून होती ह्यावर विश्वास बसणंच कठीण होत होतं.
सामसूम भासणाऱ्या पाउलवाटेवर रात्री कितीतरी पाशवी शक्तींचा उच्छाद चालला होता ह्यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण होतं. निवडूंगाच्या जाळीत, अतृप्त आत्म्यांची, रात्रभर चाललेली अघोरी धडपड एकंदर वातावरणाला भारून गेली होती त्याचा आता मागमूसही दिसत नव्हता.
सकाळचा सूर्यप्रकाशाचा सडा, सगळ्या अभद्रतेला तिलांजली देऊन, तेजोमय आणि मंगलमय दिवसाची सुरूवात करत होता!
मोठा फोटो