आर्ट ऑफ डाइंग – मृत्यूवर प्रेम करण्याची कला

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित

आहार, निद्रा, मैथुन आणि भय ह्या आदिम संवेदनांपैकी भय ही संवेदना सजीवाला त्याच्या अस्तित्व रक्षणासाठी प्राप्त झालेली प्रेरणा आहे. ह्या भयाच्या संवेदनेमुळे सजीव, जीवाला होऊ घातलेला धोका समजू शकतो आणि जीवनप्रवाह अपघाती संपण्यापासून जीवाचे रक्षण करू शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे, जीवनप्रवाह चालू राहण्यासाठी  होणारी नैसर्गिक प्रेरणा.

उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा जीवामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं अस्तित्व नव्हतं तेव्हा जीव आपलं नियत कर्म करून अनंतात विलीन होऊन जायचा, खऱ्या अर्थाने. (म्हणजे जन्म मृत्यूचा फेऱ्यात न अडकता, हे फक्त ह्या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांसाठी, बाकीच्यांनी सोडून द्यावे). पण पुढे उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचा विकास होऊन ही इंद्रियं अस्तित्वात आली. अहंकारामुळे अस्तित्वाच्या मी-पणाची भावना अस्तित्वात आली तर मन, बुद्धी इंद्रियांमुळे कर्म-संस्कार अस्तित्वात आले. अहंकारामुळे ‘अहं ब्रह्मास्मी’ ह्या जाणिवेशी फारकत होऊन अस्तित्वाच्या मोहाच्या पडद्यामुळे मी म्हणजे शरीर ही भावना प्रबळ झाली. ज्या क्षणी ही भावना प्रबळ झाली त्याच क्षणी त्या शरीराच्या अस्तित्वाच्या नष्ट होण्याच्या भितीची भावना प्रबळ झाली आणि तिचा कर्म-संस्कार झाला (म्हणजेच जन्म मृत्यूचा फेरा सुरू झाला).  

सजीवांपैकी मनुष्यप्राणी जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा त्याच्यातील बुद्धीचा विकास वेगाने होत गेला. संकल्प-विकल्पात्मक मनाने ह्या विकसित बुद्धीच्या साहाय्याने भय ह्या नैसर्गिक संवेदनेचा (प्रेरणेचा) विस्तार करून अहंकाराच्या मदतीने आदिम भीतीला अनेक आयाम दिले. माणसाने भौतिक प्रगतीत जशी जशी घोडदौड सुरू केली तशी तशी वेगवेगळ्या भयाचे आविष्कार (PHOBIA) अस्तित्वात येत गेले. भयाचे हे अनेक प्रकार असले आणि आपल्या मनात सदैव भीती वास करीत असली तरी,  मनुष्याला सगळ्यात जास्त भय जर कुठल्या गोष्टीचे वाटत असेल तर ते मृत्यूचे.

जन्माला  येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जीवाच्या हातात नसतो. त्या दोन श्वासावर त्याची हुकुमत किंवा सत्ता चालत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय? ह्या अस्तित्वाच्या अज्ञाताच्या भयाने मृत्यूचा धसका बसलेला असतो. ह्या भीतीमुळेच मृत्यू ह्या घटनेचे महत्त्व जीवाला कळलेलं नव्हतं. परंतु बुद्धीच्या प्रगल्भतेमुळे मनुष्याला “कोsहं” हा प्रश्न पडला आणि त्याने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अनेक थोर साधकांनी, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, बुद्धावस्था प्राप्त करून घेऊन जन्म-मृत्यूचे रहस्य उलगडवले. मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसतो पण त्या दोन श्वासांच्या दरम्यानचे सगळे श्वास मात्र आपल्या हातात असल्याने त्या सर्व श्वासांना आपल्या  नियंत्रणात ठेवून जीवन समृद्ध करत जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिविंग) विकसीत केली. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व बुद्धांनी आणि अरिहंतांनी विविध साधनामार्ग शोधून त्या मार्गांनी मोक्षप्राप्तीचा (कर्म-संस्कार निर्मूलनाचा) पर्याय उपलब्ध करून दिला. फक्त वैराग्य मार्गानेच नव्हे तर प्रपंचात राहूनही मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला. पण फक्त जगण्याची कलाच महत्त्वाची नाही  तर त्याच बरोबर ‘मृत्यूची कला’ (आर्ट ऑफ डाइंग) ही तितकीच महत्त्वाची आहे हेही त्यांनी समजावून दिले आहे, फक्त दर्शनमार्गानेच नव्हे तर योगमार्गानेदेखील. पण ही मृत्यूवर प्रेम करायला लावणारी ‘मृत्यूची कला’ समजण्यापूर्वी जन्म आणि मृत्यू ह्या घटना समजणे महत्त्वाचे आहे.

जीवनप्रवाह हा ऊर्जेचा एक अखंड प्रवाह आहे. ही ऊर्जा म्हणजेच चैतन्य, परब्रह्म! ऊर्जा एका आकारातून दुसऱ्या आकारात साकार होत सतत प्रवाही असते. आकार निर्माण होणे आणि नष्ट होणे ही अटळ वारंवारता आहे कारण नित्य काही नाही, सर्व साकार सृष्टी अनित्य आहे. जन्म ही घटना, ऊर्जेचे एक जीर्ण आकार सोडून नवीन आकारात साकार होणे आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहेच!

जन्म  – अविरत आणि अखंड विचारप्रवाह, त्यानुसार शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना  आणि त्या संवेदनांनुसार प्रतिक्षिप्त होणारे कर्मसंस्कार, हा घटनाक्रम पहिल्या श्वासापासून चालू होणे आणि हे सर्व प्री-प्रोग्राम्ड होऊन ‘ऑटो पायलट‘ मोड मध्ये काम सुरू होणे  हा जन्म. हेच जन्म झालेल्या सजीवाचे जीवन, ऊर्जेचे साकार रूप. अविरत आणि अखंड विचारप्रवाहामुळे निरनिराळे कर्मसंस्कार मनाच्या खोल डोहातून उफाळून वर, मनःपटलावर येत असतात आणि सजीव त्या कर्मसंस्कारांवर प्रतिक्षिप्त होत कर्मेंद्रियांद्वारे आयुष्यभर कर्म करत असतो.   

मृत्यू – ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे. पण ती फार महत्त्वाची घटना आहे कारण फार महत्त्वाचे ऊर्जेचे संक्रमण ह्या घटनेतून होत असते (आणि पुढचा जन्म ह्या घटनेशी अत्यंत संलग्न असतो). वर सांगितलेल्या ऑटो-पायलट घटनाक्रमानुसार मृत्यू समोर आल्यावर ते मृत होईपर्यंत अनंत विचार मनःपटलावर उमटतात आणि त्या विचारांवर प्रतिक्षिप्त होत कर्म केल्याने कर्मसंस्कार घडतात (हेच कर्मसंस्कार पुढच्या जन्म ह्या घटनेवर प्रभाव टाकतात, संचिताच्या स्वरूपात). पण मृत्यूचे भय असल्याने त्यावेळी येणारे विचार हे त्याच भावनेने पछाडलेले असतात. सर्व काही निसटून जाणार ही भावना आणि त्यामुळे येणारी व्याकुळता ही मृत्यू ह्या अटळ घटनेला कष्टप्रद आणि वेदनादायी तर बनवतेच पण त्याच्याशी संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेलाही प्रभावित करते. त्यामुळे ऊर्जेचे संक्रमण पुढील कोणत्या आकारात आणि कसे साकार होणार हे मृत्युसमयी असलेल्या ऊर्जास्थितीवर (मन:स्थितीवर) अवलंबून असते. म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे!

जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू  योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो. म्हणजेच मृत्यू (ऊर्जा संक्रमण) हा नैसर्गिक असायला हवा. ह्यामुळेच धर्मग्रंथांमध्ये आत्महत्या हे पाप असं म्हटलं आहे. परंतु मोक्षप्राप्त सिद्ध योगपुरुषांनी (उदा. संत ज्ञानेश्वर) समाधी अवस्थेत जाऊन देह त्यागणं हे अनैसर्गिक नाही. कारण मोक्षप्राप्तीमुळे कर्म-संस्काराचे निर्मूलन झालेले असते आणि त्यामुळे त्या मुक्तावस्थेत ऊर्जा संक्रमणाची घटना घडताना पुढचा आकार (जन्म) नसतो, असतं ते फक्त अनंतात विलीन होणं.

‘आर्ट ऑफ डाइंग’ म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला त्यामुळेच फार महत्त्वाची आहे, मृत्युसमयी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि मृत्यू नैसर्गिक होण्यासाठी. मरणावर प्रेम करायचे म्हणजे भौतिक जगात घडणाऱ्या अनेक अटळ घटनांपैकी मृत्यू हीदेखील एक अटळ घटना आहे हे समजून त्याला निर्विकार आणि निर्विचारपणे हसतमुख सामोरे जाणे आणि तो केव्हाही येऊ शकतो हे ध्यानात ठेवून त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असणे! पण अशी सज्जता असणे किंवा मृत्यूच्या असे प्रेमात असणे हे ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ इतके सोपे नसते. ‘आर्ट ऑफ डाइंग’ साठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ येणं फार गरजेच आहे.  कारण ह्या दोन्ही कला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकीँना पूरक असलेल्या. त्यांच्यामुळेच मृत्यूच्या प्रेमात पडून त्याला सामोरे जाण्याची सज्जता करता येणं शक्य असतं. जीवन जगत असतानाच जन्म आणि मृत्यू यांची संलग्नता समजून मृत्यूवर प्रेम करण्याची कला शिकायची म्हणजे मग प्रत्यक्ष मृत्यू होताना त्याला सहजतेने सामोरे जाता येते.

पण हे साधायचे कसे? त्यासाठी काही मार्ग नाही का? इतक्या प्राचीन आणि सनातन तत्त्वज्ञानात ह्यावर काहीच उहापोह झाला नाहीयेय का? तर, आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला  शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच ‘आर्ट ऑफ डाइंग’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि  पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे. प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच ‘आर्ट ऑफ डाइंग’. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!

ह्या समाधी अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विचार/विकार मनःपटलावर येतात, त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते. शरीर जीर्ण झाल्याने, शेवटचा श्वास घेऊन सोडताना, सर्व कर्म-संस्कारांच्या अंतिम आणि अफाट रेट्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचे (चैतन्य किंवा प्राणाचे) संक्रमण होते, ही घटना म्हणजेच मृत्यू. त्यावेळी उफाळून येणारे  कर्म-संस्कार हा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो. त्या अनेकविध भावनांपैकी जी भावना प्रबळ असेल त्यानुसार शेवटचे कर्म घडून त्याच्या प्रभावाने ऊर्जा संक्रमणाचा पुढचा आकार (जन्म) ठरतो. पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.

समाधी अवस्थेत देहातीत शून्याची अनुभूती येते जी शेवटचा श्वास घेतला जातो तेव्हा होत असते. साधनेमुळे त्या अवस्थेची अनुभूती सरावाने मिळालेली असल्याने त्याला सामोरे जाताना  भांबावून आणि दडपून (Overwhelmed) न जाता  चित्त स्थिर राहते. तसेच साधनेमुळे कोणत्याही कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची, प्रतिक्षिप्त न होण्याची कला साधलेली असते. त्यामुळे मृत्युसमयी भयामुळे येणाऱ्या कर्म-संस्कारांवर तटस्थ राहता येऊन सर्व व्याकुळता टाळता येते. ही साधना आयुष्यभर करायची असते, अगदी शेवटाच्या श्वासापर्यंत. ही साधना म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला. ह्या प्रेमामुळेच मृत्यूला न घाबरता किंवा त्याच्यासाठी अधीर न होता, तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या कवेत अलगद सुपूर्द  करता येणे शक्य होऊन शांतपणे अनंतात विलीन होता येते.

ह्या मृत्यूवर प्रेम करण्याच्या कलेमुळेच (आर्ट ऑफ डाइंगमुळे) मृत्यू हा नकोशी घटना न होता त्या मृत्यूचा वैयक्तिक सोहळा साजरा करता येतो.