आशा भोसले – जीवेत शरद: शतम् 

आशा भोसले
(Image used from Internet – Wikipedia)

मिसरूड फुटण्याच्या काळात, सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बाजीगर सिनेमा बघण्याचा योग आला. नाही… नाही… शाहरुख खान बद्दल काही म्हणायचं नाहीयेय. त्या सिनेमामध्ये एक गाणं होतं, ‘किताबे बहुत सी पढी होगी तुमने, कही कोई चेहरा भी तुमने पढा है ‘. ते गाणं तेव्हा ऐकलं त्यावेळी त्या गायिकेचा धारदार आवाज काळीज चिरत खोलवर गेला. त्या आवाजाची इतकी भुरळ पडली होती की ते गाणे अक्षरशः लूपवर लावून ऐकत होतो. पण तो आवाज कोणाचा आहे हे त्यावेळी माहिती नव्हत कारण त्या वयात तोपर्यंत किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि के. एल. सैगल सोडून यांच्या पलीकडे संगीत जास्त ऐकलं नव्हत. (गाण / संगीत ऐकण्याची साधन तेव्हा परवडणारी नव्हती.) तेव्हा त्या गाण्याच्या गायिकेचा आवाज कोणाचा आहे हे माहिती नसल्याने साहजिकच कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतला. तेव्हा तो आवाज आशा भोसले यांचा आहे असं कळलं! ते कळलं आणि चाटच पडलो कारण त्या वर्षी आशाबाईंचं वय साठ (६०) वर्ष होतं. सतरा – अठरा वर्षांच्या अल्लड तरुणीला तो साठ वर्षाच्या गायिकेचा आवाज चपखल बसला होता!

आशाबाईंचा आवाज आहे कळल्यावर झपाटून गेलो आणि त्यांच्या गाण्यांची शोधमोहीम हाती घेतली. आणि, त्या शोधमोहिमेत जे काही हाती लागलं त्याने आयुष्यच बदलून गेल. आशाबाईंच्या गाण्यांचा मग जो काही खजिना हाती लागला आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी अशी काही मनावर पडली त्यातून आजही बाहेर येता येत नाहीयेय. त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडून, त्यांचा फॅन होऊन, ‘लता ग्रेट की आशा’ ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, एक वेगळीच धुंदी होती त्यात त्या अल्लड वयामध्ये. आणि, त्या गाण्याच्या आवाजाच्या मोहिनी मुळे हे असले वाद कसे निरर्थक आणि पोकळ आहेत याची जाणीवही नसायची पण ते भारावलेपणच तितकं तीव्र होतं.आशाबाई – आर डी बर्मन, आशाबाई – ओ पी नय्यर, आशाबाई – कॅब्रे सॉंग्स, आशाबाई – मादक गाणी अशी अनेक समीकरण झाली होती. पण ह्या सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आवाजावरची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

मध्यंतरी कुठल्यातरी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्या आणि सुनिधी चौहान दोघीही एकत्र होत्या. (सुनिधी चौहान ही माझी आताच्या काळातली आवडती गायिका) त्यावेळी आशाबाईंनी गायकाला (स्पर्धकाला) काहीतरी सल्ला दिला आणि खाण्यापिण्याची काळजी गेट आवाजाची निगा कशी राखायची या बद्दल काहीतरी सांगत होत्या. त्या वेळेस सुनिधीने, “मी तर चॉकलेट, आइसक्रीम मनमुराद खाते,जीवन मुक्त जगलं पाहिजे” असल्या टायपाची काहीतरी अल्लड विधान करून आशाताईंना प्रतिवाद करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरंच हसूआलं, ज्या वयामध्ये आशाबाई तिच्या समोर बसून त्यांच्या आवाजाच्या ताकदीने स्टेजला आग लावता होत्या त्या पुढे अशी काहीतरी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचा कळस होता. असो! अशा या हरहुन्नरी गायिका, आशाबाई आज वयाच्या 88 व्या वर्षी वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.