कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा नचिकेत गद्रेशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम नचिकेत डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग ‘उन्नीस बीस’ यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने ‘टाटा ब्रॅन्ड’ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल 🙂

साहित्य:

प्रकार व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल
व्हाइट रम १ औस (३० मिली)
कोकमाचे सरबत १ ग्लास
स्वीट आणि सार सिरप १० मिली
चाट मसाला
कोथिंबीर
लिंबाचे काप
मडलर
बर्फ
ग्लास हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

‘किंचीत’ हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल ‘उन्नीस बीस’ होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल ‘किंचीत’ प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. 🙂

धुक्यात हरवली वाट…

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट…

जरी फोटोंमधले हे सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती तेव्हा तिथे माझ्या मनात. हे सर्व फोटो इथे टाकताना काही फार छान फिलींग मात्र नाहीयेय. कारण विचारताय? बरं सांगतो… कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती 😦 सगळे मद्रासी अण्णा बरोबर होते, काहीतरी पांचट जोक्स करत, तेही तमिळ मध्ये 😦

असो, पण त्याने ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवरची उन्मादकता कमी होत नाही नक्कीच!

रंगबिरंगी भूछत्रं

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्‍यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. चेन्नैच्या भयंकर उकाड्यावर हा उतारा एकदम कातिल होता.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी ‘कोकर्स वॉक’ नावाच्या साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एक रपेट मारून ‘साईटसिइंग’ला सुरुवात झाली. त्यानंतर एक जंगलातला ट्रेल होता. सुरुच्या बनातून असलेला एक मस्त ट्रेल. अचानक एका चढावर एक लहान फुलाच्या गुच्छासारखे काहीतरी दिसले म्हणून फोटो काढायला पुढे सरसावलो आणि काय आश्चर्य, ती फुले नसून रंगबिरंगी भूछत्र, कुत्र्याच्या छत्र्या किंवा जंगली अळंबी असल्याचे निदर्शनास आले. एकदम चकितच झालो ती विविध रंगातली भूछत्री बघुन. आजूबाजूला बघितल्यावर जाणवले की खूपच सुंदर, ह्यापूर्वी कधीही न बघितलेले भूछत्र्यांचे रंगबिरंगी आणि मनमोहक विश्व.

लहान मुली पावसात छत्र्या घेऊन फिरायला निघाल्या आहेत असे वाटायला लावणारी ही सुंदर आणि लालचुटुक भुछत्रे.

चॉकलेटच्या किंवा कॉफीच्या लॉलीपॉपची आठवण करून देणारी ही कॉफी कलरची सुंदर भुछत्रे.

लहानपणी गंगा नदीची जी काही चित्रमय झलक पाहिली होती त्यानुसार गंगा नदी म्हटले की तिच्या घाटावर असलेल्या पंडित लोकांच्या गोलाकार छत्र्या ह्यांचीच आठवण मला प्रथम होते. ही भुछत्री बघितल्यावर एकदम त्यांची आठवण झाली. चमक (शायनिंग) असलेली भुछत्रं पहिल्यांदाच बघितली, मी तरी.

ही भुछत्रे भरघोस फुलांचे गुच्छ असल्याची जाणिव करून देत आहेत.

चिमुकली आणि अगदी नाजूक असणारी ही भुछत्रे बघताच एकदम नाजूक चणीच्या लहान गोंडस बालिकांची आठवण होते.

एकदम एलियनांच्या UFO प्रमाणे दिसणारी ही एकदम वेगळ्याच रंगछटा असलेली भुछत्रे.

फुलांच्या गुच्छाप्रमाणेच असणारी ही भुछत्रे, पण ह्यावेळी वेगळ्या नजरेने आणि ऍंगलने बघितल्यावर कॉर्नेट ह्या म्युसिकल इंस्ट्रुमेंटला असलेल्या दट्ट्यांची आठवण होत होती.

काही रेखाचित्रे

मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत ‘रंगायन‘ ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्‍या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्‍याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची.

एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो. बस त्यानंतर पुढे काही नाही

तर ही त्यावेळी अचानक आलेल्या उर्मीत काढलेली काही रेखाचित्रे: