कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)

2012 ह्या सरत्या वर्षातला शेवटचा शुक्रवार! एक कॉकटेल का हक तो बनता है।
एका जबरदस्त कॉकटेलनी ह्या वर्षाची सांगता करुयात.

तर ‘कॉकटेल लाउंज’ मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).

पार्श्वभूमी:

माइ ताइ हे नाव वाचून , “ताइ माइ अक्का विचार करा पक्का” ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय? तर असो, ह्या कॉकटेलची पार्श्वभूमी अगदी चित्तवेधक आहे.

पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत अमेरिकेत, युद्धात शस्त्रसामग्री विकून मिळालेल्या अमाप पैशामुळे, अनेक बदल, स्थित्यंतरे होत होती, सुधारणा होत होत्या. अमेरिकन्स नव्या नव्या कल्पनांच्या भरार्‍या घेऊन नवनिर्माणाचे कार्य मनापासून करीत होते. त्याच काळात अमेरिकेत ‘टिकी संस्कृती’चा (Tiki Culture) प्रभाव पडला होता. त्या प्रभावाखाली रेस्तराँ आणि बार ह्यांची रचना पॅसिफिक महासागराच्या दक्षिणेला असलेल्या पॉलिनेशिआ ह्या द्वीपसमूहांतील रेस्तराँ आणि बारच्या धर्तीवर (Polynesian-themed) केली जाऊ लागली. डॉन बीच (Donn Beach) ह्या त्या टिकी पब्ज आणि बार याचा जनक समजला जातो.


(हे छाचि विकीपिडीयावरून साभार)

पुढे व्हिक्टर ज्यूल्स (Victor Jules Bergeron) ह्या इसमाने त्याच्या ‘ट्रेडर विक्स (Trader Vic’s)’ या टोपणनावाने एक टिकी रेस्तराँ आणि बार सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे चालू केला. हाच व्हिक्टर ज्यूल्स ‘माइ ताइ’ ह्या कॉकटेलचा जनक मानला जातो. पण डॉन बीचने सुरुवातीला हे कॉकटेल हा त्याचाच शोध असल्याचा दावा केला होता. पण त्याची कॉकटेल सामग्री आणि कॉकटेलची चव बरीच वेगळी असल्याने तो दावा पुढे फोल ठरला.

पण मला अजूनही तुमच्या चेहेर्‍यावर असलेले भले थोरले प्रश्नचिन्ह दिसते आहे आणि तो प्रश्नही मला कळतो आहे की, ‘माइ ताइ’ हेच नाव का आणि कसे?

सांगतो! त्याचे काय झाले की व्हिक्टर जुल्सने त्याचा पहिला ट्रेडर विक्स हा रेस्तराँ आणि बार चालू केल्यावर एका दुपारी त्याला त्याचे काही ताहिती मित्र ताहिती आयलंडवरून (पॉलिनेशियामधील एक द्वीप) भेटायला आले होते. त्यांच्यासाठी स्पेशल ड्रिंक म्हणून त्याने, रम आणि कुरास्सो लिक्युअर वर आधारित एक शीघ्ररचित (Improvised) कॉकटेल तयार केले. ते कॉकटेल प्यायल्यावर त्याचा ताहिती मित्र एकदम खूश होऊन ताहितीमध्ये अत्यानंदाने उद्गारला “Maita’i roa ae!“. त्याचा अर्थ ‘Very good! Out of this world!‘ म्हणजेच ‘एकदम फर्मास, कल्पनेपलीकडचे!’. त्याच्या त्या उद्गारांचेच नाव ह्या कॉकटेलला मिळाले, ‘माइ ताइ’.

चला, आता बघूयात ह्या कल्पनेपलीकडच्या कॉकटेलची रेसिपी.

प्रकार रम ऍन्ड कुरास्सो लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
डार्क रम 1.5 औस (45 मिली)
व्हाइट रम 1.5 औस (45 मिली)
क्वांथ्रो (कुरासाओ लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
अमारेतो (आल्मन्ड लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
ग्रेनेडाइन 10 मिली
बर्फ
लिंबचा काप सजावटीसाठी (अननसाचा असल्यास उत्तम)
ग्लास ओल्ड फॅशन्ड ग्लास

कृती:

कॉकटेल शेकर मध्ये अर्धा शेकर भरून बर्फ भरून घ्या. वरील सर्व साहित्य कॉकटेल शेकर मध्ये ओतून घ्या.
शेकरवर बाहेरून बाष्प येईपर्यंत व्यवस्थित शेक करून घ्या.

आता ते मिश्रण ओल्ड फॅशन्ड ग्लासमध्ये ओतून घ्या. माइ ताइ परिपूर्ण करण्यासाठी ह्या मिश्रणावर डार्क रमचा एक थर असणे जरुरी आहे.
बार स्पून वापरून डार्क रमची एक धार त्या मिश्रणावर सोडून द्या.

आता ग्लासवर लिंबाचा एक काप सजावटीसाठी लावून घ्या.

चला तर, कल्पनेपलीकडचे माइ ताइ तयार आहे 🙂

तुम्हा सर्वांना नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नविन वर्षाचे स्वागत ह्या धडाकेबाज कॉकटेलच्या साथीने साजरे करा.

कॉकटेल लाउंज : गोवन समर

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा माझा मित्र नचिकेत गद्रे ह्याच्याशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी (Cazcar Brand) 2 औस (60 मिली)
कॉइंत्रो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
लिम्का
बर्फ
मीठ
लिंबाचा काप (सजावटीसाठी)
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लावून घ्या.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : बॉईलरमेकर (BoilerMaker)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बॉईलरमेकर (BoilerMaker)”

पार्श्वभूमी:

अगदी सुरुवातीला जेव्हा ‘फक्त चढवण्यासाठी’ पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे ‘पिण्यावर’ मर्यादा यायची (खरेतर हे ‘खिशाला न परवणारे असल्यामुळे’ असे असयला हवे 😀 ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम ‘स्वस्तात मस्त’ होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच… रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला… 😉

आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!

प्रकार बियर कॉकटेल
साहित्य
कॅनेडियन राय व्हिस्की
(पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल)
1 औस (30 मिली)
बियर 1 टिन
ग्लास बियर ग्लास आणि शॉट ग्लास

कृती:

ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या.

आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा ‘डुब्बुक’ असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य…

आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा.

चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : Almonda Amarita

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “Almonda Amarita

पार्श्वभूमी:

काल अस्मादिकांचा वाढदिवस होता, त्यानिमीत्ताने एक जबरदस्त कॉकटेल टाकायचा विचार होता पण कार्यबाहुल्यामुळे (कसले भारदस्त वाटते ना?) जमले नाही. पण शुक्रवारचा मुहुर्त साधता येतोय त्यामुळे काही हरकत नाही.

हे कॉकटेल हे माझे इंप्रोवायझेशन आहे म्हणजे पुर्णपणे माझी रेसिपी. बायकोने एकदा मुलांसाठी एक आइसक्रीम आणले होते बदामाचे. ते बघताना माझ्या डोळ्यासमोर एकदम अमारेतो, बदामापासून बनलेली लिक्युअर, आली. ती माझ्या मीनीबार मध्ये दाखल होतीच. लगेच मग काहीतरी प्रयोग करायचे ठरले. तो यशस्वी झाला तोच ह्या कॉकटेलच्या रूपात तुमच्यासमोर सादर करतो आहे. ह्या कॉकटेलला नाव देण्यासाठी बर्‍याच मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली. पण कॉकटेल्सचे फोटों बघून हे नाव सुचवले ते माझी गोव्यातली ब्लॉगर मैत्रिण ज्योती कामत हिने (ही मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाची संपादकही आहे).

प्रकार व्हाइट रम आणि अमरेतो लिक्युअर बेस्ड, लेडीज स्पेशल 
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
अमारेतो १० मिली
आल्मड क्रशड आइसक्रीम २ स्कूप
काजू (सजावटीसाठी)  
 
ग्लास वाइन ग्लास

कृती:

ह्याची कृती एकदम सोप्पी आहे. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून मस्त ब्लेंड करून घ्या. (कोण खवचटपणे म्हणतयं काजू पण का? ते सजावटीसाठी आहेत.)
खालच्या फोटोप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की व्यवस्थित ब्लेंड झाला आहे हे समजावे. 

आता हे मिश्रण वाइनग्लास मधे ओतून घ्या. ग्लासच्या कडेला काजू सजावटीसाठी लावा. हे फारच जिकरीचे आणि कष्टप्रद काम आहे.

आता त्यात स्ट्रॉ टाकून घ्या. आइसक्रीम मुळे हे कॉकटेल खुप थंड असणार आहे. त्यामुळे  स्ट्रॉने पिणे हे सोयिस्कर असते, थेट पिण्यापेक्षा.

चला तर, Almonda Amarita तयार आहे 🙂

डिस्क्लेमर: ह्या कॉकटेलसारखे कॉकटेल कोणी दुसर्‍या नावाने प्यायले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “वॉटर्मेलन मोहितो

पार्श्वभूमी:

मला मनापासून आवडणारे एक रसाळ फळ म्हणजे कलिंगड. भरपूर पाणी असलेले हे रसरशीत फळ त्याच्या लाल रंगामुळे आणी हिरव्या आवरणामुळे कापल्यावर खुपच आकर्षक दिसते. कलिंगडाचे काप, त्यातल्या बिया अलगद तोंडातल्या तोंडात वेगळ्या करून खाण्यात जी मजा आहे तेवढीच मजा कलिंगडाचा रसही पिण्यात आहे. जर हा रस मजा देऊ शकतो तर मग त्याचे कॉकटेलही बहार आणणारच असा विचार येणे सहाजिकच आहे 🙂

तर आजचे कॉकटेल आहे ‘वॉटर्मेलन मोहितो’, क्लासिक मोहितोला दिलेला कलिंगडाचा फ्लेवर.  

प्रकार व्हाइट रम आणि पुदिना बेस्ड (मोहितो)
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
मोसंबी रस किंवा लेमन स्क्वॅश १.५ औस (४५ मिली)
कलिंगडाचा रस (प्युरी) २ औस (६० मिली)
ग्रेनेडाइन १० मिली
सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर १५ मिली
पुदिना ७-८ पाने
बर्फ
मडलर
बार स्पून
ग्लास कॉलिन्स

कृती:

सर्वप्रथम कलिंगडाचे काप करून मिक्सर किंवा ब्लेंडरमधून साधारण ६० मिली होईल इतका रस काढून घ्या.  त्यानंतर कलिंगडाचे ३-४ छोटे छोटे तुकडे आणि पुदिनाची ३-४ पाने कॉलिन्स ग्लास मध्ये टाकून मडलरच्या सहाय्याने चेचून घ्या. त्याने पुदिनीच्या पानांमधले तेल (Oils) आणि कलिंगडाचा ताजा रस सुटा होऊन ते कॉकटेलला तजेलदार बनवेल.

आता ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यात रम आणि मोसंबीचा रस किंवा लेमन स्क्वॅश टाका.

कलिंगडाच्या ताज्या रसामुळे रमला एक मस्त गुलाबी छटा येईल आणि ती तशीच गट्टम करून टाकावीशी वाटेल, पण जरा कळ सोसा. सब्र का कॉकटेल बढिया होता है| 🙂  आता त्यात कलिंगडाचा रस ओतून घ्या मस्त लाल रंग येईल आता मिश्रणाला.

त्यावर आता ग्रेनेडाईन ओता. मिश्रण एकदम लालेलाल होऊन जाईल. बार स्पून वापरून मस्त ढवळून घ्या.

थोडासा सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर टाकून ग्लास टॉप अप करा. सजावटीसाठी पुदिन्याची काही पाने व कलिंगडाचा एक काप ग्लासाच्या कडेला लावा.

चला तर, लालचुटुक वॉटर्मेलन मोहितो तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : जामुनटीनी

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “जामुनटीनी

पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन पुण्याला आलो होतो. आल्याआल्या बायकोने मंडईत जायचा फतवा काढला. सगळा असंतोष मनातल्या मनात दाबून टाकून हसर्‍या चेहर्‍याने पिशव्या हातात घेऊन गुणी नवरा असल्याचा साक्षात्कार बायकोला करून दिला. (अ‍ॅक्चुली ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात पण असो…)

जाऊदे, ‘जे होते ते भल्यासाठीच’ (हाही १२ वर्षाच्या लग्नाच्या अनुभवाने आलेला एक शहाणपणा). मंडईत गेल्यावर टप्पोरी जांभळे दिसली. जांभूळ म्हणजे माझे एक आवडते फळ, तोंडाला निळेशार करणारे! बर्‍याच वर्षांनंतर जांभूळ बघितले आणि बरे वाटले.

मग लगेच एक कॉकटेल आठवले, ‘जामुनटीनी’. जेम्स बॉन्डच्या मार्टीनी ह्या कॉकटेलला दिलेला एक जबरदस्त देशी ट्वीस्ट.

प्रकार जीन बेस्ड (मार्टीनी)
साहित्य
जीन (लंडन ड्राय) २ औस (६० मिली)
मोसंबी रस ०.५ औस (१५ मिली)
सुगर सिरप १० मिली
टपोरी जांभळे ४-५
बर्फ
मडलर
Hawthorne Strainer
ग्लास कॉकटेल

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमध्ये बर्फ आणि पाणी घालून फ्रीझ मध्ये ग्लास फ्रॉस्ट करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कॉकटेल शेकर मध्ये जांभळाचे तुकडे कापून घ्या.

आता मडलर वापरून जांभळाचे तुकडे चेचून जांभळाचा रस काढून घ्या

एका परसट बशीत मीठ आणि लाल मिरची पूड ह्यांचे मिश्रण करून पसरून घ्या. फ्रॉस्ट झालेल्या कॉकटेल ग्लासच्या कडेवर मोसंबी फिरवून कडा ओलसर करा आणि बशीतल्या मिश्रणामध्ये ग्लासची कडा बुडवून घ्या.

आता शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर जीन, मोसंबीचा रस आणि शुगर सिरप घालून व्यवस्थित शेक करा.

शेक केलेले मिश्रण शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनरने एका स्टीलच्या ग्लासमध्ये गाळून घ्या.

आता Hawthorne Strainer वापरून कॉकटेल ग्लासमध्ये मिश्रण दुसर्‍यांदा गाळून घ्या. (ह्याला डबल स्ट्रेनिंग म्हणतात.)

चला तर, चवदार जामुनटीनी तयार आहे 🙂

(सदर कॉकटेल ‘टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल्स’ मधून साभार)

कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अ‍ॅट बीच

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्‍यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्‍याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.

मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा ‘उतारा’ म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. 🙂

प्रकार मलिबू कोकोनट रम आणि आल्मन्ड (बदाम) लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
मलिबू कोकोनट रम 1.5 औस (45 मिली)
अमारेतो लिक्युअर (Amaretto Liqueur) 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
संत्र्याचा रस
बर्फ
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.

आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, ‘सनराइज’चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.

चला तर मग, अ डे अ‍ॅट बीच तयार आहे. 🙂

कॉकटेल लाउंज : बार्ने स्नॅच (Barney Snatch)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बार्ने स्नॅ (Barney Snatch)

पार्श्वभूमी:

फार वर्षांपूर्वी पूजा भट आणि नागार्जुन ह्यांच्या एका चित्रपटातल्या गाण्यात मालिबू बघितली होती. तेव्हा कॉलेजात होतो त्यामुळे फक्त बघण्यावर समाधान मानून मोठेपणी कधीतरी मालिबू विकत घ्यायची ठरवले होते. 🙂

ही मालिबू , नारळाचा तडका (ट्वीस्ट) देउन मस्त गोड चव आणलेली कॅरेबीयन व्हाईट रम आहे. एकदम मलमली पोत (Texture) असतो ह्या मालिबूला. उन्हाच्या काहिलीत ‘ऑन द रॉक्स’ मलिबू एकदम मस्त थंडवा देते, एकदम गारेगार.

आजचे कॉकटेल हे ह्याच मालिबूचे, वाढत्या उन्हाळ्यवरचा ‘उतारा’ म्हणून एकदम धमाल आणेल.

प्रकार मलिबू कोकोनट रम बेस्ड कॉकटेल
साहित्य
बकार्डी व्हाईट रम 0.5 औस (15 मिली)
मलिबू कोकोनट रम 0.5 औस (15 मिली)
ब्लु कुरास्सो लिक्युअर 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
अननसाचा रस
बर्फ
अर्ध्या लिंबाचे काप
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.

आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.

आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.

आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी  थरांचा माहोल जमून येईल.

चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. 🙂

रंगीत थरांचा क्लोज अप.

कॉकटेल लाउंज : लिंचबर्ग लेमोनेड (Lynchburg-Lemonade)

मागच्या वर्षाच्या सरत्या संध्याकाळी पान धमाका कॉकटेल टाकल्यानंतर २०१२ मधे धमाकेदार सुरूवात करायची असे ठरवले होते, पण कार्यबाहुल्यामुळे जरा व्यस्त होतो. असो, आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “लिंचबर्ग लेमोनेड

पार्श्वभूमी:

लिंचबर्ग हे एक अमेरिकेतील Tennessee राज्यातील शहर आहे. ह्याच शहरात ‘जॅक डनियल्स‘ ह्या प्रख्यात बर्बन व्हिस्कीची डिस्टलरी आहे. ह्या व्हिकीमुळे आणि शहराच्या नावावरून ह्या कॉकटेलचे लिंचबर्ग लेमोनेड हे नाव पडले आहे.

ह्या कॉकटेलला खरंच एक भारी पार्श्वभूमी आहे. टोनी मेसन ( Tony Mason) ह्या एका कॉकटेल बारच्या मालकाने 1980 मधे हे कॉकटेल त्याच्या बारमधे बनवले आणि त्याचे हे नामकरण केले. त्याच्या म्हणण्यानुसार जॅन डॅनियल्स डिस्टलरीच्या एका विक्रेत्याने ह्या कॉकटेलची रेसिपी  चोरली आणि ते ड्रिंक जॅन डॅनियल्सचेच आहे असे भासवून देशभर एक प्रमोशनल कॅंपेन चालू केले. घ्या, ह्या टोनीने चक्क डिस्टलरीच्या विरूद्ध कोर्टात फिर्याद ठोकली. (च्यायला, ह्या अमेरिकेत कोणीही उठून कोणावरही फिर्यादी ठोकू शकते.)  13 मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मागीतली. कोर्टात केस तो जिंकला पण त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. मग तो वरच्या कोर्टात गेला आणि तिथल्या जजला वाटले की ह्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याने खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवून पुन्हा नव्याने केस चालू करण्याचा आदेश दिला. पुढे काय झाले, त्याला किती डॉलर्स मिळाले हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. 😉

असो, नमनाला घडाभर तेल भरपूर झाले.

प्रकार: बर्बन व्हिस्की बेस्ड कॉकटेल

साहित्य:

बर्बन व्हिस्की(जॅन डॅनियल्स) 1 औस (30 मिली)
कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) 1 औस (30 मिली)
स्वीट अ‍ॅन्ड सार सिरप 1 औस (30 मिली)
स्प्राईट किंवा सेव्ह्न अप
बर्फ
अर्धी मोसंबी
कॉकटेल शेकर
बार स्पून

ग्लास: – कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

कॉकटेल शेकर 3/4 बर्फाने भरून घ्या. त्यात स्प्राइट सोडून बाकीचे सगळे सहित्य घालून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला बाहेरून पाण्याचे थेंब आले के समजायचे, मिश्रण तयार झाले आहे. आता खाली दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि मोसंबीचे काप घालून घ्या.

हे कॉकटेल करताना नविन धडा शिकलो, घरच्या फ्रिझमधला बर्फ वापरताना लिंबाचे काप किंवा मोसंबीची काप ग्लासात टाकले तर बर्फ वितळायला खुप वेळ लागतो आणि तो बर्फ लॉन्ग लास्टिंग होतो 🙂

आता शेकरमधील मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या.

आता ग्लासमधे स्प्राइट टाकून ग्लास टॉप अप करा.

मनमोहक, दिलखेचक आणि चवदार लिंचबर्ग लेमोनेड तयार आहे. 🙂

कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज (‘हॅप्पी न्यु इयर’ स्पेशल)

आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार, शेवटचे कॉकटेल…म्हणजे ह्या वर्षातले, 2011 चे शेवटचे!

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज

पार्श्वभूमी:

ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे ‘पान सरप्राईज’.
31 डिसेंबरला मस्त भरपेट आणि चोपून जेवण झाल्यावर, टीव्हीवर नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम बघता बघता हे डिझर्ट कॉकटेल ट्राय करा आणि तुमचे मत प्रतिसादातून नक्की कळवा. 🙂

प्रकार: व्होडका बेस्ड कॉकटेल, डिझर्ट, देशी धमाका

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
कंडेन्स्ड मिल्क 1 औस (30 मिली)
मघई पानं 2
एक कप बर्फ
ब्लेंडर
मोजण्याचा जिगर

ग्लास: – ओल्ड फॅशन्ड

कृती:

ब्लेंडरमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकून घ्या. त्यावर वोडका ओता. एक पान त्यात टाका आणि एक पान सजावटीसाठी ठेवून द्या. आता कपभर बर्फ ब्लेंडरमध्ये टाका.

व्यवस्थित ब्लेन्ड करून घ्या. पानाचा पूर्णपणे लगदा होऊन ते मिल्क आणि वोडकामध्ये एकजीव व्हायला हवे. आता हे तयार झालेले कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पान ग्लासच्या कडेला सजावटीसाठी अडकवा.

देशी धमाका ‘पान सरप्राईज’ तयार आहे:)

सदर कॉकटेल ‘द टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल’मधून साभार

सूचना: हे कॉकटेल धमाकेदार होण्यासाठी मघई पानाचा दर्जा फार महत्वाचा आहे. एकदम थंड केलेले पान वापरल्यास आणखीणच मजा येते.

!!! सर्व वाचक मित्रांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा !!!
!!! Wish you and your family a happy new year !!!