कॉकटेल लाउंज : Walk The Walk – Johnnie Walker

बर्‍याच दिवसांपासून व्हिस्कीची नेमकी मजा काय असते, लुत्फ कसा घ्यावा असे लिहायचे मनात होते. पण त्या भावना नेमक्या शब्दात कशा पकडाव्या ह्याच्या विचारात होतो. परवा चेन्नै एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉपमध्ये वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या दारूच्या बाटल्या न्याहळता न्याहळता जॉनी वॉकरच्या सेक्शनला पोहोचलो तर तिथे टी.व्ही. स्क्रीनवर एक व्हिडीयो चालू होता. तो व्हिडीयो बघितला आणि मनातल्या भावना एकदम चित्ररुपात समोर आल्या.

ज्या ईन्टेंसिटीने त्या व्हिडीओमध्ये व्हिस्की म्हणजे काय हे समजावले आहे त्या ईन्टेंसिटीला तोड नाही. तीच ईन्टेंसिटी शब्दात नेमकी कशी मांडावी ह्या विवंचनेत असतानाच हा व्हिडीओ पाहयला मिळाला. लगेच युट्युबर शोध घेतला आणि तो शेअर केल्यावाचून राहवले नाही.

व्हिस्कीत काय असते एवढे नेमके विशेष असा प्रश्न असलेल्यांनी नक्की पहावा असा व्हिडीओ…

कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम)

पहिल्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास बघितला दुसर्‍या भागात (भाग २) टकीलाचे विवीध प्रकार बघितले आता ह्या अंतीम भागात टकीला तयार करण्याची चित्रमय झालक आणि टकीला प्यायची पद्धत बघूयात.

टकीला तयार करण्याची प्रक्रिया (चित्ररूपात)

अगावेचे फळ (piñas) भट्टीत भाजण्यासाठी दोन तुकड्यांमध्ये तोडले जाताना
भट्टीत भाजले जाणारे अगावेचे फळ
भाजलेले फळ श्रेडरमध्ये टाकले जाताना.
भाजलेला आणि श्रेड केलेला अगावेचा गर
भाजलेला गर भरडण्यासाठी कन्वेअर बेल्ट वरून जाताना
भाजलेला गर भरडण्याचा पारंपारिक दगड
गर भरडून होणारा रस फर्मेंटेशन टॅंक मध्ये जाताना
फर्मेंट केलेला रस डिस्टीलेशन प्रोसेसमध्ये
मॅनुअल टकीला क्वलिटी कंट्रोल प्रोसेस
डिस्टीलेशन नंतर ओक कास्कमध्ये मुरवत ठेवलेली टकीला

टकीला शॉट घ्यायची पद्धत

टकीला पिताना मीठ आणि लिंबू खुप महत्वाचे आहे. चव बहारदार होण्यासाठी.

टकीला शॉट मारण्याआधी थोडे मीठ हात उपडा करून त्यावर टाकून ते चाटून घ्यायचे. ह्या मीठामुळे जीभेवरील पॅलेट्स (मराठी शब्द ?) टकीलाच्या चवीसाठी तयार होतात. त्यानंतर टकीला शॉटसाठी 45 मिली टकीला शॉट ग्लासमध्ये घेऊन झटकन एका दमात गिळून टाकायची. शॉट गिळताना टकीला पडजिभेवर आदळू द्यायची त्याने टकीलाचा गंध (अरोमा) दरवळून, स्वाद आणखिन खुलवतो. त्यावर लिंबाची फोड घेऊन, चोखून तीचा रस जिभेवर पसरू द्यायचा.
आता जी एक मस्त ब्रम्हानंदी टाळी लागेल तीची अनुभूती घेत घेत दुसरा शॉट भरण्याच्या तयारीला लागायचे. 🙂

आता एक थोडी चावट पद्धत. 🙂

टकीला बॉडी शॉटची पद्धत

साहित्यः
टकीला : ४५ मिली
लिंबाची फोड
मीठ
आणि सर्वात महत्त्वाचे ती, प्रेयसी किंवा सखी, ह्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे.

कृती:
१. थोडे मीठ तिच्या खांद्यावर नीट काळजीपूर्वक पसरावे.
२. लिंबाची फोड तिच्या ओठात ठेवावी.
३. आता तिच्या खांद्यावरील मीठ जिभेने हळूवार चाटून घेऊन झटकन टकीला शॉट घेउन गट्टम करून टाकावा.
४. त्यानंतर तिच्या ओठात ओठ मिसळून रस येई पर्यंत ( लिंबाचा बरं का ) किस करावा.
🙂

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(समाप्त)

कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)

मागच्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास (पल्के, अगावेचे फळ, भौगोलिक स्थान वगैरे) बघितला. आता ह्या भागात बघूयात टकीलाचे वेगवेगळे प्रकार. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे टकीला ही ब्लु अगावेपासून बनवतात. ह्या ब्लु अगावेच्या वापरल्या गेलेल्या प्रमाणामुळे टकीलाचे ढोबळमानाने २ मुख्य प्रकार पडतात.

१. टकीला : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण १००% असते.

२. मिक्सटो : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण कमीत कमी ५१% इतके असते. बाकी उसाचा रस किंवा वेगळ्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज रुपातील साखर असते.

टकीला NOM

मेक्सिको सरकारने टकीलावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी टकीलाची मानके ठरवली आहेत त्यांना NOM (NORMA OFICIAL MEXICANA) असे म्हणतत. प्रत्येक बाटलीवर NOM नंबर असावा लागतो. हा नंबर मेक्सिको सरकार प्रत्येक डिस्टीलरीला देते. NOM + हा नंबर टकीलाचे ‘ओरिजिनल’त्व ठरवतो.

ह्या ओरिजिनल टकीलाचे मुरवण्याच्या कालावधीनुसार पाच वेगवेगळ्या प्रकारात बॉटलिंग केले जाते.

१. सिल्वर – प्लाटा [Blanco – White | Plata – Silver]

ह्या प्रकाराला Blanco (White) असेही म्हणतात.
डिस्टीलेशन नंतर लगेचच किंवा जास्तीत जास्त दोन महिने स्टील टॅंक मध्ये ठेवून बाटलीबंद केलेली ही टकीला सिल्व्हर किंवा व्हाईट म्हणून ओळखली जाते. म्हणजेच कास्कमध्ये न मुरवल्यामुळे हीचा रंग सोनेरी नसतो. त्यामुळे ह्या टकीलाला १००% अगावेचा गोडवा असतो. कास्कमध्ये न मुरवल्यामुळे अल्कोहोलचा हार्शनेस असतो ह्या टकीलाला. म्हणूनच ह्या प्रकारची टकीला शॉट ग्लासमधून एका झटक्यात रिचवायची असते.

२. गोल्ड – ओरो [Gold – Oro | Young – Joven]

हा प्रकार बनविण्यासाठी ब्लांकोत कॅरॅमल कलर्स, ओक लाकडाचा अर्क आणि वेगवेगळी साखरेची सिरप्स वापरून सोनेरी(ओरो) रंग आणला जातो बाटलीबंद करण्याआधी. ह्यामुळे मुरलेल्या टकीलाचा आभास निर्माण होतो. ह्या जास्त करून मिक्सटो, ५१% अगावे वापरलेल्या, टकीला असतात. अगावे व्यतिरीक्त वापरलेल्या ह्या अतिरीक्त घटकांमुळे अल्कोहोलचा हार्शनेस कमी होतो व ती थोडी स्मुथ होते. टकीलापासून बनणार्‍या कॉकटेल्ससाठी टकीलाचा हा प्रकार जास्त वापरला जातो.

३. रेस्टेड – रेपोसॅडो (Reposado)

ब्लांकोला २ महिन्यांपसून ते जास्तीत जास्त १ वर्षांपर्यंत कास्कमध्ये मुरवूत ठेवून नंतर बाटलीबंद केला जाणारा हा प्रकार सर्वात जास्त विकली जाणारी टकीला आहे. गोल्ड किंवा ओरो ह्या प्रकाराच्या उलट, कास्कच्या लाकडाचे गुणधर्म घेऊन ह्या टकीलाला रंग आणि गंध नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो. टकीला मुरवण्यासाठी वापरण्यात येणारे कास्क्स अमेरिकन किंवा फ्रेंच ओक लाकडापासून बनवलेले असतात. हे कास्क्स नविन लाकडापासून बनवलेले असतात पण काही कंपन्या बर्बन, स्कॉच आणि कोन्यॅक मुरवण्यासाठी वापरलेले जुने कास्क्स वापरतात. जुन्या कास्कमुळे त्यांच्यामध्ये असलेल्या मुळ मदिरेचा किंचीत स्वाद टकीलाला प्राप्त होतो आणि चव आणखिन मजेदार होते.

४. एज्ड(विंटेज) – अनेजो (Añejo)

१ वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत कास्क मध्ये मुरवत ठेवून त्यानंतर बाटलीबंद केलेली ही टकीला लाकडाशी जास्त काळ संपर्कात येऊन खूपच कॉम्प्लेक्स होते. ही टकीला खूपच ‘रीच’ असते चवीला. ह्या प्रकारची टकीला चवीला खुपच कोम्प्लेक्स आणि रीच असल्यामुळे शॉट ह्या पद्धतीने पिण्याऐवजी स्निफ्टर ग्लास किंवा Ouverture Tequila glass ह्यांतून मस्त एक एक सीप घेत अनुभवायची असते.

५. एक्स्ट्रा अनेजो ( Extra Añejo)

हा प्रकार २००६ पासून मान्यता प्राप्त झाला आहे. कमीत कमी ३ वर्ष मुरवत ठेवून मग ही टकीला बाटलीबंद केली जाते. ही अतिशय उच्च दर्जाची टकीला असते त्यामुळे तेवढीच महागही असते.

वर्म टकीला

टकीलाच्या बाटलीमध्ये एक अळी (Worm) असलेली टकीला अ‍सते अशी एक वंदता आहे. पण खर्‍या आणि ओरिजिनल टकीला मध्ये कधीही अळी नसते.

मेझ्कल

अळी* असणारी, अगावे (Agave Americana) पासून बनणारी मदिरा असते मेझ्कल. ही मेक्सिकोच्या टकीलाची पाच राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये बनते. हीला टकीला म्हणता येत नाही कारण ही ब्लु अगावेपासून बनत नाही. Gusano de Magueyनावाची अळी ह्या मेझ्कल मध्ये असते. ही अळी हे एक मार्केटींग गिमीक आहे. ही अळी अल्कोहल कंटेंट किती स्ट्रॉन्ग आहे दर्शवते. जर बाटलीच्या तळाशी असलेली अळी खराब झालेली नसेल तर अल्कोहोल कंटेंट खुपच ग्रेट असे दर्शवायचे असते.* बाजूच्या चित्रात बाटलीच्या तळाशी अळी आहे.

टकीला पिण्यासाठीचे वेगवेगळे ग्लासेस

टकीला शॉट ग्लास टकीला ओव्हर्चर ग्लास मार्गारीटा कॉकटेल ग्लास

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(क्रमश:)

कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १)

कीला ह्या माझ्या अत्यंत आवडत्या मद्याची आणि माझी ‘तोंड’ओळख फारच अनपेक्षितरीत्या झाली. 2000 साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो असताना जुन्या मित्रांचा न्यू जर्सी येथे गेट टुगेदरचा  बेत ठरला. त्यातल्या एका मित्राला मायक्रो-सॉफ्ट मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याबद्दल त्याने ‘रेड लॉबस्टर’ ह्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्हा सर्वांना पार्टी दिली. तिथेच मला टकीला भेटली 🙂

त्या मित्राने जेवणाच्या ऑर्डरीबरोबरच मार्गारीटा कॉकटेलही मागवले होते. त्या कॉकटेल ग्लासबरोबर एक छोटा ग्लासपण सर्व्ह केला गेला होता. (त्याला शॉट ग्लास म्हणतात हे तेव्हा माहिती नव्हते) त्यात सोनेरी रंगाचे द्रव्य होते. आमच्याबरोबर असणार्‍या कोणाच्याही मागच्या सात पिढ्यांमधील कोणीही ‘रेड लॉबस्टर’ मध्ये जाऊन काहीही ऑर्डर करण्याची सुतराम म्हणतात तसली शक्यता नसल्याने त्या छोट्याश्या ग्लासात काय आहे हे कोणालाही माहिती नव्हते आणि कळलेही नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच जण, पु.लं. आणि त्यांचे मित्र मॉन्जीनीमध्ये गेल्यावर जसे बावचळून गेले होते, डिक्टो तसेच बावचळून गेलो होतो. त्या ग्लासात काय आहे आणि त्याचे काय करायचे ह्या टेन्शनमुळे समोरचा चवदार लॉबस्टरही गोड लागेना. त्यात ऑर्डर घ्यायला आणि सर्व्ह करायला होत्या अमेरिकन ललना, त्यामुळे आम्ही सर्वच जण आणखीनंच संकोचलो होतो. पण देवदयेने समोर मादक ‘शराब’च्या जोडीने ‘शबाब’ही असताना तसेच बावचळून जाणे आणि तसेच बसून राहणे मनाला काही केल्या पटेना. मग मीच जरा धाडस करून आमच्या वेट्रेसला (आमच्या म्हणजे  आमच्या टेबलच्या)  बोलावून त्या छोट्या ग्लासात काय आहे ते विचारले.

ती एक टीन एजरच होती. एकदम फसफसणार्‍या उत्साहात तिने सांगितले ‘शुअर सर, इट्स टकीला’. ऑ, मी आणि सर? एक मित्र बोललाही ‘च्यायला तुझा बाप शाळेत सर होता ना रे, तुला का सर म्हणतेय ती?’ तोही मुंढेवाडी बुद्रुक सोडून पहिल्यांदाच गावाबाहेर आला असल्यामुळे त्याच्या त्या तिरकस बोलण्याला त्याचे अज्ञान  समजून मी तिकडे दुर्लक्ष केले. आता त्या ग्लासात टकीला आहे हे तर कळले होते पण त्या छोट्या ग्लासात ती टकीला द्यायचे प्रयोजन काही केल्या कळेना. त्यांत पुन्हा ते सर म्हटल्यामुळे आता एक प्रचंड गोची झाली होती, त्या टकीलाचे काय करायचे ते विचारायचे कसे? एका हायस्कूलच्या सरांचा मुलगा असल्याने ‘सरांना सर्व काही माहिती असते किंबहुना तसा आव आणायचा असतो’ हे मला चांगलेच माहिती होते. मी तसा आव आणायचा प्रयत्न केलाही पण एकंदरीतच आमच्या भंजाळलेल्या अवतारावरून आम्ही सर्वजण कुठल्यातरी ‘बुद्रुक’ गावावरून आलो आहोत हे तिला बहुदा कळले असावे. ‘एनी हेल्प,सर?’ असे ती विचारती झाले. मग मात्र मी सर्व लाज सोडून त्या छोट्या ग्लासात दिलेल्या टकीलाचे काय करायचे ते तिला विचारून मोकळा झालो. तिने हसून ‘शुअर सर’ म्हणून त्या छोट्या ग्लासातली टकीला मार्गारीटामध्ये टाकून ते कॉकटेल अजून स्ट्रॉन्ग करू शकतो असे सांगितले. तसे करायचे नसल्यास नुसताच शॉट घ्यायचा असे ज्ञान वाढवले. नुसताच शॉट घ्यायचा हे तोपर्यंत बियर (तीही सुरुवातीला सोडामिक्स) पिणार्‍या मला काही झेपलेच नाही. ‘नुसताच शॉट घ्यायचा म्हणजे कसे?’ हे तिला विचारले. तिच्या मधाळ हसून बोलण्यामुळे नाही म्हटले तरी आता माझीही भीड जरा चेपली होतीच. 🙂   तिने लगेच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करून टाकला आणि परत एकदा मधाळ हसत म्हणाली ‘असे!’ मग तिला थॅन्क्स म्हणाल्यावर ती निघून गेली.

ती गेल्यावर मग सर्वांनी तसा शॉट घ्यायचे ठरवले. आता तिने माझा ‘सर’ केल्यामुळे आणि माहिती मिळवायचा गडही मी ‘सर’ केल्यामुळे सर्वप्रथम मीच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करावा असा सर्वांनी कल्ला केला. मी ही मग धाडस करून तो शॉट ग्लास उचलून गट्टम केला. त्यानंतरचा अनुभव काय वर्णावा महाराजा! जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत. त्यानंतर त्या चवीमुळे आणि त्या अनुभवामुळे आणखीन 2-3 शॉट्स मागवून ते गट्टम  करण्यात आले.  प्रत्येक शॉटबरोबर ओव्हरकोट, मफलर, स्वेटर असे प्रचंड थंडीमुळे घातलेले कपड्यांचे थर काढून टाकले, सर्वांनीच. ह्या अनुभवानंतर मी तर टकीलाचा कट्टर भक्त झालो.

त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मदिरेचा महापूर असलेल्या जपानमध्ये जाण्याचा योग आला. तोक्योमध्ये रोप्पोंगी ह्या उपनगरात ‘अगावे’ नावाचा एक्सक्लूसिव्ह टकीला बार आहे. त्या बारमध्ये गेल्यावर टकीलाचे जे काही असंख्य प्रकार जगात अस्तित्वात आहेत ते सर्व एका छताखाली बघायला आणि चाखायला मिळाले. त्यावेळी चाळीस चोरांच्या गुहेत शिरल्यावर, तिथली अगणित संपत्ती बघितल्यावर अलीबाबाची जशी अवस्था झाली असेल तशीच माझी, टकीला भक्ताची, अवस्था झाली होती. 🙂

चला आता नमना नंतर मूळ गाथेकडे वळूयात.

टकीला ही मेक्सिको ह्या उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील देशाची देणगी आहे मद्यविश्वाला. टकीला, मेक्सिकोत,  ‘अगावे‘ ह्या निवडुंग (Cacti) सदृश्य, भरपूर प्रमाणात पैदास होणार्‍या, वनस्पतीच्या शर्करायुक्त फळापासून बनवली जाते. हे फळ  अननसासारखे असते त्याला स्पॅनिश भाषेत ‘piñas’ म्हणजेच अननस असे म्हणतात.(हा piñas म्हणजेच pina colada मधला  पिना)

ह्या टकीलाचा इतिहास फार रंजक आहे. फार पुर्वीपासून ह्या अगावेच्या फळाच्या (piñas) गरापासून, त्या गराला फर्मेंट करून (आंबवून)  एक मादक द्रव्य मेक्सिकोचे स्थानिक लोक बनवत असत. त्याला पल्के (Pulque) असे ते म्हणत. अगावेच्या बर्‍याच प्रजाती आहेत. त्यां विवीध प्रजातींच्या मिलाफापासून (Blend) हे पल्के बनवले  जात असे. पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केला.  स्पॅनिश लोकांना हे पल्के आवडले पण ते पडले जातीवंत युरोपियन, त्यांनी त्याला ‘युरोपियन टच’ दिला. म्हणजे त्यांनी त्या फर्मेंटेशनला जोड दिली डिस्टीलेशनाची.  स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केल्यावर  साधारण एका दशकात उत्तर अमेरिकेतले पहिले डिस्टील्ड मद्य ह्या अगावेपासून तयार झाले जे आजच्या टकीलाचे मूळ रूप, ज्याला ‘मेझ्कल (Mezcal)’ असे म्हटले जायचे, ते होय.

मेझ्कल ब्रॅन्डी -> अगावे वाइन -> मेझ्कल टकीला -> शेवटी आजची मॉडर्न टकीला असा आजच्या टकीलाचा सुधारीत आवृत्तींचा प्रवास झाला.

आता प्रश्न असा पडेल की हा सुधारीत आवृत्तींचा प्रवास का वा कसा? तर ह्याचे उत्तर दडले आहे अगावे ह्या वस्पतींच्या प्रजातींमध्ये. सुरुवातीला मूळ मेक्सिकन स्थानिक लोक बर्‍याच प्रकारच्या अगावेच्या प्रजातीपासून मेझ्कल बनवायचे. पण स्पॅनिश लोकांनी त्यावर युरोपियन मद्यसंस्कार केले 🙂  त्यांनी अगावेच्या विवीध प्रजांतींच्या वापरामधे सुसूत्रता आणली. जसे जसे ह्या प्रजातींवर संशोधन होत गेले तसे तसे आजची सुधारीत टकीला तयार होत गेली.

अगावेच्या ह्या खालील प्रमुख प्रजाती आहेत.

 Agave Tequilala : टकीलासाठी वापरली जाणारी अगावे

 ह्यातली फक्त ‘Agave Tequilala‘ ही प्रजात आजची मॉडर्न टकीला बनवण्यासाठी वापरली जाते.ह्या अगावेला ‘ब्लु अगावे (Blue Agave)’ किंवा टकीला अगावे असेही म्हणतात. ह्या प्रजातींच्या फळामध्ये शर्करा फ्रुक्टोजच्या रूपात मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे ही प्रजात टकीला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असते.बाजूच्या चित्रात दिसणारी ही ह्या वनस्पतीची ही पाने आहेत. ती वेळोवेळी कापली जातात ज्यामुळे त्याच्या फळाला जास्त एनार्जी मिळते आणि त्यातले शर्करेचे प्रमाण वाढते. ह्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे परागीकरण वटवाघूळाकडून होते.
 हाच तो piñas म्हणजे अगावेचे शर्करायुक्त फळ ज्याला ‘अगावे हार्ट’ म्हटले जाते.हे फळ साधारण ह्याच्या झाडाच्या वयाच्या साधारण बाराव्या वर्षी तयार होते. ह्या फळाची पाने काढून टाकल्यावर वजन अंदाजे 35-90 किलो पर्यंत असते. ही कापलेली पाने पुढच्या प्लांटेशनसाठी वापरली जातात.टकीला बनवण्यासाठी ह्या फळाचा गर, हे फळ भाजून काढला जातो.

भौगोलिक स्थानमहात्म्य

जसाजसा टकीलाला लोकाश्रय मिळून ती लोकप्रिय होत गेली तसा मेक्सिकोला एक उत्पनाचे साधन मिळून टकीला डिस्टलरीच्या उद्योगाने तेथे मोठे रूप धारण केले. मग ह्या टकीलाच्या स्वामित्वासाठी तिथले सरकारही जाग़ृत झाले आणि टकीलाची सरकारी मानके ठरली.मेक्सिको मधल्या जालिस्को (Jalisco) राज्यातील Los Altos (Highlands) ह्या पर्वतराशींच्या कुशीत असलेल्या ‘टकीला‘ ह्या महानगरामधे बनलेली टकीला हीच स्वतःला अस्सल मॉडर्न टकीला म्हणवून घेउ शकते.

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

(क्रमश:)

कॉकटेल लाउंज : गाथा बीयरची

हुतेक मद्यसेवन करणार्‍यांची मद्यसेवनाची सुरुवात ही बीयरनेच होत असावी असा माझा अंदाज आहे, निदान माझीतरी तशीच झाली. 1993 साली डिप्लोमाच्या इंडस्ट्रिअल टूरला जाताना व्हि.टी. स्टेशनवर काही सिनीयर मित्रांनी बीयरचा प्लान बनवला आणि मुंबई ते औरंगाबाद अश्या ट्रेन प्रवासात बीयर पहिल्यांदा ओठी लागली. ती चव आणि तो अनुभव अजूनही जश्याच्या तसा आठवणींच्या कप्प्यात साठवला गेला आहे. त्यानंतर बर्‍याच बीयर्स ट्राय केल्या. खजुराहो, महाराणी, एल्पी, हेवर्ड्स 5000, कॅनन 10000, ओल्ड मॉन्क… अश्या कितीतरी. तेव्हा फक्त एकच मापदंड असायचा, ‘किती कडक (Strong) आहे’?

पुढे बर्याच वर्षांनी एकदा कामानिमीत्त अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथे गेलो होतो. त्या प्रोजेक्टचा एक डिझायनर, जॉन बंकर, बोस्टनहून नॉर्थ कॅरोलिनाला आला होता. आमच्या डिझाइन साइन ऑफ नंतर पार्टीला जायचे ठरले. जॉनची आणि माझी तोपर्यंत कामामुळे खुपच गट्टी जमली होती. त्याच्याजवळच बसलो होतो मी. यथावकाश बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,”तुला कोणता एल आवडतो?” माझी बत्तीच गुल झाली, एल बी डब्ल्युच झाला म्हणा ना.  ‘किती कडक आहे‘ ह्या एकमेव मापडंदाने पिणार्‍या मला तो प्रश्न काही झेपलाच नाही. पण अंगी असलेल्या हुशारीने मी त्याला प्रती प्रश्न केला, “तुझ्या आवडीचा कुठला?”. कट्टर बोस्टनवासी होता तो, त्याने मग बोस्टन एल कसा चवदार असतो, नॉर्थ कॅरोलिनाच्या बीयर कश्या ‘पानीकम’ हे सांगायला सुरुवात केली. मी आपला सर्व काही समजतयं असा आव आणून ऐकत होतो, झाकली मूठ सव्वा लाखाची हो. मग काहीतरी संधी साधून दुसर्‍या कंपूत पळ काढला.

त्यानंतर एका महिन्यानी त्यांची टीम भारतात आली. अर्थातच जॉनही होता. मग वेलकम पार्टीला पुण्यातल्या मानस रिसोर्टला घेऊन गेलो त्यांना. ह्यावेळी मी पुढे होतो कारण आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच. परत बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,”अरे एक इंडिया पेल एल असतो, तो भारतातलाच का? तसे असेल तर तोच मागवू यात.” माझ्या पोटात एकदम गोळाच आला. मागच्या वेळी तिकडे अमेरिकेत दुसर्‍या कंपूत पळ काढता आला होता. इथे आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच, त्यामुळे पळ काढून फारतर त्या मानस रिसोर्ट्च्या तलावात उडी मारावी लागली असती आणि ते शक्य नव्हते. मग त्याला काहीतरी थातूरमातूर सांगून, पटवून फोस्टर्स आणि किंगफिशर ऑर्डर केल्या. त्या बाटल्या आल्यावर लेबल पाहून जॉन म्हणाला, “अरे ही तर लागर आहे.” ते ऐकून माझी अवस्था लागीर झाल्यासारखी झाली होती. ही झाली एवढी फटफजिती पुरे म्हणून त्यानंतर लगेच अभ्यास वाढवायला घेतला.

तशी मी बीयर जास्त आवडीने नाही फार पीत पण बीयरचा जो पहिला घोट घशातून उतरत जातो आणि जे काही काळीज थंड होते ना त्याला तोड नाही, निव्वळ स्वर्गसुख…

चला! नेहमीप्रमाणे नमनाला घडाभर तेल जाळून झाले, आता बीयरच्या गाथेकडे वळूयात.

बीयर बनवायला जास्त काही सामग्री लागत नाही. बीयरसाठी लागणारे महत्वाचे 4 घटक म्हणजे

 1. पाणी
 2. बार्ली (सातू/जव)
 3. हॉप्स
 4. यीस्ट

आता प्रत्येक घटकाची माहिती करून घेवुयात :

1. पाणी

बीयरमधे 90% पाणी असते. आता असे म्हणाल च्यामारी, 90% पाण्यासाठी का एवढे पैसे मोजायचे?  पण हे पाणी काही साधेसुधे नसते; ते असते ‘मंतरेलेले पाणी’ 🙂 खरंच, जे पाणी बीयर तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरले जाते ते मिनरल वॉटर दगडांतून उगम पावणार्‍या झर्‍याचे किंवा नदीच्या उगमाचे (स्प्रिंग वॉटर) असावे लागते. दगडांमधील रासायनिक घट्क (क्षार) पाण्यात मिसळून एक वेगळी चव आलेली असते त्या पाण्याला. ती चव म्हणजेच ते क्षार फार महत्वाचे असतात.आता सध्याच्या आधुनिक जगात केमिस्ट लॅबोरेटोरी मध्ये जिप्सम किंवा एप्सम क्षार (Gypsum or Epsom Salts) पाण्यात मिसाळून तशी चव कृत्रिमरीत्या आणू शकतात. त्यामुळे बीयरच्या चवीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असतो.
तर आता ते पाणी मंतरलेले कसे हे ही लक्षात आले असेलच 😉

2. मॉल्टेड बार्ली (सातू/जव)

 बार्ली म्हणजे  सातू किंवा बिहारींचा सत्तू ह्या धान्याला हलके मोड येउ देतात. त्यानंतर भट्टीत (Kiln) ते भाजले जातात. साधारण 30 तास लागतात ह्या भाजण्याच्या प्रक्रियेला. ह्या भाजण्याचा तीव्रतेवर (भट्टीचे तापमान) बीयरची  चव अवलंबून असते. हलकेच (कमी तापमान) भाजले तर caramel चव मिळते तर जास्त प्रमाणात (जास्त तापमान) भाजले तर कॉफी किंवा चॉकलेटची चव मिळते बीयरला.बार्ली ऐवजी wheat and rye ही धान्येही वापरली जातात वेगवेगळ्या चवीसाठी.

3. हॉप्स

हॉप्स ही वेलीवर वाढणारी एक प्रकारची फुले असतात. बीयरला खराब करणारे जिवाणू मारण्यासाठी किंवा त्यांची पैदास फर्मेंटेशन प्रक्रियेत होउ नये म्हणून हॉप्सची फुले वापरली गेली सुरुवातीच्या काळात. बीयरला जो एक कडसरपणा असतो तो ह्या हॉप्समुळे येतो. ह्या हॉप्समुळे बीयरला एक विषीष्ट प्रकारचा स्वाद ही मिळतो. तो स्वाद ह्या हॉप्सच्या वापरलेल्या प्रजातीवर अबलंबून असतो. 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींची व्यावसायिकरीत्या पैदास केली जाते ज्या देतात बीयरला Citrus, pineapple, green grass, pepper आणि pine असे विवीध स्वाद. बीयरला  एक गंधही असतो जो ह्या हॉप्समुळेच येतो.

4 . यीस्ट

शास्त्रिय चित्र व्यावसायिक चित्र
 सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यीस्ट. एकपेशीय असलेला हा सूक्ष्म जीव मॉल्टेड बार्लीला आंबवताना आणि त्यातल्या शर्करेला (Carbohydrates) अल्कोहोल आणि कार्बन डाय ऑक्साईड मध्ये रुपांतरीत करतो. ह्या यीस्ट्चे दोन मुख्य प्रकार असतात, एल (Ale) आणि लागर (Lager), जे बीयरची स्टाइल किंवा प्रकार ठरवतात आणि हॉप्सच्या जोडीने बीयरला एक स्पेसिफिक स्वाद प्रदान करतात.

बीयरच्या स्टाइल्स किंवा प्रकार

एल (Ale) लागर (Lager)
 Saccharomyces Cerevisiae असे नामाधिमान असलेले हा यीस्टचा प्रकार Aerobicअसते म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता असते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट वरच्या बाजूने (हवेशी संपर्क राखून) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी असल्यामुळे साधारण उबदार/गरम तापमान लागते फर्मेंटेशनसाठी. Saccharomyces Carlsbergensis (Carlsberg ह्या बीयरला तिचे नाव ह्या यीस्टच्या प्रकारावरूनच पडले आहे) असे नामाधिमान असलेले हा यीस्टचा प्रकार Anaerobic असतो म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता नसते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट खालच्या बाजूने (हवेशी संपर्क जरूरी नल्याने) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी नसल्यामुळे थंड तापमान असले तरीही चालते फर्मेंटेशनसाठी.
एलमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार

 • ब्राउन एल
 • पेल एल
 • इंडिया पेल एल
 • पोर्टर
 • स्कॉटिश एल
 • बोस्ट्न एल
 • स्टॉन्ग एल
 • स्टाउट
लागरमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार

 • अमेरिकन लागर
 • बॉक लागर
 • पिल्सनर
 • व्हीट बीयर
 • व्हियेन्ना लागर

बीयरच्या रंगछटा

बार्ली भाजण्याचे तापमान, यीस्ट्चा प्रकार आणि हॉप्सची प्रजात ह्यानुसार बीयरच्या खालिल चित्रात दाखवल्याप्रमाणे विवीध रंगछटा असतात.

पुण्यात उंद्रीला ‘कॉरिंथियन्स क्लब‘ म्हणून एक क्लब आहे तिथे बीयर लोकली ब्रु केली जाते आणि एल आणि लागर ह्या दोन्ही प्रकारच्या बीयर्स तिथे मिळतात. माझे ते अत्यंत आवडते ठिकाण आहे. एकदा भेटूयात तिथे असे सुचवून ही बीयर गाथा इथे संपवतो 🙂

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची

ब्रॅन्डीची ओळख सनातन महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आचार्य अत्र्यांनी ‘ब्रॅन्डीची बाटली’ ह्या सिनेमाची कथा लिहून करून दिली. त्यानंतर बहुजन समाजाला खोकला झाला की चमचाभर ब्रॅन्डी घ्यायची असा शोध लागला. त्यामुळे ब्रॅन्डी ही चमचाभर औषध म्हणून घेण्यापलीकडे दारू किंवा मादक द्रव्य म्हणून माझ्या खिजगिणतीतही नव्हती. त्यात देशी दारूमध्ये ब्रॅन्डी जास्त विकला जाणारा प्रकार आहे (अजून एक ब्लेंडी  नावाचा प्रकार असून तोही ब्रॅन्डीच्या नावावार खपतो असे जाणकार सूत्रांकडून कळते). आमच्या वाड्यात राहणारा एक जहाल बेवडा ही ब्रॅन्डी पिऊन आमच्या वाड्याच्या दारात नेहमी पडलेला असायचा त्यामुळे ब्रॅन्डी तशी ‘डोक्यात’ गेलेली होती.

पण एकदा माझ्या बॉसने त्याच्याकडे गेल्यावर कोन्यॅक दिली तीही एकदम साग्रसंगीत ‘स्निफर’ ग्लासमधून. काय आहे ते माहिती नव्हते पण एक घोट घेतल्यावर भन्नाट लागली आणि काय आहे ते बॉसला विचारल्यावर त्याने सांगितले ब्रॅन्डी. एकदम चकितच झालो आणि एवढ्या चांगल्या दारूला उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिल्या बद्दल स्वतःचाच राग आला. त्या गुन्ह्याचे परिमार्जन करण्यासाठी ही ब्रॅन्डी गाथा समर्पित करतो आहे.

असो, नमनाला घडाभर तेल जाळून झाले आहे, आता मूळ कथेकडे वळूया.

ब्रॅन्डी ही डच लोकांची देणगी आहे दारू विश्वाला. ब्रॅन्डीचा फॉर्म्युला काही डच व्यापाऱ्यांकडून व्यापारात केल्या गेलेल्या तडजोडींमुळे अचानकच शोधला गेला. ते म्हणतात नं ‘करायला गेलो एक…’ अगदी तसेच झाले.

सोळाव्या शतकात नेदरलँड्सला (हॉलंड) फ्रान्समधून वाइन मोठ्या प्रमाणात आयात केली जायची. पण ती आयात करताना डच व्यापाऱ्यांना बर्‍याच अडचणी येत असत. फ्रान्समधील ज्या परगण्यांतून ही आयात केली जायची तेथील नद्यांतून वाइन घेऊन जाण्यावर बरेच कर भरावे लागत असत. एवढे कर भरून झाल्यावरही समुद्री चाच्यांकडूनही लुटालूट फार मोठ्या प्रमाणावर व्ह्यायची. फ्रान्समधून नेदरलँड्सला जायला लागणार्‍या कालावधी मुळे बर्‍याचवेळा वाइन खराबही व्हायची (वाइनमधल्या पाण्यामुळे). अशा ह्या तिहेरी संकटाचा सामना करण्यासाठी काहीतरी करणे आवश्यकच होते. बनिया, अगदी आपल्या कच्छ-मारवाडातला असो किंवा युरोपातला, नुकसान कसे काय होऊ देणार?

ह्या व्यापार्‍यांनी मग ही वाइन डिस्टील करायला सुरुवात केली. म्हणजे वाइनमधला पाण्याचा अंश काढून टाकायचा. त्यामुळे

 • आकारमान कमी होऊन कर बचत
 • कमीत कमी कार्गो स्पेस मध्ये आयात करणे सुलभ,
 • चाच्यांना असल्या वाइनमध्ये काही रुची नसायची त्यामुळे त्यांच्या त्रासापासून मुक्ती
 • आणि आता वाइन ‘कॉन्संट्रेटेड’ (डिस्टील्ड) असल्यामुळे खराब व्हायचा ही धोका नाही.

अशी भन्नाट कॢप्ती त्यांनी शोधून काढली. ह्या कॢप्तीला डचांच्या स्थानिक भाषेत ‘Brandewijn’ असे म्हणतात. म्हणजे ‘Burnt Wine’. ह्या Brandewijn चाच पुढे अपभ्रंश होऊन ‘ब्रॅन्डी’ असे नामकरण झाले.

ब्रॅन्डी कशापासून बनवली आहे त्यावरून तिची तीन मूलभूत प्रकारात विभागणी होते.

1. ग्रेप ब्रॅन्डी :

ही ब्रॅन्डी नावाप्रमाणेच द्राक्षांपासून बनवतात. फर्मेंट केलेल्या द्राक्षाच्या रसाला डिस्टील्ड करून ही ब्रॅन्डी बनवली जाते. ह्या डिस्टील्ड झालेली ब्रॅन्डी रंगहीन असते. तिला ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या ड्रममध्ये मुरवत  ठेवले जाते. त्या लाकडामुळे तिला वैषिट्यपूर्ण रंग आणि गंध प्राप्त होतो. मुरवत ठेवण्याचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष एवढा असू शकतो.

2. पोमेस (Pomace) ब्रॅन्डी :

वाइनसाठी क्रश केलेल्या द्राक्षांच्या उरलेल्या चोथ्यापासून म्हणजे, रस गेलेला गर, साली, द्राक्षांचे देठ ह्यापासून पोमेस ब्रॅन्डी बनवली जाते. ही ब्रॅन्डी फार कमी काळासाठी मुरवली जाते त्यामुळे चवीला जरा रॉ (अपक्व) असते.  तसेच ही लाकडाच्या ड्रममध्ये मुरवत ठेवली जात नाही त्यामुळे मूळ द्राक्षाच्या चवीशी इमान राखून चवीला फ्रुटी असते.

3. फ्रूट ब्रॅन्डी :

द्राक्षांऐवजी वेगवेगळ्या फळांपासून ही ब्रॅन्डी बनवली जाते. सफरचंद, जरदाळू, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, प्लम ह्या फळांच्या रसाला फर्मेंट कले जाते आणि मग  डिस्टील्ड करून फ्रूट ब्रॅन्डी तयार होते.

ब्रॅन्डीची खरी ओळख ती जगाच्या कुठल्या भागात बनवली गेली आहे त्यानुसार होते. दारूचे माहेरघर असलेले फ्रान्स हे अत्युच्च दर्जाच्या ब्रॅन्डीसाठीही प्रख्यात आहे. ब्रॅन्डीचेही युरोपियन आणि उरलेले जग अशी भौगोलिक विभागणी आहे.

फ्रेंच ब्रॅन्डीज

कोन्यॅक
जगप्रसिद्ध आणि एक नंबरवर असणारी ‘कोन्यॅक’ ही फ्रेंच ब्रॅन्डी आहे. फ्रांसच्या कोन्यॅक नावाच्या परगण्यात तयार होणारी ही ‘ग्रेप ब्रॅन्डी’ आहे.बाजूच्या चित्रात निळ्या रंगाने दर्शवलेला फ्रान्समधील हा कोन्यॅक परगणा.
ही इतकी प्रसिद्ध आणि अत्युच्च दर्जाची आहे की ब्रॅन्डीसाठी व्यापक अर्थाने सामान्य नाव होऊन बसले आहे. कोन्यॅक ‘डबल डिस्टील्ड’ असते. ही इतकी सुपरफाईन असण्याचे कारण म्हणजे ज्या कास्क मध्ये ही मुरवली जाते त्याचे लाकूड ओक वृक्षांच्या कुठल्या जंगलातले वापरायचे याचे नियम ठरलेले आहेत. Limousin or Tronçais ह्या जातीच्या ओक झाडांच्या लाकडापासून तयार केलेली कास्कंच मुरवण्याकरिता वापरली जातात. त्याचे कारण म्हणजे ह्या लाकडाने व्हॅनिलाचा गंध आणि काहीशी चव ब्रॅन्डीला मिळते.
अर्मान्यॅक (Armagnac) :
फ्रान्समधल्या दक्षिणेकडील Gascony ह्या प्रांतातील अर्मान्यॅक ह्या परगण्यात तयार होणारी ही ब्रॅन्डी Armagnac म्हणून ओळखली जाते. ह्या परगण्यातल्या खालील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने अर्मान्यॅक तयार केली जाते.

 1. Bas-Armagnac
 2. Armagnac-Ténarèze
 3. Haut-Armagnac
ही कोन्यॅकशी मिळती जुळती असली तरीही बनवण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे, जमिनीचा (माती) पोत, डिस्टीलेशन प्रोसेस, चव,गंध आणि ब्रॅन्डीचा पोत असे फार फरक आहेत ह्या दोन प्रकारांत.अर्मान्यॅक कोन्यॅकप्रमाणे ‘डबल डिस्टील्ड’ नसून ‘सिंगल डिस्टील्ड’ असते.ही ब्रॅन्डी कोन्यॅकच्या आधी सुमारे 150 वर्षापासून अस्तित्वात आहे असे म्हटले जातेपण दुर्दैवाने कोन्यॅकला मिळालेली लोकप्रियता, प्रतिष्ठा काही अर्मान्यॅक नाही मिळवू शकली.अर्मान्यॅक मुरवण्यासाठी वापरले जाणारे कास्क Limousin, Alsace ह्या जातीच्या ओक वृक्षाचे लाकडापासून बनविलेले असतात. Monlezun ह्या जंगलात मिळणार्‍या काही ओक वृक्षांचे लाकूडही वापरले जाते. ह्या लाकडांमध्ये ‘टॅनीन’ जास्त प्रमाणात असते हे ब्रॅन्डीमधे मिसळले जाते आणि एक आगळा स्वाद आणि गंध अर्मान्यॅकला बहाल करते.

इतर ब्रॅन्डीज

फ्रान्स खालोखाल इटलीचा नंबर लागतो लोकप्रिय ब्रॅन्डी बनवण्यामध्ये. ‘ग्रॅपा’ ही प्रसिद्ध ब्रॅन्डी (Pomace प्रकारातली) ही इटालियन ब्रॅन्डी आहे. त्यानंतर अमेरिकन, स्पॅनिश आणि जर्मन ब्रॅन्डीज लोकप्रिय आहेत.

ब्रॅन्डीच्या ग्रेड्स

ब्रॅन्डी मुरवत ठेवलेल्या कालावधीप्रमाणे ब्रॅन्डीच्या ग्रेड्स ठरवलेल्या आहेत. ब्रॅन्डी साधारण 2 वर्षे ते 20 वर्षे मुरवत ठेवली जाते. 25 वर्षापेक्षा जास्त जुनी ब्रॅन्डी खराब आणि पिण्यासाठी अयोग्य मानली जाते.

डिस्टील्ड झालेली पण मुरवण्यासाठी कास्कमधे ठेवण्यापूर्वीची जी ब्रॅन्डीची अवस्था तारुण्यावस्था असते तिला ‘eau-de-vie‘ असे म्हटले जाते. ह्या eau-de-vie ला किती काळ मुरवेले जाते त्यावरून ब्रॅन्डीची ग्रेड ठरते.

VS
(Very Special)
कास्क मध्ये कमीत कमी 2 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
VSOP
(Very Special Old Pale)
कास्क मध्ये कमीत कमी 4 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
XO
(Extra Old)
कास्क मध्ये कमीत कमी 6 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी. भविष्यात ही सहा वर्षाची मर्यादा 10 वर्षे होणार आहे.

ह्या व्यतिरिक्त अजूनही काही मानांकने आहेत पण ती खासकरून कोन्यॅकसाठी वापरली जातात.

Napoleon VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Extra कमीत कमी 6 वर्षे मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieux VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieille Réserve Xo पेक्षा जास्त पण Hors d’age पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Hors d’âge Xo पेक्षा जास्त मुरवलेली. Hors d’age म्हणजे beyond age. उच्च दर्जाची कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

ब्रॅन्डी पिण्याचा ‘ब्रॅन्डी स्निफ्टर (Brandy Snifter)’

ब्रॅन्डी पिण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ग्लासला ब्रॅन्डी स्निफ्टर म्हणतात.
ह्यातून ब्रॅन्डी पिण्याआधी मनसोक्त हुंगायची असते.

ब्रॅन्डी पिण्याची पद्धत

हा ब्रॅन्डी स्निफ्टर ह्या चित्रात दाखल्याप्रमाणे पकडायचा असतो. असे पकडण्यामुळे ग्लासातली ब्रॅन्डी हलकीशी गरम (उबदार) होउन तिच गंध खुलतो आणि चवही खुलते.ब्रॅन्डीत किंचीत कोमट पाणी घालून प्यायल्यास तिची लज्जत काही औरच असते. थंड केलेली (बाटली फ्रीझमध्ये ठेवून, ग्लासात बर्फ घालून नव्हे) ब्रॅन्डी ‘नीट’ घेतल्यास एक आगळाच आनंद देते.

ब्रॅन्डी ही प्रामुखाने जेवणानंतर प्यायचे मद्य आहे. जेवल्यानंतर, ब्रॅन्डीसोबत जर सिगार, तोही क्युबन, असेल तर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागते की साक्षात यम जरी त्यावेळी आला तर त्याचीही, माणसाला त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर काढायची, ईच्छा होणार नाही. 🙂

अशी ही ब्रॅन्डीची गाथा सुफळ संपूर्ण करतो.

पुणे वाइन फेस्टीव्हल – 2011

Pune Gourmet Club पुण्यात 2007 पासून पुणे वाइन फेस्टीव्हल आयोजीत करते. पुण्याबरोबर मुंबईला बांद्र्यालाही हा वाइन फेस्टीव्हल ते आयोजीत करतात. अस्सल वाइनप्रेमींसाठी वेगवेगळ्या वाइनरीजच्या वाइन्स चाखण्याची आणि विकत घेण्याची, एकाच ठिकाणी, एक मस्त संधी ह्या निमीत्ताने प्राप्त होते.

ह्या शनिवारी काही मित्रांसोबत पुणे वाइन फस्टीव्हल 2011 ला हजेरी लावण्याचा योग आला (सहकुटुंब). खरचं खूप धमाल आली. जवळजवळ 16 वाइनरीजचे स्टॉल्स ह्या वेळी होते. तसेच खाण्याचेही बरेच स्टॉल्स असल्यामुळे वाइन चाखण्याबरोबरच खादाडीची सोय उपलब्ध होती.

ह्या इथे स्वागतकक्षात प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून आत गेलो. खरेतर उशीरचं झाला होता पोहोचायला,चांगलेच अंधारून आले होते.

आत गेल्यावरचा नजारा असा होता.

एक फेरी मारून सर्व स्टॉल्सचा अंदाज घेतला. मग एका मित्राच्याच्या सल्ल्यानुसार ‘नाइन हिल्स’ ह्या वाइनरीच्या स्टॉलपासून वाइन ‘टेस्टींगला’ सुरुवात केली. त्याने ह्याच स्टॉलपासून का सुरवात करायला सांगीतले हे बाकीचे स्टॉल्स बघितल्यावर कळून आले. 😉

इथे मी सुरुवात केली ‘सोविन्यॉन ब्लॅं’ आणि ‘शेनिन ब्लॅँ’ ह्या व्हाइट वाइनपासून. मित्राने ह्या वाइअनरीची नविन लॉन्च केलेली वाइन ‘विऑन्यें’ ट्राय केली.

इथे मी माझ्या वाइनच्या तुटपुंज्या माहितीच्याआधारे वाइन टेस्टींगच्या ‘वाइन बघणे’, ‘वाइनचा गंध अनुभवणे’ आणि ‘वाइन चाखणे’ ह्या स्टेप्स उपस्थित मित्रांना समजावून सांगीतल्या. त्यांना त्या पटल्याने जरा आनंदही झाला.

पुढच्या वाइअनरीकडे गेलो तीथे रेड वाइनमधे शिराझ होती. माझे आणि सिराझचे जरा वाकडे असल्याने मी परत व्हाइट वाइनकडेच मोर्चा वळवला. इथे होती ‘शॅर्दोने’.

मग जरा वाइन चाखत चाखत आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात मित्रांनी बराच वेळ घालवला. इथे आमचे कुटुंब मुलांचा पोटोबा करण्याकरिता गेले असल्याने मलाही ह्या संधीचा फायदा करून घेता आला.

त्यानंतर मोर्चा वळवला ‘झंपा’ ह्या वायनरीच्या स्टॉलकडे.

इथल्या वाइन्स जरा जास्तच अॅAसीडीक होत्या कदाचित त्यांचे तापमान योग्य नसल्यामुळे असेल. इथे ‘सुला’ वाइन्स कश्या चांगल्या असतात ह्यावर आमचे एक चर्चासत्र झाले. ते नेमकी त्या स्टॉलवाल्याने ऐकले. मग सुला सध्या ‘वाइनमधे कशी गडबड करते’ ह्यावर त्याचे मौलिक विचार ऐकायला मिळाले. ते ऐकून पुढे सरकलो ‘किंगफिशर’ च्या स्टॉलकडे.

इथे ‘शॅर्दोने’ आणि ‘शिनेन ब्लॅं’ ह्या द्राक्षांचा ब्लेंड असलेली व्हाइट वाइन होती. हे कॉम्बीनेशनच इतके अपीलिंग होते की लगेच ट्राय केले. अतिशय सुंदर वाइन. वाइअनचे तापमान मस्त असल्याने अतिशय भन्नाट लागली. लागलीच ती विकत घ्यायचे ठरले आणि शेवटी निघताना विकत घेतली.

आता शोध घ्यायचा होता ‘झिनफॅन्डलचा’ कारण ती अजूनही कुठेच दिसली नव्हती. मग फिरून शोध घेतल्यावर झिनफॅन्डल मिळाली ‘यॉर्क’ नावाच्या वायनरीच्या स्टॉलवर. सगळ्यांना तिकडे मोर्चा वळवायला सांगीतला.

इथे झिनफॅन्ड्लची रोज वाइन ट्राय केली. एकदम मस्त होती. विकत घेण्याचे ठरवून शेवटी परत येताना विकत घेतली. इथे असताना वपाडावचे आगमन झाल. त्याला मर्गदर्शनाकरून यॉर्कच्या बाजूलाच ‘फोर सीजन्स’ वायनरीचा स्टॉल होता. तेथे मोर्चा वळवला.

ह्या स्टॉलवर ‘ब्लश’ ब्रॅन्ड्ची रोज वाइन टेस्ट केली. अतिशय भन्नाट वाइन होती. बाकीच्यांसाठी एक नविन बाटली फोडली जीचे तापमान एकदम परफेक्ट होते. त्यामुळे ब्लॅशचा लुत्फ मनमुराद घेता आला. ब्लश घेत असतानाच ‘वाइन स्टॉम्पिंगची’ घोषणा झाली आणि लगेच तीथे मोर्चा वळवला.

पण एकंदरीत हा असा माहोल बघता ‘स्टॉम्पिंग’ कमी आणि ‘स्टेम्पीड’ जास्त असे वाटल्याने फार वेळ न घालवता बाकीच्या वाइनरीजकडे मोर्चा वळवला.

पण काही मित्रांनी ह्या संधीचा ‘लाभ’ घेतला. त्यांच्या पदस्पर्शाने द्राक्षे पावन झाली.

त्यानंतर बर्‍याच वाइअनरीजच्या स्टॉल्सवर रेड वाईन, रोज वाइन आणि व्हाइट वाइन्स चाखल्या. काही बर्‍या होत्या तर काही ओके होत्या.

यानंतर एक कॉकटेल काउंटर दिसला जो बघितल्यावर आम्हा सर्वांनाच आनंद झाला. तिथे काही मित्रांनी रेड वाइनचे आणि मी ‘स्प्राईट्झर’ नावाचे व्हाईट वाइनचे कॉकटेल ट्राय केले. रेड वाइनचे कॉकटेल एकदम बकवास निघाले त्याचे नावही विसरलो ह्यातच सगळे आले. स्प्राईट्झर बरे होते.

रेसिपी
व्हाईट वाइन 30 मिली
स्प्राइट – ग्लास टॉप अप
ग्रॅपा (द्राक्षाचा सिरप) – 15 मिली

हजेरी लावलेले मित्रमंडळ

मधेच एका मित्राने सिगार पैदा केला कुठून तरी त्याने आणखीणच मजा आली. त्याच्या चेहेर्याावरून तो कोण ते कळेलच त्याचा चेहरा बोलतो आहेच.

रात्री साधारण दहाच्या सुमाराला परत निघालो. एकंदरीत ४-५ तास अगदी मजेत आणि हवेत तरंगत गेले. वाइन हे तर कारण होतेच पण दर्दी मित्रांची संगत चार चाँद लावून गेली.

कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची – 3, रेड वाईन (रक्त वारूणी)

मागच्या भागात चर्चा केली व्हाईट वाइनची (श्वेत वारुणी) , आज चर्चा करूयात रेड वाइनची (रक्त वारुणी)

ह्या वाइनला जरी रेड वाइन म्हणत असले तरीही ही फक्त लाल नसते. काळपट, गडद लाल, लालसर, रूबी रेड, जांभळट, मरून अशा विविध रंगछटांमध्ये मिळते. ह्याचे कारण म्हणजे द्राक्षाची प्रजात, ज्यापासून ती वाइन बनते. ह्या वेगवेगळ्या प्रजातीच्या द्राक्षांचा एक खास रंग असतो जो लाल, गडद जांभळ्या आणि निळसर अशा रंगछटांपासून नैसर्गिकरीत्या मिळालेला असतो.

पण खरेतर हा रंग द्राक्षाच्या गराचा नसतो; तो असतो त्या द्राक्षाच्या सालीचा. वाईनच्या नेत्रसुखद, निराळ्या अशा वर्णपटाला सालीचा हा रंगच जबाबदार असतो. वाइन बनवताना द्राक्षे जेव्हा मोठ्या पात्रात रस काढण्यासाठी चेचली जातात त्यावेळी ह्या सालींचा संपर्क त्या रसाशी येतो. त्यावेळी ही साल त्या द्राक्षाच्या रसाला एक विशिष्ट रंगछटा देते. प्रत्येक वाइनची स्वतःच्या रंगाची वैशिष्ट्यपूर्ण छटा ही :

 • ती वाइन बनवण्यासाठी वापरलेल्या द्राक्षाची प्रजात (सालीचा रंग) आणि
 • त्या द्राक्षाच्या सालीचा रसाबरोबर संपर्क होऊ दिलेला कालावधी
 • प्रत्येक वायनरीचा सीक्रेट फॉर्मुला आणि सीक्रेट रेसिपी

ह्यांनी बहाल केलेला असतो. ह्या साली नैसर्गिक यीस्टचेही काम करतात फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये.

ज्यावेळी ही साल द्राक्षाच्या रसाला विशिष्ट रंगछटा बहाल करत असते,  बरोबर त्याचवेळी सालीतले ‘टॅनीन’ त्या रसात मिसळले जात असते.  हे बहाल करते वाइनला “स्वतः:चे अंग”.  हे टॅनीन वाइनला एक ‘पोत’ (Texture) देते आणि हा पोत म्हणजेच वाइनचे अंग. हलके अंग, मध्यम अंग आणि जड अंग अशा चढत्या क्रमाने वाइन्समध्ये टॅनीनचे प्रमाण वाढत असते.  वाइनचा प्रवाहीपणा (Viscosity) वाइनच्या अंगाच्या चढत्या क्रमाने कमी कमी होत जातो.

आता बघूयात रेड वाइनसाठी वापरण्यात येणार्‍या विविध प्रजाती (Varieties) :

Cabernet Sauvignon
  Cabernet Sauvignon द्राक्षं King of Red Wine Grapes म्हणून ओळखली जातात.जिथे जिथे वाइनचे उत्पादन केले जाते तिथे तिथे ह्या द्राक्षाची पैदास केली जाते.फ्रांसमधे Bordeaux ह्या परगण्यात तयार झालेली ही द्राक्षे सर्व ठिकाणच्या द्राक्षामध्ये उच्च दर्जाची मानली जातात. Bordeaux इथल्या सगळ्या उच्च दर्ज्याच्या रेड वाइन्स ह्या द्राक्षापासून बनवल्या जातात.ह्या द्राक्षापासून बनवलेल्या वाइन्स बर्‍याच वर्षांपर्यंत मुरवत ठेवता येतात आणि त्या जितक्या जुन्या होत जातात तितक्या त्या चवदार होत जातात. जास्त काळ मुरवता येत असल्यामुळे चव परिपक्व होऊन ही द्राक्षे इतर द्राक्षांबरोबर ब्लेन्ड करायला उत्तम असतात. प्रामुख्याने Merlot ह्या द्राक्षाबरोबर तसेच Sangioveseआणि Shiraz ह्या द्राक्षांबरोबर ब्लेन्ड करण्यासाठी Cabernet Sauvignon उत्तम मानली जाते.ह्या वाइन्स मध्यम अंगाच्या आणि भरलेल्या अंगाच्या असतात. तसेच ह्या ‘ड्राय’ प्रकारात मोडतात. ह्या वाइन मध्ये टॅनीनचे प्रमाण जास्त असते.
Merlot
  ह्या द्राक्षाचे मूळ फ्रांसमधे Bordeaux ह्या परगण्यात आहे.ह्या वाइन्स हलक्या अंगाच्या ते मध्यम अंगाच्या असतात. ह्या वाइन मध्ये टॅनीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे ह्या ‘सॉफ्ट’ असतात.रेड वाइन ह्या प्रकारात सुरुवात करणार्‍यांसाठी ह्या द्राक्षाच्या वाइन्स एकदम उत्तम असतात कारण ह्यांची चव फारच ‘फ्रुटी’ असते. तर ह्या मालिकेवरून स्फुरण घेऊन कोणी रेड वाइन सुरू करणार असेल तर सुरुवात Merlot ने केल्यास आगळीच लज्जत येईल. :)प्रामुख्याने Merlot ही Cabernet Sauvignon ह्या द्राक्षाला जरा मृदू करण्यासाठी ब्लेंड करताना वापरली जाते.
Pinot Noir
  फ्रांसमधल्या Burgundy परगण्यातली ही एक उच्च दर्जाची, प्रसिद्ध द्राक्षाची प्रजात आहे.ह्या द्राक्षापासून तयार झालेल्या वाइनला ‘रेड बरगंडी’ असेही म्हणतात. फ्रान्समध्ये तयार होणार्‍या उच्च दर्जाच्या वाइनमध्ये ह्या वाइनची गणना होते.आता ह्या द्राक्षांची पैदास फ्रान्स व्यतिरिक्त इतर वाइन उत्पादक देशामध्येही मोठ्या प्रमाणात होते.ही द्राक्षे वाढवण्यास एकदम नाठाळ असतात. म्हणजे यांना दिवसा उबदार आणि रात्री प्रचंड थंड असे वातावरण लागते. पण एवढी चवदार असतात की ह्यांना वाढवण्याच्या मेहनतीचे एकदम चीज होते :)ह्या नाठाळपणामुळे ह्या द्राक्षांची पैदास इतर द्राक्षांच्या तुलनेत कमी होते त्यामुळे ह्या वाइन्स जरा महाग असतात.ह्या वाइन्स हलक्या अंगाच्या असतात आणि चव ‘फ्रुटी’ असते.
Cabernet Franc
  फ्रान्स मधल्या Bourdeaux and Loire (लूव्र) Valley परगण्यात मूळ असलेल्या ह्या द्राक्षांना वाढीसाठी थंड वातावरणाची गरज असते. ह्या द्राक्षांमध्ये ‘टॅनीन’चे प्रमाण कमी असते त्यामुळे ही द्राक्षे Cabernet Sauvignon ह्या  प्रजातींच्या द्राक्षांबरोबर ब्लेंडींग साठी  प्रामुख्याने वापरली जातात.आता ही द्राक्षे अमेरिकेत कॅलिफोर्निआ मध्येही मोठ्या  प्रमाणात तयार केली जातात.
Shiraz
  ह्या द्राक्षांना अमेरिकेत आणि फ्रांसमधे Syrah तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेत Shiraz म्हणतात.फार ऍसिडीक चव असते ह्या द्राक्षांपासून बनवलेल्या  वाइनची. नुकताच सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2011 मध्ये गेलो होतो तेव्हा ‘देशमुख वायनरी’ची D’ Shiraz असे नाव असलेली Shiraz विकत घेतली. अतिशय ऍसिडीक आणि भयंकर तीव्र चवीची होती. मला नाही आवडली. (हे माझे वैयक्तिक मत आहे)
Zinfandel
  झिंनफॅन्डल द्राक्षाची प्रजात अमेरिकेन द्राक्षोत्पादन इतिहासाच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. ह्या द्राक्षाचे मूळ इटलीत असावे असा समज होता. पण बर्‍याच संशोधनानंतर ( 10-12 वर्षांच्या )  हे मूळ क्रोएशिया मध्ये मिळाले. जरी मूळ युरोपात असले तरीही ह्या द्राक्षांच्या वाइनने आता न्यू वर्ल्ड मध्ये धूम केलेली आहे. ही प्रजात अष्टपैलू आहे कारण जरी हीचा लाल रंग असला तरीही ‘माझीच लाल’ असे न करता श्वेत  वारुणी म्हणजेच व्हाईट वाइन बनवण्यासाठीही ही द्राक्ष दुजाभाव दाखवत नाही. म्हणजे ह्या लाल द्राक्षांपासून व्हाईट वाइनही बनवली जाते जिला व्हाईट झिन असे म्हणतात.  नुसते  व्हाईटच नव्हे तर पिंक (गुलाबी) वाइन्सही ह्या द्राक्षांपासून बनवल्या जातात.आहे की नाही अष्टपैलू!
Malbec
  फ्रान्स मधल्या Bourdeaux परगण्यात मूळ असलेली ही प्रजात. पण आता ‘पिकते तिथे विकत नाही’ ह्या  उक्तीनुसार  युरोपामध्ये हिची लोकप्रियता ढासळू लागली आहे.त्याउलट अर्जेंटिना मधल्या पोषक वातावरणामुळे तिथल्या ह्या द्राक्षांपासून बनलेल्या रेड वाइन्सनी धुमाकूळ घातला आहे आणी प्रचंड लोकाश्रय मिळवला आहे. ह्या द्राक्षापासून बनलेली वाइन चवीला रस्टीक आणि टॅन्जी (रानवट आणि तीव्र) असते
Sangiovese
  इटली मध्ये मूळ असलेली आणि सर्वात जास्त व कॉमनली उत्पादित केली जाणारी ही द्राक्षांची प्रजात. इटली मधला Tuscany परगणा Sangiovese द्राक्षांची मायभूमी आहे असे  म्हणतात. प्रख्यात Chianti वाइन ही इटलीतील Chianti परगण्यातील Sangiovese द्राक्षांपासून बनविलेली असते.
Gamay
  फ्रान्स मधल्या Beaujolais परगण्यात Gamay द्राक्षापासून तयार होणार्‍या वाइन्सच अस्सल Gamay वाइन समजल्या  जातात. अमेरिकेत तयार होणार्‍या Gamay वाइन्स ह्या दुय्यम समजल्या जातात कारण त्यांचा दर्जा फ्रेंच Gamay वाइनपेक्षा हलका असतो. ह्या वाइन्स ‘तरुण’  असताना प्यायच्या असतात.

रेड वाइन कशी प्यावी

चांगल्या वाइन्स चुकीच्या पद्धतीने सर्व्ह केल्यास अथवा प्यायल्यास अतिशय वाईट लागू शकतात, तर सो सो वाइन्स ह्या योग्य पद्धतीने सर्व्ह केल्यास आणि प्यायल्यास अत्युच्च अनुभूती देऊ शकतात. वाइन सर्व्ह करताना योग्य ग्लास वापरणे फार गरजेचे असते. तसेच योग्य तापमानाला वाइनचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो आणि वाइनची लज्जत वाढते.

रेड वाइनचे योग्य तापमान

रेड वाइनसाठी तापमान एकदम “पर्फेक्ट” असावे. रेड वाइन जर जास्त थंड प्यायली तर तीच स्वाद आणि टॅनीनमुळे आलेला पोत गायब होऊ शकतो. त्याउलट जर गरम, कोमट अशी प्यायली तर ती फ्लॅट लागेल. रेड वाइन प्यायचे “पर्फेक्ट” तापमान असावे 15 ते 18 डिग्री सेल्शिअस. पण हो त्यासाठी थर्मामीटर घेऊन बसू नका प्यायला नाहीतर मग प्यायचे मीटर गंडेल 😉 रेड वाइन जनरली रूम टेंपरेचर ला प्यावी असे म्हणतात पण ते रूम टेंपरेचर भारतातले नसते बरं का, ते रूम टेंपरेचर म्हणजे जुन्या काळातील ब्रिटिश मॅन्शन्स मध्ये असणारे रूम टेंपरेचर जे असायचे 15 ते 18 डिग्री सेल्शिअस.

रेड वाइनसाठी वापरायचा ग्लास हा असा असावा:

रेड वाइनचे ‘कॅरॅक्टर’ खर्‍या अर्थाने खुलवायचे असल्यास योग्य ग्लास हा नितांत आवश्यक असतो. रेड वाइनच बाटलीचे बूच उघडल्यानंतर प्यायच्या आधी वाइनच हवेशी (पक्षी: हवेतील ऑक्सिजन) संपर्क होऊन ऑक्सीडेशन झाल्यास वाइनचे ‘कॅरॅक्टर’ खुलते म्हणजे तिचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो. ह्या ऑक्सीडेशनसाठी रेड वाइनच ग्लास मोठ्या तोंडाचा असतो. साधारण बाऊल (Bowl) सारख्या पसरट आकारामुळे हवेशी संपर्क वाढण्यास मदत होते.ह्या ग्लासेसचे पसरटपणाच्या प्रमाणानुसार अजूनही पोट प्रकार पडतात

 • Bordeaux (मराठी उच्चार ?) ग्लास
 • बरगंडी ग्लास

रेड वाइन कधी प्यावी
रेवाइन जेवणापूर्वी आणि/किंवा जेवताना जेवणाबरोबर घायची असते.
फक्त जेवतानाच रेड वाइन मजा आणते असे नाही तर निवांत वेळी (Leisure Time) नुसतीही प्यायल्यास रेड वाइन मजा आणते.

रेड वाइन बरोबर काय खावे
“Red wine with Red meat” हा रेड वाइन पिण्याचा ‘थंब रूल’ आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

स्टार्टर्स: गरम स्टार्टर्स, एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग चीज असलेले
मेन कोर्स: पास्ता विथ रेड सॉस, चीज बेस्ड डिशेस, बीफ,पोर्क, चिकन डशेस

आपले भारतीय (पक्षी: आशिआई) जेवण जरा मसालेदार आणि  तिखट असते त्यामुळे कुठल्याही जेवणाबरोबर (साऊथ इंडिअन सोडून) रेड वाइन मस्त जोडी बनवते.

(क्रमशः)

कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची – 2 (श्वेत वारूणी)

मागच्या भागात वाइनचे वर्गीकरण बघितले. आता एक एक कॅटेगरी बघुयात!

आज चर्चा करुयात व्हाइट वाइनची (श्वेत वारुणी)

जरी ह्या वाइनला व्हाइट वाइन म्हटले जात असले तरीही हिचा रंग श्वेत नसतो. हा रंग साधारण पिवळसर, हलका सोनेरी किंवा गवताच्या सुकलेल्या काडीच्या रंगासारखा असतो. हा श्वेतसदृश्य रंग ही वाइन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या द्राक्षाच्या प्रतीवर आणि प्रजातीवर अबलंबुन असतो.
व्हाइट वाइन ही प्रामुख्याने पिवळ्या किंवा श्वेतवर्णिय द्राक्षांपासुन बनवली आते. काही लाल रंगांच्या द्राक्षांच्या जातीपासुनही त्या द्राक्षाची साल न वापरता व्हाइट वाइन बनवली जाते. हे थोडे चमत्कारीक आहे पण खरं आहे. 🙂

आपल्या अंगात भिनणार्‍या प्रत्येक प्रत्येक  व्हाइट वाइनला स्वतःचे असे एक अंग असते.
आता अंग म्हणजे काय?  हे अंग म्हणजे वाइनचा चिकटपणा (Viscosity) किंवा प्रवाहीपणा.

ह्या अंगाचे प्रकार असे असतात:

 • हलके अंग (Light-bodied) – शेलाट्या बांध्याची ही वाइन म्हणजे कतरीना कैफ 🙂
 • मध्यम अंग (medium-bodied) – मध्यम बांध्याची ही वाइन म्हणजे उमेदीतली जुही चावला 🙂
 • भरलेले अंग (full-bodied) – भरल्या अंगाची ही वाइन म्हणजे शिल्पा शिरोडकर 🙂

थोडक्यात अनुक्रमे दुध, सायीचे दुध आणि बासुंदी ह्यांच्यात जो फरक तोंडभर घोट घेतल्यावर कळेल तसाच फरक वाइन वाइन च्या अंगामधेही असतो.

हलक्या अंगाबरोबरच व्हाइट वाइन ही रेड वाइनच्या तुलनेत खुपच कमी ऍसिडीक म्हणजे अल्कोहोलचे कमी प्रमाण असणारी असते तसेच तुलनेने अंमळ गोड असते.

आता जरा  “Top Eight” अश्या व्हाइट वाइनसाठी वापरण्यात येणार्‍या जाती (Varieties) बघुयात.

Chardonnay
व्हाइट वाइनसाठी वापरण्यात येणार्‍या सर्व प्रजातींमधे ही प्रजात “राणी” किंवा “Queen” म्हणुन ओळखली जाते. ह्या व्हाइट वाइनच्या लोकप्रियतेचे महत्वाचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या वातावरणात ह्या द्राक्षाच्या प्रजातीचे उत्पादन करता येउ शकते. त्यामुळे जगात जिथे जिथे  वाइन तयार केली जाते तिथे तिथे ह्या प्रजातीचे उत्पादन करता येते.ह्या द्राक्षाची चव न्युट्रल असते त्यामुळे ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइनला ओक लाकडाचा स्वाद आणि गंध जास्त प्रमाणात असतो. (ओकच्या कास्क मधे मुरवल्यामुळे)

ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइन ह्या  full-bodied म्हणजेच भरलेल्या अंगाच्या असतात. मध्यम ते जास्त अशी ऍसीडीटी असते ह्या वाइनची. ओक, वॅनिला, बटर अश्या वेगवेगळ्या चवीत शार्डने वाइन मिळते.

Chenin Blanc
फ्रान्स मधल्या Loire Valley तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निआ इथे तयार होणार्‍या ह्या द्राक्षापासुन तयार होणार्‍या वाइन्सना शिनेन ब्लांक असे नाव मिळते.ह्या वाइनची चव ही द्राक्षे कुठल्या वातावतणात आणि कुठ्ल्या प्रकारच्या मातीत तयार झाली आहेत त्यावर अवलंबून असते. म्हणज़े वेगवेगळ्या देशात तयार झालेल्या ह्या वाइनच्या चवीत फरक असतोच. फ्रान्समधे तयार होणारी शिनेन ब्लांक सर्वांत चवदार असते.

ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात.

Gewurztraminer
जर्मनी आणि फ्रान्समधे आल्प्स पर्वतराजींच्या कुशीत तयार होणारी ही द्राक्षे ह्या प्रांतातील थंड वातावरणात पिकल्यावर त्यांपासुन तयार होणारी वाइन म्हणजे Gewurztraminer (मराठी उच्चार करायच्या भानगडीत पडलो नाही). Gewurztraminer चा अर्थ स्पायसी असा आहे.ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात आणि नावाप्रमाणे जरा स्पायसी असतात.
Pinot Gris or Pinot Grigio
इटली मधे आणि फ्रान्सच्या Alsace प्रांतात तयार होणार्‍या द्राक्षांना पिनॉट ग्रीझो असे म्हणतात तर अमेरिकेत ह्या द्राक्षांना पिनॉट ग्रीस असे म्हणतात. ह्या द्राक्षापासुन तयार होणार्‍या वाइनची चव ते द्राक्ष कुठे तयार झाले आहे त्यावर खुपशी अवलंबुन असते.युरोप मधे तयार होणार्‍या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्‍या वाइन्स medium-bodied असतात.
Riesling
जर्मनी, फ्रान्सचा Alsace प्रांत आणि अमेरिकेत न्यु यॉर्क मधल्या Finger Lakes येथे ह्या द्राक्षांची पैदास मोठ्या प्रमाणात होते.
युरोप मधे तयार होणार्‍या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्‍या वाइन्स medium-bodied असतात.
ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या ‘तरुण’ असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो. मुरवत न ठेवल्यामुळे ह्या वाइन्सना ओक लाकडाचा फ्लेवर आणि अरोमा नसतो.
Sauvignon Blanc
ह्या द्राक्षापासुन बनणारी वाइन फुमे ब्लांक (Fumé Blanc) म्हणुनही ओळखली जाते. ही द्राक्षे फ्रान्समधे Bordeaux आणि Loire प्रांतात  होतात. तसे ती अमेरिका, न्युझिलंड आणि साउथ अफ्रिकेतही तयार होतात.
Semillon
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्‍या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या द्राक्षांचा Sauvignon Blanc ह्या द्राक्षांबरोबर ब्लेंड करुन “डिझर्ट” वाइन बनवतात.
Viognier
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्‍या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या ‘तरुण’ असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो.

व्हाइट वाइन कशी प्यावी

चांगल्या वाइन्स चुकीच्या पद्धतीने सर्व्ह केल्यास अथवा प्यायल्यास अतिशय वाइट लागु शकतात, तर सो सो वाइन्स ह्या योग्य पद्धतीने सर्व्ह केल्यास आणि प्यायल्यास अतुच्च अनुभुती देउ शकतात. वाइन सर्व्ह करताना योग्य ग्लास वापरणे फार गरजेचे असते. तसेच योग्य तापमानाला वाइनचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो आणि वाइनची लज्जत वाढते.

व्हाइट वाइनचे योग्य तापमान

ह्या वाइन्स ‘चिल्ड’ घ्यायच्या असतात! पिताना वाइनचे तापमान 5-7 डिग्री सेल्शिअस असावे. ह्या तापमानाला स्वाद आणि गंध (दरवळ) ‘गजब ढाता है’ 🙂

व्हाइट वाइनसाठी वापरायचा ग्लास हा असा असावा:

व्हाइट वाइनसाठी वापरायचा ग्लास हा रेड वाइन ग्लास पेक्षा थोडा लंबुळका असतो. त्याचे तोंड हे लहान असते. तोंड लहान असण्याचे कारण हवेशी संपर्क कमी होउन ओक्सीडेशन कमी करणे. त्याच बरोबर व्हाइट वाइनचे तापमान कमी ठेवले जाण्यासही लहान तोंड मदत करते.

व्हाइट वाइन कधी प्यावी
व्हाइट वाइन जेवणापुर्वी आणि/किंवा जेवताना जेवणाबरोबर घायची असते. (जेवणानंतर घ्यायच्या डिझर्ट वाइन्स वेगळ्या असतात)

व्हाइट वाइन बरोबर काय खावे
white wine with white meat” हा व्हाइट वाइन पिण्याचा ‘थंब रुल’ आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
साधारणपणे सी फुड बरोबर व्हाइट वाइन्स मजा आणतात. शाकाहारी असाल तर साधारण गोड आणि क्रिमी ग्रेव्ही असलेल्या डीश बरोबर एकदम उत्तम.

(क्रमशः)

कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची – 1

अगदी प्राचीन काळी जेव्हा माणसाचे पहिल्यांदा स्त्रीशी भांडण झाले आणि ती ‘फुरंगटुन’ बसली त्या क्षणी माणसाला तितकाच मादक आणि नशीला पर्याय शोधण्याची गरज भासुन त्याने वारुणीचा शोध लावला.  म्हणजे असे काहीतरी असावे हा माझाच जावइशोध आहे. 😆 असो.

मानवाच्या उदयाबरोबरच वाइनचा उदय झाला असावा. मानवाने जे काही मादक पेय पहिल्यांदा प्यायले असेल ते वाइन असे समजले जाते (हा माझा जावइशोध नाहीयेय) सर्व प्राचिन संकृतींमधे वाइनला (वारुणी) अत्यंत मानाचे स्थान होते. सर्वच प्राचिन संकृतींच्या म्हणजे सुमेरिअन, इजिप्शीयन, ग्रीक, रोमन्स आणि अर्थातच आपल्या प्राचिन आर्य लोकांनीही वाइन बनवली, चाखली आणि तिची मादकता उपभोगली आहे.
मर्त्य मानवाचे सोडा हो, प्रत्यक्ष इंद्राच्या दरबारातही हिचे गोडवे गायले… आय मीन गडवे प्यायले गेलेत 😉

तर ही प्राचिन काळापासुन मानवाला माहित असलेली, वाइन, वारुणी, जिच्याबद्दल कविंनी काव्ये/कवने/कविता रचल्या, लेखकांनी ग्रंथच्या ग्रंथ लिहीले, आणि आता माझ्यासारखे ब्लॉगर्स ब्लॉग पाडताहेत 😉 तीच्याबद्दल थोडी माहिती करुन घेवुयात.

वाइन ही प्रामुख्याने द्राक्षापासुन बनवतात. ती सफरचंद किंवा बेरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासुनही बनवली जाते. तसेच ती धान्यापासुनही बनवली जाते उदाहरणार्थ जापनीज साके तांदळापासुन बनवितात. पण 90% वाइन ह्या द्राक्षापासुन बनवल्या जातात आणि वेगळा उल्लेख न करता नुसते वाइन म्हटले तर ती ग्रेप वाइनच असते, जगात सगळीकडे.

वाइन बनवण्याचा शोध युरोप आणि मध्यपुर्वेत लागला असे समजले जाते. त्यामुळे वाइन दुनिया ही दोन जगात विभागली गेली आहे
1. युरोपिअन
– फ़्रान्स
– इटली
– स्पेन
– पोर्तुग़ल
2. न्यु वर्ल्ड
– अमेरिका
– ऑस्ट्रेलिया
– चिली
– अर्जेंटिना
– इतर देश

आपल्यासारख्या पामरांना ह्यातुन बोध एवढाच घ्यायचा की न्यु वर्ल्ड मधल्या वाइन्स विकत घेणे सोपे असते, डोक्याला शॉट नसतो. ह्या वाइनच्या लेबल वर सर्व डिटेल्स लिहिलेल्या असतात. ह्या डिटेल्स काय ते पुढे येणारच आहे.

युरोपिअन लोकांना त्यांच्या प्रांतांचा जाज्वल्य का काय म्हणतात तसला अभिमान असतो (आणि तो सार्थेही आहे म्हणा) त्यामुळॆ त्या वाइन्सच्या लेबर वर फक्त त्या प्रांताचे नाव असते. आणि म्हनुनच ह्या वाइन्स विकत घ्यायच्या म्हणजे डोक्याला शॉट असतो. युरोपिअनांचे म्हणणे असे की आमच्या वाइन्स प्यायच्यात ना मग जरा ‘अभ्यास वाढवा आणि मोठे व्हा’ :lol:, अक्षरश:, कारण तुम्हाला युरोपचा भुगोल (वाइनच्या अनुषंघाने) माहित असणे जरुरीचे असते ह्या वाइन समजायला आणि विकत घ्यायला.

आता जरा वाइनचे वर्गीकरण (क्लासिफिकेशन) बघुयात.खालिल चित्रात वाइनचे वेगवेगळे वर्ग/प्रकार दर्शविले आहेत.


तर वाइनचे मुख्य प्रकार 3

1. टेबल वाइन

सर्वसाधारण पणे वाइन म्हणुन पिल्या जाणार्‍या 90% वाइन्स ह्या कॅटेगरी मधे मोडतात. ह्या वाइन्सना विंटेज वाइन्स किंवा व्हरायटल (Varietal) असेही म्हटले जाते.

विंटेज म्हणजे द्राक्षाच्या सुगीचे वर्ष. म्हणजे ज्या वर्षी द्राक्षे तयार होउन वाइन बनवण्यासाठी तोडली जातात ते वर्ष. दर विंटेजप्रमाणे वाइनची चव बदलु शकते. म्हणजे एखाद्या वर्षीच्या वातावराणातील बदल जसे तापमान, बर्फाचे वादळ, थंडावा ह्यांच्यामधील सुक्ष्म फरकाने द्राक्षाच्या चवीत बदल होउन वाइअनची चव बदलते. युरोपमधे विंटेज रिपोर्ट्स दर वर्षी प्रकाशित होत असतात, ते वाचुन कोणत्या विंटेजची वाइन घ्यायची ते ठरवतात तेथील दर्दी लोकं.

व्हरायटल म्हणजे कोणत्या प्रकारच्या/जातीच्या (म्हणजे व्हरायटीच्या ) द्राक्षापासुन वाइन बनली आहे ते. वाइन बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या खास द्राक्षांच्या भरमसाठ जाती (प्रत) असतात. तर टेबल वाइन्स ह्या व्हरायटल असतात म्हणजे कोणत्या तरी एकाच प्रकारच्या द्राक्षापासुन बनवलेल्या असतात. म्हणजे व्हिस्कीमधे जसे ‘सिंगल मॉल्ट’ असते तसेच. पण व्हरायटल वाइन बनवायला कमीत कमी 75% द्राक्षही एकाच जातीची असावी लागतात. काही खास वाइनरीज 100% एकाच प्रतीच्या द्राक्षापासुन वाइन्स बनवतात पण मग त्या तश्याच महागही असातात. सर्व व्हाइट, रेड आणि रोज वाइन्स ह्या वर्गात मोडतात.

न्यु वर्ल्ड मानकाप्रमाने ह्या वाइन्स मधे जास्तीत जास्त 14% अल्कोहोल कंटेंट असु शकते.
युरोपिअन मानकाप्रमाने ह्या वाइन्स मधे 8%  –  14% अल्कोहोल कंटेंट असु शकते.

2. स्पार्कलिंग वाइन

ह्या वाइन मधे कार्बन डायऑक्साइड वापरुन हीला बुडबुडेदार बनवले जाते.
सर्व शॅंपेन ह्या स्पार्कलिंग वाइन्स  असतात पण सर्व स्पार्कलिंग वाइन्स ह्या शॅंपेन नसतात. असे का बुआ?
तर फ्रांस मधल्या शॅंपेन ह्या परगण्यात तयार होणारी द्राक्षे वापरुन शॅंपेन ह्या परगण्यात बनणारी  वाइनच फक्त स्वत:ला शॅंपेन म्हणवुन घेउ शकते. बहुत्करुन स्पार्कलिंग वाइन (युरोपिअन) ह्या व्हाइट आणि रोज प्रकारच्या असतात. पण सध्या ऑस्ट्रेलिअन आणि इटालिअन स्पार्कलिंग वाइन ह्या रेड स्पार्कलिंग वाइनही असतात.

ह्या वाइन्स मधे 8% – 12% अल्कोहोल कंटेंट असते.

3. डिझर्ट आणि फोर्टिफाइड वाइन
डिझर्ट वाइन्स ह्या गोड वाइन्स असतात जेवण झाल्यावर घेण्यासाठी. मुळ वाइनमधे साखरेचा अंश वाढवुन त्या वाइन मधे गोडवा आणलेला असतो.

फोर्टिफाइड म्हणजे स्ट्रॉन्ग बनवणॆ. फोर्टिफाइड वाइन ह्या मुळ वाइनमधे स्पिरीट टाकुन स्ट्रॉन्ग बननलेली असते. जनरली ब्रॅन्डी वाइनमधे टाकुन फोर्टिफाइड वाइन बनवली जाते.

ह्या वाइन्स मधे 17% – 22% अल्कोहोल कंटेंट असते.

(क्रमश:)