ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?

मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्‍याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता. एके काळी लष्कराच्या अधिकारात आणि ताब्यात असलेले हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी खुले होऊन त्याचा दैनंदिन जीवनातही वापर प्रभावीपणे सुरू झाला आहे. पण जीपीएस (GPS) म्हणजे नेमके काय? हा प्रश्न पडणे गैरलागू नाही; कारण प्रश्न पडले तरच उत्तरे मिळतात.

तर चला, जीपीएस (GPS) म्हणजे काय ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूयात…

ह्या जीपीएस (GPS) ची मुहूर्तमेढ रशियाने स्पुटनिक हा मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडल्यापासून रोवली गेली. स्पुटनिकमुळे अवकाशाचा अभ्यास, वातावरणाचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा अभ्यास असे अनेक उपयोग त्यावेळी होणार होते. पण अमेरिकेत त्याने गदारोळ उडाला आणि त्यातून पुढे अवकाश युगाच्या स्पर्धेची सुरुवात झाली. अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धामुळे ह्या अवकाशात सोडलेल्या उपग्रहांना एक वेगळेच परिमाण त्यावेळी मिळाले आणि त्यांचा उपयोग लष्करी हेरगिरी करण्याची सुपीक कल्पना अमेरिकन लष्कर अधिकार्‍यांच्या डोक्यात आली. कदाचित रशियाने सोडलेला उपग्रह त्याचसाठी असावा अशी अमेरिकेला भिती वाटत असावी. त्या अनुषंगाने संशोधन झाल्यावर ‘सॅटेलाईट नॅव्हिगेशन’ ह्या तंत्रज्ञानाचा उगम झाला. पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत उपग्रह सोडून, त्यांनी प्रक्षेपित केलेले संदेश ग्रहण करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक स्थान (geo-spatial) ठरविण्यासाठी, शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले ते प्रामुख्याने अमेरिकन लष्करी उपयोगाकरिता. हेच सॅटेलाईट नॅव्हिगेशन ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता जर अखंड पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक क्षेत्राकरिता वापरले गेले तर त्याचे “Global Navigation Satellite System (GNSS)” नामकरण होते. हेच तंत्रज्ञान जीपीएस (GPS) चा पाया आहे.

भूमितीमधील ‘Trilateration’ ह्या संकल्पनेचा प्रत्यक्षात, व्यावहारिक उपयोग (Practical Application) जीपीएस (GPS) मध्ये केला जातो. ह्या भूमितीय संकल्पनेनुसार एखाद्या बिंदूचे स्थान निश्चित करताना त्या बिंदूजवळ असणार्‍या आणखी कमीत कमी तीन बिंदूच्या भोवती वर्तुळ काढून, त्या बिंदूंमध्ये असणारे सापेक्ष अंतर लक्षात घेऊन स्थान निश्चिती करता येते. ह्यालाच Trilateration किंवा त्रिबिंदूभेद (श्रेयअव्हेर: राजेश घासकडवी) असे म्हणतात.

आता हे सर्व वाचल्यावर, काही ओ की ठो न कळल्याने, ‘ओ मेरी प्यारी बिंदू, बिंदू रे बिंदू… मेरी नैया पार लगादे’ हे गाणे म्हणावेसे वाटायला लागले ना. माझेही तसेच झाले होते. ठीक आहे, जरा उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे आपली नैया पार होईल.

समजा तुम्ही एके ठिकाणी उभे आहात आणि तुम्हाला अजिबात कळत नाहीयेय की तुम्ही कुठे आहात. त्यामुळे तुम्ही कोणाला तरी विचारता की बाबा रे हे ठिकाण कोणते. तो म्हणतो की हे ठिकाण मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे. आता आली का पंचाईत, बाजूच्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे हे ठिकाण त्या वर्तुळाच्या परिघावर नेमके कुठे आणि कोणते ते कसे कळणार?

मग तुम्ही दुसर्‍या कोणाला तरी विचारता. तो म्हणतो हे ठिकाण नाशिकपासून 210 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे. त्यानुसार 210 किमी त्रिज्या असलेलं अजून एक वर्तुळ काढूयात. आता जरा जीवात जीव येतोय, बाजूच्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे आता हे ठिकाण ह्या दोन वर्तुळांच्या एकमेकांना छेद देणार्‍या दोन बिंदूंपैकी एक आहे हे कळले.

त्या नंतर तुम्ही तिसर्‍या माणसाला विचारता. तो म्हणतो हे ठिकाण सातार्‍या पासून 105 किमी अंतरावर असलेले एक ठिकाण आहे.

त्यानुसार 105 कि.मी. त्रिज्या असलेलं अजुन एक वर्तुळ काढूयात. बस्स, आता ह्या बाजूच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे तिन्ही वर्तुळे छेद जाणारा बिंदू म्हणजे आपल्याला हवे असलेले ठिकाण म्हणजे, पुणे आहे हे निश्चित करता येते. (तसेही त्या माणसांनी दिलेल्या तिरकस उत्तरांवरून चाणाक्ष वाचकांनी हे ठिकाण आधीच ओळखले असणार म्हणा! ) तर हे तीन बिंदू आणि त्यांच्या भोवती काढलेली वर्तुळे हे सर्व भूमितीमधील ‘Trilateration’ संकल्पना.

वर दर्शविलेली ही वर्तुळे सॅटेलाइट्स च्या साहाय्याने अशी खालच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे कॅलक्युलेट केली जातात. हे द्विमीतीय असले तरी प्रत्यक्षात ते कॅल्क्युलेशन त्रिमितीय असते. रिसीव्हर प्रथम एका सॅटेलाईटकडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 150 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 150 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. त्यानंतर तो दुसर्‍या सॅटेलाईट कडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 210 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 210 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. त्यानंतर तिसर्‍या सॅटेलाईट कडून संदेश मिळवतो. तो सॅटेलाईट समजा 105 किमी दूर आहे. मग रिसीव्हर 105 कि. मी. चे एक वर्तुळ कॅलक्युलेट करतो. आता ह्या तिन्ही वर्तुळे जिथे एकत्र छेद देतील तिथले अक्षांश आणि रेखांश घेऊन त्याने स्थान निश्चिती केली जाते.

याच संकल्पनेचा उपयोग करुन जीपीएस (GPS) रिसीव्हर आपल्याला मदत करतो. त्यासाठी त्याला दोन गोष्टी माहिती असाव्या लागतात.

1. संदेश प्रक्षेपित करणार्‍या सॅटेलाईटचे अवकाशातील स्थान
2. त्याचे स्वतःचे, संदेश प्रक्षेपित करणार्‍या सॅटेलाईट पर्यंतचे अंतर

आता “याहूSSSS” हे गाणे म्हणावेसे वाटायला लागले ना? थांबा जरा. हे सगळे समजायला सोपे झाले किंवा करून घेतले. पण प्रत्यक्षात ते एवढे सोपे नसते. सॅटेलाईटपासून स्वतःचे अंतर मोजायला रिसीव्हरला प्रत्येक सॅटेलाईटची भ्रमणकक्षा माहिती असावी लागते. त्यांचे भ्रमण कॅलेंडर त्याला स्टोअर करून ठेवायला लागते. सूर्य आणि चंद्र यांच्या आकर्षणामुळे सॅटेलाईटच्या भ्रमणकक्षेत किंचित बदल होऊ शकतो. त्या किंचित बदलामुळे स्थान निश्चिती मध्ये चूक होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून सॅटेलाईटकडून मिळालेल्या संदेशांमधून त्या बदलाची माहिती डीकोड करून त्यानुसार अंतर कॅलक्युलेट केले जाते. त्याशिवाय वेळ ही एक किचकट भानगडही असते. प्रत्येक सॅटेलाईटची वेळ इतर सॅटेलाईट्स बरोबर सिंक्रोनाइज्ड असते, त्यासाठी त्या सर्व सॅटेलाईट्स मध्ये ‘ऍटॉमिक क्लॉक’ वापरलेले असते. पण ते क्लॉक रिसीव्हर मध्ये ठेवणे परवडणारे नसते. पण जर रिसीव्हर सॅटेलाईट्सच्या वेळेबरोबर सिंक्रोनाइज्ड नसेल तर अचूक स्थान निश्चिती करता येणार नाही. त्यासाठी रिसीव्हरमध्ये ‘क्वार्ट्झ क्लॉक’ वापरले जाते. ते प्रत्येक ‘क्लॉक टीक’ बरोबर त्याची वेळ रिसेट करते आणि सॅटेलाईटकडून मिळालेल्या संदेशांमधून मिळालेल्या ‘टाइम वॅल्यु’ वरून रिसीव्हर योग्य वेळ ठरवतो.

हे सगळे अविरत चालू असावे लागते. त्यासाठी बरीच आकडेमोड ह्या रिसीव्हरला करावी लागते. बरेच CPU सायकल्स त्यासाठी खर्च होतात. त्यामुळे मोबाइल मधल्या GPS रिसीव्हरमध्ये AGPS म्हणजे Assisted GPS वापरले जाते. मोबाइलमधल्या मर्यादित मेमरी, बॅटरी आणि गणनशक्तीमुळे ही सगळी आकडेमोड सर्व्हरवर केली जाऊन योग्य ते अक्षांश आणि रेखांश मोबाइलमधल्या रिसीव्हरला परत पाठवले जातात. त्यांचा वापर करून मोबाइलमधले मॅप्स ऍप मॅपवर आपली लोकेशन दाखवते.

आजच्या घडीला ह्या Global Navigation Satellite System आणि Trilateration यांच्या साहाय्याने दोनच यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत.
1. अकेरिकेची GPS यंत्रणा आणि 2. रशियाची GLONASS यंत्रणा

अमेरिकेची GPS यंत्रणा

अमेरिका ह्या यंत्रणेसाठी 24 सॅटेलाईट्स वापरते. कुठल्याही एका वेळी त्यातले तीन सॅटेलाईट्स पृथ्वीच्या कुठल्याही भागावर असतील अशी त्यांची भ्रमणकक्षा ठरवलेली केलेली असते. ही यंत्रणा सुरुवातीला फक्त लष्करासाठीच वापरली जायची, प्रामुख्याने हेरगिरीसाठी. पण तिचा काही भाग सरकारने सार्वजनिक उपयोगासाठी खुला केल्यापासून दैनंदिन जीवनात त्याचा किफायतशीर उपयोग सुरू झाला.

रशियाची GLONASS (Gobalnaya Navigatsionnaya Sputnikovaya Sistema) यंत्रणा

ह्यासाठी रशियानेही 24 सॅटेलाईट्स असलेलीच यंत्रणा उभी केली आहे, अमेरिकेच्या GPS ला उत्तर म्हणून. मध्यंतरी सोव्हियत रशियाच्या पडझडीनंतर ह्या यंत्रणेचे काम ठप्प झाले होते. पण पुतिन यांनी त्यावर लक्ष केंद्रित करून आणि रग्गड पैसा ह्या प्रकल्पाला पुरवून 2011 मध्ये सर्व 24 सॅटेलाईट्स कार्यान्वयित होतील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे 2011 पासून बर्‍याच मोबाइल बनविणार्‍या कंपन्यांनी GPS बरोबर GLONASS सिग्नल्स रिसीव्हींगची क्षमता असलेले रिसीव्हर्स मोबाइलमध्ये अंतर्भूत करायला सुरुवात केली आहे. सॅमसंग नोट, सॅमसंग गॅलॅक्सी 3 आणि आयफोन 5 ह्या फोन मध्ये ही सुविधा पुरवलेली आहे.

युरोपियन युनियनची Galileo यंत्रणा

अमेरिका आणि रशिया यांचे त्यांच्या सार्वजनिक असलेल्या यंत्रणांवर पूर्णं नियंत्रण असल्याने युद्धकाळात किंवा आणीबाणीच्या काळात ते त्यांची सेवा बंद करू शकतात. आणि लष्करी वापरासाठी जबर किंमत मोजूनही युद्धकाळात किंवा आणीबाणीच्या काळात त्यांच्या त्या यंत्रणांवर अवलंबून राहणे ही एक मोठी जोखीम आहे हे युरोप युनियनने ओळखले आणि त्यामुळे त्या यंत्रणांपासून स्वतंत्र अशी ही गॅलिलिओ यंत्रणा उभारण्याचा निर्णय 2003 मध्ये घेतला. 2006 मध्ये चीनही ह्या प्रकल्पात सहभागी झाला. पण बर्‍याच वेळा, वाढत जाणार्‍या खर्चामुळे त्या खर्चाचा भार युनियनमधल्या देशांनी कसा उचलायचा यावरून बरेच गोंधळ झाला आणि अजूनही आहे. एकूण 30 सॅटेलाईट्स असलेली ही यंत्रणा 2019 मध्ये पूर्णपणे कार्यान्वयित होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ह्या यंत्रणेची चार सॅटेलाईट्स त्यांच्या भ्रमणकक्षेत सोडली गेली आहेत.

चीनची कंपास (बैदू 2) यंत्रणा

युरोपियन युनियनच्या कटकटींना वैतागून चीनने त्यांच्या बैदू 1 ह्या स्थानिक यंत्रणेत सुधारणा करून स्वतंत्र ग्लोबल यंत्रणा उभारायचा निर्णय घेतला आणि कंपास हा प्रकल्प हाती घेतला. 35 सॅटेलाईट्सचा वापर ह्या यंत्रणेत केला जाणार आहे. त्यापैकी 10 सॅटेलाईट्सचा लॉंच करून झालेली आहेत. ह्यावरून चीनचा ह्यातला झपाटा दिसून येतो. 2020 पर्यंत सर्व सॅटेलाईट्सचा लॉंच करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची चीनची योजना आहे.

भारताची Indian Regional Navigational Satellite System (IRNSS) यंत्रणा

अभिमानाची बाब अशी की ह्या सर्व दिग्गज देशांच्या पंक्तीत भारत ही असणार आहे. सात सॅटेलाईट्स असलेली ही यंत्रणा फक्त भारत आणि भारतीय उपखंडावर लक्ष केंद्रित करणार आहे. इस्रो च्या पुढाकाराने आकारास येणार्‍या ह्या सरकारी यंत्रणेचा वापर नागरी आणि लष्करी ह्या दोन्ही कामांकरिता केला जाणार आहे. 2014 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वयित करण्याची इस्रोची योजना आहे. ह्या यंत्रणेद्वारे खालील चित्रात दाखविलेला भूभाग सॅटेलाईट्सच्या निरीक्षणाखाली असणार आहे.

आता ग्लोबल पोजिशनिंग म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

सर्च इंजिन – कसे चालते रे भाऊ ?

एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्‍या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला. मग त्याचे आणि माझे ‘गुगल शोध’ बद्दल झालेले बोलणे त्याने माझ्या धाकट्या मुलालाही सांगितले, प्रात्यक्षिकासहित. त्याचे त्यालाही कौतुक वाटून त्याचीही उत्सुकता चाळवली गेली.

‘बाबा, गुगलवर आपण काहीपण शोधू शकतो?’, गाल फुगवून आणि डोळे मोठ्ठे करून धाकट्याने विचारले. मी एकदम टेक सॅव्ही बाप असल्याच्या कौतुकाने त्याला म्हणालो, ‘हो काहीपण, तुला काय शोधायचे ते सांग आपण शोधूया’. एकदम निरागसतेने त्याने विचारले, ‘आई चिडल्यावर कधी-कधी तुम्ही म्हणता ना मला की नविन आई आणूयात! ही नविन आई पण आपण गुगलवर शोधू शकतो का?”. च्यायला, ही आत्ताची लहान पिढी आपलेच दात आपल्या घशात कसे घालील ह्याचा काही नेम नाही. पण वेळ बरी होती, अर्धांग स्वयंपाकघरात गुंतलेले होते. मी लगेच, ‘अरे चला तुम्हाला आइसक्रीम खायचे होते ना, जाऊया’, असे म्हणून वेळ मारून नेण्यासाठी त्यांना घेऊन बाहेर पडलो. आईसक्रीमच्या खुषीत धाकटा त्याचा प्रश्न विसरून गेला. पण मोठ्या मुलाने, गुगलकडे ही सगळी माहिती अशी असते, तो ही सगळी माहिती आपल्याला अशी काय दाखवू शकतो असे ‘समंजस’ प्रश्न विचारले. त्याला समजावून देता देता लक्षात आले की ‘एंटरप्राईज सर्च’ ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे माहिती झालेल्या ह्यातल्या तांत्रिक बाबींची माहिती साध्या आणि सोप्या भाषेत सर्वांनाच करू देता येईल. चला तर मग बघुयात हे सर्च इंजीन कसे काम करते ते…

आजच्या ऑनलाईन जगात इंटरनेट हे माहितीचे भांडार झाले आहे. सर्व लहान मोठ्या कंपन्या त्यांचे ब्रॅन्ड्स, त्यांची उत्पादने आणि सेवा ह्यांच्या माहितीसाठी आणि मार्केटींगसाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करुन त्या भांडारात भर टाकत आहेत. वेब २.० (Web 2.0) मुळे इंटरनेट वाचनीय न रहाता लेखनीयही झाले आहे. लाखो ब्लॉगर्स विवीध विषयांवर लेखन करून त्या भांडाराला दिवसेंदिवस समृद्ध करीत आहेत. ही सर्व माहिती, अफाट पसरलेल्या आणि गहन खोली असलेल्या महासागराप्रमाणे आहे. आता ह्या माहितीच्या अफाट सागरातून आपल्याला हवी असलेली नेमकी माहिती शोधायची म्हणजे अक्षरशः ‘दर्या मे खसखस’ शोधण्यासारखेच आहे. इथेच हे इंटरनेट सर्च इंजीन अल्लादिनच्या जादूच्या दिव्यातील जिनप्रमाणे आपल्या मदतीसाठी पुढे येते.

ही मदत करण्यासाठी इंटरनेट सर्च इंजीन अविरत कार्यरत असते. ह्या कामाची विभागणी खालील तीन मुलभूत प्रकारांत केलेली असते.

माग काढणे
(Web Crawling)
इंटरनेटवरील सर्व वेब पेजेसचा माग काढून, त्यांना भेट देऊन त्यावरील माहिती गोळा करणे
पृथःकरण आणि सूची करणे
(Analysis & Indexing)
गोळा केलेल्या माहितीचे पृथ:करण (Analysis) आणि सुसुत्रीकरण (Alignment) करून त्या माहितीचा जलद शोध घेण्यासाठी सूची (Index) बनवणे
शोध निकाल
(Search Result)
शोध घेणार्‍या इंटरनेट वापरकर्त्यांना (Users) सूची वापरुन योग्य तो शोध निकाल (Search Result) कमीत कमी वेळात दाखवणे

१. Web Crawling (माग काढणे)

आपल्याला हवी असलेली माहिती इंटरनेटवर नेमक्या कोणत्या पानावर आहे हे आपल्याला सांगण्याआधी ते पान इंटरनेट सर्च इंजीनला माहिती असले पाहिजे, हो ना? त्यासाठी सर्च इंजीनला अस्तित्वात असलेल्या सर्व वेब पेजेसचा मागोवा घ्यावा लागतो. रोज भर पडण्यार्‍या ह्या करोडो वेब पेजेसना भेट देऊन त्यांचा मागोवा घेणे हे काही खायचे काम नाही (ह्या खडतर कामाचा आवाका, मुलींचा मागोवा घेत फिरणार्‍यांना नक्की ध्यानात येईल 😉 ). ह्यासाठी सर्च इंजीन्स, सोफ्ट्वेअर रोबोट्स वापरतात ज्यांना ‘स्पायडर (Spider)’ म्हटले जाते. हे स्पायडर्स अक्षरशः इंटरनेटभर सरपटत जाउन ही माहिती गोळा करतात म्हणून ह्या प्रक्रियेला Web Crawling म्हणतात. ही प्रक्रिया पुनरावर्तन (Recursion) प्रक्रिया असते म्हणजे सुरुवातीच्या, पहिल्या पानावर असलेल्या सर्व लिंक्स गोळा केल्या जातात आणि मग त्या प्रत्येक लि़कला भेट देऊन पुन्हा त्या पानावरच्या सर्व लि़क गोळा करून त्या प्रत्येक लिंकला भेट देत ह्याची आवर्तने होत राहतात.

आता कळीचा मुद्दा हा आहे की ह्या प्रत्येक पानाला भेट दिल्यावर काय माहिती गोळा केली जाते? प्रामुख्याने सर्व स्पायडर्स ‘मजकूर स्वरूपातली (Text)’ माहिती गोळा करतात. प्रत्येक सर्च इंजीन्सची आपापली विशीष्ट अशी अल्गोरिदम्स असतात ही माहिती गोळा करण्यासाठी. पण प्रामुख्याने वेब पेजचे टायटल, मेटा टॅग्स, हेडर टॅग्स, चित्रांना दिलेला मजकूर (Alt tag) ह्यांत असलेल्या Text ला जास्त वेटेज दिले जाते. कारण हा मजकूर त्या वेब पेजला ‘डिफाईन’ करत असतो. त्यानंतर Body tag मधला मजकूर गोळा केला जातो.

काही वेब साइट्सना काही पेजेसचा मागोवा घेऊ द्यायचा नसतो. अशा वेळी ह्या साइट्स Robots.txt नावाची फाईल त्यांच्या साइट्वर ठेवतात. ही फाइल म्हणजे स्पायडर्स आणि वेब साइट ह्यांच्यामधला करार (Robots Exclusion Protocol) असतो. ज्या वेब पेजेसना ह्या स्पायडर्सनी भेट देऊ नये असे ठरवले असते त्या वेब पेजेसची नावे (लिंक्स) ह्या फाइलमध्ये लिहीलेली असतात. स्पायडर्स Crawling किंवा पुनरावर्तन चालू करायच्या आधि ही फाइल वाचून त्याप्रमाणे लिंक्स मागोवा घेताना गाळतात.

२. Analysis & Indexing (पृथ:करण आणी सूचीकरण)

ही सगळी ‘मजकुर (Text)’ माहिती गोळा करून सर्च इंजिन्स त्यांच्या जवळ ठेवत नाहीत. त्या माहितीचे पृथःकरण करून त्यातली शोध घेण्याच्या कामी येणारी माहितीच फक्त वापरली जाते. पण हे पृथःकरण असते तरी काय?

पृथ:करण
ह्यात प्रथम जी माहिती गोळा केली आहे ती कोणत्या भाषेतली आहे ते तपसले जाते. त्या भाषेच्या अनुषंगाने पृथ:करण कार्यवाहक (Analysers) वापरले जातात. एकदा भाषा कळली की मग त्या Text चे प्रसामान्यीकरण (Normalization) केले जाते. ह्यासाठी वापरली जाणारी प्रोसेस ‘Stemming किंवा Lemmatization’ म्हणून ओळखली जाते. ह्यात शब्दांची विवीध रूपे (धातूसाधित रूपे) त्यांच्या मूळ (धातू) प्रकारात आणली जातात. ह्म्म.. जरा बोजड झाले ना, वोक्के, उदाहरण बघू म्हणजे समजेल.

car, cars, car’s, cars’ ह्याचे मूळ रूप car हे घेतले जाते. त्यामुळे जेव्हा ‘car’ हा शब्द सर्च टर्म म्हणून वापरला जाईल तेव्हा car चे कोणतेही रुप असलेली वेब पेजेस शोधली जातील.

अजून एक उदाहरण बघुयात,
“the boy’s cars are different colors” वे वाक्य “the boy car differ color” असे Normalize केले जाईल. हे फक्त वानगीदाखल आहे. प्रत्यक्षात बरीच वेगवेगळी अल्गोरिदम्स वापरली जातात आणि ही प्रोसेस खुपच क्लिष्ट आहे.

सूचीकरण
आता ह्या नॉर्मलाईझ केलेल्या शब्दांच्या मूळ रुपांना (धातूंना) सूचीबद्ध केले जाते. ही सूची (फक्त समजण्यासाठी) पुस्तकाच्या शेवटी जी सूची (Index) असते, म्हणजे शब्दांची यादी आणि तो शब्द पुस्तकात कोण-कोणत्या पानांवर आलेला आहे ते पृष्ठ क्रमांक, साधारण तशीच, त्या प्रकारची एक सूची असते.

सर्च इंजीनच्या सूचीत नॉर्मलाईझ केलेले शब्दांचे मूळ रूप आणि ते कोण कोणत्या वेब पेजेस वर आले आहे त्यांची यादी असते. हेही फक्त वानगीदाखल आहे. हे सूचीकरण हा तर सर्च इंजीनचा आत्मा असतो आणि ते त्यांचे व्यावसायिक सिक्रेट असते. ह्या सूचीवरच सर्व डोलारा उभा असतो. ह्या सूचीला तांत्रिक भाषेत ‘Inverted index‘ म्हणतात.

ह्या सूचीत तो शब्द त्या वेब पेज वर किती वेळा आला आहे, कुठे आला आहे, कुठल्या महत्वाच्या टॅग्स मध्ये आला आहे अशी विवीध माहिती असते. ह्या सूचीची रचना, सर्च इंजीन शोध निकाल किती जलद देऊ शकत ह्यासाठी फारच महत्वाची असते.

३. Search Result (शोध निकाल)

जेव्हा शोधकर्ता काही शोधण्यासाठी इंटरनेट सर्च इंजीन वापरतो तेव्हा जे शोधायचेय त्याच्यापेक्षा भलतीच काही वेब पेजेस शोध निकालात दिसली तर शोधकर्ता पुन्हा ते सर्च इंजीन वापरणारच नाही आणि तो असंतुष्ट वापरकर्ता (unsatisfied user) म्हणून गणला जाईल आणि असे unsatisfied user असणे सर्च इंजीनला परवडणार नाही (धंदा बसेल हो दुसरे काय, छ्या! मराठी माणसाला धंदा आणि तो बसला असे काही सांगितल्याशिवाय चटकन कळतच नाही). त्यासाठी शोध निकालातली अन्वर्थकता किंवा समर्पकता (relevance) फार महत्वाची असते. सर्च इंजीन्सच्या ह्या relevance चे मूल्यमापन Precision (अचूकता) आणि Recall (?) ह्यांनी केले जाते. ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक असतात.

Precision (अचूकता): म्हणजे सर्च टर्म नुसार शोध निकालात न दाखवायची वेब पेजेस गाळण्याची (Filter) अचूकता
Recall (?): म्हणजे सर्च टर्म नुसार शोध निकालात दाखवायची वेब पेजेस निवडण्याची अचूकता

आज सर्च इंजीनचे जवळजवळ ८०-८३% मार्केट काबीज करून त्यावर मोनोपॉली असलेल्या गुगलच्या यशाचे ‘relevance’ हेच मूळ आहे. लॅरी आणि सर्जी ह्या जोडगोळीच्या ‘पेजरॅन्क (PageRank)’ अल्गोरिदम वर गुगलचा डोलारा उभा आहे. गंमत म्हणजे एकेकाळी त्यांना आणि त्यांच्या ह्याच अल्गोरिदमला कोणीही हिंग लावूनही विचारत नव्हते. शेवटी कंटाळून त्यांनी स्वतःची कंपनी चालू करायचा निर्णय घेतला. 🙂

या खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एकंदरीत सर्च इंजीन चालते, बरं का रे भाऊ!

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

सॅमसंग गॅलक्सी S2 धारकांसाठी खुषखबर…

आज सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये गलो होतो. तेव्हा असे कळले की सॅमसंग गॅलक्सी S2 साठी ‘आईसक्रीम सॅन्डवीच ४.०’ OS चा ऑफिशीयल रोलआउट भारतात झाला आहे. २-३ दिवसात सर्व सर्विस सेंटरमध्ये अपग्रेड अव्हेलेबल होईल. तर तयार व्हा नविन OSच्या अपग्रेडसाठी 🙂

काय आहे आईसक्रीम सॅन्डवीचमध्ये नविन

  • सुधारित आणि परिणामकारक मल्टीटास्किंग
  • सुधारित नोटीफिकेशन्स
  • आपल्या आवडीनुसार होम स्क्रीन डिझाइन करण्याची सुविधा
  • विजेट्सचा आकार आता कमी जास्त करता येण्याची सुविधा
  • स्पेलिंग तपासून सुधारणा करणारा स्पेल चेकर
  • मोबाइलच्या स्क्रीनचा स्क्रीन शॉट घेण्याची सुविधा

आणि असे बरेच काही…

‘क्लाउड कंप्युटिंग’ – म्हणजे काय रे भाऊ ?

ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, ‘काळा काळा पिंजलेला कापूस’ असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी ‘ढगाला कळ लागल्यावर काय होते’ ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस ‘ढगात’ जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही ‘क्लाउड’ कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. 🙂

संगणक विश्वात झालेली क्रांती ही, ‘संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले’ असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती ‘क्लाउड कंप्युटिंग’पाशी येऊन पोहोचली आहे. सध्या सगळीकडे क्लाउड कंप्युटिंगचा नारा ऐकू येतो आहे. कंपन्यांच्या IT डिपार्टमेंट्समध्ये तो एक बझवर्ड झाला आहे. तर काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग…

समजा तुम्ही एक संगणक तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत घेणार आहात. त्यासाठी तुम्ही इंटेलचे हार्डवेयर असलेला संगणक फायनल केलात. त्या हार्डवेयरच्या डिव्हाइस ड्रायव्हर्सची एक DVD तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, ती तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज ठरवलीत. त्यासाठीही तुम्हाला एक OS DVD मिळेल. त्या DVD साठवण्यासाठी तुम्हाला एक बॉक्स घ्यावा लागेल.
आता संगणक घेतलात तर त्यावर तुम्ही काही अ‍ॅप्लिकेशन नक्कीच चालवणार असाल (म्हणजे त्याचसाठी तुम्ही संगणक घेत आहात हे गृहीत धरले आहे 🙂 ) तर त्या अ‍ॅप्लिकेशन्सच्याही DVD मिळतील व त्या तुम्हाला संभाळून ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधिचा DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा DVD बॉक्स घ्यावा लागेल. काही वर्षांनंतर तुमचे हार्डवेयर जुने झालेले असेल त्यातले काही भाग तुम्ही बदलायचे ठरवले. पुन्हा नविन डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या DVD तुम्हाला मिळाल्या. परत DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे पुन्हा नविन बॉक्स. आता तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचे नवे वर्जन आले आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायचे ठरवले. त्याच्या पुन्हा नव्या DVD. आता तुम्ही तुमच्या मुलाकरिता अजुन एक नविन संगणक घ्यायचे ठरवता. काही आप्लिकेशन्सची जुनी वर्जन्स तुमचा मुलगा वापरणार आहे. परत नविन बॉक्स मुलासाठी. ह्या प्रत्येक वेळी तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. ह्यात मध्येच काही DVD ऐनवेळी खराब झाल्या तर मग तुम्हाला पुन्हा नविन DVD मिळविण्याची मारामार करावी लागणार. पुन्हा तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार.

येवढी यातायात जर एक-दोन संगणकांसाठी असेल तर शेकडो / हजारो कर्मचारी काम करत कंपन्यांचे काय होत असेल याचा विचार करा. ह्या सर्व हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर विकत घेण्याच्या आणि त्याच्या मेंटेनंन्ससाठी येणार्‍या खर्चाला ‘टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO)’ म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांची ही कॉस्ट अतिशय प्रचंड असते, त्यासाठी जे कुशल मनुष्यबळही लागते तेही प्रचंड महाग असते.

‘क्लाउड कंप्युटिंग’ नेमके ह्याच समस्येवर उत्तर आहे. आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे ‘टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप’ पासून सुटकारा. ‘तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे’ हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे. 🙂

क्लाउड कंप्युटिंग म्हणजे सर्व, ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर आणि डाटा (माहिती) हे एका मध्यवर्ती, प्रचंड आकाराच्या (लॉजिकली) संगणकावर ठेवायचे. त्या मध्यवर्ती संगणकाची संगणनशक्ती वापरून ती OS, अ‍ॅप्लिकेशन्स त्या संगणकावर रन करायची आणि डाटा/डॉक्युमेंट्स (माहिती) त्याच मध्यवर्ती संगणकाच्या मेमरीत साठवून ठेवायचा. ह्या मध्यवर्ती संगणकासाठी लागणार्‍या हार्डवेयरची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संगणकाची सेवा पुरवठा करणार्‍याची असणार. आता नविन हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर तुम्हाला आपसुकच अपग्रेड होऊन मिळणार. थोडक्यात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर ह्या तुम्हाला सेवा म्हणून मिळणार. तुम्ही फक्त त्या सेवा वापरण्याचा मोबदला सेवा पुरवठादाराला द्यायचा. एकढाच तुमचा खर्च. बाकीची सगळी यातायात तो सेवा पुरवठादार तुमच्यासाठी, तुमच्या वतीने करणार.

क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला ‘क्लाऊड’ असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.


(चित्र आंतरजालावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे इंटरनेट. त्यामुळे क्लाउड हे नाव ‘रूपक’ म्हणून वापरले गेले आहे, मध्यवर्ती संगणकाच्या अमूर्त रुपासाठी. तर हे असे आहे अमूर्त रुप क्लाउड कंप्युटिंगचे:


(चित्र विकिपीडीयावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंग हे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकारांत विभागले गेले आहे.

  • इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
  • प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
  • सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)

इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर हा क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे. ह्यावरच सगळा डोलारा उभा आहे. ह्या प्रकारात सर्व प्रकारचे सर्व्हर्स, नेटवर्क डिव्हायसेस, स्टोरेज डिस्क्स तत्सम हार्डवेयरचा समावेश होतो. इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा घेतल्यावर, आपल्याला फक्त हार्डवेयर कोणते हवे ते ठरवायचे असते, बाकीच्या किचकट गोष्टी सेवा पुरवठादार आपल्या वतीने करतो. ही सेवा ‘जेवढा वापर तेवढे बील’ अश्या तत्वावर चालते. वापर वाढला तर बील जास्त वापर कमी झाला तर बील कमी अशी ‘इलास्टिक’ सेवा असते ही. त्यामुळे ‘टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप’ मध्ये प्रचंड बचत होते.

IBM® Cloud ह्या नावाने IBM ही इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवते.

प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
उद्या जर मला एक ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस देणारी वेब साईट चालू करायची असेल तर मला आधि एक डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, मग सर्व्हर स्पेस विकत घ्यावी लागेल, डाटाबेस विकत घ्यावा लागेल आणि मग साईट चालू होईल. जर साईट खूप चालली आणि खुप युजर्स मिळाले तर मला जास्त सर्वर स्पेस विकत घ्यावी लागेल आणि असेच बरेच काही. हे सर्व झेंगाट मलाच बघावे लागेल. पण हे सर्व नको असेल तर मी क्लाउड वर प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस ही सेवा विकत घेऊ शकतो. ज्यामुळे माझे अ‍ॅप्लिकेशन ह्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जाईल आणि सर्व प्रकारची अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह जबाबदारी सेवा पुरवठादाराची असेल. म्हणजे मी नोकरी संभाळून आता ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस चालू ठेवू शकतो. 😉

अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहु ह्या प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवणार्‍या कंपन्या आहेत.

सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)
ह्या प्रकारात मध्यवर्ती संगणकावर सॉफ्टवेयर सेवा (अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर), सेवा पुरवठादार पुरवतो आणि आपण आपल्याकडचा संगणक किंवा मोबाइल वापरून ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो. गुगलच्या सर्व सेवा (डॉक्स, ड्राइव्ह, पिकासा, कॅलेंडर ई.), ई-मेल सर्विसेस, मायक्रोसॉफ्ट्ची ड्रॉपबॉक्स सेवा, ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम ह्या सर्व सेवा सॉफ्ट्वेयर अ‍ॅज अ सर्विस ह्या प्रकारात मोडतात.

तर असे आहे हे क्लाउड कंप्युटिंग, कळले का रे भाऊ! 🙂

कळले म्हणताय ? तर मग ह्या भाऊंना आता कोणीतरी समजावून सांगा

गुगल ड्राइव्ह

गुगल ही कंपनी एक अद्भुत कंपनी आहे. फक्त एका सर्चइंजीन वरून मल्टी बिलीयन डॉलर कंपनी होणे व आत्ताच्या घडीला इंटरनेट वर अधिराज्य गाजवणारी सेवा कंपनी होणे तेही मायक्रोसॉफ्ट आणि याहु सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून हे खरच अद्भुत आहे. सर्जी ब्रिनच्या एका व्हाईट पेपर प्रमाणे ‘इंटरनेट तुमच्या खिशात’ असे स्वप्न असलेली गुगल ही सेवा कंपनी अत्तुच्य अभियांतत्रिकी सेवा देऊन आपले सर्व दैनंदिन जीवन व्यापणार अशी लक्षणे दिसत आहेत.

अनेकोत्तम सेवा देण्यार्‍या ह्या कंपनीची एक नवी सेवा कालपासून सुरू झाली, गुगल ड्राइव्ह.
५GB इतकी जागा फुकट देऊन ही सेवा गुगलने सर्वांसाठी सुरु केली आहे. पण गुगलच्या उत्कंठा वाढवणार्‍या कॅम्पेननुसार तुमच्या अकाऊंटवर ही सेवा उपलब्ध होण्यास काही वेळ लागू शकतो. मी ट्राय केल्यावर मला ‘Your Google Drive is not ready yet’ असा निरोप येतोय 😦

असो, काय आहे विषेश ह्या सेवेत? तसे वेब वर जागा असणे ही सेवा काही नाविण्यपूर्ण किंवा युनिक नाहीयेय. बरेच सेवा पुरवठादार आधिपासूनच ही सेवा देत आहेत. मग गुगलचे काय एवढे विषेश? तर ह्या सेवेचे गुगलच्या इतर सेवांबरोबर होणारे एकसंगीकरण हे विषेश असणार आहे.

गुगल डॉक्स ही सेवा जर वापरत असाल तर खुषखबर ही आहे की गुगल डॉक्स हे गुगल ड्राईव्ह प्लॅटफॉर्मवरच तयार केले आहे. त्यामुळे आता गुगल डॉक्सवर तयार केलेली डॉक्युमेन्ट्स गुगल ड्राईव्हवर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ह्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर करू शकाल. तसेच एकच फाइल अनेकजण एकाच वेळी एडीट करू शकाल. एकाचवेळी अनेकांना एकच डॉक्युमेंट एडीट करता येउ शकणे हा एक खरंच उच्च अभियांत्रिकी (पेटंटेड) शोध आहे गुगलचा.

ही सेवा विंडोज, मॅक, iOS, अ‍ॅन्ड्रॉइड ह्या सर्व प्लॅट्फॉर्म्स वर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कुठुनही आणि कधीही तुम्ही तुमच्या फाइल्स हाताळू शकता.

गुगलचे ब्रेड आणि बटर असलेली ‘गुगल सर्च’ ही सेवा तुमच्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी तुमच्या दिमतीला हजर असेल. स्कॅन केलेल्या फाइल्स/डॉक्युमेंट्स मधूनही ‘OCR’ हे तंत्रज्ञान वापरून टेक्स्ट सर्च करून तुमच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधल्या जाणार आहेत.

drive.google.com/start हा दुवा वापरून तुम्ही तुमचे गुगल ड्राइव्ह सुरु करु शकता.

स्टीव जॉब्सला मानाचा मुजरा…

स्टीव्ह एक सच्चा, हाडाचा, आणि खराखुरा ‘आर्किटेक्ट’!

प्रॉडक्ट्चे, हार्ड्वेअर डिझाइन पासुन सॉफ्ट्वेअर डिझाइन ते सर्वसमावेशक युजर इंटरफेस डिझाइन ह्या सर्वांचा एकहाती विचार करण्याची पात्रता आणी व्हिजन असलेला एकमेव खरा इंजिनीअर!

स्वत:च्याच कंपनीतुन हाकलले गेल्यानंतर जिद्दीने नवीन कंपनी चालु करुन ती मुळ कंपनीला विकत घ्यायला भाग पाडणे
आणि पुन्हा एक बलाढ्य अशी कंपनी बनवणे हे सर्व करु शकणारा विसाव्या शतकातील एकमेव अवलिया!

लिसा, मॅकिंतोश, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, आयपॅड आणी अ‍ॅप स्टोअर ह्या आणि अश्या अनेक उच्च अभियांत्रिकी मुल्य
असलेली प्रॉडक्ट्स त्याने संगणक विश्वाला बहाल केली.

संगणक इतिहास, उच्च अभियांत्रिकी मुल्यांशी कधीही तडजोड न कराणार्‍या स्टीव्हच्या नावाशिवाय अपूर्ण असेल.
त्याइतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनीच लिहीले जाईल. ह्या थोर आर्किटेक्टचा व्यावसायिक आणि शोध प्रवास अनुभवायला मिळाला ह्याचा
आणि त्याच्या पिढीत जन्माला आल्याचा मला अभिमान आहे.

पुन्हा एकदा ह्या अवलियाला मानाचा मुजरा!

– (iSad) ब्रिजेश