तो आणि ती

तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर
ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर

तो ‘दील और दिमाग़ से’ आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा
ती फक्त ‘दील से’ आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी

तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा
ती नातेवाइक, मुले, समाज… काय म्हणेल ह्या विचाराने हैराण होत आयुष्य जगणारी

तो काहीसा हळवा, बराचसा माघार घेणारा पण कधी कधी आक्रमक होणारा
ती हळवेपणाचा आव आणून टोचून बोलून घायाळ करणारी

तो नाजूक आठवणींच्या वलयात गुरफटून, गालातल्या गालात हसून आनंद मिळवणारा
ती ‘कसला विचार करतोय कोण जाणॆ?’ असे म्हणून आपल्याच विश्वात आनंदणारी

तो एकांतात, नाजूक क्षणी, नाजूक क्षण वेचून आठवणींच्या कप्प्यात साठवण्याचा कसोशिने प्रयत्न करणारा
ती एकांतात, नाजूक क्षणी ‘तुझे माझ्यावर खरेच प्रेम आहे ना रे’? असे विचारून धुंदी उतरवणारी

तो अचानक उत्कटतेने तीला कवेत घेउन, चुंबनांची बरसात करून घुसमटून टाकावे असा विचार करणारा
ती ‘वेळे काळाचे भानच नाही, जनाची नाही तर मनाची तरी’ असे म्हणून रंगाचा बेरंग करणारी

तो त्याच्यातल्या उणिवा तीने भरून काढून त्याला साथ द्यावी असे वाटणारा, पण हे तीला कसे समजवून सांगावे ह्या विचारांनी घुसमटणारा
ती सगळे मलाच बघावे लागते, तो कधीतरी मला समजून घेइल, ह्या एकांगी विचारांनी घुसमटून जाणारी

तो कधी-कधी हे सगळे असह्य होउन भांड-भांड भांडणारा
ती तेवढ्याच आक्रमकतेने भांड-भांड भांडणारी

तो नंतर माघार घेउन तीला रंगात आणून खुलवणारा
ती समजूतदारपणे, खुषीने रंगात येउन खुलणारी

तो तीच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून तीच्यावर मनापासून प्रेम करणारा
ती त्याच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून त्याच्यावर तीतकेच मनापासून प्रेम करणारी