लाल सिंग चढ्ढा

बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, “नका बघू मग आमचे सिनेमे” ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.

काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.

सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.

सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.

जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे…वगैरे…) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.

सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

झुंड

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही ‘स्टोरी टेलींग’ नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि ‘जय भीम’ कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला ‘अमिताभ’ बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही ‘झुंड’ टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!

पुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य

Plagiarism किंवा वाड्‍ःमयचौर्य हा प्रकार ब्लॉगर जगतात ब्लॉगर्ससाठी काही नवीन नाही. त्यापासून सुरक्षा म्हणून कॉपीराईट सुविधा पुरविणाऱ्या बऱ्याच साईट्स पुढे आल्या. बहुतेककरून सर्व ब्लॉगर्स ह्या सुविधांचा वापर ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित करतात. मीही ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित केले आहेत.

पण नुकताच एक धक्का बसला. ‘पुढारी’सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राकडून माझ्या सैराटवरच्या लेखाचे वाड्‍ःमयचौर्य झाले. ‘बॅकसाईड स्टोरी’ ह्या सदरात माझा लेख जसाचा तसा प्रकाशित केला होता.  त्या लेखावर  एक प्रतिक्रिया टाकून  मी  निषेध नोंदवून ह्याबद्दल खुलासा मागवला. त्याचबरोबर संकेत पारधी ह्या मित्राने फेसाबुकवर पोस्ट टाकून हे वाड्‍ःमयचौर्य पब्लिकमध्ये उघड केले.

त्यावर पुढारी कडून त्या लिंकवर माझा नामनिर्देश करणारा खालील चित्रात दिसणारा बदल करण्यात आला. (त्यात वापरलेली मराठी भाषा अतिशय हास्यास्पद आहे)

IMG_4101[1]

तसेच पुढारीच्या वेबअडमीन कडून मेलद्वारेही खुलासा करण्यात आला.

Web Pudhari – webpudhari@pudhari.co.in via rediffmailpro.com
May 20

Dear Sir,
Got your mail regarding the article. This article was published in one of our print edition and so got carried on the website. We have informed this matter to the concern editor who is looking into the issue. Please give us some time to find out who submitted your article to us..
Pls send us your mobile number so that we can get in your touch…

असा अतिशय अश्लाध्य प्रकार पुढारीसारख्या दैनिकाकडून व्हावा हे खरोखर खेदजनक आहे. तसेच संपादकांनी कोणीही दिलेला मजकूर कसलीही शाहनिशा न करता प्रकाशित करावा  हेही निंद्य आहे!

पुढारीने माझा नामनिर्देश करून चूक कबूल केली आहे पण  त्याचा आनंद नाही कारण आता वर्तमानपत्रांचा  वाड्‍ःमयचौर्यरूपी काळ’ सोकावातोय…

सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम‘ ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉 )

कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे ‘पिंगा’ हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित ‘मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक’ यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.

ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल ‘बाजीराव-मस्तानी’ पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले?  तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.

पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज  आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर  मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा ‘पुरोगामी’ होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.

कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे  विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका  ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.

बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती ‘तवायफ‘ की पत्नी  ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला ‘गाणी बजावणी‘ करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.

ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर ‘तवायफ‘ ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे!  ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे  ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.

सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः  भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे  तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि  भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे  क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.

भव्य-दिव्य न् महागडे  सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.

राहता राहिले ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची ‘तडफदार आणि धडाकेबाज’ भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.

बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा  भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!

प्रिय विद्या बालन हिस

प्रिय विद्या बालन हिस,

काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे. ‘देड इश्किया’ मध्ये जो काही ‘देड’ पणा केला गेला आहे त्यात तू नसल्याने एकदम हायसे वाटत आहे! “का? असे काय झाले?”, असा प्रश्न तुला पडणारच…

तर, काल मी देड इश्किया पाहिला, विशाल भारद्वाजच्या सिनेमांच्या भव्य कॅन्व्हासच्या प्रेमात मी पडलेलो असल्याने. आठव ओमकारा, त्यातला उत्तरेकडचा, मातकट, चंबळचाप्रभाव असलेला, राजकारणात मुरलेल्या प्रदेशाचा कॅन्व्हास. इश्किया मधला नक्षलप्रभावित प्रदेशाचा कॅन्व्हास. सात खून माफ आणि कमीने मधली प्रयोगशीलता. त्यामुळे तू चित्रपटात नव्हतीस तरीही विशालसाठी हा सिनेमा बघितला आणि तुला मिस केले…

इश्किया मध्ये एका साध्या सुती साडीतली तू साकारलेली कृष्णा एकदम पटली होती. आपला ‘उल्लू सिधा’ करण्यासाठी तू एकटीने, एकहाती एका नजाकतीने आणि चातुर्याने खालूजान आणि बब्बनला एकाच वेळी खेळवले होतेस. इथे ‘देड इश्किया’ मध्ये माधुरी आणि हुमा कुरेशी अशा दोघी असूनही त्या दोघींनी मिळूनही तो इंपॅक्ट साधता आलेला नाहीयेय. कथानकाची आणि कथेतल्या वातावरणाची गरज म्हणून माधुरी चित्रपटात भरजरी कपड्यांमध्ये वावरली आहे पण साध्या सुती साडीतली तुझी कृष्णाच उजवी वाटते. माधुरी फक्त तिच्या एंट्रीच्या सीनमध्ये प्रचंड सुंदर दिसून एकदम भावते पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतशी ती शोभेची बाहुली होत, भयंकर मेकअप करून उतू जाणारे वय लपविण्याच्या प्रयत्नात निष्प्रभ होत जाते. कथेचे सेंट्रल कॅरॅक्टर असलेली आणि अनेकविध कंगोरे असलेली बेगम पारा रंगवताना अभिनयाची कमाल करण्याची मोठी संधी चक्क घालवताना माधुरीला बघितले आणि तुला मिस केले…

नसरूचाचांनी साकारलेला खालूजान जेवढा इश्कियामध्ये प्रभावी होता त्याच्या कैक पटीने देड इश्किया मधला नवाब बनलेला खालूजान प्रभावी आहे. पण बब्बन देड इश्कियामध्ये हरवल्यासारखा वाटतो. इश्किया मध्ये तुझी आणि बब्बनची अभिनयाची जी जुगलबंदी झाली होती तशी देड इश्कियामध्ये बब्बन आणि हुमा कुरेशी मध्ये घडतच नाही. हुमा कुरेशी अजूनही वासेपुरातच असल्यासारखी चित्रपटभर वावरली आहे, तिला ती मुहम्मदाबादमध्ये आहे ते कळलेच नाही असे वाटत राहते. माधुरीबरोबर नाचण्याचा मूर्खपणा आपण करणार आहोत हे कळल्यावर तरी नाचण्यात थोडा ग्रेस आणण्याचा प्रयत्न हुमाने करायला हवा होता; ‘स्टेज’चा अनुभव असलेली अभिनेत्री असा उदोउदो तिच्याबाबतीत झाला असल्याने तशी अपेक्षा करणे गैरलागू नाही पण हुमा त्यात कमी पडते. इश्किया मध्ये जेव्हा तू ‘च्युत्यम सल्फेट’ शब्द वापरतेस तेव्हा त्यामगचा जिव्हारी लागावी असा वार अगदी काळजापर्यंत पोहोचतो. तो भाव हुमाला डायरेक्ट च्युतिया हा शब्द वापरून एक सहस्त्रांशानेही जमलेला नाही हे पाहिले आणि तुला मिस केले…

मानवी नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत आणि त्यातून पुढे येणारा आणि अंगावर येणारा कथेमधला ट्विस्ट ही विशालची खासियत. देड इश्किया मध्ये हा ट्विस्ट तितकासा अनपेक्षित राहत नाही. पण त्यातला अजून एक आतला ट्विस्ट मात्र खासच आहे, अगदी नावीन्यपूर्ण. पण तो काहीसा घाईघाईत मांडल्यासारखा वाटतो, सेंसॉरला घाबरून उरकल्यासारखा. देड इश्कियामध्ये नसरुद्दिन शहा सोडून कोणीही नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत प्रभावीपणे मांडताना दिसत नाही. फक्त खुसखुशीत आणि चपखल बसणारे संवाद हीच काय ती जमेची बाजू. इश्कियामध्ये प्रत्येक पात्र त्याची कथेतली गरज ठसवून जाते. देड इश्किया मध्ये तसे होता नाही. जरी स्टारकास्ट तगडी असली तरीही सगळे आपापली कामे नेमून दिल्यासारखी पार पाडतात. चित्रपटातला व्हिलनही ओके-ओकेच, उप-व्हिलन (इटलवी नावाचे पात्र) शेवटी अजिबात पटत नाही. इश्कियामध्ये जसे तुझ्या अस्तित्वाने सगळ्यांचेच अभिनय खुलून आले होते तसे देड इश्कियामध्ये होत नाही असे जाणवले आणि तुला मिस केले…

पण तुला काही ठिकाणी विसरायला झाले ते विशालने उभा केलेला नवाबी कॅन्व्हास बघताना. पूर्ण लखनवी थाटाचा, नवाबी आणि उर्दू शेरो-शायरीचा एक कैफभरा माहौल विशालने अगदी भन्नाट उभा केला आहे. त्या अनुषंगाने सिनेमात येणारे संगीत ठीक-ठाक. मध्ये मध्ये जुन्या गाण्यांचे काही तुकडे काही सीन्समध्ये ऐकायला मिळतात ते मात्र एकदमच खास! मुशायर्‍यामधली शेरोशायरी ही मस्तच.

तर, हा विशालचा भव्य कॅन्व्हास असलेला पण कथेत शेवटी किंचित कमी झालेला, तगडी स्टारकास्ट असूनही काहीतरी कमी राहिलेला, माधुरीची जादू ओसरली का? असे वाटायला लावणारा आणि ह्या सगळ्यामुळे शेवटी इश्किया बरोबर तुलना करण्यावाचून न राहवला जाणारा देड इश्किया काल पाहिला आणि तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले…

तुझा,
(चाहता आणि देड इश्कियावर उतारा म्हणून लगेच इश्किया बघून टाकलेला)

दुनियादारीच्या निमित्ताने…

आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्‍याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्‍याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.

मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली. आणि म्हणूनच कदाचित वाचनातला हुरूप टिकून राहिला आणि एकंदर मराठी साहित्य वाचायची सवय आणि गोडी लागली. एकदम सुरुवातीला बाबा कदमांच्या एका दोन कादंबर्‍या वाचल्या होत्या, त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सुशिंची सालम ही कादंबरी वाचली आणि झपाटल्यासारखा सुशिंच्यासर्व कादंबर्‍या वाचनालयात जाऊन वाचायचा सपाटा लावला. त्यावेळी बहुतकरून फिरोझ इराणी आणि दारा बुलंद हे माझे आवडते हीरो बनले होते. मग एकदा अचानक कल्पांत ही कादंबरी हाती लागली आणि सुशिंचा एका आगळाच पैलू मला गवसला. सुशिंचा परम भक्त असल्याचा अभिमान तेव्हा गगनात मावत नव्हता. पुढे लवकरच कॉलेजला जायला लागलो आणि नेमकी ‘दुनियादारी’ ही कादंबरी हाती लागली. बस्स! कॉलेजजीवन अगदी झपाटून गेले होते तेव्हा.

पण आता नुकतीच ही कादंबरी आता पुन्हा एकदा वाचली (नाही, चित्रपट येणार म्हणून नाही, त्याच्या आधीच). पण ह्यावेळी ती एवढी भिडली नाही जितकी कॉलेजात असताना भिडली होती. ह्यावेळी वाचताना एम. के. श्रोत्री आणि श्रेयस यांचे नाते, सुशिंनी, कादंबरीत बरेच पोकळ दाखवले आहे असे वाटून गेले. प्रत्यक्षात एम. के. श्रोत्री आयुष्याबद्दलचे जे काही तत्त्वज्ञान कादंबरीत सांगतो ते जास्त गहन असे सुशिंनी मांडायचा प्रयत्न केला होता पण श्रेयस तळवळकराशी डायरेक्ट नाते संबंध जुळवून कादंबरीचा केलेला शेवट ह्यावेळी मला काही भावला नव्हता.

आता हा सिनेमा जेव्हा आला त्यावेळी कथानक बदलले आहे असा गदारोळ झाला होता. पात्रांची नावेदेखील बदलली आहेत असेही कळले होते. पण चित्रपट स्वतः बघितल्याशिवाय त्यावर काहीबाही वाचून मत बनविणे हे मला आवडत नाही. त्यामुळे चित्रपट बरा असो की वाईट सुशिंसाठी हा चित्रपट बघायचाच असे ठरविले होते. चेन्नैत असल्याने काही हा चित्रपट बघायला जमत नव्हते. आज पुण्यात आल्या-आल्या चित्रपट पाहून घेतला. चित्रपटगृह दुपारी बाराच्या शोलाही भरलेले होते. हे पाहून खूपच बरे वाटले आणि ही गर्दी तरुणाईची होती. त्यातल्या बहुसंख्यांना सुशि कोण हेही माहितीही नसावे.

असो, मला हा सिनेमा अतिशय आवडला. सर्वात जास्त काय आवडले असेल तर पटकथेत केलेला बदल. ह्या बदलामुळे एम. के. श्रोत्रींच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे असे मला व्यक्तिशः वाटते. कादंबरीत एम. के. श्रोत्री एक शोकांतिक शेवट असलेले पात्र आहे, दुनियादारीची साक्ष देण्यासाठी उभारलेले पात्र. पण कादंबरीत एम. के. श्रोत्रींचा शेवट आणि त्याची श्रेयसशीघातलेली सांगड तितकीची पटत नाही. पण चित्रपटातल्या पटकथेत एम. के. श्रोत्रीच्या मृत्यूने श्रेयसमध्ये झालेला बदल आणि चित्रपटाच्या पटकथेतील शेवट हा अतिशय सयुक्तिक आणि वास्तविक वाटतो.

मला चित्रपट बघताना कथेत केलेले बदल कुठेही खटकले नाहीत. मुळात सिनेमा बघायला जाताना एक स्वतंत्र कलाकृती बघायला जायचे ह्या हिशोबानेच गेले होतो. त्यामुळे कुठेही तुलना केली नाही. सुशिंच्या दुनियादारी ह्या कादंबरीवर बेतलेली एक स्वतंत्र कथा/पटकथा आणि त्यावर बेतलेला एक स्वतंत्र चित्रपट असे बघितल्यास हा सिनेमा मस्तच झाला आहे. हा सिनेमा हाऊसफुल चालून 30-40 कोटींचा गल्लाही ह्या सिनेमाने जमवला आहे.

पात्रे आणि त्यांची वेषभूषा सत्तरीच्या दशकातली दाखवली आहे, पण कादंबरी त्या काळातली असल्याने तसे करणे गरजेचे आहे असे वाटत नाही. कारण कथेतला बदल हा, ही पूर्ण कथा फ्लॅश-बॅकच्या अंगाने पुढे आणतो त्यामुळे त्या वेषभूषा पटत जातात. अंकुशाचा दिग्या उर्फ डी.एस.पी. अतिशय समर्पक. तो दिग्या वाटतो, निदान मलातरी वाटला. अश्क्या, उम्या इत्यादी पात्रेही मस्तच. शिरीनसाठी सध्याच्या जमान्यात सई ताम्हनकर शिवाय दुसरी कोणी पर्याय असेल असे वाटत नाही असे वाटावे इतकी सई शिरीन म्हणून शोभते. (पण अभिनयाची वानवा असल्याने मूळ कथेतील पात्राची परिपक्वता दाखविण्यास तीच्या मर्यादा आड येतात). मिनू अतिशय समर्पक, मूळ कथेतील मिनू अस्तित्वात आलीय की काय असे वाटावे इतकी उर्मिला कानिटकर मिनू म्हणून शोभली आहे.

श्रेयस आणि साईनाथ ही पात्रे मात्र जबरी हुकली किंवा फसली आहेत. स्वप्नील जोश्याला त्याच्या त्या सुजलेल्या स्वरूपात श्रेयस म्हणून पचविणे खरंच खूप जड जाते. चेहेर्‍यावरच्या थोराडपणामुळे श्रेयसचा हळुवारपण आणि निरागसता त्याला अजिबात प्रतिबिंबित करता आलेला नाहीयेय. जितेंद्र जोशी फक्त सुरुवातीच्या, एंट्रीच्या सीनमध्ये तेवढा सुसह्य होतो बाकी चित्रपटभर त्याने ओव्हर अॅशक्टींगचा कहर केला आहे. एम. के. श्रोत्री म्हणून संदीप कुलकर्णीला काही करायला चित्रपटात वावच नाहीयेय. 2-3 सीन्समध्येच एम. के. श्रोत्रीचे दर्शन होते. पण संदीप कुलकर्णी ऐवजी मोहन जोशींना एम. के. श्रोत्री म्हणून बघायला कदाचित आवडले असते.

तर एकंदरीत ‘सुशि-भक्तांनी’ गदारोळ उडवलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट मला आवडला आणि कथेतील बदलही सार्थ वाटला, त्यामुळे एम. के. श्रोत्री ह्या पात्राला न्याय मिळाला असे मला वाटते.

प्रोमीथीयस (Prometheus)

प्रोमीथीयस नावाचे एक भव्य अंतरा़ळ यान पृथ्वीपासून करोडो मैलांवर असलेल्या एका आकाशगंगेतल्या सुर्यमालिकेतील एका ग्रहावर एका मिशनसाठी चालले आहे. त्यात सर्व अंतराळवीर दीर्घकाळीन (दोन वर्षांहून अधिक) झोप घेऊन तो ग्रह जवळ आल्यामुळे उठुन त्या ग्रहावर उतरण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण उठून तयार झाल्यावर वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड, त्या मिशनचा स्पॉन्सर, एका व्हिडीओद्वारे त्या सर्वांशी संवाद साधून त्यांना सांगतो, “हा व्हिडीओ बघितला जात असेल तेव्हा मी जिवंत नसेन पण आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांची उकल ह्या मिशनमुळे होणार आहे आणि ती मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि खळबळजनक असणार आहे.” त्यासाठी त्याने पुरातन सांकेतिक चित्रांचा अभ्यास करणार्या? एलिझाबेथचा ह्या मिशनमध्ये समावेश केला आहे. तीची एक थियरी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करणार असते. काय असते ही थियरी…

पुरातन चित्रांचा अभ्यास करतना वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या संस्कृतीतील काही निवडक चित्रांमध्ये कमालीचे साम्य, साधर्म्य आणि एक संदेश आहे, ह्याचे सुसुत्रीकरण एलिझाबेथ हिने केलेल असते.

ह्या चित्रांमध्ये दाखवलेली एक ग्रहमालिका ही सजीवांची उगमभूमी आहे आणि तिथल्या ‘इंजीनियर्सनी’ मानवाला तयार केले अशी ही थियरी असते. आता हे इंजिनियर्स कोण? ते म्हणजेच ‘देव’ का हे शोधण्यासाठीच हे मिशन असते. त्या अंतरा़ळ यानावर डेविड नावाचा एक मनुष्यांप्रमाणे दिसणारा रोबोट असतो. तो ह्या सर्वांची मदत करण्यासाठी शिपवर पीटर वेलॅन्डने तैनात केलेला असतो.

एकदाचे ते अंतरा़ळ यान त्या ग्रहावर उतरते आणि त्यातले अंतराळवीर त्या ‘इंजीनियर्सचा’ शोध घेण्यास यानाच्या बाहेर पडतात. तिथे असलेल्या गुहेत शिरून कॅमेर्‍याद्वारे तिथली सर्व स्थिती यानावर प्रक्षेपित केली जात असते त्याचे 3D मॉडेल यानातील अंतराळवीर अभ्यासत असतात. अचानक त्या गुहेत त्यांचा काही चमकणार्‍या आकृत्या पळताना दिसतात आणि इथुन एक थरार सुरु होतो ह्या सिनेमात. त्या आ़कृत्या आभासी असतात आणि त्या बघून त्यांच्यापैकी दोघेजण घाबरून परत यानात जाण्यासाठी तिथुन पळ काढतात. त्या आ़कृत्या जिथुन एका भिंतीत अदृश्य झालेल्या असतात तिथे गेल्यावर त्यांना काही सांगाडे दिसतात आणि मानवाच्या उगमाचे कोडे उलगडणार असे वाटू लागले जाऊन उत्कंठा एकदम शिगेला पोहोचते. ती भिंत एका सांकेतिक खुणेने उघडण्यास रोबोट, डेवीड, यशस्वी होतो. त्याला अफाट माहिती फीड केलेली असल्यामुळे तिचे जलदरीत्या पृथःकरण करून त्याला हे शक्य होते. त्या भिंतीपलीकडे असते एक भव्य मानवी चेहेर्‍याच्या आकाराची मुर्ती!

त्यानंतर अचानक एक भयानक वादळ सुरु होते आणि त्या सर्वांना यानात परत यावे लागते. येताना मात्र त्या मानवी सांगाड्याच्या डोक्याच्या भागाला त्यांच्याबरोबर घेवुन यानात येण्यात ते यशस्वी ठरतात. त्याचवेळी तो रोबोट, डेविड, तिथली एक काचेची वस्तू कोणाच्याही नकळत, गुपचुप त्याच्या बॅगमध्ये टाकतो. पण यानात पोहोचल्यावर काय होते…

यानात पोहोचल्यावर त्या मानवी सांगाड्याच्या डोकेसदृश्य भागाचे विष्लेशण केले जाते तेव्हा त्यांना कळते की तो सांगाडा म्हणजे एक हेल्मेट आहे. ते तोडल्यावर त्याच्या आत एक मानवी मुंडके असते. त्यात असणार्यात मेंदुत विचार प्रक्रिया करण्याची शक्ती असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. लगेच एक इंजेक्शन देऊन त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो यशस्वी होतोही पण त्या चेहृयातुन रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात आणि सर्वजण त्या चेहेर्‍याला एका काचेच्या बॉक्समध्ये बंद करतात. त्या बॉक्समध्ये त्या चेहेर्या चा स्फोट होतो. त्या रक्तातले DNA घेऊन त्याची पडताळणी मानवी रक्ताच्या एका सॅंपलबरोबर केली जाते आणि तो DNA मानवी DNA शी तंतोतंत जुळणारा असतो. आपल्याला तयार करणारे ‘इंजीनियर्स’ एकदाचे मिळाले ह्याचा आनंद सर्वांना होतो. आता परत त्या गुहेत जाउन त्या ‘इंजीनियर्स’पैकी कोणि तिथे सांगाड्यांऐवजी जिवंत असल्यास त्याचा शोध घ्यायचा असे ठरते. त्याचवेळी यानात रोबोट, डेविड, गुढपणे कोणाशीतरी बोलत असतो आणि सिनेमातले गुढ एकदम अचानक वाढते कारण आकृत्यांना घाबरून यानात परत येण्यास निघालेले यानात परत आलेलेच नसतात, ते त्या गुहेतच विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असतात. डेविड त्याने आणलेल्या काचेच्या वस्तूमधील रक्तसदृश्य द्रवपदार्थ एलिझाबेथच्या पार्टनरला देतो जो तिचा बॉयफ्रेंडही असतो. थरार वाढतो आणि उत्कंठा लागून रहाते पुढे काय होणार ह्याची…

दुसर्याश दिवशी सगळे परत सगळे परत त्या गुहेत जातात आणि इथुन पुढे सगळ्या चित्रपटाचा बट्ट्याबोळ व्ह्यायला सुरुवात होते. अचानक एवढा चांगला विषय आणि आशय ह्यांच्यावर बेतलेला सिनेमा अचानक ‘एलियनपट’ बनतो. पुन्ह्या त्याच चित्रविचित्र किळसवाण्या एलियनचे अवतार दिसणे, त्यांनी विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असणार्यास अंतराळवीरांच्या तोंडात त्यांचा सोंडसदृश्य शरीराचा भाग सोडून त्यांना मारणे, एलिझाबेथ प्रेग्नंट राहून (रोबोट, डेविड जेव्हा तिच्या पार्टनरला रक्तसदृश्य द्रवपदार्थ देतो त्यारात्री त्यांना प्रेमाचा साक्षात्कार झालेला असतो) एकाच रात्रीतला गर्भ ३ महिन्यांच्या गर्भाप्रमाणे मोठा असणे, तो गर्भ म्हणजे एक एलियन असणे, तिने स्वतःचे स्वतः ऑटेमॅटिक ऑपरेशन मशिन वापरून गर्भपात करताना, तेही भूल न घेता लेसर किरणांनी पोट फाडून घेऊन, त्यातुन तो एलियन बाहेर पडणे असल्या मार्गानी सिमेना जायला लागून रसातळाला जातो.

पुढे कळते की वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड हा मेलेला नसून तो त्या यानातच असतो. त्याला अमर व्ह्यायचे असते म्हणजे मृत्युला हरवायचे असते त्यासाठी त्याने हा सगळा खटाटोप केलेला असतो, हाय रे कर्मा! हेही नसे थोडके म्हणून पुढे, ती गुहा ही गुहा नसून अजून एक अंतराळ यान असते जे मानवसदृश्य ‘इंजीनियर्स’चे असते. ते ‘इंजीनियर्स’ सर्वजण नष्ट झालेले असतात आणी त्यांच्यातला फक्त एकजण जिवंत असतो आणि ते म्हणे त्या वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड आणि रोबोट डेविडला माहिती असते. तो शेवटचा मानवसदृश्य ‘इंजीनियर्स’ त्याचे अंतराळयान घेऊन पृथ्वीवर जाउन पृथ्वी उजाड करणार आहे कारण त्याला त्यांची जमात पुन्हा पृथ्वीवर वसवायची आहे. मग प्रोमीथीयस अंतरा़ळ यानाचा कॅप्टन पृथ्वीला वाचवण्यासाठी त्या ‘इंजिनीयरच्या’ अंतराळयानाला धडक देतो आणि पृथ्वीला एका भयानक संकटातून, आपत्तीपासून (?) वाचवतो. पण त्यावेळी एलिझाबेथ त्या ग्रहावर असते, ती वाचते. मग रोबोट, डेविड तिला सांगतो ही त्या ग्रहावर अजूनही अंतराळ याने आहेत. तो ती याने चालवू शकतो. मग एलिझाबेथ त्यातील एक यान वापरून पृथ्वीवर न परतता ‘पुनश्च हरीओम’ म्हणत खरोखरीच्या ‘इंजीनियर्स’चा शोध घेण्यास अंतराळात निघून जाते. त्याचवेळी तिकडे त्या ग्रहावर तिच्या गर्भातून निघालेल्या एलियन मधून अजुन एक विचित्र एलियन सदृश्य आकृती पडद्यावर येउन, पडदा व्यापून खच्चून ओरडते, उगाचच….

इथे सिनेमा संपतो आणि पैसे वाया गेल्याची जाणिव होते. हॉलीवुडला पडलेली परग्रहवासीयांची भुरळ काही केल्या उतरायची नाव घेत नाहीयेय. खरंतर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या आकारातले परग्रहवासीयांचे काल्पनिक चित्रीकरण सुरुवातीच्या काही सिनेमांमध्ये आकर्षक वाटले होते पण आता त्यात तोच तोचपणा येऊन (ऑक्टोपससदृश्य प्राण्यांचे किळसवाणे दृश्यीकरण) परग्रहवासीयांवर आधारित सिनेमांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे जेव्हा प्रोमीथीयस (Prometheus) सिमेनाच्या प्लॉटबद्दल वाचले होते तेव्हा, आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांचा उहापोह ह्या सिनेमात केला आहे हे कळले होते. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मनुष्य फार पुरातन काळापासूनच करतो आहे. ह्या असल्या भारी भक्कम कंसेप्ट वर सिनेमा आणि तोही रिडले स्कॉट ह्या ‘एलियनपटांचा’ बादशहा असलेल्या दिग्दर्शकाकडून येणार म्हटल्यावर उत्सुकता खुपच होती. रिडले स्कॉट एलियन्सच्या पुढे जाउन आता ‘देव’ ह्या संकल्पनेशी त्यांचा (एलियन्सचा) काही संदर्भ जोडेल अशी आशा होती पण पदरी पूर्णपणे निराशा येते.

दिग्दर्शन आणि चित्रपटाचा कॅन्व्हास अप्रतिम आहे. ग्राफिक्स वापरून सिनेमाला दिलेला अंतराळ यानातला ‘ग्लॉसी’ लूक एकदम मस्त आहे. स्काय फाय सिनेमासाठी जे काही आवश्यक आहे तो सर्व मसाला ठासून भरलेला आहे पण सिनेमाचा आत्मा, पटकथा, त्या पटकथेचा अर्ध्यातून चुथडा झालेला आहे. खरेतर ह्या विषयाला साजेसा वेळ (२ तासांपेक्षाही जास्त) घेतला आहे रिडले स्कॉटने पण तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे. शेवटी एका एलियनला ओरडायला लावून ह्या चित्रपटाच्या सिक्वेलची जाहिरातही करून टाकली आहे.

चार्लीझ थेऱोन ह्या सुंदर आणि कमनिय हिरॉइनला चित्रपटात काहीही ‘काम’ नाहीयेय, तिला तिचा रोल फार महत्वाचा आहे असे सांगून चित्रपटात घेतले होते असे वाचले कुठेतरी आणि हसूच आले. बाकीच्या कलाकारांनी कामे त्यांच्या भुमिकेनुसार चांगली केली आहेत. Michael Fassbender ने साकारलेला रोबोट, डेविड, एकदम मस्त आणि पुर्णतः यंत्रमानव वाटतो. पण एकंदरीत हा सिनेमा एक परिपूर्ण अनुभव देण्यात पूर्णतः अयशस्वी ठरला आहे.

हॉलीवुडमधले चित्रपटही बॉलीवुड चित्रपटांना टक्कर देऊ शकतात, भरकटण्याच्या बाबतीत, ह्याचे उदाहरण असलेला प्रोमीथीयस सिनेमागृहात जाऊन बघण्याची घाई करण्याएवढा काही खास नाही. सावकाश डाउनलोड करून बघितल्यास एकदा बघायला हरकत नाही.

वीर्यदानाचे महत्व पटवणारा – विकी डोनर :)

जॉन अब्राहम, अभिनय कशाशी खातात हे न कळणारा एक बॉलीवुडी पेहेलवान, जेव्हा एक चित्रपट प्रोड्युस करणार हे वाचले होते तेव्हा हसू आले होते. खरंतर त्याचा हा सिनेमा डाऊनलोड करूनच बघितला असता. पण सध्या मद्र देशी काहिच विरंगुळा नसल्याने आणि १२-२ असे लोड शेडिंग असल्यामुळे एका मॉल मध्ये गेलो (A.C. मध्ये २ तास घालवायला). बघण्यासारखी काहीच ‘प्रेक्षणीय स्थळं’ नसल्यामुळे भयंकर बोर झाले म्हणून PVR मल्टीप्लेक्स कडे मोर्चा वळवला. तिथे त्यावेळी फक्त विकी डोनर ची तिकीटे करंटला मिळत होती. म्हटले चला १२० रूपये जॉनच्या बोडक्यावर घालूयात काही पर्याय नाही. पण चक्क १२० रूपयांमधले ८०-९० रूपये वसूल झाले आणि जॉन एक अभिनेता नसला तरीही चक्क एक चांगला निर्माता असल्याचे निदर्शनास आले.

दिल्लीत डॉ. बलदेव चढ्ढा (अन्नू कपूर) दरियागंज मध्ये एक Infertility Clinic आणि स्पर्म बॅन्क चालवत असतात. पण सध्या काही केसेस फेल गेल्यामुळे त्यांचे पेशंट कमी होऊन स्पर्म बॅन्क बंद पडते की काय अशी परीस्थिती झालेली असल्यामुळे ते एका तरूण वीर्यदात्याच्या शोधात असतात.

ह्या शोधाशोधीच्या प्रयत्नात त्यांना सापडतो लजपत नगर मध्ये रहाणारा तरुण, विकी (आयुष्यमान खुराणा). विकीची आई, डॉली, एक ब्युटी पार्लर चालवत असते. आजीचा,’बीजी’च्या, लाडावलेल्या विकीला बिजनेस न करता एक रेप्युटेड नोकरदार व्ह्यायचे असते. ‘मम्मी आय वॉन्ट रेस्पेक्ट, आय वॉन्ट क्लास’ असे तो डॉलीला सारखा अस्सल पंजाबी लहेजात बजावत असतो. डॉ. चढ्ढा मग ह्या विकीला पटवून वीर्यदाता बनण्याची विनंती करतात. पण विकी त्यांची ही मागणी धुडकावून लावतो. पण छानछौकीला चटावल्यावलेल्या विकीला ते पैशाचे अमिष दाखवून ‘बाटलीत उतरवतात’ 😉

मग विकीकडे पैशाचा ओघ सुरू होतो. त्याच्या घराचा आणि डॉलीच्या ब्युटी पार्लरचा कायापालट होतो. बीजीला हवा असलेला १६ जीबी iPhone आणी ४२ इंची LCD TV घरात येतो. सगळा आनंदी आनंद असतो. मग विकीला एक जोडीदारीण पण मिळते बॅन्केत (खर्‍याखुर्‍या, स्पर्म बॅन्केत नव्हे) काम करणारी, अशीमा रॉय (यामी गौतम). त्यांचे यथावकाश लग्न होते आणि इथे कथा एक वळण घेते…

अशीमा कधीच आई बनू शकणार नाही अस डॉक्टर तीला एका तपासणीच्या वेळी सांगतात. त्यामुळे अशीमा मानसिकरीत्या खचून जाते तर वीर्यदानामुळे इतरांना बाप होण्याचे सुख मिळवून देणारा विकी स्वतः कधीही बाप होऊ शकणार नाही, ह्या असल्या, दैवाच्या खेळामुळे हतबल होऊन जातो. त्याच दरम्यान तो स्पर्म डोनर असल्याचे अमीशाला कळते आणि त्याने तिला ते आधि का सांगीतले नाही म्हणून चिडून, भांडून घर सोडून निघून जाते. कथा एकदम सिरीयस वळण घेते. डॉ. चढ्ढांना हे सर्व कळते आणि मग ते एक युक्ती करतात आणि अमीशाला परत आणतात. सर्व आलबेल होऊन शेवट गोड होतो. पण ती युक्ती काय हे पहाण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. 🙂

जरासा वेगळा म्हणजे  बॉलीवुडच्या भाषेत ‘हटके’, खासकरून भारतीय समाजात चर्चा करण्यास निषीद्ध असा स्पर्म डोनर हा विषय विनोदी अंगाने हाताळला आहे. ह्यात सर्वात जमेची बाजू म्हणजे संपूर्ण चित्रपटाला असलेली दिल्ली आणि पंजाबी पार्श्वभूमी आणि पंजाबी भाषेचा तडका असलेले डायलॉग्स. पूर्वार्धात सिनेमा अतिशय मनोरंजन करतो. खुसखुशीत संवाद मजा आणतात. विकीची आजी ‘बिजी’ (कमलेश गील) हे पात्र खासंच रंगवले आहे, मजा आणते. डॉली आणि बिजी ह्यांचे सास-बहू सीन्स एकदम मिश्कील आहेत. विकी पंजाबी आणि अशीमा बंगाली, त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांचे हे लग्न स्विकारण्याचे प्रसंग धमाल आणतात. विषेशतः अशीमाच्या वडिलांचे ‘पंजाबीकरण’ मजेशीर.

MTV रोडीज ह्या कार्यक्रमाची फाईंड असलेला आयुष्यमान अतिशय आत्मविश्वासाने वावरला आहे पूर्ण चित्रपटात. पहिला चित्रपट करतो आहे असे कुठेही वाटत नाही. पंजाबी आणि दिल्लीकर विकी त्याने मस्त रंगवला आहे. यामी गौतमने तीची भुमिका व्यवस्थित निभावली आहे. अन्नु कपूरचा डॉ. चढ्ढा काही जास्त भावत नाही. पोट सुटलेला अन्नु बघवत नाही. हे पात्र खूप छान रंगवता आले असते पण अन्नु कपुरला वाया घालवले आहे. ह्या मेनस्ट्रीम कलांकारांपेक्षा चित्रपटात जान आणली आहे कमलेश गील ह्यांच्या बिजीने. हे पात्र छान लिहीले आहे आणि त्याला १००% न्याय दिला आहे कमलेश गील ह्यांनी.

शुजीत सरकारचे दिग्दर्शन ओके ओके, जास्त इंप्रेसिव्ह नाही. जुही चतुर्वेदीचे संवाद भन्नाट आहेत. पुर्वाधात फक्त ह्या संवादांची आतिषबाजी धमाल आणते. पण कथा आणि पटकथा शेवटी भरकटली आहे. डॉ. चढ्ढांची युक्ती एकदम पकाऊ आणि निरर्थक वाटते. खरेतर अशीमा भांडून तिच्या घरी गेल्यावर विकी तीला आणायला तीच्या घरी कलकत्त्याला जातो. त्यावेळी अशीमाचे वडील तिच्या मानसिक गोंधळाचा गुंता एका परखड प्रश्नाने सोडवतात. ते विचारतात “तुझ्या रागाचे कारण काय आहे? तु आई होउ शकणार नाहीस हे की विकीने तुला सत्य सांगीतले नाही हे की तु आई व्हायला समर्थ नाहीस आणि पण विकी बाप बनायला समर्थ आहे हे?” तिथेच गुंता संपून सिनेमा संपवायला हवा होता. तो एकदम परफेक्ट आणि इफेक्टीव्ह शेवट झाला असता. ईथे जुही चतुर्वेदी कथाकार म्हणून थोडी भरकटली आहे आणि शेवट लांबून विस्कळीत झाला आहे.

थोडक्यात, विनोदी आणि धमाल पूर्वार्ध असलेला, इंटरव्हल नंतर थोडा सिरीयस असलेला आणि शेवट लांबून विस्कळीत झालेला हा विकी डोनर १००-१२५ रुपयांमध्ये मल्टीप्लेक्स मध्ये बघायला हरकत नाही, आयुष्यमान, डॉली आणि बिजी साठी. ह्यापेक्षा जास्त ति़कीट असेल तर मात्र आरामात डाऊन्लोड करून बघायाला हरकत नाही.

जर यदाकदाचित तुम्हाला हा चित्रपट पाहून वीर्यदानाचे महत्व पटले तर जॉन अब्राहम खर्‍या अर्थाने ‘यशस्वी’ निर्माता आहे असे म्हणता येईल 😉

गोष्ट एका ‘कहानी’ची…

‘कहानी’ ह्या चित्रपटबद्दल त्याचे फक्त पोस्टर सोडून काहीच वाचले नव्हते. सध्या मी ‘विद्यामय’ असल्यामुळे हा चित्रपट बघितला जाणार तर होताच 🙂 शक्यतो मी जे चित्रपट आवडीने पहायचे असतात त्यांच्याविषयी कुठेही काहिही वाचत नाही पहायच्या आधि. वाचल्यावर थोडाफार का होईना एक पूर्वग्रह होतोच. ‘दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ’ हा मंत्र मी पाळत आल्याने त्याचा फायदा हा कहानी चित्रपट बघताना झाला. त्या कहानीचीच ही गोष्ट…

चित्रपट सुरू होतो एका प्रयोगशाळेत उंदरांवर केल्या जाणार्‍या एका प्रयोगाने. एक वायू उंदरांच्या पिंजर्‍यात सोडून दिल्यावर सगळे उंदीर मरून जातात. त्यानंतर कोलकात्याची मेट्रो रेल्वे, त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची घावपळ, घाई असा सीन येतो. लगेच आता त्या वायूने एक दुर्घटना होणार हे लक्षात येते, ती तशी होते ही. संपूर्ण चित्रपटात पुढे काय होणार ह्याचा अंदाज बांधता येईल एवढी ही एकच घटना. (इथे मुद्दाम तसे करून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वादातीत).  ही आहे चित्रपटाची नांदी, ‘Prologue’. नांदीनतर मूळ कथानक…

नवरा हरवलेली ‘विद्या बागची’ नावाची एक गरोदर स्त्री (विद्या बालन) लंडनहून कोलकात्याला तिच्या नवर्‍याला,अर्णव बागचीला, शोधायला आलेली असते, विमानतळावरून डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये. रीतसर तक्रार नोंदवून झाल्यावर ती गरोदर असल्यामुळे एक सब इंस्पेक्टर (परमब्रत चॅटर्जी) तीला मदत करायला तयार होउन तिला तिचा नवरा रहात असलेल्या एका हॉटेल (?) मध्ये घेऊन जातो. आणि इथून सुरू  होतो एक गुंतागुंतीचा, धक्कादायक, किंचीत वेगवान, रहस्यमय, उत्कंठावर्धक शोधप्रवास…

नॅशनल डेटा सेंटर, कोलकाता इथे  अर्णव एका प्रकल्पावर काम करण्यासाठी लंडंनवरून आलेला असतो. तिथे विद्या त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी जाते. तिथे तिला कळते की अर्णव तिथे आलेलाच नसतो. पण तिथली HR  मॅनेजर तिला सांगते की एक ‘मिलन दामजी’ नावाचा एक कर्मचारी तिच्या नवर्‍यासारखाच दिसणारा होता. ती HR  मॅनेजर त्याची माहिती NDC च्या संगणकावर शोधायचा प्रयत्न करते पण ती फाइल तिला दिसू शकत नाही.  इथे प्रश्न निर्माण होतो की अर्णव खरंच आहे का ? अचानक अर्णव आणि मिलन दामजी असा गुंता झालेला असतो. त्यातच भर म्हणून ‘ईटेलिजंस ब्युरो’, IB,  मिलन दामजीची फाईल कोणीतरी शोधायचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या कथानकात शिरते. एक एजंट, खान (नवाजउद्दीन सिद्दीकी) कोलकात्याला दाखल होतो. तो केसचा ताबा आपल्या हातात घेतो. कथेची गुंतागुंत अजून वाढते, कोण आहे हा मिलन दामजी…

आता एका कॉन्ट्रॅक्ट किलरची एंट्री होऊन त्याला HR  मॅनेजर व इतर ज्यांनी मिलन दामजीला बघितले आहे त्यांना संपवण्याची सुपारी मिळते व तो त्यांना संपवतोही. कथेतल्या एका वळणावर खुद्द विद्याला संपवण्याची त्याला सुपारी मिळते. धक्के वाढतच जाऊन रहस्य अजूनही वाढतच जाते…

शेवटी येतो चित्रपटाचा उत्कर्षबिंदू (Climax), एक धक्का बसून रहस्याचा उलगडा होतो आणि नकळत तोंडून निघून जाते “आईशप्पथ, सही!” आता अर्णव बागची कोण, मिलन दामजी कोण, विद्याचे काय होते, रहस्य काय हे जाणून घ्यायला चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघणे जास्त सयुक्तिक आहे.

अतिशय सशक्त कथा, पटकथा! संपूर्ण चित्रपटभर खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकत आहे सुजॉय घोष ह्यांच्या कथेत. ते पटकथाकार आणि दिग्दर्शकही आहेत ह्या चित्रपटाचे. सर्व बाजू अतिशय कौशल्याने सांभाळल्या आहेत त्यांनी. रहस्यमय चित्रपटात दिग्दर्शन अतिशय महत्वाचे असते. सुजॉय ह्यांनी स्वतः कथा आणि पटकथा लिहीली असल्याने दिग्दर्शनात काय काय करायचे हे त्यांना पक्के ठाऊक होते. कमालीचे दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या घटनांचे तुकडे दाखवून त्यांची एकमेकांत सांगड घालून कथा पुढे नेण्याचे कौशल्य चित्रपटाला तांत्रिकदृष्ट्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठवते. तांत्रिकदृष्ट्या उच्च दिग्दर्शनाला मिळालेली नम्रता राव हयांच्या संकलनाची जोड ही चित्रपटची जमेची बाजू. सेतू (Cinematography) ह्यांनी दुर्गापूजेच्या तयारीत असलेला आणि दूर्गापूजेत रंगलेला कोलकाता आणि त्याची बारकाई व्यवस्थित टिपली आहे. कोलकात्याचे हे दर्शन विलोभनिय  झाले आहे.

चित्रपटात विद्या सोडली तर कोणीही तसे प्रतिथयश कलाकार नाहीत. पण जे जे आहेत त्यांनी समरसून कामं केली आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलरही त्याच्या छोट्याश्या भूमिकेत भाव  खाऊन जातो. नवीनच पोलिस झालेला, हळूवार पोलिस सब इंस्पेक्टर परमब्रत चॅटर्जीने छान रंगवला आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त विद्याचाच आहे असे म्हणता येणार नाही. पण तिने साकरलेली ‘विद्या बागची’ कुठेही ‘विद्या बालन’ होत नाही. ती शेवटपर्यंत तंतोतंत विद्या बागचीच वाटते, इतका सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय केला आहे विद्याने. गरोदर बाईचे अवघडलेपण, नवरा हरवलेल्या बाईची घालमेल अतिशय सहजपणे रंगवलीय तिने.

“हॅ, हिंदी चित्रपटांमध्ये असते काय बघायला?” असे म्हणणार्‍यांनी आवर्जून बघावा अशा ‘कहानी’ची ही गोष्ट!