गोष्ट एका ‘कहानी’ची…

‘कहानी’ ह्या चित्रपटबद्दल त्याचे फक्त पोस्टर सोडून काहीच वाचले नव्हते. सध्या मी ‘विद्यामय’ असल्यामुळे हा चित्रपट बघितला जाणार तर होताच 🙂 शक्यतो मी जे चित्रपट आवडीने पहायचे असतात त्यांच्याविषयी कुठेही काहिही वाचत नाही पहायच्या आधि. वाचल्यावर थोडाफार का होईना एक पूर्वग्रह होतोच. ‘दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ’ हा मंत्र मी पाळत आल्याने त्याचा फायदा हा कहानी चित्रपट बघताना झाला. त्या कहानीचीच ही गोष्ट…

चित्रपट सुरू होतो एका प्रयोगशाळेत उंदरांवर केल्या जाणार्‍या एका प्रयोगाने. एक वायू उंदरांच्या पिंजर्‍यात सोडून दिल्यावर सगळे उंदीर मरून जातात. त्यानंतर कोलकात्याची मेट्रो रेल्वे, त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची घावपळ, घाई असा सीन येतो. लगेच आता त्या वायूने एक दुर्घटना होणार हे लक्षात येते, ती तशी होते ही. संपूर्ण चित्रपटात पुढे काय होणार ह्याचा अंदाज बांधता येईल एवढी ही एकच घटना. (इथे मुद्दाम तसे करून प्रेक्षकाला गाफील ठेवण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वादातीत).  ही आहे चित्रपटाची नांदी, ‘Prologue’. नांदीनतर मूळ कथानक…

नवरा हरवलेली ‘विद्या बागची’ नावाची एक गरोदर स्त्री (विद्या बालन) लंडनहून कोलकात्याला तिच्या नवर्‍याला,अर्णव बागचीला, शोधायला आलेली असते, विमानतळावरून डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये. रीतसर तक्रार नोंदवून झाल्यावर ती गरोदर असल्यामुळे एक सब इंस्पेक्टर (परमब्रत चॅटर्जी) तीला मदत करायला तयार होउन तिला तिचा नवरा रहात असलेल्या एका हॉटेल (?) मध्ये घेऊन जातो. आणि इथून सुरू  होतो एक गुंतागुंतीचा, धक्कादायक, किंचीत वेगवान, रहस्यमय, उत्कंठावर्धक शोधप्रवास…

नॅशनल डेटा सेंटर, कोलकाता इथे  अर्णव एका प्रकल्पावर काम करण्यासाठी लंडंनवरून आलेला असतो. तिथे विद्या त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी जाते. तिथे तिला कळते की अर्णव तिथे आलेलाच नसतो. पण तिथली HR  मॅनेजर तिला सांगते की एक ‘मिलन दामजी’ नावाचा एक कर्मचारी तिच्या नवर्‍यासारखाच दिसणारा होता. ती HR  मॅनेजर त्याची माहिती NDC च्या संगणकावर शोधायचा प्रयत्न करते पण ती फाइल तिला दिसू शकत नाही.  इथे प्रश्न निर्माण होतो की अर्णव खरंच आहे का ? अचानक अर्णव आणि मिलन दामजी असा गुंता झालेला असतो. त्यातच भर म्हणून ‘ईटेलिजंस ब्युरो’, IB,  मिलन दामजीची फाईल कोणीतरी शोधायचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या कथानकात शिरते. एक एजंट, खान (नवाजउद्दीन सिद्दीकी) कोलकात्याला दाखल होतो. तो केसचा ताबा आपल्या हातात घेतो. कथेची गुंतागुंत अजून वाढते, कोण आहे हा मिलन दामजी…

आता एका कॉन्ट्रॅक्ट किलरची एंट्री होऊन त्याला HR  मॅनेजर व इतर ज्यांनी मिलन दामजीला बघितले आहे त्यांना संपवण्याची सुपारी मिळते व तो त्यांना संपवतोही. कथेतल्या एका वळणावर खुद्द विद्याला संपवण्याची त्याला सुपारी मिळते. धक्के वाढतच जाऊन रहस्य अजूनही वाढतच जाते…

शेवटी येतो चित्रपटाचा उत्कर्षबिंदू (Climax), एक धक्का बसून रहस्याचा उलगडा होतो आणि नकळत तोंडून निघून जाते “आईशप्पथ, सही!” आता अर्णव बागची कोण, मिलन दामजी कोण, विद्याचे काय होते, रहस्य काय हे जाणून घ्यायला चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघणे जास्त सयुक्तिक आहे.

अतिशय सशक्त कथा, पटकथा! संपूर्ण चित्रपटभर खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकत आहे सुजॉय घोष ह्यांच्या कथेत. ते पटकथाकार आणि दिग्दर्शकही आहेत ह्या चित्रपटाचे. सर्व बाजू अतिशय कौशल्याने सांभाळल्या आहेत त्यांनी. रहस्यमय चित्रपटात दिग्दर्शन अतिशय महत्वाचे असते. सुजॉय ह्यांनी स्वतः कथा आणि पटकथा लिहीली असल्याने दिग्दर्शनात काय काय करायचे हे त्यांना पक्के ठाऊक होते. कमालीचे दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या घटनांचे तुकडे दाखवून त्यांची एकमेकांत सांगड घालून कथा पुढे नेण्याचे कौशल्य चित्रपटाला तांत्रिकदृष्ट्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठवते. तांत्रिकदृष्ट्या उच्च दिग्दर्शनाला मिळालेली नम्रता राव हयांच्या संकलनाची जोड ही चित्रपटची जमेची बाजू. सेतू (Cinematography) ह्यांनी दुर्गापूजेच्या तयारीत असलेला आणि दूर्गापूजेत रंगलेला कोलकाता आणि त्याची बारकाई व्यवस्थित टिपली आहे. कोलकात्याचे हे दर्शन विलोभनिय  झाले आहे.

चित्रपटात विद्या सोडली तर कोणीही तसे प्रतिथयश कलाकार नाहीत. पण जे जे आहेत त्यांनी समरसून कामं केली आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलरही त्याच्या छोट्याश्या भूमिकेत भाव  खाऊन जातो. नवीनच पोलिस झालेला, हळूवार पोलिस सब इंस्पेक्टर परमब्रत चॅटर्जीने छान रंगवला आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त विद्याचाच आहे असे म्हणता येणार नाही. पण तिने साकरलेली ‘विद्या बागची’ कुठेही ‘विद्या बालन’ होत नाही. ती शेवटपर्यंत तंतोतंत विद्या बागचीच वाटते, इतका सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय केला आहे विद्याने. गरोदर बाईचे अवघडलेपण, नवरा हरवलेल्या बाईची घालमेल अतिशय सहजपणे रंगवलीय तिने.

“हॅ, हिंदी चित्रपटांमध्ये असते काय बघायला?” असे म्हणणार्‍यांनी आवर्जून बघावा अशा ‘कहानी’ची ही गोष्ट!

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स.

हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले. अतिशय उत्तम कथा,वळणा वळणाची, अनेक धक्के आणि फ्लॅशबॅक असलेली. अनेक परिकथेतील पात्रे आणि कथांचे भाग एकत्र करून कथा साकारली आहे.

कथानायक पुस (Puss) हा एक साहसवीर असतो आणि एका साहस मोहीमेच्या वेळी एका शहरात येतो. त्यावेळी त्याला समजते जॅक आणि जील ह्या भावंडांकडे तो लहानापासून शोधत असलेल्या 3 जादूच्या बिया (Magic Beans) आहेत. हे जॅक आणि जील महाभयानक आणि कुप्रसिद्ध असे दुष्प्रवृत्तीचे असतात. पुस रात्री त्यांच्याघरी त्या जादूच्या बिया चोरायला जातो. पण तिथे त्याला एक मुखवटा (Mask) घातेलेली आकृती आड येते आणि तो त्या बिया चोरू शकत नाही. त्या आकृतीचा पाठलाग करत तो एका अड्ड्यावर पोहोचतो. तिथे ती आकृती त्याला द्वंद्वाचे आवाहन देते.साधेसुधे नव्हे तर “डान्स फाइट”चे, म्हणजे नाचत नाचत मारामारी. ह्या मारामारीच्या शेवटी त्याला कळते ती आकृती म्हणजे ‘किटी सोफ़्टपॉन’ नावाची एक मांजरी आहे.

तीच्या मागे-मागे जाता जाता त्याला त्याचा लहानपणीचा मित्र भेटतो. हा मित्र म्हणजे ‘ह्म्प्टी अ‍ॅलेक्झांडर डम्टी’, ह्म्प्टी डम्टी कवितेतील अंडे. तो पुसला मदतीची याचना करतो. पण पुस त्याला झिडकारून निघून जातो. मग आपल्याला कळते की किटी ही हम्प्टीची मैत्रीण आहे. ती हम्प्टीला विश्वास देते की ती पुसला परत आणू शकते.

ती पुसकडे जाते आणि त्याला त्याच्या रागाचे कारण विचारते. मग येतो एक फ्लॅशबॅक……

पुस अणि हम्प्टी ‘सॅन रिकार्डो’ नामक एका खेड्यात एका अनाथा आश्रमात एकत्र वाढलेले असतात. तिथे पुस हम्प्टीचे बाकीच्या टग्यांपासून नेहमी रक्षण करत असतो त्यामुळे त्याचा खास मित्र असतो. हम्प्टीला 3 जादूच्या बिया हव्या असतात. त्या बियांची एक राक्षसी वेल होणार असते जी आकाशाच्या पलीकडे जाऊ शकते. तिथे एक मोठा राजवाडा असतो आणि त्यात सोन्याचे अंडे देणारा हंस असतो. तो हम्प्टीला हवा असतो. तो पुसला त्याच्या ह्या मोहिमेत सामावून घेतो. मग हे दोघे मिळून जादूच्या बिया मिळवण्यासाठी लोकांच्या घरात घुसणे माफक चोर्‍याकरणे असे प्रकार करू लागतात. एकदा पुस एका म्हातारीला एका वळूपासून वाचवतो. ती म्हातारी त्या शहरातल्या एका प्रतिष्ठित आणि पोलीस पाटलाची आई असते. पुसचा जाहीर सत्कार केला जातो आणि त्याला ‘सन्मानाचे बूट’ दिले जातात. त्या दिवसापासून तो लोकांना मदत करू लागतो आणि हम्प्टीला टाळू लागतो.

एके रात्री हम्प्टी त्याला फक्त एक शेवटची मदत करायची विनंती करतो. पुस मान्य करून त्याच्याबरोबर जातो. पण हम्प्टी ‘बॅन्क ऑफ सॅन रिकार्डो’ वर दरोडा घालायला पुसला घेऊन गेलेला असतो. पुसला हे कळते तेव्हा तो खूप रागावतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. बॅन्केतला बझर चालू होऊन पोलीसपाटील पोलिसांसोबत तिथे पोहोचलेला असतो. ते पुसच दरोडा घालायला आलेला आहे असे समजतात. पुसला पळून जाण्याशिवाय गत्यंतर नसते. हम्प्टी त्याला स्वतःला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याविषयी विनवतो. हम्प्टीचे स्वप्न साकार करायला फक्त पुसच त्याला मदत करू शकतो असे विनवूनही पुस त्याच्यावर रागावून पळून जातो. पण तो कायमचा सॅन रिकार्डोचा ‘वॉन्टेड’ होऊन जातो. त्याच्या ह्या भटक्या आयुष्याला हम्प्टी जबाबदार आहे असे त्याला वाटत असते.

आता किटी आणि हम्प्टी पुसची समजूत काढण्यात यशस्वी होतात. मग ते जॅक आणि जील कडून त्या बिया चोरतात आणि त्या आकाशातल्या राजवाड्यात पोहोचतात. सोन्याचे अंडे देणारे हंसाचे पिलू आणि सोन्याची अंडी घेऊन परत पृथ्वीवर येतात. पण परत आल्यावर त्यांची गाठ पडते जॅक आणि जीलशी. इथून कथेला एक धक्कादायक वळण येते. हंसाचे पिलू जमिनीवर आणल्यामुळे अजाणतेपणी एक भयंकर धोकाही त्यांनी ओढवून घेतलेला असतो. तो धोका आणि धक्कादायक वळण काय हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायलाच हवा.

Antonio Banderas (पुस), Salma Hayek (किटी), Zach Galifianakis (हम्प्टी) ह्यांचा आवाजाने नटलेला हा सिनेमा लक्षात राहतो तो अतिशय सुंदर आणि इंटेलिजेंट 3D एफेक्ट्समुळे.
पुस किटीचा पहिल्यांदा पाठलाग करतो पाठलाग एकदम थरारक झालाय. त्यानंतर ‘डांस फाईट’ म्हणजे तर कळस आहे. सालसाच्या आणि चा..चा..च्या बीट्स वर किटीच्या अदा आणि स्टेप्स म्हणजे उफ्फ्फ…निव्वळ माइंड ब्लोईंग. 🙂
त्यानंतर जॅक आणि जीलकडून 3 बिया चोरीचा सिक्वेंस ही मस्तच. त्या बियांपासून राक्षसी वेल तयार होऊन आकाशातल्या राजाराजवाड्यात जाणे आणि परत येणे एवढे थरारक आहे की माझी दोन्ही मुले माझे हात इकडून तिकडून पकडून बसले होते. 3D एफेक्ट्स एवढे प्रभावीपणे वापरलेत की आपल्या डोळ्यासमोर सगळे घडते असे वाटते. प्रत्येक पात्राचे डिटेलिंग तुफान आहे,अगदी बारीक सारीक तपशीलही मस्तच चितारले आहेत.

काही काही डायलॉग्स मोठ्यांसाठी आहेत. म्हणजे ते फक्त मोठ्यांना कळतील असे आहेत. ते सोडले तर बच्चे कंपनीला गुंगवून ठेवण्यात हा ऍनिमेशनपट एकदम यशस्वी ठरतो. तर बच्चेकंपनीला खूश करायचे असेल तर आणि त्यांच्याबरोबर वेळ आनंदात घालवायचा असेल तर नक्की बघण्यासारखा, “पुस इन बूट्स”

पस आणि किटी सोफ़्टपॉन

ह्म्प्टी अ‍ॅलेक्झांडर डम्टी

‘डर्टी पिक्चर’ : उलाला…उलाला…उलाला…उलाला

बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला.

एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा ‘आंबटशौकीन’ मसाला भरपूर आहे.

एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास ‘सील्क’ ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत.

बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स.

अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे ‘विद्या बालन‘.

अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण…..

विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते ‘व्हल्गर’ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे ‘सेन्शुअल’ दिसली आहे ती.

सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल ‘साऊथ ईंडिअन’, चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा.

असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त ‘शो ऑफ’करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे ‘दर्शनिय’ आणि ‘सहनीय’ झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे.

आता काही कमकुवत बाजू:
पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो.
इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते.
इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो.

मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.

पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली

ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच.

सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’. लगेच टोरंट वरून डाउनलोड करून घेतला आणि ताबडतोब अधाश्यासारखा बघुन टाकला.

स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स म्हणजेच मायक्रोसोफ्ट आणि अ‍ॅपल ह्यांच्या वादावरचा हा चित्रपट. रूढ अर्थाने चित्रपट म्हणता येणार नाही. थोडाफार माहितीपटाच्या धर्तीवर जातो.

स्टीव जॉब्सचा मित्र स्टीव्ह वॉझनिअ‍ॅक ह्याचे आणि बिल गेट्सचा मित्र स्टीव्ह बाल्मर ह्यांचे मधे मधे नरेशन आणि घटना मालिका असा हा चित्रपट आहे. दोघांच्याही जीवनातला संघर्ष, कॉलेज जीवनातला, स्वतःची ओळख निर्माण करण्यामागचा, बलाढ्य कंपनी चालु करण्यामागाची तळमळ, अहंकार हा चित्रपट अगदी सुंदरपणे आपल्यासमोर उलगडून दाखवतो.

चित्रपट सुरु होतो स्टीव्ह जॉब्सच्या स्टोरीने. त्याच्या आयुष्यतला अ‍ॅपल सुरु करण्यआधीचा काळ दाखवत. त्यानंतर येतो बिल गेट्सचा मायक्रोसोफ्ट सुरु करण्यआधीचा काळ. दोघांची कथानकं नरेशन आणि घटनाक्रम ह्यांच्या सहायाने अतिशय रंजकपणे दिग्दर्शक आपल्यापुढे ठेवतो. त्यानंतर ही स्वतंत्र कथानकं एका वळणावर एकत्र येतात जेव्हा स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स समोरासमोर येतात. मग त्या दोघांचे आपापली कंपनी बलाढ्य करण्यासाठीचे डाव, राजकारण आणि कूट्नीती ह्यांनी भरलेले कथानक ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’ हे चित्रपटाचे नाव सार्थ करते.

Noah Wyle ह्या नटाने उभा केलेला स्टीव्ह जॉब्स निव्वळ लाजवाब! त्याने स्टीव्हची आढ्यता, बेमुर्वतपणा, आपल्याच मस्तीत जगण्याचा कैफ अगदी ताकदीने पेललाय. अक्षरश: भुमिका जगलाय तो.
त्याचा हिप्पी अवतार सोडुन एकदम सुटाबुटात तो एका संगणक प्रदर्शनात येतो तो सीन आणि एका उमेदवाराचा अ‍ॅपल्साठी मुलाखत घेण्याच्या सीन मधे तर तो निव्वळ आहाहा….

Anthony Michael Hall ह्या नटानेही बिल गेट्सही अगदी सार्थपणे रंगवलाय. बिल गेट्सचा धुर्तपणा अतिशय मस्त रंगवला आहे बेट्याने.

‘लोकांकडे मी जाण्या ऐवजी लोकचं माझ्याकडे धावत येताहेत’ हे पहिला अ‍ॅपल संगणक सादर करणार्‍या स्टीव्हचे उद्गार अ‍ॅपलमागची स्टीवची भुमिका स्पष्ट करतात तर ‘आज लोकांना माझी गरज नाहीयेय पण मीच त्यांची गरज बनेन’ हे बिलचे उद्गार मायक्रोसॉफ्टमागची बिलाची भुमिका स्पष्ट करतात.

संगणक विश्वातील ‘दादा’ लोकांचे ऐहिहासिक पर्व उलगडणारा, आवर्जुन पहावा असा, ‘पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली’
(मला तर फारच आवडला).

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार.

द स्मर्फ्स ( 3D ऍनिमेशनपट )

शुक्रवारी मुलांच्या ‘ऑर्डर’ला मान देउन (हो, आजकालची मुले विनंती करत नाहीत) द स्मर्फ्स हा 3D ऍनिमेशनपट बघितला.
तसे मला ऍनिमेशनपट भयंकर आवडतात. फार वर्षांपुर्वी ‘चिकन रन’ नावाचा एक ऍनिमेशनपट बघीतला होता, तेव्हापासुन जो छंद लागलाय तो आजपर्य़ंत टिकुन आहे.

तर द स्मर्फ्स ही एका काल्पनीक खेड्यातील निळ्या रंगातल्या कार्टुन्सची ही एक कहाणी आहे. ही कार्टुन कॅरॅक्टर्स आपल्या दैनंदीन मानवी जिवनात आल्यावर काय काय धमाल होउ शकते ते ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

निळ्या रंगाचे स्मर्फ्स एक जादुइ खेड्यात रहात असतात. गार्गामेल ह्या एका जादुगाराला (wizard) ह्या निळ्या स्मर्फ्सची निळाइ हवी असते. ही निळाइ मिळवून तो जगातील सर्वात शक्तिमान जादुगार (wizard) बनणार असतो. त्यासाठी त्याला सर्व निळ्या स्मर्फ्सना ठार करयचे असते.

ह्या जादुइ खेड्यात एक निळे आजोबा (पापा) असतात. त्यांना ‘भविष्याच्या झलकी’ मधुन मधुन दिसत असतात (जादुइ गोलात). त्यांचा नातु (clumsy) हा फार वेंधळा, सारखा धडपडणारा (साजिद खानच्या चित्रपटातला हीरो जसा हुकलेला असतो तसा) असतो. ह्या खेड्यात सगळॆ पुरुष स्मर्फ्सच असतात पण गार्गामेलने त्यांच्यात फुट पाडण्यासाठी एक सुंदर ‘निळी’ तयार केलेली असते जीला आजोबांनी आपलेसे करून वाढविलेले असते. गार्गामेलला आपली ही खेळीही फुकट गेली ह्याचा भयंकर राग असतो.

एकदा आजोबा एका जादुच्या वलयात भविष्याची झलक पहात असताना त्यांना दिसते की त्यांच्या खेड्याचा गार्गामेल हा विनाश करणार आहे. त्याच वेळी नेमका गार्गामेल त्यांच्या खेड्यावर हला करतो. त्याच्यापासुन वाचण्यासाठी धावपळ करत असताना एक पाण्याची पोकळी तयार होते आणि काही निळॆ स्मर्फ्स त्यातुन न्यु यॉर्कच्या सेंट्रल पार्क मधे येउन धडकतात.

तीथुन ते पोहोचतात एका कंपनीचा मार्केटींग व्हीपी पॅट्रीकच्या घरी. पॅट्रीकला ही काय बला आली आपल्याकडे असे वाटुन तो त्यांना हुसकुन लावायचा विचार करतो. पॅट्रीकच्या बायकोला, ग्रेसला मात्र हे निळॆ स्मर्फ्स फार्फार आवडतात (बायकोच ती नवर्‍याला जे आवडणार नाही ते तीला नेमके आवडणार, अगदी अमेरीकन नवराही बिचाराच असतो हो). तर पॅट्रीकला त्यांना घरात ठेउन घ्यावे लागते. बरं आता ह्या पॅट्रीकच्या ऑफिसात काहीतरी लोच्या झाला आहे. त्याचे प्रमोशन झाले आहे पण त्याला दोन दिवसात एक ऍड बनवायची असते. ती नाही बनवली तर त्याची महिला बॉस त्याला ‘फायर’ करणार असते. बाइच ती, दोन दिवसात हा बिचारा कसे काय काम पुर्ण करेल हे तिच्या कठोर मनाला शिवत देखील नाही. तर पॅट्रीक ह्यामुळे तणावाखाली असतो. तशात ग्रेसला दिवस गेलेले असतात. पॅट्रीकला ही जबाबदारी नको असते, म्हणजे तो अजुन तयार नसतो ह्या जबाबदारीसाठी असे त्याचे म्हणणे असते.

तर इथुन पुढे निळॆ स्मर्फ्स गार्गामेलचा सफाया करून त्यांच्या जादुइ दुनीयेत परत कसे जातात, पॅट्रीकची नोकरी जाते की रहाते आणि तो बाप बनण्याच्या जबाबदारीसाठी तयार होतो का ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सिनेमा पाहुन घ्या.

हा चित्रपट एकदम सरळ-धोपट सिनेमा आहे. कथा फारशी प्रभावी नाही. काहीही चढउतार नाहित की वळणॆ नाहीत. पुढच्या सीन मधे काय होणार ह्याचा अंदाज आधिच येतो. कथेतील पात्रेही व्यवस्थित फुलवलेली नाहीत. आजोबांचा नातु clumsy हा तसा का आहे आणि तो तसा असण्याचे प्रयोजन काय ह्याची उत्तरे मिळत नाहीत. पॅट्रीकच्या महिला बॉसचा प्रॉब्लेम काय असतो, तीचे अचानक मतपरीवर्तन का होते हेही व्यवस्थित फुलवलेले नाही. निळ्या रंगाचे स्मर्फ्स त्यांच्या जादुइ दिनियेतुन आपल्या मानवी जगात आल्य़ानंतरही फारशी काही धमाल होत नाही. कथा फुलवायला फार स्कोप होता पण संधी घालवली आहे. थ्रीडी अनुभवही फार चांगला नाही. वास्तविक हा सिनेमा थ्रीडी नसता तरीही चालले असते.

ज्यांना ऍनिमेशनपट आवडतात आणि मुले आहेत त्यांनी एकदा बघायला हरकत नाही.

ज्यांनी रिओ बघितला आहे आणि ज्यांना तो फार आवडाला आहे त्यांना द स्मर्फ्स नावडण्याची दाट शक्यता आहे. रिओ हा एक भारी आणि अशक्य सिनेमा आहे.