झुंड

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही ‘स्टोरी टेलींग’ नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि ‘जय भीम’ कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला ‘अमिताभ’ बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही ‘झुंड’ टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!

गाथा सागरतळाच्या सफरीची

(मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित)

डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

सोहनलाल द्विवेदी यांची ही एक कविता होती शाळेत असताना – कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्या कवितेतल्या या वरच्या कडव्यातून गोताखोर हा शब्द पहिल्यांदा आयुष्यात आला. त्या वेळी गोताखोर म्हणजे काय याचा मराठी अर्थ बघितला, तेव्हा गोताखोर म्हणजे पाणबुड्या असं समजलं. आमच्या गावाला विहिरीत घागरी, बादल्या बुडाल्या की त्या काढण्यासाठी खूप दम असलेला एक पट्टीचा पोहणारा पाण्याच्या तळाशी जाऊन त्या घागरी आणि बादल्या वर काढायचा. त्याला आमच्याकडे पाणबुड्या म्हणायचे. त्यामुळे गोताखोर म्हणजे समुद्राच्या तळाशी बुडी मारून मोती काढणारा पाणबुड्या असं समीकरण त्या वेळी डोक्यात फिट बसलं. पण त्या वेळी त्या समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेले समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पण पुढे सुदैवाने त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडणार होती, ह्याची त्या वेळी काहीच कल्पना नव्हती. त्या अद्भुत सफरीची ही गाथा…

२०१३ला मॉरिशसला भेट देण्याचा योग आला होता. त्या टूरमध्ये तिथल्या एका प्रवाळ बेटावर जाण्यासाठी आयलंड हॉपिंग टूर होती. त्या प्रवाळ बेटावर समुद्राच्या उथळ भागात, ऑक्‍सिजनचा सप्लाय असलेलं एक शिरस्त्राण डोक्यावर चढवून बोटीच्याखाली पाण्यात बुडी मारून तिथले रंगीत मासे बघण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिथे फक्त रंगीत मासे बघण्यासारखे होते, आणखी दुसरं काही नव्हतं. आम्ही जिथे होतो, तिथून बरंच पलीकडे खोलवर बरंच काही होतं, पण तिकडचं नीट दिसत नव्हतं. आणि अचानक, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर असलेले आणि काळे रबरी पोषाख घातलेले पाणबुडे दिसले आणि सोहनलाल द्विवेदींच्या कवितेला गोताखोर आयुष्यात प्रथम आणि प्रत्यक्ष बघितला. मी जिथे मासे बघत होतो, तिथलंच समुद्राखालचं विश्व इतकं भन्नाट होतं की ते गोताखोर जिथे बुड्या मारत होते, तिथलं विश्व किती भन्नाट असेल ह्याची कल्पना करूनच उत्कंठा वाढली आणि लगेच पाणबुड्या बनून तिथे जाण्याचं मनाशी ठरवलं आणि पाणबुड्या व्हायचं हे बीज तिथे डोक्यात रोवलं गेलं!

पुढे कामाच्या निमित्ताने मलेशियाला स्थलांतरित झालो आणि एका सुट्टीत लंकावि ह्या बेटावर फिरायला जाण्याचा योग आला. पांढऱ्या वाळूचे नितांत सुंदर किनारे असलेलं एक भन्नाट बेट. तीन दिवसांचा मुक्काम होता त्या बेटावर आणि लोकल टूर गाइड घेतला होता साइटसीइंगच्या मार्गदर्शनासाठी. त्या टूर गाइडने, मुख्य बेटापासून जवळच एक पुलाउ पायर नावाचं प्रवाळ बेट आहे आणि त्या बेटावरचं मरीन पार्क स्नॉर्कलिंग साइट म्हणून प्रख्यात आहे, तिथली ट्रीप बुक करू का? असं विचारलं. गूगलबाबाला साकडं घालून स्नॉर्कलिंग म्हणजे काय याचा शोध घेतला, तर तो एक मिनी-पाणबुड्या असलेला प्रकार आहे असं कळलं. स्नॉर्कलिंग मास्क लावून समुद्रात तोंड खुपसून आणि लाइफ जॅकेट घालून पाण्यावर तरंगायचं. त्या मास्कला एक पाइप असतो, त्यातून हवा आत येते आणि तोंडाने श्वास घेत तोंड पाण्यात बुडवून समुद्राखालचे रंगीबिरंगी विश्व बघायचं, हे म्हणजे स्नॉर्कलिंग. मॉरिशसच्या अनुभवानंतर समुद्राखालचे जग अधिक विस्तृतपणे बघण्याची इच्छा तर तेव्हाच झाली होती, पण ती पाणबुड्या होऊन बघण्याची होती.

टूर गाईडाला विचारलं, “डाइव्हिंग करता येईल का?”

त्यावर त्याने विचारलं, “तू सर्टिफाइड डाइव्हर आहेस का?”

मग कळलं की असं कोणीही उठून डाइव्हिंग करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि सर्टिफिकेट असेल तरच डाइव्हिंग करता येतं. ‘दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने मग स्नॉर्कलिंग करू या असं ठरलं, कारण ते करण्यासाठी कुठल्या प्रशिक्षणाची गरज नव्हती, कोणीही लाइफ जॅकेट घालून आरामात स्नॉर्कलिंग करू शकतो!

तिथला स्नॉर्कलिंगचा अनुभव निव्वळ अवर्णनीय होता. इथे नुसते रंगीबेरंगी मासेच नाही, तर समुद्राखालच्या रंगीबेरंगी प्रवाळ वसाहतीही वैविध्यपूर्ण होत्या. भान हरपून टाकणारा आणि मन उचंबळून टाकणारा अनुभव होता एकदम. आम्ही जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, त्या भागाची खोली साधारण दहा ते पंधरा फूट इतकी होती. सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असल्यामुळे पारदर्शक पाण्यातून प्रवाळ वसाहतींनी परिपूर्ण असलेला समुद्रतळ नितांतसुंदर दिसत होता. ह्या वेळी स्नॉर्कलिंगचा आनंद सहकुटुंब घेत असल्याने तो आनंद द्विगुणित होत होता. आणखी जास्त खोलवर भागामध्ये मोठे मासे आणि प्रवाळ वसाहतींची संख्या आणि दाटी खूपच जास्त होती. जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, तिथून फक्त अंदाज येत होता, पण दूर असल्याने जास्त स्पष्ट दिसत नव्हतं. जरा रोखून बघण्याचा प्रयत्न केला, पण जास्त काही दिसू शकलं नाही. पण अचानक, पुन्हा एकदा गोताखोर दिसला, तेच पाठीवर सिलेंडर आणि आणि काळा रबरी पोशाख. त्यांना ते खोलवरच (शंभर फुटांपर्यंत खोल) समुद्रतळाचं विश्व जवळून अनुभवता येत होतं. तो अनुभव किती आणि कसा भन्नाट असेल हा विचार मनात आला आणि सर्टिफाइड डाइव्हर व्हायची बांधलेली खूणगाठ पुन्हा परत घट्ट झाली.

त्या लंकावि दौऱ्यावरून परत आल्यानंतर ऑफिसमध्ये बसलो असताना ऑफिसातील एक सह-कर्मचारी मधू माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, “काय रे इतका टॅन का झाला आहेस?” तिला सांगितलं की मी नुकताच लंकाविला समुद्रकिनाऱ्यावर मस्त हुंदडून आलोय तीन-चार दिवस. त्यामुळे जरा त्वचा टॅन झाली आहे.

त्यावर ती हसून म्हणाली, “अरे, मीसुद्धा आताच रदांग आयलंडला जाऊन आले. तीन दिवसाची डाइव्हिंग ट्रीप होती.”
ते ऐकून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी एकदम खुशीत येऊन तिला विचारलं, “तुला डाइव्हिंग येतं?”
त्यावर ती उत्तरली, “मी असिस्टंट डाइव्हिंग टीचर आहे!”

हे म्हणजे, ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!’ असं होतं. तिच्याकडून लगेच पुढची माहिती मिळवली की मलेशियन सब अ‍ॅक्वा क्लब (Malayan Sub Aqua Club – MSAC) नावाच्या एका डाइव्हिंग क्लबाची ती मेंबर होती आणि तिथेच ती असिस्टंट टीचर सर्टिफिकेशनची तयारी करत होती. मी तिला म्हटलं, मला स्कुबा डाइव्हर व्हायचंय. त्यावर ती म्हणाली की दोन आठवड्यानंतर सर्टिफाइड डाइव्हरसाठीची एक नवीन बॅच चालू होणार आहे आणि जर मला इंटरेस्ट असेल तर ती माझी नोंदणी त्या क्लबमध्ये करेल. मला एकदम तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं. शाळेत असताना पहिल्यांदा आयुष्यात भेटलेला गोताखोर बनण्याचे जे एक अंधुक स्वप्न मॉरिशसला बघितलं होतं ते आता साकार होताना दिसत होतं.

Club – MSAC

दुसऱ्याच दिवशी, मधूने क्लबच्या मेंबरशिपसाठी लागणारी सगळी कागदपत्रं ऑफिसमध्येच आणली. सगळे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून क्लबाचा रीतसर मेंबर झालो आणि ट्रेनिंगच्या दिवसाची वाट बघू लागलो. ट्रेनिंग दोन भागात होणार होतं. पहिला भाग होता थिअरीचा आणि दुसरा प्रॅक्टिकलचा. थिअरीमध्ये दोन दिवसाचं वर्कशॉप होतं. त्यामध्ये भौतिकशास्त्राचे, पाण्याचा दाब आणि त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम याचं रीतसर शास्त्रीय शिक्षण होतं. जसजसं समुद्राच्या तळाशी खोल जाऊ तसतसं पाण्याचा दाब वाढत जातो आणि त्यामुळे स्कुबा इक्विपमेंट वापरून घेतलेला श्वास आणि त्यामुळे फुप्फुसात भरला जाणारा ऑक्सिजन यांचे शरीरावर काय परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतात याची इत्थंभूत माहिती या वर्कशॉपमध्ये देण्यात आली. त्यानंतर समुद्राच्या पाण्याखाली किती काळ राहता येतं ह्याचं गणित, कागदावर आकडेमोड करून आणि Dive Computer वापरून कसं करायचं हे शिकवलं. त्याखेरीज इतरही बरीच शास्त्रीय माहिती देण्यात आली. ते वर्कशॉप एकंदरीत फारच मनोरंजक आणि ज्ञानवर्धक होतं. क्लबची प्रेसिडेंट ट्रूडी गणेंद्र हे वर्कशॉप कंडक्ट करत होती. तिने वर्कशॉप संपताना, जे काही शिकलो त्याची एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे असं सांगून आमची विकेटच घेतली. रिव्हिजनसाठी एक आठवड्याचा कालावधी देऊन, एक आठवड्यानंतरची परीक्षेची तारीख ठरवली. जोपर्यंत लेखी परीक्षा पास होणार नाही, तोपर्यंत प्रॅक्टिकल सुरू करता येणार नव्हतं. एक आठवडाभर जोरदार रिव्हिजन करून लेखी परीक्षा पास झालो.

प्रॅक्टिकल सेशन्स ही स्विमिंग पुलावर होणार होती. खुद्द समुद्रात बुडी मारण्याआधी, जी काही थियरी शिकलो त्याचा सराव ऑक्सिजन सिलेंडर लावून स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये करायचा होता. डाइव्हिंग करताना खाली बुडी मारल्यानंतर समुद्रच्या पाण्यात पोहायचे नसतं, तरंगायचं असतं. ह्या तरंगायच्या पद्धतीचा (Buoyancy) सराव करायला स्विमिंग पूलमध्ये शिकवलं जातं. पाण्याच्या दाबाची काळजी घेत हळुवारपणे कसं बुडायचं, हळुवारपणे कसं वर यायचं याचं रीतसर शिक्षण ह्या प्रॅक्टिकल स्टेशन्समध्ये असतं. सहा दिवसांचे स्विमिंग पूल प्रात्यक्षिक झाल्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारण्यासाठी घेऊन जातात. ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करणारी मुख्य नळी बंद झाल्यास बॅकअप नळी कशी वापरायची, खोल पाण्यात डोळ्यावरचा मास्क काढून पुन्हा कसा लावायचा, खोल पाण्यात ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर असलेलं सगळं किट उतरवून पुन्हा पाठीवर कसे चढवायचे, आपल्या डाइव्हिंग बडीच्या ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजन संपला तर त्याला अल्टरनेट सप्लाय देत कसं वर घेऊन यायचं, अशा प्रकारचे अनेक सराव करवून घेत एकदाचं प्रशिक्षण संपलं. ट्रेनिंग संपून आता मी त्या दिवसाची वाट बघत होतो, जेव्हा प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारून पाणबुड्या होण्याचं स्वप्न अखेर साकार होणार होतं. ट्रेनिंग संपल्यानंतर दोन आठवड्यांनी क्लबकडून एक मेल आलं की रदांग आयलंडवर पहिल्या डाइव्हिंग ट्रिपवर जाण्यासाठी तयार व्हा. ते मेल बघताच मन उचंबळून आलं आणि एक अनामिक हुरहुर दाटून राहिली. आतुरतेने त्या दिवसाची वाट बघू लागलो…

डाइव्हिंग चमू

आणि अखेर तो दिवस उजाडला. कौलालंपूरपासून उत्तरेकडे असलेल्या कौलातरंगाणू राज्यातल्या रदांग बेटावर जायचं होतं. कौलालंपूरपासून रदांग बेटावर जायच्या जेट्टीपर्यंतचा प्रवास साधारण ५७५ किलोमीटरचा होता. त्यानंतर जेट्टीपासून बेटावर जायला बोटीने ४५ मिनिटं लागणार होती. कौलालंपूरपासून ५७५ किलोमीटरचा सगळा प्रवास एक्स्प्रेस हायवेचा होता. ताशी १४० ते १५० किमी. या भन्नाट स्पीडने चार-साडेचार तासात ते अंतर कव्हर केलं. एक्स्प्रेस हायवेमुळे गाडीने स्पीड पकडला होता आणि मन त्या वेगाच्या कैकपट वेगाने रदांग बेटावर पोहोचलं होतं. जेट्टीवर पोहोचल्यानंतर या डाइव्ह ट्रीपवर येणाऱ्या सर्वांशी ओळख झाली. त्या ग्रूपमध्ये सर्व प्रकारचे अनुभवी डाइव्हर होते. मी धरून आम्ही तिघे होतो, जे पहिल्यांदा सागरतळाशी बुडी मारणार होतो. सर्वांशी ओळखीपाळखी होईपर्यंत आमची बोट जेट्टीला लागली आणि सगळे उत्साहाने बोटीत जाऊन बसले. आम्ही ज्या रदांग बेटावर चाललो होतो, ते बेट मलेशियातल्या बेस्ट डायव्हिंग साइटपैकी एक आहे. ते तसं का आहे ह्याची प्रचिती किनारा जवळ येऊ लागला तशी येऊ लागली. स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यांच्यामुळे सागरतळ स्पष्ट दिसत होता. अगदी किनार्‍यालगतही वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसत होते. तो स्पष्ट सागरतळ डोळ्यात साठवून ठेवून आम्ही आमच्या डाइव्ह रिसॉर्टकडे निघालो. आपापल्या अलॉट झालेल्या रूमच्या चाव्या घेऊन आम्ही रूममध्ये सामान ठेवलं आणि थोडे फ्रेश झालो, तोपर्यंत ट्रूडीची हाक आली टीम मीटिंगसाठी.

रिक्रिएशनल डायव्हिंगमध्ये साधारण २५ ते ३० मीटर खोल समुद्रतळापर्यंत जाता येतं – म्हणजे शंभर ते सव्वाशे फूट खोल. आम्ही नवशिके एकदम त्या रिक्रिएशनल डाइव्हला जाण्याआधी समुद्राची आणि समुद्राच्या पाण्याची ओळख व्हावी म्हणून आमच्यासाठी एक मिनी डाइव्ह प्लॅन केली होती. ट्रूडी आणि आम्ही तीन नवशिके त्या मिनी डाइव्हसाठी जाणार होतो. त्या डाइव्हमध्ये स्विमिंग पुलामध्ये शिकलेले सगळे सराव पुन्हा एकदा किनार्‍याजवळ समुद्राच्या उथळ भगातील पाण्यात केले आणि मुख्य डाइव्हला जाण्यासाठी आम्ही तयार झालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रूडी आणि रिसॉर्टचा लोकल गाइड यांनी सर्वांचं ब्रीफिंग केलं. त्या ब्रीफिंगमध्ये डाइव्ह करताना वापरायच्या सांकेतिक खुणा समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर आमच्या पहिल्या डाइव्हचा मार्ग समजावून सांगितला. त्या डाइव्हमध्ये कोणत्या प्रकारचे मासे, कोणत्या प्रकारचे समुद्री जीव, वनस्पती आणि कोणत्या प्रकारचे प्रवाळ बघायला मिळतील याची कल्पना देण्यात आली. वेळेचं काटेकोर पालन करत, टाकीमधला ऑक्सिजन पूर्ण डाइव्हसाठी कसा पुरून उरेल ह्यानुसार डाइव्ह मार्गाचं प्लॅनिंग केलं गेलं होतं. रिक्रिएशनल डायव्हिंग हा एकटा-दुकट्याने करण्याचा खेळ-प्रकार नाहीये. हा ग्रूपमध्ये करण्याचा आणि एकमेकांच्या परस्पर सहकार्याने करण्याचा खेळ-प्रकार आहे. मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, बीसीडी (Buoyancy compensator), डाइव्ह कॉम्प्युटर आणि पायात लांबलचक फीन्स हा सगळा लवाजमा सांभाळत, वेळेचे भान आणि टाकीतल्या ऑक्सिजनचं प्रमाण यांचं गणित करत समुद्रतळाचं जादुई विश्व अनुभवायचं ही एक तारेवरची कसरत असते. त्यासाठी परस्पर सहकार्याची नितांत गरज असते डाइव्ह करताना. त्यासाठी प्रत्येक डाइव्हरला चमूतील एक डाइव्हर, बडी-डाइव्हर (भिडू) म्हणून निवडायचा असतो. आमची पहिलीच वेळ असल्याने ब्रीफिंगनंतर आम्हाला आमचा बडी-डाइव्हर सांगण्यात आला, जो ट्रूडीने ठरवला होता. आमच्या चमूबरोबर असणाऱ्या अनुभवी डाइव्हर्सचा आम्हा नवशिक्यांना प्रचंड फायदा आणि मदत होणार होती

Buoyancy Control

ट्रूडीने शिट्टी वाजवली आणि आम्ही सगळे बोटीत स्थानापन्न झालो. बोटीत बसल्यानंतर माझा बडी आणि मी एकमेकांनी आमची सगळी उपकरणे व्यवस्थित आहेत आणि व्यवस्थित बांधली गेली आहेत याची चाचणी करून एकमेकांना ‘ओके सिग्नल’ दिला. पंधरा मिनिटांत बोट आमच्या डाइव्ह साइटला पोहोचली. ट्रूडीने सिग्नल देताच देवाचं नाव घेऊन मी पाण्यात उडी टाकली. निळ्याशार रंगाचं थंडगार पाणी अंगाला लागताच शरीर आणि मन दोन्हीही थरारून गेलं. सर्व डाइव्हर्स पाण्यात आल्यानंतर एक रिंगण करून ट्रूडीने सिग्नल दिल्यानंतर बीसीडीतली हवा सोडून देऊन आम्ही सगळे जण सागरतळाकडे जाऊ (बुडू) लागलो. पंधरा मीटरपर्यंत खोल आल्यानंतर बीसीडीमध्ये पुन्हा हवा भरून Buoyancy सांभाळत तरंगत राहायला सांगण्यात आलं. आजूबाजूला रंगीबिरंगी मासे घोळक्या-घोळक्याने फिरत होते. रंगीबेरंगी प्रवाळ वसाहती मन मोहून टाकत होत्या. पण आणखी खोल जायचं होतं, पुन्हा आणखीन खोल जाण्यास सुरू केलं. पंचवीस मीटर खोल पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री जीव आवतीबोवती दिसू लागले.

खोल समुद्रातली गहन शांतता, आल्हाददायक थंडगार पाणी आणि समुद्राची हिरवट निळसर झाक या धीर-गंभीर वातावरणाचा परिणाम होऊन एक प्रकारची असीम शांतता अनुभवायला येत होती. शरीरातलं गात्र न् गात्र सैल (रिलॅक्स) झालं होतं. मनाच्या खूप खोलवर अगदी शांत-शांत वाटत होतं. सगळं एकदम संथ होऊन वेळ थांबून गेल्यासारखं वाटत होतं. इतक्यात माझं लक्ष एका माशाकडे गेलं. तो संथ लयीत त्याची शेपटी हालवत एका जागी निवांत थांबून होता. मी सगळे भान हरपून त्याच्याकडे बघत होतो. धीरगंभीर वातावरण, मनात दाटलेली असीम शांतता आणि संथपणे शेपटी हालवत निवांत असलेला तो मासा या सर्वांचा अंमल होऊन, एक भारावलेली अवस्था अनुभवली, एकदम ट्रान्समध्ये जाऊन निवांत आणि समाधिस्थ झालो होतो. हा अनुभव इतका भन्नाट आणि अलौकिक होता की तो तसा शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे. इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमात कतरीना कैफ डाइव्ह ट्रीपवरून आल्यानंतर हृतिकला म्हणते – ‘डाइव्हिंग इज लाईक मेडिटेशन!’. तो सिनेमा बघितला तेव्हा ती काय म्हणतेय त्याचा नेमका अर्थ कळला नव्हता किंवा त्यामागची भावना कळली नव्हती (आणि त्या वेळी मेडिटेशन म्हणजे काय हेही ठाऊक नव्हतं). पण त्या निवांत माशाकडे बघून जी मनाची अलौकिक अवस्था झाली होती, त्या वेळी तिच्या डायलॉगचा खरा अर्थ उमगला, अगदी खोलवर पोहोचला.

त्यानंतरच्या डाइव्ह्ज वेगवेगळ्या साइटवर झाल्या. फाईंडिंग निमो हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यात जे समुद्रातलं जादुई विश्व दाखवलं आहे, ते सगळं ह्या साइट्सवर बघायला मिळालं. वेगवेगळे रंगीबेरंगी मासे, शार्क, स्टिंग-रे, भलीमोठी समुद्री कासवं, माहित नसलले इतर अनेक समुद्री जीव, वनस्पती आणि वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या प्रवाळ वसाहती ह्या सर्वांचं एकत्रित एक अद्भुत विश्व आहे. हे अत्यंत सुंदर, मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. हे सगळं अद्भुत विश्व प्रत्यक्ष अनुभवायलाच हवंच!

डाइव्हिंग सर्टीफिकेट

MSAC मेंबरशीप

सिंधू में गोताखोर – स्वप्नपूर्ती

मी आणि मधू

आर्ट ऑफ डाइंग – मृत्यूवर प्रेम करण्याची कला

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित

आहार, निद्रा, मैथुन आणि भय ह्या आदिम संवेदनांपैकी भय ही संवेदना सजीवाला त्याच्या अस्तित्व रक्षणासाठी प्राप्त झालेली प्रेरणा आहे. ह्या भयाच्या संवेदनेमुळे सजीव, जीवाला होऊ घातलेला धोका समजू शकतो आणि जीवनप्रवाह अपघाती संपण्यापासून जीवाचे रक्षण करू शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे, जीवनप्रवाह चालू राहण्यासाठी  होणारी नैसर्गिक प्रेरणा.

उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा जीवामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं अस्तित्व नव्हतं तेव्हा जीव आपलं नियत कर्म करून अनंतात विलीन होऊन जायचा, खऱ्या अर्थाने. (म्हणजे जन्म मृत्यूचा फेऱ्यात न अडकता, हे फक्त ह्या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांसाठी, बाकीच्यांनी सोडून द्यावे). पण पुढे उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचा विकास होऊन ही इंद्रियं अस्तित्वात आली. अहंकारामुळे अस्तित्वाच्या मी-पणाची भावना अस्तित्वात आली तर मन, बुद्धी इंद्रियांमुळे कर्म-संस्कार अस्तित्वात आले. अहंकारामुळे ‘अहं ब्रह्मास्मी’ ह्या जाणिवेशी फारकत होऊन अस्तित्वाच्या मोहाच्या पडद्यामुळे मी म्हणजे शरीर ही भावना प्रबळ झाली. ज्या क्षणी ही भावना प्रबळ झाली त्याच क्षणी त्या शरीराच्या अस्तित्वाच्या नष्ट होण्याच्या भितीची भावना प्रबळ झाली आणि तिचा कर्म-संस्कार झाला (म्हणजेच जन्म मृत्यूचा फेरा सुरू झाला).  

सजीवांपैकी मनुष्यप्राणी जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा त्याच्यातील बुद्धीचा विकास वेगाने होत गेला. संकल्प-विकल्पात्मक मनाने ह्या विकसित बुद्धीच्या साहाय्याने भय ह्या नैसर्गिक संवेदनेचा (प्रेरणेचा) विस्तार करून अहंकाराच्या मदतीने आदिम भीतीला अनेक आयाम दिले. माणसाने भौतिक प्रगतीत जशी जशी घोडदौड सुरू केली तशी तशी वेगवेगळ्या भयाचे आविष्कार (PHOBIA) अस्तित्वात येत गेले. भयाचे हे अनेक प्रकार असले आणि आपल्या मनात सदैव भीती वास करीत असली तरी,  मनुष्याला सगळ्यात जास्त भय जर कुठल्या गोष्टीचे वाटत असेल तर ते मृत्यूचे.

जन्माला  येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जीवाच्या हातात नसतो. त्या दोन श्वासावर त्याची हुकुमत किंवा सत्ता चालत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय? ह्या अस्तित्वाच्या अज्ञाताच्या भयाने मृत्यूचा धसका बसलेला असतो. ह्या भीतीमुळेच मृत्यू ह्या घटनेचे महत्त्व जीवाला कळलेलं नव्हतं. परंतु बुद्धीच्या प्रगल्भतेमुळे मनुष्याला “कोsहं” हा प्रश्न पडला आणि त्याने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अनेक थोर साधकांनी, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, बुद्धावस्था प्राप्त करून घेऊन जन्म-मृत्यूचे रहस्य उलगडवले. मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसतो पण त्या दोन श्वासांच्या दरम्यानचे सगळे श्वास मात्र आपल्या हातात असल्याने त्या सर्व श्वासांना आपल्या  नियंत्रणात ठेवून जीवन समृद्ध करत जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिविंग) विकसीत केली. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व बुद्धांनी आणि अरिहंतांनी विविध साधनामार्ग शोधून त्या मार्गांनी मोक्षप्राप्तीचा (कर्म-संस्कार निर्मूलनाचा) पर्याय उपलब्ध करून दिला. फक्त वैराग्य मार्गानेच नव्हे तर प्रपंचात राहूनही मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला. पण फक्त जगण्याची कलाच महत्त्वाची नाही  तर त्याच बरोबर ‘मृत्यूची कला’ (आर्ट ऑफ डाइंग) ही तितकीच महत्त्वाची आहे हेही त्यांनी समजावून दिले आहे, फक्त दर्शनमार्गानेच नव्हे तर योगमार्गानेदेखील. पण ही मृत्यूवर प्रेम करायला लावणारी ‘मृत्यूची कला’ समजण्यापूर्वी जन्म आणि मृत्यू ह्या घटना समजणे महत्त्वाचे आहे.

जीवनप्रवाह हा ऊर्जेचा एक अखंड प्रवाह आहे. ही ऊर्जा म्हणजेच चैतन्य, परब्रह्म! ऊर्जा एका आकारातून दुसऱ्या आकारात साकार होत सतत प्रवाही असते. आकार निर्माण होणे आणि नष्ट होणे ही अटळ वारंवारता आहे कारण नित्य काही नाही, सर्व साकार सृष्टी अनित्य आहे. जन्म ही घटना, ऊर्जेचे एक जीर्ण आकार सोडून नवीन आकारात साकार होणे आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहेच!

जन्म  – अविरत आणि अखंड विचारप्रवाह, त्यानुसार शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना  आणि त्या संवेदनांनुसार प्रतिक्षिप्त होणारे कर्मसंस्कार, हा घटनाक्रम पहिल्या श्वासापासून चालू होणे आणि हे सर्व प्री-प्रोग्राम्ड होऊन ‘ऑटो पायलट‘ मोड मध्ये काम सुरू होणे  हा जन्म. हेच जन्म झालेल्या सजीवाचे जीवन, ऊर्जेचे साकार रूप. अविरत आणि अखंड विचारप्रवाहामुळे निरनिराळे कर्मसंस्कार मनाच्या खोल डोहातून उफाळून वर, मनःपटलावर येत असतात आणि सजीव त्या कर्मसंस्कारांवर प्रतिक्षिप्त होत कर्मेंद्रियांद्वारे आयुष्यभर कर्म करत असतो.   

मृत्यू – ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे. पण ती फार महत्त्वाची घटना आहे कारण फार महत्त्वाचे ऊर्जेचे संक्रमण ह्या घटनेतून होत असते (आणि पुढचा जन्म ह्या घटनेशी अत्यंत संलग्न असतो). वर सांगितलेल्या ऑटो-पायलट घटनाक्रमानुसार मृत्यू समोर आल्यावर ते मृत होईपर्यंत अनंत विचार मनःपटलावर उमटतात आणि त्या विचारांवर प्रतिक्षिप्त होत कर्म केल्याने कर्मसंस्कार घडतात (हेच कर्मसंस्कार पुढच्या जन्म ह्या घटनेवर प्रभाव टाकतात, संचिताच्या स्वरूपात). पण मृत्यूचे भय असल्याने त्यावेळी येणारे विचार हे त्याच भावनेने पछाडलेले असतात. सर्व काही निसटून जाणार ही भावना आणि त्यामुळे येणारी व्याकुळता ही मृत्यू ह्या अटळ घटनेला कष्टप्रद आणि वेदनादायी तर बनवतेच पण त्याच्याशी संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेलाही प्रभावित करते. त्यामुळे ऊर्जेचे संक्रमण पुढील कोणत्या आकारात आणि कसे साकार होणार हे मृत्युसमयी असलेल्या ऊर्जास्थितीवर (मन:स्थितीवर) अवलंबून असते. म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे!

जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू  योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो. म्हणजेच मृत्यू (ऊर्जा संक्रमण) हा नैसर्गिक असायला हवा. ह्यामुळेच धर्मग्रंथांमध्ये आत्महत्या हे पाप असं म्हटलं आहे. परंतु मोक्षप्राप्त सिद्ध योगपुरुषांनी (उदा. संत ज्ञानेश्वर) समाधी अवस्थेत जाऊन देह त्यागणं हे अनैसर्गिक नाही. कारण मोक्षप्राप्तीमुळे कर्म-संस्काराचे निर्मूलन झालेले असते आणि त्यामुळे त्या मुक्तावस्थेत ऊर्जा संक्रमणाची घटना घडताना पुढचा आकार (जन्म) नसतो, असतं ते फक्त अनंतात विलीन होणं.

‘आर्ट ऑफ डाइंग’ म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला त्यामुळेच फार महत्त्वाची आहे, मृत्युसमयी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि मृत्यू नैसर्गिक होण्यासाठी. मरणावर प्रेम करायचे म्हणजे भौतिक जगात घडणाऱ्या अनेक अटळ घटनांपैकी मृत्यू हीदेखील एक अटळ घटना आहे हे समजून त्याला निर्विकार आणि निर्विचारपणे हसतमुख सामोरे जाणे आणि तो केव्हाही येऊ शकतो हे ध्यानात ठेवून त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असणे! पण अशी सज्जता असणे किंवा मृत्यूच्या असे प्रेमात असणे हे ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ इतके सोपे नसते. ‘आर्ट ऑफ डाइंग’ साठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ येणं फार गरजेच आहे.  कारण ह्या दोन्ही कला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकीँना पूरक असलेल्या. त्यांच्यामुळेच मृत्यूच्या प्रेमात पडून त्याला सामोरे जाण्याची सज्जता करता येणं शक्य असतं. जीवन जगत असतानाच जन्म आणि मृत्यू यांची संलग्नता समजून मृत्यूवर प्रेम करण्याची कला शिकायची म्हणजे मग प्रत्यक्ष मृत्यू होताना त्याला सहजतेने सामोरे जाता येते.

पण हे साधायचे कसे? त्यासाठी काही मार्ग नाही का? इतक्या प्राचीन आणि सनातन तत्त्वज्ञानात ह्यावर काहीच उहापोह झाला नाहीयेय का? तर, आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला  शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच ‘आर्ट ऑफ डाइंग’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि  पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे. प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच ‘आर्ट ऑफ डाइंग’. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!

ह्या समाधी अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विचार/विकार मनःपटलावर येतात, त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते. शरीर जीर्ण झाल्याने, शेवटचा श्वास घेऊन सोडताना, सर्व कर्म-संस्कारांच्या अंतिम आणि अफाट रेट्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचे (चैतन्य किंवा प्राणाचे) संक्रमण होते, ही घटना म्हणजेच मृत्यू. त्यावेळी उफाळून येणारे  कर्म-संस्कार हा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो. त्या अनेकविध भावनांपैकी जी भावना प्रबळ असेल त्यानुसार शेवटचे कर्म घडून त्याच्या प्रभावाने ऊर्जा संक्रमणाचा पुढचा आकार (जन्म) ठरतो. पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.

समाधी अवस्थेत देहातीत शून्याची अनुभूती येते जी शेवटचा श्वास घेतला जातो तेव्हा होत असते. साधनेमुळे त्या अवस्थेची अनुभूती सरावाने मिळालेली असल्याने त्याला सामोरे जाताना  भांबावून आणि दडपून (Overwhelmed) न जाता  चित्त स्थिर राहते. तसेच साधनेमुळे कोणत्याही कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची, प्रतिक्षिप्त न होण्याची कला साधलेली असते. त्यामुळे मृत्युसमयी भयामुळे येणाऱ्या कर्म-संस्कारांवर तटस्थ राहता येऊन सर्व व्याकुळता टाळता येते. ही साधना आयुष्यभर करायची असते, अगदी शेवटाच्या श्वासापर्यंत. ही साधना म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला. ह्या प्रेमामुळेच मृत्यूला न घाबरता किंवा त्याच्यासाठी अधीर न होता, तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या कवेत अलगद सुपूर्द  करता येणे शक्य होऊन शांतपणे अनंतात विलीन होता येते.

ह्या मृत्यूवर प्रेम करण्याच्या कलेमुळेच (आर्ट ऑफ डाइंगमुळे) मृत्यू हा नकोशी घटना न होता त्या मृत्यूचा वैयक्तिक सोहळा साजरा करता येतो.

चावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा

chawadee

हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या  श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!

चिंतामणी“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.

“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.

“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.

“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.

“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.

“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.

भुजबळकाका“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.

“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत.

“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.

चिंतोपंत“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.

“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.

“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.

“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.

भुजबळकाका“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.

“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.

“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

चिंतोपंत“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.

“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.

“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून बारामतीकर
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.

“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.

“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.

“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.

“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना

“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्‍यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.

पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्‍या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.

“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.

सकाळचा सूर्यप्रकाश

शाळेच्या एका ग्रुपवर बर्‍याच टूम निघत असतात. एके दिवशी प्रशांत गोरे ह्या मित्राने एक फोटो शेअर करून टूम काढली की फोटोवरून काहीतरी हटके लिहा. त्याच्या कोकणातल्या आजोळच्या घराचा फोटो होता तो. कस काय कोण जाणे पण ते घर बघितल्यावर एकदम नारायण धारप आणि त्यांच्या रहस्यकथा आठवल्या. आणि, लक्षात आल की ह्या प्रकाराच काही लिहीले नाहीयेय. प्रयत्न करून बघितला, तो असा…


 

कोकणातल्या आजोळच्या घराचा फोटो

सूर्य कासराभर वर येऊन सगळा आसमंत लख्ख करून गेला. जांभ्याच्या चिरांच्या भक्कमपणावर ठाकलेल्या त्या घराचा परिसर उजळून गेला होता आणि प्रसन्न वातावरणाचा आभास निर्माण झाला होता. घराभोवतालच्या हिरवाईची आभा सकाळच्या उत्साही वातावरणाला द्विगुणीत करत होती.

रात्रीच्या अभद्र वातावरणाचा मागमूस कणभरही उरला नव्हता. रात्रीच्या काळोखात, आता प्रसन्न भासणारी, गडद हिरवाई ह्याच वातावरणाला गूढतेचं वलय देऊन भयंकर कोलाहल सामावून होती ह्यावर विश्वास बसणंच कठीण होत होतं.

सामसूम भासणाऱ्या पाउलवाटेवर रात्री कितीतरी पाशवी शक्तींचा उच्छाद चालला होता ह्यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण होतं. निवडूंगाच्या जाळीत, अतृप्त आत्म्यांची, रात्रभर चाललेली अघोरी धडपड एकंदर वातावरणाला भारून गेली होती त्याचा आता मागमूसही दिसत नव्हता.

सकाळचा सूर्यप्रकाशाचा सडा, सगळ्या अभद्रतेला तिलांजली देऊन, तेजोमय आणि मंगलमय दिवसाची सुरूवात करत होता!

मोठा फोटो

GHAR

सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम‘ ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉 )

कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

chawadee

आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.

“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.

“बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.

“अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“बारामातीकर, कुठे आहे तुमचा जाणता राजा ह्या दुष्काळात? आहे का काही त्या माजी कृषीमंत्र्याला शेतकऱ्याचे?”, इति चिंतोपंत.

“अमेय खोपकर ह्या बॉलीवूड सेनेच्या अध्यक्षाने मनसे तर्फे बॉलीवूडला आवाहन केले आहे शेतकर्यांना सढळ हाताने मदत करायला, चांगला काम आहे!”, इति घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, हे असे आवाहन की आव्हान? ”, बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका हसत.

“हो ना, कसलं आवाहन न आव्हान, धमकीच म्हणा ना सरळ.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, अहो जमीन कसून अन्नधान्य पिकवणाऱ्याची काळजी करायला नको का?”, घारुअण्णा तिरमिरीत.

“काळजी तर करावीच ना, पण अशी दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवून?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, जागृती होतेय हे काही कमी आहे का? पावसाने कंबरडे मोडले आहे.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, तथाकथित बहुजन नेत्यांकडून काही सुरुवात झाली नाही म्हणून विरोध दुसरं काय?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! स्वतः: काय केलेय मदत करण्यासाठी? दुसऱ्यांना वेठीस का म्हणून?”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, हा कळवळा कृष्णकुंजातील गारेगार एसीमध्ये बसूनच आलाय ना? की विदर्भात किंवा मराठवाड्यात बसून आलाय?”, बारामतीकर शांतपणे.

“टोल आंदोलनात मिळालेलं काही द्यायचे की आधी स्वतः:, मग आवाहनं करायची दुसऱ्यांना!”, इति भुजबळकाका.

“ओह्हो! घारुअण्णा, आत्ता माझ्या लक्षात आलं कोण आयजी आणि कोण बायजी ते.”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जर मदत करतात तर बॉलीवूड कलाकार का करू शकत नाही असा सवाल विचारणारे हे टिकोजीराव कोण?”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“नाशिकच्या ‘नवणिर्माणा’तूनही काही ‘भले’ झालेच असेल की ते वापरायचे दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी”, बारामतीकर आवेशात.

“अहो पण हे शिंचे कलाकार कमावतात की खोऱ्याने मग सामाजिक बांधिलकी वैग्रे काही आहे की नाही?”, घारुअण्णा तणतणत.

“ते त्यांचं त्यांना ठरवू द्याना, त्यांची सामाजिक बांधिलकी ठरविणारे तुम्ही कोण? ”, भुजबळकाका हसत.

“अहो पण आपला नाना आणि मकरंद करताहेत ना? त्यांचे बघून तरी काही लाज बाळगायची…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. मराठी माणसाने मराठी माणसासाठी काही केले की लगेच बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकारांचा पोटशूळ कसा उठतो बघा! ”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“अहो राजने काहीतरी करून पक्षाची मोट बांधली आहे, पदं आणि पदाधिकारी उभे केले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही कामं नकोत का?”, सोकाजीनाना मंद हसत

“आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे मनसे पहिल्यांदा करते आहे का? शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा म्हणजे नेमके काय करा, ती मदत जर बॉलीवूडचे कलाकार करणार असतील तर त्यात मनसेचा काय रोल, ह्या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. ब्लु प्रिण्ट मध्येही हेच केले होते. आता, नाना आणि मकरंद मैदानात उतरून काही करताहेत हे दिसल्यावर अचानक एक विषय मिळाला प्रकाशात यायला. शेतकऱ्यांना पैसे वाटून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? त्यांच्या समस्या काय आहेत आत्महत्या करण्यामागच्या त्याचा अभ्यास करून, मुळाशी जाऊन, निराकरणासाठी काही ठोस कार्यक्रम राबवायला हवा ना! तसे करण्याची सोडा, नुसते विचार करण्याची तरी कुवत आहे का? नुसते सढळ हाताने मदत करा असे आवाहन कम गर्भित धमकी देऊन समस्या नाहीशी होते का? नाही! त्याने फक्त ‘उपद्रवमूल्य’ लोकांच्या मनात ठसवता येते आणि हेतू तोच आहे. ‘आम्ही आहोत अजून, आम्हाला विसरू नका एवढ्यात‘, हाच संदेश लोकांच्या मनातफ़ ठसवायचा आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

“आणि आपण बसतो आपापली अस्मितांची गळवं कुरवाळत, तथाकथित नेत्यांनाही तेच हवे असते. सोडा तो अकलेचा दुष्काळ आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना घारूअण्णांच्या खांद्यावर हात टाकत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – अफझलखानाचे सै(दै)न्य

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं…”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

‘शिवसेनाप्रमुखपद’ हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

“घारुअण्णा आणि नारुतात्या, तुम्ही समजताय त्या ‘बिपी’बद्दल बोलत नाहीयेत ते.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“बालक-पालक सिनेमा बघितल्यापासून त्यांचं हे अस्सच आहे अगदी!”, चिंतोपंत चर्चेत प्रवेश करत.

“अहो राजच्या मनसेच्या, बहुचर्चित आणि बहुआयामी ब्लु प्रिंट बद्दल बोलतोय मी! आता सांगा, बघितली का नाही ती महाराष्ट्राची ब्लु प्रिंट?”, बारामतीकर.

“नाही! वाचली नाही अजून, काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, ही मात्र हद्द झाली! अहो, नातवाने आयपॅड दिलाय ना तुम्हाला, त्याची काय पुजा घातलीय का? ”, बारामतीकर हसत हसत.

“इथे आयपॅडचा काय संबंध?”, चिंतोपंत बुचकळ्यात पडत.

“अहो, आधुनिकतेची कास धरत मनसेने ती ब्लु प्रिंट, एक वेबसाइट काढून, ऑनलाईन करून, पब्लिक डोमेनमध्ये आणलीय.”, बारामतीकर.

“बरंsssबरंsss, म्हणजे आमच्या नमोंचाच आधुनिकतेची कास धरण्याचा कित्ता गिरवलाय म्हणा की तुमच्या राजने!”, चिंतोपंत उपहासाने.

“झालं, ह्यांचा संघीय बाणा आला लगेच बाहेर!”, इति बारामतीकर.

“बरं, राहिलं! काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट ते तर सांगा…”, चिंतोपंत.

“काय सांगणार, नव्या बाटलीत जुनीच दारू, झालं!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“वाचलीय का तुम्ही ती ब्लु प्रिंटं?? की नेहमीचाच विरोधासाठी विरोध? ”, घारुअण्णा किंचित रागात.

“हो! वाचलीही आणि त्या वेबसाइटवरचा मुख्य पानावरचा व्हिडियोही पाहिलाय मी!”, भुजबळकाका शांतपणे.

“मग, काय म्हणताहेत नवनिर्माणकर्ते त्या व्हिडियोत?”, नारुतात्या.

“त्या व्हिडियोत जगाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची विहंगम सफर घडवून आणलीय महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आणि पर्यायाने नवनिर्माण करण्यासाठी!”, बारामतीकर गालात हसत.

“म्हणजे इथेही उद्धवच्या विहंगम फोटोग्राफीशी स्पर्धा आहेच म्हणा की.”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“थांबा हो नारुतात्या! बारामतीकर, नेमके आहे काय त्या व्हिडियोत असे?”, घारुअण्णा त्रस्त होत.

“वेब साइटीवर,‘महाराष्ट्राचा विकास आराखडा – होय, हे शक्य आहे’असा ओबामाचा‘येस, वी कॅन’हा कित्ता गिरवला आहे.”, बारामतीकर मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत.

“अहो, त्या व्हिडियोत काय आहे ते सांगा ना पण…”, घारुअण्णा चिडून.

“विकासासाठी दूरदृष्टी हवी आणि दूरदृष्टीला सौदर्यदृष्टीची जोड हवी असं म्हणताहेत नव-प्रबोधनकार. परदेशातली उदाहरणं द्यायची गरज नाही अस म्हणत सगळी परदेशातलीच उदाहरण दिली आहेत. सुंदरता आणि रचनेवर भर द्यावा लागेल हा मुद्दा मांडताना ते जनतेने करायचे आहे असे म्हणत त्यात सरकारची जबाबदारी कमीत कमी असावी म्हणत धूर्तपणे जनतेलाच जबाबदार धरले आहे आणि जबाबदारी जनतेवरच टाकली आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!”, बारामतीकर.

“ते जाऊदे, ते नेहमीचेच आहे. पण मला एका कळत नाहीयेय, महाराष्ट्राचे जाऊ दे, मुंबईचेपण जाऊदे म्हणतो मी, जे काही सौंदर्यपूर्ण नवनिर्माण घडवायचे आहे, महाराष्ट्रभर, त्याची झलक नाशकात का नाही दिसली? आराखडा नाशकात का नाही इंप्लीमेंट करून दाखवला? जसे मोदींनी‘गुजरात मॉडेल’च्या बळावर स्वतःला सिद्ध केले तसे‘नाशिक मॉडेल’बनवून विकास आराखडा सिद्ध करायचा होता ना!”, भुजबळकाका नेहमीच्या घीरगंभीर आणि ठाम भूमिकेत जात.

“तोच तर कळीचा मुद्दा आहे ना भुजबळकाका! ते असो, मी तो व्हिडियो बघितला आणि विकास आराखडाही वाचला. एकदम राजीव गांधींची आठवण झाली!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा बुचकळ्यात पडत.

“राजीवजींच्या भाषणांमध्ये ‘हमें ये करना है’ हे पालुपद असायचे त्याची अंमळ आठवण झाली.”, सोकाजीनाना मंद हसत, “तर ते ही असो, आमच्या कॉर्पोरेट जगतात माझा साहेब मला नेहमी म्हणायचा ‘Don’t come to me with problems, I know them, come to me with 2-3 solutions or approaches. I’ll decide which is best for the situation looking at the big picture’. त्या साहेबाची आठवण ताजी झाली मला व्हिडियो बघताना. पुन्हा पुन्हा देशाची, महाराष्ट्राची कशी काँग्रेसने वाट लावली आहे आणि समस्या काय काय आहेत तेच पुन्हा पुन्हा सांगितले, पण ते कसे बदलणार ते मात्र गुलदस्त्यात राहते या व्हिडियोमध्ये. म्हणून मग आराखडा वाचला तर तिथे ‘हे करायला हवं, असं व्हायला हवं’ असं सगळं संदिग्धच. नेमके नवनिर्माण आणि विकास आराखडा म्हणजे काय हे ठाम आणि भरीव असे काहीच नाही. ज्या गोष्टी आधी केलेल्या आहेत आणि करणे शक्य आहे तिथेच फक्त ‘आम्ही हे करू किंवा केले जाईल’ असे ठामपणे म्हटले आहे, बाकीच्या ठिकाणी ‘असे असायला हवे, असे करायला हवे’ असे सगळं संदिग्ध आहे. त्यामुळे नेमके काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे हा विकास आराखडा, एकंदरीत आतापर्यंतच्या केल्या गेल्या भाषणांचे आणि मुद्द्यांचे सुसुत्रीकरण करून, एकत्रित बांधणी करून केले गेलेले डॉक्युमेंटेशन, एवढाच निष्कर्ष काढता येतोय!”

“ज्जे बात, सोकाजीनाना!”, भुजबळकाका जोषात येत.

“त्यामुळे, ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ असं भुजबळकाका म्हणाले तरी आपण मात्र चहाच मागवूयात, काय?”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.