एक वादळ – माझ्या टेनिसमय आयुष्यातले

शालेय जीवनात वडिलांच्या एका स्नेह्याच्या मुलामुळे टेनिस खेळ कळायला लागला पण बघायची काही गोडी लागली नव्हती तेव्हा. जॉन मेकॅन्रो, बोरीस बेकर, स्टेफी ग्राफ, मार्टिना नव्रातोलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, अराँता साँचेझ व्हिकारियो ही नावे तेव्हा अगदी एलियन लोकांची असावीत असेच वाटायचे. नव्रातोलोव्हा हे तर मला, ‘नवरा तिला हवा’ असेच वाटायचे. पण पुढे कळले की तिला नवरा नको असून ‘नवरी‘ हवी आहे 🙂 एकदा हिंदी बातम्या ऐकताना एका फ्रेंच ओपनची फायनल, कोणीतरी एक खेळाडू आणि अराँता साँचेझ व्हिकारियो ह्यांच्यात होणार अशी बातमी अर्धवट अशी ऐकली “….अराँता साँचेझ व्हिकारियो के दरमियां।“ त्यावेळी तसल्या नावांची कानाला सवय नसल्याने “…अराँता साँचेझ भिकारियो के दरमियां।“ अशी ऐकली आणि बावचळून गेलेलो ते अजूनही लख्ख आठवते आहे आणि त्याचवेळी परदेशातही भिकारी आहेत असे वाटून सुखावलोही होतो.

असो, तर त्यावेळी खेळाचा दर्जा वैगरे भानगडीत न पडता खेळातली गंमत जास्त अनुभवण्याच्या दृष्टीने मी मॅचेस बघत असे. एका मित्राचे वडील जॉन मेकॅन्रोचे प्रचंड फॅन होते. ते खेळातली गंमत, थरार, सर्व आणि वॉली, बेसलाइन विनर असले तपशील समजावून सांगायचे. त्यामुळे खेळ बघायला मजा यायची. तोपर्यंत जास्त करून पुरुष एकेरीच्याच मेचेस बघायचो. पुढे जरा आणखी ‘मोठे’ झाल्यावर महिला एकेरीच्या सामन्यांतले ‘बारकावे’ कळल्याने त्या मॅचेस बघायची सवय लागली. पण त्यात फार गोडी लागावी अशी परिस्थिती नव्हती. स्टेफी ग्राफचा त्या खेळातला दबदबा आणि तिचे कौशल्य वादातीत असले ती मला आवडायची नाही. त्याचे कारण वेगळे होते. वडिलांच्या ज्या स्नेह्याच्या मुलामुळे टेनिस खेळ बघायला लागलो त्याची बहीण, कल्पानाताई हिचे आणि माझे अजिबात जमायचे नाही. त्यामुळे तिला जे जे आवडायचे ते सर्व माझे नावडते झाले होते आणि स्टेफी तिची आवडती होती. त्यामुळे मला मनातून स्टेफीचा गेम आवडत असूनही तिचा फॅन होता आले नाही. ति विरोद्ध मोनिका सेलेस अशी एक मॅच मोनिका हरल्यावर मी ढसाढसा रडलो होतो, कारण ‘कल्पानाताईची आवडती स्टेफी’ ती मॅच जिंकली म्हणून!

चित्र: आंतरजालाहून साभार

तर ते असो, पुढे माझ्या टेनिस जीवनात एक वादळ आले ज्याने टेनिस ह्या खेळाची सर्व परिणामे माझ्यापुरती बदलून गेली. आयुष्य ढवळून निघाले. पौगंडावस्थेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली. त्या तारुण्यसुलभ वयात तारुण्याची सर्व आव्हाने पेलायची ताकद मनात रुजून, जगण्याचा एक नवीनं हुरूप आला. टेनिस खेळाविषयी अतिशय आत्मियता निर्माण होऊन हा खेळ शोधल्याबद्दल गोर्‍या साहेबाविषयी अभिमान दाटून आला. अर्जेंटिना ह्या देशाविषयी एकदम अभिमान दाटून येऊन त्या देशाविषयी एक प्रेम मनात उत्पन्न झाले. अचानकच त्यादेशाविषायीची माहिती काढणे चालू केले. वडिल भूगोल शिकवायचे त्यांना “आपण अर्जेंटिना ह्या देशावर एक प्रोजेक्ट करुयात का?”, असे विचारुन झीटही आणली. हे सर्व होण्याचे एकमेवा कारण होते ते वादळ! ते वादळ होते अर्जेंटिनाची ‘गॅब्रिएला सॅबातिनी’.

चित्र: आंतरजालाहून साभार

‘ती पाहताच बाला कलेजा खलास झाला’ असे काय म्हणतात ना, नेमके तसेच झाले तिला पहिल्यांदा बघितल्यावर. ते वयाच असे होते ज्यावेळी आपल्या विषमलिंगी जोडीदाराबद्दलच्या कल्पना आणि फॅन्टसीच हळूहळू डेव्हलप होत असतात. एक अमूर्त असे चित्र आपल्या मनात तयार होत असते. सुंदरता, देखणेपणा, आकर्षकता, ब्यूटिफुल आणि हॅन्डसम ह्यात असलेली एक थिन लाइन ह्या गोष्टी आपल्या मनाच्या खोल गाभ्यात डिफाइन होत असतात. त्यामुळेच त्या वयात टेनिस खेळाडूच्या रूपाने भेटलेली (टीव्हीवर हो!) गॅब्रिएला आयुष्यात वादळ उठवून गेली होती.

चित्र: आंतरजालाहून साभार

तिच्या केसांची हटके स्टाइल, लांब तरतरीत नाक, चेहेर्याहची पंचकोनी ठेवण, खेळताना डोक्याला लावलेला पांढरा बंडाना, पांढरा मिनी स्कर्ट आणि पुष्ट व कमनीय अशी अ‍ॅथलीट देहयष्टी. हे सर्व पाहून त्या वयात वेडावून न जाणे हे जरा कठीणच होते. अक्षरशः मिळतील त्या वर्तमानपत्रांतले तिचे सर्व फोटो जमवून ठेवायचा ध्यासच लागला होता तेव्हा. त्या वेळेच्या कृष्ण-धवल वर्तमानपत्रांमधल्या तिच्या त्या कृष्ण-धवल फोटोंमध्येही ती त्यावेळी लाजवाबच दिसायची, अगदी काळजाला घरे पडतील इतकी. त्या काळी इंटरनेट सुविधा नसल्याने तिचे त्या खेळाच्या पोषाखा व्यतिरीक्त फोटो बघायला मिळायचे नाहीत. कधीतरी वाचनालयात स्पोर्टस्टार सदृश मासिकांमध्ये रंगीत फोटो बघायला मिळायचा. मग गुपचूप तो फोटो फाडून घेऊन वाचनालयातून पसार व्हायचे धंदेही त्या काळी केलेत. गॅब्रिएलासाठी हे त्या काळी माझ्यासाठी क्षम्य गुन्हे होते. नशिबाने कधी पकडलो गेलो नाही म्हणून नाहीतर अफाट मार खावा लागला असता ही गोष्ट वेगळी, पण तरीही त्यावेळी मार खाताना तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊन तो मारही सुसह्य झाला असता असा सार्थ विश्वास आजही आहे.

तिचा खेळ एवढा काही उच्च नव्हता आणि तिने विशेष असे काही सामनेही जिंकले नाहीत. पण त्याची फिकीर मला नाही कारण तिने माझ्या हृदयातले ‘ग्रॅन्ड स्लॅम’ पहिल्या दृष्टीतच जिंकले होते, 6-लव, 6-लव असे!

चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

chawadee

“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत.

“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो! पण एवढ्यातच 2014 च्या निवडणुका जिंकल्याचा आनंद झाल्यासारखे आनंदित होऊ देऊ!”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, भाजपासाठी आणि ‘भाजपेयीं’साठी!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी भाजपा – पार्टी विथ डिफरन्स ह्याचा अर्थ काय ते कळले!”, नारुतात्या पुन्हा पांचट विनोद करत.

“हो ना! इतर पक्षांपेक्षा तसूभरही कमी नसून, इतर पक्षांत आणि भाजपा मध्ये काही नाही डिफरन्स हे नक्कीच आता कळले तमाम भारतीय जनतेला.”, बारामतीकर.

“बारामतीकर, नारुतात्यांना कसला पोचच नाही हे ठाक आहे, पण तुम्ही सुद्धा?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, राहू द्या! अडवाणीजींनी यापुढे आपण पक्षाचे केवळ प्राथमिक सदस्य असणार आहोत असे म्हणत सगळ्या पदांचा राजीनामा देणे, हे ह्या लाखों हजार रुपयांचे घोटाळे करणार्‍यांच्या पक्षाच्या समर्थकांना कधी कळणार नाही. कसलाही हव्यास नसलेले निष्काम कर्मयोगी यांना काय समजणार?”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“निष्काम कर्मयोगी! ह्म्म्म”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“अहो डोंबलाचे निष्काम कर्मयोगी. एकेकाळी देश पेटवला होता ना ह्याच तुमच्या निष्काम कर्मयोग्याने, विसरलात का? राममंदिराच्या नावाखाली देशभर आयोजीत केलेली रथयात्रा हा सत्तेसाठी केलेला निष्काम कर्मयोग होता काय हो घारुअण्णा? आणि चिंतोपंत प्रत्येक वेळी ह्या नारुतात्याचा पोच काढण्याची काही गरज नाही!”, नारुतात्या .

“बरंsssबरंsss, तुम्ही जुन्याच मुळी उगाळत बसा! अहो वेळ काय घटना काय? तुम्ही बरळताय काय?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तेच म्हणतो मी, अहो वेळ काय घटना काय? व्यक्ती कोण आणि निष्काम कर्मयोगी काय?”, इति बारामतीकर.

“बरें, निष्काम कर्मयोगी राहूदे पण देशासाठी आणि देशातील जनतेच्या भल्यासाठी लढणारा एक सच्चा देशभक्त तर आहेत ते!”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“अहो पण त्यांचे मूळ गाव आणि जन्म पाकिस्तानात आहे ना, जन्माने पाकिस्तानीच आहेत ते?”, इति नारुतात्या.

“नारुतात्या तुम्ही गप्प बसा!”, घारुअण्णा रागात घुमसत.

“नारुतात्या, तुम्ही शांत बसा बरे जरा. पण घारुअण्णा, असा राजीनामा देण्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत नाही का? ”, चिंतोपंत.

“शिंचा, कसला अंतर्गत कलह आता?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा, हा राजीनामा म्हणजे, नरेंद्र मोदींची भाजपच्या निवडणूक प्रचारसमिती प्रमुखपदी झालेली निवड लालकृष्ण अडवाणी यांना फार रुचली नसल्याचे द्योतक आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“मग त्यात काय चूक आहे? एवढ्या अनुभवी आणि ज्येष्ठं नेत्याला काही किंमत आहे की नाही?”, घारूअण्णा जरा तडकून.

“हे बघा, त्यांची किंमत त्यांचीच घालवली असे माझे मत आहे?”, बारामतीकर ठामपणे .

“नक्कीच, माझ्यालेखी त्यांची किंमत तेव्हाच शून्य झाली होती जेव्हा त्यांनी बाबरी पाडल्याचा जाहीर राष्ट्रीय निषेध व्यक्त केला होता.”, नारुतात्या घुश्शात.

“घ्याsss ह्यांची गाडी अजूनही तिथेच अडकली आहे?”, घारुअण्णा उद्विग्नतेने.

“अहो पण मोदींचा उदोउदो तुम्ही लोकांनीच चालवला होता ना? मग आता निवडणूकीची धूरा त्यांच्या सक्षम हातात दिली तर त्यात एवढे राजीनामा देण्यासारखे काय आहे?”, भुजबळकाका शांतपणे.

“देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली आहे. हा अनाठायी उपदेशही बहुदा त्यांना झोंबला असावा. संघाकडून नथीतून मारला गेलेला हा तीर असावा असा त्यांचा समज झाला असावा.”, बारामतीकर ठामपणे.

“नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नसावी. 2014 निवडणूका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी हाच पर्याय उचित आहे. अडवाणीजींनी निदान आता तरी असे कृत्य करायला नको होते.”,चिंतोपंत खिन्नपणे.

“नाही चिंतोपंत, तोच तर कळीचा मुद्दा आहे ना! अडवाणींचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पंतप्रधान पदाचा असलेला सोस काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो, आचरटपणा आहे हा सगळा. त्यांनी पाठवलेले राजीनाम्याचे पत्र वाचलेत का? पक्षाची सद्य स्थिती आणि पक्षाची दिशा यांची बऱ्याच दिवसांपासून ते सांगड घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणे! तशी सांगड घालताना त्यांना साक्षात्कार झाली की भाजपा हा मुखर्जी आणि दीनदयाळ यांनी स्थापन केलेला आदर्श पक्ष राहिला नसून मतलबी लोकांची बजबजपुरी झाला आहे. बरें ही परिणती आताच व्हायचे कारण असावे? तर, मोदींची हवा बर्‍याच दिवसांपासून तयार होत होती. त्यामुळेच तर अडवाणींनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. पण आता नरेंद्र मोदींचे भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी झालेले शिक्कामोर्तब ह्यात त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदी बसण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होताना दिसला असणार. त्याच एकमेव आशेवर तर त्यांनी इतके दिवस तग धरला होता. आदर्श पक्ष वैगरे सगळ्या बाजारगप्पाआहेत, खरा पोटशूळ आणि कळीचा मुद्दा ‘पंतप्रधानपद’ आहे आणि ते आता हातातून जाताना दिसते आहे.”

“मोदी हा उत्तम पर्याय आहे! त्यामुळे विसरा हे राजीनामा नाट्य. काय पटते आहे का? तर चहा मागवा चटकन!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

राजेश सातमकर

शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर.

१९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही. त्यात पहिल्या आठवड्यात ज्याच्या बाजूला बसलो होतो तो समदु:खी असावा ह्या अपेक्षेने त्याला विचारले, “तुला कळते का रे?” तर तो एकदम फुशारकीने म्हणाला, “हं, त्यात काय? कळते आहे सगळे.” त्याच्याशी पुढे बोलणे झाल्यावर कळले की त्याची ‘मेरिट’ ३ मार्कांनी हुकली होती. च्यायला, माझी तर बोलतीच बंद झाली. मग, मराठी माध्यमातून शिकलो असल्याने आणि त्या वातावरणात बिचकून जायला होत असल्याने, समदु:खी मित्रांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यात पहिला मित्र भेटला धनुराम. वेव्हलेंग्थ जुळली. त्याची तोपर्यंत बर्‍याच जणांशी मैत्री झालेली होती.

भौतिकशास्त्राला एक प्रोफेसर नायर होते शिकवायला. मिलिटरी रिटायर्ड माणूस, सणसणीत आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा. प्रयोगशाळेत कसलेतरी संशोधन करत असलेला उपद्व्यापी माणूस. पहिल्या महिन्यातच माझी जर्नल तपासताना त्यांनी माझी भर प्रयोगशाळेत सर्वांसमोर लाज काढली, कारण काय? तर मी Specimen ह्याचे स्पेलिंग मी Speciman असे केले होते. मला त्यावेळी मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. सर्व इंग्लिश मिडीयमकर ‘कुठून येतात कोण जाणे’ असल्या नजरेनी बघत होते माझ्याकडे त्यावेळी, त्यामुळे भयंकर अपमानित व्ह्यायला झाले होते.

रिसेसमध्ये, कॅन्टिनमध्ये, धनुरामबरोबर बसून जवळजवळ रडतच बोलत बसलो होतो. तोच खांद्यावर हात आणि कानावर, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” हे शब्द एकाचवेळी पडले. कोण बाबा हे म्हणून मागे बघितले तर एक काळा सावळा, शिडशिडीत, किंचित कुरळे असलेल्या, बारीक कापलेल्या केसांचा तेल लावून चपटा भांग पाडलेला, मिसरूड फुटलेला, दाढीची लव तुरळक वाढलेला, चेहेर्‍यावर तारुण्यसुलभ तारुण्यपीटिका, उंचीने माझ्यापेक्षा एखादं इंच कमी असलेला मुलगा, स्वच्छ आणि निखळ हसत माझ्याकडे बघत होता. त्यावेळी हसताना त्याचे चमकणारे शुभ्र दात आजही मला लख्ख आठवतात. “राजेश, राजेश सातमकर”, असे म्हणत त्याने मला ‘शेक-हॅन्ड’ केला. त्या हाताच्या उबदार आणि घट्ट पकडीबरोबरच मैत्रीचे नातेही त्या पकडीसारखेच घट्ट होणार ह्याची खात्री त्याच्या निर्मळ आणि निखळ हास्याने त्यावेळी झाली.

तोही माझ्यासारखाच इंग्रजीला काहीसा वैतागला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही इंग्रजीला वैतागून जायचो, कोणी नवीन प्रोफेसर किंवा मॅडम येऊन इंग्रजी झाडून गेल्या आणि काही कळले नाही की कॅन्टिनमध्ये चहा पीत पीत राजेश त्याचे नेहमीचे पेटंटेड वाक्य ऐकवायचा, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” पण तो माझ्याइतका वैतागलेला नसायचा. त्याचे कारण मी त्याला एकदा न राहवून विचारले तेव्हा कळले की त्याची थोरली बहीण कुठल्याश्या नामांकित कॉलेजात शिकणारी आणि स्कॉलर होती. ती त्याचा अभ्यास घ्यायची. “च्यायला, नशीबवान आहेस रे तू”, असे मी त्याला म्हणायचो तेव्हा तो मुग्ध हसायचा.

त्यानंतर आमचे मैत्रीचे बंध जुळत गेले आणि राजेश सातमकर कळत गेला. पहिल्या आठवड्यात माझा बाजूला बसलेला सो कॉल्ड ‘स्कॉलर’ ज्याची मेरिट ३ मार्कांनी हुकली होती तो आणि राजेश गिरगावातल्या एकाच शाळेतले विद्यार्थी आणि वर्गबंधू आहेत हे समजल्यावर मी चाटच पडलो. कारण तो स्कॉलर राजेशशी जास्त बोलायचा नाही आणि मैत्रीचा ओलावा तर कधीच जाणवायचा नाही. मला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे. पण पुढे कळले की राजेशचे वडील त्यांच्या शाळेत शिपाई होते. राजेश त्यांच्या शाळेतला एक स्कॉलर होता. त्याचे जरा जास्त कौतुक व्हायचे शाळेत कारण कठिण परिस्थितीत राहूनही त्याची शैक्षणिक प्रगती देदीप्यमान होती आणि ते कौतुक त्या स्कॉलरला आवडायचे नाही.

हुषार असलेला राजेश स्वभावाने अगदी सरळ आणि सज्जन कॅटेगरीतला होता, नाकासमोर चालणारा. त्याच्या तोंडून कधीही अपशब्द यायचे नाहीत. खूप चिडला, हे ही क्वचितच व्हायचे, की मात्र “नालायक” एकढाच एक जहाल शब्द त्याच्या तोंडून पडायचा पण लगेच त्याच्या निखळ हास्याने त्या शब्दाची जहालता शीतल होऊन जायची. माझ्या तोंडाचे तर तेव्हा गटारच असायचे. भकारात्मक शब्दांनीच वाक्यं सुरू व्हायची आणि संपायचीही. त्यावेळी तो मला उपदेश न करता नुसते डोळे मोठे करून निषेध नोंदवायचा. त्याच्याबरोबर मी ‘इक्विलिब्रियम’वर एक फिजिक्सचा प्रोजेक्ट केला होता. त्यात एक बाहुली असते जिला असेही वाकवले आणि पाडले तरीही ती पुन्हा मूळ स्थितीत येते असा तो प्रोजेक्ट होता. चेष्टेने मी त्या बाहुलीला ‘जड बुडाची’ म्हणायचो. त्यावेळी मात्र माझ्या त्या शब्दावर तो मनमुराद हसला होता, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत.

त्या नंतर मला आमच्या पॉलीटेक्निकच्या शेजारी असलेल्या मिठीबाई कॉलेजचा शोध लागला. त्या कॉलेजात बर्‍याच बॉलीवूडच्या नट्या शिकून गेल्या आहेत ही बातमी कळल्यावर लेक्चर बंक करून दुपारी मिठीबाई कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये सौंदर्यस्थळे न्याहळीत बसणे आणि घरी जाताना भागुबाईवरून अंधेरी स्टेशनला न जाता मिठीबाई कॉलेजवरून चालत चालत विले पार्ले स्टेशनला जाणे हा भागुबाईमधील जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन बसला होता. मी लेक्चर बंक करून मिठीबाईला जातो ह्याचा त्याला विलक्षण अचंबा वाटायचा. त्याचा निषेध तो, “अरे, तू एका शिक्षकाचा मुलगा आहेस ना, तुला हे शोभत नाही” असे बोलून व्यक्त करायचा. मला त्यावेळी खरंतर त्याचा खूप राग यायचा पण त्याच्या हसण्याने तो मावळूनही जायचा. मिठीबाई कॉलेजवरून स्टेशनला जाताना हा पठठ्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं जायचा. मग मी त्याला खूप पिळायचो. “अरे, भोxxx, ही हिरवळ बघ ना बाजूची. सौंदर्याचा नजरेने तरी आनंद घे” असे म्हणायचो. खूप वैतागलो की मग मी माझा एक ठेवणीतला डायलॉग त्याच्यावर फेकायचो, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा? म्हणून म्हणतो, बघ जरा आजूबाजूला फुललेले हे ताटवे!” त्यावर तो फक्त मंद हसायचा आणि त्याचा हुकुमाचा एक्का बाहेर काढायचा, “हे तुझे थोर आणि साहित्यिक विचार जर तुझ्या वडिलांनी ऐकले तर त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार कधी केला आहेस का?” आता ह्यावर काय बोलणार? “मर भोxxx”, असे बोलून मी त्याला टपल्या मारायचो.

पहिल्या सेमिस्टरला सगळे जण चक्क पास झालो. त्यामुळे त्याच्या “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” ह्या पालुपदाची धार कमी झाली असली तरी सज्जनपणाच्या आचरणाची धार अणुकूचीदार होत होती. त्याचे मिठीबाई कॉलेजवरून जातानाचे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत जाणे अजूनही कायम होते. फक्त एक फरक पडला होता. तो बर्‍याच वेळा गैरहजर असायचा दुसर्‍या सेमिस्टर मध्ये, आजारी असायचा. त्यामुळे आणि दुसर्‍या सेमिस्टरला जरा मॅच्युरिटीही आल्यामुळे माझे मित्रांचे विश्वही जरा बदलले होते. कूपर हॉस्पिटलाकडच्या बाजूच्या एका टग्या मुलांचा अड्डा असलेल्या बस स्टॉपचा शोध लागला होता. तिथे वावर वाढला असल्याने राजेशचे गैरहजर असणे तसे जाणवायचे नाही. तसेही तो मला नेहमी मी त्या बस स्टॉपवर जाऊ नये म्हणून वेळोवेळी झापायचाही. पण मैत्रीचे वीण तशीच घट्ट होती.

दुसर्‍या सेमिस्टरच्या शेवटी किंवा तिसर्‍या सेमिस्टरच्या सुरुवातीला तो खूप दिवस आलाच नाही. चक्क चाचणी परीक्षेलाही आला नाही. हे मात्र अचंबित करणारे वर्तन होते. मग त्याच्या वर्गमित्र, सो कॉल्ड स्कॉलर, याला आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करून यायला सांगितले. आम्ही त्याची केलेली मनधरणी त्याने तशीही धुडकावून लावली होती कारण तो अंधेरीला राहायला आला होता. पण कोणत्यातरी प्रोफेसरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन यायला सांगितल्यामुळे त्याला जावे लागले. एका वीकएंडला तो गिरगावात जाऊन आला. सोमवारी आल्यावर,“राजेश खपला” असे तो आम्हाला म्हणाला. दोन मिनिटे मला तो नेमके काय म्हणतोय ते कळलेच नाही. मग नंतर कळले की राजेश सातमकर ह्या जगात नव्हता. माझी तर हे ऐकून दातखीळच बसली. सर्व जाणिवा एकदम बधीर होऊन सुन्न व्हायला झाले. त्याचा हसरा चेहेरा नजरेसमोर फेर धरून नाचू लागला आणि त्याला मजे मजेत म्हटलेले, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा?” हे राहून राहून आठवायला लागले.

राजेशला बोन कॅन्सर होता. एखाद्या साध्या सरळ माणसाबरोबर नियती कसा खेळ खेळेल हे सांगणे कठीण असते. मात्र  राजेशशी नियतीने खेळलेला हा खेळ मनाला चटका लावून गेला. त्याला एकदा, “काय रे, काय आजारी असतोस सारखा? कुठल्या डॉक्टरला दाखवलेस?” असे विचारले असताना त्याने टाटा हॉस्पिटलाचा केलेला उल्लेख आठवून त्याची लिंक त्यावेळी लागली. अतिशय जवळचा बनलेल्या आणि कायम हसत राहणार्‍या राजेशचे असे अचानक सोडून जाणे मनाला चटका लावून गेले होते. काही कारणामुळे त्याच्या घरी कधी जाता आले नाही. 1-2 मित्र त्याच्या घरी त्याच्या तेराव्याला जाऊन आले. मला का कोण जाणे, जायची प्रचंड इच्छा असूनही जावेसे वाटले नाही आणि गेलोही नाही. त्या गोष्टीची बोच अजूनही मनात कायम आहे.

आजही जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या की ती राजेश सातमकर आवर्जून आठवतो आणि मनात एक आवाज उमटतो, “राजेश, गेलास भोxxx, पण एकदा जरा मिठीबाईच्या रस्त्यावरून अलीकडून चालला असतास तर ‘समजा उद्या जर गचकलास’ ह्या माझ्या वाक्याची बोच मला आयुष्यभर बाळगावी लागली नसती”.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, “च्यामारी, काय आचरटपणा आहे हा”, असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते. त्यामुळे त्या लिखाणाला मान्यता मिळाली आणि बरेच जण पुढे होऊन धीटपणे त्या प्रकारचे लेखन करू लागले.

इथं पर्यंत ठीक होते. एक वाचक म्हणून वाचकाला प्रस्थापित साहित्याबरोबरच एक आगळा साहित्यप्रकार अनुभवायला मिळून त्याचे अनुभवविश्व समृद्ध होण्याचा एक मार्ग खुला झाला होता. पण पुढे त्याला लागू नये ते वळण लागले. ते मुख्यत्वे राजकीय छापाचे आहे. त्या नंतर तो गट प्रबळ होत गेला. खरेतर हे साहित्य समृद्धतेचे आणि प्रगतीचे लक्षण असायला हवे होते. पण वाचकांच्या दुर्दैवाने तसे न होता ‘एकाने गाय मारली तर दुसर्‍याने लगेच वासरू मारावे’अशा मार्गाने तो गट एका चळवळीचे रुपडे घेऊन पुढे आला. पुढे ते त्यांना विद्रोही असे म्हणवून घेऊ लागले.

पण मुळात विद्रोही म्हणजे काय? आणि विद्रोही साहित्य म्हणजे काय? ह्यावर त्या गटातच एकवाक्यता नाही असे मला वाटत होते कारण मलाही हे विद्रोही साहित्य म्हणजे शोषित समाजातील लेखकांनी लिहिलेले साहित्य असेच वाटायचे. म्हणजे त्याची व्याप्ती तेवढीच मर्यादित होते होती. त्यामुळे ह्या वर्षी एक सोडून दोन विद्रोही साहित्य संमेलन होणार म्हटल्यावर हसूच आले होते. अरे, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून परिवर्तन आणायचे आहे ना? मग निदान चूल तरी एक मांडा अशा मताचा मी होतो. त्यामुळे एक आचरटपणा ह्यापलीकडे त्याकडे लक्ष द्यावे असे मला कधीही वाटले नाही. कारण चिपळूणच्या संमेलनाच्या ‘परशू’ वरून झालेला गोंधळ आणि नंतर विद्रोही साहित्य संमेलनातील मान्यवरांनी तोडलेले तारे ह्यामुळे हा सगळा फार्स आहे असेच मला वाटते.

खरेतर कोणतेही साहित्य संमेलन का? हाच मूलभूत प्रश्न मला छळतो. ह्या संमेलनामुळे रसिकांचे आणि वाचकांचे काय भले होते हेच मला कळलेले नाही. पण त्यामुळे हे प्रस्थापित आणि विद्रोही ह्यांच्या मत-मतांतराच्या भुलभुलैयात न फसण्याचे मी माझ्यापुरते ठरवले होते.

पण आज एका मित्राने खालील चित्रफीत पाठवली आणि वैचारिक गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली. भालचंद्र नेमाड्यांना मिळालेल्या जन्मस्थान पुरस्काराच्या सोहळ्यात त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यात त्यांनी व्यवस्था म्हणजे काय आणि त्यात कसे परिवर्तन अपेक्षित आहे हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे.

ह्या भाषणात त्यांनी भारतातील सर्व वर्गातील स्त्रियांनी राम मंदिराला विरोध करायला हवा असे म्हटले आहे. ते तसे का? तेही त्यांनी त्या भाषणात मांडले आहे. ते ऐकल्यावर मला एकदम डॅन ब्राउनची दा-विंची-कोड ही कादंबरी आठवली. त्यात त्याने मांडलेली थियरी आठवली. त्याने मांडलेली ती थियरी प्रस्थापित चर्चच्या मतांशी द्रोह जरी असला तरीही तो त्याच्या मतांनी विद्रोही ठरतो कारण तो प्रस्थापित चर्चव्यवस्थेच्या वेगळे होऊन काही मांडू इच्छितो.

ह्या भाषणाने, विद्रोही आणि विद्रोही साहित्य म्हणजे नेमके काय असायला हवे, ह्याबद्दल माझ्या मनात एक नक्कीच वेगळी विचारधारा सुरू व्हायला मदत झाली आहे.

दारू – म्हणजे काय रे भाऊ ?

   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात…

कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  🙂 )

दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून.

व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते.

लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात.

भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते.

ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे.

ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.

आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते.

ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते.

तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो.

त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर

chawadee

“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“नाहीतर काय? औरंगजेबाचा जिझिया कर काय वेगळा होता ह्याच्याहून?”, घारुअण्णा चिंतोपंतांची बाजू उचलून धरत.

“अहो, पंत आणि अण्णा नेमके काय झाले ते तरी सांगाल का?”, इति नारुतात्या.

“अहो नारुतात्या, वर्तमानात राहतं चला की जरा!”, घारुअण्णा चिडून.

“अहो, सरकारने घर खरेदी करताना द्यावयाच्या मुद्रांक शुल्कासाठी ग्राह्य धरल्या जाणार्‍या रेडी रेकनर दरात ५ ते ३० टक्क्यांनी वाढ करून टाकली आहे ह्या नवीन वर्षात. नववर्षाची सप्रेम भेट!”, चिंतोपंत तणतणत.

“काय असते हे रेडी रेकनर?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“नारुतात्या, एखाद्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्यूटी ठरविण्यासाठी शासनाने ठरविलेला दर म्हणजे रेडी रेकनर.”, इति भुजबळकाका.

“अजून जरा इस्कटून सांगा ना, नेमके काय ते कळले नाही.”, नारुतात्या एकदम बावचळून.

“अहो, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा, त्या एरियातल्या प्लॉटच्या सर्वे नंबरप्रमाणे, तेथील सदनिकांचा दर शासन ठरवते, म्हणजे सरकारी दर. त्या दराप्रमाणे प्रॉपर्टीच्या स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते. हा दर बाजारभावापेक्षा वेगळा असू शकतो.”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे, जर समजा एखाद्याकडे खूप काळा पैसा आहे आणि त्याने तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवायचा ठरवला आणि स्टॅम्प ड्यूटी कमी करण्यासाठी सदनिकेचा दर अत्यल्प दाखवून रजिस्ट्रेशन करायचे ठरवले तर स्टॅम्प ड्यूटीची किंमत कमी होऊन सरकारचा महसूल बुडेल ना? तसे सुरुवातीला हे खूप मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे सरकार ते तसे होऊ नते म्हणून, त्यावर ‘शासन’ म्हणून, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा सरकारी दर ठरवते. त्याप्रमाणे त्या सरकारी दरानुसार स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते.”, भुजबळकाका.

“च्यायला असे आहे होय, किचकटच मामला आहे हा!”, नारुतात्या अचंबित होऊन.

“नारुतात्या, काही किचकट नाहीयेय, समजून घेतले की सगळे कळते. उगाच ह्याचा बाऊ आपण करतो आणि सरकार व बिल्डरांनाही तेच हवे असते.”, इति बारामतीकर.

“पण काय हो बारामतीकर, हे बिल्डर तर तुमच्याच साहेबांचे कच्चे बच्चे आणि फायनांन्सर ना?”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! ५ ते ३० टक्के झालेली ही वाढ ‘कार्पेट’ आणि ‘बिल्ट-अप’ एरिया ह्याच्यात असलेल्या, किंबहुना जाणून बुजून करून ठेवलेल्या घोळामुळे, प्रत्यक्षात ५० टक्के असेल असे ह्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“बांधकामाच्या वस्तूंचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, माझ्या मते तर ते जाणून बुजून भिडवले असावेत, त्याने घराच्या किमती आधीच वाढलेल्या, त्यात पुन्हा हा नवा बोजा, मध्यमवर्गाने घरं घ्यायची कशी? ”, चिंतोपंत.

“सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने तो महसूल ह्या मुद्रांकाच्या मार्गाने तिजोरीत भरण्याचा मार्ग शासनाने अवलंबला आहे.”, इति भुजबळकाका.

“तेच तर, माझा मुख्य मुद्दा आणि आक्षेप हाच आहे, तो म्हणजे, हा जो काही जादा महसूल गोळा होणार आहे त्याच्या विनियोगा मध्ये काही पारदर्शकता असणार आहे का? दरवेळी असा जनतेच्या खिशातून ओरबाडलेला हा पैसा, जनकल्याणासाठी वापरला जातो का?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“च्यायला ही तर मोगलाई झाली, म्हणजे आमच्या खिशातून लागेल तसा पैसा काढायचा आणि त्याला हव्या त्या मार्गाने आपल्याच खिशात किंवा घशात टाकायचा ही राजकारण्यांची ‘शासन’पद्धत अफलातूनच आहे!”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“अहो, ते मोगल परकीय तरी होते, ते मुळात बाहेरुन आलेच होते लुटालूट करायला. हे तर हरामखोर सगळे आपलेच भारतीय बांधव ना? ”, घारुअण्णा रागाने तांबडेलाल होत.

“त्यात पुन्हा बिल्डर लॉबी आहेच वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळायला, फ्लोअर इंडेक्स, सुपर बिल्ट अप, वॅट अन् काय काय.”, भुजबळकाका खिन्नतेने.

“अहो त्याच्या जोडीला मेंटेनन्स ही भली मोठी कटकट आहेच. माझ्या एका मुंबैच्या नातेवाइकाच्या मुलाने त्याचा मुंबईतला फ्लॅट विकून टाकला मेंटेनन्स परवडत नव्हता म्हणून. EMI च्या ¼ होत होता म्हणे त्याचा मेंटेनन्स. पुण्यातही हे फॅड बोकाळायला वेळ लागणार नाही.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो, मग सर्वसामान्य माणसाने घराचे स्वप्न बघायचेच नाही की काय?”, नारुतात्या हताश होत.

“ऑ! अहो, मग मी काय म्हणत होतो आल्या आल्या?”, चिंतोपंत डोक्यावर हात मारत.

“सोकाजीनाना, म्हणजे आता पुण्यातही एक ‘धारावी’ येऊ घातलीय तर!”, नारुतात्या सोकाजीनानांकडे बघत.

“ही राजकारणी आणि बिल्डरांची अभद्र युती अशीच राहिली तर तसे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“आधी, काळ्या पैशाचा ओघ थांबवण्यासाठी आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी सुरू केलेला हा ‘रेडी रेकनर’, पैसा छापण्याची टाकसाळ आहे हे लक्षात यायला राजकारण्यांना जराही वेळ लागला नाही. ज्या पद्धतीने सगळीकडे हे बिल्डिंगांचे पेव फुटले आहे त्यानुसार रोजची रजिस्ट्रेशनांची संख्या बघितली तरी त्यातून मिळणारा महसूल कोणाचेही डोळे फिरवेल. शिवाय रजिस्ट्रेशनच्या वेळी घेतली जाणार्‍या ‘फी’च्या काळ्या पैशाचा आकडा काढला तर सर्वसामान्य माणसाचे डोळेच पांढरे होतील. त्यातून कोणत्या आधारावर, सर्व्हेवर, ही दरवाढ केली गेली ह्याचाही काही पत्ता नाही. आंधळी-मुकी जनता तिला कसेही हाका! हाच मंत्र झाला आहे आजच्या राजकारणाचा. आणि वर्षाला जवळजवळ २० हजार कोटी इतका महसूल जो गोळा होतो त्याचे नेमके काय होते हे गुलदस्त्यातच राहते. त्यामुळे हालवले की पैसा देणार्‍या ह्या ‘मागच्या दारातल्या’ पैशाच्या झाडाला काही सरकार पानगळ येऊ देणार नाही. त्याला खतपाणी घालून हिरवेगार ठेवण्याचाच हा एक प्रकार आहे, झालं.”, सोकाजीनाना उद्विग्नपणे.

“सोडा हो, आता आपल्याला घरं घ्यायची नाहीत, ह्याच्यातच मनाचे समाधान मानून घ्या आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – बळीराजा आणि रामगिरी

chawadee

चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत.

“आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण्णा नाराजीने.

“अहो घारुअण्णा, पण त्यांनी तसे का केले हे तर समजून घ्यायचा प्रयत्न करा ना!”, बारामतीकर जरा सावध होत.

घारुअण्णा“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.

“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.

“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“का ब्वॉ?”, नारुतात्या.

“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.

भुजबळकाका“आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात व्यवस्थित आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी ह्यांना वेळ द्यावा एवढेच त्यांचे म्हणणे होते.”, भुजबळकाका.

“बरंsss मग पोलिसांशी बाचाबाची करण्याचे काय कारण मग?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, अहो मुख्यमंत्र्यांना म्हणे वेळच नव्हता!”, इति बारामतीकर.

“कुठल्या ‘आदर्श’ कामात गुंतले होते म्हणे आपले माननीय मुख्यमंत्री?”, नारुतात्या.

“पुढे कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे कुठले पितळ आता उघडे करायचे याची चर्चा करत असतील पक्षश्रेष्ठींबरोबर अजून काय!”, बारामतीकर नाराजीने.

“छॅsss ह्या आपल्या बारामतीकरांची दौड आपली इथपर्यंतच…”, घारुअण्णा उपरोधाने.

बारामतीकर
“घारुअण्णा शेतीच्या प्रश्नातले तुम्हाला काय कळते हो?”, बारामतीकर घाव सहन न होऊन.

“व्वा रे व्वा! कोंकणात वाडीत नारळी आणि पोफळीची झाडें आहेंत म्हटले आमची. झालंच तर चार फणस आहेंत.”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

नारुतात्या“अहो घारुअण्णा, त्याला झाडी म्हणतात शेती नव्हे! खी…खी..खी… ”, नारुतात्या पाचकळपणा करत.

“नारुतात्या अहो कसला बाष्कळपणा चालवलाय तुम्ही हा, आहो विषय काय तुमचे चाललेय काय?”, चिंतोपंत जरा तडकून.

“नाहीतर काय, अहो शेतकर्‍यांनी न्याय मार्गाने आपले म्हणणे आणि मागण्या मांडायचा प्रयत्न केला होता.”, भुजबळकाका शांतपणे.

“काय मागण्या होत्या त्यांच्या एवढ्या?”, चिंतोपंत.

“केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान्य उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध रास्त मागण्या होत्या शेतकर्‍यांच्या.”, बारामतीकर.

“त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ न दिल्यामुळे त्यांनी चिडून त्यांच्या निवासस्थानावर कूच करायचे ठरवले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी त्या बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली.”, भुजबळकाका.

“पण पोलिसांनी परिस्थिती धीराने हाताळल्यामुळे लाठीचार्ज टळला आणि भलतेच काही झाले नाही.”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“चला म्हणजे कोणीतरी शहाणपणा दाखवला म्हणायचा!”, नारुतात्या.

“अहो सोकाजीनाना ऐकताय ना, शेतकरी आणि पोलिसांची धक्काबुक्की झालीयेय”, चिंतोपंत.

“हो, ऐकले सगळे! कृषिप्रधान असलेल्या भारत देशात, त्या कृषिप्रधानतेचा पाया असलेल्या बळीराजावर ही वेळ यावी याचेच वैषम्य वाटते आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“हे बरीक खरें हों!”, घारुअण्णा.

सोकाजीनाना“अहो, ज्या जनतेचे नेतृत्व करत आहेत त्या जनतेला देण्यासाठी, जनतेचा सेवक असलेले, मुख्यमंत्री यांना वेळ नसावा, ह्या सारखे दुर्दैव दुसरे कोणते असावे? अडत्यांच्या जाळ्यात अडकलेल्या, अठरा ते वीस-वीस तास लोड शेडिंगच्या तडाख्यात अडकलेल्या, कितीही उत्पादन घेतले तरीही कर्जाच्या विळख्यातच अडकून पिचत असलेल्या आणि ह्या सर्वामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍याने जायचे कोणाकडे? त्याच्या मुख्यमंत्र्याकडेच ना? पण त्यांना त्यासाठीही वेळ असू नये? एकीकडे अतिप्रचंड फायद्यासाठी बिल्डरांच्या गळ्यात गळे घालून लागवडीखालची प्रचंड जमीन लाटायची, त्यासाठी बिल्डरधार्जिणे नियम बनवायचे, ह्यासाठी वेळच वेळच असणार्‍यांना, उरलेल्या जमीनत सचोटीने लागवड करून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या अन्नधान्याची सोय लावणार्‍यासाठी मात्र वेळ नसावा ह्याची खरंच शरम वाटायला हवी.”, सोकाजीनाना गंभीर चेहेर्‍याने.

“असो, झाली घटना काही चांगली झाली नाही! तरीही शेवटी त्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर 30 मिनिटे का होईना पण चर्चेसाठी दिली, जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून, हेही नसे थोडके! जाऊद्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

सुगंधी दिवाळी – गाथा परफ्यूमची

(मिसळपाव दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)

चित्र: आंतरजालाहून साभार

माझ्या लहानपणी मला दिवाळीला, फटाक्यांच्या आकर्षणाबरोबर अत्तराची बाटली हे एक फार मोठे आकर्षण होते. दरवर्षी दिवाळीला वडील एक अत्तराची बाटली आणायचे, बाटली काय म्हणतोय, कुपीच असायची ती एक लहानशी. अभ्यंगस्नान केल्यावर थोडे अत्तर कपड्यावर चोपडून मिळायचे. नंतर त्याच अत्तराचा फाया कानात घालायला मिळायचा. मग नुसता घमघमाट व्ह्यायचा आणि एकदम राजेशाही वाटायचे. त्या काळातला तो चंगळवादच होता. त्यानंतर पुन्हा वर्षभर काही अत्तर स्वतःच्या अंगावर मिरवायला मिळायचे नाही. हा, पण कधीतरी आईबरोबर हळदी कुंकवाला गेले की तळहाताच्या उलट्या बाजूला थोडेसे अत्तर चोपडले जायचे पण त्यात दिवाळीच्या अत्तराची मजा नसायची. कधीतरी गावातल्या अतिश्रीमंतांच्या लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही थोडीफार सुगंधी झुळूक द्यायचा. ह्यापलीकडे कधी अत्तराचा संबंध लहानपणी आला नव्हता.

मोठे झाल्यावर, कॉलेजात जायला लागल्यावर, कॉलेजातल्या श्रीमंत मित्रांकडून डिओ आणि परफ्यूम हे अत्तराचे श्रीमंत अवतार आहेत कळले. ते काही वापरायची ऐपत नव्हती. ते तसले काही घेऊयात का? असे आमच्या पूज्य वडिलांना नुसते म्हटले जरी असते तर दरवर्षी दिवाळीला मिळणारा हक्काचा अत्तराचा फायाही मिळायचा बंद झाला असता. त्यामुळे कॉलेजात असताना डिओ आणि परफ्यूम हे ऐकण्यापलीकडे काही मजल गेली नाही.

चित्र: आंतरजालाहून साभार

पुढे नोकरी लागल्या एक चार्ली नावाची एक सेंटची बाटली घेतली होती. त्या विषयातले ज्ञानही तेव्हा एवढे अगाध होते की डिओ म्हणजे काय, परफ्यूम, सेंट म्हणजे काय ह्यातली काहीही अक्कल नव्हती. काहीतरी छान वास येतो येवढीच काय ती अक्कल. एकदा ऑफिसमधल्या एका मित्राच्या घरी, अंधेरीला, आम्ही काही मित्र पार्टीसाठी मुक्कामी राहिलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या घरूनच ऑफिसला जाणार होतो. सकाळी अंघोळ झाल्यावर त्याच्या ड्रेसिंग टेबलावरच्या कपाटात बघितले तर बर्‍याच रंगेबीरंगी बाटल्या दिसल्या. त्यात एक डिओ असे लिहिलेली बाटली होती. मनात म्हटले “च्यायला चला, मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन” आणि फवारले त्यातले द्रव्य शर्टावर सगळीकडे. तसे करताना त्या मित्राने पाहिले आणि दात काढत म्हणाला,“साल्या, घाटीच आहेस. अरे, डिओ आहे तो परफ्यूम नाही.” मीही दात काढले आणि बळंच हॅ. हॅ.. हॅ… केले. पण तो घाव जिव्हारी लागला होता. मित्राने माप काढले म्हणून नव्हे तर, साला, जे कळत नाही ते करायची हौस दांडगी, ह्या स्वतःच्या वृत्तीमुळे. पण काळाच्या ओघात पुढे ती घटना विसरूनही गेलो.

मुंबईतल्या एका कंपनीत काम करीत असताना एकदा, पहिल्यांदा अमेरिकेत कामानिमित्त जायचा योग आला. तेव्हा त्या कंपनीत आम्हाला एका आठवड्याचे ट्रेनिंग दिले होते अमेरिकेत कसे वागायचे, एक कंसल्टंट म्हणून, ह्याबद्दल. तिथल्या रीतीभाती, खाण्यापिण्यातले आणि दैनंदिन जीवनातले शिष्टाचार ह्यावर सगळा भर होता. त्यावेळी कळले की अमेरिकेत, तिथल्या लोकांची भारतीयांबद्दलची एक तक्रार म्हणजे, ‘इंडियन पीपल स्मेल’. त्यामुळे आम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी जो ‘किट अलावंस’ (प्रवास तयारी भत्ता) दिला होता त्यात कोणती वेगवेगळी डिओ आणि परफ्यूम्स घ्यावी याची यादी दिलेली होती. त्यावेळी मात्र भत्ता कंपनीने दिलेला असल्याने महागडी डिओ आणि परफ्यूम्स घ्यायची इच्छा पूर्ण झाली, इथेही मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन हा मंत्र होताच साथीला. पण अमेरिकेत गेल्यावर ते तसे ट्रेनिंग का दिले गेले होते त्याची परिणती आली.

दुसर्‍यांदा अमेरिकेत गेलो ते एका नवीन कंपनीतून. तोपर्यंत बॉडी शॉपिंगचा धंदा पार फोफावला होता. त्यामुळे पहिल्या कंपनीसारखे काही एटिकेट्स ट्रेनिंग वैगरे देण्याच्या फंदात ही नवीन कंपनी पडत नव्हती. (पण माझा खरा रस होता प्रवास तयारी भत्त्यात, मात्र तो काही ह्यावेळी नव्हता) ह्यावेळी माझ्याबरोबर २-३ दक्षिण भारतीय होते, ज्यांचे आयुष्य ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ह्या उक्तीवर उभे होते. त्यांचा आणि डिओ, परफ्यूम्स वगैरेंचा दूरान्वयेही काही संबंध नव्हता. अमेरिकेत गेल्यावर तिथल्या त्या क्लायंटच्या ऑफिसमधल्या मुली कायम काहीही काम (ऑफिसचेच, बरं का) असले की फक्त माझ्याकडेच यायच्या. नाही हो, मी काही मदनाचा पुतळा वैगरे नाहीयेय, त्यामुळे माझा कसलाही गैरसमज झाला नव्हता. पण त्या दक्षिण भारतीय मित्रांना फार जळजळ व्ह्यायची. मग त्यांना ‘इंडियन पीपल स्मेल’चा फंडा समजावून सांगितला तेव्हा कुठे त्यांच्या जिवात जीव आला. त्यानंतर मग त्यांनीही कुठल्यातरी स्वस्तातल्या ब्रॅन्डचे डिओ घेतलेच एकदाचे पण तरीही त्या ऑफिसमधल्या मुली काही माझ्याकडे यायच्या थांबल्या नाहीत. ‘एकदा कानफाट्या नाव पडले की पडले’ही म्हण इंग्रजीत कशी समजावून सांगायची हे काही केल्या मला जमले नाही; म्हणून मग मीही त्या दाक्षिणात्यांना काही समजावून द्यायच्या भानगडीत पडलो नाही. नाही तरी मलाही आतून खूप खूप बरे वाटायचे हो, त्या मुली माझ्याकडे यायच्या तेव्हा, खोटं कशाला बोला.

चला आता ह्या नांदीनंतर आपल्या परफ्यूमच्या गाथेकडे वळूयात.

परफ्यूमचा इतिहास
प्राचीन काळी, त्यावेळच्या पूजाअर्चनेच्यावेळी, काही खास वनस्पती किंवा काही खास झाडांच्या खोडाच्या साली जाळून सुवासिक धूर केला जायचा. रोमन संस्कृतीत (ख्रिस्तपूर्व) पॅगन लोकं देवाची पूजाअर्चना करताना हा सुवासिक धूर वापरीत. त्यांच्या मते देवाकडे जाण्याचा मार्ग ह्या ‘धूरा पासून’ सुरू होतो. लॅटिन भाषेत ‘per fumum’ म्हणजे ‘धूरा पासून’ किंवा इंग्रजीत ‘from smoke’. त्याचेच पुढे काळाच्या ओघातले आधुनिक रूप म्हणजे ह्या सुगंधाला आजचे पडलेले नाव, परफ्यूम. त्यामुळे आजच्या काळात वापरला जाणारा ‘परफ्यूम’ हा शब्द आलेला आहे, लॅटिन भाषेतून, ‘धूरा पासून’.

चित्र: आंतरजालाहून साभार

परफ्यूमच्या सुवासिक इतिहासात डोकावले असता, परफ्यूमचा वापर हा इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीपासून असल्याचे ह्या विषयातील संशोधक आणि जाणकारांचे मत आहे. ह्या ऐतिहासिक खोलात जर जायचा प्रयत्न केला तर तो इतिहास आपल्याला पार इजिप्त पर्यंत घेऊन जातो. मध्यपूर्वेत इजिप्तजवळ उत्खननात इसवीसनाच्या ४००० वर्षांपूर्वीच्या काही कबरींचा शोध लागला आणि त्या कबरींमध्ये काही कुप्या मिळाल्या. त्या कुप्या ह्या सुगंधी द्रव्यांच्या असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून इजिप्तमध्ये त्या काळाच्या संस्कृतीत सुगंधी द्रव्यांचा फार वापर केला जात होता ह्याचा शोध लागला. पण त्या कबरींमध्ये ह्या कुपी काय करीत होत्या? तर त्या रहस्याची पुराणवस्तुशास्त्रज्ञांनी केलेली उकल अशी की मृतात्म्याचा स्वर्गात जातानाचा प्रवास हा सुवासिक असावा अशी त्या काळी धारणा होती. आहे की नाही हा परफ्यूमच्या इतिहास त्याच्या नावाप्रमाणेच एकदम आल्हाददायक.

परफ्यूम कसे तयार होते?

चित्र: आंतरजालाहून साभार

परफ्यूम कसे बनवतात हे कळले आणि मी आनंदाने बेहोषच झालो. कारण ते बनविण्याची पद्धत ही माझ्या अतिशय आवडीची आहे, अगदी ‘गाळीव’. परफ्यूम तयार करण्याच्या पद्धतीत डिस्टिलेशन (Distillation) ही प्रक्रिया वापरली जाते. जेव्हा ही डिस्टिलेशन पद्धत वापरली जाते हे कळले तेव्हाच ह्या परफ्यूमची गाथा लिहायची हे मनाशी नक्की केले. परफ्यूम तयार करण्यातली पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणे. परफ्यूम बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती (Herbs) आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव (उदा. कस्तुरी मृग) हा गोळा करून त्याचा साठा केला जातो. हा कच्चा माल मिळवला की मग त्यांपासून सुवास वेगळा करणे ही महत्वाची पायरी असते. हा सुवास वेगळा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या प्रकारानुसार ह्यातली एक पद्धत सुवास वेगळा करण्यासाठी वापरली जाते.

उर्ध्वपातनाने अर्क काढणे (डिस्टिलेशन): ह्यात कच्चा माल एका भट्टीत (Still) मध्ये टाकून त्याला उकळवले जाते, हे उकळवण्यासाठी गरम वाफही वापरली जाते. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे (तेल) बाष्प तयार होते. हे बाष्प मग एका नळीवाटे जाऊ देऊन त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रव पदार्थात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल (Concentrated Oil)

द्रावकात विरघळविणे: पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठ्या फिरत्या भांड्यात कच्चा माल टाकून तो घुसळवला जातो आणि तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळतो आणि एक मेणचट पदार्थ मागे उरतो. त्याला मग इथिल अल्कोहोलमध्ये मिसळवले जाते. मग त्या मिश्रणाला गरम केले जाते. त्या उष्णतेने त्यातले अल्कोहोल उडून जाते आणि मग मागे उरते सुगंधी तेल (Concentrated Oil).

दाब देणे: ह्या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढले जाते.

आता इथून पुढे, शास्त्र आणि कला यांचा खरी जुगलबंदी चालू होते. ही वेगवेगळी सुगंधी तेलं ठराविक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, त्यांचा मिलाफ (Blend) केला जातो. हा मिलाफ करणारा किमयागारच (रासायनिक) असावा लागतो. फारच नैपुण्याचे काम असते हे. म्हणून हा मिलाफ करण्याच्या ह्या शास्त्राला, कलेचीही जोड असावी लागते असे म्हटले जाते. आता ह्यात कसली कला आलेय? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. सांगतो! आपण जे फिनिश्ड गुड म्हणजे तयार माल असलेले परफ्यूम वापरतो त्याचे, 3 थर असतात. त्या प्रत्येक थराला नोट (Note) असे म्हणतात.

टॉप नोट: परफ्यूम फवारल्या फवारल्या जो गंध दरवळतो तो टॉप नोट असतो.
सेंट्रल किंवा हार्ट नोट: परफ्यूम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो तो हार्ट नोट असतो.
बेस नोट: परफ्यूम फवारल्यानंतर कित्येक तास दरवळणारा जो गंध असतो तो बेस नोट असतो.

मग आता सांगा, हे सगळे त्या ब्लेंड केलेल्या परफ्यूम जमवून आणायचे म्हणजे कलाकारीच आहे की नाही?

त्यानंतरची पायरी म्हणजे मुरवणे (Aging). ह्या ब्लेन्ड करून मुरवलेल्या सुगंधी तेलांना मग मुरवले जाते. त्याचा कालावधी काही महिने ते काही वर्षे इतका असू शकतो. ह्या ब्लेन्ड केलेल्या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिक्स केले जाऊन त्याची घनता कमी केली जाते. ह्या अल्कोहोल मिश्रीत परफ्यूममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात.

परफ्यूमचा प्रकार सुगंधी तेलाचे प्रमाण टिकण्याचा कालावधी
Perfume ५ ते ३० % ६ ते ७ तास
Eau de Perfume or EDP ८ ते १५ % ५ ते ७ तास
Eau de Toilette or EDT ४ ते ८ % ४ ते ६ तास
Eau de Cologne ३ ते ५ % २ ते ३ तास

परफ्यूमच्या सुगंधाचे प्रकार कोणते?

ह्या परफ्यूमचे सध्याच्या आधुनिक काळात वर्गीकरण साधारण पाच ढोबळ प्रकारात केले जाते.

फ्लोरल नोट्स: गुलाब, जाई, चमेली, कार्नेशन इत्यादी विविध फुलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
ओरिएंटल नोट्स: प्राण्यांच्या सुवासिक अवयवांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांना फळांच्या आणि फुलांच्या सुगंधी तेलांबरोबर ब्लेंड करून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
वुड नोट्स: चंदन, देवनार यांसारख्या झाडांच्या खोडापासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
फ्रेश नोट्स: सायट्रस (लिंबू, संत्री, मोसंबी) चवीच्या फळं आणि फुले यांपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.
Fougère नोट्स: फ्रेंच भाषेत Fern (नेचे सदृश वनस्पती) ला Fougère म्हणतात. ह्या नेचे सदृश वनस्पतींपासून मिळवलेल्या सुगंधी तेलांपासून बनवली जाणारी परफ्यूम्स ह्या प्रकारात मोडतात.

हे ढोबळ आणि मूलभूत वर्गीकरण झाले, ह्यांच्या उपप्रकारांत असंख्य प्रकारचे फ्लेवर्स असलेली परफ्यूम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचे प्रकार दर्शवण्यासाठी खालील फ्रेग्नन्स चक्र वापरले जाते.

फ्रेग्नन्स चक्राचे चित्र विकीपीडियावरून साभार

परफ्यूम आणि डिओडरंट मध्ये फरक काय?
डिओडरंट्सचा (Deodorant) वापर घर्मस्त्राव (Perspiration) रोखण्यासाठी केला जातो. घामामध्ये असलेल्या जिवाणूंमुळे घामाला एक दुर्गंध येत असतो. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दुर्गंधापासून मुक्ती मिळवून देण्याचे कार्य हे डिओडरंट्स करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर हे डिओडरंट्स फवारायचे असतात. बरेच डिओडरंट्स हे सुगंधरहित सुद्धा असतात. त्यांचे काम एकच घर्मस्त्राव रोखणे.
परफ्यूम्समध्ये घर्मस्त्राव रोखण्याचे काही असले काही गुणधर्म नसतात. त्यात फक्त सुगंधच (Fragrance) असतो. त्याचे कार्य फक्त आणि फक्त एकच, सुगंध देऊन शरीराला सुवास देणे.

परफ्यूम कसे वापराल?
परफ्यूम फवारल्यावर त्यातले सुगंधी कण हळूहळू उडून जातात. ते उडून जाताना त्यांच्या नोट्स प्रमाणे गंध दरवळत राहतो. जास्त काळ ह्या परफ्यूमचा गंध दरवळत ठेवायचा असेल तर ते परफ्यूम कसे वापरायचा ह्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. सर्वात आधी तुमच्या आवडीचा परफ्यूम निवडून घ्या. बरेच परफ्यूम्स वापरल्यानंतर तुम्हाला नेमका शोभणारा (सूट होणारा) परफ्यूम ठरवता येईल. आता परफ्यूम निवडून झाला असेल तर मग तो लावण्यापूर्वी छानपैकी अंघोळ करून घ्या. तुमच्या परफ्यूमच्या सुगंधाच्या जवळ जाणारा सुगंध असलेल्या साबणाने अंघोळ केल्यास उत्तम. उदाहरणार्थ जर तुम्हाला फ्रेश नोट्सचे परफ्यूम्स आवडत असतील तर सिंथॉल लाईम वापरल्यास त्याच्या शरीरावर रेंगाळणार्‍या गंधाबरोबर त्याची जोडी त्या परफ्यूमबरोबर जमून जाईल अगदी.

आता हा परफ्यूम चोपडण्याच्या काही विशेष जागा आहेत तेथे तो लावल्यास त्याचा परिणाम फार काळ टिकून राहतो. आपल्या शरीरावर जिथे नाडीचे ठोके पडतात त्या जागा हा परफ्यूम फवारण्यास अती उत्तम म्हणजे हाताचे मनगट, हाताच्या कोपराची आतली बाजू, छाती (स्त्रियांसाठी ही जागा अतिशय उत्तम! ह्यात कसलीही अश्लीलता नाहीयेय. कसलेही भलते विचार मनात आणू नका). शिवाय मान आणि कानाच्या पाळीच्या मागची बाजू ह्या जागा तर खास महत्त्वाच्या. का ते विचारा? जेव्हा जोडीदाराला आपण कवेत घेतो तेव्हा नाकाच्या सर्वात जवळ असणारे शरीराचे भाग हेच असतात. त्यामुळे तिथून येणार्‍या सुगंधाने जोडीदाराला कवेत घेण्याच्या उन्मादाला आणखीनंच बहर येतो. साधारण जिथे जिथे हे परफ्यूम फवारले आहे ती जागा अंगावरच्या कपड्यांनी झाकली जाईल अशी काळजी घेतल्यास त्या परफ्यूमचा परिणाम जास्त काळ राहू शकतो. परफ्यूममधले उडून जाणारे सुगंधी कण कपड्यामुळे हवेत विरून जायला वेळ लागतो आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो.

चला तर मग, ह्या वर्षीची दीपावली तुमच्यासाठी अतिशय सुगंधी आणि सुवासिक अशी असो, ही शुभेच्छा व्यक्त करत ही परफ्यूमची गाथा इथे सुफळ संपूर्ण करतो.

गजरा – एक प्रवास

(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)

लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर ‘गजरा’ नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे. पण प्रत्यक्ष बघितल्यावर बहुतकरून तो पांढर्‍या रंगाचा असतो हे बघून थोडा हिरमोडच झाला होता.

त्यानंतर गजर्‍याशी तसा काही प्रत्यक्ष संबंध कधी आलाच नाही. पण पुढे मिलिंद बोकिलांच्या शाळा ह्या कादंबरीचा नायक, मुकुंद जोशी, ह्याच्या वयाचे झाल्यावर, मुकुंदाप्रमाणेच, त्या पौगंडावस्थेतील वयात मित्रांबरोबर आपापली शिरोडकर शोधताना ह्या गजर्‍याशी अप्रत्यक्ष संबंध आला. त्या वयात वाचायला मिळू शकणार्यार आणि त्या वयात झेपू शकणाऱ्या कादंबर्‍यांमधून (आमच्या गावातील सार्वजनिक वाचनालयातील लायब्ररीयन, आचार्यकाकू, यांचा बारीक डोळा असायचा आम्ही कुठली पुस्तके वाचतो ह्यावर. एकदा काकोडकर चोरून वाचताना त्यांनी मला पकडले आणि अशी काही हजामत सर्वांदेखत केली की तोंड दाखवायला जागा नव्हती उरली काही दिवस. तेवढे कमी नव्हते म्हणून की काय कोण जाणे, वडिलांनाही “मुलगा मोठा झाला बरं का!” असं सांगितलं, त्यामुळे घरी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लाय तो अजूनही लक्षात आहे) नायिकांची जी काही शृंगारिक वर्णने वाचली होती त्यात नेहमी मोहक हालचाल करणारे घाटदार नितंब, त्यावर घोळणारा लांबसडक केसांचा, एका वेणीचा शेपटा आणि त्यावर माळलेला गजरा हा हटकून असायचाच. त्यामुळे त्या मोहमयी दिवसांमध्ये मग नेहमी एक वेणी आणि त्यावर गजरा माळणारी आपली शिरोडकर शोधताना खूप मजा यायची. एक वेणी आणि गजरा हे सौंदर्याचे परिमाण ठरून गेले होते. पण त्या पौगंडावस्थेतील वयाच्या नशिबात शिरोडकर काही विधात्याने लिहून ठेवलेली नव्हती, त्यामुळे गजर्‍याचा आणि माझा संबंध काही पुढे सरकला नाही.

कॉलेजात गेल्यावर, नुकतीच फुटलेली मिसरूड साफ करून जरा आधुनिक विचारांचे आणि प्रगल्भ झालो असे वाटू लागल्याने गजरा घालणे म्हणजे अगदीच डाऊनमार्केट, ‘काकूबाई’छाप मुली गजरा घालतात असा समज मनात घट्ट रुतून बसला होता. त्यामुळे गजर्‍यापासून अजूनही दुरावला गेलो. पण आता कॉलेजातल्या लायब्ररीमध्ये आचार्यकाकू लायब्ररीयन नव्हत्या त्यामुळे तिथल्या लायब्ररीत आणि आता शाळकरी नसल्याने आचार्यकाकूंचा तेवढा वचकही राहिला नसल्याने, गावातल्या लायब्ररीत, काकोडकरांच्या जरा ‘वरच्या’ लेव्हलची पुस्तके वाचायला मिळू लागली. त्यावेळी अचानक गजर्‍याचा अजून एक महत्त्वाचा पैलू पुढे आला. ह्यावेळी तो स्त्रीचे नितंब आणि त्यावरची वेणी ह्यावर विराजमान न होता चक्क पुरुषाच्या मनगटावर लगडलेला होता. माडी चढण्यासाठी तोंड रंगवणार्‍या तांबूल सेवनाबरोबरच ह्या श्वेतवर्णी गजर्‍याचे असणे, हे किती अनिवार्य आहे ह्याची जाण आली. पण पुढे त्या भलत्याच आळीचा रस्ता सभ्य माणसे धरत नाहीत असे कळले. समाजामध्ये अभिमानाने म्हणजे ताठ मानेने जगण्याकरता आणि मिरवण्याकरता स्वतःला सभ्य म्हणवून घेणे किंवा तसे चित्र निर्माण करणे ही फारच अत्यावश्यक बाब आहे हे सत्यही तितक्याच प्रकर्षाने कळले असल्याने त्या भलत्याच आळीचा रस्ता पकडणेही कधी जमले नाही. हाय रे कर्मा, त्या तसल्या प्रकारेही माझा गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध येणे घडले नाही.

शाळेतही शिरोडकर काही भेटली नाही आणि कॉलेजातही. त्यासाठी नशिबाची साथ फार जोराची असावी लागते असे म्हणतात. पण मला खरं विचाराल तर नशीब वगैरे काही नसते, त्यासाठी एक धमक अंगात असावी लागते. तसली धमक काही माझ्या अंगात नव्हती. त्यामुळे मग नशीब वगैरे असले काहीबाही कारण शोधावे लागते, आपली दुर्बलता झाकण्यासाठी, दुसरे काही नाही. त्यामुळे मग लग्न करतेवेळी, मुलगी बघून, सर्वांच्या संमतीने यथासांग ‘अरेंज्ड मॅरेज’ अशा प्रकाराने झाले. लग्नानंतर माझ्या काही खास आणि हौशी मित्रांनी मधुचंद्रासाठी माझी बेडरूम सजवण्याचे काम अतिशय प्रेमाने अंगावर घेऊन ते तडीला नेले. संपूर्ण खोली रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजवली होती. बेडवरही फुले पसरून ठेवली होती. बेडच्या बाजूच्या टेबलावर गजरे ठेवलेले होते. ते गजरे बघताक्षणीच गजर्‍याबद्दलच्या आतापर्यंतच्या सर्व आठवणी जाग्या होऊन शेवटी गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध आला बुवा एकदाचा ह्या जाणीवेने एकदम सुखावून गेलो. मधुचंद्राची रात्र, जिवाभावाच्या मित्रांनी प्रेमाने सजवलेली बेडरूम, गजरे आणि सोबत सुंदर अशी नवी नवरी, अहाहा, स्वर्ग असाच असावा कदाचित असा विचार मनात आला. आनंदाने आणि काहीश्या धडधडत्या छातीने बेडवर पडलो आणि गजरा हातात घेऊन तो तिच्या केसात माळण्यापूर्वी तिला माझी गजरा कहाणी सांगत होतो. बेडवर पडल्यानंतर साधारण ३-४ मिनिटाने एक विचित्र जाणीव होऊन सर्व अंगाला खाज येऊ लागली, काही कळेचना असे काय होतेय ते. मग उठून बघितल्यावर कळले की एक गडबड झाली होती. बेडरूमची खिडकी उघडी राहिली होती. मित्र रूम सजविण्याच्या नादात खिडकी बंद करायला विसरले होते. त्या खिडकीतून त्या फुलांच्या वासाने बरीच वेगवेगळ्या प्रकारची बारीक, नजरेला सहज न दिसणारी, चिलटं त्या बेडवर पसरलेल्या फुलांवर आणि बेडवरच्या फुलांच्या माळांवर येऊन बसली होती. मग ती सर्व बेडवरची फुले आणि बेडला लावलेल्या सर्व फुलांच्या माळा काढल्या आणि बेडवरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवून बेडरूमच्या कोपर्‍यात ती बेडशीट टाकून दिली. त्या सर्व प्रकारानंतर त्या गजऱ्यांचाही धसका घेऊन ते गजरेही मग त्याच बेडशीटवर टाकून दिले. ऐन मधुचंद्राच्या उन्मादक रात्रीही गजर्‍याचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध येता येता राहिला. त्यानंतर काही परत माझा आणि गजर्‍याचा संबंध आला नाही.

आता अलीकडेच कामानिमित्त म्हणजे नवीन नोकरीकरता चेन्नैत मद्रासी अण्णा होऊन राहावे लागतेय. आमच्या कंपनीची दोन ऑफिसेस चेन्नै शहराच्या उत्तर – दक्षिण टोकाला आहेत. एक थेट शहराच्या मध्यवर्ती भागात, हेड ऑफिस आणि दुसरे तिथून १५-२० किमी अंतरावर शहराच्या बाहेर दुसर्‍या टोकाला. मला ह्या दोन्ही ऑफिसेसमध्ये ये-जा करावी लागते. चेन्नैत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदी छान आहे. शहराचे सर्व भाग बस मार्गाने व्यवस्थित जोडलेले आहेत. त्या बस सेवाही मस्त आहेत. सुपर डिलक्स, डिलक्स आणि आम बस असे तीन प्रकारच्या बसेस शहरात धावतात. आम बस ही व्हाईट बस असते म्हणजे पांढर्‍या रंगाची पाटी असलेली असते आणि ती सर्व स्थानकांवर थांबते आणि हिचे तिकीट भाडे अतिशय कमी म्हणजे स्वस्त असते. ह्या प्रकाराव्यतिरिक्त ए.सी. बसेसही असतात. चेन्नैतल्या भयंकर उकाड्यात ह्या ए.सी. बसेस म्हणजे अगदी स्वर्ग असतात. माझ्या ऑफिसच्या मार्गांवर ह्या ए.सी. बसेस धावत असल्याने मी नेहमी ह्याच बसने प्रवास करतो. सर्व प्रकारच्या बसमध्ये त्यांच्या भाड्याप्रमाणे गर्दी आणि प्रवास करणारी जनता असते.

हो हो कळतंय, अचानक मी एकदम असल्या रूक्ष विषयात कसा काय घुसलो असे वाटायला लागले ना तुम्हाला? नाही हो! विषयांतर नाही करत आहे. कळेलच तुम्हाला, ट्रस्ट मी.

तर एकदा सिंगापुरावरून काही सीनियर मंडळी भारतात एका मीटिंगकरिता आली होती. मला त्या मीटिंगला हजर राहायचे होते. त्यासाठी मी बस स्टॉपवर उभा होतो बसची वाट बघत. त्या दिवशी नेमका काही तरी घोटाळा झाला होता. ए.सी. बस काही केल्या वेळेत येत नव्हत्या. मीटिंगला वेळेवर पोहोचणे गरजेचे होते. पहिल्यांदाच वरिष्ठांची ओळख वाढवायची संधी प्राप्त झाली होती. त्यामुळे जास्त वाट बघत वेळ घालविणे परवडणार नाही, काय करावे, टॅक्सीने जावे का असा विचार करत होतो. तेवढ्यात 29C ही एक व्हाईट बस स्टॉपवर आली. रिकामी होती म्हणजे बसायला जागा नव्हती पण उभे राहायला व्यवस्थित जागा होती. लगेचच चढलो बस मध्ये….

पुढच्याच स्टॉपवर बस मध्ये हीsss गर्दी झाली. पहिल्यांदाच व्हाईट बसमध्ये चढलो होतो. त्यामुळे ती बस सर्व स्टॉपवर थांबत थांबत ही गर्दी अशी वाढतच जाणार हे काही लक्षात आले नाही आणि पुढे सरकत सरकत (की ढकलला जात जात?) बसच्या मधल्या भागात आलो. आता बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती तरीही बस स्टॉपवर थांबत होती आणि लोकं बसमध्ये शिरतच होती. माझी अवस्था काही विचारू नका. मुंबैच्या लोकलमध्ये जशी अवस्था होते नेमकी तशीच अवस्था बसमध्ये झाली होती माझी. उभं राहायला देखील धड जागा नव्हती. जर लिओ टॉलस्टॉयने ह्या बसने प्रवास केला असता तर त्याने त्याची ‘माणसाला किती जागा लागते’ ही कथा लिहिली नसती असाही एक विचार त्यावेळी मनात येऊन गेला. आजूबाजूला ‘एक्स डिओडरंट’ची किंबहुना कुठल्याच डिओडरंटची जाहिरात नेमकी कशाची असते हे अजूनही न कळलेले समग्र चेन्नैकर दर स्टॉपगणिक माझ्या जीवाची घालमेल वाढवीत होते. घामाच्या त्या आंबट वासाने जीव गुदमरून जात होता. त्यातच एक काका उतरायचे म्हणून सीटवरून उठले आणि नेमके माझ्या पुढेच, नाकासमोरच, वरच्या दांड्याला हात पकडून उभे राहिले आणि मला ब्रह्मांड आठवले. नाकातले केस पार जळून गेले, जगण्याची आसक्तीच नाहीशी झाली. किती दिवस आंघोळ केली नव्हती काय माहिती. उलटीची एक प्रबळ इच्छा उचंबळून यायला लागली. अहो, हसताय काय? हसताय तुम्ही, जीव जायची पाळी आली होती माझी. पण लगेच स्टॉप आला आणि ते काका उतरून गेले, बरेच लोक त्या स्टॉपवर उतरून गेले पण तेवढेच पुन्हा चढले.

आता बसमध्ये उभं राहून ह्या घामाच्या आंबट वासात प्रवास करणे शक्य नाही, पुढच्या स्टॉपवर उतरून टॅक्सीने जाऊयात असा विचार करत होतो तोच एक चमत्कार झाला. एक धुंद सुवास नाकात शिरला. इतका वेळ डोळे उघडायची हिंमत नसल्याने डोळे बंद करूनच उभा होतो. भास झाला असेल असा विचार करून तसाच उभा राहिलो. पण परत तोच मंद आणि धुंद सुवास नाकात शिरला. डोळे उघडून समोर बघतो तोच एक मद्रदेशी भगिनी, केसांची एक वेणी असलेली आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा माळलेली, पाठमोरी उभी होती. गजराही चक्क भरघोस होता. त्यांतून येणारा तो सुगंध मला ह्या जगात पुन्हा परत आणत होता. त्याक्षणी मला माझा गजरा अप्रत्यक्षरित्या का होईना पण एकदाचा भेटला होता. माझा स्टॉप यायला अवकाश होता. ती मद्रदेशी भगिनी माझा स्टॉप येईपर्यंत उतरून न जाता तशीच माझ्यापुढे उभी राहो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करत होतो. त्यानेही ती ऐकली आणि देव आहे ह्याचीही जाणीव करून दिली. त्या मोगर्‍याच्या दरवळणार्‍या मंद आणि धुंद सुगंधापुढे जगातली सर्व परफ्यूम्स (अगदी मेड इन फ्रांस), कोलोन्स, डिओ वगैरे अगदी तुच्छ वाटते होती. त्या नैसर्गिक सुगंधामुळे सगळे मानवनिर्मित कृत्रिम सुगंध खुजे वाटावेत इतका तो मोगर्‍याचा सुवास ताजातवाना होता आणि माझी जगण्याची आसक्ती पुन्हा मार्गावर आणत होता.

आतापर्यंतचा माझा गजरा प्रवास आणि शोध असा अचानक पूर्ण होईल अशी स्वप्नातदेखील कधी कल्पना केली नव्हती. पण ‘देर आये दुरूस्त आये’ असे काहीसे म्हणतात त्याप्रमाणेच झाले खरे. तर आता ह्या दिवाळीला दर दिवशी एक असे वेगवेगळे गजरे बायकोसाठी आणून तिला ते माळायला लावून त्या नैसर्गिक सुगंधात दिवाळी साजरी करायची अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधली आहे.