चावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा

chawadee

हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या  श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!

चिंतामणी“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.

“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.

“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.

“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.

“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.

“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.

भुजबळकाका“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.

“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत.

“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.

चिंतोपंत“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.

“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.

“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.

“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.

भुजबळकाका“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.

“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.

“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

चिंतोपंत“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.

“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.

“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून बारामतीकर
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.

“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.

“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.

“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.

“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना

“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्‍यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.

पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्‍या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.

“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

chawadee

आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.

“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.

“बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.

“अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“बारामातीकर, कुठे आहे तुमचा जाणता राजा ह्या दुष्काळात? आहे का काही त्या माजी कृषीमंत्र्याला शेतकऱ्याचे?”, इति चिंतोपंत.

“अमेय खोपकर ह्या बॉलीवूड सेनेच्या अध्यक्षाने मनसे तर्फे बॉलीवूडला आवाहन केले आहे शेतकर्यांना सढळ हाताने मदत करायला, चांगला काम आहे!”, इति घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, हे असे आवाहन की आव्हान? ”, बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका हसत.

“हो ना, कसलं आवाहन न आव्हान, धमकीच म्हणा ना सरळ.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, अहो जमीन कसून अन्नधान्य पिकवणाऱ्याची काळजी करायला नको का?”, घारुअण्णा तिरमिरीत.

“काळजी तर करावीच ना, पण अशी दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवून?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, जागृती होतेय हे काही कमी आहे का? पावसाने कंबरडे मोडले आहे.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, तथाकथित बहुजन नेत्यांकडून काही सुरुवात झाली नाही म्हणून विरोध दुसरं काय?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! स्वतः: काय केलेय मदत करण्यासाठी? दुसऱ्यांना वेठीस का म्हणून?”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, हा कळवळा कृष्णकुंजातील गारेगार एसीमध्ये बसूनच आलाय ना? की विदर्भात किंवा मराठवाड्यात बसून आलाय?”, बारामतीकर शांतपणे.

“टोल आंदोलनात मिळालेलं काही द्यायचे की आधी स्वतः:, मग आवाहनं करायची दुसऱ्यांना!”, इति भुजबळकाका.

“ओह्हो! घारुअण्णा, आत्ता माझ्या लक्षात आलं कोण आयजी आणि कोण बायजी ते.”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जर मदत करतात तर बॉलीवूड कलाकार का करू शकत नाही असा सवाल विचारणारे हे टिकोजीराव कोण?”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“नाशिकच्या ‘नवणिर्माणा’तूनही काही ‘भले’ झालेच असेल की ते वापरायचे दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी”, बारामतीकर आवेशात.

“अहो पण हे शिंचे कलाकार कमावतात की खोऱ्याने मग सामाजिक बांधिलकी वैग्रे काही आहे की नाही?”, घारुअण्णा तणतणत.

“ते त्यांचं त्यांना ठरवू द्याना, त्यांची सामाजिक बांधिलकी ठरविणारे तुम्ही कोण? ”, भुजबळकाका हसत.

“अहो पण आपला नाना आणि मकरंद करताहेत ना? त्यांचे बघून तरी काही लाज बाळगायची…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. मराठी माणसाने मराठी माणसासाठी काही केले की लगेच बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकारांचा पोटशूळ कसा उठतो बघा! ”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“अहो राजने काहीतरी करून पक्षाची मोट बांधली आहे, पदं आणि पदाधिकारी उभे केले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही कामं नकोत का?”, सोकाजीनाना मंद हसत

“आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे मनसे पहिल्यांदा करते आहे का? शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा म्हणजे नेमके काय करा, ती मदत जर बॉलीवूडचे कलाकार करणार असतील तर त्यात मनसेचा काय रोल, ह्या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. ब्लु प्रिण्ट मध्येही हेच केले होते. आता, नाना आणि मकरंद मैदानात उतरून काही करताहेत हे दिसल्यावर अचानक एक विषय मिळाला प्रकाशात यायला. शेतकऱ्यांना पैसे वाटून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? त्यांच्या समस्या काय आहेत आत्महत्या करण्यामागच्या त्याचा अभ्यास करून, मुळाशी जाऊन, निराकरणासाठी काही ठोस कार्यक्रम राबवायला हवा ना! तसे करण्याची सोडा, नुसते विचार करण्याची तरी कुवत आहे का? नुसते सढळ हाताने मदत करा असे आवाहन कम गर्भित धमकी देऊन समस्या नाहीशी होते का? नाही! त्याने फक्त ‘उपद्रवमूल्य’ लोकांच्या मनात ठसवता येते आणि हेतू तोच आहे. ‘आम्ही आहोत अजून, आम्हाला विसरू नका एवढ्यात‘, हाच संदेश लोकांच्या मनातफ़ ठसवायचा आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

“आणि आपण बसतो आपापली अस्मितांची गळवं कुरवाळत, तथाकथित नेत्यांनाही तेच हवे असते. सोडा तो अकलेचा दुष्काळ आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना घारूअण्णांच्या खांद्यावर हात टाकत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – अफझलखानाचे सै(दै)न्य

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं…”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

‘शिवसेनाप्रमुखपद’ हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

“घारुअण्णा आणि नारुतात्या, तुम्ही समजताय त्या ‘बिपी’बद्दल बोलत नाहीयेत ते.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“बालक-पालक सिनेमा बघितल्यापासून त्यांचं हे अस्सच आहे अगदी!”, चिंतोपंत चर्चेत प्रवेश करत.

“अहो राजच्या मनसेच्या, बहुचर्चित आणि बहुआयामी ब्लु प्रिंट बद्दल बोलतोय मी! आता सांगा, बघितली का नाही ती महाराष्ट्राची ब्लु प्रिंट?”, बारामतीकर.

“नाही! वाचली नाही अजून, काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, ही मात्र हद्द झाली! अहो, नातवाने आयपॅड दिलाय ना तुम्हाला, त्याची काय पुजा घातलीय का? ”, बारामतीकर हसत हसत.

“इथे आयपॅडचा काय संबंध?”, चिंतोपंत बुचकळ्यात पडत.

“अहो, आधुनिकतेची कास धरत मनसेने ती ब्लु प्रिंट, एक वेबसाइट काढून, ऑनलाईन करून, पब्लिक डोमेनमध्ये आणलीय.”, बारामतीकर.

“बरंsssबरंsss, म्हणजे आमच्या नमोंचाच आधुनिकतेची कास धरण्याचा कित्ता गिरवलाय म्हणा की तुमच्या राजने!”, चिंतोपंत उपहासाने.

“झालं, ह्यांचा संघीय बाणा आला लगेच बाहेर!”, इति बारामतीकर.

“बरं, राहिलं! काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट ते तर सांगा…”, चिंतोपंत.

“काय सांगणार, नव्या बाटलीत जुनीच दारू, झालं!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“वाचलीय का तुम्ही ती ब्लु प्रिंटं?? की नेहमीचाच विरोधासाठी विरोध? ”, घारुअण्णा किंचित रागात.

“हो! वाचलीही आणि त्या वेबसाइटवरचा मुख्य पानावरचा व्हिडियोही पाहिलाय मी!”, भुजबळकाका शांतपणे.

“मग, काय म्हणताहेत नवनिर्माणकर्ते त्या व्हिडियोत?”, नारुतात्या.

“त्या व्हिडियोत जगाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची विहंगम सफर घडवून आणलीय महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आणि पर्यायाने नवनिर्माण करण्यासाठी!”, बारामतीकर गालात हसत.

“म्हणजे इथेही उद्धवच्या विहंगम फोटोग्राफीशी स्पर्धा आहेच म्हणा की.”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“थांबा हो नारुतात्या! बारामतीकर, नेमके आहे काय त्या व्हिडियोत असे?”, घारुअण्णा त्रस्त होत.

“वेब साइटीवर,‘महाराष्ट्राचा विकास आराखडा – होय, हे शक्य आहे’असा ओबामाचा‘येस, वी कॅन’हा कित्ता गिरवला आहे.”, बारामतीकर मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत.

“अहो, त्या व्हिडियोत काय आहे ते सांगा ना पण…”, घारुअण्णा चिडून.

“विकासासाठी दूरदृष्टी हवी आणि दूरदृष्टीला सौदर्यदृष्टीची जोड हवी असं म्हणताहेत नव-प्रबोधनकार. परदेशातली उदाहरणं द्यायची गरज नाही अस म्हणत सगळी परदेशातलीच उदाहरण दिली आहेत. सुंदरता आणि रचनेवर भर द्यावा लागेल हा मुद्दा मांडताना ते जनतेने करायचे आहे असे म्हणत त्यात सरकारची जबाबदारी कमीत कमी असावी म्हणत धूर्तपणे जनतेलाच जबाबदार धरले आहे आणि जबाबदारी जनतेवरच टाकली आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!”, बारामतीकर.

“ते जाऊदे, ते नेहमीचेच आहे. पण मला एका कळत नाहीयेय, महाराष्ट्राचे जाऊ दे, मुंबईचेपण जाऊदे म्हणतो मी, जे काही सौंदर्यपूर्ण नवनिर्माण घडवायचे आहे, महाराष्ट्रभर, त्याची झलक नाशकात का नाही दिसली? आराखडा नाशकात का नाही इंप्लीमेंट करून दाखवला? जसे मोदींनी‘गुजरात मॉडेल’च्या बळावर स्वतःला सिद्ध केले तसे‘नाशिक मॉडेल’बनवून विकास आराखडा सिद्ध करायचा होता ना!”, भुजबळकाका नेहमीच्या घीरगंभीर आणि ठाम भूमिकेत जात.

“तोच तर कळीचा मुद्दा आहे ना भुजबळकाका! ते असो, मी तो व्हिडियो बघितला आणि विकास आराखडाही वाचला. एकदम राजीव गांधींची आठवण झाली!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा बुचकळ्यात पडत.

“राजीवजींच्या भाषणांमध्ये ‘हमें ये करना है’ हे पालुपद असायचे त्याची अंमळ आठवण झाली.”, सोकाजीनाना मंद हसत, “तर ते ही असो, आमच्या कॉर्पोरेट जगतात माझा साहेब मला नेहमी म्हणायचा ‘Don’t come to me with problems, I know them, come to me with 2-3 solutions or approaches. I’ll decide which is best for the situation looking at the big picture’. त्या साहेबाची आठवण ताजी झाली मला व्हिडियो बघताना. पुन्हा पुन्हा देशाची, महाराष्ट्राची कशी काँग्रेसने वाट लावली आहे आणि समस्या काय काय आहेत तेच पुन्हा पुन्हा सांगितले, पण ते कसे बदलणार ते मात्र गुलदस्त्यात राहते या व्हिडियोमध्ये. म्हणून मग आराखडा वाचला तर तिथे ‘हे करायला हवं, असं व्हायला हवं’ असं सगळं संदिग्धच. नेमके नवनिर्माण आणि विकास आराखडा म्हणजे काय हे ठाम आणि भरीव असे काहीच नाही. ज्या गोष्टी आधी केलेल्या आहेत आणि करणे शक्य आहे तिथेच फक्त ‘आम्ही हे करू किंवा केले जाईल’ असे ठामपणे म्हटले आहे, बाकीच्या ठिकाणी ‘असे असायला हवे, असे करायला हवे’ असे सगळं संदिग्ध आहे. त्यामुळे नेमके काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे हा विकास आराखडा, एकंदरीत आतापर्यंतच्या केल्या गेल्या भाषणांचे आणि मुद्द्यांचे सुसुत्रीकरण करून, एकत्रित बांधणी करून केले गेलेले डॉक्युमेंटेशन, एवढाच निष्कर्ष काढता येतोय!”

“ज्जे बात, सोकाजीनाना!”, भुजबळकाका जोषात येत.

“त्यामुळे, ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ असं भुजबळकाका म्हणाले तरी आपण मात्र चहाच मागवूयात, काय?”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)

(मिसळपाव.कॉम दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित)

chawadee

“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“कोणाबद्दल बोलताय घारुअण्णा, आज कोणाची कंबख्ती?” नारुतात्या चिवड्याचे ताट ओढत आणि चेहऱ्यावर हसू आणत.

“तुमच्या त्या ‘राउल’ ऊर्फ पप्पूबद्दल बोलतोय मी, का उगाच वेड पांघरताय ह्या दिवाळीच्या मंगलमय सकाळी?” घारुअण्णा चकली ताटात टाकत, भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, त्यात त्याचे कसले आलेय कर्तृत्व? ते कर्तृत्व राजीवचे! खी खी खी…”, नारुतात्या चिवड्याचा बकाणा भरत आणि पांचट विनोद करत.

“नारुतात्या, कसले शिंचे पुचाट विनोद करतांय सकाळी सकाळी? मी सीरियसली बोलतोय!” घारुअण्णा करारी चेहरा करून.

बारामतीकर“अहो घारुअण्णा! नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?” बारामतीकर.

“बारामतीकर, ह्याची लायकी काय हो? आपल्या ह्या ‘आर्य सनातनी आसेतुहिमाचल भारतवर्षा’चे नेतृत्व करण्यासाठी आणि करोडो जनतेची धुरा वाहण्यासाठी आयात केलेले शिलेदार, सेनापती का लागावेत तुम्हाला?”, घारुअण्णा कसल्याश्या आवेशात.

“ह्म्म्म… तुम्हालाsss”, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“नाहीतर काय? आमचे मोदी बघा, असे ह्या अस्सल हिंदुस्तानच्या मातीतून तळपत पुढे आलेले अस्सल स्वदेशी आणि करारी नेतृत्व!”, चिंतोपंत घारुअण्णांच्या खांद्याला खांदा देत.

“घारुअण्णा, तुमची देशाबद्दलची व्याख्या अतिशय जातीयवादी आणि जनमानसाचे ध्रुवीकरण करणारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा तुकडा मोडत.

“वाटलेच मला, अजून कसे ह्यांनी ह्यांचे सेक्युलर तोंड उघडले नाहीं ते!” घारुअण्णा तिरीमिरीत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, देशाची व्याख्या राहू द्या तात्पुरती बाजूला. पण मला सांगा, ह्या काँग्रेसकडे, नेहरू घराण्याच्या ह्या लाडावलेल्या नातवाशिवाय दुसरे कोणते कणखर नेतृत्व नाही?” चिंतोपंत.

“नाहीतर काय, शिंचा युवराज म्हणे!” घारुअण्णा रागाने धुसफुसत.

“काय हो, काय प्रॉब्लेम काय तुमचा? उमदे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व आहे की राहुल!” इति बारामतीकर.

भुजबळकाका“हो, आणि नेमके तेच कारण सांगत संघश्रेष्ठींनी अडवाणींच्या गुडघ्याचे बाशिंग काढून घेतले ना?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा दुसरा तुकडा मोडत.

“अहो, देशात अतिरेकी कारवाया होत असताना हे तुमचे सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व परदेशात काय गुण उधळत होते, ते माहीत आहे आम्हाला!” घारुअण्णा रागाने चकलीचा चुरा करत.

“अहो, त्याने CII Industrial Meet मध्ये तोडलेले अकलेचे तारे आम्ही ऐकले आणि पाहिलेसुद्धा. काय म्हणे भारत मधमाशीचे पोळे आहे, भारतीय ट्रेन्समध्ये लोक नाही तर आयडियाज प्रवास करतात. पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणे आउटडेटेड सिलॅबस शिकवला जातो. नॉन्सेन्स!” चिंतोपंत करंजी मोडत.

“अहो चिंतोपंत, फक्त पायलट ट्रेनिंग नव्हे, पूर्ण शिक्षणपद्धतीचा बोर्‍या वाजलाय म्हणे. हा सुकळीचा म्हणे अमेरिकेत आणि केंब्रिजमध्ये शिकून सुशिक्षित झालाय! अरे, शिरा पडो तुझ्या तोंडात, शिंच्या, आमच्या भारतीय शिक्षण परंपरेला नावे ठेवतोय काय रे नापास गाडग्या!” घारुअण्णा रागाने अजून एका चकलीचा चुरा करत.

“अहो घारुअण्णा, कुठे भरकटत चालला आहात. मुद्द्याला धरून राहा. जनमताचे ध्रुवीकरण करणार्‍या जातीयवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या नेतृत्वापेक्षा हे सर्वसमावेशक सेक्युलर नेतृत्वच भारताचे भले करेल!” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडूचा घास घेत.

चिंतोपंत“बहुजनसम्राट, शब्द मागे घ्या! फॅसिस्ट काय, जातीयवादी काय? काहीही बोलाल काय? अहो, गुजराथचा झालेला कायापालट बघितला आहात काय? मोदी फॅसिस्ट आणि जातीयवादी असते तर गुजराथच्या जनतेने त्यांना निवडून दिले असते काय? गुजराथच्या जनतेचा सार्थ विश्वास आहे मोदींच्या कणखर नेतृत्वावर. गुजरातच्या विकासाचे व्यवस्थित पॅकेजिंग आणि मार्केटिंग करून गुंतवणुकीचा ओघ त्यांनी गुजराथेत वळवला आहे. आता हाच ‘गुजराथ पॅटर्न’ भारतभर राबविण्याची गरज आहे. विकास आराखड्याची गरज आहे आज भारताला. पण त्यासाठी सार्थ पुरोगामी वैचारिक बैठक असलेल्या नेतृत्वाची आज निकड आहे आणि नरेंद्र मोदी हाच सार्थ पर्याय आहे आणि ती काळाची गरजही आहे!” चिंतोपंत ठामपणे रव्याचा लाडू तोडत.

“अहो, गुजराथबाहेर ह्या मोदींना कोणी ओळखते का? राहुलचा दिल्लीपासून पार केरळपर्यंत जनमानसावर पगडा आहे. अखंड भारत त्याला आज ओळखतो आणि त्याला पंतप्रधानाच्या रूपात पाहतो आहे. तुमच्या भाजपात तरी एकवाक्यता आहे का? तिथेही तंगडीखेच चालू आहेच. नुसता विकास आराखडा नको आहे, तो सर्वसमावेशक हवा आणि तळागाळातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हवा.” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडू संपवत.

घारुअण्णा“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.

“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.

“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.

“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.

“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना“अहो, हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा पोकळ बुडबुडा ह्या दोन्ही पक्षाच्या थिंक टॅन्कने, मीडियाला हाताशी धरून, हवा देऊन फुगवला आहे. अहो, गाजराची पुंगी आहे ही दोन्ही पक्षांसाठी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, काय? त्यात तुमच्यासारखे अनुयायी आहेतच त्या बुडबुड्याला अजून हवा द्यायला. निवडणुकीआधी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत, असे पक्षावर कोणतेही बंधन नसते. ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते. अहो, निवडणुकीत जिंकेल जो जिंकायचाय तो. तुम्ही का आपापसात लढताय फुकाचे? तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा – कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. काय, पटतंय का?” सोकाजीनाना मंद हसत.

“चला, आज चहा नको. दिवाळीच्या मुहूर्तावर बायकोने बासुंदी करून दिली आहे सर्वांसाठी, ती घ्या आणि तोंड गोड करा!” सोकाजीनाना मिश्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या बासुंदीच्या वाट्या भरू लागले.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग…बरं… बरं… काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या ‘कांद्याचे भाव’  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी ‘आम आदमी पक्ष’ आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’

chawadee
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.

“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.

“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.

“कसली दुरुस्ती? काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.

“जे काम बाळासाहेबांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी केलं, झालं!”, इति भुजबळकाका.

“अच्छा म्हणजे सरांविषयी बोलता आहात तर आपण”, चिंतोपंत चर्चेत येत.

“हो! ‘मनोहर जोशी परत जा’, ‘मनोहर जोशी चले जाव’, शिवसैनिकांच्या अशा घोषणांमुळे सरांना व्यासपीठच नव्हे तर मेळावा सोडून जावे लागले.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो, हे तर धक्कादायक आहे!”, आता शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना! हे जरा अतीच झाले आणि काय हो बहुजनहृदयसम्राट ह्यात तुम्हाला का एवढा आनंद झाला आहे?”, चिंतोपंत जराशा त्राग्याने.

“आनंद नाही झालाय पण जे काही झाले ते खूप उशीरा झाले असे म्हणायचे आहे. अहो, खाजवून खरूज काढायचे आणि ते चिघळले की बोंबा मारायच्या असे झाले हे सरांचे चिंतोपंत”, भुजबळकाका.

“म्हणजे काय? कसली खरूज?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, दादरला एका नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी दिली काडी लावून. ‘शिवसेनेचे नेतृत्व आता बाळासाहेबांसारखे आक्रमक राहिले नाही’ ‘असे स्फोटक विधान केले. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही वर त्यांनी व्यक्त केली. आहे की नाही मज्जा!”, भुजबळकाका उपहासाने.

“बाळासाहेबांच्या स्मारकाचा खांदा करून, त्यावर बंदूक ठेवून त्यांनी उद्धवावर गोळ्या डागण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अंगाशी आला.” इति बारामतीकर.

“अगदी बरोबर बोललात बारामतीकर! अहो सरांचा हा बामणी कावा आजचा नाहीयेय. अगदी शिवसेनेत बाळासाहेबांच्या जवळ पोहोचल्या पासूनचा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“ओ बहुजनसम्राट असलात म्हणून उगाच काहीही बरळू नका! कसला बामणी कावा? वाट्टेल ते बोलाल काय?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत, इतिहास गवाह है! बहुजन समाजात, तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम ज्या छगनरावांनी केले त्यांच्यावरच शिवसेना सोडण्याची वेळ यावी यामागे कोणाचा आणि कोणता कावा होता हे सर्वांना माहिती आहेच.”, इति भुजबळकाका.

“बरं! ज्या शिवसेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळे त्यांचे स्वतःचे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले त्यांच्याच स्मारकावरून राजकारण करावे ही मात्र हद्द झाली.”, बारामतीकर तावातावाने.

“ ‘बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही, म्हणून त्यांचे स्मारक होण्यास विलंब होत आहे. त्यांची भाषा वापरली असती तर आतापर्यंत त्यांचे स्मारक उभे राहिले असते आणि आता स्मारकासाठी आंदोलन उभे राहिले तर त्यासाठी उभा राहणारा पहिला सैनिक मी असेन’, असली काहीतरी कावेबाज स्टेटमेंट पत्रकारांना देण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही”,भुजबळकाका

“अहो खरंआहे , एवढा जर पुळका होता स्मारकाचा तर द्यायचा एक कोपरा कोहिनूर मिलचा स्मारकासाठी पण नाही.”, इति बारामतीकर.

“अहो, मुळात स्मारक स्मारक हवेच कशाला! त्याने काय असे भले होणार आहे?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“अहो, इथे स्मारक हवेय कोणाला, त्याच्या आडून राजकारण करायला मिळते ना!”, बारामतीकर.

“अहो शिवसेनेत आल्यापासून फक्त राजकारणच आणि तेही घाणेरडे राजकारण करणारे सर काय म्हणताहेत बघा ‘राजकारण आणि धोरणीपण एकत्र असतात. बाळासाहेब २0 टक्के राजकारणी आणि ८0 टक्के समाजकारणी होते. त्यांनी राजकारणाला नाही तर समाजकारणाला महत्त्व दिले. बाळासाहेब निवडणुका जिंकणारे राजकारणी नव्हते, म्हणूनच ते आदर्श राजकारणी होते.’, आहे की नाही मज्जा आणि चिंतोपंत, तुमच्यासाठी ‘बामणी’ हा शब्द वगळतो, पण ह्यात तुम्हाला कावा दिसत नाही?”, भुजबळकाका हसत.

“अहो, साहेबांच्या जवळ असल्याने ह्यांनी स्वतःच्या फायद्याचे राजकारण करून, स्वतःचे भले करून घेतले खरे पण त्याचबरोबर शिवसेनेचे भले करण्याऐवजी नुकसानच केले त्यांनी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदी बसवले त्याचीही चाड ठेवली नाही.”, बारामतीकर.

“चालायचेच, तुमच्या साहेबांच्याच जास्त जवळ आहेत म्हणे ते बाळासाहेबांपेक्षा, वाण आणि गुण लागायचाच मग!”, नारुतात्या गालातल्या गालात हसत.

“नारुतात्या, उगाच आमच्या साहेबांना मध्ये आणायचे काम नाही!”, बारामतीकर जरा चिडून.

“का हो का? शिवसेना आणि बाळासाहेब ह्या चर्चेत पवारसाहेबांचा विषय येणे अपरिहार्यच आहे हो!”, नारुतात्या गालातल्या गालातले हसणे चालू ठेवत.

“नारुतात्या, पोरकटपणा करून उगाच विषयांतर करू नका!”, भुजबळकाका वैतागत.

“अहो, बहुजनहृदयसम्राट, नारुतात्यांच्या बोलण्यात तथ्य आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“ऑ?”, घारुअण्णा एकदम चमकून.

“अहो, दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी दादरला नवरात्र मंडळात केलेला मेलोड्रामा ह्यात एक छुपे कनेक्शन नक्कीच आहे.”, सोकाजीनाना मिश्किल हसणे कायम ठेवत.

“सोकाजीनाना, स्पष्ट बोला ब्वॉ! ह्या खोपडीत काही शिरले नाही.”, नारुतात्या हार मानत.

“सोपे आहे हो सगळे. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही. थोडा हे थोडे की जरुरत है असेच त्यांचे अजूनही चालले आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा लोभ आणि ती धोक्यात येताना दिसणारी उमेदवारीच ह्या सगळ्या मर्कटलीला करण्यास त्यांना भाग पाडत आहे.”, सोकाजीनाना

“अहो पण सोकाजीनाना, त्याने उद्धवावर तोफा डागून काय होणार आहे?”,चिंतोपंत प्रश्नांकित चेहेर्‍याने.

“अहो तीच तर सरांची खासियत आहे! आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्‍या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात ‘कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही’ असा शालजोडीतलापण दिला!”

“थोडक्यात काय, सुंभ जळला तरीही पीळ जात नाही अशी, ‘राजकारणी आणि कावेबाज’ मनोहरपंत सरांची, आजची अवस्था आहे! काय पटते आहे का? चला, चहा मागवा!”, मंद हसतसोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

chawadee

“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत.

“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो! पण एवढ्यातच 2014 च्या निवडणुका जिंकल्याचा आनंद झाल्यासारखे आनंदित होऊ देऊ!”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, भाजपासाठी आणि ‘भाजपेयीं’साठी!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी भाजपा – पार्टी विथ डिफरन्स ह्याचा अर्थ काय ते कळले!”, नारुतात्या पुन्हा पांचट विनोद करत.

“हो ना! इतर पक्षांपेक्षा तसूभरही कमी नसून, इतर पक्षांत आणि भाजपा मध्ये काही नाही डिफरन्स हे नक्कीच आता कळले तमाम भारतीय जनतेला.”, बारामतीकर.

“बारामतीकर, नारुतात्यांना कसला पोचच नाही हे ठाक आहे, पण तुम्ही सुद्धा?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, राहू द्या! अडवाणीजींनी यापुढे आपण पक्षाचे केवळ प्राथमिक सदस्य असणार आहोत असे म्हणत सगळ्या पदांचा राजीनामा देणे, हे ह्या लाखों हजार रुपयांचे घोटाळे करणार्‍यांच्या पक्षाच्या समर्थकांना कधी कळणार नाही. कसलाही हव्यास नसलेले निष्काम कर्मयोगी यांना काय समजणार?”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“निष्काम कर्मयोगी! ह्म्म्म”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“अहो डोंबलाचे निष्काम कर्मयोगी. एकेकाळी देश पेटवला होता ना ह्याच तुमच्या निष्काम कर्मयोग्याने, विसरलात का? राममंदिराच्या नावाखाली देशभर आयोजीत केलेली रथयात्रा हा सत्तेसाठी केलेला निष्काम कर्मयोग होता काय हो घारुअण्णा? आणि चिंतोपंत प्रत्येक वेळी ह्या नारुतात्याचा पोच काढण्याची काही गरज नाही!”, नारुतात्या .

“बरंsssबरंsss, तुम्ही जुन्याच मुळी उगाळत बसा! अहो वेळ काय घटना काय? तुम्ही बरळताय काय?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तेच म्हणतो मी, अहो वेळ काय घटना काय? व्यक्ती कोण आणि निष्काम कर्मयोगी काय?”, इति बारामतीकर.

“बरें, निष्काम कर्मयोगी राहूदे पण देशासाठी आणि देशातील जनतेच्या भल्यासाठी लढणारा एक सच्चा देशभक्त तर आहेत ते!”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“अहो पण त्यांचे मूळ गाव आणि जन्म पाकिस्तानात आहे ना, जन्माने पाकिस्तानीच आहेत ते?”, इति नारुतात्या.

“नारुतात्या तुम्ही गप्प बसा!”, घारुअण्णा रागात घुमसत.

“नारुतात्या, तुम्ही शांत बसा बरे जरा. पण घारुअण्णा, असा राजीनामा देण्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत नाही का? ”, चिंतोपंत.

“शिंचा, कसला अंतर्गत कलह आता?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा, हा राजीनामा म्हणजे, नरेंद्र मोदींची भाजपच्या निवडणूक प्रचारसमिती प्रमुखपदी झालेली निवड लालकृष्ण अडवाणी यांना फार रुचली नसल्याचे द्योतक आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“मग त्यात काय चूक आहे? एवढ्या अनुभवी आणि ज्येष्ठं नेत्याला काही किंमत आहे की नाही?”, घारूअण्णा जरा तडकून.

“हे बघा, त्यांची किंमत त्यांचीच घालवली असे माझे मत आहे?”, बारामतीकर ठामपणे .

“नक्कीच, माझ्यालेखी त्यांची किंमत तेव्हाच शून्य झाली होती जेव्हा त्यांनी बाबरी पाडल्याचा जाहीर राष्ट्रीय निषेध व्यक्त केला होता.”, नारुतात्या घुश्शात.

“घ्याsss ह्यांची गाडी अजूनही तिथेच अडकली आहे?”, घारुअण्णा उद्विग्नतेने.

“अहो पण मोदींचा उदोउदो तुम्ही लोकांनीच चालवला होता ना? मग आता निवडणूकीची धूरा त्यांच्या सक्षम हातात दिली तर त्यात एवढे राजीनामा देण्यासारखे काय आहे?”, भुजबळकाका शांतपणे.

“देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली आहे. हा अनाठायी उपदेशही बहुदा त्यांना झोंबला असावा. संघाकडून नथीतून मारला गेलेला हा तीर असावा असा त्यांचा समज झाला असावा.”, बारामतीकर ठामपणे.

“नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नसावी. 2014 निवडणूका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी हाच पर्याय उचित आहे. अडवाणीजींनी निदान आता तरी असे कृत्य करायला नको होते.”,चिंतोपंत खिन्नपणे.

“नाही चिंतोपंत, तोच तर कळीचा मुद्दा आहे ना! अडवाणींचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पंतप्रधान पदाचा असलेला सोस काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो, आचरटपणा आहे हा सगळा. त्यांनी पाठवलेले राजीनाम्याचे पत्र वाचलेत का? पक्षाची सद्य स्थिती आणि पक्षाची दिशा यांची बऱ्याच दिवसांपासून ते सांगड घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणे! तशी सांगड घालताना त्यांना साक्षात्कार झाली की भाजपा हा मुखर्जी आणि दीनदयाळ यांनी स्थापन केलेला आदर्श पक्ष राहिला नसून मतलबी लोकांची बजबजपुरी झाला आहे. बरें ही परिणती आताच व्हायचे कारण असावे? तर, मोदींची हवा बर्‍याच दिवसांपासून तयार होत होती. त्यामुळेच तर अडवाणींनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. पण आता नरेंद्र मोदींचे भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी झालेले शिक्कामोर्तब ह्यात त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदी बसण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होताना दिसला असणार. त्याच एकमेव आशेवर तर त्यांनी इतके दिवस तग धरला होता. आदर्श पक्ष वैगरे सगळ्या बाजारगप्पाआहेत, खरा पोटशूळ आणि कळीचा मुद्दा ‘पंतप्रधानपद’ आहे आणि ते आता हातातून जाताना दिसते आहे.”

“मोदी हा उत्तम पर्याय आहे! त्यामुळे विसरा हे राजीनामा नाट्य. काय पटते आहे का? तर चहा मागवा चटकन!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.