श्रावण मोडक उर्फ श्रामो

गुरुवारी दुपारी झोपलो होतो तेव्हा प्रसाद ताम्हणकरचा फोन आला, “पुण्यात आहेस का? बिपीनला फोन कर, श्रामो गेले.” एवढेच सांगून त्याने घाईत फोन बंद केला. मला काही कळलेच नाही तो काय म्हणाला ते आणि जेव्हा तो काय म्हणाला याची संगती लागली तेव्हा एक प्रचंड धक्का बसला आणि श्रावण मोडकांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आला. काय करावे तेच कळत नव्हते. बातमी कदाचित खोटी असावी अशी शक्यताही नव्हती कारण असली अश्लाघ्य मस्करी कोणी करणे शक्य नव्हते. तरीही एक मन ही बातमी खोटी असावी अशी वेडी आशा लावत होते. लगेच बिपीनला फोन लावला. त्याने, तो मुंबईत हॉस्पीटल मध्ये आहे आणि पार्थिव घेऊन रात्री 9-10 वाजे पर्यंत पुण्यात पोहोचू असे सांगितले. त्या फोननंतर पुण्यातल्या मित्रांना फोन करून रात्री डेक्कन जवळ भेटून पुढे अंत्यसंस्कारासाठी जायचे ठरवले. त्यानंतर पुन्हा पुन्हा श्रावण मोडकांचा हसरा आणि मिश्किल चेहरा डोळ्यांपुढे येत राहिला आणि मन भूतकाळात गेले…

मी मिसळपाव.कॉम वर लिहायला लागायच्या आधी बरेच दिवस नुसताच वाचक होतो. तेव्हा मोडक, लेखांवर येणार्‍या त्यांच्या प्रतिसादांतून भेटले होते. त्या प्रतिसादांमधली त्यांची भाषा आणि विचारपूर्ण आणि मॅच्युअर प्रतिसाद वाचून ह्या व्यक्तिमत्त्वाशी प्रत्यक्षात भेट झाली तर किती बहार येईल असे त्यावेळी वाटायचे. मिसळपाव.कॉम वर लिहायला लागल्यावर पहिल्या व्हिस्कीच्या लेखावर त्याचा थेट प्रतिसाद आला नव्हता. एका प्रतिसादाला उप-प्रतिसाद आला होता त्यांचा. त्यानंतरच्या जपानच्या ‘हानामी’च्या लेखावर आलेला पहिला प्रतिसाद हा मोडकांचा होता, थेट प्रतिसाद.

पहिल्या लेखानंतर लगेचच 1-2 महिन्यात पुण्यात एक कट्टा ठरवला होता मला भेटण्यासाठी, प्रसादने. बिपीन येणार येवढेच माहिती होते. डेक्कन जिमखान्यावर भेटायचे ठरले होते. मी प्रसादबरोबर तिथे पोहोचलो तर तिथे एक बुटकी, विचित्र फ्रेंच कट असलेली दाढी, मागे फिरवलेले केस, दाढीचे वाढलेले खुंट आणि तोंडात जळती सिगारेट असलेली एक व्यक्ती आधीच पोहोचली होती. प्रथमदर्शनी मनात विचार आला “कोण ब्वॉ हे ध्यान!” तेवढ्यात प्रसादने ओळख करून दिली. “हे श्रावण मोडक म्हणजे श्रामो! एकेकाळचे पत्रकार.” त्यावर श्रामोंनी मिश्किल हसत, स्पष्ट आणि कणखर आवाजात “नमस्कार!” असे म्हणत मला खिशात टाकले. त्या मिश्किल हसण्याने त्यांची आणि माझी वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखा ओळखीचा ओलावा 5 मिनिटात झाला. पुढे सर्वजण आल्यावर, टेबलावर बसल्यावर श्रामो पीत नाहीत असे कळले आणि अचंबा वाटला. गप्पांच्या ओघात श्रामोंबद्दलची जुजबी माहिती इतरांकडून कळली. पण सिगारेट ओढण्याकरिता बाहेर जावे लागत असल्याने मला त्यांच्याबरोबर एकट्याने गप्पा मारायची संधी मिळाली. त्यात त्यांच्या पत्रकारितेचा ओझरता उल्लेख त्यांच्याकडून आला.

पण त्या गप्पांमध्ये ते स्वतःबद्दल बोलणे टाळून माझी माहिती घेत होते. पहिल्या भेटीत मी मात्र स्वतःचे ‘सेलिंग’ करण्याच्या नादात होतो, ही कॉर्पोरेट क्षेत्रातील सवय आता एकदम आत मुरली आहे. श्रामोंशी तेव्हा माझी पहिलीच भेट असल्याने ‘श्रामो’ ही नेमकी काय ‘चीज’ आहे ते अजून कळायचे होते. मध्येच मग माझ्या लिखाणावर चर्चा झाली त्यावेळी ते, दारू आणि कॉकटेल्स ह्या विषयावर मी मराठीत लिहिण्याविषयी आणि एक शैली जोपासून लिहिण्याबद्दल मनापासून आणि समरसून अर्धा तास माझ्याशी बोलले. त्यावेळी त्यांनी दारू बंद केली असल्याचे समजले. मी ही “का?” वगैरे असले प्रश्न विचारण्याच्या फंदात पडलो नाही. त्या पहिल्या भेटीनंतर 2-3 वेळा प्रत्यक्षात भेट झाली पण फोनवर गप्पा नेहमी चालू असायच्या.

2011 च्या ऑगस्ट मध्ये त्यांचा एक फोन आला, “सध्या बिझी आहेस का पुढचे काही आठवडे?” मी का? असे म्हटल्यावर म्हणाले, “सामना दिवाळी अंकासाठी लेख हवा आहे. विषय तुझाच आहे, दारू पिण्यातला भ्रष्टाचार अशी थीम आहे.” पुढच्या 2-3 मिनिटात त्यांनी त्यांच्या डोक्यात काय आहे ते सांगितले. आता मला श्रामोंशी बोलण्याची एवढी सवय झाली होती की त्यांना नेमके काय म्हणायचे आहे ते लगेचच कळायचे. त्यानंतर 5-6 दिवसांनी त्यांना लेखाचा मसुदा पाठवला. लगेच फोन आला, “प्रत्यक्षात भेटणे जमेल का? विषय हातचा जाऊ नये अशी इच्छा आहे.” एवढेच बोलले. मी लेखात भरकटलो आहे त्याची मला जाणीव झाली. त्याच रात्री डेक्कनवर पूनमला भेटलो. अक्षरशः पंधरा-वीस मिनिटात आमचे लेखावरचे बोलणे संपले. त्यानंतर मात्र दीड दोन तास इतर विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. त्यांचे पत्रकारिकेतले किस्से, राजकारण आणि राजकारणी, दारू, मराठी संस्थळे, मिसळपाव वरच्या मित्रांचे जुने किस्से असे बरेच काही. एकदा श्रामो बोलायला लागले की विषयाचे बंधन अजिबातच नसायचे.

पुढे दिवाळी अंकात तो लेख प्रकाशित झाल्यावर त्यांचा फोन आला, “चल, आता लेखक झालास तर तू!” फोनवर जरी बोलत असलो तरी त्यांच्या चेहेर्‍यावरचे त्यांचे टिपीकल मिश्किल हास्य मला दिसत होते. “पार्टी कधी देतोस?” असे त्यांनी विचारल्यावर मी त्यांना हसत-हसत म्हणालो, “श्रामो, तुमच्याबरोबर सुकी पार्टी करण्यात असली आलीय मजा! बघा, ‘बसणार’ असाल तर जमवू एक मैफिल.” त्यावर ते जे म्हणाले त्यावर विश्वासच बसला नाही. ते म्हणाले, “लेका, तुझ्याबरोबर एकदा मैफिल जमवायचीच आहे. मी दारू सोडली असली तरीही त्या मैफिलीत तुझ्याबरोबर शँपेन जरूर घेणार आहे. पण त्याची वेळ आणि काळ मी ठरवीन.” त्यांच्या डोक्यात माझ्या कॉकटेल्सचे ‘आयफोन ऍप’ डेव्हलप करायचे होते. ते लाँच करतानाच्या पार्टीला ते माझ्याबरोबर शँपेन घेणार होते.

त्यानंतर मी चेन्नैला आलो आणि भेटी बंद झाल्या. पण स्काइप आणि फोनवरून गप्पा व्हायच्या. माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा मी एक आभार प्रगटनाचा एक लेख लिहिला होता. त्यात मी श्रावण मोडकां विषयी लिहून त्यांचे आभार मानले होते. त्यांना फोन करून तसे सांगितले. पंधरा मिनिटात त्यांचा फोन आला, “आय ऍम ओब्लाइज्ड! पण मी काहीही केलेले नाही”. त्यावर मी त्यांना गमतीने म्हणालो, “दिव्याला थोडीच माहिती असते की त्याचा प्रकाश कुठे कुठे पडतो आहे ते.” त्यावर ते म्हणाले होते, “पुरे! पुण्यात आलास की नक्की भेटू आणि ‘आयफोन ऍप’ वर पुढची चर्चा करू.” मग मीही त्यांना, “तुमची शँपेन उधार आहे माझ्यावर, भेटावे तर लागेलच”, असे म्हणालो आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो.

ओळख आणखी दृढ झाल्यावर फेसबुकवर दोघेही एकमेकांच्या फ्रेंडलिस्ट मध्येही आलो. माझ्या प्रोफाइलवर, फोटो अल्बम्समध्ये माझ्या मिनीबारच्या अल्बमवर त्यांची कमेंट आली होती,“आपली भेट खूप उशिरा झाली राव.” त्यावर माझी कमेंट होती, “@Shravan Modak: अशी निरवानिरवीची भाषा का बुवा? अजूनही वेळ गेलेली नाही.”

…आणि परवा बिपीनला फोन करून त्याच्याशी बोलणे झाल्यावर नेमकी तीच कमेंट प्रकर्षाने आठवली आणि डोळ्यात टचकन पाणी आले.

श्रामो, शँपेनची बाटली उधारच राहिली की हो माझ्यावर!
😦

राजेश सातमकर

शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर.

१९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही. त्यात पहिल्या आठवड्यात ज्याच्या बाजूला बसलो होतो तो समदु:खी असावा ह्या अपेक्षेने त्याला विचारले, “तुला कळते का रे?” तर तो एकदम फुशारकीने म्हणाला, “हं, त्यात काय? कळते आहे सगळे.” त्याच्याशी पुढे बोलणे झाल्यावर कळले की त्याची ‘मेरिट’ ३ मार्कांनी हुकली होती. च्यायला, माझी तर बोलतीच बंद झाली. मग, मराठी माध्यमातून शिकलो असल्याने आणि त्या वातावरणात बिचकून जायला होत असल्याने, समदु:खी मित्रांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यात पहिला मित्र भेटला धनुराम. वेव्हलेंग्थ जुळली. त्याची तोपर्यंत बर्‍याच जणांशी मैत्री झालेली होती.

भौतिकशास्त्राला एक प्रोफेसर नायर होते शिकवायला. मिलिटरी रिटायर्ड माणूस, सणसणीत आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा. प्रयोगशाळेत कसलेतरी संशोधन करत असलेला उपद्व्यापी माणूस. पहिल्या महिन्यातच माझी जर्नल तपासताना त्यांनी माझी भर प्रयोगशाळेत सर्वांसमोर लाज काढली, कारण काय? तर मी Specimen ह्याचे स्पेलिंग मी Speciman असे केले होते. मला त्यावेळी मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. सर्व इंग्लिश मिडीयमकर ‘कुठून येतात कोण जाणे’ असल्या नजरेनी बघत होते माझ्याकडे त्यावेळी, त्यामुळे भयंकर अपमानित व्ह्यायला झाले होते.

रिसेसमध्ये, कॅन्टिनमध्ये, धनुरामबरोबर बसून जवळजवळ रडतच बोलत बसलो होतो. तोच खांद्यावर हात आणि कानावर, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” हे शब्द एकाचवेळी पडले. कोण बाबा हे म्हणून मागे बघितले तर एक काळा सावळा, शिडशिडीत, किंचित कुरळे असलेल्या, बारीक कापलेल्या केसांचा तेल लावून चपटा भांग पाडलेला, मिसरूड फुटलेला, दाढीची लव तुरळक वाढलेला, चेहेर्‍यावर तारुण्यसुलभ तारुण्यपीटिका, उंचीने माझ्यापेक्षा एखादं इंच कमी असलेला मुलगा, स्वच्छ आणि निखळ हसत माझ्याकडे बघत होता. त्यावेळी हसताना त्याचे चमकणारे शुभ्र दात आजही मला लख्ख आठवतात. “राजेश, राजेश सातमकर”, असे म्हणत त्याने मला ‘शेक-हॅन्ड’ केला. त्या हाताच्या उबदार आणि घट्ट पकडीबरोबरच मैत्रीचे नातेही त्या पकडीसारखेच घट्ट होणार ह्याची खात्री त्याच्या निर्मळ आणि निखळ हास्याने त्यावेळी झाली.

तोही माझ्यासारखाच इंग्रजीला काहीसा वैतागला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही इंग्रजीला वैतागून जायचो, कोणी नवीन प्रोफेसर किंवा मॅडम येऊन इंग्रजी झाडून गेल्या आणि काही कळले नाही की कॅन्टिनमध्ये चहा पीत पीत राजेश त्याचे नेहमीचे पेटंटेड वाक्य ऐकवायचा, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” पण तो माझ्याइतका वैतागलेला नसायचा. त्याचे कारण मी त्याला एकदा न राहवून विचारले तेव्हा कळले की त्याची थोरली बहीण कुठल्याश्या नामांकित कॉलेजात शिकणारी आणि स्कॉलर होती. ती त्याचा अभ्यास घ्यायची. “च्यायला, नशीबवान आहेस रे तू”, असे मी त्याला म्हणायचो तेव्हा तो मुग्ध हसायचा.

त्यानंतर आमचे मैत्रीचे बंध जुळत गेले आणि राजेश सातमकर कळत गेला. पहिल्या आठवड्यात माझा बाजूला बसलेला सो कॉल्ड ‘स्कॉलर’ ज्याची मेरिट ३ मार्कांनी हुकली होती तो आणि राजेश गिरगावातल्या एकाच शाळेतले विद्यार्थी आणि वर्गबंधू आहेत हे समजल्यावर मी चाटच पडलो. कारण तो स्कॉलर राजेशशी जास्त बोलायचा नाही आणि मैत्रीचा ओलावा तर कधीच जाणवायचा नाही. मला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे. पण पुढे कळले की राजेशचे वडील त्यांच्या शाळेत शिपाई होते. राजेश त्यांच्या शाळेतला एक स्कॉलर होता. त्याचे जरा जास्त कौतुक व्हायचे शाळेत कारण कठिण परिस्थितीत राहूनही त्याची शैक्षणिक प्रगती देदीप्यमान होती आणि ते कौतुक त्या स्कॉलरला आवडायचे नाही.

हुषार असलेला राजेश स्वभावाने अगदी सरळ आणि सज्जन कॅटेगरीतला होता, नाकासमोर चालणारा. त्याच्या तोंडून कधीही अपशब्द यायचे नाहीत. खूप चिडला, हे ही क्वचितच व्हायचे, की मात्र “नालायक” एकढाच एक जहाल शब्द त्याच्या तोंडून पडायचा पण लगेच त्याच्या निखळ हास्याने त्या शब्दाची जहालता शीतल होऊन जायची. माझ्या तोंडाचे तर तेव्हा गटारच असायचे. भकारात्मक शब्दांनीच वाक्यं सुरू व्हायची आणि संपायचीही. त्यावेळी तो मला उपदेश न करता नुसते डोळे मोठे करून निषेध नोंदवायचा. त्याच्याबरोबर मी ‘इक्विलिब्रियम’वर एक फिजिक्सचा प्रोजेक्ट केला होता. त्यात एक बाहुली असते जिला असेही वाकवले आणि पाडले तरीही ती पुन्हा मूळ स्थितीत येते असा तो प्रोजेक्ट होता. चेष्टेने मी त्या बाहुलीला ‘जड बुडाची’ म्हणायचो. त्यावेळी मात्र माझ्या त्या शब्दावर तो मनमुराद हसला होता, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत.

त्या नंतर मला आमच्या पॉलीटेक्निकच्या शेजारी असलेल्या मिठीबाई कॉलेजचा शोध लागला. त्या कॉलेजात बर्‍याच बॉलीवूडच्या नट्या शिकून गेल्या आहेत ही बातमी कळल्यावर लेक्चर बंक करून दुपारी मिठीबाई कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये सौंदर्यस्थळे न्याहळीत बसणे आणि घरी जाताना भागुबाईवरून अंधेरी स्टेशनला न जाता मिठीबाई कॉलेजवरून चालत चालत विले पार्ले स्टेशनला जाणे हा भागुबाईमधील जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन बसला होता. मी लेक्चर बंक करून मिठीबाईला जातो ह्याचा त्याला विलक्षण अचंबा वाटायचा. त्याचा निषेध तो, “अरे, तू एका शिक्षकाचा मुलगा आहेस ना, तुला हे शोभत नाही” असे बोलून व्यक्त करायचा. मला त्यावेळी खरंतर त्याचा खूप राग यायचा पण त्याच्या हसण्याने तो मावळूनही जायचा. मिठीबाई कॉलेजवरून स्टेशनला जाताना हा पठठ्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं जायचा. मग मी त्याला खूप पिळायचो. “अरे, भोxxx, ही हिरवळ बघ ना बाजूची. सौंदर्याचा नजरेने तरी आनंद घे” असे म्हणायचो. खूप वैतागलो की मग मी माझा एक ठेवणीतला डायलॉग त्याच्यावर फेकायचो, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा? म्हणून म्हणतो, बघ जरा आजूबाजूला फुललेले हे ताटवे!” त्यावर तो फक्त मंद हसायचा आणि त्याचा हुकुमाचा एक्का बाहेर काढायचा, “हे तुझे थोर आणि साहित्यिक विचार जर तुझ्या वडिलांनी ऐकले तर त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार कधी केला आहेस का?” आता ह्यावर काय बोलणार? “मर भोxxx”, असे बोलून मी त्याला टपल्या मारायचो.

पहिल्या सेमिस्टरला सगळे जण चक्क पास झालो. त्यामुळे त्याच्या “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” ह्या पालुपदाची धार कमी झाली असली तरी सज्जनपणाच्या आचरणाची धार अणुकूचीदार होत होती. त्याचे मिठीबाई कॉलेजवरून जातानाचे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत जाणे अजूनही कायम होते. फक्त एक फरक पडला होता. तो बर्‍याच वेळा गैरहजर असायचा दुसर्‍या सेमिस्टर मध्ये, आजारी असायचा. त्यामुळे आणि दुसर्‍या सेमिस्टरला जरा मॅच्युरिटीही आल्यामुळे माझे मित्रांचे विश्वही जरा बदलले होते. कूपर हॉस्पिटलाकडच्या बाजूच्या एका टग्या मुलांचा अड्डा असलेल्या बस स्टॉपचा शोध लागला होता. तिथे वावर वाढला असल्याने राजेशचे गैरहजर असणे तसे जाणवायचे नाही. तसेही तो मला नेहमी मी त्या बस स्टॉपवर जाऊ नये म्हणून वेळोवेळी झापायचाही. पण मैत्रीचे वीण तशीच घट्ट होती.

दुसर्‍या सेमिस्टरच्या शेवटी किंवा तिसर्‍या सेमिस्टरच्या सुरुवातीला तो खूप दिवस आलाच नाही. चक्क चाचणी परीक्षेलाही आला नाही. हे मात्र अचंबित करणारे वर्तन होते. मग त्याच्या वर्गमित्र, सो कॉल्ड स्कॉलर, याला आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करून यायला सांगितले. आम्ही त्याची केलेली मनधरणी त्याने तशीही धुडकावून लावली होती कारण तो अंधेरीला राहायला आला होता. पण कोणत्यातरी प्रोफेसरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन यायला सांगितल्यामुळे त्याला जावे लागले. एका वीकएंडला तो गिरगावात जाऊन आला. सोमवारी आल्यावर,“राजेश खपला” असे तो आम्हाला म्हणाला. दोन मिनिटे मला तो नेमके काय म्हणतोय ते कळलेच नाही. मग नंतर कळले की राजेश सातमकर ह्या जगात नव्हता. माझी तर हे ऐकून दातखीळच बसली. सर्व जाणिवा एकदम बधीर होऊन सुन्न व्हायला झाले. त्याचा हसरा चेहेरा नजरेसमोर फेर धरून नाचू लागला आणि त्याला मजे मजेत म्हटलेले, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा?” हे राहून राहून आठवायला लागले.

राजेशला बोन कॅन्सर होता. एखाद्या साध्या सरळ माणसाबरोबर नियती कसा खेळ खेळेल हे सांगणे कठीण असते. मात्र  राजेशशी नियतीने खेळलेला हा खेळ मनाला चटका लावून गेला. त्याला एकदा, “काय रे, काय आजारी असतोस सारखा? कुठल्या डॉक्टरला दाखवलेस?” असे विचारले असताना त्याने टाटा हॉस्पिटलाचा केलेला उल्लेख आठवून त्याची लिंक त्यावेळी लागली. अतिशय जवळचा बनलेल्या आणि कायम हसत राहणार्‍या राजेशचे असे अचानक सोडून जाणे मनाला चटका लावून गेले होते. काही कारणामुळे त्याच्या घरी कधी जाता आले नाही. 1-2 मित्र त्याच्या घरी त्याच्या तेराव्याला जाऊन आले. मला का कोण जाणे, जायची प्रचंड इच्छा असूनही जावेसे वाटले नाही आणि गेलोही नाही. त्या गोष्टीची बोच अजूनही मनात कायम आहे.

आजही जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या की ती राजेश सातमकर आवर्जून आठवतो आणि मनात एक आवाज उमटतो, “राजेश, गेलास भोxxx, पण एकदा जरा मिठीबाईच्या रस्त्यावरून अलीकडून चालला असतास तर ‘समजा उद्या जर गचकलास’ ह्या माझ्या वाक्याची बोच मला आयुष्यभर बाळगावी लागली नसती”.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, “च्यामारी, काय आचरटपणा आहे हा”, असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते. त्यामुळे त्या लिखाणाला मान्यता मिळाली आणि बरेच जण पुढे होऊन धीटपणे त्या प्रकारचे लेखन करू लागले.

इथं पर्यंत ठीक होते. एक वाचक म्हणून वाचकाला प्रस्थापित साहित्याबरोबरच एक आगळा साहित्यप्रकार अनुभवायला मिळून त्याचे अनुभवविश्व समृद्ध होण्याचा एक मार्ग खुला झाला होता. पण पुढे त्याला लागू नये ते वळण लागले. ते मुख्यत्वे राजकीय छापाचे आहे. त्या नंतर तो गट प्रबळ होत गेला. खरेतर हे साहित्य समृद्धतेचे आणि प्रगतीचे लक्षण असायला हवे होते. पण वाचकांच्या दुर्दैवाने तसे न होता ‘एकाने गाय मारली तर दुसर्‍याने लगेच वासरू मारावे’अशा मार्गाने तो गट एका चळवळीचे रुपडे घेऊन पुढे आला. पुढे ते त्यांना विद्रोही असे म्हणवून घेऊ लागले.

पण मुळात विद्रोही म्हणजे काय? आणि विद्रोही साहित्य म्हणजे काय? ह्यावर त्या गटातच एकवाक्यता नाही असे मला वाटत होते कारण मलाही हे विद्रोही साहित्य म्हणजे शोषित समाजातील लेखकांनी लिहिलेले साहित्य असेच वाटायचे. म्हणजे त्याची व्याप्ती तेवढीच मर्यादित होते होती. त्यामुळे ह्या वर्षी एक सोडून दोन विद्रोही साहित्य संमेलन होणार म्हटल्यावर हसूच आले होते. अरे, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून परिवर्तन आणायचे आहे ना? मग निदान चूल तरी एक मांडा अशा मताचा मी होतो. त्यामुळे एक आचरटपणा ह्यापलीकडे त्याकडे लक्ष द्यावे असे मला कधीही वाटले नाही. कारण चिपळूणच्या संमेलनाच्या ‘परशू’ वरून झालेला गोंधळ आणि नंतर विद्रोही साहित्य संमेलनातील मान्यवरांनी तोडलेले तारे ह्यामुळे हा सगळा फार्स आहे असेच मला वाटते.

खरेतर कोणतेही साहित्य संमेलन का? हाच मूलभूत प्रश्न मला छळतो. ह्या संमेलनामुळे रसिकांचे आणि वाचकांचे काय भले होते हेच मला कळलेले नाही. पण त्यामुळे हे प्रस्थापित आणि विद्रोही ह्यांच्या मत-मतांतराच्या भुलभुलैयात न फसण्याचे मी माझ्यापुरते ठरवले होते.

पण आज एका मित्राने खालील चित्रफीत पाठवली आणि वैचारिक गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली. भालचंद्र नेमाड्यांना मिळालेल्या जन्मस्थान पुरस्काराच्या सोहळ्यात त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यात त्यांनी व्यवस्था म्हणजे काय आणि त्यात कसे परिवर्तन अपेक्षित आहे हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे.

ह्या भाषणात त्यांनी भारतातील सर्व वर्गातील स्त्रियांनी राम मंदिराला विरोध करायला हवा असे म्हटले आहे. ते तसे का? तेही त्यांनी त्या भाषणात मांडले आहे. ते ऐकल्यावर मला एकदम डॅन ब्राउनची दा-विंची-कोड ही कादंबरी आठवली. त्यात त्याने मांडलेली थियरी आठवली. त्याने मांडलेली ती थियरी प्रस्थापित चर्चच्या मतांशी द्रोह जरी असला तरीही तो त्याच्या मतांनी विद्रोही ठरतो कारण तो प्रस्थापित चर्चव्यवस्थेच्या वेगळे होऊन काही मांडू इच्छितो.

ह्या भाषणाने, विद्रोही आणि विद्रोही साहित्य म्हणजे नेमके काय असायला हवे, ह्याबद्दल माझ्या मनात एक नक्कीच वेगळी विचारधारा सुरू व्हायला मदत झाली आहे.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

ब्लॉग माझा 2012 : चलचित्रफीत

एबीपी माझा ह्या TV वाहीनीद्वारे नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. अशोक पानवलकर, संपादक – महाराष्ट्र टाइम्स, दीपक पवार, संचालक – मराठी अभ्यास केंद्र, इरावती कर्णिक, लेखिका व नाटककार हे ह्या स्पर्धेचे परिक्षक होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. जवळपास 160 ब्लॉगर्सनी त्यांचे ब्लॉग्स स्पर्धेसाठी पाठविले होते.

या स्पर्धेत माझ्या ह्या ब्लॉगला पुरस्कार मिळाला आहे. तुम्हा सर्व वाचकांमुळेच हे शक्य झाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाची ही चलचित्रफीत:

ब्लॉग माझा ह्या स्पर्धेचा कौतुक सोहळा

ब्लॉग माझा 2012 ह्या स्पर्धेचा कौतुक सोहळा उद्द्या, रविवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३०वा. एबीपी माझा ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

30 मिनीटांच्या ह्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग 27 जानेवारीला झाले होते. दिपक पवार ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सर्व विजेत्यांचे त्यांच्या ब्लॉगबद्दलचे व्यक्त केलेले मनोगत ह्या कार्यक्रमातून दाखविले जाणार आहे.

मला स्वत:ला हा कार्यक्रम दूरदर्शनवर बघता येणार नाहीयेय (चेन्नैत असल्याने). याच दिवशी abpmajha.in या वेबसाईटवर हा एपिसोड अपलोडही केला जाईल.

एबीपी माझा आणि माझी 2 मिनीटांची ‘बाइट’

काल, रविवारी, आयुष्यात आणखी एक माइलस्टोन पार पडला, टी.व्ही. वर चमकण्याचा…

एबीपी माझा या सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा 2012’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आपापल्या ब्लॉगची माहिती सांगण्याची प्रत्येकी 2 मिनीटांची ‘बाइट’, अश्या 30 मिनीटांच्या कार्यक्रमाचे रेकोर्डिंग करायचे आहे अशा स्वरुपाचा मेल एबीपी माझाचे एडीटर प्रसन्न जोशी यांच्याकडून आला. मनामध्ये आनंदाचे भरते आले. त्याचबरोबर बाकीच्या विजेत्यांना भेटण्याची प्रत्यक्षात संवाद साधण्याची संधी प्राप्त चालून आली होती.

लहानपणी शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घेतल्यावर तोंडाला रंग लागला होता. आता टी.व्ही. वर चमकण्याच्या निमीत्ताने पुन्हा एकदा तोंडाला रंग लागेल अशी आशा होती. पण तसे काहीच झाले नाही. ज्या अवतरात आम्ही गेलो होतो त्याच अवतारात आमचे रेकॉर्डिंग झाले. मी माझ्या मनाची, “लेका, एका फुटकळ ब्लॉगवर, लेखांना मिळणार्‍या चार पाच प्रतिसादांचा मालक तु, तु काही सेलेब्रिटी नव्हेस तुझी साग्रसंगीत, मेकअप करुन मुलाखत घ्यायला.”, अशी समजूत घातली.

पण मनाने तशी उचल खायला, आशा पल्लावित व्हायला कारणीभूत झाला होता विनोद कांबळी. तन्मय कानिटकर ह्या एका सपर्धा विजेत्याबरोबर एबीपी माझाच्या कॅंटीनमध्ये बसून चहा पित होतो. मध्येच तिथे विनोद कांबळी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याचा अवतार एवढा चकचकीत होता की त्याला केलेला मेकअप जाणवत होता. त्यामुळी आपल्यालाही असेच चकचकीत करतील अशी आशा पल्लवीत झाली होती हो, दुसरे काही नाही. असो, पण ह्या कार्यक्रमानिमीत्ताने त्या एका न्युज चॅनेलच्या, एबीपी माझाच्या, स्टुडियोत रेकॉर्डिंगला जायची संधी प्राप्त झाली, एका वेगळ्याच अनुभवाची भर, हे ही नसे थोडके.

15 विजेत्यांपैकी 12 जण स्वतः आले होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. दिपक पवार, परिक्षक पॅनेल मधले एक परिक्षक, ह्यांच्याशी स्पर्धेतील ब्लॉग निवड प्रक्रिया कशी किचकट होती आणि त्यांनी निवडीचे निकष काय ठेवले ह्यावर चर्चा त्यावेळी झाली. एकंदरीत मजा आली.

कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची वेळ अजून कळली नाहीयेय. बहुदा पुढच्या आठवड्यात असावा. वेळ कळली की इथे मिनी पोस्टच्या रुपात कळवतोच.

प्रमाणपत्र

चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर

chawadee

“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“नाहीतर काय? औरंगजेबाचा जिझिया कर काय वेगळा होता ह्याच्याहून?”, घारुअण्णा चिंतोपंतांची बाजू उचलून धरत.

“अहो, पंत आणि अण्णा नेमके काय झाले ते तरी सांगाल का?”, इति नारुतात्या.

“अहो नारुतात्या, वर्तमानात राहतं चला की जरा!”, घारुअण्णा चिडून.

“अहो, सरकारने घर खरेदी करताना द्यावयाच्या मुद्रांक शुल्कासाठी ग्राह्य धरल्या जाणार्‍या रेडी रेकनर दरात ५ ते ३० टक्क्यांनी वाढ करून टाकली आहे ह्या नवीन वर्षात. नववर्षाची सप्रेम भेट!”, चिंतोपंत तणतणत.

“काय असते हे रेडी रेकनर?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“नारुतात्या, एखाद्या प्रॉपर्टीची स्टॅम्प ड्यूटी ठरविण्यासाठी शासनाने ठरविलेला दर म्हणजे रेडी रेकनर.”, इति भुजबळकाका.

“अजून जरा इस्कटून सांगा ना, नेमके काय ते कळले नाही.”, नारुतात्या एकदम बावचळून.

“अहो, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा, त्या एरियातल्या प्लॉटच्या सर्वे नंबरप्रमाणे, तेथील सदनिकांचा दर शासन ठरवते, म्हणजे सरकारी दर. त्या दराप्रमाणे प्रॉपर्टीच्या स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते. हा दर बाजारभावापेक्षा वेगळा असू शकतो.”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे, जर समजा एखाद्याकडे खूप काळा पैसा आहे आणि त्याने तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवायचा ठरवला आणि स्टॅम्प ड्यूटी कमी करण्यासाठी सदनिकेचा दर अत्यल्प दाखवून रजिस्ट्रेशन करायचे ठरवले तर स्टॅम्प ड्यूटीची किंमत कमी होऊन सरकारचा महसूल बुडेल ना? तसे सुरुवातीला हे खूप मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे सरकार ते तसे होऊ नते म्हणून, त्यावर ‘शासन’ म्हणून, एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या एरियाचा सरकारी दर ठरवते. त्याप्रमाणे त्या सरकारी दरानुसार स्टॅम्प ड्यूटीची किंमत ठरते.”, भुजबळकाका.

“च्यायला असे आहे होय, किचकटच मामला आहे हा!”, नारुतात्या अचंबित होऊन.

“नारुतात्या, काही किचकट नाहीयेय, समजून घेतले की सगळे कळते. उगाच ह्याचा बाऊ आपण करतो आणि सरकार व बिल्डरांनाही तेच हवे असते.”, इति बारामतीकर.

“पण काय हो बारामतीकर, हे बिल्डर तर तुमच्याच साहेबांचे कच्चे बच्चे आणि फायनांन्सर ना?”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! ५ ते ३० टक्के झालेली ही वाढ ‘कार्पेट’ आणि ‘बिल्ट-अप’ एरिया ह्याच्यात असलेल्या, किंबहुना जाणून बुजून करून ठेवलेल्या घोळामुळे, प्रत्यक्षात ५० टक्के असेल असे ह्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“बांधकामाच्या वस्तूंचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, माझ्या मते तर ते जाणून बुजून भिडवले असावेत, त्याने घराच्या किमती आधीच वाढलेल्या, त्यात पुन्हा हा नवा बोजा, मध्यमवर्गाने घरं घ्यायची कशी? ”, चिंतोपंत.

“सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने तो महसूल ह्या मुद्रांकाच्या मार्गाने तिजोरीत भरण्याचा मार्ग शासनाने अवलंबला आहे.”, इति भुजबळकाका.

“तेच तर, माझा मुख्य मुद्दा आणि आक्षेप हाच आहे, तो म्हणजे, हा जो काही जादा महसूल गोळा होणार आहे त्याच्या विनियोगा मध्ये काही पारदर्शकता असणार आहे का? दरवेळी असा जनतेच्या खिशातून ओरबाडलेला हा पैसा, जनकल्याणासाठी वापरला जातो का?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“च्यायला ही तर मोगलाई झाली, म्हणजे आमच्या खिशातून लागेल तसा पैसा काढायचा आणि त्याला हव्या त्या मार्गाने आपल्याच खिशात किंवा घशात टाकायचा ही राजकारण्यांची ‘शासन’पद्धत अफलातूनच आहे!”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“अहो, ते मोगल परकीय तरी होते, ते मुळात बाहेरुन आलेच होते लुटालूट करायला. हे तर हरामखोर सगळे आपलेच भारतीय बांधव ना? ”, घारुअण्णा रागाने तांबडेलाल होत.

“त्यात पुन्हा बिल्डर लॉबी आहेच वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळायला, फ्लोअर इंडेक्स, सुपर बिल्ट अप, वॅट अन् काय काय.”, भुजबळकाका खिन्नतेने.

“अहो त्याच्या जोडीला मेंटेनन्स ही भली मोठी कटकट आहेच. माझ्या एका मुंबैच्या नातेवाइकाच्या मुलाने त्याचा मुंबईतला फ्लॅट विकून टाकला मेंटेनन्स परवडत नव्हता म्हणून. EMI च्या ¼ होत होता म्हणे त्याचा मेंटेनन्स. पुण्यातही हे फॅड बोकाळायला वेळ लागणार नाही.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो, मग सर्वसामान्य माणसाने घराचे स्वप्न बघायचेच नाही की काय?”, नारुतात्या हताश होत.

“ऑ! अहो, मग मी काय म्हणत होतो आल्या आल्या?”, चिंतोपंत डोक्यावर हात मारत.

“सोकाजीनाना, म्हणजे आता पुण्यातही एक ‘धारावी’ येऊ घातलीय तर!”, नारुतात्या सोकाजीनानांकडे बघत.

“ही राजकारणी आणि बिल्डरांची अभद्र युती अशीच राहिली तर तसे होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“आधी, काळ्या पैशाचा ओघ थांबवण्यासाठी आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी सुरू केलेला हा ‘रेडी रेकनर’, पैसा छापण्याची टाकसाळ आहे हे लक्षात यायला राजकारण्यांना जराही वेळ लागला नाही. ज्या पद्धतीने सगळीकडे हे बिल्डिंगांचे पेव फुटले आहे त्यानुसार रोजची रजिस्ट्रेशनांची संख्या बघितली तरी त्यातून मिळणारा महसूल कोणाचेही डोळे फिरवेल. शिवाय रजिस्ट्रेशनच्या वेळी घेतली जाणार्‍या ‘फी’च्या काळ्या पैशाचा आकडा काढला तर सर्वसामान्य माणसाचे डोळेच पांढरे होतील. त्यातून कोणत्या आधारावर, सर्व्हेवर, ही दरवाढ केली गेली ह्याचाही काही पत्ता नाही. आंधळी-मुकी जनता तिला कसेही हाका! हाच मंत्र झाला आहे आजच्या राजकारणाचा. आणि वर्षाला जवळजवळ २० हजार कोटी इतका महसूल जो गोळा होतो त्याचे नेमके काय होते हे गुलदस्त्यातच राहते. त्यामुळे हालवले की पैसा देणार्‍या ह्या ‘मागच्या दारातल्या’ पैशाच्या झाडाला काही सरकार पानगळ येऊ देणार नाही. त्याला खतपाणी घालून हिरवेगार ठेवण्याचाच हा एक प्रकार आहे, झालं.”, सोकाजीनाना उद्विग्नपणे.

“सोडा हो, आता आपल्याला घरं घ्यायची नाहीत, ह्याच्यातच मनाचे समाधान मानून घ्या आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

गजरा – एक प्रवास

(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)

लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर ‘गजरा’ नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे. पण प्रत्यक्ष बघितल्यावर बहुतकरून तो पांढर्‍या रंगाचा असतो हे बघून थोडा हिरमोडच झाला होता.

त्यानंतर गजर्‍याशी तसा काही प्रत्यक्ष संबंध कधी आलाच नाही. पण पुढे मिलिंद बोकिलांच्या शाळा ह्या कादंबरीचा नायक, मुकुंद जोशी, ह्याच्या वयाचे झाल्यावर, मुकुंदाप्रमाणेच, त्या पौगंडावस्थेतील वयात मित्रांबरोबर आपापली शिरोडकर शोधताना ह्या गजर्‍याशी अप्रत्यक्ष संबंध आला. त्या वयात वाचायला मिळू शकणार्यार आणि त्या वयात झेपू शकणाऱ्या कादंबर्‍यांमधून (आमच्या गावातील सार्वजनिक वाचनालयातील लायब्ररीयन, आचार्यकाकू, यांचा बारीक डोळा असायचा आम्ही कुठली पुस्तके वाचतो ह्यावर. एकदा काकोडकर चोरून वाचताना त्यांनी मला पकडले आणि अशी काही हजामत सर्वांदेखत केली की तोंड दाखवायला जागा नव्हती उरली काही दिवस. तेवढे कमी नव्हते म्हणून की काय कोण जाणे, वडिलांनाही “मुलगा मोठा झाला बरं का!” असं सांगितलं, त्यामुळे घरी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लाय तो अजूनही लक्षात आहे) नायिकांची जी काही शृंगारिक वर्णने वाचली होती त्यात नेहमी मोहक हालचाल करणारे घाटदार नितंब, त्यावर घोळणारा लांबसडक केसांचा, एका वेणीचा शेपटा आणि त्यावर माळलेला गजरा हा हटकून असायचाच. त्यामुळे त्या मोहमयी दिवसांमध्ये मग नेहमी एक वेणी आणि त्यावर गजरा माळणारी आपली शिरोडकर शोधताना खूप मजा यायची. एक वेणी आणि गजरा हे सौंदर्याचे परिमाण ठरून गेले होते. पण त्या पौगंडावस्थेतील वयाच्या नशिबात शिरोडकर काही विधात्याने लिहून ठेवलेली नव्हती, त्यामुळे गजर्‍याचा आणि माझा संबंध काही पुढे सरकला नाही.

कॉलेजात गेल्यावर, नुकतीच फुटलेली मिसरूड साफ करून जरा आधुनिक विचारांचे आणि प्रगल्भ झालो असे वाटू लागल्याने गजरा घालणे म्हणजे अगदीच डाऊनमार्केट, ‘काकूबाई’छाप मुली गजरा घालतात असा समज मनात घट्ट रुतून बसला होता. त्यामुळे गजर्‍यापासून अजूनही दुरावला गेलो. पण आता कॉलेजातल्या लायब्ररीमध्ये आचार्यकाकू लायब्ररीयन नव्हत्या त्यामुळे तिथल्या लायब्ररीत आणि आता शाळकरी नसल्याने आचार्यकाकूंचा तेवढा वचकही राहिला नसल्याने, गावातल्या लायब्ररीत, काकोडकरांच्या जरा ‘वरच्या’ लेव्हलची पुस्तके वाचायला मिळू लागली. त्यावेळी अचानक गजर्‍याचा अजून एक महत्त्वाचा पैलू पुढे आला. ह्यावेळी तो स्त्रीचे नितंब आणि त्यावरची वेणी ह्यावर विराजमान न होता चक्क पुरुषाच्या मनगटावर लगडलेला होता. माडी चढण्यासाठी तोंड रंगवणार्‍या तांबूल सेवनाबरोबरच ह्या श्वेतवर्णी गजर्‍याचे असणे, हे किती अनिवार्य आहे ह्याची जाण आली. पण पुढे त्या भलत्याच आळीचा रस्ता सभ्य माणसे धरत नाहीत असे कळले. समाजामध्ये अभिमानाने म्हणजे ताठ मानेने जगण्याकरता आणि मिरवण्याकरता स्वतःला सभ्य म्हणवून घेणे किंवा तसे चित्र निर्माण करणे ही फारच अत्यावश्यक बाब आहे हे सत्यही तितक्याच प्रकर्षाने कळले असल्याने त्या भलत्याच आळीचा रस्ता पकडणेही कधी जमले नाही. हाय रे कर्मा, त्या तसल्या प्रकारेही माझा गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध येणे घडले नाही.

शाळेतही शिरोडकर काही भेटली नाही आणि कॉलेजातही. त्यासाठी नशिबाची साथ फार जोराची असावी लागते असे म्हणतात. पण मला खरं विचाराल तर नशीब वगैरे काही नसते, त्यासाठी एक धमक अंगात असावी लागते. तसली धमक काही माझ्या अंगात नव्हती. त्यामुळे मग नशीब वगैरे असले काहीबाही कारण शोधावे लागते, आपली दुर्बलता झाकण्यासाठी, दुसरे काही नाही. त्यामुळे मग लग्न करतेवेळी, मुलगी बघून, सर्वांच्या संमतीने यथासांग ‘अरेंज्ड मॅरेज’ अशा प्रकाराने झाले. लग्नानंतर माझ्या काही खास आणि हौशी मित्रांनी मधुचंद्रासाठी माझी बेडरूम सजवण्याचे काम अतिशय प्रेमाने अंगावर घेऊन ते तडीला नेले. संपूर्ण खोली रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजवली होती. बेडवरही फुले पसरून ठेवली होती. बेडच्या बाजूच्या टेबलावर गजरे ठेवलेले होते. ते गजरे बघताक्षणीच गजर्‍याबद्दलच्या आतापर्यंतच्या सर्व आठवणी जाग्या होऊन शेवटी गजर्‍याशी प्रत्यक्ष संबंध आला बुवा एकदाचा ह्या जाणीवेने एकदम सुखावून गेलो. मधुचंद्राची रात्र, जिवाभावाच्या मित्रांनी प्रेमाने सजवलेली बेडरूम, गजरे आणि सोबत सुंदर अशी नवी नवरी, अहाहा, स्वर्ग असाच असावा कदाचित असा विचार मनात आला. आनंदाने आणि काहीश्या धडधडत्या छातीने बेडवर पडलो आणि गजरा हातात घेऊन तो तिच्या केसात माळण्यापूर्वी तिला माझी गजरा कहाणी सांगत होतो. बेडवर पडल्यानंतर साधारण ३-४ मिनिटाने एक विचित्र जाणीव होऊन सर्व अंगाला खाज येऊ लागली, काही कळेचना असे काय होतेय ते. मग उठून बघितल्यावर कळले की एक गडबड झाली होती. बेडरूमची खिडकी उघडी राहिली होती. मित्र रूम सजविण्याच्या नादात खिडकी बंद करायला विसरले होते. त्या खिडकीतून त्या फुलांच्या वासाने बरीच वेगवेगळ्या प्रकारची बारीक, नजरेला सहज न दिसणारी, चिलटं त्या बेडवर पसरलेल्या फुलांवर आणि बेडवरच्या फुलांच्या माळांवर येऊन बसली होती. मग ती सर्व बेडवरची फुले आणि बेडला लावलेल्या सर्व फुलांच्या माळा काढल्या आणि बेडवरच्या बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवून बेडरूमच्या कोपर्‍यात ती बेडशीट टाकून दिली. त्या सर्व प्रकारानंतर त्या गजऱ्यांचाही धसका घेऊन ते गजरेही मग त्याच बेडशीटवर टाकून दिले. ऐन मधुचंद्राच्या उन्मादक रात्रीही गजर्‍याचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध येता येता राहिला. त्यानंतर काही परत माझा आणि गजर्‍याचा संबंध आला नाही.

आता अलीकडेच कामानिमित्त म्हणजे नवीन नोकरीकरता चेन्नैत मद्रासी अण्णा होऊन राहावे लागतेय. आमच्या कंपनीची दोन ऑफिसेस चेन्नै शहराच्या उत्तर – दक्षिण टोकाला आहेत. एक थेट शहराच्या मध्यवर्ती भागात, हेड ऑफिस आणि दुसरे तिथून १५-२० किमी अंतरावर शहराच्या बाहेर दुसर्‍या टोकाला. मला ह्या दोन्ही ऑफिसेसमध्ये ये-जा करावी लागते. चेन्नैत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदी छान आहे. शहराचे सर्व भाग बस मार्गाने व्यवस्थित जोडलेले आहेत. त्या बस सेवाही मस्त आहेत. सुपर डिलक्स, डिलक्स आणि आम बस असे तीन प्रकारच्या बसेस शहरात धावतात. आम बस ही व्हाईट बस असते म्हणजे पांढर्‍या रंगाची पाटी असलेली असते आणि ती सर्व स्थानकांवर थांबते आणि हिचे तिकीट भाडे अतिशय कमी म्हणजे स्वस्त असते. ह्या प्रकाराव्यतिरिक्त ए.सी. बसेसही असतात. चेन्नैतल्या भयंकर उकाड्यात ह्या ए.सी. बसेस म्हणजे अगदी स्वर्ग असतात. माझ्या ऑफिसच्या मार्गांवर ह्या ए.सी. बसेस धावत असल्याने मी नेहमी ह्याच बसने प्रवास करतो. सर्व प्रकारच्या बसमध्ये त्यांच्या भाड्याप्रमाणे गर्दी आणि प्रवास करणारी जनता असते.

हो हो कळतंय, अचानक मी एकदम असल्या रूक्ष विषयात कसा काय घुसलो असे वाटायला लागले ना तुम्हाला? नाही हो! विषयांतर नाही करत आहे. कळेलच तुम्हाला, ट्रस्ट मी.

तर एकदा सिंगापुरावरून काही सीनियर मंडळी भारतात एका मीटिंगकरिता आली होती. मला त्या मीटिंगला हजर राहायचे होते. त्यासाठी मी बस स्टॉपवर उभा होतो बसची वाट बघत. त्या दिवशी नेमका काही तरी घोटाळा झाला होता. ए.सी. बस काही केल्या वेळेत येत नव्हत्या. मीटिंगला वेळेवर पोहोचणे गरजेचे होते. पहिल्यांदाच वरिष्ठांची ओळख वाढवायची संधी प्राप्त झाली होती. त्यामुळे जास्त वाट बघत वेळ घालविणे परवडणार नाही, काय करावे, टॅक्सीने जावे का असा विचार करत होतो. तेवढ्यात 29C ही एक व्हाईट बस स्टॉपवर आली. रिकामी होती म्हणजे बसायला जागा नव्हती पण उभे राहायला व्यवस्थित जागा होती. लगेचच चढलो बस मध्ये….

पुढच्याच स्टॉपवर बस मध्ये हीsss गर्दी झाली. पहिल्यांदाच व्हाईट बसमध्ये चढलो होतो. त्यामुळे ती बस सर्व स्टॉपवर थांबत थांबत ही गर्दी अशी वाढतच जाणार हे काही लक्षात आले नाही आणि पुढे सरकत सरकत (की ढकलला जात जात?) बसच्या मधल्या भागात आलो. आता बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती तरीही बस स्टॉपवर थांबत होती आणि लोकं बसमध्ये शिरतच होती. माझी अवस्था काही विचारू नका. मुंबैच्या लोकलमध्ये जशी अवस्था होते नेमकी तशीच अवस्था बसमध्ये झाली होती माझी. उभं राहायला देखील धड जागा नव्हती. जर लिओ टॉलस्टॉयने ह्या बसने प्रवास केला असता तर त्याने त्याची ‘माणसाला किती जागा लागते’ ही कथा लिहिली नसती असाही एक विचार त्यावेळी मनात येऊन गेला. आजूबाजूला ‘एक्स डिओडरंट’ची किंबहुना कुठल्याच डिओडरंटची जाहिरात नेमकी कशाची असते हे अजूनही न कळलेले समग्र चेन्नैकर दर स्टॉपगणिक माझ्या जीवाची घालमेल वाढवीत होते. घामाच्या त्या आंबट वासाने जीव गुदमरून जात होता. त्यातच एक काका उतरायचे म्हणून सीटवरून उठले आणि नेमके माझ्या पुढेच, नाकासमोरच, वरच्या दांड्याला हात पकडून उभे राहिले आणि मला ब्रह्मांड आठवले. नाकातले केस पार जळून गेले, जगण्याची आसक्तीच नाहीशी झाली. किती दिवस आंघोळ केली नव्हती काय माहिती. उलटीची एक प्रबळ इच्छा उचंबळून यायला लागली. अहो, हसताय काय? हसताय तुम्ही, जीव जायची पाळी आली होती माझी. पण लगेच स्टॉप आला आणि ते काका उतरून गेले, बरेच लोक त्या स्टॉपवर उतरून गेले पण तेवढेच पुन्हा चढले.

आता बसमध्ये उभं राहून ह्या घामाच्या आंबट वासात प्रवास करणे शक्य नाही, पुढच्या स्टॉपवर उतरून टॅक्सीने जाऊयात असा विचार करत होतो तोच एक चमत्कार झाला. एक धुंद सुवास नाकात शिरला. इतका वेळ डोळे उघडायची हिंमत नसल्याने डोळे बंद करूनच उभा होतो. भास झाला असेल असा विचार करून तसाच उभा राहिलो. पण परत तोच मंद आणि धुंद सुवास नाकात शिरला. डोळे उघडून समोर बघतो तोच एक मद्रदेशी भगिनी, केसांची एक वेणी असलेली आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा माळलेली, पाठमोरी उभी होती. गजराही चक्क भरघोस होता. त्यांतून येणारा तो सुगंध मला ह्या जगात पुन्हा परत आणत होता. त्याक्षणी मला माझा गजरा अप्रत्यक्षरित्या का होईना पण एकदाचा भेटला होता. माझा स्टॉप यायला अवकाश होता. ती मद्रदेशी भगिनी माझा स्टॉप येईपर्यंत उतरून न जाता तशीच माझ्यापुढे उभी राहो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करत होतो. त्यानेही ती ऐकली आणि देव आहे ह्याचीही जाणीव करून दिली. त्या मोगर्‍याच्या दरवळणार्‍या मंद आणि धुंद सुगंधापुढे जगातली सर्व परफ्यूम्स (अगदी मेड इन फ्रांस), कोलोन्स, डिओ वगैरे अगदी तुच्छ वाटते होती. त्या नैसर्गिक सुगंधामुळे सगळे मानवनिर्मित कृत्रिम सुगंध खुजे वाटावेत इतका तो मोगर्‍याचा सुवास ताजातवाना होता आणि माझी जगण्याची आसक्ती पुन्हा मार्गावर आणत होता.

आतापर्यंतचा माझा गजरा प्रवास आणि शोध असा अचानक पूर्ण होईल अशी स्वप्नातदेखील कधी कल्पना केली नव्हती. पण ‘देर आये दुरूस्त आये’ असे काहीसे म्हणतात त्याप्रमाणेच झाले खरे. तर आता ह्या दिवाळीला दर दिवशी एक असे वेगवेगळे गजरे बायकोसाठी आणून तिला ते माळायला लावून त्या नैसर्गिक सुगंधात दिवाळी साजरी करायची अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधली आहे.

चावडीवरील गप्पा – सचित्र झलक

नमस्कार मंडळी! चावडीवरच्या गप्पांची मैफल आवडते ना? चावडीवरील सर्व वल्ली आहेतच एकदम नग, एकापेक्षा एक. आजपर्यंत त्यांच्या गप्पा जशा तुम्ही ऐकल्यात तशा त्या, माझी मिसळपाव.कॉम वरील मैत्रिण पूजा पवार हिनेही ऐकल्या आणि ती सोकाजीनानांची फॅन झाली. त्यांच्या चहाची चाहत तिला एकदम भावली. तिने मिसळपाव च्या दिवाळी अंकात ह्या सर्व मंडळींची एक फर्मास चर्चा ‘हौन जाउ दे’ असा आदेश दिला. (हो, ती आदेशच देते!) त्याला मिसळपाव वरील अजुन एक कलाकार मित्र, अभिजीत देशपांडे ह्याने दुजोरा देत ही फर्मास चर्चा सचित्र करुयात असा प्रस्ताव मांडला आणि ह्या वल्लींना दृश्य रुप द्यायचा विडा उचलला.

त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडीवरील सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार आणि अभिजित देशपांडे या दोघांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा
हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका
हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर
हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची ‘साहेबांच्या’ प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर ‘साहेबांचे’ बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा ‘टग्या’दादांवर अतिशय राग आहे, त्या ‘टग्या’दादांमुळे  ‘साहेबांची’ प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या
हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी ‘बेंबट्या’ होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत
हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोकाजीनाना
तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी
अस्मादिक
सर्वात शेवटी अस्मादिक 🙂